महाराष्ट्र दर्शन - भाग ३/ "वेरूळ "

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
22 Nov 2010 - 5:04 pm

भाग १ - http://www.misalpav.com/node/15474
भाग २ - http://www.misalpav.com/node/15500

अर्ध्या तासात वेरूळ आले सुद्धा ......
मला नुकतीच झोप लागली होती.... परत बस मधून उतरा.... तेसुद्धा १ च्या रणरणत्या उन्हात...... जीवावर आलं होत....
"पण" वेरूळ ला जाण्याचीच एवढी ओढ होती, कि बाकीचे त्रास त्यापुढे नगण्य वाटत होते.....
एका मोठ्या "उद्यानासमोर" बस थांबली .......समोरच वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्या दिसत होत्या....
बघूनच मन "प्रसन्न" झालं....

आमच्या गाईड ची पीर पीर सुरु झाली .
इथे एकूण ३४ लेण्या आहेत . त्यातल्या पहिल्या १२ बौद्ध, नंतरच्या १७ हिंदू .आणि शेवटच्या ५ जैन धर्माच्या आहेत....
विशेष म्हणजे या सर्व लेण्या वेगवेगळ्या कालखंडात बांधल्या गेल्या आहेत.......
वेरूळची लेणी साधारणत: इ.स.च्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातली बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांमधली परस्परसहिष्णुता प्रकर्षाने दाखवतात.

मी तर थक्कच झालो होतो....
एवढ्या प्रचंड गुंफा ....... ती एक प्रकारची शांतता (एवढे पर्यटक असून सुद्धा)
जणू त्याच काळात जाऊन पोहोचलो होतो.....
पहिल्या लेणीत "गौतम बुद्ध " ध्यानस्थ बसलेले होते......
(अंधार प्रचंड असल्याने फोटो नीट येत नव्हते )

पुढे आलो तर एक भव्य २ मजली इमारत होती.....

याला "विहार" असे म्हणतात .... या विहारात "बौद्ध भिक्कू" त्यांची ध्यान धारणा, वेगेरे करत असत....
हॉटेल सारख्या यात छोट्या छोट्या खोल्या कोरलेल्या आहेत.....
इतकंच नव्हे तर या खोल्यांमध्ये दगडाचे पलंग आणि उश्या सुद्धा आहेत......
पुढच्या माहितीने मी खल्लास झालो होतो..... हि इमारत खालून वरपर्यंत अशी न बांधता डोंगर फोडून, वरपासून खालपर्यंत अशी बांधलेली आहे...... म्हणजे २ मजला पहिल्यांदा आणि नंतर १ ला मजला.....
तरीही इतकं अचूक बांधकाम? कसं काय? अशी कलाकार माणसं त्या काळात होती भारतात या विचारानेच शहारा आला.... एकही चूक तुम्हाला त्या structure मध्ये दिसणार नाही. perfect distance , perfect balance , एवढंच नवे तर "column " सुद्धा खालपासून वरपर्यंत निमुळते होत गेलेले, म्हणजे बघणाऱ्या वाटेल कि आधी पाया बांधलाय आणि वर मजले......

बापरे....... मी नुसता वेड्यासारखा बघत होतो.......

एवढं "बारकाईने काम केलेलं होतं.... प्रत्येक भिंत, प्रत्येक खांब........... नक्षीदार...."

आता ऊन सॉलिड रणरणत होत.......

काही शिल्प

आता येऊन थबकलो ते जगप्रसिद्ध "कैलास मंदिरा" जवळ

त्याच अफाट रूप बघूनच स्थळ - काळ विसरलो ......
जवळ जवळ ५ ते ६ मजली डोंगर वरून खोदून काढला गेला होता........
जिकडे बघू तिकडे शिल्प.... कोरीव काम..... मूर्त्या , काय बघू नि काय नाय...

कोणाचे असतील हे हात.... कोणी कोरला असेल हा अवाढव्य डोंगर...
कशी काय योजना आखली गेली असेल? कोण असतील हे कलाकार?

कोणी म्हणतात कि यासाठीचे कलाकार हे दक्षिणेतून मागवले गेले होते....
म्हणून "दक्षिणात्य" शैली चा प्रभाव या मंदिरावर आहे.....

मुग्ध होऊन फोटो काढत होतो......

द्वारावरच गजाननाची मूर्ती होती....

"symmetry " अतिशय उत्तम साधली होती....
जसा हत्ती उजव्याबाजूला तसाच आणि तेवढ्याच अंतरावर दुसरा डाव्या बाजूला ......

प्रत्येक लहान सहन गोष्टीत "symmetry ", जे डाव्या बाजूला तेच उजव्या बाजूला............ हे साधणं खूप कठीण काम आहे....
त्याकाळी without CAD drawing n elevation हे कसं काय बांधलं असेल हा प्रश्नच पडतो.. ते सुद्धा उलटं...., आधी कळस मग देऊळ

अप्रतिम कलाकुसर केलेला स्तंभ

असं म्हणतात कि हे मंदिर बांधायला तब्बल १५० वर्ष लागली....
म्हणजे २ पिढ्या खर्ची पडल्या ...........
सगळीच कमाल आहे......
आणि "पेपर वर्क" शून्य ..... जे काय आहे ते एका पिढीने दुसऱ्या पिढीला तोंडी सांगितलं......

अष्टभुजा

शंकर पार्वती .......
आणि यांच्या हातात चक्क "ऊस" आहे........

यावरचा नैसर्गिक रंग अजून टिकून आहे..........

एक "close up " view

हळू हळू सूर्यदेव पश्चिमेला कलू लागले.......आणि लांब लांब सावल्या मंदिरावर पसरू लागल्या....

" width="१०००" height="८००" alt="" />

आता निघायची वेळ होती.... गाईड सगळ्यांना बोंबलून बोंबलून बस मध्ये बसायला सांगत होता.... पण तिथून पाय हलेल तर शप्पथ.....

ते सौंदर्य बघायला दहा डोळे असते तरी कमी पडले असते.........,
पण शेवटी निघावच लागलं.......
"या सौंदर्याला कोणाची दृष्ट लागू नको देऊस" अशी शिव-शंभोला प्रार्थना करून वेरूळ चा निरोप घेतला ......

कलानृत्यसंगीतमांडणीसंस्कृतीनाट्यबालकथाप्रवासधर्मदेशांतरवाङ्मयइतिहाससमाजजीवनमानराहणीभूगोल

प्रतिक्रिया

स्पा's picture

22 Nov 2010 - 5:05 pm | स्पा

वेरूळचा इतिहास आणि त्याबद्दलची माहिती जास्त लिहिली नाहीये...
कृपया जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.......

५० फक्त's picture

22 Nov 2010 - 5:42 pm | ५० फक्त

छान फोटो व वर्णन

कॅलास मंदिराबद्दलची मला असलेली माहिती -

या मंदिराची रुपरेखा आखणा-यांनी त्याचे प्रोटो टाईप करुन एका कुंडात बुडवुन ठेवलेले होते. त्या कुंडात रंगमिश्रित पाणि भरलेले होते. त्या कुंडातील पाणी एका विशिष्ट मोजमापाच्या भांड्याने काढुन घेतले जाई. तेंव्हा त्या प्रोटोटाईप चा जो काही भाग दिसेल तेवढाच भाग त्या डोंगरा-च्या वरच्या बाजुने कोरणे किंवा खोदणे सुरु होई. तेवढा भाग झाला की पुन्हा त्याच विशिष्ट भांड्याने पाणि काढले जाई व पुढ्चा - म्हणजे खालचा भाग कोरला किंवा खोदला जाई.

अर्थात ही अनेक थेरीं पॅकी एक आहे, जर बांधकाम १-२ पिढ्या चाललं असेल तर असं झालं असण्याची शक्यता कमी वाटते, परंतु माझ्या मते हीच थेरी सर्वात जास्त योग्य आहे.

त्या काळातील बरीच अखंड दगडातील बांधकामे या पद्धतीने केलेली असावीत असे म्हणले जाते. यावर एक खुप सुंदर तेलगु चित्रपट आहे, फार पुर्वी दुरदर्शन वर पाहिला होता, ज्यात शिल्पकार वडिल व मुलाच्या संघर्षाची कहाणि होती.

हर्षद

उल्हास's picture

22 Nov 2010 - 6:34 pm | उल्हास

समोर उभे राहुन पाहतोय असे वाट्ले

अप्रतिम

चांगभलं's picture

22 Nov 2010 - 8:07 pm | चांगभलं

अप्रतिम फोटू.. स्पायल्या...

वेरूळ तर झकासच......

लेख चढत्या क्रमाने रंगत जातोय...
पुढे काय?
अजंठा?

नगरीनिरंजन's picture

22 Nov 2010 - 8:14 pm | नगरीनिरंजन

व्वा! सुंदर फोटो आणि चांगले वर्णन! तिथे जाऊन आल्यासारखं वाटलं.

आनंदयात्री's picture

22 Nov 2010 - 9:53 pm | आनंदयात्री

छान लेख.
लेण्यांच्या अप्रतिम सौंदर्याइतकीच त्यांच्या नृशंस विध्वंसाची क्रुर कहाणी तुमच्या पीरपीर्‍या गाईडने तुम्हाला सांगितली नाही का ?

भारी समर्थ's picture

22 Nov 2010 - 10:44 pm | भारी समर्थ

काय डेंजर काम केलंय राव त्या कैलास मंदिरावर... कितीतरी सूक्ष्म आणि ढोबळ गोष्टींवर आपण सहजच नजर फिरवतो. पण नीट पाहता लक्षात येतं की ती गोष्ट तेथे असण्यामागे निश्चित असं एक कारण आहे. कैलास मंदिराच्या उत्तरेकडे महाभारतातील तर दक्षिणेकडे रामायणातले ठळक प्रसंग कोरलेले आहेत.
मंदिराच्या सभोवतालच्या कातळीत एका ठिकाणी तीन देवींच्या दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. त्या गंगा, सरस्वती आणि यमुनेच्या आहेत असं मागाहून कळलं. प्रत्येक नदीच्या पायाखाली तिचं वाहन आहे व मध्यभागी गंगा तर दोन्ही बाजूला सरस्वती आणि यमुना आहेत. गंगेची मूर्ती सरळ तर बाकी दोन नद्यांच्या मूर्ती कमरेत वाकलेल्या आहेत. कारण गंगा नदी इतर कोणत्याही नदीत विलीन होत नाही पण बाकी दोन्ही होतात. अशा कितीतरी गोष्टी असतील राव तिथं.
अजिंठ्याकडे जाताना अन्वा म्हणून गाव लागतं, मुख्य रस्त्यापासून उजवीकडे ९-१० किमी अंतरावर. तिथे १२ व्या शतकातलं शिवाचं लहानसच पण सुंदर असं मंदिर बघण्याजोगं आहे. अगदी अर्ध्या तासात उरकण्यासारखं आहे ते. जात असाल तिकडे तर चुकवू नका...

भारी समर्थ

एका ठिकाणी तीन देवींच्या दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. त्या गंगा, सरस्वती आणि यमुनेच्या आहेत असं मागाहून कळलं.

हा तो फोटू.....

पैसा's picture

22 Nov 2010 - 10:51 pm | पैसा

झक्कास फोटु! इतिहास जरा जास्त हवा होता. कोणीतरी लिवा की !

नेमकं कुठं वाचलंय ते आता नक्की आठवत नाही पण बहुतेक ना.सं. इनामदारांच्या शहेनशाह मध्ये असावं, किंवा इकडेतिकडे वाचलेल्याची सरमिसळ समजा-
दख्खनेत मोहिमेवर असताना एकदा औरंगजेबाचा डेरा वेरूळजवळच्या (वेरूळच्या परिसरातच औरंगजेबाच्या गुरूची कबर आहे, मोठी पाहाण्यासारखी मशीद आहे आणि औरंगजेबही खुल्दाबादेच्या वेशीवर (अहाहा!! काय आठवणी तरी तिज्यायला - इथूनच पुढे म्हैसमाळकडे एक रोड जातो - प्रेयसीसुलभतारूण्यजनित हट्टामुळे अनेक वार्‍या घडल्या आहेत - वर सकाळचे निरभ्र आकाश, हळूहळू चेहेरा दाखवणारे गगनराज, खालच्या गावात आरवणार्‍या कोंबड्यांचा आवाज ऐकू येत असे एवढी शांतता आणि खालच्या झोपड्यांतून वर आलेल्या धुरांच्या रेषा, कुठल्यातरी खडकावर तो खालचा नजारा पाहात बसलेले ते जोडपे - च्यायला गेले ते दिवस!!! ) कयामतची वाट पाहात विसावला आहे ) माळरानावर पडला. त्याकाळचे औरंगजेबाचे हिंदू अंगवस्त्र म्हणा किंवा बायको म्हणा - तिच्या आग्रहावरून औरंगजेब वेरूळचे कैलास लेणे पाहायला आला. अशी आख्यायिका (त्याकाळी) सांगण्यात येत असे (हे भटभिक्षुकांचेच कसब!) की कैलास लेण्यात जी महादेवाची पिंड आहे त्या पिंडीकडे काही क्षण पाहात राहिले तर त्यात माणसाला त्याचा पुढचा जन्म दिसू लागतो. तर त्या वेरूळच्या पिंडीसमोर औरंगजेब जाऊन उभा राहिला आणि पाहू लागला. पिंडीमध्ये त्याला डुक्कर (सुव्वर!!) दिसले. शिव्यांची लाखोली वाहात लालेलाल होऊन औरंगजेब मुक्कामी पळाला आणि त्याने सगळे कैलास लेणे फोडून टाकण्याचा हुकूम सोडला. त्यांच्या बापाला फुटतंय ते! घोटीव फत्तरच ते. तरी काही मूर्त्या फोडण्यात आल्या. बाकीच्यांवर चुना थापण्यात आला आणि राहिलेल्या ठिकाणी गवत, लाकडे टाकून ती जागाच दग्ध करण्यात आली.

जाता जाता अजिंठ्याबद्दल:
हे जॉन स्मिथ या इंग्रज अधिकार्‍याने अजिंठा लेणी जगासमोर आणण्यापूर्वीचे. वाघाची (अजूनही अजिंठा लेणीसमोरच वाघूर नावाची नदी वाहाते) शिकार करताकरता तहानलेला जॉन स्मिथ अजिंठ्याच्या आजच्या व्ह्यू पॉईंटवरून खाली पाहात असताना त्याला एका लेणीचे प्रवेशद्वार दिसले. खाली उतरून पुन्हा आत गेला तेव्हा गचपनात झाकून गेलेल्या इतर लेण्याही दिसून आल्या. त्यापैकी कांहीचा तर अजिंठा भागातील मेंढपळांनी शेळ्या-मेंढ्यांचा कोंडवाडा म्हणूनही वापर केला होता आणि आत शेळ्या, मेंढ्या, लेंड्या दिसून आल्या!

अवांतर: लातूरच्या डॉ. पंडितराव देशमुखांची वेरूळ-अजिंठा ( की खजुराहो सुध्दा?? ) लेणीच्या निर्मितीकाळादरम्यानच्या घडामोडीवर लिहीलेली एक खूपच सुंदर कादंबरी आहे - हॅण्डमेड कागदावर छापलेली तुम्ही काढलेल्या सुंदर छायाचित्रांसारखीच सुंदर छायाचित्रे आहेत त्यात - वर्णन (उदा. आकस्मिक वेळी माती किंवा धातूच्या भांड्याचा वापर न करता मांस शिजवणे ), नावे (रक्कस, बब्बस), भाषेचा बाजही जब्बरदस्स्त!! मिळाली कुठे तर एकदा जरूर वाचाच.

अतिअवांतर: खुल्दाबाद (काही वेळा रत्नपूर) रोडवरच कागजीपुरा नावाचे एक खेडे लागते. या खेड्यात त्या काळी प्रशासनिक कामासाठी लागणारा कागद वापरला जात असे. अजूनही काही लोक तो धंदा करतात. त्या कागदाला अजूनही विदेशातून मागणी आहे आणि तो फार महाग आहे - कारण सगळी प्रक्रिया मनुष्यबळ वापरून हाताने केली जाते.

बाकी पैठणी साड्यांचेही तकलादू कारखाने याच रोडवर उभे आहेत - ते मिपाकरणींना माहित नसतील अशी शक्यता नाही ! आणि मिपाकर लोक ते माहित असूनही तिथे जायची हिंमत करतील अशी शक्यता नाही!
तुम्ही पाहिलेत का?

फटू जबराट!

आनंदयात्री's picture

23 Nov 2010 - 9:24 am | आनंदयात्री

धन्यवाद यशवंत.
माझ्या माहितीप्रमाणे, दख्खन मोहिमेत वर्षानुवर्षे खर्ची करुनही मराठे हरत नाहीत, नाना कॢप्त्या करुनही सिवा हाती लागत नाही या जाणीवेने औरंगजेब पिसाळला होता, त्यातच आलेल्या साथीच्या रोगाने हजारो सैनिक मेले. औरंगजेबाचीही तब्येत खराब झाली होती आणि तो अत्यंत वैतागलेला होता. त्याला औषध लागु पडत नव्हते. मनःशांती मिळावी म्हणुन अनेक प्रयत्न झाले, विशेष यश आले नाही. शेवटी कुठेतरी मन रमेल म्हणुन "गुंफा" दाखवायला त्याला घेउन गेले (बहुदा रबिया उर दुर्रानी या त्याच्या बायकोने). असे म्हणतात तोपर्यंत लेणी अत्यंत सुस्थितित होती, देवगिरीवरुन त्यांची काळजी घेण्यासाठी पैसा पुरवला जाई (मुस्लिम अधिपत्याखाली असतांना सुद्धा). रंगरंगोटी शाबुत होती आणी शिवलिंगाची पुजा देखिल चाले. लेण्याच्या मागच्या भागात एक कोरलेला पोपट होता म्हणे, त्याचे डोळे अत्यंत विलक्षण अश्या रत्नांचे होते. त्या डोळ्यात माणसाला त्याचा पुढला जन्म दिसायचा. आणि त्यात औरंगजेबाला डुक्कर दिसले. झालें .. औरंगजेब पुन्हा पिसाळला. काफिरांचे बुत तोडायला हजार पाथरवट बोलावले गेले. नंतर आख्ख्या लेण्यात भुस्सा, गोवर्‍या आणि गवत भरुन पेटवुन देण्यात आले. पाथरवटांनी मुर्त्या तोडल्या आणि आगीने रंग जाळला. शतकांनी जपलेले वैभव हरामखोर औरंग्याने काही दिवसात होत्याचे नव्हते करुन टाकले. आजही अद्वितीय अशी वाटणारी लेणी तिच्या मुळ स्वरुपात काय असेल याची फक्त कल्पनाच आपण करु शकतो.

-(खिन्न)

आंद्या

बाकी खुल्ताबादच्या रस्त्यावर पैठणींची दुकाने नसुन "हिमरु शालींची" आहेत. हिमरु सिल्क ला औरंगाबाद सिल्क असेही म्हटले जाते.

स्पा's picture

23 Nov 2010 - 10:15 am | स्पा

MTDC चे गाईड माहिती सांगण्यातच इतका वेळ घालवतात कि.. लेण्या बघण्यासाठी वेळच उरत नाही.......
आणि ते लेण्या सुद्धा विशिष्टच दाखवतात, सगळ्या नाही
म्हणून मग आम्ही गाईड ला सोडून सरळ लेण्या बघत सुटलो.......
(इतिहास काय मिपाकर सांगतीलच हा विश्वास होताच)

पण आता हि माहिती वाचताना खूप आनंद होतोय.....
(मिपाकरांनी विश्वासघात केला नाही ;))

पाथरवटांनी मुर्त्या तोडल्या आणि आगीने रंग जाळला

खरच इतकी विकृती कुठेही पाहिलेली नव्हती.....
कुठे गजाननाची सोंड तुटलेली आहे.....\
कित्येक मुर्त्यांची तर डोकी सुद्धा छाटलेली आहेत.....

एकही हत्तीची सोंड शाबूत नाहीये....
सगळी शिल्प आपली भग्न केलेली.....

खूप राग येतो....... हे सगळं बघताना....

शहाजहान ने म्हणे ताजमहाल बांधनारयांचे हात तोडून टाकलेले..... का तर अशी कलाकृती परत उभी राहू नये म्हणून
किती हि विकृती.....
आणि आपण गोडवे गातो... त्यांच्या प्रेमाचे...............

बाकी खुल्ताबादच्या रस्त्यावर पैठणींची दुकाने नसुन "हिमरु शालींची" आहेत.

या ठासून केलेल्या विधानामागं मला तीन शक्यता दिसतात.
१. तुमचं लग्न झालेलं आहे.
२. बेटर हाफही मिपावर आहे.
किंवा मग -
३. तुम्ही औरंगाबादचे असूनही बरेच दिवस त्या रस्त्याकडे फिरकलेला नाहीत !

अहो तिथं जागोजागी पाट्या लावलेल्या आहेत पैठणी साडी सेल म्हणून -मशीनी ठेवलेल्या आहेत पैठण्या विणणार्‍या.
हां, तिथं त्या रस्त्यावरच्या कारखान्यात तयार होणारी पैठणी ही खरी पैठणी नव्हेच असे म्हणणे असेल तर वेगळे.

महिला मंडळानं आनंदयात्रीं च्या या विधानावर विश्वास ठेऊ नये.
विशेष सूचना: वेरूळ रोडला पैठण्या मिळतातच मिळतात त्या पण अस्सल असतात आणि ते लोक चार-सहा हजारानं कमी भावात देतात.

( अस्सल पैठण्या, कागजीपुर्‍यातल्या कागदांचे व्यापारी ) यशवंत पैठणकर
आमची शाखा फक्त वेरूळ रोडवरच आहे.

आनंदयात्री's picture

23 Nov 2010 - 10:50 am | आनंदयात्री

बरं राहिलं !
:)

निखिल देशपांडे's picture

25 Nov 2010 - 11:54 am | निखिल देशपांडे

कागजीपुर्‍याचा इतिहास कुणी सांगेल का???
वेरुळचे फोटो मस्तच हो स्पा.

प्रचेतस's picture

23 Nov 2010 - 8:53 am | प्रचेतस

अतिशय सुंदर.
वेरूळची ही कोरीव लेणी वेगवेगळ्या राजवटीत खोदली गेली. सुरुवातीची बौद्ध लेणी ही कलचुरी राजवटीत खोदली गेली. नंतर कर्नाटकाहून आलेल्या राष्ट्रकूट राजवटीत कैलास लेण्याचे बांधकाम झाले. म्हणूनच दक्षिण भारतीय शैलीचा प्रभाव येथे जाणवतो. लेण्यासमोरील स्तंभ हा इजिप्तमधील मंदिरासमोर असलेल्या ओबेलिस्कशी साध्यर्म्य दाखवतो. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. नंतरच्या जैन लेण्या ९ व्या व १० व्या शतकात खोदल्या गेल्या. विशेष म्हणजे कोणत्याही राजवटीने आधीच्या लेण्यांना कुठलाही धक्का लावला नाही. विध्वंस झाला तो मात्र नंतरच्या इस्लामिक राजवटींमध्येच.

फक्त माहिती आणि इतिहास , विषयाला फाटा न फोडणाऱ्या प्रतिक्रिया......आणि फालतू विषयावर चर्चा करण्यात वेळ न घालवता खरी अस्सल माहिती देणारे मिपाकर बघून डोळे पाणावले ...... ;)

इंटरनेटस्नेही's picture

25 Nov 2010 - 2:48 am | इंटरनेटस्नेही

संपुर्ण लेखमाला आवडली. :) मिपावरचा एक महत्त्वाचा लेख म्हणुन याची नोंद व्हावी.
आमचे परममित्र 'स्पा' यांना पुढील लेखनासाठी आणि प्रवासासाठी शुभेच्छा!