मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शनिशिंगणापूरात समतेची गुढी

सुधीरन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे. अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत. हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही. स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही. स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले. शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.

वाचने 37224 वाचनखूण प्रतिक्रिया 280

सुधीरन Fri, 04/22/2016 - 07:14
>>त्याचं काय आहे की जेव्हा तालिबानी जिहाद करतो ना, तेव्हा त्याचा उद्देश समोरच्याच्या श्रद्धेचे तुकडे तुकडे करायचा असतो. तालिबानी जिहादाची प्रेरणाच धार्मिक आहे. आंधळ्या धर्मश्रद्धेतूनच त्याचा उदय झालेला आहे. त्यांचा धर्मचिकित्सेला विरोध आहे (तुमचाही आहे!). >> काही शास्त्राधार आहे का? कसला शास्त्राधार? कधीच्या काळी कुणीतरी कल्पनांचे घोड़े दौडवून लिहिलेल्या भाकडकथांमध्ये तो का शोधायचा? >> अन्याय झालेला नसल्याने मी व्याख्येच्या भानगडीत पडत नाही. हो, दलितांवरसुद्धा अन्याय नव्हता झाला! साने गुरूजी तुम्हारा भी चुक्याच्! >> स्त्रीची इंद्रिये शरीरात असतात. याउलट पुरुषांची बाहेर असतात. शनीच्या स्पंदनांचा स्त्रीला अतिरिक्त त्रास होऊ शकतो. कैच्याकैच लॉजिक! ११/१२ विची बायोलॉजीची पुस्तके वाचा. तुमचाच तर्क चालवायचा तर स्त्रीची इंद्रिये शरीराच्या आत असल्याने सुरक्षित तर पुरुषाची बाहेर (!) असल्याने असुरक्षित असतात (मेन पार्ट, मेन पार्ट- रा वन). त्यामुळे पुरुषांनाच मंदिरबंदी करावी!!!! >> दुकाने? कसली दुकाने? बायकांच्या प्रवेशबंदीमुळे कोणाची दुकाने फोफावली? भट-ब्राह्मण-बडवे-पुजारी यांची दुकाने. ती लोकांच्या अज्ञानामुळे फोफावली आहेत, फोफावत आहेत. >>काफीरांच्या श्रद्धाभंजनाचा संबंध जिहादशी जोडला आहे तो ब्रि. मलिक यांनी. जर हिंदूंच्या निरुपद्रवी श्रद्धांचे विनाकारण भंजन होत असेल तर ते दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडणारच. परधर्मियांच्या भितीने धर्मसुधारणा करायच्याच नाहीत का? सती प्रथा-जातीव्यवस्था-अस्पृश्यता इ. नासुद्धा यासाठी विरोध करू नये का?

गामा पैलवान Sat, 04/23/2016 - 02:08
सुधीरन, तुमचा वरील प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १. >> त्यांचा धर्मचिकित्सेला विरोध आहे (तुमचाही आहे!). माझा धर्मचिकित्सेला विरोध नाही. ती व्यासपीठावर करायची असते. २. >> कसला शास्त्राधार? कधीच्या काळी कुणीतरी कल्पनांचे घोड़े दौडवून लिहिलेल्या भाकडकथांमध्ये तो का शोधायचा? आगोदर तुमचा धर्मशास्त्रांविषयीचा दृष्टीकोन बदला. धर्म म्हणजे भाकडकथा म्हणंत असाल तर तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही. धर्मचिकित्सा शास्त्राधारेच करायची असते. ३. >> हो, दलितांवरसुद्धा अन्याय नव्हता झाला! साने गुरूजी तुम्हारा भी चुक्याच्! साने गुरुजींनी अन्यायास वाचा फोडण्यासाठी उपोषणाचा म्हणजे आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला होता. ते तृप्ती देसाईंसारखे श्रद्धाभंजक नव्हते. ४. >> ११/१२ विची बायोलॉजीची पुस्तके वाचा. सूचनेबद्दल धन्यवाद! तुम्हीसुद्धा धर्मशास्त्र व स्पंदनशास्त्र वाचून आलात तर बरं होईल. ५. >> भट-ब्राह्मण-बडवे-पुजारी यांची दुकाने. ती लोकांच्या अज्ञानामुळे फोफावली आहेत, फोफावत आहेत. या दुकानांचा स्त्रियांनी शिंगणापूर चौथऱ्यावर प्रवेश करण्याशी संबंध नाही. ६. >> परधर्मियांच्या भितीने धर्मसुधारणा करायच्याच नाहीत का? सती प्रथा-जातीव्यवस्था-अस्पृश्यता इ. >> नासुद्धा यासाठी विरोध करू नये का? त्यासाठी सेवामार्ग अनुसरावा लागतो. असा मार्ग फुले, कर्वे, आंबेडकर, शाहू महाराज, सावरकर इत्यादिंनी चोखाळला होता. त्यासाठी श्रद्धा मोडीत काढायची गरज नसते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुधीरन Sat, 04/23/2016 - 07:11
>> ती व्यासपीठावर करायची असते. धर्मचिकित्सा करणारी कितीतरी पुस्तके राजवाड़े, साळुंखे, कुरुंदकर, कॉ. पाटील, बेडेकर, प्रबोधनकार इ. नी लिहिली आहेत. व्यासपीठावरून चर्चा झाल्या आहेत. त्यालाच कृतिची जोड़ देणेसुद्धा आवश्यक ठरते. आणि आधी मंदिराच्या विश्वतांशी चर्चा केली गेली. ते ऐकत नसतील तर काय करायचं? >> धर्म म्हणजे भाकडकथा म्हणंत असाल तर तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही. धर्मशास्त्रांमध्ये ज्या बालिश गोष्टी (वाचायला नाही सांगत आता- टीवीवरील धार्मिक मालिका पहा) सांगितल्या आहेत त्यांविषयी बोललो होतो! धर्मास भाकड़कथा नाही म्हटलेलं! महादेव, गणपती, हनुमान, कृष्ण इ. देवतांचे जे विकृतिकरण झालेले दिसते त्याविषयी आणि तत्सम विषयांबद्दल राग आहे! >>या दुकानांचा स्त्रियांनी शिंगणापूर चौथऱ्यावर प्रवेश करण्याशी संबंध नाही. मी कुठे जोडतोय? तुम्ही विचारलेल्या प्रश्नास उत्तर दिले फ़क्त! >>धर्मशास्त्र व स्पंदनशास्त्र वाचून आलात तर बरं होईल. रामायण, महाभारत, भगवद्गीता, महादेवावरील १/२ ग्रंथ (शिवा ट्राइलॉजी नव्हे!), सनातन प्रभात, धर्मभास्कर मधील लेख, क़ुरआन, बायबल याबाहेर माझा अभ्यास नाही. अजुन वाचन करायचे आहे. >> श्रद्धाभंजक प्रश्न विचारले, चुकीच्या प्रथांना विरोध केला, चर्चा करूनही मार्ग निघत नसेल तर कृती केली (लाठ्या-काठया-बंदूका-बॉम्ब घेवून पवेश नव्हता केला! आणि आत जावून पूजाच केली) तर ती व्यक्ति श्रद्धाभंजक ठरते का? >> फुले, कर्वे, आंबेडकर, शाहू महाराज, सावरकर इत्यादिंनी चोखाळला होता. त्यासाठी श्रद्धा मोडीत काढायची गरज नसते. कमाल आहे! फुले, शाहू, आंबेडकर इ. नी कितीतरी श्रद्धा मोडीत काढल्यात!

गामा पैलवान Tue, 04/26/2016 - 02:06
सुधीरन, १. >> व्यासपीठावरून चर्चा झाल्या आहेत. त्यालाच कृतिची जोड़ देणेसुद्धा आवश्यक ठरते. शनी शिंगणापूर येथील प्रथेच्या संदर्भात चर्चा वा चिकित्सा झालेली नाही. २. >> आणि आधी मंदिराच्या विश्वतांशी चर्चा केली गेली. ते ऐकत नसतील तर काय करायचं? तृप्ती देसाईंना तीन पर्याय उपलब्ध होते. १. स्थानिक मान्यवरांशी (मंदिराच्या विश्वस्तांशी नव्हे) चर्चा करणे. २. काशी येथील विद्वत्सभेत आपले म्हणणे मांडणे. ३. चारधामपैकी एका वा अधिक शंकराचार्यांना विनंती करणे. वरीलपैकी एकही पर्याय अंमलात न आणता देसाईंनी घुसखोरी केली आहे. त्याकारिता विश्वस्तांशी चर्चा होत नाही अशी लंगडी सबब दिली आहे. विश्वस्त हे प्रशासकीय पद आहे. त्यांना धर्माविषयी माहिती असण्याची अपेक्षा नाही. ३. >> चर्चा करूनही मार्ग निघत नसेल तर कृती केली (लाठ्या-काठया-बंदूका-बॉम्ब घेवून पवेश नव्हता केला! आणि >> आत जावून पूजाच केली) तर ती व्यक्ति श्रद्धाभंजक ठरते का? चर्चा करूनही मार्ग निघत नसेल तर मग श्रद्धाभंजाकांचे डोके फोडावे का? तसंही पाहता आत्मा अमर आहेच की. केवळ मर्त्य देह नाहीसा झाला तर काय बिघडलं? लावायचा का जंगलाचा नियम? ४. >> कमाल आहे! फुले, शाहू, आंबेडकर इ. नी कितीतरी श्रद्धा मोडीत काढल्यात! युक्तिवादापुरतं एकवेळ मान्य करू. पण या लोकांनी अरेरावी कधी केल्याचं ऐकिवात नाही. अगदी शाहू महाराज सत्ताधारी होते तरीही त्यांनी लोकभावना पायदळी तुडवल्या नाहीत. आ.न., -गा.पै.

ईश्वरसर्वसाक्षी गुरुवार, 04/28/2016 - 17:46
भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आज मुंबईतील हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करणार आहे. त्यांच्या या आंदोलनाला स्थानिक मुस्लिम नेत्यांनी विरोध दर्शवलाय. एमआयएमने तर तृप्ती देसाईंना काळं फासणार असा इशारा दिलाय. आता सपाचे आमदार अबू आझमी यांनीही या प्रकरणात उडी घेतलीये. तृप्ती देसाई या प्रसिद्धीसाठी हा ड्रामा करत आहे. दर्ग्यात महिलाने जाणे न जाणे हा आमच्या समाजाचा प्रश्न आहे. त्यात तृप्ती देसाईंनी ढवळाढवळ करू नये. मी, माझ्या मुस्लिम महिला कार्यकर्त्यांना आदेश दिले असून तृप्ती देसाईंनी जर दर्ग्यात मजार (कब्र) पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर धक्के मारून हाक लून द्या असा इशारा अबू आझमी यांनी दिलाय.

ईश्वरसर्वसाक्षी गुरुवार, 04/28/2016 - 17:49
ज्याला जिथे माथा टेकायचा आहे त्याने तिथे जावे, ह्यामध्ये स्त्रि-पुरुष, जात-धर्म ह्यावरुन कोणिहि कोणाला रोखु नये असे मला वाटते. पण फक्त प्रसिध्दि साठि कोणि सामजिक शांतता, स्थैर्य, सलोखा धोक्यात आणत असेल तर मात्र आपला विरोध आहे.

ईश्वरसर्वसाक्षी गुरुवार, 04/28/2016 - 17:54
येस पिरा. दर्ग्यात मजारपर्यंत जाणार नसून जिथपर्यंत महिला आणि पुरुषांना जाऊ दिलं जातंय तिथपर्यंतच जाऊन दुवा मागणार असल्याचं देसाईंनी स्पष्ट केलं. अँड द मोस्ट फनी पार्ट इज ज्यांना विरोध करायचा त्यांनी लोकशाही मार्गाने विरोध करावा ,कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होणार नाही याची काळजी घ्यावी असंही देसाईंनी म्हटलंय. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना संधी द्यावी अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली. या विषयीचं पत्र सरसंघचालक मोहन भागवत यांना दिलं

सुनील गुरुवार, 04/28/2016 - 18:27
बै लै हुश्शार बॉ!! एका दगडात अनेक पक्षी घायाळ करते आहे!! बादवे, सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळांत जिथपर्यंत पुरुषांना प्रवेश आहे तिथपर्यंत स्त्रीयांनादेखिल प्रवेश मिळाला पाहिजे.