अखेर त्यांचं स्वप्न त्यांच्या मुठीत आलं होतं. घरातल्या जागेची अडचण, त्या पाठोपाठ येणाऱ्या अडचणी आणि बाहेरची गर्दी-गोंगाट यांच्यापासून सुटकेचा मार्ग त्यांना सापडला होता. नवीन वसणाऱ्या उपनगरातल्या एका मोठया गृहप्रकल्पात त्यांनी नाव नोंदवलं होतं. प्रख्यात अशा 'स्वप्नसिटी बिल्डर्स'नी या भागातल्या मध्यवर्ती अशा विस्तीर्ण भूखंडावरच्या स्वप्नराशि, स्वप्नमाला, स्वप्नकुटिर, स्वप्ननगरी, स्वप्नाली, स्वप्नील घरकुलांची मोठीच जाहिरात केली होती. प्रशस्त घरांच्या उंच उंच इमारती उभ्या राहूनही गाडयांसाठी, बाग-बगीचा, खेळण्यासाठी जागा आणि क्लब हाऊससाठीसुध्दा जागा उपलब्ध होईल येवढी ऐसपैस जागा होती ती.