नाटकी बोलतात साले!

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
25 Apr 2013 - 11:07 am

नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;
क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे

मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू
त्या बटू वामनाची सत्ता, "अभय" पालटली पाहिजे

                                                   - गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------

बटू वामन - शेतकर्‍यांना आत्महत्तेस बाध्य करून पाताळात गाडणारे सर्व सत्ताधारी म्हणजे बटू वामनाचेच वारस होय.

बटू वामन हा हिंदूचा देव आणि त्यावरच मी फक्त टीका केली आहे असे समजून हिंदूव्देष्ट्यांनी निष्कारण हुरळून जाऊ नये. कारण सर्वच धर्मांनी शेतकर्‍याला पाताळात गाडण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही, यावर माझा प्रगाढ विश्वास आहे. एका शेरात सर्वच धर्माच्या प्रेषितांचा उद्धार करणे मला शक्य नसल्याने अपरिहार्यतेपोटी मी ’दुधाची तहान ताकावर’ या न्यायाने केवळ वामनाचाच उल्लेख करू शकलो, याची मला जाणीव आहे.

तसा मी आस्तिक, बर्‍यापैकी धार्मिक आणि देवपूजकही आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------

अभय-गझलमराठी गझलवीररसअद्भुतरसरौद्ररसकवितागझल

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

27 Apr 2013 - 12:19 pm | अभ्या..

वा वा. वा अभयराव छान लिहिलेत.

गंगाधर मुटे's picture

27 Apr 2013 - 9:05 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद.

आशु जोग's picture

27 Apr 2013 - 12:56 pm | आशु जोग

> सर्वच धर्मांनी शेतकर्‍याला पाताळात गाडण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही
नक्की काय झालय आत्ता आणि इतिहासात ?

गंगाधर मुटे's picture

27 Apr 2013 - 10:24 pm | गंगाधर मुटे

<<<<नक्की काय झालय आत्ता आणि इतिहासात ?>>>
शेतकरी दरिद्रीरेषेखालीच राहावा म्हणून पुरेपूर व्यवस्थाच केली गेली. आत्ता आणि इतिहासातही.

एका बाजूला शेतकरी प्रचंड कष्ट करतोय

काही शिक्षकांना, प्रोफेसरांना काम केले नाहीतरी पगार.

आशु जोग's picture

27 Apr 2013 - 12:57 pm | आशु जोग

शिक बाबा शिक, लढायला शिक
कुणब्याच्या पोरा आता, लढायला शिक

ही इंद्रजित भालेराव यांची कविता असेल तर टाका ना इथे कुणीतरी

गंगाधर मुटे's picture

27 Apr 2013 - 9:11 pm | गंगाधर मुटे

ती कविता

http://www.baliraja.com/node/377

येथे वाचता आणि ऐकता येईल.

अनिल आपटे's picture

27 Apr 2013 - 3:54 pm | अनिल आपटे

राजकारण्या विषयी चीड कवितेतून चांगली व्यक्त झाली आहे
कविता आवडली

गंगाधर मुटे's picture

27 Apr 2013 - 9:07 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद.

गंगाधर मुटे's picture

27 Apr 2013 - 11:49 pm | गंगाधर मुटे

लोकसत्ता बातमी
दिनांक १९/१०/२०१२

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने २०११ सालच्या शेतकरी आत्महत्येची अलीकडेच आकडेवारी जाहीर करताना देशभरात १४ हजार ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३३७ शेतक ऱ्यांनी मृत्यूस कवटाळल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली असली तरी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत घट झाल्याचे विधान करून या आकडेवारीला शह दिल्याने आकडेवारीच्या नेमक्या सत्यतेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी हा आकडा ३१४१ एवढा होता. आत्महत्याग्रस्त महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतक ऱ्यांची संख्या जवळजवळ ७० टक्के आहे.
महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक ऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनात १९९५ ते २०११ या कालखंडादरम्यान देशभरात २ लाख ९० हजार ७४० शेतकरी आत्महत्या झाल्याची आकडेवारी सादर केली आहे. दिवाळखोरी किंवा आर्थिक चणचण आणि दारिद्रय़ या कारणांनी या आत्महत्या झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

--------------------------------------------------------------------
आत्महत्या असो की दुर्घटना, सरकारी मृतांचा आकडा हा वास्तवापेक्षा १/३ ने तरी कमीच असतो.

त्या हिशेबाने हा आकडा किमान ५ ते ६ लाखाच्या घरात असू शकतो.
---------------------------------------------------------------------