-
https://www.misalpav.com/tourism/53715-
पहिला भाग इथे वाचा
उद्याच्या कार्यक्रामाची रूपरेखा ऐकली. जेवण केले,खोलीत जाऊन सर्व पर्यटक गुडूप झाले..
पुढे.....
रात्री गाढ झोप लागली.नेहमी प्रमाणे सकाळी साडेपाचला आपोआप डोळे उघडले.तयार होऊन खाली आलो. भर वस्तीतले हाॅटेल सिमेंटच्या जंगलाने वेढलेले.साडेसहा वाजले सकाळ होती तरी ही उन कडक व मार्तंड रागात दिसत होता.यावर्षी सर्व ठिकाणी कडक उन्हाळा भासतोय.
एक कवीता आठवली,
वेळ झाली भर माध्यान्ह
माथ्यावर तळपे उन
नको जाऊ कोमेजून
माझ्या प्रितीच्या फुला.......
(अवांतर - ही कवीता पुढे याचे अप्रतिम, अजरामर गाणे झाले. कवी रस्त्यावरून जाताना भरदुपारी डांबरीकरण चालू असते व रस्त्यालगत, रणरणत्या उन्हात काम करणाऱ्या बाईचे तान्हुले पहुडले होते.त्या बाळा बद्दल आईच्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत.)
सकाळी,सकाळी चंदिगढचे तापमान बत्तीस डिग्री होते. आसपास हिरवाई नसल्याने पक्षी नव्हते.कावळे,घारी तेव्हढे दिसत होते. थोडा वेळ थांबलो,चहूबाजूस फेरफटका मारला व नाष्ट्यासाठी प्रयाण केले.आलू पराठे,कवड्या दही, मिक्स लोणचे बरोबर आलू पुडी असे उत्तर भारतीय,पंजाबी पदार्थ होते.उकडलेली अंडी, ऑम्लेट, काॅर्नफ्लेक्स,मोड आलेली धान्ये,फळे इ.होते.हाॅटेल मालक हल्ली ग्राहकांच्या प्रत्येक गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून असतात.दिक्षित,दिवेकर,खवय्ये सर्वाचा आत्माराम कसा शांत होईल याचा प्रयत्न करतो.आजचा अर्धादिवस चंदिगढ बघण्यासाठी होता. सुखना तळे, राॅक गार्डन व पिंजोर गार्डन ही तीन मुख्य प्रेक्षणीय स्थळे बघण्याचे ठरले. चंदिगढ मधे अजूनही काही प्रेक्षणीय स्थळे आहेत.जसे कॅपिटल काॅम्प्ल्याक्स (सचिवालय वगैरे) व खरेदी साठी सेक्टर सतरा,रोज गार्डन वगैरे.पर्यटक अवर्जून या ठिकाणी जातात. उरलेला अर्धा दिवस चंदिगढ शिमला प्रवासा साठी होता. चंदिगढ
शिवालीक पर्वतरांगाच्या पायथ्याशी सुनियोजित वसवलेले शहर, भारताचे पहिले पं.प्र. पं जवाहरलाल नेहरू यांचे स्वप्न. ले कॉर्बुझियर (Le Corbusier )प्रसिद्ध फ्रेंच वास्तुविशारद यांनी सन १९५२ मधे डिझाइन केले होते.याबद्दल जालावर भरपूर मााहीती उपलब्ध आहे ती इथे पुन्हा चोप्पपस्ते करत नाही...... उत्तरेकडील सीमावर्ती भागातले अत्याधुनिक प्रमुख शहर. ऐंशी, नव्वदच्या दशकात थंडीमधे होणार्या प्रचंड बर्फबारी मुळे श्रीनगर लेह मार्ग सैन्य आणी नागरी वहातूकीस बंद असायचा. तेंव्हा चंदिगड येथून हवाई मार्गा द्वारे सैनीकांचे आवागमन होत असे.पंजाब व हरियाणा राज्यांची समाईक राजधानी,केंद्रशासीत प्रदेश, मोठी छावणी ,मुख्यालय, चिन व तिबेट यांच्या अंतरराष्ट्रीय सिमा जवळच म्हणून चंदिगढचे महत्व खास आहे.
सामरिक,राजकिय महत्त्वा बरोबरच शहराला ऐतिहासिक, पौराणिक वारसा सुद्धा आहे.महाभारतातमधे "पंचकुला", याचा उल्लेख पंचपुरा म्हणून आढळतो, असे अंतरजालावर समजले.
आमचे रहाण्याचे होटल झिरकापूर गावात, शहराच्या बाहेर असल्याने मुख्य शहराला टाळून छोट्या गाड्यांनी पंचकुला, चंडिमंदिर भागात आलो. व्हि आय पी एरीया,भरपूर हिरवळ, मोठी झाडे,प्रशस्त,स्वच्छ रस्ते व नियंत्रित वहातूक दृष्टीस न पडली तर नवलच. दुचाकीवर चालक आणी सहप्रवासी हेल्मेट घालून फिरताना दिसले. शिख धर्मीय सोडून सर्वजण हेल्मेट वापरताना दिसले.
सुखना तळे
सुखना तळे 'ले कॉर्बुझियर, वास्तुविशारद यांच्या देखरेखी खाली १९५८ मधे बनले. शिवालीक पर्वतरांगा मधून वाहून येणारे पावसाचे पाणी या तळ्यात साठवले जाते.डोंगरा वरून येणारी चिखलमाती, दगड गोटे तळ्यात जमा होऊ नये म्हणून फिल्टरची विशेष व्यवस्था आहे.सुखना तळे शहराची शान आहे. इथले निसर्ग सौंदर्य आणी जैववैविध्य अप्रतिम आहे.
"The Punjab & Haryana high court has declared Sukhna Lake a ‘living entity, or ‘legal person’ with the rights, duties, and liabilities of a living person. Therefore, all the citizens of Chandigarh as loco parentis (in the place of a parent) save the lake". (अंतरजालावरून)
थंडी मधे स्थलांतरीत पक्षी,जसे सायबेरियन बदक,स्टाॅर्क, क्रेन्स या तळ्यावर जरूर मुक्कामाला येतात. जानेवारी ते मार्च या काळात तळे सर्वात जास्त सुंदर दिसते असे स्थानिकांकडून कळाले. तळ्याच्या काठावर सुशोभिकरण करण्यात आले आहे. कमालीची स्वच्छता बाळगण्या साठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जाणवले. सकाळ,संध्याकाळी व्यायाम,विरंगुळ्यासाठी शहरवासीयांना आणी पर्यटकांना ही एक छान जागा आहे. तळ्याचा विस्तार तीन किलोमीटर पर्यंत आहे जणू मुंबईचा मरिन ड्राईव्ह,.....
आम्हीं सकाळी नऊ वाजता तळ्यावर दाखल झालो.उन्हाचे चटके लागत होते.बोटींगची व्यवस्था आहे पण उन्हामुळे पर्यटकानी पाठ फिरवल्या मुळे सर्व जणी तळ्याकाठी नांगर टाकून सुस्तावलेल्या होत्या.स्थानिक लोक,कर्मचारी सोडल्यास इतर लोक नगण्यच होते. पर्यटक झाडाच्या सावलीत उभे राहून सेल्फी, फोटो सेशन करत होते.
मी पक्षी कुठे दिसतात बघत होतो. कडक उन्हामुळे पक्षी सुद्धा जंगलात, झाडांवर निघून गेले होते.ते तळ्यात फक्त हळदी कुंकू बदके (Indian Spot Billed Duck)विहार करताना दिसली. बाकी साळुंक्या पोपट,एखाद दुसरा फुलचुखी पक्षी बागडताना दिसले.
खुप उत्सुकता होती पण पक्षीदर्शन न झाल्याने निराशा झाली. सहा वाजता आलो असतो तर कदाचित जास्त पक्षी दिसले असते. असा विचार चालू असतानाच एक ओळखीचा आवाज कानावर आला.पटकन वर नजर गेली,छोटा धनेशची(Indian Gray Hornbill) जोडी एकमेकाचा पाठलाग करत जंगलाकडे जाताना दिसली. जोडा कॅमेर्यात नाही पण दोघातला एक जण मात्र कॅमेर्यात सापडला.
-
थोडावेळ फिरून झाल्यावर पुढे राॅक गार्डन कडे प्रस्थान करण्याची सुचना आली. आमची पावले पार्किंग कडे वळाली.....
राॅक गार्डन.
साधारण, बाग म्हणले की डोळ्या समोर झाडे,फुले, फुलपाखरे येतात पण दगडांची बाग कशी असेल याची उत्सुकता होती. जगद्विख्यात राॅक गार्डनचे जन्मदाता श्री नेकचंद सैनी,सब डिव्हिजनल इंजिनियर, हे फाळणीपुर्व पाकिस्तानात जन्मले होते .सैनी कुटुंबिय फाळणीनंतर भारतात स्थाईक होण्या साठी ते तत्कालीन पंजाबात स्थलांतरीत झाले. जन्मजात कलेचे वरदान लाभलेले सैनी ,१९५१ मधे रोड इन्स्पेक्टर म्हणून सरकारी कामावर रूजू झाले.काम करताना विवीध टाकाऊ वस्तूंच्या ढिगाऱ्यात त्यानां आपल्या कलेला उपयोगी सामुग्री आणी साकारण्याची क्षमता दिसून आली.
१९५७ मधे श्री नेकचंद सैनी यांनी विवीध आकाराचे छोटे मोठे दगड, फुटक्या टाईल्स, बांगड्यांचे तुकडे,टेराकोटाची फुटकी भांडी,मटके,बाटल्या,इतर औद्योगिक कचरा,विजेचे फ्युज, ट्यूबलाईट चे होल्डर इत्यादी टाकाऊ वस्तूंपासून पासून मानवी,प्राणी,पक्षी इत्यादी प्रेक्षणीय कलाकृती बनवण्यास सुरूवात केली.अगदी फेकून दिलेले,कापलेले माणसांचे केस सुद्धा त्यांनी या कलाकृतींच्या डोक्यावर लावण्यासाठी वापरले. अथक अठरा वर्ष श्री सैनी यांनी आपला छंद नेटाने जोपासला. त्यांनी सुखना तळ्याच्या एकाबाजूला जंगलात गुपचूप एक वेगळे अद्भुत साम्राज्य साकारले.
या कलाकृतींचे निर्माण ॲबस्ट्रॅक्ट जरी असले तरी रचनेनुसार ते एका विशिष्ट उद्देशाने बनवलेले दिसते. हे काम, ते सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी मदती शिवाय करत राहीले.
राॅक गार्डन बघताना त्यांची कलासक्ती कल्पनाशक्ती,निष्ठ,प्रेम, सृजनशीलता, दृढनिश्चय पदोपदी दिसून येतो.त्यांनी आपला छंद नोकरी सांभाळून फावल्या वेळात जोपासला.
आज बागेत ५,००० हून अधिक कलाकृती आणि शिल्पे आहेत.हे गार्डन जवळपास 40 एकर मधे पसरलेले आहे. तीन वेगवेगळ्या फेजेस मधे विकसित झालेले हे अद्भुत साम्राज्य चौदा कक्षात (चैंबर) विभागले आहे.(इती वाटाड्या ऊवाच) येथील कलाकृती उंच ओट्यावर प्रस्थापित केल्या आहेत. यात कलाकाराची दुरदृष्टी दिसते.जमीनीवर त्यांना सहज नुकसान पोहचले असते,किंवा त्यांचे वास्तविक सौंदर्य झाकोळून गेले असते.
मानवनिर्मित धबधबे,झोपाळे,पारंपारिक पंजाबी गाव असे अनेक प्रकार अशाच टाकाऊ वस्तूंपासून बनवले आहेत. बाहुल्यांचे संग्रहालय,घुमावदार संकुचित पाऊलवाटा, गल्ल्या(लेन), उंच उंच दगडांच्या भिंती मधून एकमेकांना जोडणारे रस्ते,भव्य कमानी आणी भव्य दालने इत्यादी.
या बाजूला जंगल असल्याने या उपद्व्याप कडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही.कचरा डेपो समजून अधिकाऱ्यांनी सुद्धा दुर्लक्ष केले. पुढे एकोणीसशे पंच्याहत्तर मधे हा भूखंड अवैध व अतिक्रमित ठरवून त्या सर्व कलाकृती नष्ट करण्या साठी सरकारी हुकूम जारी झाला.जन- सामान्यांच्या भारी विरोधामुळे सरकारला आपला हुकूम मागे घ्यावा लागला, आणी या जागेला सार्वजनिक बागेचे स्वरूप दिले गेले.
आज हे गार्डन शहराचा अभिमान तर आहेच पण श्री नेकचंद सैनी यांची यशोगाथा आहे.देशीविदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
हिंन्दी भाषेत एक म्हण आहे,"अकेला चना भाड नही फोड सकता",म्हणजे "एका हाताने टाळी वाजत नाही."पण जुनून असेल तर अशक्य पण शक्य होते.
"असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।"
या अद्भुत,अनोख्या गार्डनबद्दल किती लिहिले तरी वाचका समोर पुर्ण चित्र उभे करणे मला तरी शक्य नाही.
१९२४ मधे जन्मलेला अवलिया कलाकार २०१५ मधे एक मोठी कलाकृती,सांस्कृतिक धरोहर पाठिमागे सोडून गेला. भारत सरकारने निस्वार्थ कलाकाराच्या कलेचे कौतूक पद्म पुरस्कार देऊन केले. असो, निर्मात्याबद्दल थोडक्यात सांगायचा प्रयत्न होता.
या बागेत फिरणे,कलाकृतींचा अनुभव घेणे त्यांना समजणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. सभोवताली बागेत झाडांवर किलबिलाट चालू होता. उंच आकाशातील पक्षांचे फोटो काढू की कलाकाराच्या जमिनीवरील मोहक अद्भुत कलाकृतींचे ? अशा द्विधा परिस्थितीत सापडलो होतो............."पक्षी इतरत्रही सापडतील, सध्यातरी कलाकृतीवर ध्यान दे.........". असे मनाला समजावले.
भरपूर गर्दी होती. सेल्फिवाले,तूनळीवाले,समूह ,सोलो पर्यटक असे अनेक प्रकारचे,भाषेचे,विवीध वेशभूषा परिधान केलेले सर्व वयाचे पर्यटक आपापल्या पद्धतीने आनंद घेत होते. मी सुद्धा माझ्या कुंटूबासोबत एन्जॉय करत होतो. झाडांचे प्राकृतिक अच्छादन असल्याने चाळीस डिग्री तापमानातही अल्हाददायक वाटत होते. मस्त गारवा होता.
फिरता,फिरता अचानक एक वेगळा आवाज कानावर आला. चमकून वर बघितले तर डोक्यावर एक "पहाडी तांबट",आपल्या साथीदाराला साद घालताना दिसला.
महाराष्ट्र,गुजरात मधील तांबट पक्षी. निकाॅन डि एस एल आर डी ३४००.
" रूप पाहता लोचनी,सुख झाले हो साजणी",
गर्द झाडीत लपलेला तांबट बघताना अशी अवस्था झाली. पटापट फोटो काढले, आवाज रिकाॅर्ड केला.
हिमालयातला दिसलेला पहिला पक्षी. मला पुन्हा एकदा शहारूख खानचा तो प्रसिद्ध डायलॉग आठवला,
"किसी चिज को शिद्द्त से चाहो तो.....सारी कायनात.....ब्ला, ब्ला, ब्ला".
मी याला थोडे माॅडिफाय केले,
"तुम किसी पंछी को मुद्दाम चाहो तो वो आपके कानमे आ के बोलता है!" "मै यहाँ हू....,मै यहाँ हू....,मै यहाँ हू......"
ग्रेट बार्बेट,पहाडी तांबट' असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव Psilopogon virens आहे.मोठा आशियाई बार्बेट पक्षी, प्रामुख्याने हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो. अतिशय सुरेख,रंगबिरंगी पक्षी.प्रकृतीचे जवळपास सारे रंग याच्यात दिसतात.आपल्या कडे आढळणारा तांबट (काॅपरस्मिथ बार्बेट) सुद्धा सुरेख आहे पण एव्हढा नाही.
रूप ग्रेट बार्बेटचे!
आखूड मान,मोठे डोके,जणू रंगपेटीचे खोके!
मोठ्या पिवळ्या चोचीवर झुपकेदार मिशा,
निळे पाणीदार डोळे,याला खुल्या दाही दिशा!
पाठीवर साजिरा,मखमली तपकिरी कोट,
हिरव्या-पिवळ्या छटांनी,सजले सुंदर पोट!
बुडावर घातला याने लाल चुटुक डायपर,
भिरभिर,तीक्ष्ण नजर,जसा चारचाकीचा वायपर!
'पिल-हॉ... पिल-हॉ...', गुंजे डोंगर-दरा,
झाडांच्या पानांआड दडे, वनराणीचा तुरा!
मुक्तहस्त चित्राचा पिसारा हिरवागार,
ग्रेट बार्बेट,निसर्गाचा अद्भुत अविष्कार!
राॅक गार्डन बघण्यासाठी शुल्क मात्र वीस रुपये आहे.इतर सर्वजनिक उद्यना प्रमाणेच पार्किंग, स्नॅक्स, प्रसाधन रूम इत्थंभूत सोयी आहेत.
आम्हांला आता पिंजोर गार्डन कडे प्रस्थान करायचे होते........
बाकी पुढच्या भागात.
मिसळपाव
प्रतिक्रिया
एका पेक्षा जास्त चित्र डकवणे जमत नाही...
SOS
शाब्बास...
In reply to एका पेक्षा जास्त चित्र डकवणे जमत नाही... by कर्नलतपस्वी
जमले,जमले....
पण हा जुगाड आहे,शास्त्रशुद्ध नाही.
All well that ends well🤣
मस्तच भटकंती झालेली आहे…
मस्तच भटकंती झालेली आहे.
चंडीगड कधीच माझ्या टू डू लिस्टमध्ये नसणार आहे मात्र आपल्या नजरेने ते शहर बघायचा आनंद निराळाच.
@प्रचेतस...चंडीगड कधीच माझ्या टू डू लिस्टमध्ये नसणार
नियतीच्या मनात काय आहे कुणालाच सांगता येत नाही.
मी ऐंश मधे बारा हजार फुटांवर हिमालयात पोस्टेड होतो. दिड वर्ष झाल्यावर मला त्रास झाला. बेस कॅम्प ला आलो. हेल्थ कार्डवर शेरा आला "not to be posted HIGH ALTITUDE".
नंतर माझी कधीच अधिक उंचावर बदली झाली नाही.
आता एक्काहत्तर व्या वर्षी रोहतांग ला तेरा हजार फुट उंचीवर गाडीने व आणखीन एक हजार फुटांवर पायी पायी चढलो. काही त्रास झाला नाही.
कधी काय होणार ते माहीत नसते.
बाकी हिमाचल निसर्ग सौंदर्य तुम्हांला नक्कीच आवडेल. अतिशय अप्रतिम आहे
धन्यवाद.
हिमाचल आवडेलच पण मला अजुनही…
In reply to @प्रचेतस...चंडीगड कधीच माझ्या टू डू लिस्टमध्ये नसणार by कर्नलतपस्वी
हिमाचल आवडेलच पण मला अजुनही त्याचे आकर्षण वाटले नाही, हिमालयाने अजून बोलावलेच नाही. इथले सह्याद्रीचे काळेकभिन्न डोंगरकडे, सदाहरित वने मात्र कायम बोलावून घेतात.
मस्त लिहिली आहे भटकंती
मस्त लिहिली आहे भटकंती