मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शृंगार

अस्तित्वाच्या पल्याड..

आनंदमयी ·
अस्तित्वाच्या पल्याड कोठे संथ नदीच्या पैलतिरावर, जललहरींसह वाहत गेली दूर तिथे स्वप्नांची घागर... त्या तीरावर गोकुळनगरी कान्हाची बेधुंद बासरी पाहुन लोभस रूप तयाचे, मनही झाले निळसर निळसर सर्वार्थाने देह लाजला पाहताच तो रोखुन मजला नाजुक कटिकमलावर बसला रुतुन तयाच्या नजरेचा शर हळूच जवळी आला कान्हा छेडित नाजुक अधरफुलाना भान हरपले जेव्हा मजला स्पर्शुन गेला तो मुरलीधर हलवुन मजला गेला वारा उधळुनी सुंदर स्वप्नफुलोरा विरून गेले रूप सावळे आणिक मागे उरली हुरहुर ©अदिती शरद जोशी

ओढ

विअर्ड विक्स ·
निशब्द राहिलो जरी मी पाहुनी सारे न्याहाळले कायम तुज विसरुनी तारे, भावनेस शब्दांची जोड का हवी कधी ओळखशील माझी ओढ हि खरी...

मी....

घन निल ·
दुखः माझे एकट्याचे एकलाच भोगतो मी … रात्रीस चांदण्यांसवे एकटाच जागतो मी … मी दिले तुला माझे आकाश चांदण्यांचे … कैफात निखळले जे रुपेरी तारे मोजतो मी …. माझ्या ओल्या जाणिवांची खुलीच होती कवाडे … आठवून तुझे धुमारे एकटाच लाजतो मी …. मकरंद तुझ्या ओष्टीचा अजुनी ओठांस आहे … ओलावल्या आठवांत एकटाच भिजतो मी … घनभार तुझ्या केसांची ती किरमिजी संध्याकाळ … प्राक्तनात माझ्या फुले वेचतो मी …. जगलो एकच पहाट जी तुझ्या मिठीत उगवली …. ओथंबल्या दवांत एकटाच नाचतो मी …

सार्थक

अज्ञातकुल ·
आभार… तिच्या गारस वयाचे ओळखीच्या समयाचे आतर्क्य यमनाचे आणि त्यामुळे छेडल्या गेलेल्या अरूप यौवनाचे ……. !! त्यातूनच उतारावरचं तारुण्य नात्याचं लावण्य शब्दांचा प्रसव आणि भावनांचा दुर्लभ शृंगार लाभला आहे मला … "माझा मी",… "नसूनही असलेली माझ्यातली ती " भेटलीय मला असंख्य वेळा ……. अस्तित्वाशिवाय ……!! या गंधर्व क्षणांमधून जन्मलेली कविताच जिवंत ठेवील मला चंद्र माधवीच्या प्रदेशात तिची प्रतीक्षा करीत चिरंतन …. !! आभार पुन्हा एकदा आमच्या न भेटण्याचे, …… आजन्म ………………. !! …………………… अज्ञात

ध्यासबावळी

अज्ञातकुल ·
आस मिटे ना मन हो चातक थेंब मिळे ना स्वाती तृषा पाशवी अंतर्यामी असून पाणी भवती फिरे एकटा मेघ अंबरी आतुर सुकली माती छळते सावट रंध्रे अनवट ठाव न लागे चित्ती अंकुर चिंतातूर; दिसे ना किरण सोबती अवती गुदमर विळखुन विरह दाटला स्तब्ध जाहली नाती एक साद पवनास विनवते छेड बांधले मोती झुलव आपला झुला; तोषव ध्यासबावळी धरती …………………. अज्ञात

असणे नसणे

अज्ञातकुल ·
जगण्यात उगिच सजते असणे अक्षरांत झिंगवते नसणे असणे नसणे ओसांडे मन हसण्यात सदा किण किण श्रावण आभास सदा पथदूर कुठे शोधासा कठिण पडते कोडे मेघावळ पिंजुन एकांती धड धड करते काळिज वेडे आकाश; खोल पोकळ वासा आवेग; न ठावे थांग जसा पवनासाहि ना कळलेले हे वाहतो सवे निशिगंध कसा ………………… अज्ञात

अथांग

अज्ञातकुल ·
ऋणात आहे; …. ऋण काटेरी तरी वाट ती माहेरी लाघव ओळी हळव्या लहरी अभंग संचित गाभारी ठाव न लागे अथांग सारे उचंबळे कधी मौन उरी प्रजक्तासम सण एकेरी एकांताची कास धरी स्पर्श दंवाचा चित्त थरारे ओघळ किंचित; बंड करी म्हणे सवे ये श्रावणात अन फिरव मला गत माघारी …………… अज्ञात

रंजनभ्रमरी

अज्ञातकुल ·
प्राजक्त मनाने झुरलो मी झरल्यात कळा अनुबंध तळी मदनाची बाधा भवभोळी गंधात न्हाइली मूक कळी चाहूलक्षणांची पागोळी दंवस्पर्शकोवळ्या अंघोळी अंगणी श्वेत केशर ओळी मातीवर ओल्या; रांगोळी अलवार स्पर्श हळुवार उरी दरवळ परिमळ मन गाभारी गोकुळी रास रंजनभ्रमरी वेदना जरा विरल्या दारी ……………. अज्ञात

रात्रीस उखाणा सुचला

प्रसाद साळवी ·
मी शब्द तुला सुचलेला, उधळून लावीतो कविता मी सूर उसवले दोन्ही, तिसर्‍याच्या उदयाकरता बघणार्‍या नजरांमधले वाटेत थांबले अंतर नजरेच्या क्षितिजाआडून सतरंगी जंतरमंतर वाजवता रंग उद्याचे, शत-गंध मोकळे होती ओघळत्या सेकंदांचे अडवून ठेवले मोती देऊळ-खांबा पक्षी क्षत-पंख पुसे इवलासा रदबदली अंधाराशी, हा निव्वळ फोल दिलासा वितळत्या भूतकाळातून निसरडी पाऊले आली घमघमत्या आज-उद्याशी आडवी-तिडवी रमली कधी स्तब्ध उभ्या असलेल्या, डोंगरमाथ्याआडून मुक्त स्वरांनी सरिता नाचते जाणीवा विसरून

....तसं नाहीये

मिसळलेला काव्यप्रेमी ·
समुद्राच्या अंगी आवेग भिनायला भरतीची जोड लागते . संध्येला कातर व्हायला सूर्यास्ताची वेळ लागते . चातकाच्या आतुरतेला वसंताची ओढ लागते . पाण्याला नितळ व्हायला स्वच्छ सूर्यप्रकाश लागतो . मातीला गंधाळायला पहिल्या पावसाची सर लागते . प्राजक्त ओघळायला पहाटेची साथ लागते . मोगर्‍याला गजरा व्हायला धाग्याची गाठ लागते . मऊ साय धरायला दुधाला धग लागते . साध्या पाण्याचे थंडगार तुषार व्हायला कड्यावरुन कोसळावे लागते . हवेला कुंद व्हायला धुक्याची हाक लागते . इतकचं काय, चंद्र उठून दिसायलासुद्धा रात्रीचे आंगण अन् चांदण्यांचे कोंदण लागते . पण तुझं तसं नाहीये गं तुझं...