छिद्रान्वेषी वैतागसम्राटाची डायरी ( भाग २)

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
16 Aug 2012 - 7:35 pm

१ जानेवारी :
आत्ता रात्रीचे बारा वाजताहेत. सकाळपासून कालच्या पार्टीचा हॅंगओवर. म्हणजे उलट्या, मळमळ तर आहेच त्यात जुलाबही...रजाच पडली. रात्री डॉक्टरकडे जावं लागलं... नवीन कुठलीतरी स्ट्रॉन्ग औषधं दिली.. वर चारचौघांत " पिणं कमी करा" हा सल्ला. आता औषधं घेतल्यावर जुलाब बंद झालेत तर आता अंगावर रॅश आल्यासारखी वाटतेय... आणि लिहिताना खाज येतेय सर्व त्वचेवरती... म्हणजे ऍलर्जी नक्की कोणत्या गोळीची हेही आता कळणार नाही.. *** चा फोनही लागत नाहीये आता.. आता बसा खाजवत.. असा हा वर्षाचा पहिला दिवस... वै ता ग....

५ जानेवारी :
ही स्वप्नं म्हणजे एक त्रास असतो. झोपेतून जागं झाल्यावरती अजिबात आठवत नाहीत. आज पहाटे गंमत झाली..राष्ट्रपती झाल्याचे स्वप्न पडले. चक्क बरेचसे आठवतही होते. चांगली गोष्ट म्हणजे राष्ट्रपती झालो. पंतप्रधानाला किंवा मंत्र्याला फ़ार कामं अस्तात. नाना भानगडी निस्तरायच्या असतात. राष्ट्रपतीची मज्जा असते. हारतुरे आणि मानसन्मान स्वीकारायचे, भाषणबाजी आणि परदेशदौरे करायचे..काही जबाबदार्‍या नाहीत,कोणाला उत्तरं द्यायची नाहीत, पत्रकारपरिषदांमध्ये अवघड प्रश्न नाहीत..पाच वर्षं नुसती मज्जा .. तर आम्ही राष्ट्रपतीभवनात असतानाच त्या स्वप्नातल्या राष्ट्रपतीभवनाचे लाईट गेले. ( मग मी सवयीने फ़्यूज चेक केला, बिल भरलंय का ते पाहिलं, आजूबाजूच्यांचेही गेले आहेत का ते पाहिलं, बोर्डाच्या ऑफ़िसाला फोन केला, तो एंगेज होता, मग पुन्हा पुन्हा फोन केला, मधल्या काळात वायरिंगमध्ये फ़ॉल्ट आहे का चेक करायला इलेक्ट्रिशियनला बोलावलं , तोपर्यंत पहाट झाली आणि उजाडायच्या वेळी लाईट आले)... आमचं स्वप्न सुद्धा हे असं अस्तं..चिडचिड होणार नाही तर काय...

१० जानेवारी :
ऑफ़िसातला एक मनुष्य आहे.. नवीन आलाय . पण सदा हसतमुख. बॉसने झापला, हसतो. सर्दी ताप असताना कामावर येतो आणि तरी हसतो.गेल्या महिन्यात पाकीट मारलं गेलं, हसतो. या माणसाच्या टाळक्यावर परिणाम तर नाहीये न झालेला, हे मी विचारलं एकादोघांना.तेही हसले. आता यात हसण्यासारखं काय आहे? उगीचच हसणारे लोक येडचाप असतात..

१८ जानेवारी :
सारखं भावव्याकूळ होऊन येडचाप कविता पाडणारे दोन बावळट भेटले आज. त्यांनी जाम पकवलं. मग त्यांची एक एक कविता झाली की मी त्यांना नोकरी नीट करा, कुटुंबीयांची काळजी घ्या, भावनांनी पोट भरत नाही असलं सांगायचो.. मग तो कोणा युरोपियन कवीच्या अनुवादित कविता म्हणायला लागला... मग एक कविता सम्पली की तोच तो कवी गरीबीत कसा मेला, मरताना तो भ्रमिष्ट झाला होता, आपल्या अवस्थेला तोच कसा जबाबदार आहे; हे मी सांगितलं... मग त्यातला एक पेटला, म्हणाला, " माझ्या आदर्शाबद्दल असं बोलू नका. याचा त्यांच्या कलेशी काहीही संबंध नाही , ही त्यांची वैयक्तिक बाब आहे " ... म्हणालो," का? का नाही बोलायचं? पैसे खाल्ल्यामुळे त्याची नोकरी गेली , मग तो फ़्रान्समध्ये पळून गेला, पुढे त्याला सिफिलिस झाला मग तो वेडा झाला. आणि मेला . खरं ते खरं.. मी बोलणार.." .. दोघे जाम चिडले ... पण माझा नाईलाज होता..

२० जानेवारी
: हिच्या माहेरच्या गावचे अध्यात्मिक अधिकारी बुवा आहेत... त्यांचं एक संस्थान आहे, गुरुवारी लाइनी लावून लोक दर्शन घेतात त्यांचं.. त्यांना एकूण फ़ार मान. त्यांच्या एका प्रवचनाला गेलो. ( जावं लागलं.. "भेटलात तर पायावर डोकं ठेवा, तुमचे नेहमीचे आचरट प्रश्न विचारू नका" असा घरचा सल्ला होता ). नेमकी नको असताना दुसर्‍या लायनीत जागा मिळाली. इतक्या पुढे बसल्यावर झोपताही येइना. प्रचंड झोप येत होती. मग झोप घालवण्यासाठी डोक्यात विचारचक्र चालू केलं. हे दिसतात तितके सज्जन असतील का?रोज दाढी नीट केली तर यांचं अध्यात्मिक तेज कमी होईल का? इन्कम ट्याक्स किती भरत असतील? पैशे कसे खात असतील? बायांच्या भानगडी असतील का? यांच्यावर स्टिंग ऑपरेशन करायचं म्हटलं तर क्यामेरा कुठे लपवता येइल? कोणतं चॅनल ही बातमी दाखवेल? एकूणच मानवप्राणी स्खलनशील आहे या विषयावर जालावर लेख लिहावा का? मनाला येइल ते लिहिलं तर लेख संपादित होईल का? झोपच उडाली. वेळही बरा गेला....

३१ जानेवारी :
टीम अण्णाचा ( पुन्हा) सरकारला इशारा... क्रांती करणार म्हणे..यांच्या नानाची टांग... मी तेव्हाच म्हटलं होतं, या मूर्खांच्या नादाला लागू नका... पण आमचे कोण ऐकणार? गेलं वर्षभर बडबडतोय पण आम्हीच भ्रष्ट... फ़ाल्तु गोष्टींतून भारावणारी आजची तरूण पिढी... कोणीही लोकशाहीला शिव्या द्यायला लागलं की मला जाम वैताग येतो. त्या बालगंधर्व चौकात बसलेले येडपट लोक पाहिले की कीव येते मला.

१० फ़ेब्रुवारी :
एवरेस्ट मोहिमेसाठी मदत मागायला आज ऑफ़िसात दोन लोक आले. "ही तुमची वैयक्तिक हौस आहे त्याला मी का द्यायची मदत?" असा मोठ्ठ्याने वाद घातला त्यांच्याशी. शब्दाने शब्द वाढला. " तुम्हाला हिमालयात महिना दोन महिने ट्रिप करायचीय तर मी कशाला द्यायचे पैशे? मला अंटार्क्टिका खंडावरती हेलिकॉप्टर चालवायला शिकायचंय आणि पॅराशूत दुरुस्तीचे क्लास काढायचेत तर मी मागतो का तुम्हाला पैशे? तुमची हौस करायला लोकाचे पैसे वापरू नका. " असं बराच वेळ चाललं.. चिंतलवाराने बाजूला नेला त्यांना.

१७ फ़ेब्रुवारी :
आज शाळा सिनेमा पाहिला.. तिची फ़ार आठवण झाली. कुठे कशी असेल कोणास ठाऊक ?.. चिठ्ठी मी लिहिली नव्हती यावर पम्या आणि देव्याचा कधीच विश्वास बसला नाही. तिच्याशी शेवटचं नीट बोलायचंच राहून गेलं..या वेळी तिचा वाढदिवस होऊन गेल्यावर चार दिवसांनी आठवलं, हे बरंय.. नाहीतर त्या दिवशी उगीचच हुरहूर वगैरे लागते. या वैतागातून कायमची मुक्ती कधी ?

५ मार्च :
आज जवळच्याच एका मॉल्मध्ये जाऊन आलो. सिनेमा आणि शॉपिंग वगैरे... च्यायला या पोरांच्या ...पोरं जाम कुरकुर करतात. सदा चेहरा वाकडाच. लहान असताना खाऊ आणा, कपडे , खेळणी नवीन काहीही आणा, यांना काहीही आवडणारच नाही... सदान्कदा रड चालूच. आता जरा मोठी झालीय्त म्हणावं तरी तेच.. हाच सिनेमा हवा, त्याच मल्टिप्लेक्सला हवा, अस्से पॉपकॉर्न नकोत , असलाच कोला हवा आणि अश्शाच सीटा नकोत. सारखी कूरकूर. ही म्हणते तुमच्यावर गेलीय्त दोन्ही पोरं.आता माझं काय चुकलं यात? काहीही.. आता मी कधीतरी कूरकूर करतो का ?सगळं जीवन आनंदाने सहन तर करतोय. पण सांगतो कोणाला? अजिबात भांडलो नाही. हा असला तोंड दाबून बुक्क्यांचा मार हा एक भीषण वैताग असतो.

२० मार्च....
आज इलेक्शनची तारीख जाहीर झाली. मतदान हा लोकशाहीतला सर्वांत आवश्यक पण वे**वा प्रकार आहे, असं ऑफ़िसातला चिंतलवार म्हणतो. आमच्या ऑफ़िसाला यावेळी पूर्ण सुट्टी दिलेली नाही, हा सर्वांत भीषण प्रकार असणार आहे. म्हणजे आदल्या दिवशीच लॉन्ग ट्रिपला जाता येणार नाही. हा साला अन्याय आहे.

२५ एप्रिल :
आम्चा एक शाळेतला एनाराय मित्र भेटला आज. देशाटनाने येणारे चातुर्य कसे महत्त्वाचे आहे असे फ़ार ऐकावे लागले..इन्डिया इतकं कसं बदललं वगैरे ऐकून कान पकले. . विशेषत: नुकतेच पर्यटन करून आलेला एनाराय लग्नाचे फोटो दाखवणार्‍यांइतकाच धोकादायक.... आता बायकोला पण कशी नोकरी लागली, आता दोघे कसे मजबूत कमावतात, दर वर्षी आल्प्समध्ये स्कीइन्ग करायला जातो वगैरे बडबड ऐकून घेतली... शाळेच्या परीक्षेत मी पेपर दाखवायचो, म्हणून पास तरी झाला हा... काय एकेकाचं नशीब असतं, वैताग असतो एकेक.. मी पण मग तुझ्या घरात मोलकरणी किती? ( आमच्याकडे तीन आहेत .. )तुझी कार कोण धुतं?( पाच डॉलरमध्ये आमच्या सोसायटीत महिनाभर कार पुसतो एक मुल्गा)... बेबीसिटिंगला किती खर्च येतो? तव्यावरची गरम पोळी रोज खायला मिळते का? इतपत प्रश्न विचारून वचपा काढला. एकूण हे गावाबाहेर लाकडी घरात राहून , केरफ़रशी, धुणं भांडी स्वत:ची स्वत: करणारे आणि फ़्रीजमधलं गार अन्न पुन्हा पुन्हा गरम करणारे एन आर आय लोक म्हणजे एक त्रास अस्तो.

१० मे :
काल चाळीस वर्षं वय पूर्ण झालं...आणि मिशीचे केस सुद्धा पांढरे होताहेत असं जाणवलं. ( चाळीस वर्षांचे लोक म्हणजे म्हातारे, असं माझंच सुप्रसिद्ध वचन आठवलं.. लहानपणची स्वत:ची मूर्ख स्टेटमेन्ट्स आठवणं म्हणजे एक त्रास आहे) आज बर्‍याच दिवसांनी वजनकाट्यावर उभा राहिलो. ८२ किलो दिसतंय वजन. वीस वर्षांपूर्वी कॉलेजाबाहेर पडलो तेव्हा सत्तावन्न होतं. तेव्हा हॅन्गरला टीशर्ट अडकवल्यासारखं शरीर दिसायचं ... फ़ेसबुकावर कोणीतरी जुन्या फोटोंमध्ये मला ट्याग केला, गहिवरलो. ते पाप्याचं पितर बघवेना. घाईघाईनं ट्याग काढला. या फ़ेसबुकाच्या नानाची टांग..

२३ मे :
आज एक पत्र आलं. शाळेतल्या कोणा मित्रांचं. शाळा सोडून पंचवीस वर्षं झाल्याबद्दल एक स्नेहसंमेलन आयोजित केलेलं आहे पुढच्या महिन्यात. या दोघातिघांनी शाळेत शोधाशोध करून सर्वांचे पत्ते शोधून काढले वगैरे वगैरे... रिकामपणाचे उद्योग नुसते. अर्थात यातल्या एकाच्या बापानं आयुष्यभर सावकारी केली. भरपूर माया गोळा केलीय म्हणे. याला काय फ़रक पडतोय? पत्रातली भाषा इतकी लाडीक ( पुनर्मीलन सोहळा आणि काय काय) आणि भीषण शुद्धलेखन... का बोंबलायला जायचं मी असल्या कार्यक्रमाला ?

२९ मे :
डॉक्टर लोक एकूणच जादा शहाणे. सत्यमेवजयतेनंतर एकूणच शेपटावर पाय पडल्यासारखे चिडचिड करायला लागले. ते फ़ारच मजेदार. तर आज तो समोरचा नवीन डॉक्टर भेटला तर त्याला त्यावरून उचकवला तर काही बोलायला तयार नाही. भलताच नेमस्त माणूस... आमीर खान चांगला आहे म्हणायला लागला. काही मजा येइना, मग नेहमीची ट्रिक वापरली. ऍलोपॅथीवाल्यासमोर निसर्गोपचार, होम्योपॅथीवाल्यांचे कौतुक करायचे आणि रेकी, निसर्गोपवारवगैरे लोकांपुढे मॉडर्न मेडिसिनचे. या ट्रिकनंतर अपोझिट साईडचे लोक जाम उखडतात ग्यारंटी... पण हा ढिम्म. " तुमची मतं इन्ट्रेष्टिंग आहेत" इतकंच म्हणाला. काय वैताग आहे. धड चिडताही येत नाही काहींना..

१६ जून
: आज नवी छत्री हरवली. सकाळी नळाला पाणीच आलं नव्हतं.खाली पंपाची मोटर जळाली म्हणे. मग सोसायटीची इमर्जन्सी मीटिंग भरली संध्याकाळी. मला खरंतर सोसायटीच्या चेअरमनच्या नावाने जाम ठणाणा करायचा होता की हे लोक नेहमी महाग वस्तू आणतात, आणि यांना प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन लुटतात पण जो जास्त बोंब मारतो त्याच्या गळ्यात जास्त कामं पडतात हे मला महित होतं . ( एकदा असंच मीटिंगमध्ये सांगायला गेलो तर ते गवंड्याचं काम माझ्यावरच पडलं .. एक रजा गेली फ़ुकट) . सोसायटीची कामं गळ्यात घेणं हा किती वैताग असतो हे काय मला ठाऊक नाही? मनात नसतानाही निमूटपणे बसून राहिलो. फ़ार चिडचिड झाली.. कामं गळ्यात न पडण्यासाठी हा वैताग सहन केला.

२१ जून :
आज नक्कीच ठरवलं होतं की पहाटे जॉगिंगला बाहेर पडायचंच. ( जिमवाले लुटतात साले.. ) जुने शूज घालून ( नवे शूज घेणार होतो पण आधीच या जून महिन्यांत पोरांच्या शाळेचा प्रचंड खर्च झालाय. दर वर्षी नवीन दप्तर,, नवे शूज, नवा टिफ़िनबॉक्स कशाला लागतो यांना ?. ) घराचा दरवाजा उघडला तर पावसाला सुरुवात... प्रचंड पाऊस... साली काही ठरवायची सोय नाही..घरातच जॉगिंग करावं म्हटलं तर आवाज फ़ार होतो म्हणे... खालच्या मजल्यावरचे बोंब मारतात... मग घरात येऊन फ़्रीजमधला चॊकलेट केक खाऊन परत झोपलो.. गोड खाल्लं की माझं फ़्रस्ट्रेशन जातं.. मी परत झोपताना बघून बायकोने काहीतरी कॉमेन्ट मारली.. अजिबात त्रास करून घेतला नाही... अजून दीड तास झोपलो...

२८ जून
: समोरच्या बिल्डिंगमधला पृथक ( हो, हे नाव आहे..आजकाल अस्लीच आचरट नावं दिसतात) कॉलेजात नाटकात काम करतोय. आपण थोर अभिनय करतो असं त्याला वाटतं... या असल्या फ़ुग्याला टाचणी लावावीशी फ़ार वाटतं. सांगत होता की एक कोणतरी डॉक्टर नाटक बसवायला येतात, ते याचं फ़ार कौतुक करत होते, वगैरे बगैरे... त्याला इतकंच म्हणालो, " बीजे मेडिकलमधल्या सगळ्या नाटकवाल्या डॉक्टरांना वाटतं की आपण लागू, आगाशे आणि पटेल आहोत. तर असल्या येड्यांचं फ़ार मनावर घेऊ नकोस. अभ्यास कर.. तुझ्या बापाला आनंद होईल".. आता पृथक पुन्हा यायचा नाही... उत्तम झालं.. एक पीडा टळली.

३० जून
शाळेच्या रीयुनिअनला जावं लागलं. काय होतं की मी ठरवलेलं होतं की जायचं नाहीच. पण पम्याचा फोन आला की तू यायलाच पायजे, आपण एकत्र जाऊ... तो त्याची मर्सिडिज घेऊन दारात हजर झाला. ( मग प्रवासभर त्याच्या मर्सिडिजचं कौतुक ऐकत बसलो. मर्सिडिज घेणं कसं त्याचं स्वप्न होतं, त्याचा गांडूळखताचा बिझनेस कसा जोरात आहे कोणत्या शेयरवर तो कसे पैसे लावतो वगैरे अवांतर वैताग माहिती मिळाली).. मी बरोबर पंचवीस वर्षांनी गेलो शाळेत.नॉस्टॅल्जियाचं अजीर्ण झालं आज... बाहेर पडल्यावर पहिल्यांदाच. शाळा अगदीच छोटीशी वाटली.केस विरळ झालेले, पोटं सुटलेले अनेक मित्र दिसले ...दृश्य एकंदर विचित्र आणि भयंकर होतं... काही मुली आलेल्या होत्या, त्यांच्यापेक्षाही कुरूप नवर्‍यांना घेऊन. माझा कॉम्प्लेक्स पुष्कळ कमी झाला... सगळी पोरं आचरटासारखी हसत, टाळ्या देत जोक सांगत फ़िरत होती. वाट्टेल तिथे फ़ोटो काढत होती. मग घंटा देऊन शाळा भरवली , प्रार्थना झाली... आमचे त्या वेळचे हेडमास्तर आलेले होते त्यांच्या मुलाबरोबर. ( अत्यंत शिस्तप्रिय आणि वाट्टेल तशी शिक्षा करणारा फ़टकळ तोंडाचा माणूस.) पण भाषणांत मुलं काय काय कौतुक करत होती त्यांचं. शाळा अशी , तशी असं कौतुक करणारं सगळे बरंच काय काय बोलले. देव्या खोटारडा तर सर्व मास्तरांचं इतकं कौतुक करत होता की हे सगळं मला कसं लक्षात आलं नाही , हे वाटून वैताग आला.. चालायचंच. आपली शाळा इतकी चांगली होती की काय, असं वाटून गंमतही वाटली..

ती दिसेल असं वाटत होतं पण आली नव्हती, ते बरं झालं.. दोन तीन वर्षांपूर्वी तिचं नाव एकदम आठवेनाच, तेव्हा बरं वाटलं होतं तसंच बरं वाटलं... या वैतागातनं कायमचा सुटलो की काय... असो..... तिनं तेव्हा मला एक चिठी लिहिली होती ती हेडमास्तरांच्या हातात पडली आणि त्यांनी ती वाचून फ़ाडून टाकली होती आणि मला पुष्कळ फ़टकावलं होतं. फ़टकावल्याचं विशेष काही नाही पण चिठ्ठी निदान मला तरी दाखवायची...अस्ली ती वैताग शिस्त... त्या चिठीत काय लिहिलेलं होतं अजून कल्पना नाही... रिझल्टच्या दिवशी तिची वाट पाहत ज्या कट्ट्यापाशी उभा होतो , तिथे उभा राहून आलो आज थोडा वेळ. तेव्हा तर आली नाहीच आणि भेटलीही नाही पुन्हा कधी...एकदम कल्पना आली डोक्यात की थेट हेडमास्तरांनाच विचारावं जाऊन त्या चिठ्ठीबद्दल. आपल्या डोक्याचा भुंगा तरी कमी होईल अशी एक आशा. त्यांच्याकडे गेलो तर त्यांच्या मुलानं सांगितलं , त्यांना अल्झायमर झाला आहे. काहीच आठवत नाही, ते हेडमास्तर होते हेही ते विसरलेत. .. अशी सगळी गंमत.. एकंदर वैतागातनं सुटका नाही हेच खरं...

.

औषधोपचारगुंतवणूकविनोदसमाजजीवनमानभूगोलछायाचित्रणविचारशुभेच्छा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Aug 2012 - 7:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डायरीची पानं आवडली. पुन्हा पुन्हा वाचुन काढेन. धन्स.
[ शेवटचं तर खासच. मला वाटलं हेडमास्तर काही मदत करतील, तर हे असं ]

-दिलीप बिरुटे

गणामास्तर's picture

16 Aug 2012 - 7:47 pm | गणामास्तर

एकदम कल्पना आली डोक्यात की थेट हेडमास्तरांनाच विचारावं जाऊन त्या चिठ्ठीबद्दल. आपल्या डोक्याचा भुंगा तरी कमी होईल अशी एक आशा. त्यांच्याकडे गेलो तर त्यांच्या मुलानं सांगितलं , त्यांना अल्झायमर झाला आहे. काहीच आठवत नाही, ते हेडमास्तर होते हेही ते विसरलेत. .. अशी सगळी गंमत.. एकंदर वैतागातनं सुटका नाही हेच खरं...

हे लै भारी होतं.. वैतागाचा परमोच्च बिंदु.
मास्तर असेचं लिहीत रहा.

रेवती's picture

16 Aug 2012 - 7:48 pm | रेवती

दुसरा भाग जास्त आवडला.
मिपावरही आपण असेच नियमीत लिहावे.

पैसा's picture

16 Aug 2012 - 7:56 pm | पैसा

काय वैताग आहे!! लय भारी. या डायरीची पाने कधी संपूच नयेत!

प्रभाकर पेठकर's picture

16 Aug 2012 - 8:02 pm | प्रभाकर पेठकर

रोजनिशीची (खाजगी) पानं मिपा सदस्यांसाठी उघडी केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मजा आली वाचताना.

झकास्स्स्स...
शॉलिट्ट...
जबराट... :)

मी-सौरभ's picture

16 Aug 2012 - 8:22 pm | मी-सौरभ

आवडेश

कामाचा वैताग आला होता तेवढ्यात ही डायरी वाचली.

मन१'s picture

16 Aug 2012 - 8:30 pm | मन१

कहर आहे.
त्यातही ५जानेवारीचा दिवस तर हद्द आहे.

आबा's picture

16 Aug 2012 - 8:56 pm | आबा

हा भागही आवडला
(अवांतरः शेवटचा पॅरा वाचून, वैतागसम्राटांचा 'अभिजात छिद्रान्वेश्यांमध्ये' समावेश करवा की नाही? असा प्रश्न पडला)

चावटमेला's picture

16 Aug 2012 - 9:10 pm | चावटमेला

:)

आंबोळी's picture

16 Aug 2012 - 9:44 pm | आंबोळी

बर्‍याच दिवसानी मास्तर फॉर्ममधे आले.....
जबरदस्त!!!
अवांतरः बाकी त्या शरदिनीतै भेटतात का हो? आल्या नैत बरेच दिवसात इकडे....जरा चक्कर मारायला सांगा.

स्पंदना's picture

17 Aug 2012 - 5:57 am | स्पंदना

अवांतरः बाकी त्या शरदिनीतै भेटतात का हो? आल्या नैत बरेच दिवसात इकडे....जरा चक्कर मारायला सांगा.

अवांतराचा निषेध!

काय माणस असतात? उगा दुसर्‍याच्या डोक्याचा भुगा करायला पहातात.

जाई.'s picture

16 Aug 2012 - 9:44 pm | जाई.

अशक्य
कहर!!!

प्रचेतस's picture

16 Aug 2012 - 10:19 pm | प्रचेतस

जबरा...

दुसर्‍याची डायरी वाचणे योग्य नाही हे माहीती असूनही वैतागसम्राटांची डायरी वाचलीच .

सगळेच किस्से एक से बढकर एक आहेत.
राष्ट्रपतीभवनाचा तर अती उच्चं .. वैतागसम्राटांच्या स्वप्नात देखील वैताग? ... कठीण आहे.

मास्तरांचे नाव पाहिले म्हणुन ही केवळ पोच.
आता निवांत वाचतो.

अस्वस्थामा's picture

16 Aug 2012 - 11:01 pm | अस्वस्थामा

छान लिहिलंय..
कोसलामधल्या डायरीच्या पानांची आठवण झाली..

शेवटी करुणेची झालर आहे अगदी हेडमास्तरच काय मुख्य पात्राची करुणा येते. खरोखर वैताग संपावा, "ती" चिठ्ठी मिळावी त्याला असे वाटते.

पिवळा डांबिस's picture

16 Aug 2012 - 11:32 pm | पिवळा डांबिस

झकास!!!!
चांगली गोष्ट म्हणजे राष्ट्रपती झालो.... तर आम्ही राष्ट्रपतीभवनात असतानाच त्या स्वप्नातल्या राष्ट्रपतीभवनाचे लाईट गेले. ( मग मी सवयीने फ़्यूज चेक केला, बिल भरलंय का ते पाहिलं, आजूबाजूच्यांचेही गेले आहेत का ते पाहिलं, बोर्डाच्या ऑफ़िसाला फोन केला, तो एंगेज होता, मग पुन्हा पुन्हा फोन केला, मधल्या काळात वायरिंगमध्ये फ़ॉल्ट आहे का चेक करायला इलेक्ट्रिशियनला बोलावलं , ...
हे भन्नाट!
म्हणजे आधी राष्ट्रपतीभवनाचे लाईट जाणं हे भन्नाट आणि मग स्वतः राष्ट्रपतीने वरील सगळी धावपळ करणं हे अजूनही भन्नाट!!
म्हंजे आधी होता वाघ्या.....त्याचा येळकोट वगैरे वगैरे!!!
:)
... म्हणालो," का? का नाही बोलायचं? पैसे खाल्ल्यामुळे त्याची नोकरी गेली , मग तो फ़्रान्समध्ये पळून गेला, पुढे त्याला सिफिलिस झाला मग तो वेडा झाला. आणि मेला . खरं ते खरं.. मी बोलणार.." .. दोघे जाम चिडले ...
सांभाळून हो!
इथे मिपावरच्यादेखील काही जणांच्या आदर्शाच्या पंचाला हात घालताय!!!
;)
एकूण हे गावाबाहेर लाकडी घरात राहून , केरफ़रशी, धुणं भांडी स्वत:ची स्वत: करणारे आणि फ़्रीजमधलं गार अन्न पुन्हा पुन्हा गरम करणारे एन आर आय लोक म्हणजे एक त्रास अस्तो.
हा हा हा! इथे तर फुटलोच!!!
एकदम खरं आहे!! या येनारायांच्या मायला!!!
माजलेत लेकाचे!!!!!
:)
अलिकडे मिपाला झालेलं गंभीरतेचं बद्धकोष्ठ वैतागवाडीचा एनिमा देऊन दूर केल्याबद्द्ल अभिनंदन!!
(फक्त आता तुमच्या नवीन पेशंटला ट्रीटमेंट देण्यापूर्वी ते हात जरा धुवा म्हणजे झालं!!!)
:)

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2012 - 2:57 am | प्रभाकर पेठकर

या येनारायांच्या मायला!!!

NRI सदस्यांना त्यांच्या आई वरून शिव्या घालण्यासारखे असे कोणते पातक त्यांच्या हातून घडले आहे?

पिवळा डांबिस's picture

17 Aug 2012 - 4:52 am | पिवळा डांबिस

ती वैताग व्यक्त करायची पद्धत आहे, 'तद माताय' सारखी!!
पण तुमचं बरोबर आहे, नकोच ते, उगीच सो-कॉल्ड निष्पाप मनांवर परिणाम व्हायचा....

पण आता तुम्हीच प्रतिसादाला बूच मारल्याने ते आम्हाला अपडेट करता येत नाहीये!!!
तरी चतुर आणि चाणाक्ष वाचकांनी त्या जागी 'या येनारायांच्या **ला' असे वाचावे!!!
:)
(स्वगतः दोन फुल्या फुकट गेलेल्या परवडल्या पण सुग्रीव (सुगरणीचं पुल्लिंग?) पेठकरशेफशी पंगा नको!! कधीतरी गल्फात जायचा प्रसंग आलाच तर दोन ऊन-ऊन घास दुसरं कोण खायला घालणार?)

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2012 - 11:06 am | प्रभाकर पेठकर

बुच बसले असले तरी संपादक मंडळाला 'ते' वाक्य काढून टाकण्याची विनंती तुम्ही करू शकता. हे सहज कळावे.

अवांतरः 'सो-कॉल्ड निष्पाप' आणि 'सुग्रीव' ह्या दोन शब्दयोजनांमध्ये कांही गूढ अर्थ भरला आहे का? ह्या विचारात पडलो आहे.

धनंजय's picture

16 Aug 2012 - 11:44 pm | धनंजय

भयंकर गमतीदार वैताग आला.

दादा कोंडके's picture

16 Aug 2012 - 11:51 pm | दादा कोंडके

एकेका दिवसाचे रेफरन्स खत्तरनाक आहेत! :) मजा आली...

संजय क्षीरसागर's picture

16 Aug 2012 - 11:52 pm | संजय क्षीरसागर

प्रत्येक वेळी मस्त अँगल पकडलेत. मजा आ गया

अभ्या..'s picture

17 Aug 2012 - 12:31 am | अभ्या..

मला अंटार्क्टिका खंडावरती हेलिकॉप्टर चालवायला शिकायचंय आणि पॅराशूत दुरुस्तीचे क्लास काढायचेत तर मी मागतो का तुम्हाला पैशे?

अचाट..
मास्तर द ग्रेट

रामपुरी's picture

17 Aug 2012 - 1:21 am | रामपुरी

आज सकाळी आल्या आल्या ऑफीसमध्ये काम. दुपारी जरा निवांत काही वाचावं तर पहील्या दोन जिलब्याच हाताला लागल्या. मग जरा चांगला माझ्या आवडीच्या विषयाचा (म्हणजे वैतागावरचा) लेख हाताला लागला. पण बघतो तर भाग दोन. परत वैताग. आता पहिला भाग शोधणे आले. त्यात तो पहिला भाग कुठे लवकर सापडेना. शेवटी सापडला. लेख चांगला होता. पण मग दुसरा भाग वाचून बघतो तर खाली 'क्रमशः' नाही. म्हणजे पुढचा भाग येणार की नाही कळले नाही. आता काय फक्त वाट बघत बसायची. अशी वाट बघत बसायची म्हणजे साला वैताग आहे... आज डोक्याची नुस्ती वैतागवाडी झाली. झक मारली आणि ते वाचायचं काढलं.

५० फक्त's picture

17 Aug 2012 - 7:55 am | ५० फक्त

मस्त लिहिलंय मास्तर, चिठ्ठीच्या प्रकरणाबद्दल वैयक्तिक सहमती.

रणजित चितळे's picture

17 Aug 2012 - 11:02 am | रणजित चितळे

मस्त आवडली. परत परत वाचावेसे असे.

सहज's picture

17 Aug 2012 - 11:09 am | सहज

सुं द र!!!

१८ जानेवारी विशेष आवडले.... एकंदर जानेवारी वैतागवैविध्य मस्तच. (लेखनप्रण सातत्य पुढे कमी होणारी वारंवारीता ...) पण शेवट किती चानचान!! डायरेक्ट ललित लेखन क्लासीक शेवट.... इतकं नाटकी काय कोणाचं कधी असतं का तस्ल फक्त नाटक्/सिनेमा कथा कादंबर्‍यात घडतं. मास्तरांची ती कचरा पेटी त्या दिवशी पाळतीवर ठेवून एकेक टरकवलेला कागद-कपटा जोडून सुट्टी सत्कारणी लावली असती एखाद्यानं....किंवा डायरेक्ट जाउन विचारले असते "लाईनला" (च्यायच्ची घाटी शाळा) काय लिहले होते ग त्यात.. ..उगाच आपलं काहीतरी.. :-)

भडकमकर मास्तर's picture

17 Aug 2012 - 2:09 pm | भडकमकर मास्तर

घाटी शाळा.

का शिव्या देताय घाटी शाळेला? कशीका असेना... आम्ची शाळा आहे ती...
काय सांगू वैताग...
आमच्या शाळेत लाईनशी बोल्ता यायचं नाही, तुमच्या शाळेत ते वर्षाच्या शेवटी मुलामुलींचे नाचाचे एकत्र कार्यक्रम आनि झालंच तर लैंगिक शिक्षणाचे वर्ग वगैरे असायचे काय?

चिठ्ठी
वह राज राजही रहेगा /
हेडमास्तर जाम खडूस. फाडलेली चिठ्ठी खिशात टाकली आणि घेऊन गेले. शाळेचा एक अन्तू प्यून चांगला माणूस ...
त्याला सांगून मास्तरांची कचरापेटी शोधून पाहिली . ( त्यात अनेक मजेदार वस्तू मिळाल्या .. त्याबद्दल पुन्हा कधी सांगेन ) .. माझ्या उपयोगाचे काही मिळाले नाही....
आता सारेच अल्झायमर्पंणमस्तु ....

स्पंदना's picture

18 Aug 2012 - 4:28 am | स्पंदना

नाहीतरी त्या विसराळु बाबाच करुन करुन पार टेकीला आलेय मी.
भडकमकर ना? हां . मध्ये मध्ये काहीतरी आठवत माझ्या सासर्‍यांना. बरीच अंडी पिल्ली बाहेर पडतात. अन ऐकुन ऐकुन मलाही थोडीफार लिंक लागते. तर त्या साल्या भडकमकरच्या 'लाइन' ला त्यांनीच (हेडमास्तर) चिठ्ठी लिहिली होती. तिची तसली चिठ्ठी वाचुन काय गळाला लागतय का पाहिल होत मास्तरांनी .

(हेडमास्तरांच्या स्नुष्ना)

नाना चेंगट's picture

17 Aug 2012 - 11:27 am | नाना चेंगट

हा हा हा

मस्त !

गोंधळी's picture

17 Aug 2012 - 11:44 am | गोंधळी

सही.:bigsmile:

सस्नेह's picture

17 Aug 2012 - 1:45 pm | सस्नेह

बहोत खूब !
वैतागाचे इतके रंगीबेरंगी अविष्कार वाचून मजा आली !
अ‍ॅक्चुअली, हे अविष्कार दुसर्‍याचे पाहूनच मजा येते. स्वतःवर वेळ आली की फज्जा !

भडकमकर मास्तर's picture

17 Aug 2012 - 2:20 pm | भडकमकर मास्तर

वाचक आणि सर्व प्रतिसाद देणार्‍यांना धन्यवाद

अवांतर :
एखाद्याचा वैताग वाचूनही लोकांना इतका आनंद होईल असे वाटले नव्हते...

भडकमकर मास्तर's picture

17 Aug 2012 - 2:22 pm | भडकमकर मास्तर

चुकून दुसर्‍यांदा पडलेला
प्र का टा आ

परिकथेतील राजकुमार's picture

18 Aug 2012 - 12:46 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍यादस्त हो मास्तर !

नुकतीच आम्ही 'एका मिपाकराच्या डायरी' लिहिण्यास सुरुवात केली असतानाच हा दुसरा भाग आला. बेक्कार हसतो आहे.

लेख उत्तमच झालाय. चिमटे मस्त काढले आहेत.

अभिज्ञ.

(स्वगत)च्यायला.
मास्तरांचे काहि(च्याकै) लेख वाचणे हा एक वैतागच असतो अन त्याला बळेच "वा वा छान छान" म्हणायचे म्हणजे आणिकच वैताग. ;)

असो.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Aug 2012 - 7:34 pm | प्रकाश घाटपांडे

हल्ली वैतागून वाचनच बंद केल होत. म्हणल बघाव तरी वैतागसम्राटाची डायरी. साल पण वाचूनच वैताग निघुन गेला.

कपिलमुनी's picture

20 Aug 2018 - 6:56 pm | कपिलमुनी

आधी वाचले असेल पण काही आठवत नाही . तेव्हा कोनता आयडी होता आणि काय प्रतिसाद दिला ?
वैताग स्साला :)

शाम भागवत's picture

20 Aug 2018 - 7:20 pm | शाम भागवत

काही लोक एक्सेल फाईल ठेवायचे त्यासाठी.
:)

प्रकाश घाटपांडे's picture

11 Apr 2020 - 9:53 am | प्रकाश घाटपांडे

पुन्हा एकदा डायरी वाचली

मज्जा आली राव परत एकदा वाचून

पिवळा डांबिस's picture

14 Apr 2020 - 2:14 am | पिवळा डांबिस

ते भडकमकर मास्तर शरदिनीचा हात पकडून पळून गेले.
आणि आमचे सुग्रीव पेठकरकाका देखिल मस्कती तर्रीत आकंठ बुडाले.
आता पकाकाका, ईजुभाऊ आणि आमच्या हाती आठवणी काढणे तेव्हढे राहिले....

चौकस२१२'s picture

14 Apr 2020 - 6:32 am | चौकस२१२

२०१२ नंतर यांनी हि डायरी लिहिली नाही? अरेरे ...धूमकेतू !
मधुनच असं वाटलं कि वपुंना जर जनाची लाज ना बाळगता ( भरपूर फुल्य्या वापरून) खरं मनातलं आणि थोडक्यात लिहा असं सांगितलं असता तर त्यांनी कदाचित असं लिहलं असतं