Skip to main content

हिमाचल प्रदेशातली भटकंती -पुणे-दिल्ली-चंदिगढ

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 04/06/2026 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
आ

 

 

"आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो" 

चाकोरीचे खर्डून कागद सहीस पाठवतो 

व्याप नको मज कुठलाही अन्‌ ताप नको आहे 

उत्तर कुठले मूळात मजला प्रश्न नको आहे 

या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला 

मी न छ्ळावे त्यानां , त्यांनी छळू नये मजला 

बधीरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो.... -

-संदीप खरे 

 

कवी खरे यांचे म्हणणे तंतोतंत खरे आहे. सेवानिवृत्त असल्याने अगदी अशीच परिस्थीती आहे."चाकोरीचे खर्डून कागद सहीस पाठवतो ", हे काम सुद्धा आता हातातून निसटून गेले आहे.सर्वच व्यवहार डिजीटल झाल्याने कुठेच सही करण्यास वाव नाही. बॅकेत चेक अथवा पैसे काढायला WS ची गरज नाही,पत्रव्यवहार नाही,अगदी कुठ्ठे कुठ्ठे म्हणून सही करावी लागत नाही सेवानिवृत्त झाल्यानंतर  सर्वांनीच "आता तुम्हीं खुप केलत,आराम करा. थोडक्यात,  उगाच लुडबुड करू नका.आमचे आम्हीं बघून घेऊ, आम्हांला त्रास देऊ नका. आता तुमची गरज दिवाणखान्यातल्या वस्तूंसारखी आहे. असे सभ्य वर्तनातून दाखवून दिले. तसे मलाही जाणवले की सर्वजण स्वताची काळजी घेण्यास समर्थ आहेत. मलाही वाटले की सदासर्वकाळ डोक्यावर न दिसणारे ओझे हल्के झाले आहे आणी आता स्वानंदाचे दिवस आले आहेत.तेव्हां मी ही ठरवले की "व्याप नको मज कुठलाही अन्‌ ताप नको आहे", आणी मी ही काही प्रश्नांशी करार केला आहे. कवी जरी याला बधीरतेची संज्ञा देत असला तरी माझा स्वभाव सकारात्मक असल्याने मी याला "स्वमग्न",असेच म्हणेन. 

 

एका रात्रीत जग बदलते याचा अनुभव सेवानिवृत्ती नंतर येतो. काल पर्यंत घरी कधी येणार याची वाट बघणारी सुहास्यवदना, अर्धांगिनी,सारखा घरीच पडिक असतो बाहेर कधी जाणार याची वाट बघत असते. निदान बरेचवेळा तीच्या चेहर्‍यावर तरी तसे दिसते. घरी आल्यावर मिळणारा गरम चहाचा कप, कधी कधी "तेतिपो"ची बशी सेवानिवृत्ती नंतर बंद होते.तेतिपो, एक असा पदार्थ आहे ज्याचा अस्वाद घेता घेता बरीच स्वप्ने रंगवली होती. दुपारचे दुध तापवणे,दोन कप चहा करणे अशी मोठी मोठी कामे अंगावर टाकली जातात.खुश खुश वातावरण बदली होऊन खुसफूस आणी खुस खुस वाढू लागते.एक तारखेला नियमीत पेन्शन आली तरी, "खुश है जमाना आज, पहली तारीख है",हे गाणे वाजत नाही.(कारण, बर्‍याच शोधानंतर कळाले. पगार अर्धा झालेला असतो म्हणून ...) मुलांच्या शाळा संपलेल्या असतात, सकाळी उठा,डबे करा इत्यादी सकाळची घाई गडबडीची कामे बंद झालेली असतात. हळूहळू उशीरा उठण्याची मजा येवू लागते. सकाळचा मिळणारा "बेड टी",हळूहळू बंद होतो व तुमच्या बरोबर माझाही एक कप करा आणी झाकून ठेवा असा हुकूम सुटतो.

 

 आयुष्यभर घाण्याच्या बैलासारखे फिरायची सवय लागलेला "सेनि क",मात्र अजूनही आपल्या वेळा सांभाळत असतो. असो, कालाय तस्मै नम:.

असे आसतय बघा, 

रिकामटवळ्यांना,(सेवानिवृतांसाठी पर्यायी शब्द) बोलायला, लिहायला,रडायला थोडी जरी संधी मिळाली तर ते रस्त्यात उधळलेल्या वळू सारखे सुटतात आणी मग त्यांना आवरणे कठीण होते.

 

 असो,मूळपदावर येतो.... 

 

शाळांना सुट्ट्या लागल्या.आय टी वाले आईबाप  पाखरांना घेऊन आठवडा दोन आठवडे कुठे कुठे गेले असल्याने सोसायटीत पाखरांचा कलकलाट एकदम कमी झाला होता. पारंपारिक "नौतापा " , ग्लोबल वाॅर्मिगमुळे आता नऊ दिवसाचा राहिला नाही . शांत, निसर्गरम्य,पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता राजस्थानातील गंगानगर, चुरू, महेंद्रगड सदृश्य तापत होते. मुलं,नातवंड सुट्टीवर गेल्याने (पेन्श) नर नारी जरा आरामात (रिलॅक्स) होते. 

 

या वर्षी अम्रिके वारी करायची होती पण पंप्रनी केलेल्या आवाहना मळे स्थगित केली. देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावावा या उद्देशाने घरेलू पर्यटन करावे असे ठरले. 

 

"वय झालय,तुम्हांला काही कळत नाही,तुम्हीं काहिच करायचे नाहिये,मुले सर्व बघून घेतील" अशी मुक्ताफळे ऐकत गप्प बसून राहीलो. (प्रेरणा कवी संदिप खरे) मुलांनी,चंदिगढ, शिमला, मनाली,रोहतांग पास आणी जवळपासची प्रेक्षणीय स्थळे मिळून आठ दिवसाची केसरी टूर्स आणी ट्रॅव्हल्सचे पॅकेज बुक केले.

 

 "जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही", असे म्हणतात. आतापर्यंत स्वताच टूर्सचे आयोजन करत असल्याने बर्‍यापैकी अनुभव होता.पॅकेजचे ओझे पाकिटावर किती ताण देईल आणी दिलेल्या पैशाची किंमत किती वसूल होईल याचा गपचूप अंदाज घेतला आणी मान डोलावली.(तसेही मला कुठे पैसे द्यायचे होते. माझ्या मते पेन्शनर्स एक प्रकारे SIP असतात.) अर्थात, काश्मिर आणी पूर्वोत्तर सीमावर्ती भागात बरेच दिवस कार्यरत असल्याने बर्फ, घाट रस्ते डोंगर दर्‍या यांचे विशेष अकर्षण नव्हते.मुख्य अकर्षण होते ते हिमाचल प्रदेशातील निसर्गातील रंगबिरंगी पक्षांचे."मुनाल,वुडपिकर,हिमालयन बुलबुल",थ्रश,ग्रेट बार्बेट,यलो बिल मॅगपेई वगैरे.

 

दोन वर्षापुर्वी पक्षीदर्शन करताना ढगाईमाता टेकडीवर, मोहम्मद वाडी मधे अवचित "चातक",पक्षाचे दर्शन झाले होते. स्थलांतरीत, पावसाचा सांगावा घेवून येतो व पाऊस संपला की परत हिमाचल मधे निघून जातो.याचे ज्ञानेश्वरी,कथा कादंबरी मधे याचे वर्णन वाचले होते.अतिशय सुरेख पक्षी.

 

 केदारनाथला गेलेल्या सोसायटीतील मित्राने "यलो बिल मॅगपेई",चे चित्र कायप्पावर पाठवून "हा पक्षी कुठला?",अशी विचारणा केली होती.( असे कुणी विचारले की बरे वाटते.)तेंव्हा त्या प्रदेशातील पक्षांची माहिती घेतली होती.  एका पक्षीमित्राने नुकतेच हिमाचल प्रदेशाच्या राज्यपक्षाचे "मुनाल ",चे प्रची कायप्पावर पाठवले होते. हा आपल्या मोरा सारखा रंगबिरंगी, डोक्यावर दिमाखदार तुर्रा असलेला लोभस पक्षी. एकंदरीत विन- विन सिच्युएशन होती. 

 

विमानाची तिकीटे झाली. स्पाईसची  फ्लाईट पहाटे सहा वाजता होती. सकाळी तीन वाजता विमानतळ गाठायचा असल्याने लवकरच झोपावे असा विचार केला. दहा वाजता जेवण आटोपून झोपी गेलो.थोड्याच वेळात कळाले फ्लाईट कॅन्सल झाली. "बोंबला गयी भैस पानी मे", कर्मधर्म संयोगाने इंडिगोची फ्लाईट त्या वेळेसच होती व तीकीटे उपलब्ध असल्याने थोड्यावेळापुर्वी जमलेले निराशेचे ढग आशेच्या वादळामधे साफ उडून गेले. (आजकाल उड्डाणे  होणे नित्याचीच बाब झालीय). गंमत अशी की,विमानतळावर पोहोचल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली रद्द झालेली फ्लाईट अजूनही वेळेवर आहे अशी सुचना डिजीटल फलकावर झळकत होती. (कोण लक्ष देतय!) 

 

आमचे विमान वेळेवर सुटले. दोनहजार तीन ते सात मधे दिल्लीत "धौला कुवाॅ", भागत रहात होतो.विमानतळा जवळच घर होते. सर्व भाग चांगलाच ओळखीचा होता. सरोजनी नगर विस्फोटाच्या दिवशी सरोजनी मार्केट मधे दिवाळीची खरेदी कराता सहकुटुंब गेलो होतो.आजही आठवण आली की अंगावर काटे येतात. पुन्हां एकदा दोन हजार बारा मधे दिल्लीवारीचा योग आला. त्यानंतर आता दोन हजार सव्वीस मधे पुन्हां एकदा आला. दोन हजार बारा मधे फारसा फरक जाणवला नाही.परंतू यावेळेस मात्र दिल्ली मधे अमुलाग्र बदल झालेला दिसून आला.(श्री पटाईत सर कदाचित माझ्या म्हणण्याला दुजोरा देतील.) दिल्ली विमानतळावर बाहेर पडताना बॅक मैना प्रचुर संख्येत बागडताना दिसल्या. 

 

बाहेर इतर सह प्रवाशांची भेट झाली. माझी नजर मात्र आकाशा कडे भिरभिरत होती. घारी,कावळे आणी इतर माणसाळलेले पक्षी बिनधास्त विहार करत होते. दिल्ली त्रेचाळीस डिग्री रणरणत्या उन्हात सुद्धा पळत होती. बस भरली , चंडीगढ कडे रवाना झाली. पाच ते पंच्याहत्तर वयोगटातील प्रवाशांनी आपापला ग्रुप बनवला. गप्पाटप्पा सुरू झाल्या.एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे, सर्व मोबाईल खिशात,पर्समधे गेले होते. 

 

लहानपणी बस मधे खिडकी जवळची जागा मिळणे,केव्हढे अप्रूप होते.वय वाढले पण खिडकी जवळच्या जागेचे अप्रूप आजही कायम आहे. लवकरच बसने हरियाणात प्रवेश केला.मुरथल सोनीपत, पानिपत,कुरुक्षेत्र मागे टाकत असताना एक गोष्ट लक्षात आली की कन्या भ्रूणहत्या विरूद्ध  जागरूकता मोहीम जोरदार  चालवलेली दिसली.रस्त्यालगतच्या भिंतींवर लक्षवेधक घोषवाक्ये मोठ्या अक्षरात रंगविण्यात आली होती सोबत सुचक चित्रेही काढली होती. 

 

"कैसे खाओगे उनके हाथ की रोटियां 

जब नही बचाओगे तुम बेटिया" 

 

बेटी पढाओ बेटी बचाओ

 

 नही बचाओगे अंश, 

तो कैसे बढेगा वंश? 

 

मुरथल जवळ दुपारचे जेवण," हवेली हाॅटेल ",मधे घेतले. ही एक "कामत", सारखीच मोठी साखळी आहे. उत्तम परिसर,आतमधे सर्व सुखसोई अगदी वाॅशरूम सुद्धा वातानुकूलित. पंजाबी मेन्यू. बरेच दिवसांनी दाल माखानी व मुंग दाल हलवा अगदी पारंपारिक चव असलेला खायला मिळाला. बरोबरच रब्बी शेरगिल यांचे सुफी संगीत "बुला की जाणावे मै कौण..."आवडते गाणे लागले होते. मग काय दिक्षित, दिवेकर बाजुला सारून मस्त ताव मारला. बाहेर सेल्फी प्रेमींना भरपूर स्पाॅट होते. जुनी "ऑस्टीन", बासष्टचे माॅडेल असावे,उभी होती. लाल रंगाची. (पंजाबी लोकांना लाल रंग खुप आवडतो असे निरीक्षणात आले होते ) तिच्या बरोबर मी ही एक सेल्फी काढला.

अ 

 

ई

 

हायवे वर पंपावर डिझेल, पेट्रोल करता रांगा दिसल्या नाहीत. आमच्या बस मधे 280 लीटर डिझेल भरले. रेट ९१ रू. प्र लि.गॅस चा तुटवडा कुठेच दिसला नाही. एक, दोन ढाब्यावर चौकशी केली असता कुणीच रडगाणे गाताना दिसले नाही. दिल्ली, सोनीपत मुरथल घरौदा पानीपत कुरुक्षेत् करत बस एकदाची चंदिगढला पोहोचली. संध्याकाळ झाली होती. सर्व जण दमले होते. उद्याच्या कार्यक्रामाची रूपरेखा ऐकली. जेवण केले खोलीत जाऊन गुडूप झाले. ता.क.- मिपावर लेख व प्रचि डकवणे सोपे झालेय. मालकांचे आभार.  

(तंत्रज्ञान मागासवर्गीय  लेखक)


वाचने 136
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

पहीला भाग मस्त जमलाय!! खुसखुशीत झालाय. संपादन करुन चित्रे  ओढुन मोठी करा मात्र , म्हणजे मस्त दिसतील.

आता लेखमाला येउंद्या बैजवार. पुभाप्र.

 

आणि हो!! मी पयला!!


या महिना अखेरीस चंडीगड ते लेह असा अटल टनेलमार्गे प्रवास होणार आहे . आम्ही मनालीपर्यंत पर्यटन थांबे घेणार नाही त्यामुळे या प्रवासातील मनालीपर्यंतचे आपले अनुभव वाचायला निश्चितच आवडतील .