"अरं ये अंत्या! कसली धावपळ चाल्लीय इतक्या रातच्याला?" राम्या
"अरं, आपला गण्या सकाळी गुरं चरायला घेऊन गेलता रानात... समंधी गुरं आली, पर गण्याचा काय पत्याच न्हाय अजून... आम्ही चार-पाचजण जरा बघून येतो रानात..." अंत्या
जांभळी गाव जवळच्या शहरापासून किमान १६ मैल दूर... ३०-४० घरांची वस्ती... पावसाळ्यात पोटापुरता भात पीकतो आणि दुध, तुप, रानातला मध असं काहीतरी शहरात विकून गावकरी तिकट-मिठाची सोय करतात... गुरांना चरायला अख्खं रान आहेच... गावाच्या जवळपास लाकुडतोडी मुळं रान जरा कमी झालयं, पण जरा आत शिरलं की एकदम दाट रान लागतं... रानातुन वाहणारी कुकडी नदी म्हणजे रानाची नस...