माझा गुडघा दुखतो. उजवा गुडघा. खरं तर पूर्वीच म्हणजे मी पन्नाशी ओलांडली तेव्हा तो थोडा थोडा कुरकुर करायला लागला होताच. पण मी म्हटलं इतक्या लहान वयात (!?) गुडघा कसा दुखेल बरं! आणि दुखून चालणारच नाही (शब्दशः). आपल्याला तर अजून किती तरी कामं करायची आहेत.
तेव्हा असं वाटलं की, खूप काही अचिव्ह करायचं आहे. आपण काही म्हातारे झाले नाही आहोत. आपण ज्येष्ठ नागरिक व्हायला अजून दहा वर्षं बाकी आहेत.
पण माझ्या या मताशी माझा उजवा गुडघा सहमत नव्हता. तो आपला दुखतच होता.
मी घरच्या घरी इलाज सुरु केले. जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे "एक चुटकी में दर्द गायब" करणारी क्रिमं आणून चोळून पाहिली. शेकून पाहिलं. गुडघ्याचे स्पेशल व्यायाम केले. पण गुडघा काही त्याचं "दर्द ए गुडघा" सोडेना. उलट माझ्या उजव्या गुडघ्याला पाठिंबा आणि सहानुभूती दर्शविण्यासाठी माझा डावा गुडघा ही दुखू लागला. जिने चढणं, उतरणं कठीण व्हायला लागलं. आधारासाठी रेलिंग तेही दोन्ही बाजूंना गरजेचं वाटायला लागलं.
मी मनातल्या मनात आपण ज्येष्ठ नागरिक व्हायला लागलो हे मान्य करायला लागले. आपल्या सेंड ऑफ च्या दिवशी आपण काठी घेऊनच पुष्पगुच्छ घ्यायला आणि चहा, चिवडा भक्षण करण्यासाठी जाऊ याबद्दल मला पूर्ण खात्री वाटू लागली. पन्नास वर्षांची झाले आणि कवी मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे"कृतान्तकटकामलध्वज जरा "मला दिसो लागली" (दचकायला काय झालं? अभिजात मराठीत लिहिलंय.)
डोळ्यांचा नंबर वाढला. केस पांढरे झाले. ते डाय करायचा कंटाळा येऊ लागला. दंताजीचे ठाणे एक एक करून उठू लागले. दंतचिकित्सकही, "दात उपटायला नको. सेव्ह करुया", असे म्हणत माझ्या पर्सचे रुट कॅनाॅल करु लागले. धडधडत्या हृदयाने, वाढत्या पल्सरेटनिशी दंतवैद्याच्या खुर्चीवर वारंवार बसावे लागू लागले. कान वाईट आणि चांगलं दोन्हींही ऐकण्याची क्षमता हरवून बसू लागले.
मी बघा म्हातारीसारखी पाल्हाळ लावत बसले. या तक्रारी पूर्वीही खूपदा सांगून झाल्या आहेत.
तर आजचा वर्ण्य विषय काय ? हं.. माझे दुखणारे गुडघे!
माझे गुडघे दुखतात म्हटल्यावर अनेक थोर आणि प्रसिद्ध लोकांना, लेखक (आपले पु.ल. हो!) खेळाडू, राजकीय नेते, इतर देखील अनेक आदरणीय लोकांना गुडघेदुखीनं सतावलं होतं हे आठवून माझं दुःख थोडं कमी झालं.
माझे गुडघे दुखतात म्हटल्यावर माझ्या मित्र मैत्रिणींना टिंगल करायला एक विषय मिळाला.
"अरे,हिचा मेंदू आय मीन गुडघा दुखतोय रे. म्हणजे हिला दोन, दोन मेंदू आहेत. एक उजवा आणि एक डावा."
"दोन मेंदू असूनही फिजिक्स, केमिस्ट्री,मॅथ्स ला काॅलेजात असताना इतके कमी मार्कस.! आईशप्पथ !"
अर्थातच् असल्या घिशापिट्या पीजेमुळे मला मुळीच हसू फुटले नाही. काही नातेवाईक सांत्वन करायचे, "अगं, फक्त मसल दुखावला असेल. हाडाला काही झालं नसेल."
..काय फरक पडतो? दुखतंय त्याचं काय??
काही "हितचिंतकांनी" आश्चर्य व्यक्त केलं, "अगबाई, इतक्या लहान वयात गुडघेदुखी? कसं होणार हिचं? अजून मुलीचं, सुनेचं बाळंतपण करायचंय.नातवंडं खेळवायची आहेत."
"आम्हाला बघा, काहीही होत नाही. दिवसभर कामं करत असतो. चार चार बाळंतपणं झाली,पण आमच्या तब्येती ठणठणीत!"
"यांची खाणी सकस नाहीत. बाहेरून मागवायचं, हाँटेलमध्ये जायचं, पिझ्झा, बर्गर, सर्रास खातात. मग असली दुखणी पन्नासाव्या वर्षी होणारच.
काही अधिकच जास्त हितचिंतक म्हणाले,"पायांकडून अधू होणार आहेस तू. कुबड्या घेऊन चालावं लागलं नाही म्हणजे मिळवली. काळजी घे नाहीतर व्हिलचेयरला खिळून राहशील पुढच्या आयुष्यात."
काळजी घे? कशी?
मी आर्थोपिएडिक सर्जनना दाखवलं. एक्सरे,एम्आर आय, फिजिओथेरपी, डायथर्मी,नी कॅप, ब्रेसेस इ.इ. चौंऱ्याऐंशी लक्ष टेस्ट आणि उपचारांच्या फेऱ्यांतून जाऊन आल्यावर "ऑपरेशन करावे का ?", यावर आम्ही घरातल्या मंडळींनी एकत्र चर्चा केली. अनेक डॉक्टर्स आणि ज्यांनी ऑपरेशन करून घेतलंय अशा पेशंट्सची सेकंड, थर्ड, फोर्थ इत्यादी मतं विचारली.
काही सर्जन्स म्हणाले,"ऑपरेशन ची काहीही गरज नाही."
काही जण म्हणाले,"ताबडतोब केलं पाहिजे. मी कालच एका ८५वर्षांच्या आजोबांचं ऑपरेशन केलं. ही इज रिकव्हरिंग ."
ज्यांची सर्जरी झालीय अशांना विचारलं तर काहीजण म्हणाले,"अजिबात करुन घेऊ नका.सक्सेस रेट चांगला नाही. मला तर काहीच उपयोग झाला नाही."
तर दुसरा म्हणाला,"जरुर करुन घ्या. डॉक्टर अमुक तमुक यातले स्पेशालिस्ट आहेत. त्यांनी केलं माझं ऑपरेशन. मी रोज सकाळी योगासने,जाॅगिंग करतो. आत्ताच लेह लडाख ट्रिपला जाऊन आलो."
मला तर एका पढ्यालिख्या ओळखीच्या बाईंनी सांगितलं,"माझ्या गुरुमाँ अशी दुखणी बरी करतात त्या दुखऱ्या जागेवर अग्निकर्म करतात. त्यांच्याकडे एक पंचधातूची सळी आहे, त्या सळीनं त्या दुखऱ्या भागावर चटके देतात. पेशंट लग्गेच बरा होऊन , आपल्या पायांनी पळत पळत घरी जातो."
एका मानलेल्या दिरांनी सांगितलं,"आमचे महाराज यावर प्रभावी उपचार करतात. ते पेशंटला फरशीवर झोपवून त्याच्या दुखऱ्या भागावर उभे राहतात. मग काही वेळाने त्यांच्यात अलौकिक शक्तीचा संचार होतो आणि ते त्या पेशंटच्या शरीरावर नृत्य करु लागतात. पेशंट ताबडतोब बरा होतो."
मी विचारलं ,"वेदना झाल्यावर उपचार करण्यापेक्षा ते महाराज वेदना होऊच नयेत म्हणून आपल्या दैवी शक्तीचा उपयोग का नाही करत?".
त्यावर ते गृहस्थ म्हणाले ,"वेदना होतात ते आपलं पूर्वसंचित आणि प्रारब्ध असतं."
मी म्हटलं,,"अगदी कर्रेक्ट बोललात."
तर एकूण काय तर माझे गुडघे आता मी पंच्याहत्तरी ओलांडली आहे तरीही दुखतात. मला वाटतं आता मी त्या गुडघेदुखी सकट, आणि इतरही बारीक सारीक शारीरिक व्याधींसकट जगायला शिकलेय. प्रत्येक व्यक्ती तेच करते. न करुन सांगते कुणाला? पण या सगळ्या चक्रव्यूहातून गेल्यावर माझ्या लक्षात काही सत्यं आली आहेत.
शरीराचं ऐकलं पाहिजे. मन हे नेहमीच शरीरावर सत्ता गाजवत असतं. पण आपण शरीराला महत्त्व दिलं पाहिजे. जन्मभर शरीराला कष्ट दिलेत. आता त्याला विश्रांती द्या. शरीर स्वतःच स्वतःला बरं करत असतं. तसं करण्यासाठी त्याला अवधी द्या.
जे टाळणं अशक्य आहे ते सहन करण्याची क्षमता वाढवा. त्याच्या सह जगायला शिका.
ते तुमचा सोबती, सांगाती आहे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही वर्षांपूर्वी माझ्या…
काही वर्षांपूर्वी माझ्या आईची मैत्रीण माझ्याकडे आली होती. वय वर्षे ७५.
ती मला म्हणाली
अरे डॉक्टर ( अगदी माझ्या लहानपणापासून मला पाहत असल्यामुळे अरे तुरे) आज काल माझे गुढघे दुखतात आणि कंबर पण मधून मधून दुखते.
मी त्यांना म्हणालो मावशी तुम्ही घरभर फिरून पहा घरात एक तरी ७५ वर्षे जुनी गोष्ट चालू आहे का?
दोन मिनिटं विचार करून त्या म्हणाल्या तू म्हणतोस ते खरं आहे एकही गोष्ट ७५ वर्षे जुनी आणि चालू नाही घरात.
मी म्हणालो मावशी ७५ व्या वर्षी सुद्धा तुमचं शरीर व्यवस्थित काम करत आहे आणि तुम्ही चालत्या फिरत्या आहात हे चांगलं नाही का?
तुम्हला अनेक पुल देशपांडे यांचं वाक्य सांगतो- ते लिहितात वयाच्या ७५ व्या वर्षी तुम्ही सकाळी उठला आणि गुढघे, पाठ, कंबर, डोकं, मान यातील काहीच दुखत नसेल तर तुम्ही मेला आहात असं समजायला हरकत नाही.
आणि श्री मंगेश पाडगावकर यांच्या शब्दात सांगतो- जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?
तुम्ही ७५ वर्षे काम केलं. त्यातून तुमच्या लहानपणी आणि तरुणपणी आजकालच्या मिक्सर सारख्या सुविधा नव्हत्या. इतकी वर्षे श्रम केले तेंव्हा तुमचं शरीर थोडं फार झिजणारच. याला उपाय काही नाही.
माझा अस्थिव्यंगतज्ज्ञ मित्र माझ्या आईला म्हणाला होता. काकू तुमचं शरीर झिजलं आहे त्याला माझ्याकडे उपाय नाही. तुम्ही आलात तर मी बदलून बदलून औषध देईन पण कायमचा उपाय नाही.
त्या हसून म्हणाल्या तू म्हणतोस ते बरोबर आहे.
मिपापण 'त्या' कटात सामिल आहे की काय ?
मझं पण पंचहात्तरव्वं वर्ष आता संपत आलंय. एक गुढघा दुखू लागलाय, त्याबद्दल बायकोशी कधीकधी बोलणं होत असतं. तर ते बोलणं 'ऐकून' आताशा युट्यूब उघडल्यावर लगेच गुडघ्यांचे व्यायाम, आसने, मुद्रा, गुडघा- तज्ञांचे इंटरव्ह्यू, ॲमॅझॉनवर नी-क्याप आणि तत्सम उत्पादने, महाराष्ट्राच्या हास्यजत्रेवर समीर चौघुले वगैरेंची गुडघेदुखी, गूगलवर गुडघेदुखीबद्दल लेख वगैरे आपोआप दिसू लगलंय.
आत्ता सहज मिपा उघडतो, तर हा लेख. हे राम. हे भगवंता, आता मी कुठे जाऊ, काय करू ?
चला, आता नीक्याप लावून काठी घेऊन जरा फिरुन यावे, म्हणजे अंम्मळ बरे वाटेल.
निर्व्याज
आजी,
किती निर्व्याज लिहिता तुम्ही! स्वतःच्या दुःखावरही विनोद करणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. शंभर वर्षे तुम्ही चालते फिरते राहून आयुष्य व्यतीत करावं ही शुभेच्छा.
तुमचं लिखाण पुस्तक रूपातही यावे अशी अपेक्षा.
वाह...
मस्त लिहिलंय. आवडलं.
मी अजून पन्नाशी ओलांडली नाही पण गेल्या दोन वर्षांपासून ट्रेकिंगला गेलो की दोन दोन महीने गुडघेदुखी तळ ठोकून बसायची. वाटलं संपलं आता असं फिरणं पण मग ठरवलं की इतक्या सहजपणे गुडघे टेकायचे नाहीत. कंबर (आणि गुडघे), कसून तयारीला लागलो आणि नुकताच साठ किमीचा, हिमालयातला एक कठीण ट्रेक पार पाडून आलो. गुडघ्यांनाही कळलं बहुतेक या माणसाची “घुटण्यातच आहे” त्यामुळे यावेळी तेही कुरकुर न करता गप्प बसलेत.
खरय शरीराची झीज खुप काही…
खरय शरीराची झीज खुप काही गोष्टी बदलते.
शरीराचे ऐकावे की मनाचे ??ही अवस्था चाळीशीनंतर येतेच असे ऐकले आहे.पण जे मनाचे ऐकतात तेच शरीरालाही झुकायला लावतात,त्यांच्याकडे पाहायला पाहिजे.माझ्या मातोश्रीने वयाच्या ६५ त १८ किलो कमी करुन अनेक दुखणी रिवर्ट केली आहेत.
रच्यकाने मला आताच सायटिका सांगितला आहे.आता मातोश्रीचा सल्लाच घेते.
आजी काळजी घ्या. आराम करा आणि…
आजी काळजी घ्या. आराम करा आणि लिहिते राहा बरं वाटेल. आमच्याकडेही गुढघ्यांची दुखणी आहेत.
उपचार, ते सगळं ऐकणे, उपाय या सर्व गोष्टी आहेतच.
बाकी, औषधोपचार साथ देत नसतात तेव्हा देव धर्म नवससायास वगैरे तर अरारा तिकडे माणसं झुकू लागतात.
-दिलीप बिरुटे
तू माझा सांगाती..
लहानपणापासुनच सायकलीवर फिरण्याची संवय , जरी आता वय झाले तरी सोडली नाही. अजुनही सायकलीची साथ सोडली नाही.त्याचा फायदा असा की अजुन तरी गुढगे दुखीचा त्रास सुरु झाला नाही. फक्त एकाच स्थितीत बराच वेळ बसुन राहिल्यावर, ( संगणकासमोर अथवा वाचनात दंग झाल्यावर ) उठुन चालु लागल्यावर, पाच दहा पावले थोडासा गुढगा दुखतो, पण ह्या वयात एव्हढे तर होणारच ना ? अशी मनाची समजुत काढून, पुढील वाटचाल करीत राहावे असे ठरविले आहे. कोणत्याही गोष्टीचा बाऊ करावयाचा नाही, हे पक्के.
जे टाळणं अशक्य आहे ते सहन…
जे टाळणं अशक्य आहे ते सहन करण्याची क्षमता वाढवा. त्याच्या सह जगायला शिका. +१
आजींचे लेख
नेहमीप्रमाणेच खुसखुशीत!!
हल्ली फार विचार केला
की माझा गुडघा दुखतो (कधी डावा तर कधी उजवा). हे असे का होत असावे यावर सध्या सतत विचार करतोय. विचार करून करून गुडघा आणखी दुखेल अशी भीतीही वाटत राहते.
श्रीश्री घुटनादु:खानंदस्वामी (भटिंडावाले) यांच्या दर्शनाला जावा
In reply to हल्ली फार विचार केला by अनन्त्_यात्री
'डावे' विचार करत असता 'उजवा' गुढघा दुखतो, आणि 'उजवे' विचार करत असता 'डावा' गुडघा दुखतो,
किंवा -
'डावे' विचार करत असता डावाच, आणि 'उजवे' विचार करत असता उजवाच गुडघा दुखतो,
... याची सातत्याने १०८ दिवस नोंद करून ठेवा, आणि मग श्री श्री श्री १०८ घुटनादु:खानंदस्वामी (भटिंडावाले) यांच्या दर्शनाला जावा. मुक्ती मिळेल याची ग्यारंटी. (गलत साबित करने वालों को एक लाख रुपैय्या नगद इनाम)
त्यांच्याकडे एक पंचधातूची…
त्यांच्याकडे एक पंचधातूची सळी आहे, त्या सळीनं त्या दुखऱ्या भागावर चटके देतात. पेशंट लग्गेच बरा होऊन , आपल्या पायांनी पळत पळत घरी जातो."
चटका बसल्यावर कोणीही पळत सुटणारच की.
" क्योकी मै झूट नही बोलता " सिनेमात गोविंदा एका म्हाताऱ्या माणसावर हा प्रयोग करून दाखवलेला आहे. तो माणूस आगीला घाबरून चार फूट उंचीची लाकडी चौकट चढून जातो.