कालचीच गोष्ट, कृषी भवन वरून ती मेट्रोत चढली. क्षणभराकरता नजरा भिडल्या. तब्बल तीस वर्षानंतर ती दिसली होती. रूप रंग बदलले असले तरी ही तिने मला ओळखले. एक मंद स्मित तिच्या चेहऱ्या वर उमटले. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, असे वाटले, वसंत ते शिशिराचा प्रवास क्षणातच घडला. तिने पाठ फिरवली आणि पुढच्याच अर्थात पटेल चौक स्टेशन वर ती उतरली. मी पाहताच राहलो. त्या वेळी सुद्धा ती अशीच आयुष्यातून निघून गेली होती, काही न बोलता.
पहिल्यांदा तिची भेट मंडी हाऊसच्या सरकारी वाचनालयात झाली. मला आठवते, वसंत कानिटकरांचे ‘प्रेम तुझा रंग कसा’ ह्या नाटकाचे पुस्तक चाळत होतो.