एक ओपन व्यथा भाग ९ (अंतिम)
शेवटच्या भागाच्या निमित्ताने.....
१. खरं तर अश्या प्रकारची लेखमालिका लिहायचा हा माझा पहिलाच प्रयत्न. त्यामुळे ह्या मालिकेत नक्कीच काही उणिवा राहिल्या असतील. पुढच्या वेळेस त्या नक्की सुधारेन.
२. हे संपूर्ण लिखाण अज्जिब्बात म्हणजे अज्जिब्बात काल्पनिक नाही. ह्यातील प्रत्येक घटना मी एक तर अनुभवलेली आहे किंवा पाहिलेली आहे किंवा वाचलेली तरी आहे. मुद्दामच मी कुठल्याही प्रकारचा नामोल्लेख टाळला आहे.
३. हे लिखाण कोणाही जातीच्या वा धर्माच्या विरोधात नाही. एक साधारण ओपन व्यक्तीही किती हतबल होऊ शकते ह्याचं उदात्तीकरण मी केलं असं म्हटलं गेलं तरी मला ते मान्य असेल. तरी जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी असावी.
४. काही काही प्रसंग खूप भावनिक होते. मला आवरत नव्हतं लिहताना... लिहिताना लिहिले जात नव्हते. सगळे प्लॉट तसे तयार होते पण . . . . . . . . .
त्यामुळे पटपट भाग टंकणे शक्य झाले नाही.
५. शेवटचे दोन भाग लिहिताना मी आत्यंतिक अस्वस्थ झालो होतो. प्रचंड निराश झालो होतो. ते कशाप्रकारे उतरवलं गेलंय हे वाचकच ठरवतील.
६. खरं तर चार पाच भागात संपेल असं वाटत असताना ९ भागापर्यंत ही कथा वाढली ... सर्व सहृदय प्रतिसादकांचा मनापासून आभारी आहे...
७. माझे हे लिखाण आवर्जून दखलपात्र विभागात समाविष्ट केल्याबद्दल मिपाच्या संयोजकांचाही मी आभारी आहे
८. हा शेवटचा भाग आपणास भावेल अशी आशा आहे....
--------------------------------------------------------------------
एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054
एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086
एक ओपन व्यथा ३ - http://www.misalpav.com/node/36148
एक ओपन व्यथा ४ - http://www.misalpav.com/node/36475
एक ओपन व्यथा ५ - http://www.misalpav.com/node/36610
एक ओपन व्यथा ६ - http://www.misalpav.com/node/36653
एक ओपन व्यथा ७ - http://www.misalpav.com/node/36736
एक ओपन व्यथा ८ - http://www.misalpav.com/node/36889
-----------------------------------------------
दळभद्री....
अगदी हाच विचार येत असेल ना हे सारं वाचताना?.... आणि असा विचार येणं मी अजिबात अस्वाभाविक म्हणत नाही. काय कारण? फार काही जगावेगळं आहे? मीच काय असं जगावेगळं भोगलं होतं, कि मी आत्महत्या करावी? किंवा करण्याचा विचार करावा? मला कुठला असा असाध्य आजार बळावला होता कि त्याला कुठलाच उपाय नव्हता? आणि इतक्या कुठल्या वेदना होत होत्या कि त्या वेदनांपायी मी आत्महत्येचा विचार करावा. तसा तर मी सुशिक्षित बेरोजगारही नव्हतो कि गरिबीमुळे मी आत्महत्येचा विचार करावा? एव्हढं शिकलेलं पोरगं इतक्या क्षुल्लक कारणावरून आत्महत्येचा विचार कसा काय बुवा करू शकतं? इतक्या साध्या गोष्टी माझ्या एव्हढ्या बिघडलेल्या मानसिक अवस्थेची कारणं ठरावीत? कोण्याही त्रयस्थ माणसाला हे असं वाटणं मी चुकीचं म्हणणार नाही. कदाचित हे जे कोणी वाचत असेल त्याच्याजागी मी स्वतः जरी असलो असतो तरी मला स्वतःलासुद्धा हेच वाटलं असतं.... कदाचित....
एक साधी शिंक आली कि मरायला काय झालं होतं?.... एखादी ठेच लागून कसाबुवा कोणाचा प्राण जाऊ शकतो?... साधा ताप एकाच्या मरणाचं कारण कसा काय होऊ शकतो? नुसत्या थंडीने किंवा ऊन पडलं कि कसं बुवा कोणाला सहन होत नाही, लगेच प्राणोत्क्रमण? एकेकाचे नखरे असतात... असं... कोणी... जर अगदी नं पटणाऱ्या कारणाने मरण पावलं असेल तर आपण विचार करतो?? नाही ना? बहुतेक नाही करत.... (इथे मी अपवादांचा विचार नाहीये करत) आपण विचार करतो कि असते एकेकाची सहनशक्ती.... आणि विषय सोडून देतो...
आज समाजात प्रत्येकजण काही ना काही, कुठे ना कुठे, कसल्या ना कसल्या प्रकारे भोगत आहे. बर्याचदा आपण मला काय त्याचे? म्हणून एकतर त्या गोष्टी टाळतो किंवा टाळल्यासारखं दाखवतो. पण मनातून त्या गोष्टी नाहीत जात. मन शोधात असतं, त्या सगळ्या गोष्टी कुठल्याप्रकारे बाहेर येतील, त्या रस्त्याच्या... बर्याच जणांना तो रस्ता सापडतो. ते निवांत होतात. राहिलेले एक तर शोधत राहतात तो रस्ता आयुष्यभर अथवा परिस्थितीला पूर्णपणे शरण जाऊन त्या रस्त्याचा नाद सोडून देतात. मला ना तो रस्ता सापडला, ना मी परिस्थितीला शरण जायच्या पक्षात होतो, ना गोष्टी मला सहन होत होत्या... माझी सहन शक्ती संपत संपत चालली होती... मला अंदाज आला आणि मी निर्णय घेतला...
खरंतर मी असा निर्णय घेण्याचा विचार पहिल्यांदा करत नव्हतो. बर्याचवेळा केला होता. फक्त तो अंमलात आणला गेला नाही. कदाचित पूर्ण सहनशक्तीचा घडा भरायचा असेल. मनात कितीदा तरी विचार यायचा कि मी एकटा नाहीये भोगत हे सारं... मग मी का हे सगळं वैयक्तिक पातळीवर घेत आहे? माझ्यापेक्षा प्रचंड हलाखीत लोकं जगताहेत. त्यात आनंद मानत आहेत... मग मलाच काय असं झालं कि मी एव्हढा टोकाचा विचार करणं मला क्रमप्राप्त झालं?...
मी गोष्टी टाळून पुढे जाऊ शकत नव्हतो. माझं स्वतःचं जळणं थांबवूही शकत नव्हतो. माझी सहनशक्ती खूप कमी होती असाही कोणी अर्थ काढला तरी मला चालेल. कदाचित तेच खरं असेल... आत्महत्या करणाऱ्यांच्या इतिहासामध्ये सगळ्यात "उदात्त आत्महत्या" जी साने गुरुजींनी केली होती, ती होती असं मला वाटतं. "ज्या प्रकारचा समाज मी अनुभवत आहे, उघड्या डोळ्यांनी बघत आहे, तो समाज मला अपेक्षित नाही. मुळात मला अपेक्षित असणारा समाज मला घडवता आला नाही" ह्या निराशेपायी सानेगुरुजींनी स्वतःला संपवलं होतं. त्यामागे त्यांना वाटत असलेलं त्यांचं सामाजिक अपयश होतं. माझी आणि त्यांची तुलना शक्यंच नाही. आणि मुळात मला ती करायचीच नाहीये. मला माझ्यासभोवतालच्या समाजाप्रमाणे स्वतःला घडवता आलं नाही हे माझं वैयक्तिक अपयश आहे. माझ्या मणक्यात हाडं आहेत. तिथे रबरी नळी बसलेली वा बसवलेली नाहीये. कि जी कुठेही आणि कशीही वाकू शकेल. तरी मी खूप वाकलो. आयुष्यभर हे असलं वाकून राहणं आपल्याला शक्य नव्हतं... आणि म्हणूनच मी हा कोणालाही नं पटणारा निर्णय घेतला.
ज्या पद्धतीने आज आजूबाजूला गोष्टी घडत आहेत त्याकडे मी त्रयस्थ नजरेने नाही बघू शकत. "लेट इट बी" ही माझी मानसिकता कधीच नव्हती. मी अंतर्बाहय पेटून उठायचो. रात्र रात्र झोप यायची नाही. मध्यंतरी माझ्या पाहण्यात एक पोस्ट आली होती. ज्यात लिहिलं होतं, कि आपल्या देशात तिघांच्याच मरणाची दखल घेतली जाते. एक म्हणजे मुस्लिम, दुसरा म्हणजे दलित आणि तिसरा म्हणजे जनावर.... लाईक्स आणि कमेंट्स चा सिलसिला जोरात सुरु होता त्या पोस्ट वर.... पण आपण ही वस्तुस्थिती नाकारू शकतो? एका मुस्लिमाचा खून झाला की सारं राज्य पेटतं... एका दलिताला मारहाण झाली कि ती लगेच राष्ट्रीय समस्या होते... इतरांनी काय घोडं मारलंय? अर्थात कोणावरही गरज नसताना आणि त्याची चूक असताना अन्याय होऊ नयेच. त्याचं समर्थन कधीच होत नाही. कोणीच त्याचं समर्थन करू नये ... पण विशिष्ठ समाजावरच्याच अन्यायाला का इतकं मोठठं कव्हरेज मिळतं? इतरांना मारहाण होत नाही? इतरांचा खून होत नाही? त्यांना जीव नसतो? त्यांच्या जीवाला मोल नसते? मग जर माझ्या जीवाचं मोलंच नसेल तर हा जीव मरेपर्यंत मिटेपर्यंत मी का सांभाळू?
इतके दिवस एका समाजाने दुसर्या समाजावर अन्याय केला... काही काळानंतर तो दुसरा समाज त्याचा सूड घेण्यासाठी पहिल्या समाजावर पुन्हा अन्याय करायची भाषा करतो. एका हिंदी चित्रपटात एक डायलॉग आहे, "हर कुत्ते का दिन आता है". प्रत्येकाचे दिवस येतात. मग आपण किती दिवस ही असली कुत्री अनुभवणार आहोत?..... कधी ह्या बाजूची कुत्री तर कधी त्या बाजूची कुत्री... हे सासूसुनेसारखं भांडण किती दिवस सुरु ठेवणार आहोत? ह्यातून हाती काय लागणार आहे??
माझ्या वैयक्तिक पातळीवर ह्या गोष्टी माझ्या आकलनाच्या पलीकडे जात होत्या...
वेदनेला जात नसते.... पण प्रत्येक जातीची स्वतःची अशी वेदना असते.... ती दुर्लक्षिली जाऊ नये... कोणाचीच... पण जेंव्हा एकाच जातीच्या वेदनेला अधिकृतता मिळते, दुसर्या जातीला डावलून. तेंव्हा डावलल्या गेलेल्या जातीची वेदना ही हॉरिबल असते, ती शब्दात कितपत मांडता येईल... मला शंका आहे... दुर्दैवाने आज ह्या अशा प्रकारच्या पॉलिसीला तथाकथित निरपेक्षतेचं लेबल लावलं जातंय.... असो..
संदीप खरेची एक कविता आहे त्यात तो म्हणतो...
"पैलतीर गाठताना ध्यानी आले गेला धीर.... पार पोचताच झाला पैलतीर ऐलतीर".
मला माझी अवस्था अगदी ह्या ओळींसारखी झाल्यासारखी वाटत होती... प्रत्येक पायरीवर वाटायचं कि, हि जी पायरी आहे ना ती एकदा का ओलांडली कि झालं, मग काही अडचण नसेल. गोष्टी सुरळीत पार पडतील. ओलांडली कि त्यापेक्षा मोठठी पायरी माझं स्वागत करायची. परत परत स्वतःला सांगायचो. पण मी त्या दुसर्या बाजूला कधीच पोहोचलो नाही जिथं मला पोहोचायचं होतं. सदैव अलीकडेच .... दर वेळेस वाटायचं आता बास...एकदा का हा काळ गेला कि त्रास कमी होईल... पण तो काळ गेला कि काळ वेगळ्याप्रकारे दत्त म्हणून पुन्हा समोर उभा.... आणि आधीपेक्षा जास्त भीषण रूप घेऊन.. दर वेळेस नव्या उमेदीने प्रवास करण्याचं त्राण माझ्यात नव्हतं...
मला एक स्वप्न नेहमी पडायचं म्हणजे पडतं... मी रस्त्याने चालत आहे... रस्त्यानं खूप गर्दी आहे... मी गर्दीच्या अनुषंगाने जात आहे... कळत नाहीये नेमकं कुठे चाललोय? का चाललोय? कोणासोबत चाललोय?... कारण सगळेच अनोळखी.... हळूहळू चालत असताना मला असं लक्षात येतं कि सगळे माझ्याकडे बघत आहेत. मला ते जरा विचित्र वाटू लागतं... मग काही जण माझ्याकडे बोट दाखवून गालातल्या गालात हसू लागतात... मला काही म्हणजे काही कळत नाही.... मी जरा जोरात चालू लागतो, त्यांना टाळण्यासाठी.... मग ते खूप मोठ्याने हसू लागतात... मला पुन्हा काही कळत नाही.... मी भाम्बावून जातो... जोरात पळू लागतो.... गर्दी अजून मोठ्याने हसू लागते... आणि एकदम मला जरा जाणवू लागतं, काहीतरी गडबड आहे... एका मोठ्या दुकानाच्या मोठ्या आरशासमोर मी येऊन थांबतो.... जेंव्हा मी आरशात बघतो तेंव्हा मला भोवळ येते प्रचंड.... माझ्या पायाखालची जमीन सरकते.....कारण.. "माझ्या अंगावर एकही कपडा नसतो". मग मला कळतं गर्दीचं माझ्याकडं बघून हसण्याचं कारण... पण त्याचवेळेस मला समजत नाही, कधी माझ्या अंगावरचे कपडे गायब झाले??. मला दरदरून घाम फुटतो. आणि मी जागा होतो.... स्वतःला चिमटा काढून बघतो... ते स्वप्नंच आहे ह्याची खात्री होते आणि मी सुटकेचा निःश्वास सोडतो.... एक तर अशी स्वप्ने कोणालाच पडू नयेत... आणि पडलीच तर ती आठवू नयेत... मला पडायची पण आणि अगदी ठळक आठवायची पण... अख्खा दिवस त्याच स्वप्नाच्या छायेत जायचा... सवय होउ लागली मला ह्या स्वप्नाची.... नंतर तर स्वप्नातच मी स्वतःला चिमटा काढायचो. स्वप्नात काढलेला चिमटा खरा वाटायचा... स्वप्नातलं स्वप्न खरं वाटायचं..... परिस्थिती अजून बेक्कार व्हायची... साला दिवस पण विचित्र आणि रात्र त्यापेक्षा विचित्र...
किती दिवस धीर धरून ठेवणार होतो मी...
मला काही समाजामध्ये क्रान्ति आणायची नाहीये.....अर्थात माझी ती पात्रताच नाहीये म्हणा.... किंवा माझं हे असलं भलंमोठं पत्र वाचून काही समाज मंथन वगैरे व्हावं ही माझी काही अपेक्षा नाही... मुळात हे पत्र तरी कोणी वाचेल का ह्याबाबतसुद्धा मला खूप शंका आहे... मग मी एव्हढं का लिहतोय? त्यामागे हेतू कुठला? ह्या सर्व पत्रप्रपंचामागे कोणताही सामाजिक हेतू नाही.... ह्या सर्वामागे फक्त एक हेतू आहे तोही वैयक्तिक...
अज्ञात आडनावेला मोकळं व्हायचं होतं.... ज्या गोष्टी कधीच कोणाशी बोलल्या नाहीत. त्याला त्या कोणाशी तरी बोलायच्या होत्या... आयुष्यभर जे काही कोंडून ठेवलं होतं...ते बाहेर काढायचं होतं... ओकायचं होतं... अज्ञात आडनावे हा इसम आयुष्यभर गुदमरून राहिला होता... त्याला काही मोकळे श्वास घ्यायचे होते... तेही कोणाकडून वेडा म्हणवून नं घेता... कधी कधी हे अश्या प्रकारे व्यक्त होणं फायदेशीर असतं... कारण बर्याचदा जेव्हा आपण एका व्यक्तीसमोर मोकळं होत असतो ना... तेंव्हा एक तर पुढच्या व्यक्तीला त्यात कितपत रस असेल ह्याबद्दल शंका असते. आणि रस असला तरीही तुम्हाला कितपत व्यक्त होता येईल ह्यात पण शंकाच आहे. कारण अश्यावेळेस पुढच्या व्यक्तीला श्रोत्यापेक्षा उपदेशक होण्यात जास्त रस असतो. आणि मला उपदेश नको होता, कारण उपदेशक हा जास्तकरून काठावरच उभा असतो. बुडणाऱ्याला काठावर असणाऱ्याकडून वाचवण्याची अपेक्षा असते, मार्गदर्शनाची नाही....
आता खरंच मला खूप मोकळं मोकळं वाटतंय.... गच्चं भरलेलं आभाळ मोकळं झालंय... आता मी जरा हलका झालोय... मला माहितीये ही अवस्था क्षणिक आहे पण तरीही छान वाटतंय... पण आता माघार घेणार नाही....
जेंव्हा मी ठरवलं, आपण आपल्याला संपवायचं... मी आंतरजालावर (इंटरनेटवर) हुडकू लागलो... कुठल्या प्रकार आपल्याला पटेल... (सोबतच्या कागदपत्रांमध्ये इंटरनेटच्या हिस्ट्रीच्या प्रिंट आउट्स जोडल्या आहेत). मला एकही मार्ग पटला नाही... प्रत्येक मार्गात काही ना काही दोष होता.. मला असं मरण हवं होतं कि ज्याचा संबंध सरळ सरळ मी ज्यापद्धतीने जगलोय त्याच्याशी असावा... शेवटी मीच माझा मार्ग ठरवला....
आयुष्य पळण्यात गेलं होतं, कोणालाना ना कोणाला घाबरण्यांत गेलं होतं. शेवटी मला पळायचं नव्हतं. ठरलं... पाय गच्चं बांधायचे. स्वयंपाकघरातला टेबल बराच जाडजूड होता. तो मी माझ्या खोलीत आणला. खुर्चीचे पाय टेबलाच्या पायाला बांधले. नंतर माझे पाय त्या खुर्चीच्या पायाला करकचून बांधले... इच्छा जरी असली तरी पळणं आता शक्य नाही. हातानेच पोट पण बांधलंय खुर्चीला. आणि मी लिहीत आहे. आपल्या हाताने फार काही काम केलंच नाहीये.... कधी कोणावर ही अन्यायाच्या विरोधात उगारले गेले नाही. सतत आपलेच तोंड लपवायचे काम ह्या हातांनी केलेलं आहे. माझ्या बुळचट वृत्तीचे प्रतीक म्हणून मी माझ्या हाताकडे बघतो. कालच मला भंगाराच्या दुकानात गंजलेली हातकडी मिळाली. माझं लिहून झाल्यावर मीच माझ्या हाताला हातकडीने बांधणार आहे. कोणी सांगावं, माझेच हे बुळचट हात मला वाचवण्यात यशस्वी झाले तर?? नाही... मला ती शक्यतासुद्धा ठेवायची नाही. उजव्या हाताने डाव्या हातात हातकडी अडकवीन आणि तोंडात चावी ठेवून उजवा हात अडकवेन आणि तोंडानेच चावी नंतर दूर फेकून देईन. माझं तोंड..... कधीच कोणालाच काही बोललो नाहीये मी आत्तापर्यंत... कुठलाच ब्र काढला नाहीये. कधी कोणाला उलटं बोललोही, ओरडलोही नव्हतो. गरज असो वा नसो.... मला शेवटीहि ओरडायचं नव्हतं... रोगर खूप घाण लागतं म्हणे, खूप जळतं म्हणे आत.... आतडं, जठर का काय म्हणतात ते पेटून उठतं असं म्हणतात. माणूस गुरासारखा ओरडतो असं ऐकलंय... हात हातकडीने बांधून झाल्यावर रोगर घटाघट पिईन... आणि लगेच तोंडात कापडाचा बोळा कोंबेन..आधीही माझा आवाज कोणाला ऐकू गेला नाही. आत्ताही कोणालाच ऐकू जाऊ द्यायचा नाहीये... मला वाचायची एकही शक्यता मागे ठेवायची नाहीये... एव्हढा मला माझ्या ह्या असल्या जाण्याचा वीट आलाय.... बास.
पण...
आत्ता...
ह्या...
नेमक्या क्षणी...
एक...
सांगू??
.....खरं सांगू?.. मला खूप राहून राहून आई आणि बाबांचा चेहरा डोळ्यासमोर येतोय... जरा कालवाकालव होतेय आत... खूप उशिरा झालोय ओ मी त्यांना... त्यात एकुलता एक... ज्या हाताने मला चालायला शिकवलं, ते बाबांचे हात कसे काय माझ्या मृतदेहाला स्पर्श करू शकणार आहेत?... आई नेहमी माझ्यासमोर येऊन म्हणायची 'बोल रे राजा बोल... काहीतरी बोल'. मला तिच्याशी कधीच बोलू वाटलं नाही. बोलून तसाही काही फायदा झाला नसताच... वस्तुस्थिती थोडीच बदलणार होती. मी फक्त तिच्याकडे बघायचो, निर्विकार नजरेने. तिच्या काळजाला कित्ती घरं पडली असतील. अजूनही पडत असतील. मी असा निपचित बघून काय होईल तिचं?? काय धक्का बसेल तिला?... ज्वालामुखी जेंव्हा फुटतो तेंव्हा आधी जमीन हादरते आणि मग फुटते... इथं माझ्या मनात खूप काही खूप वेळ खदखदत होतं पण त्याचे धक्के मी कधीच कोणाला जाणवू देणार नव्हतो. आणि जाणवू दिले नाहीतच... मग एकदम हा जो काही स्फोट होणारे, त्याचे परिणाम किती गंभीर होणारेत?? पूर्णपणे कल्पना आहे मला त्याची... कालच माझा वाढदिवस साजरा केला दोघांनी. माझ्या लग्नाचं बोलत होते. 'फारसं काम होत नाही... शरीर साथ देत नाही... हातपाय चालतात नीट तोवर तुझ्या दोनाचे चार झालेले पाहायचेत' असं म्हणत होते... लहान असताना आई मला विचारायची, 'कधी मोठा होणारेस रे तू?' मी लगेच एकाही क्षणाचा विलंब नं लावता म्हणायचो, 'उद्या...' आई खूप प्रेमाने जवळ घ्यायची आणि जड, भरलेल्या आवाजात म्हणायची, 'लवकर मोठा हो'. मला त्याचा अर्थ कळायचा नाही. मी तसाच आईच्या कुशीत पडून राहायचो. कालपण आईने मला तोच प्रश्न विचारला, 'कधी मोठा होणार रे तू? मी काहीच नाही म्हणालो. दीर्घ 'ह्म्म्म.....' म्हणून वेळ मारून नेली. कारण काल माझ्याकडे 'उद्या' हे उत्तर नव्हतं... कोणत्या तोंडानें मी ते देणार होतो? ................ पोरगं मोठं झालं कि बापाच्या अंगावर रोज मूठ मूठ भर मांस वाढतं म्हणे. इवलं इवलं बाळ डोळ्यासमोर वाढत असताना त्याला कोण आनंद होतो, हे वाचलंय पण बर्याचदा. आपल्या पोरात बाप स्वतःचंच रूप बघत असतो असं म्हणतात. कोणी आपलं रूप म्हणून मृत्यू बघू शकेल?... कोणीच नाही ना? बाबांना ते बघावं लागणार आहे... कुठल्याच गोष्टीला बाबांनी मला नाही नाही म्हटलं, अर्थात मी कधी कुठला हट्ट केला नाही म्हणा... तरी जे काही मागितलं ते त्यांनी देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. बाबा जास्त बोलत नाहीत. त्यांची नजर जास्त बोलते. कशी असेल त्यांची नजर जेंव्हा अकस्मात त्यांना मी असा दिसेन?.....
आईबाबांचा विचार करत असताना मला ह्या निर्णयाचा फेरविचार करावा का काय असं जरा जरा वाटू लागलंय खरं.... पण.... नाही... मला कोणी कितीही आत्मकेंद्री म्हटलं तरी चालेल पण निदान आतातरी मी मागे हटणार नाही... आयुष्याने मला माझ्या पद्धतीने जगू दिलं नाही. त्याला मी माझ्या पद्धतीनेच संपवणार... हे रोज रोजचं मरण, मला, खरंच सहन होण्यापलीकडचं आहे. सहन नं होणारी आणि बरी पण नं होणारी जखम वागवण्यापेक्षा जखम होण्याची शक्यता संपवून टाकणंच योग्य...
ही आत्महत्या पूर्णपणे शुद्धीत असताना मी करत आहे. ज्या ज्या गोष्टींचा संदर्भ मी ह्या पत्रात दिला आहे त्याचे सर्व पुरावे मी सोबत जोडले आहेत. मुद्दामच मी कोणाचाही नामोल्लेख हेतुपुरस्सर टाळला आहे. कोणीही ह्याला जबाबदार नाही.आणि जबाबदार मानायचं असेल तर माझ्या जातीला जबाबदार मानण्यात यावं. पण जातीला शिक्षा करणार कशी? खरंतर हे असलं पत्र ज्याला सुसाईड नोट म्हणतात ती एव्हढी मोठी नसते, बहुतेक. पण मला मोकळं व्हायचं असल्याकारणाने ही नोट, हे पत्र खूपच लांबलं, ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणून मी इथेच थांबतो...
एक दुर्दैवी, असमर्थ आणि नालायक असा ओपन नागरिक
अज्ञात आडनावे...
------------------------------------
पत्र संपूर्ण वाचून झाल्यावर पाटील बराच वेळ सून्न होऊन बसले होते... दुसर्या दिवशी सकाळी पाटील पोलीस स्टेशनमध्ये गेले. कांबळेंना बोलावलं. काही टिपणे काढली होती, त्याचा तपास करायला सांगितला. कांबळे बरं म्हणून कामाला लागले. दुसर्या दिवशी कांबळेंनी त्याचा रिपोर्ट पाटलांना सादर केला. पाटलांनी तो रिपोर्ट अज्ञात आडनावेच्या फाईलीला लावला. आणि "केस क्लोज्ड" चा शेरा मारून ती फाईल पुढची अनेक वर्षे धूळ खायला कपाटात ठेवून दिली. त्यांच्या पत्रकाराला बातमीसाठी फोन केला. तो फोन ठेवून पाटील बराच वेळ त्या बंद कपाटाकडे बघत बसले होते...
.
.
.
.
दुसऱ्या दिवशीच्या पेपर मध्ये सहाव्या पानावर अगदी खालच्या कोपर्यात दोन ओळीची बातमी छापून आली... "मानसिक वैफल्य आणि वैयक्तिक अपयशामुळे युवकाची आत्महत्या"... त्याचवेळेस, त्याचपेपरच्या, त्याच पानावरच्या अग्रलेखाचे शीर्षक सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं...
.
.
.
.
.
"दलित युवकांची आत्महत्या... गरज सामाजिक आत्मचिंतनाची"
Book traversal links for एक ओपन व्यथा भाग ९ (अंतिम)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
मला ही कन्सेप्ट किंवा लेखमाला
अगदी असंच
अरे!
जाऊ दे ना ताय, मागच्यावेळी
+१
सहमत आहे अर्धवटराव
दणकुन जोरबैठका काढायला
प्रतिसाद आवडला!
पहिले 2-3 भाग आवडले. पण नंतर
वाचतील काही दिवसांनी लेखक राव
सर्वांचे आभार...
लिहा खुशाल
तसेही दु:ख विकायची ती दलित
मग नाय तर काय.
जाऊद्या हो! ते कायद्याच्या
आधी कोणी विकलाय?
दलितांनी?? गुड जोक! सत्य समोर
तुमचा काय प्रॉब्लेम आहे सोन्याबापूजी??
तसेही दु:ख विकायची ती दलित
:)
ताई
;)
बापू, हे वैयक्तिक तुमच्याबद्दल नाही,
तुम्ही आता विषय बदलत आहात,
तुम्ही आता विषय बदलत आहात,
तुम्ही आता विषय बदलत आहात,
विषय बदलायचा काहीच संबंध नाही, गरजही नाही,
एक्सक्युज मी, तुम्ही आत्ता
__/\__
ओके, तुम्हीही गैरसमज करून घेऊ
निमो तुम्ही गोंधळला आहात काय?
गोंधळ अजिबात नाही
अकुंची कविता येथे सांगून
मी विसंगती लक्षात आणून देत
माणूस स्वतःच्या चुकांसाठी
माणूस स्वतःच्या चुकांसाठी
कथा एकसलग वाचली. निःसंशय