हिमलयन बुल्बुल
लालबुड्या बुलबुल
https://www.misalpav.com/tourism/53715 -१
https://www.misalpav.com/tourism/53727 -२
https://www.misalpav.com/tourism/53743 -३
https://www.misalpav.com/tourism/53761 -४
सरते शेवटी,हाॅटेलवर परत आलो.खुप दमलो होतो.पाठ टेकताच निद्राधीन झालो.....
आता पुढे...
मागील एका भागावर मिपाकर कंजूस भाऊंनी प्रतिसादले आहे कि त्यांना पॅकेज्ड टुर आवडत नाही.बरेच बघायचे राहून जाते.मी त्यांच्या मताशी सहमत आहे.परंतू ज्याना भटकंती मधे जास्त रूची नाही.कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवायचा आहेत. डोक्याला ताप नको आहे वर्षभराचा शिणवटा घालवून स्वताला रिचार्ज करयचे आहे आशा लोकांसाठी पॅकेज्ड टुर चांगले ऑप्शन आहे.काय बघायचे,हाॅटेल, गाडी, विमान,रेल्वे टिकट बुकिंग अशा गोष्टींवर विचार करायला वेळ नसतो त्यांच्या साठी प्रवासी कंपन्यांकडून सर्व सोयी उपलब्ध केल्या जातात. याचे सुद्धा काही फायदे आहेत. नवीन ओळखी होतात,मित्र मिळतात,सर्वसमावेशक गुण वाढतो.बिझनेसची जाहिरात होते ,ग्राहक मिळतात इत्यादी, इत्यादी. असो....
आज २६ मे,कालच्या प्रमाणेच लवकर उठून बाहेर पडलो.गुलाबी थंडी होती आणी नव्हती पण.निरव शांतता.कालचे सद्गृहस्थ आज पुन्हा भेटले.आजच्या सकाळच्या फिरण्यात हिमालयन बुलबुल, ब्लॅक बुलबुल,रोफस सिबीया दिसली(पुण्याकडील ब्राह्मणी मैना, भांगपाडी मैने सादृश्य दिसते)
लाल गाल्या,लालबुड्या बुलबुल सर्व भारतात दिसतात त्यांचा पिछवाडा लाल असतो. तर हिमालयन बुलबुल फक्त हिमाचल,उत्तरांचल तत्सम प्रदेशात आढळतो.त्याचा पिछवाडा पिवळा असतो.
भगवान भी नाॅटी बाॅय से कम नही.....
इथे संदिप खरे यांची कवीता आठवली,
"देते कोण,देते कोण,देते..."
बाय बाय शिमला......... आज शिमल्यातील तंबू गोळा करून मनाली कडे प्रयाण करायचे होते.बिलासपूर,सुंदरनगर मंडी हा भाग हिमालयाच्या सखल भागात तर कुल्लू, मनाली,रोहतांग हे अनुक्रमे चढत्या भाजणीने उंचीवर असलेल्या जागा.त्यामुळे चढउताराचा प्रवास होता.मण्डी बिलासपूर, सुंदर नगर, हा भाग "सुकेत घाटी", म्हणून ओळखला जातो.कुल्लु शहर, पंडोह धरण,सतलुज बियास परियोजना आणी बरेच काही दिसणार होते,प्रवास बियास नदीकाठाने झाला ,तो थेट उगमस्थान पर्यंत.याचे वर्णन पुढे येईलच.
छोट्या गाड्या हाॅटेल बाहेर तयार होत्या. स्टाफ सुहास्य वदने निरोप देण्यासाठी उभा होते. बस थांब्यावर सर्व पर्यटक पोहचले. पुढचा प्रवास सुरू झाला.हिमालयाचे निसर्ग सौंदर्य लक्षात येण्यासाठी काही प्रचि गाडीत बसल्या बसल्याच काढली आहेत.
पर्यटक गप्पात गुंतले व नंतर पेंगुळले.लहान मुले,चारच होती पण दंगा चालू होता.तीन दिवसात चांगले मित्र झाले. एकमेकाला उपनावे दिली.विकी कौशल,अरिजीत सिंग, कियारा अडवाणी वगैरे.त्यांचे या बद्दलचे तर्क अजब होते पण संयुक्तिक वाटले.
पर्यटकांमधे जोश भरावा या उद्देशाने टिम लिडरने अंताक्षरी खेळण्याचा प्रस्ताव मांडला व आज माझी मॅरेज ॲनव्हरसरी आहे सांगून एक गाणे म्हणले.पर्यटक भावूक झाले. सर्वानी त्याला शुभेच्छा दिल्या.(प्रवास संपल्यावर टिम लिडरला खोपच्यात घेतले व खरे सांगा खोदून खोदून विचारले.शेवटी ट्रेड सिक्रेट म्हणून गौप्यस्फोट केला.अर्थात ते मी कुणाला सांगीतले नाही.) दोन ग्रुप मधे चढाओढ सुरू झाली.वयवर्ष पाच ते पंच्याहत्तर सारे सक्रिय झाले व आपापल्या जनरेशनची गाणी म्हणू लागले.
सात वर्षाच्या अरिजीतने, "निघालो घेऊन दत्ताची पालखी", हे गाणे अत्यंत ताला सुरात म्हंटले.आई बाप धन्य झाले. पुढे त्याचे "हे सुरांनो चंद्र व्हा",गाणे ऐकून तर मी त्याला डोक्यावर घेतले. मुलाचा आवाज गोड आहे म्हंजे जनुकीय प्रभाव आहे,समजले आईबाप दोघेही चांगले गायक,सोलो, डुयेट अशी एकामागोमाग एक गाणी म्हणून मैफिल सजवली.वरिष्ठ पर्यटकांनी आपली भडास निकाली."तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही...., हम तुम्हें चाहते है ऐसे....".समां बांधला.अंताक्षरीचे समापन गाणाऱ्या जोडप्याने नवविवाहित दांपत्यासाठी एक डुयेट गावून केला.
"गाता रहे मेरा दिल,तू ही मेरी मंझील".
चाहते,चाहते, सुनते,सुनते सर्वांना चहाची तल्लफ आली आणी पंण्डोह धरण ओलांडून गाडी बियास व्ह्यू पाॅईंट वर चहासाठी गाडी थाबंली.चहा ब्रेकनंतर पुन्हा प्रवास सुरू झाला.दुपारचा एक वाजला,गाडी जेवणासाठी थांबली. मस्त जेवण झाले.साधारण चार वाजता बिलासपूर, मंडी शहर मागे टाकत "आर के शाॅल", दुकाना समोर गाडी उभी राहीली.तिन्ही बाजूला उंच उंच डोंगर,जवळच पार्वती नदीचा खळाळता प्रवाह.निसर्गरम्य वातावरण.चहा ब्रेक नंतर शाॅपिंग.
हिमाचली टोप्या,जॅकेट, शाल,स्वेटर्स आणी घरगुती बनवलेल्या लोकरीच्या कलाकृती विक्रीस उपलब्ध होत्या.पर्यटकांना अकर्षित करण्यासाठी हातमागावर शाल विणण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली. बहुतेक तरूण मंडळी हातमाग नावाचा प्राणी पहिल्यांदाच बघत होते. मी आणी दोन वरिष्ठांना मात्र याचा पूर्वानुभव होता.
अवांतर.
माझ्या शालेय शिक्षणात इयत्ता चौथी हे फार महत्त्वाचे वर्ष,चौथी ते सातवी विणकाम हा नवीन विषय अभ्यासक्रमात शिकवला जायचा
गुरूजी ,शेवटच्या तासाभरात कापूस बोंडातून सरकी काढणे,तो धनुकली ने स्वच्छ करणे, त्याचे पेळू बनवणे,टकळीवर किंवा चरख्यावर सुत कतणे ही सर्व कामे विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे.पुढे कातलेल्या सुताचे गुंडे बनवणे. ताणा-बाणा बनवून हातमागावर चढवणे. धोट्यावर,लाकडी सहा इंची वस्तू,सुत गुंडाळून त्याला ताणा-बाणा मधून इकडून तिकडे पळवणे..... हुश्श, चौथी ते सातवी याचे मार्क मिळायचे. वर्गाततली काही निवडक मुलेच फक्त हे काम करायची. गुरूजींनी सुद्धा किती चांगले कापड विणले याची नोंद परफॉर्मन्स अप्रायजल व्हायची.
असो, विषयांतर झाले.
आमचे कुटुंब खरेदी करता गेले.मी बाहेर टेहळणी करत होतो. उंच आकाशात घारी घिरट्या मारत होत्या. दूर डोंगरावर कापशी घार बसलेली दिसली. तिथेच एक महाकाय घार दिसली. तिचाही फोटो घेतला.नंतर ओळख परेड मधे निरखून बघताना ती सामान्य घार नसून दुर्मिळ असा तो काळा गरूड (Black Eagle)होता. कॉर्नेल युनिव्हर्सिटीने सुद्धा याची पुष्टी केली. एक आणखीन दुर्मिळ पक्षाचे दर्शन झाल्याने पर्यटनाचा आनंद द्विगुणित झाला हे वेगळे सांगावयास नकोच.
पर्यटकांनी बरीच खरेदी केली. सामानाची गुणवत्ता चांगली होती.पुण्यासारख्या समशीतोष्ण ,मैदानी भागात फारसे उपयोगी नव्हते. हौसेला मोल नाही......
टिम लिडरने उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा सांगायला सुरूवात केली. दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजताच निघायचे होते. वसिष्ठ मंदिर, रोहतांग खिंड आणी अटल टनल बघणार होतो. इतक्या लवकर का निघायचे याचा तपशील पुढच्या भागात सांगतो.
"रोहतांग खिंडीला भेट देण्यासाठी विशेष गरम पोशाखाची गरज आहे जसे "रूपा के थर्माकोट",लोकरीचे हातमोजे,पायमोजे,गरम हायनेक स्वेटर्स,छत्री स्नो चष्मा वगैरे आणी ते सर्व तुम्हीं आणले असेलच",आशी उद्घोषणा करून IED टाकला.पर्यटक अस्वस्थ झाले. "इथेच कुठे तरी गाडी थांबवा,गरम कपडे वगैरे खरेदी करूया",आणी तत्सम मागण्या सुरू झाल्या.काहीजण म्हणाले,"मनाली,माॅलरोड वर सर्व मिळेल,आपण तिथे घेवू",माॅलरोड दहा वाजता बंद होतो सांगून आणखीन एक ब्लास्ट केला. वातावरण तंग झाले.
मग मी उठून समोर आलो.ओळख दिली. स्नो बाऊंड भागातला माझा अनुभव सांगीतला. पर्यटकांना आश्वस्त केले. "साधारण स्नो फाॅल मार्चनंतर बंद होतो.तापमान वाढते,बर्फ वितळायला सुरूवात होते.दिवसा बर्यापैकी गरम असते.वाहती हवा असेल तरच हाडे गोठवणारी थंडी असते अन्यथा वातावरण सुखकर असते. तेव्हां घाबरण्याची गरज नाही. जास्त गरम कपड्याची अवशकता भासणार नाही". थोडी अस्वस्थता कमी झाली.
टिम लिडरने नंतर स्पष्टीकरण देत म्हणाला," या भागात हवामानातील बदल अनपेक्षित असल्याने व ते कधी बदलेल याचा भरवसा नसल्याने आम्हीं पर्यटकांना अधिकच्या सुचना देतो".पुन्हा पर्यटक माझ्याकडे बघू लागले.मी म्हणालो"हवामान बदलण्याचा भरवसा नसतो हे बरोबर आहे पण बेभरवशाचे बदल फक्त ऋतूचक्र बदलताना,शिशीर संपलाय, वसंतही आपला मुक्काम लवकर हलवण्याची चिन्हे दिसत आहेत.आजचे तापमान बघता ग्रीष्माची चाहूल स्पष्ट दिसत आहे. काळजी करू नका.
पुढे लिडरने सांगीतले,"फर", का ओव्हरऑल ड्रेस,स्नो गाॅगल,स्नो बुट ,हातमोजे,पायमोजे भाड्याने मिळतील.पर्यटकांचा जीव भांड्यात पडला.तरीही मी पुन्हा म्हणालो याची गरज नाही.इतके गरम होणार की काढुन फेकून द्यावे लागेल.उद्या दुपारी आपण या विषयावर बोलू.
अवघ्या सहा सात तासांचा प्रवास पण चहा पाणी,खाणे पिणे व बियास व्ह्यू पाॅईंट असे बघत बघत मनालीच्या वेशीवर पोहचण्यास संध्याकाळचे साडेसात आठ वाजले.इथे सुद्धा भरपूर यर्यटकांची गर्दी,तंग रास्ते असल्यामुळे मुख्य बस थांब्यावर जायला एक तास व हाॅटेलवर छोट्या गाडीने जायला पाऊणतास लागला.साडेनऊ वाजता हाॅटेल वर पोहोचलो. काही यात्री माॅल रोडवर उतरले.
सकाळी तीन वाजताच निघायचे असल्याने लगेच बिस्तर पकडला.......
बाकी पुढील भागात.
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचतोय.
आयोजीत सहलीत का स्वतंत्रपणे वादाचा मुद्दा बाजूला ठेवून प्रवास वर्णनाची गंमत घेतो आहे. पक्षीदर्शन छान चालले आहे.
( सहावीत एकदाच शाळेच्या सहलीला गेलो होतो आणि तेव्हाच ठरवून टाकले हा प्रकार आपल्यासाठी नाही. आणि आता कुटुंबालाही स्वतंत्र जाणेच आवडते. हिमालयात मात्र नाही जाणार.)
आयोजीत सहलीत का स्वतंत्रपणे वादाचा मुद्दा
कंजूस भाऊ, हा वादाचा मुद्दा नाही तर दोन्ही स्वतंत्र विषय आहे. आणी सर्वस्वी भटक्यांचे मुलभूत स्वातंत्र्य आहे.
मी स्वतःच आयोजित भटकंतीच्या विरोधात आहे. या वेळेस भीमानगर, पिंजोर सारखे अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाण आयोजीत सहली मुळे बघू शकलो नाही.
तुमच्यासारख्या खंद्या भटक्याने माझे लेख वाचून त्याची दखल घेणे हेच मुळी उत्साह वाढवणारे आहे.
धन्यवाद.
तुम्ही चांगल्या मनाने प्रतिक्रिया घेता म्हणून लिहू शकतो.
In reply to आयोजीत सहलीत का स्वतंत्रपणे वादाचा मुद्दा by कर्नलतपस्वी
आपल्याच देशात भाषेची अडचण येत नाही म्हणून धाडस करून जाऊ शकतो. खरी अडचण ही वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्ती आपल्याबरोबर फिरायला असणे ही असते. पाच वर्षांखालील मुले आणि ज्यष्ठ नागरिक यांची आवडनिवड आणि कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा यात खूप फरक पडतो. तरुणांचं तर सोडाच. एकमत काही होत नाही. सगळे आपलेच. शिवाय परक्या ठिकाणी तुम्ही दोघे तिकडे जा आणि आम्ही इकडे जातो पण संध्याकाळी सातला रुमवर या असे सांगणेही धोकादायक किंवा काळजीचे ठरू शकते. मग जाऊ दे आपण सर्व एकत्रच फिरू हा मंत्रच बरा पडतो.
आयोजित टुअरमधले गाइड किंवा लीडरही कमिशन मिळण्याची संधी सोडत नाहीत. ठराविक दुकानाजवळ घाबरवून रेनकोट वगैरे घ्यायला लावायचे(उदाहरणार्थ रु २५०) आणि नंतर तेच जागेवर पंचवीस - पन्नास रुपये भाड्याने मिळणे हे जुनेच आहे.
आमच्याकडे माझ्यावर सोपवतात, (तुम्ही म्हणता तसे करू) आल्यावर काय काय राहिले याची चर्चा करतातच. आणि ते होतेच. दोन गोष्टी मिळतात तर तीन राहतात. काय करणार. घरात अगदीच खुर्चीत पाय हलवत बसण्यापेक्षा जरा फिरून आलो एवढेच साध्य करतो. आवडललेल्या ठिकाणी जास्ती वेळ दिल्याने बाकीच्या गळतात आणि दिवस संपतो.
हैदराबादला आमच्या काकांना सालारजंग पूर्ण चार तास पाहायचे होते, महिलांना ते लवकर आटपून चारमिनार बाजारात बांगड्या खरेदीत वेळ घालवायचा होता, तर मुलांचं सकाळचं खाणं होऊन दहाला आत गेलो तरी पावणे अकराला भूक लागली होती. मग उरकले . खालच्या रिसेप्शनिष्टला विचारले की कोणते मुख्य दालन पाहू? त्याने लगेच सांगितले हा बुरखावाला पुतळा, सोळा नंबरमधले जडजवाहीर आणि तेवीसमधले चिनी रेशीमकाम. त्याप्रमाणे भराभर फिरून बाहेर पडलो. सगळ्यांनी हुश्श केले.
फसलेल्या गोष्टींच्या आठवणी ताज्या राहतात आणि त्याचे फोटो नसतात.
तुमच्या मताचा आदर करून माझा अनुभव नोंदवतो.
In reply to तुम्ही चांगल्या मनाने प्रतिक्रिया घेता म्हणून लिहू शकतो. by कंजूस
हिमाचल ट्रिप ही माझ्या आतापर्यंत च्या भटकंतीतली पहिलीच आयोजित ट्रिप होती. केसरी या प्रवासी कंपनीने आयोजित केली होती. सहप्रवासी एकुण आठ्ठाविस. सात डाॅक्टर पैकी दोन सेवानिवृत्त. दोन कुटुंबांचा स्वताचा उद्योग,सहा लहान मुले. आम्हीं दोघे पती पत्नी,दोन सोलो प्रवासी आणी बाकी आय टी कंपनीत नोकरदार.
एकंदरीत सुशिक्षित आणी त्याही पेक्षा समजदार लोक असल्याने यात्रा सुफळ संपूर्ण झाली. व्यक्ती तितक्या प्रकृती.
केसरी प्रवासी कंपनी जुनी आहे. सर्व ठिकाणचे परराज्यातील लोक ओळखतात. पर्यटनस्थळी यांचे चांगले संबंध आहेत. टिम लिडर, व सहायक दोघेही स्वभावाने चांगले,जबाबदार कर्मचारी होते. यावरून कंपनीतील संस्कृती लक्षात येते.
पण प्रत्येक वेळेस असेच होईल याची खात्री नाही.
पुन्हा आयोजित ट्रिप वर जायचे असेल तर हिच कंपनीला प्राधान्य देईन.
अधिक माहितीबद्दल व्यनि केला आहे..
वाचत आहे...गुरूजी ,शेवटच्या…
वाचत आहे...
गुरूजी ,शेवटच्या तासाभरात कापूस बोंडातून सरकी काढणे,तो धनुकली ने स्वच्छ करणे, त्याचे पेळू बनवणे,टकळीवर किंवा चरख्यावर सुत कतणे ही सर्व कामे विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे.पुढे कातलेल्या सुताचे गुंडे बनवणे. ताणा-बाणा बनवून हातमागावर चढवणे.
अरे वाह!भारीच!
सगळे भाग वाचून काढले
मस्त वर्णन...
छायाचित्रे तर अगदी छान. विशेषतः पक्षांची. अशा प्रवासात देखील तुम्ही तुमचा छंद जपलात हे विशेषच...
भविष्यात ही सहल करायची आहे त्यामुळे वाचत आहे.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे...
माझेही तेच मत आहे. मला बियास…
In reply to सगळे भाग वाचून काढले by श्वेता२४
माझेही तेच मत आहे.
मला बियास नदीचे फोटो आवडले.
अरे वा !! आपल्या प्रवास…
अरे वा !! आपल्या प्रवास वर्णनाचे आणखी एक वाचनीय आणि प्रेक्षणीय प्रकरण!!
आपण बरोबर म्हटलय "ज्याना भटकंती मधे जास्त रूची नाही.कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवायचा आहेत. डोक्याला ताप नको आहे वर्षभराचा शिणवटा घालवून स्वताला रिचार्ज करयचे आहे आशा लोकांसाठी पॅकेज्ड टुर चांगले ऑप्शन आहे.काय बघायचे,हाॅटेल, गाडी, विमान,रेल्वे टिकट बुकिंग अशा गोष्टींवर विचार करायला वेळ नसतो त्यांच्या साठी प्रवासी कंपन्यांकडून सर्व सोयी उपलब्ध केल्या जातात." असाच आणखी एक प्रकार म्हणजे जिथे एकट्या दुकट्यापेक्षा कळपात असणे जास्त सुरक्षित असू शकते.
मी आणि सौ बऱ्याच ठिकाणी २ आठवडे प्रवासासाठी २-४ महिने पूर्वतयारी करून आमचे आम्ही गेलो आहोत. अपवाद म्हणून काश्मीरला "केसरी" बरोबर गेलो आणि श्रीनगर विमानतळावर उतरल्यापासून ते परत जाईपर्यन्तचा आजूबाजूचा सैनिकी बन्दोबस्त पाहिला त्या वरून केसरी बरोबर जायचे ठरवले ते बरोबर केले असे वाटत राहिले.
एकट्या दुकट्यापेक्षा कळपात असणे जास्त सुरक्षित असू शकते.
In reply to अरे वा !! आपल्या प्रवास… by शेखरमोघे
मोघे साहेब विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कळपात असणे सुरक्षीत, याचा प्रत्यय आला. भयंकर दुर्घटना घडता घडता टळली.
कोणती,कशी व केव्हां या साठी वाचत रहा.
आत्तापर्यन्त किमान २५ तरी…
In reply to एकट्या दुकट्यापेक्षा कळपात असणे जास्त सुरक्षित असू शकते. by कर्नलतपस्वी
आत्तापर्यन्त किमान २५ तरी ट्रिप्स / ट्रेक्स केले ... सुरवातीचे एक दोन ट्रक्स युवाशक्ती बरोबर केले .. बाकी सगळे स्वतः प्लॅन करून ... त्यातल्या काही सोलो
आता गुगुल आणि ऑनलाइन बुकिंग्स मुळे काम खूप सोपे झाले आहे पण १८ वर्षांपूर्वी lonely planet हे पुस्तक वाचुन पहिल्यांदा लडाखला गेलो होतो
त्यामुळे ग्रुप टूर कि स्वतः प्लॅन करून .. हा वैयक्तिक पसंतीचा मुद्दा आहे ...
मस्त झालाय हा लेख…
मस्त झालाय हा लेख. निसर्गसौंदर्य अप्रतिम आहे.
छान...
पर्यटकांची गर्दी कमी दिसते. मी गेल्या महिन्यात शिमल्यातून फक्त ‘पास’ झालो आणि शिमला पूर्णपणे नापास झालेले दिसले. परिस्थिती फारच गंभीर आहे. तासाभरावर असलेल्या फागु मधे मात्र छान वाटलं.
सर्व प्रतिसदक वाचकांचे
मनापासून आभार.