घूंघटके पट खोल
संत कबीर यांच्या काव्याचा परिचय करून देतांना पहिली अडचण ही येते की सुरुवात कोठून करावी हेच कळत नाही. भजन की दोहे ? सकाळी रेडिओवर एखाददुसरे भजन ऐकावयास मिळते, रात्री कुमारांच्या निर्गुण भजनांची कॅसेट आठवड्यातून दोन-तीनदा तरी लागतेच.पण वाचावयाचे म्हटले की समोर येते दोहे-साकी यांचे पुस्तकच. कुठलेही पान उघडा, दोन ओळीत एखादा सुंदर विचार मन लुभावून टाकतो. आणि मुख्य म्हणजे या दोन ओळीत पाठभेदाची कटकट फार त्रास देत नाही. भजनांचे तसे नाही. रुचकर बिर्याणी खातांना कचकन खडा लागावा तसा हा पाठभेद सर्व मूड घालवून टाकतो.