✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एका गारुड्याची गोष्ट १३: धामण: उंदराचा कर्दनकाळ !

ज
जॅक डनियल्स यांनी
Mon, 12/02/2013 - 04:22  ·  लेख
लेख
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे ! एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग. एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य ! एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी ! मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार ! एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर ! एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका ! एका गारुड्याची गोष्ट १२: धामण: जुन्या ओळखीचा साप ! हा भाग मी माझ्या आजीला अर्पण करत आहे, काल (२९ नोव्हेंबर) तिला जाऊन एक वर्ष झाले. तिची अल्पशी ओळख म्हणजे माझी आज्जी छोट्याश्या खेडेगावातील (बोरखेडे) एका शाळामास्तर ची मुलगी, १९४० साली माझ्या आजोबांबरोबर ठाण्यात तलावपाळीवर येऊन स्थाईक झाली आणि मग ठाणेच तिचे आणि आमचे गाव झाले. घर ठाणास्टेशन जवळ आणि आजोबा कॉलेज मध्ये प्रोफेसर त्यामुळे घरात अनेक लोकांचा सतत राबता, पण तरीसुद्धा पैशाचे आणि रेशनचे गणित माझ्या आज्जीने नेहमीच हसतमुखाने जमवले. अजून सुद्धा तिने खाऊ घातलेल्या चटणी-भाकरीची आठवण सांगणारे ठाण्यात मला भेटतात. गोष्टी सांगण्याची तिची हातोटी आणि तल्लख स्मरण शक्ती याला तोडच नव्हती. गावाकडच्या भोंदू बंगाली बाबाच्या गोष्टीमधून तिनेच मला "नागाची" ओळख करून दिली आणि नागाच्या विषाला उतारा म्हणजे फक्त "डॉ." हे माझ्या मनावर वयाच्या ८ वर्षीच बिंबवले. असो. कुटुंबाचे आधारस्तंभ: माझी आज्जी, बाबा, दोन काका आणि दोन आत्त्या. आज्जी धामणीबद्दल हा लेख आहे आणि त्यात उंदराचा विषय नाही, म्हणजे दुर्वांकुरच्या जेवणानंतर "मठ्ठा" नाही. उंदीर हा महाभयंकर प्राणी आहे, हे मला सर्पोद्यान मध्ये काम करायला लागल्यावर समजले. आपण सगळी व्हाईट-कालर लोकं,इमारती मध्ये किंवा पक्क्या घरामध्ये आपली बूड टेकणार. त्यामुळे आपला उंदराशी संबध म्हणजे "टोम आणि जेरी" पुरता किंवा "घरात शिरलेला (छोटा) उंदीर आपण कसा ठोकला !" या बाजीराव गोष्टी पुरता. टोम आणि जेरी मधला 'जेरी' म्हणजे "दिखावे पे मत जाव-अपनी अकल लगाव" चे उदाहरण ! खऱ्या लाइफ मध्ये उंदीर गोंडस वगैरे काही नसतो, निसर्गातील 'अल-कायदा'चा अवतार, पण त्यांच्या पेक्षा भयानक. मानवजात उध्वस्त करायचे फुल प्याकेज- बायोलोजिकल वॉरफेअरच्या सगळ्या अस्त्रांनी (पिसवा, जीवाणू) सज्ज आणि मानवाचे अन्नसाठे उध्वस्त करायची क्षमता! उंदराची एक मादी साधारण पणे ३ वर्ष जगते आणि एका वर्षात ७ वेळा प्रसूत होते, आणि साधरण पणे एकावेळी ८ पिल्लांना जन्म देते. म्हणजे एका वर्षी ती ५ क्रिकेट च्या टीम्स (६० खेळाडू) तयार करते. विचार करा, म्हणजे दहा हजार माद्या दर तीन वर्षाने एक उंदरांची धारावी (१० लाख उंदीर) तयार करतात. वो एक उंदीर...! धामणीचे स्टेपल डायेट म्हणजे "काळा उंदीर" मधेच लहर आली तर थोड्या चीचुन्द्र्या पण खाते फाष्ट्फुड म्हणून ! धामण वर्षाला साधरण पणे ५० उंदीर खाते, आणि पंधरा वर्ष जगते. आत्ता करा हिशोब, एक धामण मारून आपण आपलीच किती वाट लावतो आहे. आत्ताच्या "फुकट आणि मस्त" च्या जमान्यात, उंदराचा बिमोड करायला धामणीसारखा दुसरा उपाय मानवजातीकडे नाही. उंदीर आत्ता फक्त खेडेगावापुरते मर्यादित राहिले नाही, जसे whatsapp घराघरात पोहचले तसे उंदीर पण आपल्या घराघरात पोहचले आहेत, आणि आपले नुकसान करत आहेत त्यामुळे, धामण आत्ता फक्त फक्त शेतकऱ्यांचा मित्र राहिला नसून सगळ्या मानव जातीचा मित्र बनला आहे. "धामण पाळा आणि प्लेग टाळा"काही वर्षाने तुम्हाला अशी स्लोगन दिसू शकते. भारत सोडायच्या महिनाभर आधी एका फोटोग्राफर (overdrive magazine चा ) मित्राचा फोन आला, त्याला सापाबद्दल मदत पाहिजे होती. हा नेहमी सारखा कॉल नाही, हे मला समजले, पण ओळख बघून मी मदतीला होकार दिला. त्याच्या धनकवडीच्या स्टुडीओ मध्ये पोहचलो, तर तिकडे एक मोठी फेमस मॉडेल (फेमिनाची) आमची वाट बघत होती. कामाचा अंदाज मला एक नव्हता, पण थोड्या वेळातच मित्राच्या हातात धामणीची पिशवी बघून प्रकार ध्यानात आला. थोडक्यात म्हणजे ती मॉडेल अंगावर धामण सोडणार होती आणि माझा मित्र फोटो काढणार होता. (जास्त विचार करू नका, मिलिंद- मधू सारखा फालतू प्रकार इकडे नव्हता.) माझे काम म्हणजे त्या धामणीला शांत ठेवायचे. आत्ता पर्यंत अनेक विषारी-बिनविषारी साप पकडले होते, हाताळले होते, पण हा प्रकारच नवा होता. बिनविषारी साप असला तरी ती धामण ५-६ फुटी होती. तीने जर मॉडेलच्या तोंडावर चावा घेतला तर त्या मॉडेल चे "करियर" त्याच सापाच्या बिळातच घुसले असते याची मला कल्पना होती. नंतर चे पाच तास माझ्या आयुष्यातील सगळ्यात जास्त टेन्शनमधले तास होते, त्यावरून मी इंजिनीरिंग ची App-Mech ची पण परीक्षा दहा वेळा ओवाळून टाकीन. त्या फोटोशूट च्या लाईटमध्ये धामणीला त्या मॉडेलच्या अंगावर शांत ठेवणे म्हणजे माझ्या आत्ता पर्यंतच्या अनुभवाची कसोटी होती. पण ती धामण आणि मॉडेल खूप खंबीर आणि प्रोफेशनल असल्यामुळे त्यांनी माझ्या कष्टाला न्याय दिला, दोघांनी पण एकमेकीना सहन करत फोटोशूट पूर्ण केले. धामण कशी स्मार्ट लुक्स देते आहे बघा ! १ कसोटीचा क्षण ! २ मॉडेल आणि धामणीचा आत्मविश्वास ! ३ धामण आणि मॉडेल च्या मधली केमिस्ट्री ! ४ पुढच्या भागात बिनविषारी साप आणि विषारी साप यांच्या रूपातला गोंधळ, आणि पुढचा भाग पुण्यामधून :) सगळे फोटो गौरव ठोंबरे कडून घेतले आहेत आणि त्यांना कुठल्याही पद्धतीने बदलण्यात आले नाही.

Book traversal links for एका गारुड्याची गोष्ट १३: धामण: उंदराचा कर्दनकाळ !

  • ‹ एका गारुड्याची गोष्ट १२: धामण: जुन्या ओळखीचा साप !
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
आस्वाद
लेख
माहिती

प्रतिक्रिया द्या
48784 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

मस्तच.

आनंद
Sat, 12/07/2013 - 11:56 नवीन
मस्तच. धामण "तो" होता कि "ती" होती. कदाचित "तो" असावा म्हणुन फोटो शूट एंजॉय केलेल दिसतय.
  • Log in or register to post comments

नाग हा माणसाचा शत्रु नाही का?

damn
गुरुवार, 12/19/2013 - 07:26 नवीन
एवढे उन्दीर खाणारी धामिण जर नागाचे स्टेपल फूड असेल, तर नाग हा माणसाचा शत्रू नाही का?
  • Log in or register to post comments

नाग उंदिरच खातो.नागराज (किंग

सुबोध खरे
गुरुवार, 12/19/2013 - 10:30 नवीन
नाग उंदिरच खातो.नागराज (किंग कोब्रा) चे मुख्य खाणे धामण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: damn

तुमचा एक लेख वाचाय मिळाला आणि

अमितदादा
Mon, 08/08/2016 - 01:51 नवीन
तुमचा एक लेख वाचाय मिळाला आणि मग सगळेच लेख वाचून काढले. निव्वळ अप्रतिम आणि ग्रेट. तुमच्या कामाला आणि अनुभवाला सलाम. लेखांमधले पंचेस सुद्धा एक नंबर. तुम्ही लिहीत रहा आणि आम्ही वाचत राहू एवढच सांगेन.
  • Log in or register to post comments

धन्यवाद् ! मधल्या काळात

जॅक डनियल्स
Tue, 08/30/2016 - 07:49 नवीन
धन्यवाद् ! मधल्या काळात शिक्षणामुळे ब्रेक घेतला होता. आता परत लिखाण चालू करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा

अमित लेख वर काढल्याबद्दल

vikrammadhav
गुरुवार, 08/11/2016 - 09:09 नवीन
अमित लेख वर काढल्याबद्दल धन्यवाद !!!! खूप चांगल्या लेखमालेला मुकलो असतो !!!
  • Log in or register to post comments

अतिशय वाचनीय लेखमालिका. सही!

साळू
Wed, 09/14/2016 - 14:41 नवीन
अतिशय वाचनीय लेखमालिका. सही! अवांतर : हा ह्या लेखमालिकेमधला शेवटचा लेख आहे का? की अजून पण भाग आहेत?
  • Log in or register to post comments

धन्यवाद् ! हा शेवटचा भाग

जॅक डनियल्स
गुरुवार, 09/15/2016 - 07:32 नवीन
धन्यवाद् ! हा शेवटचा भाग नव्हता, पण या नंतर मला लिहायला जमले नव्हते. पण आत्ता लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साळू

संपूर्ण लेखमालिका वाचली!!

जव्हेरगंज
Wed, 09/14/2016 - 22:00 नवीन
संपूर्ण लेखमालिका वाचली!! जबरदस्त झालीये साष्टांग !!! अजून पायजेल ...
  • Log in or register to post comments

धन्यवाद् ! आत्ता जमले तसे

जॅक डनियल्स
गुरुवार, 09/15/2016 - 07:33 नवीन
धन्यवाद् ! आत्ता जमले तसे लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

'साप' सोडून इतर विषयांवर पण

जव्हेरगंज
गुरुवार, 09/15/2016 - 12:37 नवीन
'साप' सोडून इतर विषयांवर पण लिहा की! लिखाणशैली एकदम हटके आहे! उदा. अमेरीकेतले अनुभव वगैरे इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

जबराट लेखमालिका !!!!

चिनार
गुरुवार, 09/15/2016 - 11:53 नवीन
जबराट लेखमालिका !!!! जॅक राव तुम्हाला सलाम !!! सापाविषयीचे अनेक गैरसमज दूर झाले. पुण्यात पाषाण भागात राहत असल्यामुळे सापाचे दर्शन अधूनमधून मिळत असते..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा