धंदा
त्या रस्त्यावर दारूचं एक दुकान होतं. संध्याकाळी तिथे मोप गर्दी असायची. त्यामुळे आजूबाजूची दुकानं थोडी लवकरच बंद व्हायची.
एक पलीकडची पानटपरी सोडली तर.
बरं, त्या रस्त्याला रात्री आठनंतर इतर लोक फारसे नसायचेच. समोर एक मोठी कंपनी होती.तिची कम्पाउंड वॉल होती. लांबलचक पसरलेली. त्यामुळे वर्दळ नाही अन शांतता.
त्यामुळे रात्री तिथे बेवड्यांची फौज जमायची. बेवडा तर मारायचा; पण बारमध्ये परवडत नाही. मग बाहेरच. शहरात असे बरेच अड्डे. त्यातलाच हा एक. त्या कंपनीच्या भिंतीची कंपनी त्यांना बरी पडायची.
ठरलेले मेंबर तर असायचेच.पण कधी नवीनही असायचे. जमणाऱ्यांची भांडणं - मारामाऱ्या ठरलेल्या.