आता मी वानप्रस्थाश्रमात प्रवेश केलाय. सत्तरी ओलांडली. माझ्यासारखे अनेकजण आहेत ज्यांनी साठी, सत्तरी ओलांडली आहे. साठीनंतरच खरं तर वानप्रस्थाश्रम सुरु होतो.
कसं वागायचं वानप्रस्थाश्रमात? प्रश्न पडतो ना? त्याची उत्तरे अनेक आहेत. पहिलं म्हणजे आपण मुलाबाळांच्या संसारात "कॅपिटल आय" न होता "स्माॅल आय" व्हायचं. अहंकार, मीपणा झटकून टाकायचा. कॅपिटल आय तरुणपणी असतो. अंगात मस्ती मुसमुसत असते. माज असतो. जोश असतो. मनगटात ताकद असते. मनात ऊर्मी , उत्साह संचारलेला असतो. मी काहीही करेन असा अहंकार असतो. "कर्तुं,अकर्तुं, अन्यथा कर्तुम्"अशी ताकद असते. जिद्द असते . क्षमता असते. कर्तबगारी असते.