तालिबानीस्तान !
भारताची राजधानी दिल्लापासून दीडशे किलोमीटर पलीकडच्या प्रांतात भारतीय कायदे चालू शकणार नाहीत, असे सरकारनेच जाहीर केले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? चकीत होऊन पहायची गरज नाही. भारतात असे कधी होणार नाही. पण भारताचे कधी भले न पाहिलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र असे होतेय. राजधानी इस्लामाबादपासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या 'स्वात' प्रांतात आता पाकिस्तानी कायदे चालणार नाहीत. पाकिस्तानी सरकार आणि या भागात वर्चस्व असलेल्या तालिबान्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता या भागात न्यायदानाच्या प्रक्रियेसाठी 'शरीया' कायदे लागू होतील. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात सुरू असलेला संघर्ष संपावा म्हणून सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात असले तरी या निर्णयामागे सरकारची हतलबलताच दिसून येते. कारण तालिबान्यांच्या उच्चाटनासाठी या भागात घुसलेल्या लष्कराच्या हाती फक्त अपयशच लागले आहे. त्यामुळे थोडक्यात सरकारने आता या भागाच्या 'तालिबानीकरणास'च एकप्रकारे मान्यता दिली आहे.
आधी या स्वात प्रांताविषयी थोडं जाणून घेऊ. स्वात हा भाग पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतात वसला आहे. सैदु शरीफ ही या भागाची राजधानी. पण मिंगोरा हे या भागातील प्रमुख शहर आहे. खरं तर हे पूर्वीचे संस्थान होते. अगदी पाकिस्तान स्थापन झाल्यानंतरही ते सुखनैवपणे नांदत होते. पण १९६९ मध्ये ते वायव्य सरहद्द प्रांतात सामील झाले. या भागाला पाकिस्तानचे स्वित्झर्लंड म्हणतात. उंच पर्वतराजी, हिरवागार प्रदेश आणि रमणीय तलाव यांनी हा प्रदेश नटलेला आहे. निसर्गाने या भागाला भरभरून काही दिले आहे. पण त्याचवेळी नागरी भागापासून त्याला तोडलेही आहे. दुर्गमतेमुळे या भागात जाणे अवघड आहे. त्यामुळेच तालिबान्यांनी या भागातून पाकिस्तानच्या सरकारी प्रतिनिधींना हटवून कब्जा केला आहे.
या भागातून वाहणारी प्रमुख नदी म्हणजे 'स्वात'. तिचा उल्लेख अगदी 'ऋग्वेदा'तही 'सुवास्तू' नदी या नावाने आढळतो. प्रदेशाचा उल्लेख गेल्या दोन हजार वर्षापासून विविध ठिकाणी आढळतो. पौराणिक काळात उद्यान नावाने हा प्रदेश ओळखला जात होता, तो येथील निसर्गसौंदर्यामुळेच. जग जिंकायला निघालेला अलेक्झांडर या भागात येऊन गेला होता. येथील गावांचे उल्लेखही ग्रीक भाषेत आढळतात. पुढे इसवी सन ३०५ पूर्वी मौर्य साम्राज्यांतर्गत हा प्रदेश आला. मात्र, त्यानंतर या भागात बौद्ध संप्रदायाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. एवढेच काय वज्रायन हा बुद्ध मार्गातील पंथ याच भागात उदय पावला. या भागात आजही बुद्धांचे विहार, स्तुत, मूर्ती बुद्धकालाची साक्ष देत उभ्या आहेत. हिंदू राजे राज्य करत असताना या भागात संस्कृतही बोलली जात होती. पुढे १०२३ च्या सुमारास गझनीच्या मोहम्मदाने भारतावर आक्रमण केले आणि हा भाग बळकावला. या भागात इस्लामचा प्रसार होण्यासही गझनी कारणीभूत ठरला. पुढे राजे बदलत गेले, पण सत्ता इस्लामीच राहिली.पुढे पाकिस्तानात सामील झाल्यानंतर येथे स्थानिक प्रशासन निर्माण करण्यात आले. येथून प्रतिनिधीही निवडून जाऊ लागले. पण अफगाणिस्तानात वाढत असलेले तालिबान्यांचे लोण याही भागात येऊन पोहोचले आणि धर्मवेडाचा उद्रेक येथेही झाला.
तालिबानचे वर्चस्व
मौलाना फाझुल्ला हा मुलतत्ववादी नेता याला कारणीभूत ठरला. या भागाचे तालिबानीकरण करायचे या हेतूने त्याने तेहरिक ए नाफाझ ए शरीयत ए मोहम्मदी नावाची संघटनाच स्थापन केली. गेल्या काही वर्षांत या संघटनेचे वर्चस्व वाढत होते. पोलिस चौक्यांवर हल्ले कर, निरपराध नागरिकांना मार हा त्यांचा एककलमी कार्यक्रम होऊन बसला आहे. या भागातील ५९ गावात त्यांनी समांतर सरकार स्थापन केले आहे. तेथे शरीयत कायदा लागू केला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचे तब्बल २० हजार सैनिक या भागात तैनात असूनही त्यांचे येथे काहीही चालत नाही. आता तालिबान्यांनी मुलींच्या शिक्षणाला बंदी घातली आहे. या भागात ४०० शाळा असून त्यात ४० हजार मुली शिकतात. या शाळाच आता बंद पाडल्या आहेत. या शाळा बंद करण्याचा आदेश तालिबानने कालमर्यादा घालून दिला होता. हा आदेश झुगारून मिंगोरा भागातील दहा शाळा उघडल्या खर्या पण तालिबान्यांनी त्या बॉम्बस्फोटांनी उडवून लावल्या.
तालिबानी दहशत
तालिबानी अतिरेक्यांची दहशत एवढी आहे की २००७ मध्येत्यांनी अलपुरी या जिल्ह्याचे मुख्यालय ताब्यात घेतले, त्यावेळी स्थानिक पोलिसांनी त्यांचा प्रतिकार न करता ते त्यांच्या ताब्यात दिले आणि स्वतः पळून गेले. तालिबानी अतिरेक्यांत उझबेक, ताजिक व चेचेन बंडखोरांचाही समावेश आहे. २००७ मध्येच या भागातील मोठे व्यावसायिक व अवामी नॅशनल पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मालक बख्त बैदर यांची अतिरेक्यांनी हत्या केली. याशिवाय सुधारणावादी प्राध्यापक इसरार मोहम्मद व त्यांचा मुलगा झुबीर यांचे अपहरण केले. अवामी नॅशनल पार्टीचे आणखी एक नेते अब्दूल जब्बार खान यांच्यावरही अयशस्वी हल्ला करण्यात आला. हिंसाचार घडवून आणत त्यांनी या भागातील लोकांमध्ये भय निर्माण केले आहे.
सरकारने टेकले गुडघे
गेली दोन वर्षे या भागात सरकार आणि तालिबानी बंडखोर यांच्यात हिंसाचार सुरू होता. यात १२०० लोक मृत्युमुखी पडले आहेत. १७० शाळा, कॉलेजेस उडविण्यात आली. शिवाय या हिंसाचाराला कंटाळून तीन लाख लोक विस्थापित झाले आहेत. या भागात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करता येत नसल्याने अखेरस पाकिस्तान सरकारने तालिबानींपुढे गुडघे टेकणे पसंत केले. मंगळवारी तालिबानमधील ज्येष्ठ लोक (जिर्गा) आणि सरकारी प्रतिनिधींची बैठक झाली. तीत या भागात शरीयत कायदा लागू करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता न्यायदानात सरकारी हस्तक्षेप काहीही रहाणार नाही. सुप्रीम कोर्ट वगैरे 'भानगड' नसेल. मिंगोरा येथेच कोर्ट असेल. येथील केसेस इस्लामाबादला नेल्या जाणार नाहीत.
असे होईल न्यायदान
गुन्हेगारी प्रकरणे चार महिन्यात निकाली काढली जातील. तर दिवाणींसाठी सहा महिन्यांची कालमर्यादा असेल. एलएलबी करताना शरीयतचा अभ्यास न करणार्यांना आता तीन महिन्यांचा 'क्रॅश' कोर्स सक्तीने करावा लागणार आहे. शिवाय प्रत्येक कोर्टात शरीयतचा प्रतिनिधी (हा प्रामुख्याने तालिबानीच असेल) महत्त्वाच्या पदांवर हजर असेल. कुठल्याही प्रकरणाची अंतिम सुनावणी मिंगोरा येथेच होईल. न्यायदान करणार्या न्यायाधीशांना आता काझी असे संबोधले जाईल. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या न्यायाधीशाला जिला काझी असे म्हटले जाईल. महत्त्वाचे म्हणजे या सगळ्यांनी दाढी राखणे सक्तीचे असेल.
गेल्या अनेक वर्षांपासून हिंसाचाराने पोळलेल्या या भागाने सरकार आणि तालिबानी यांच्यात झालेल्या कराराचे स्वागत केले असले तरी आगामी काळ मात्र कठीण असेल हे तालिबान्यांच्या एकूण हालचालींवरून दिसून येते. पाकिस्तानचा कायदाच जिथे चालणार नसेल तिथे कसे राज्य असेल याची कल्पनाच केलेली बरी. सत्तेत कोण आहे त्यावर न्याय दिला जाणार असेल तर त्याला न्याय तरी म्हणता येईल काय? अफगाणिस्तानात हिंसाचाराला कंटाळलेल्या लोकांनी सुरवातीला तालिबान्यांचे स्वागत केले होते. पण पुढे काय घडले हा इतिहास आहे. त्यामुळे सध्या शांतता प्रस्थापित होण्यासाठी झालेल्या या करारामुळे स्वातमधील ग्रामीणांना हायसे वाटत असले तरी पुढचा काळ कठीण आहे हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. अफगाणिस्तानमधील तालिबानींना सुरवातीला पाकिस्तानचाच वरदहस्त होता. आता त्याच तालिबानींनी पाकिस्तानलाच गिळंकृत करायला सुरवात केली आहे. भस्मासूर आता पाकिस्तानवर उलटला आहे. काळाचा महिमा अगाध असतो, हेच खरे.
वाचने
6994
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
भोचकराव, ले
सुंदर लेख..
लेख चान
+१
फारच
धन्यवाद!
मस्त
In reply to मस्त by घाशीराम कोतवाल १.२
नकाशे इथे
धोकादायक
छान लेख!
In reply to छान लेख! by राघव
भोचकशेट,
माहितीपूर्ण लेख
छान.
मस्त लेख ..!, ( जागा राखुन ठेवली आहे. )
माहितीपूर्ण लेख आवडला
चांगला लेख
In reply to चांगला लेख by विकास
खरे आहे..
छान..
काळजी करण्यासारखे
In reply to काळजी करण्यासारखे by मृदुला
हेच म्हणतो
In reply to हेच म्हणतो by बेसनलाडू
+१
सुंदर लेख. . .
चांगला लेख
याच नावाने
In reply to याच नावाने by माझी दुनिया
अरे वा!
In reply to अरे वा! by विकास
असू दे हो...
भोचकगुरुज
एकूण कठीणच
लेख