✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आमचे गोंय - प्रास्ताविक (१)

ट
टीम गोवा यांनी
Mon, 04/04/2011 - 00:33  ·  लेख
लेख
*** आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास , मध्ययुग व मुसलमानी सत्ता , पोर्तुगिज (राजकिय आक्रमण) , पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) , शिवकाल आणि मराठेशाही , स्वातंत्र्यलढा १ , स्वातंत्र्यलढा २ , स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य , गोव्याची सांस्कृतिक जडणघडण , गोव्याची खाद्यसंस्कृती , को़ंकणी भाषा - इतिहास आणि आज , समारोप - आजचा गोवा *** खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी टीव्ही नव्हता, म्हणजे आमच्याकडे नव्हता. करमणुकीचे साधन म्हणजे चित्रपट आणि नाटके! करमणूक घरबसल्या हवी असेल तर, रेडिओ! आमच्याकडे जुना फिलिप्सचा व्हॉल्व्हवाला रेडिओ होता. कॉलेजमधे जाणारा काका आणि थोडी मोठी आत्या त्यावर गाणी वगैरे ऐकत. मी अगदीच लहान, शाळेतही जात नसेन तेव्हा. एके दिवशी एक गाणे कानावर पडले आणि त्यानंतर चित्रपटाचे नाव पण... 'बॉम्बे टू गोवा'! बॉम्बे तर ऐकून माहित होतं, हे गोवा काय आहे? पण ते पटकन दोन शब्दात संपणारे नाव का कोणास ठाऊक, चांगलेच लक्षात राहिले. पण तेवढेच. पुढे बरीच वर्षे हे नाव उगाचच कधीतरी आठवायचे. वर्गात एकदोन मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला जाणारी. त्यांच्याकडून कधीतरी उडत उडत गोव्याबद्दल ऐकलेलं. तिथली देवळं, चर्चेस, बीचेस यांची वर्णनं माफक प्रमाणात ऐकली. असंच कधीतरी मंगेशकर लोक मूळचे गोव्याचे असं वाचलं होतं. बरीच वर्षं गोव्याचा संबंध एवढाच. साल १९८१. अर्धवट, कळत्या न कळत्या वयात आलो होतो. अचानक एक तूफान आलं... 'एक दुजे के लिये'. सुप्परडुप्परहिट्ट सिनेमा! भयानक गाजला. आम्हाला आधी तो बघायची परमिशन नव्हती घरून. पण सिनेमा जेव्हा प्रमाणाबाहेर हिट झाला तेव्हा कशीतरी परमिशन काढून बघितला. वासू सपनाच्या प्रेमकहाणीच्या जोडीने लक्षात राहिला तो त्यात दिसलेला गोवा. हे माझं गोव्याचं प्रथम दर्शन. भन्नाटच वाटलेला गोवा तेव्हाही. पण, गोव्याचं प्रत्यक्ष दर्शन होईपर्यंत अजून पाच वर्षं वाट बघायची होती. बारावीची परिक्षा संपली आणि रिकामपण आलं. कुठेतरी जाऊया म्हणून बाबांच्यामागे भूणभूण लावली होती. खूप पैसे खर्च करून लांब कुठेतरी जाऊ अशी परिस्थिती नव्हती. विचार चालू होता. एक दिवस बोलता बोलता बाबांनी त्यांच्या एका स्नेह्यांसमोर हा विषय काढला. गोव्यात त्यांच्या चिक्कार ओळखी होत्या. त्यांनी गोव्याला जा म्हणून सुचवलं. एवढंच नव्हे तर 'तुमची राहण्याची / खाण्याची सोय अगदी स्वस्तात आणि मस्त करून देतो' असं सांगितलं. एवढं सगळं झाल्यावर नाही वगैरे म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. निघालो आम्ही गोव्याला. आठ दहा दिवसांचं ते गोव्यातलं वास्तव्य, भटकणं, ते एक वेगळंच जग. आजही माझ्या डोळ्यासमोर त्यातला क्षणन् क्षण जिवंतपणे उभा आहे. पंचवीस वर्षं झाली, गोव्याने मनातून जागा रिकामी केली नाहीये. माझं अजून एक भाग्य म्हणजे त्यावेळी आम्ही अगदी घरगुती वातावरणात गोव्यात सैर केली होती. त्यावेळीही गोवा म्हणजे फक्त बीचेस, तारांकित रिसॉर्टस, दारू, विदेशी पर्यटक एवढीच गोव्याची जनमान्यता होती. पण आम्ही ज्यांच्या बरोबर गोवा हिंडलो, त्यांनी या सगळ्याच्या व्यतिरिक्त असलेला, सदैव हिरव्या रंगात न्हालेला, शांत (सुशेगाऽऽऽत हा शब्द तेव्हाच ऐकलेला), देवळातून रमलेला गोवाही दाखवला. माझी तो पर्यंत गोवा म्हणजे चर्चेस, गोवा म्हणजे ख्रिश्चन संस्कृती अशी समजूत. हा दिसत असलेला गोवा मात्र थोडा तसा होता, पण बराचसा वेगळाही होता. गोवा दाखवणार्‍या काकांनी गोव्याबद्दलची खूपच माहिती दिली. जसजसे ऐकत होतो, चक्रावत होतो. गोव्याच्या इतिहासातील ठळक घटना, पोर्तुगिज राजवटीबद्दलची माहिती वगैरे प्रथमच ऐकत होतो. शाळेत नाही म्हणायला गोव्यात पोर्तुगिजांची सत्ता होती वगैरे वाचले होते, पण ते तितपतच. काकांकडून प्रत्यक्ष ऐकताना खूप काही कळले. माझ्या मनावर अगदी खोल कोरला गेलेला प्रसंग म्हणजे आम्ही एका देवळात (बहुतेक दामोदरी का असेच काहीसे नाव होते) गेलो होतो आणि एक लग्नाची मिरवणूक आली वाजत गाजत. देवळाच्या बाहेरच थांबली. पुजारी लगबगीने बाहेर गेला. लगीनघरच्या मुख्य पुरूषाने पुजार्‍याच्या हातात काहीतरी बोचके दिले. पुजारी आत आला. त्याने ते बोचके देवाच्या पायावर घातले, एक नारळ प्रसाद म्हणून बाहेर जाऊन त्या पुरूषाला दिला. वरात चालू पडली. मला कळे ना! हे लोक देवळात आतमधे का नाही आले? कळले ते असे, ती वरात ख्रिश्चनांची होती. बाटण्याआधी त्या घराण्याचे हे कुलदैवत, अजूनही मंगलप्रसंगी कुलदैवताचा मानपान केल्याशिवाय कार्य सुरू होत नाही! पण बाटल्यामुळे देवळाच्या आत पाऊल टाकता येत नाही. देवळाच्या बाहेरूनच नमस्कार करायचा. असलं काही मी आयुष्यात प्रथमच ऐकत / बघत होतो. गोव्याच्या ऊरात काही वेदना अगदी खोलवर असाव्यात हे तेव्हा जाणवलं होतं. (वेदना असतीलही, नसतीलही. तेव्हा मात्र एकंदरीत त्या वरातीतल्या लोकांच्या तोंडावरचा भक्तिभाव आणि बाहेरून नमस्कार करण्यातली अगतिकता जाणवली होती असे आता पुसटसे आठवते आहे.) अशीच एक आठवण म्हणजे त्रिकाल चित्रपटात, एका ख्रिश्चन मुलाचे लग्न दुसर्‍या एका ख्रिश्चन मुलीशी होत नाही कारण तो मुलगा ब्राह्मण ख्रिश्चन असतो आणि मुलगी इतर जातीची ख्रिश्चन!!! त्रिकाल लक्षात राहिला तो असल्या सगळ्या बारकाव्यांनिशी. याच चित्रपटात मी गोव्यातील राणे आणि त्यांचे बंड हा उल्लेख प्रथम ऐकला. गोव्याहून परत येताना गोवा माझ्याबरोबरच आला. कायम मनात राहिला. कधी मधी अचानक, गोवा असा समोर येतच गेला. गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याचे उल्लेख वाचताना, त्या लढ्याबद्दल कुठे फुटकळ वाचताना, गोव्याच्या दैदिप्यमान लढ्याचा इतिहास कळला. पुलंच्या 'प्राचीन मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास' वाचताना तर मला "जैसी हरळामाजी रत्नकिळा | रत्नामाजी हिरा नीळा | तैसी भासामाजी चोखुळा | भासा मराठी" म्हणणारा फादर स्टीफन भेटला. या बहाद्दराने तर 'ख्रिस्तपुराण' हे अस्सल भारतीय परंपरेला शोभून दिसेल असे पुराणच लिहिले ख्रिस्तावर. हा गोव्याचा, आणि ही पुराण रचना गोव्यातली. ज्या गोव्यात मराठीचा एवढा सन्मान झाला, त्याच गोव्यात मराठी विरूद्ध कोंकणी वाद उफाळला आणि मराठीवर 'भायली' असल्याचा आरोप झाला हे वर्तमानपत्रातून वाचत होतो. सुभाष भेंड्यांची 'आमचे गोंय आमका जांय' नावाची कादंबरी वाचली होती. तपशील आठवत नाहीत, पण गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचे आणि त्याचबरोबर, 'भायले' लोकांबद्दलची एकंदरीतच नाराजी याचे चित्रण त्यात होते एवढे मात्र पुसटसे आठवत आहे. असा हा गोवा! अजून परत जाणे झाले नाहीये. कधी होईल सांगताही येत नाहीये. काही दिवसांपूर्वी 'प्रीत-मोहर'ने गोव्याबद्दल एक लेख लिहिला. गोव्याच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त. तेव्हा तिची ओळख झाली आणि असे वाटले की ती गोव्याबद्दल अजूनही बरेच काही लिहू शकेल. त्याच वेळेस आमची 'पैसा'बायसुद्धा गोव्याची आहे असं कळलं. तीही उत्तम लिहू शकेल असे वाटले. या सगळ्यामुळे गोव्यावर एखादी साग्रसंगीत लेखमाला का होऊन जाऊ नये? असा विचार मनात आला. अर्थात, त्या दृष्टीने माझा उपयोग शून्य! पण पैसा आणि प्रीत-मोहर यांनी कल्पना तत्काळ उचलून धरली. पैसातैने पुढाकार घेतला आणि लेखमालेची रूपरेषाही ठरवून टाकली. या मेहनतीचं फळ म्हणजे, 'आमचे गोंय' ही लेखमाला! या निमित्ताने एक वेगळीच लेखमाला वाचायला मिळेल म्हणून मलाही आनंद होत आहे. सर्वच वाचकांना ही लेखमाला आवडेल आणि महाराष्ट्राच्या या नितांत सुंदर लहान भावाची चहूअंगाने ओळख होईल ही आशा! - बिपिन कार्यकर्ते क्रमशः ** विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग. - टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते)
  • आमचे गोंय - प्रास्ताविक (२)
  • आमचे गोंय - भाग १ - प्राचीन इतिहास
  • आमचे गोंय - भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ता
  • आमचे गोंय - भाग ३ - पोर्तुगिज (राजकिय आक्रमण)
  • आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)
  • आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही
  • आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १
  • आमचे गोंय - भाग ७ - स्वातंत्र्यलढा २
  • आमचे गोंय - भाग ८ - स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य
  • आमचे गोंय - भाग ९ - गोव्याची सांस्कृतिक जडणघडण
  • आमचें गोंय - भाग १० - गोव्याची खाद्यसंस्कृती
  • आमचें गोंय - भाग ११ - कोंकणी भाषा – इतिहास आणि आज
  • आमचें गोंय - समारोप - आजचा गोवा

Book traversal links for आमचे गोंय - प्रास्ताविक (१)

  • आमचे गोंय - प्रास्ताविक (२) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
इतिहास
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
42375 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

छान

सखी
Tue, 04/05/2011 - 21:42 नवीन
छान. पहिला लेख आवडला. टिम गोवा मोठ्ठी व्हावी, तुम्ही तिघे तसेच इतर गोमंतक मिपाकरांनी देखील टिम गोवासाठी भरभरुन लिहावे अशी शांतादुर्गेचरणी प्रार्थना. -- हेच म्हणते नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणांची माहीती मिळेल असे वाटतेय, सचित्र माहीती आली तर दुधात साखरच. तसेच मिपाकरांनी गोव्याची ट्रिप केली तर तुम्हा तिघांपैकी कोणाकडे उतरायचे तेही कळवा, हॉटलेपेक्षा घरचा पाहुणचार कधीही चांगलाच. :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

किंचित असहमती

पंगा
Tue, 04/05/2011 - 21:53 नवीन
लेखमाला आतापर्यंत उत्तम चाललेली आहे. बरेच पोटेन्शियलही आहे, त्यामुळे अर्थातच अपेक्षा खूप आहेत. त्यामुळे ती यशस्वी व्हावी, त्यातून काहीतरी चांगले यावे याबद्दल शुभेच्छा आहेतच. पण...
टिम गोवा मोठ्ठी व्हावी
हे पटले नाही. माझ्या मते 'टीम' सध्या आहे तशीच उत्तम आहे. कदाचित एखाददुसर्‍या जाणत्या मेंबराने वाढ इथवर ठीक राहू शकेलही, पण खूप मोठ्ठी वगैरे झाली तर सुसूत्रता न राहण्याची, दिशा भरकटण्याची, कदाचित विसंवाद होण्याची शक्यता निर्माण होते. लेखमालेच्या यशासाठी 'टीम' खूप मोठ्ठी न होणेच हितावह राहील, असे वाटते. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

बरोबर

आनंदयात्री
Wed, 04/06/2011 - 21:27 नवीन
बरोबर आहे तुमचे, मान्य. (अवांतरः ओक्के !! बिकाशेट, पंगाशेटला नका देउ अ‍ॅडमिशन टिम गोवात ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

अतिअवांतर

पंगा
Wed, 04/06/2011 - 21:34 नवीन
मी कधी बरे म्हटले "मला घ्या" म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

व्वा! पुढील भागाची वाट बघत

शहराजाद
Tue, 04/05/2011 - 07:36 नवीन
व्वा! पुढील भागाची वाट बघत आहे. टीम गोवा नाव आवडलं.
  • Log in or register to post comments

शक्य झाल्यास उपक्रमात भाग

नीधप
Tue, 04/05/2011 - 10:01 नवीन
शक्य झाल्यास उपक्रमात भाग घेता येईल का?
  • Log in or register to post comments

मस्त.... !!! येऊ देत

मनराव
Tue, 04/05/2011 - 16:47 नवीन
मस्त.... !!! येऊ देत अजुन....
  • Log in or register to post comments

मस्त

सविता००१
Wed, 04/06/2011 - 13:55 नवीन
खूप उत्सुक आहे पुढील भाग वाचण्यास.
  • Log in or register to post comments

म स्त

वहिनी
Wed, 04/06/2011 - 14:51 नवीन
मस्त मस्त मस्त ?
  • Log in or register to post comments

मस्त लेखन.

पक्का इडियट
Tue, 04/12/2011 - 08:26 नवीन
मस्त लेखन.
  • Log in or register to post comments

सुरेख,

मन१
Tue, 04/12/2011 - 18:06 नवीन
अप्रतिम, अत्युकृष्ट! वाचतो आहे. --मनोबा.
  • Log in or register to post comments

टीम गोवा! जिंदाबाद!

प्राजु
Wed, 04/13/2011 - 02:17 नवीन
टीम गोवा! जिंदाबाद!
  • Log in or register to post comments

गोवा

जयंत कुलकर्णी
Wed, 05/04/2011 - 21:17 नवीन
प्रिया टीम गोवा, पहिल्यांदा हे आत्तापर्यंत वाचले कसे नाही असे वाटून वाईट वाटले. गोवा म्हणजे बीर, मासे, चर्च, इत्याई.... असे वाटणार्‍या अनेक लोकांनी ही लेखमालिका जरूर वाचावी. मी तर माझ्या सर्व मित्रांना गोव्याला जायच्या अगोदर ही लेखमालिका वाचावीच असा आग्रह धरणार आहे. ज्या ठिकाणी जायचे त्याच्याशी एकरुप होऊन ती जागा बघणे फारच अविस्मरणीय असते.... मी हंपीला गेलो होतो तेव्हा असाच त्याचा पूर्ण आभ्यास करून गेलो होतो... त्या अनुभवावरून सांगतोय. आपण एक चांगली लेखमालिका लिहीत आहात यासाठी आपले अभिनंदन.... आणि अर्थातच धन्यवाद !
  • Log in or register to post comments

गोव्यात मराठी

सुनील
Wed, 05/04/2011 - 21:36 नवीन
सोमवारच्या (२ मे) च्या हेरल्डच्या अंकात (गोव्यातून प्रकाशित होणारे दैनिक) प्रख्यात कोंकणीवादी उदय भेंब्रे यांचा लेख वाचावा. विषय वेगळा आहे पण, गोव्यात मराठी रुजण्यास पोर्तुगीजच कारणीभूत ठरले आणि परिणामस्वरूप हिंदू गोवेकर मराठीच्या कसे जवळ आले, हे दिसून येईल. (पोर्तुगिझांनी कोंकणी शिक्षणावर बंदी आणली. त्यांनंतर शिक्षणासाठी ख्रिस्ती मंडळींनी पोर्तुगिझ तर हिंदूंनी मराठी जवळ केली . जर पोर्तुगिझांनी कोंकणीवर बंदी आणली नसती तर, चित्र कदाचित वेगळे दिसले असते का, असा प्रश्न पडतो!)
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लेखमाला

उपेक्षित
Sat, 04/22/2017 - 17:52 नवीन
अतिशय सुंदर लेखमाला नवीन सदस्यांसाठी वर काढत आहे... गेले २/३ दिवस परत गुंगून गेलो होतो या निराळ्या गोव्यामध्ये.
  • Log in or register to post comments

गोव्यात जायचा चांगला काळ

तेजस आठवले
Sat, 04/22/2017 - 19:56 नवीन
गोव्यात जायचा चांगला काळ कोणता? मला देवळे बघण्यासाठी गोव्याला जायचे आहे. मंगेशी, शांतादुर्गा, महालसा हे मुख्य. चर्चेस लहान असताना बघितली आहेत त्यामुळे त्यात एवढा रस नाही. मुख्य म्हणजे शुद्ध शाकाहारी असल्याने ही ट्रिप नक्की कशी प्लॅन करावी हे समजत नाहीये. खायचे प्यायचे हाल होऊ नये ही इच्छा आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पैसा
Sat, 04/22/2017 - 22:09 नवीन
@उपेक्षित, धन्यवाद! @तेजस आठवले, सध्या खूप उन्हाळा आहे. समुद्रकिनार्‍यावर वारा असतो. पण खारट पाण्यामुळे जास्त चिकट वाटत रहाते. डिसेंबरमधे गोव्यात यायला चांगले वातावरण असते. पण तेव्हा गर्दी जास्त असते. कधीही आलात तरी शाकाहारी जेवणार्‍यांना काही प्रॉब्लेम नाही.
  • Log in or register to post comments

+१

प्रीत-मोहर
Tue, 04/25/2017 - 08:47 नवीन
+१ देवळं कधीही बघु शकता. तुम्ही कोणत्या भागात रहायचा विचार करत असाल त्यावर तुम्हाला त्या भागातली शुद्ध शाकाहारी ठिकाणं सुचवता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गोव्यात शाकाहारी मिळत नाही हा

दशानन
Sat, 04/22/2017 - 22:12 नवीन
गोव्यात शाकाहारी मिळत नाही हा एक गैरसमज आहे. बिनधास्त जावा! हॉटेल्स ना शोधता रेंट होम्स शोधा स्वस्त मध्ये ट्रिप होते व सामान कमी बाळगा.
  • Log in or register to post comments

जल्ला मेला

उपेक्षित
Tue, 04/25/2017 - 18:17 नवीन
जल्ला मेला जागूताईच्या माशाच्या रेशिप्या बगून बगून शाकाहार सोडून वषाट चालू कराव का ? या विचारात असलेला एक उपेक्षित :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा