✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी

म
मृत्युन्जय यांनी
Fri, 04/01/2016 - 17:46  ·  लेख
लेख
नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली. साधारण महाभारताच्या कथेतल्या या २ नायकांच्या सूडाच्या प्रवासातील मुख्य टप्पे सगळ्यांनाच ज्ञात आहेत. कर्ण आणी अर्जुन एकाच आईची दोन मुले दैवगतीने वेगवेगळ्या ठिकाणी वाढले. त्यापैकी अर्जुन उच्च्कुलीन राजपुत्र म्हणून वाढल्याने त्याला साक्षात गुरु द्रोणांकडुन सर्व दैवी अस्त्रांचे आणि शस्त्रांचे ज्ञान मिळाले तर कर्ण एक सूतपुत्र म्हणुन वाढल्याने त्या ज्ञानापासून वंचित राहिला मात्र द्रोणाचार्यांच्या आश्रमातच राहुन त्याने शस्त्रास्त्रांचे उत्तम ज्ञान मिळवले आणि धनुर्विद्येत प्राविण्य मिळवले पण सर्व प्रकारे लायक असुनही केवळ प्रचलित जातिव्यवस्थेमुळे एका ठराविक मर्यादेपलीकडे ज्ञान न मिळवु शकल्याने त्याला दैवी अस्त्रांपासून वंछित रहावे लागले जी त्याने नंतर परशरामांकडुन फसवणुकीने मिळवले आणी त्याच्मुळे त्याचा घात झाला. पण या सर्व घटनाक्रमामागचे जबरदस्त राजकारण कधी कोणी समजुन घ्यायचा प्रयत्न करताना दिसत नाही. कर्ण आणि अर्जुन या दोन व्यक्तिरेखांच्या आडुन दुर्योधन आणि कृष्ण या दोन राजकारण्यांनी जे अप्रतिम राजकारण खेळले त्याच्या विवेचनासाठी हा खटाटोप. महाभारत आपण नेहमीच एका साचेबद्ध रितीने पाहतो आणि ते बरोबरही आहे कारण तसे न केल्यास ते मूळ कथाबीजाला आव्हान देण्यासारखे होइल. पण थोडा वेळ त्यातील सर्व दैवी घटना आणि संगती बाजूला करुन बघितल्यास मानवी भावभावनांचे अगणित कंगोरे सामोरे येतील. दैवी अस्त्रे, कृष्णाचे देवत्व, देवांचे अस्तित्व आणि दैवी चमत्कार या संदर्भाकडे दुर्लक्ष केल्यास कृष्ण आणि दुर्योधन यांच्या राजकारणाचे द्वंद्व दिसुन येइल. त्यामुळे फक्त या लेखापुरत्या या सगळ्या गोष्टींना मी फाटा दिला आहे आणी हे लक्षात ठेउनच कृपया हा लेख वाचावा. जर दैवी अस्त्रांचे अस्तित्वच अमान्य केले तर हे लक्षात येइल की द्रोणाचार्यांनी त्यांच्या सर्वच शिष्यांना केवळ युद्धकलेत आणि युद्धशास्त्रात प्रवीण केले होते. यात कदाचित रासायनिक शास्त्रावर आधारित अस्त्रे असु शकतील जी त्यांनी काही ठराविक लोकांना शिकवली ज्यांचा उपयोग कदाचित " सर्वसंहारक अस्त्रे " म्हणुन होउ शकत होता पण एकास एक युद्धात कदाचित ही अस्त्रे निरुपयोगी होती. हे गृहीतक मान्य केल्यास एकल्व्याची कथा देखील अजुन जास्त समजुन घेता येइल. जर अर्जुनाकडे इतकी सगळी संहारक अस्त्रे होती की जी एकास एक युद्धात देखील वापरता येत होती तर द्रोणाचार्यांच्या मनात तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होइल की नाहीए याबाबत शंका असण्याचे कारण नव्हते. पण धनुर्विद्येतली एकलव्याची प्रगती आणी कौशल्य बघता त्यांना त्याबद्दल भय उत्पन्न झाले याचाच दुसरा अर्थ असा होतो की कदाचित दैवी अस्त्रे असा काही प्रकार नव्हताच. होत्या त्या सगळ्या अफवा. त्यामुळेच कर्णाकडे दैवी अस्त्रे नाहित हे माहिती असुनही दुर्योधनाला त्याच्यात अर्जुनाचा प्रतिस्पर्धी दिसला. युद्धकलेत आणि धनुर्विद्येत अर्जुनाचा उतारा कौरवांकडे नव्हता आणि त्यामुळॅच पहिली संधी मिळताच दुर्योधनाने कर्णाला आपल्या जाळ्यात ओढले. दुर्योधनाच्या गुणाग्राहकतेचा आणी राजकीय दूरदृष्टीची ही पहिली चुणूक होती. या वेळी तरी युधिष्ठिराकडे त्या राजकीय कुवतीवर उतारा नव्हता आणी सर्वंकष राजकीय पटलावर कृष्णाचा उगम होइस्तोवर युधिष्ठिर विदुराच्या राजकारणीय कौशल्यावर विसंबुन तरलेला दिसतो. अर्जुनाकडे दैवी अस्त्रे आहेत आणी कर्णाकडे ती नाहित हे जेव्हा कंठशोष करुन सांगितले जात होते त्याच्याच आसपास कधीतरी दुर्योधनाने कर्णाकडे दैवी अस्त्रे नसली तरी जन्मजात दैवी कवच आणी कुंडले आहेत अशी आवई उठवुन दिली असावी आणि ही नि:संशयपणे एक आवईच होती असे म्हणण्यास वाव आहे. कर्णाचे जन्मजात दैवी कवच भेदुन कुठलेही अस्त्र किंवा शस्त्र त्याला इजा पोचवु शकत नाही हे सत्य असल्यास द्रौपदी स्वयंवरामध्ये, गंधर्व युद्धात आणि विराट युद्धात त्याला इजा कश्या झाल्या याचे काही स्पष्टीकरण मिळु शकत नाही. शिवाय जर कर्णाकडे दैवी कवच कुंडले होती तर ती एक असामान्य घटना होती आणि अश्या असामान्य माणसाबद्दल परशुरामांना काही माहिती नव्हती हे संभवत नाही. त्यामुळे कर्णाचे अभेद्य कवच आणि कुंडले अस्तित्वातच नव्हती हे मानायला वाव आहे. अशी आवई उठवल्याने कर्ण अर्जुनापेक्षा सरस, प्रबळ आणि अजेय आहे अशी भावना सैन्यात पसरवण्यात दुर्योधन यशस्वी झाला आणि त्यामुळे सैन्याचे आणी कौरवपक्षाचे मनोधैर्य वाढले असावे. दुर्योधनाने राजकारणाच्या पटावरचे अजुन एक घर या खेळीमुळे सर केले. दुसरीकडे द्रोणाचार्यांनी न शिकवलेली विद्या आणी कौशल्य कर्णाने परशुरामांकडुन हस्तगत केली असावी परंतु हे करताना त्याने यच्चयावत सर्व दैवी अस्त्रे परशुरामांकडुन शिकुन घेतली आहेत अशी आवई उठवण्यात दुर्योधन यशस्वी झालेला दिसतो. द्रोणाचार्यांना दैवी अस्त्रे परशुरामांनी शिकवली होती त्यामुळे अर्जुनाच्या गुरुंच्या गुरुंकडुन दैवी अस्त्रे शिकलेला महान धनुर्धर म्हणुन कर्णाची जाहिरात करण्याची संधी दुर्योधन दवडेल असे वाटत नाही. दुर्योधनाने अजुन एक पॉईंट सर केलेला दिसतो. त्यानंतर त्याच्या या तंत्राला त्याच्यावरच उलटवण्याचा यशस्वी प्रयत्न कृष्णाने केलेला दिसतो. त्याने दुर्योधनावर कडी करत अशी आवई उठवलेली असावी की अर्जुनाने तर सर्वच देवांकडुन दैवी अस्त्रे मिळवली (परशुराम काय चीज आहे) आणी भरीस भर म्हणुन त्याने देवाधिदेव शंकराचा कृपाप्रसाद ग्रहण करुन त्यांच्याकडुन अस्त्रांमध्ये सर्वोच्च स्थानी असलेले पाशुपत अस्त्र थेट शिवाकडुन मिळवले. अजुन एक ब्राउनी पॉइंट सर करताना या सग्ळ्या कथेला कर्णाला (न) मिळालेल्या शापांची फोडणी दिली गेली आणी अशी अफवा पसरवली गेली की कर्ण ऐनवेळी त्याचे ब्रह्मास्त्र विसरेल असा शाप परशुरामांनी दिला आहे तर कर्णाचे रथचक्र युद्धाच्या ऐन ध्मश्चक्रीत चिखलात घुसेल असा शाप त्याला ब्राह्मणाने दिलेला आहे. यानंतर कर्णाला पुरते निष्प्रभ करण्यासाठी पुढची चाल खेळली गेली असावी आणि कुठल्याश्या ब्राह्मणाला पुढे करुन कर्णाकडे कधी नसलेले कवच आणी कुंडल त्याने त्या ब्राह्मणाला म्हणजे इंद्राला दान केली अशी आवई उठवली गेलेली दिसते. लोकांना दाखवण्यापुरता हा बनाव कदाचित खरेच घडवुन आणला गेला असाबा आणि घेणार्‍याला आणी देणार्‍याला दोघांनाही त्यातला फोलपणा जाणवला असावा पण त्यामुळे सैन्यावर मोठा दुष्प्रभाव पडु शकतो. झालेल्या या नुकसानीची भरपाई करण्यासाठी कौरवांनी अजुन एक आवई उठवुन दिली की कर्णाच्या दानशूर पणावर प्रसन्न होउन इंद्राने त्याला अशी एक अमोघ शक्ती दिली आहे की ज्या योगे तो कुठल्याह्ही यौद्ध्याला मारु शकेल. या शेवटच्या अफवेवरचा उतारा कॄष्णाला घटोत्कचाच्या मृत्युत दिसला आणि एवढी दु:खद घटना घडलेली असतानाही त्या घटनेचे देखील सवतःच्या राजकीय फायद्यासाठी भांडवल करण्यात कृष्ण यशस्वी झाला. घटोत्कचाच्या मृत्युसरशी त्याने कर्णाची शक्ती वापरुन संपली आणी इंद्राकडे परत गेली अशी आवई उठवुन दिली. सर्व पांडव दु:खी असताना कृष्णाने मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने रथावर उड्या मारुन आपला आनंद व्यक्त करताना कर्णाने त्याची शक्ता गमावल्याची बातमी पसरवली. त्यामुळे घटोत्कचाच्या मृत्युने मनोबल गमावलेल्या पांडव सैन्याला उलट आता अर्जुनाचा मार्ग निर्धोक झाला असे मानुन मनातली सर्व मरगळ झटकुन युद्ध करण्यास आधारच मिळाला. यामुळेच कदाचित अर्जुनाचे देखील मनोबल वाढले असावे. सैन्याचे तर नि:संशय वाढतेच. युद्धाच्या सतराव्या दिवशी कर्णाने शल्याला रथाचे सारथ्य करण्याची विनंती केली याचा कृष्णाने या सगळ्या घडामोडीत अचूक उपयोग करुन घेतला आणि शल्याने मोठ्या कौशल्याने कर्णाचा रथ वेगळा काढुन युद्धाभूमीवर चिखल साठला असेल अश्या ठिकाणी नेउन उभा केला. आणि मग "चिखलातुन चाक निघाले की सांग, मी येतो परत सारथ्य करायला" असे सांगुन शक्य चक्क निघुन गेला. त्या चिखलात चाक रुतलेले असताना सारथी सोडुन गेलेला असताना आणि रथ हलत नसताना केलेल्या त्या एकतर्फी युद्धात कर्णाला नि:शस्त्र असताना मारताना 'अखेरच्या युद्धात रथचक्र जमिनीत रुतण्याचा ' त्याला शापच होता असे सांगण्याचे नैतिक पाठबळ देखील कृष्णार्जुनाला त्या शापाच्या अफवेतुनच मिळाले. महाभारत युद्धात बहुतेक सगळ्या प्रमुख यौद्ध्यांचा अंत साध्या बाणांनीच झाला आहे. दैवी अस्त्राने सदगती प्राप्त झालेले फार थोडे. भीष्म साध्या बाणांनी शरपंजरी पडले. द्रोणांचा तलवारीने शिरच्छेद झाला, भूरिश्रवाचेही तेच, कर्ण साध्या अंजलिक बाणाने मारला गेला, दुर्योधन गदायुद्धात गेला, वृषसेन साध्या बाणाने मारला गेला, दृष्ट्यद्युम्न आणि युधामन्यु यांना तर अश्वत्थाम्याने हातानेच मारले. असे असताना अवास्तव महत्व दिल्या गेलेल्या दैवी अस्त्रांना आणि शक्तींना राजकारणाच्या पटावर मोहर्‍यांसारखे वापरुन कृष्ण आणि दुर्योधनाने राजकीय चातुर्याचे असीम प्रदर्शन केले असे मानण्यास वाव आहे. या सगळ्या खेळ्यांमध्ये कर्ण आणि अर्जुन या दोघांचा प्याद्यांसारखा मोठ्या खुबीने वापर केला गेला. ****************** तळटीपा: १. वरचे विवेचन हे माझे मत झाले. महाभारताच्या मुख्य कथेत सगळ्या दैवी घटना, व्यक्ती आणी शक्तींचा उल्लेख केला गेला आहे. जर या सर्व गोष्टींचे दैवी आवरण अथवा अस्तित्व अमान्य करायचे झाले तर या सगळ्या घटनांचे स्पष्टीकरण क्से करता येइल याचे विवेचन करण्याचा हा माझ्या दृष्टीकोनातुन छोटा प्रयत्न. २. महाभारतातले राजकारण मुख्यत्वे लढले गेले चार पात्रांमध्ये दुर्योधन आणि शकुनी एका बाजुला आणि कृष्ण आणि युधिष्टिर दुसर्‍या बाजुला. त्यातही मुख्य खेळाडु दुर्योधन आणी कृष्ण त्यामुळे या दोघांचाच प्रामुख्याने उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात या संपुर्ण राजकारणामागे अजुनही व्यक्ती असु शकतात. " वर नमूद केल्याप्रमाणे हे माझे "रीडिंग बिटवीन द लाइन्स" किंवा "इंटरप्रिटेशन आहे त्यामुळे अमुक गोष्ट कृष्णाने केली याचा पुरावा मूळ महाभारतातुन काढुन द्यायला सांगितल्यास तसा काही देता येणार नाही. ३. हा लेख लिहिताना मुळात महाभारत घडले का? महाभरत खरे की केवळ एक कथा? या दृष्टीकोनातुन?विचार केलेला नाही. एका खर्‍या कथेचे दैवी आवरण बाजुला सारुन त्यातील काही घटनांचे विवेचन इतक्या ढोबळ अर्थाने कृपया या लेखाकडे बघावे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
इतिहास
वाङ्मय
साहित्यिक
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
मत
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
33391 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

आवडलं

मन१
Fri, 04/01/2016 - 17:54 नवीन
महाभारताबद्दल इतरही कुणाचा अभ्यास असेल तर त्यांची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

नय पट्या, इतक्या आवया?

स्पा
Fri, 04/01/2016 - 18:23 नवीन
नय पट्या, इतक्या आवया?
  • Log in or register to post comments

धर्म ग्रंथाकडे एक 'कथा'

मम्बाजी सर्वज्ञ
Fri, 04/01/2016 - 18:32 नवीन
धर्म ग्रंथाकडे एक 'कथा' म्हणून बघण्याचा चांगला व्यू आहे. अवांतर : अजून 'चेष्टा' करणारी माकडे आली नाहीत, तयार राहा. विशेषतः 'रामायण आणि महाभारत' म्हंटल्यावर आजकाल 'मर्कट चाळ्यांचा आणि लाथांचा' सुकाळ असतो. कुठलाही धागा सोडला नाही आहे या लोकांनी. इथे आलेच तर त्यांना रिस्पोन्स न देणे योग्य, उगाच कचरा होत जातो चर्चेचा. मी पा आणि मु पी मध्ये आजकाल फार फरक राहिला नाही आहे.
  • Log in or register to post comments

+11111

विजय पुरोहित
Fri, 04/01/2016 - 19:04 नवीन
+11111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ

इरावती कर्वे यांचे "युगान्त"

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/01/2016 - 18:33 नवीन
इरावती कर्वे यांचे "युगान्त" (वाचले नसल्यास) वाचा. महाभारतातील पात्रांच्या कृतींचे तत्कालीन समाज-राज-धर्म-कारणाच्या पार्श्वभूमीवर केवळ मानव म्हणून (मानवी राग-लोभ-ईर्षा-अपेक्षा-उद्देश जमेस धरून) फार छान विष्लेशण केलेले आहे. राजकारण का व कसे झाले आणि नंतर कृष्णाचे दैवतीकरण कसे झाले हा भागही रोचक आहे.
  • Log in or register to post comments

मूळ इतिहास/कथेतील हातभर

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/01/2016 - 18:44 नवीन
मूळ इतिहास/कथेच्या हातभर ढलपीला दोन योजने लांब बनवणे हे नंतर प्रक्षेपीत झालेल्या भागांमुळे होतच राहते... मूळ "जय" आणि आताचे "महाभारत" यांच्या लांबीतला फरक हेच सांगतो. व्यक्तींना देवत्व/संतपणा बहाल करण्यासाठी आणि पुस्तकांना दैवी बनवण्यासाठी त्यांना चमत्कार चिकटवण्यासारखी दुसरी जास्त पॉवरफूल्ल ट्रिक नाही... उदा "हा एवढा महापूर आला / भूकंप झाला, पण त्या देवस्थानाला धक्कापण नाय लागला" किंवा "हात लावून कॅन्सर बरा केला", इ, इ, इ. ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हो ते तर वाचाच आणि भैरप्पांचे

Anand More
Sat, 04/02/2016 - 12:39 नवीन
हो ते तर वाचाच आणि भैरप्पांचे पर्व व कुरुंदकरांचे व्यासांचे शिल्प देखील वाचल्यास तुमची मते बदलतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

परफेक्ट विवेचन.

अभ्या..
Fri, 04/01/2016 - 18:33 नवीन
परफेक्ट विवेचन. मलाही बर्‍याचदा असेच वाटायचे. काय ही दिव्यास्त्रे? एकेका बाणाने हजारो सैनिक मारायची ताकद असलेली प्रत्यक्षात कशी असतील? धनुर्विद्येतले परफेक्षन अचूक लक्ष्यावर बाण सोडणे, हलत्या वाहनातून तिरंदाजी करणे, शब्दवेधीपणा असणे याशिवाय अजून काय असेल. एकाच वेळी आगीचा पाउस पाडणे, पाणी पाडणे, हजारो सैनिक मारणे ह्या अव्वाच्या बव्वा असणार. बर्‍याच प्रश्नांना लॉजिकली समर्थन मिळतेय मृत्युंजयराव तुमच्या विवेचनातून. धन्वाद.
  • Log in or register to post comments

अभ्या...च्या प्रतिसादाशी सहमत

विजय पुरोहित
Fri, 04/01/2016 - 19:05 नवीन
अभ्या...च्या प्रतिसादाशी सहमत. लेख अतिशय आवडला. एका नवीन दृष्टीकोणातून महाभारत समजून घेता आले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

भीम

हकु
Fri, 04/01/2016 - 19:24 नवीन
आपण सांगितलेल्या या चार पात्रांव्यातिरिक्त तितकेच महत्वाचे अजून एक पात्र म्हणावे लागेल, ते म्हणजे 'भीम'. डॉ. प. वि. वर्तक यांच्या 'स्वयंभू' या भीमावर आधारित पुस्तकाचा संदर्भ घेऊन काही मुद्दे मांडतो. त्यांच्या मते भीम हे महाभारताचा नायक शोभावा असे व्यक्तिमत्व. त्याची काही कारणे - १) लहानपणापासूनच भीम हा अतिशय बलवान म्हणून समजला गेलेला. त्यामुळे झोपेचे औषध खाऊ घालून तलावात बुडवून आधीच त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या कुठल्याही पांडवाबरोबर हे घडवण्याची आवश्यकता वाटली नाही. (अर्थात इथे ती तलावात बुडवण्याची गोष्ट ग्राह्य धरली तर) पण एकंदरीतच कौरव गण लहानपणापासूनच भीमाला टरकून होते ही बाब मानली पाहिजे. २) लाक्षागृहाला लागलेल्या आगीतून कुंतीसकट सर्व भावंडांना वाचवण्याचे काम भीमानेच केले. इथे भीमाची बुद्धी लक्षात घ्यायला हवी. ३) भीमाची ताकद अचाट होतीच. जरासंधासारख्या कसलेल्या मल्लाला उभा फाडण्याचे काम इथे भीमाने करून दाखवले. इथे कृष्णाचं राजकारण आपल्या सहज ध्यानात येतं. त्याने जरासंधासारख्या प्रचंड बलवान शत्रूला भीमाकरवी परस्पर मारलं. पण इथे भीम (आणि केवळ भीमच) त्याला मल्ल युद्धात मारू शकतो ह्याची कृष्णाला पूर्ण खात्री होती. ४) द्रौपदी वस्त्र हरणाच्या प्रसंगात केवळ युधिष्ठीराचा आदेश झाला नाही म्हणून भीम- अर्जुन हात चोळत चरफडत बसले, पण सर्वांसमक्ष दुर्योधनाच्या मांड्या फोडण्याची, दु:शासनाचं रक्त पिण्याची आणि सर्वच्या सर्व १०० कौरवांचा वध करण्याची प्रतिज्ञा इथे भीमाने केली आणि कुरुक्षेत्राच्या युद्धात ती कोणाच्याही मदतीशिवाय पूर्ण करून दाखवली. मात्र अर्जुनाच्या प्रतीज्ञांकडे बघितलं तर असं दिसतं की त्याला प्रत्येक वेळी कृष्णाची मदत घ्यावी लागलेली दिसते. कर्ण वध, जयद्रथ वध इ. ५) इथे भीमाने सुद्धा शंभर कौरवांना कुठल्याही दैवी अस्त्रांनी मारलेले नाही. ६) डॉ. प. वि. वर्तक यांच्या मते, भीमाने रणांगणावर प्रत्यक्ष युद्धात कर्णाला जवळजवळ ३१ वेळा जीवदान दिले. केवळ अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण व्हावी यासाठी. कर्ण प्रत्येक वेळी भीमाला पाठ दाखवून पळत सुटला. अर्थात भीमाने कर्णाला धनुर्विद्येत सुद्धा हरवले असा याचा अर्थ होतो. ते ही ३१ वेळा. (इथे डॉ. प. वि. वर्तक यांनी महाभारतातले दाखले त्या पुस्तकात दिलेले आहेत.) ७) अज्ञातवासात असताना, पाचही पांडव आणि द्रौपदी एकाच ठिकाणी म्हणजे विराट राजाच्या दरबारी राहत असताना जेव्हा कीचकाने द्रौपदीशी लंपटपणा केला तेव्हा द्रौपदीने ईतर कोणाच्याही कानावर न घालता केवळ भीमाला जाऊन सांगितले. अगदी अर्जुनाला सुद्धा तिला हे सांगावेसे वाटले नाही. म्हणजे तिचाही विश्वास सर्वात जास्त भीमावर च होता हे लक्षात येते. पुढे भीमाने कीचकाला हातांनीच अगदी अमानुष पद्धतीने मारले आणि त्यानंतर द्रौपदीला पळवून नेणाऱ्या शंभर अनुकीचाकांना सुद्धा पाठलाग करून मारले. यातला प्रत्येक अनुकीचक हा किचकाच्याच ताकदीचा होता. इथे भीमाने अक्षरश:मोठमोठाले वृक्ष उपटून ह्या सर्वांना मारल्याचे वर्णन महाभारतात आहे. ८) कुरुक्षेत्रावर सुद्धा प्रतिस्पर्धी पक्षाचा सर्वात जास्त संहार एकट्या भीमाने केलेला दिसतो. तो ही कुठल्याही अस्त्राविद्येशिवाय. ९) कुंती ला सुद्धा सर्वांपेक्षा जास्त भीमाच्याच ताकदीवर विश्वास होता असा दाखला सुद्धा त्या पुस्तकात दिला आहे. १०) सर्वात महत्वाचे- कृष्णाने गीता सांगण्यासाठी केवळ अर्जुनाचीच निवड का केली? युधिष्ठीर किंवा भीम यांना गीता सांगावी असे त्याला का वाटले नाही ? कारण गीतेचे तत्वज्ञान त्या दोघांनाही बहुतांश प्रमाणात माहित होते. दयूत प्रकरणात गीतेत सांगितलेले तत्वज्ञान ऐकवत भीमाने युधिष्ठिराची कानउघडणी केल्याचा एक प्रसंग इथे वर्तकांनी सांगितलेला आहे. थोडक्यात भीम हा केवळ शक्तीत नाही तर बुद्धीतही श्रेष्ठ होता. त्यामुळे हे महाभारतातले एक अतिशय महत्वाचे पात्र म्हणून म्हणायला हवे. कर्ण आणि अर्जुनापेक्षाही महत्वाचे.
  • Log in or register to post comments

नक्कीच भीम हे एक महत्वाचे आणी

मृत्युन्जय
Sat, 04/02/2016 - 12:28 नवीन
नक्कीच भीम हे एक महत्वाचे आणी रोचक पात्र आहे. मात्र लेखाचा मुख्य उद्देश सर्वात महत्वाच्या पात्रांवर लिहायचा नसून मर्यादित गोष्टींवरील राजकीय दृष्टीकोनाचे विवेचन करायचा असल्याने भीमाचा उल्लेख केला नाही. राजकारणाच्या खेळात भीम हे एक फारच कच्चे पात्र होते हे नक्की. कर्ण आणि अर्जुन स्वतःदेखील राजकारणात फार निष्णात नव्हते. त्यामानाने दुर्योधन आणी कृष्ण फार पोचलेले राजकारणी होते आणि युधिष्टिराने फार मोठ्या प्रमाणावर राजकीय सूज्ञता दाखवली हे नक्की. मात्र दुर्योधन आणी कृष्ण यांच्यापेक्षा तो थोडा कच्चा होता राजकारणात. मात्र तो प्रचंड डिप्लोमॅटीक होता असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हकु

अजून एक मुद्दा

हकु
Fri, 04/01/2016 - 19:31 नवीन
अजून एक मुद्दा- भीमाबद्दल कोणीही कसलीही आवई उठवण्याच्या भानगडीत पडलं नाही कारण भीमाची ताकद सर्वांना परिचित होती आणि स्वतः भीम ती वेळोवेळी सिद्ध करून दाखवीत होता.
  • Log in or register to post comments

प्रश्नच नाही. कीचक वधाच्या

मृत्युन्जय
Sat, 04/02/2016 - 12:29 नवीन
प्रश्नच नाही. कीचक वधाच्या वेळची वर्णने तर भीषण आहेत. भीमाच्या अंगात अमानुष ताकद होती हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हकु

भिमाच्या ताकदीबद्दल शंकाच

अस्वस्थामा
Mon, 04/04/2016 - 16:53 नवीन
भिमाच्या ताकदीबद्दल शंकाच नाही. तरी पण त्याच्याबाबतीत जास्त अंगावर येणारी बाब त्याचं क्रौर्य. त्याचे बहुतेक पराक्रम अथवा सूड हे खूप रक्तरंजित आणि बीभत्स वाटावेत असे (आठवा जरासंध, कीचक, दु:शासन) आहेत. अमानुष ताकदीसोबतच अमानुष अशी क्रौर्यकर्मे करणारा म्हणून तरी तो लक्षात राहतो हे नक्की. (महाभारतातील इतर पात्रातले कोणी असे नसतील असं नव्हे पण भीमाचे असले पराक्रम अगदी चवीने रंगवले आहेत असं वाटतं.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ओके म्हणजे महाभारतातून सगळे

उगा काहितरीच
Fri, 04/01/2016 - 19:36 नवीन
ओके म्हणजे महाभारतातून सगळे चमत्कार वगैरे वजा करून त्यात आजच्या काळानुसार काही लॉजीक बसवायचे तर... चांगला प्रयत्न आहे. शुभेच्छा ! पण मग बरेचसे लूप होल्स राहतील साहेब. तुमच्या महाभारताच्या अभ्यासाबाबत जाणून आहे, पण काही विद्या , कला काळाबरोबर नष्ट पण झाल्या असतील ना. एक सोपे उदाहरण घ्यायचे तर त्याकाळात धनुष्य ज्या साधनांचा वापर करून बनवत असत ती कला आज नामशेष झाली असेल ना. ( अॉफकोर्स त्यापेक्षा ॲडव्हान्स बो असतील पण तसे धनुष्य तर आज नाही ना बनवू शकत कुणी) मे बी अशाच प्रकारे अस्त्रे वगैरे चं नॉलेज नष्ट झालं असु शकते.... . . .(प्रतिसाद विस्कळीत झाला आहे समजून घ्याल अशी आशा आहे.)
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.

प्रचेतस
Fri, 04/01/2016 - 19:45 नवीन
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख. बाकी दैवी अस्त्रे ही द्विरुक्ती झाली. :)
  • Log in or register to post comments

म्ह ण जे ?

अगम्य
Sat, 04/02/2016 - 00:29 नवीन
शस्त्रे मनुष्य निर्मित आणि अस्त्रे दैवी असे असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो.

प्रचेतस
Sat, 04/02/2016 - 04:48 नवीन
हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

अवांतर

अर्धवटराव
Sat, 04/02/2016 - 05:25 नवीन
अस्त्र म्हणजे संहारक फॉर्मुला म्हणावं काय? आज आपण ज्याला शस्त्रास्त म्हणतो त्यातला शस्त्र म्हणजे मेकॅनीकल असेम्ब्ली आणि अस्त्र म्हणजे जैवीक अस्त्र, रासायनीक अस्त्र या अर्थाने...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अस्त्र म्हणजे मंत्रांनी

प्रचेतस
Sat, 04/02/2016 - 06:22 नवीन
अस्त्र म्हणजे मंत्रांनी अभिमंत्रित केलेले शस्त्र. ते मुख्यत: बाणावरती स्थापित करता येई. प्रचंड संहारक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

व्हॉइस अ‍ॅक्टीवेटेड गायडेड

तर्राट जोकर
Sat, 04/02/2016 - 12:55 नवीन
व्हॉइस अ‍ॅक्टीवेटेड गायडेड मिसाईल लोडेड विथ वॉरहेड्स?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शस्त्र आणि अस्त्र

मिहिर
Sat, 04/02/2016 - 05:37 नवीन
धरून लढायचे ते शस्त्र आणि फेकून मारायचे ते अस्त्र असे नव्हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मग हे सुद्धा सांगा

समाधान राऊत
Fri, 04/01/2016 - 20:22 नवीन
संजयाने वेळोवेळी युद्धभुमी वरील घडलेल्या घटना राजवाड्यात ध्रुतराष्ट्राला कशा सांगितल्या ..याला लॅाजिक लावा बरे~
  • Log in or register to post comments

दोघेही उंच मनो-यावर बसले असतील.

बबन ताम्बे
Fri, 04/01/2016 - 20:40 नवीन
तिथून सगळे दिसत असेल. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत

दुर्बिणीचा शोध पण लावला असावा

मम्बाजी सर्वज्ञ
Fri, 04/01/2016 - 20:50 नवीन
दुर्बिणीचा शोध पण लावला असावा (कदाचित संजयनेच)?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

संजयाला दिव्य दृष्टि होती हे

प्रचेतस
Fri, 04/01/2016 - 21:33 नवीन
संजयाला दिव्य दृष्टि होती हे एक मिथक आहे. महाभारताचा सर्वच वृत्तांत संजय हा फ्ल्याशब्याक स्वरूपात सांगतो. सुरुवातीला पर्वाचा सारांश आणि नंतर धृतराष्ट्राने विस्ताराने हकीकत सांग अशी आज्ञा केली असता त्या त्या दिवसानुसार आदल्या दिवसाच्या वृत्ताचा विस्तार. शल्यपर्वाच्या शेवटी कौरवांचा पराभव होऊन उरलेसुरले कौरव प्राणभयाने पळत असतात त्यात संजय देखील असतो. तो धृतराष्ट्राला म्हणतो की जीवाच्या भितीने आम्ही पळत सुटलो. बाणांपासून बचावून कसा बसा जीव वाचवून आम्ही येथे परत आलो. संजयाला दिव्य दृष्टी वैगेरे काहीही नसून तो प्रत्यक्ष युद्धाच्या वार्तांकनासाठी युद्धभूमीवर प्रत्यक्ष हजर असे व् रात्री शिबिरात परत जात असे. दिव्यदृष्टी ही प्रक्षिप्त कथा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत

हो असे असेल खरे

अगम्य
Sat, 04/02/2016 - 00:34 नवीन
गीतेत सुद्धा श्री भगवान "उवाच" अर्जुन "उवाच" असा परोक्ष भूतकाळ वाचक प्रयोग केला आहे. साधा भूतकाळ किंवा live commentary सारखा वर्तमानकाळ नाही वापरलेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

संजय महाभारताच्या युद्धात

मृत्युन्जय
Fri, 04/01/2016 - 22:29 नवीन
संजय महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने लढला. युद्धाच्या महत्वाच्या टप्प्यांनंतर त्याने युद्धाचे वार्तांकन केले. इतकेच काय युद्धाच्या एका सत्त्रात तर चक्क ध्रुतराष्ट्र स्वतः चिलखत चढवुन युद्धभूमीवर हजर होता. अर्थात त्याने युद्ध लढले नाही. चिलखत केवळ संरक्षणापुरते असावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत

हे लॉजिक तर सेम

चांदणे संदीप
Fri, 04/01/2016 - 20:32 नवीन
हे लॉजिक तर सेम मला लहानपणी'च' डोक्यात आलेले. अजून कोणीच कसा असा विचार करत नाही याचेच मला तेव्हाही राहून राहून आश्चर्य वाटायचे. आज इथे हा लेख पाहिला आणि काही अंशी पटला. मीच एक लेख यावर लिहून काढायचा विचार करत होतो, नव्हे सुरुवातही झाली होती पण इथली धूळवड नको वाटत होती, आजही वाटते! त्यामुळेच इथेच प्रतिसादात थोड्या वेळात लिहितो. बीजी! :) वरती हकु यांचा प्रतिसाद आवडला. त्यावरही लिहितोच! म्हात्रेकाकांचा प्रतिसादही विषयाला धरून, उत्तमच. त्यांनी उल्लेखलेले पुस्तक वाचायचा योग मात्र आलेला नाही! उका यांचा प्रतिवाद आवडला....आलोच! तरी, सविस्तर प्रतिक्रिया थोड्या वेळाने देतोच! स्टे टयून्ड! Sandy
  • Log in or register to post comments

छान विषय

Jack_Bauer
Fri, 04/01/2016 - 20:42 नवीन
हा खूपच इंटरेस्टिंग विषय आहे. ह्यात सूर्यग्रहण आणि जयद्रथ हि घटना देखील सांगता येईल.
  • Log in or register to post comments

महाभारत असा ग्रंथ आहे, त्यात

विवेकपटाईत
Fri, 04/01/2016 - 20:54 नवीन
महाभारत असा ग्रंथ आहे, त्यात प्रत्येकाला त्याचा दृष्टीकोनातून काहीना काही सापडतेच. भैरप्पाचा पर्व आणि वासुदेव नायर यांचा दुसरा पांडव हे हि वाचण्यासारखे आहेत. या शिवाय हिंदीत राम कुमार भ्रमरचे हि महाभारतावर आधारित पूर्ण पुस्तकांची सिरीज आहे. ती हि वाचून पहावी. प्रत्येकवेळी काही अलग आणि निराळे अनुभव मिळतील. खर म्हणाल तर महाभारत हा एक मोठा महासागर आहे. आजची राजनीती हि महाभारतात पाहता येते.
  • Log in or register to post comments

दुर्याधनाला जेवढे वाईट समजले

हेमंत लाटकर
Fri, 04/01/2016 - 21:17 नवीन
दुर्याधनाला जेवढे वाईट समजले जाते तेवढा वाईट नसावा असे वाटते. तो चंगला राजा होता. हस्तिनापुरातील जनता सुखी समाधानी होती. पांडवांना राज्य मिळवून देण्यासाठी दुर्याधनाची जास्तीत जास्त वाईट प्रतिमा निर्माण केली गेली. यात कृष्णनितीच होती.
  • Log in or register to post comments

आपल्याला दुर्योधनावर लिहिलेला

मृत्युन्जय
Sat, 04/02/2016 - 13:20 नवीन
आपल्याला दुर्योधनावर लिहिलेला हा लेख कदाचित आवडेल - http://www.misalpav.com/node/26927
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

रोचक लेख--काही प्रश्न

गॅरी ट्रुमन
Fri, 04/01/2016 - 21:31 नवीन
रोचक लेख. पण काही गोष्टी नाही पटल्या. विशेषत: पत्त्याच्या चॅलेन्ज या खेळात चालते त्याप्रमाणे (चार राजे, उपर चार, उसके उपर और दो वगैरे) एकामागोमाग दुसरी चढवून सांगितलेल्या आवया पसरवणे हा मुद्दा विशेष पटला नाही. जर कर्ण कुठल्याकुठल्या लढायांमध्ये जखमी झाला असेल तर मुळात त्याच्याकडे कुठलेही कवच वगैरे नव्हते हे कोणालाच कसे समजले नाही?म्हणजे दुर्योधनाने त्याच्या राजकारणाच्या सोयीसाठी ही आवई उठवली हे जरी मान्य केले तरी त्याविरूध्द लक्षणे सामोरी येऊनही (कर्ण जखमी होणे) सगळ्यांनी विश्वास कसा ठेवला? तीच गोष्ट नसलेली कवचकुंडले कर्णाने दान केली ही आवई उठवली गेली त्याविषयी. जर दुर्योधनाने कर्णाकडे कवच कुंडले आहेत ही आवई उठवली असेल आणि कृष्णाने ती कवच कुंडले गेली ही त्याविरूध्द आवई उठवली असेल तर त्याचे खंडन करायचा दुर्योधन-कर्णाकडून काही प्रयत्न कसा झाला नाही? तिसरे म्हणजे इंद्राने कर्णाला कोणालाही मारता येईल असे अमोघ शस्त्र दिले अशी आवई उठवली गेली असली तरी घटोत्कचाला मारण्यासाठी "त्या अमोघ शस्त्राचा" वापर न करताच कर्णाने आपले काम केले अशीही आवई उठवता येणे कितपत कठिण होते? आणि घटोत्कच युद्धात धुमाकूळ घालत असताना "याच्या तावडीतून वाचलो तरच अर्जुनाकडे बघून घेता येईल तेव्हा अर्जुनासाठी ते अमोघ अस्त्र ठेवले असलेस तरी ते आताच घटोत्कचाविरूध्द वापर" असा आग्रह दुर्योधनाने कर्णाकडे धरला होता असे मी वाचलेल्या महाभारताच्या पुस्तकात होते. जर मुळात असे कुठलेच अमोघ अस्त्र नसेल तर दुर्योधनाने असा आग्रह धरायची तर्कसंगती लागत नाही.
  • Log in or register to post comments

जन्मजात कवचकुंडले व

प्रचेतस
Fri, 04/01/2016 - 21:40 नवीन
जन्मजात कवचकुंडले व सूर्याद्वारे इंद्रापासून सावध राहण्यास सांगणे व इंद्रहस्ते त्याचे कपटाने हरण ह्या सरळ सरळ मागाहून घुसडलेल्या गोष्टी आहेत. कर्णास त्याचे जन्मरहस्य कृष्णाकडून शिष्टाइचे वेळेस कळते. कवचकुंडल हरण प्रकार आधीचा आहे. इंद्रहस्ते मात्र कधीतरी त्याला शक्ती मिळाली असावी हे मात्र मूळ संहितेत असेल असे वाटते. बाकी महाभारत (आणि रामायणातही) जेव्हढे म्हणून परशुरामाचे उल्लेख आहेत ते सर्व प्रक्षिप्त आहेत. इसपू २०० ते इस २०० ह्या दरम्यानचे हे मूळ कथांवरचे हे भार्गवी संस्करण आहे. ह्यानंतरचे कृष्णाचे भगवंतात झालेले संस्करण हे गुप्त काळात झालेले. भार्गवी आणि गुप्त संस्करणे महाभारतात सर्वात मोठी संस्करणे मानली जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

१. कर्ण अनेक लढायांमध्ये जखमी

मृत्युन्जय
Sat, 04/02/2016 - 12:24 नवीन
१. कर्ण अनेक लढायांमध्ये जखमी झाला हे तर वरती नमूद केलेच आहे. द्रौपदी स्वयंवर, विराट युद्ध आणि घोषयात्रा ही त्यातली काही उदाहरणे. कवच कुंडले असताना तो जखमी कसा झाला हा प्रश्न त्यामुळे अनुत्तरितच राहतो. २, कर्णाने शक्ती वापरलीच नाही अशी आवई उठवता आलीही असती. पण कृष्णाने मुख्य म्हणजे जो नाटकीपणा केला त्यामुळे पांडव सैन्याचे मनोधैर्य नक्कीच उंचावले असावे. या सगळ्या खेळ्या अश्याही प्रतिस्पर्ध्ह्यावर मानसिक विजय मिळवण्यासाठी होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

तोच मुद्दा

गॅरी ट्रुमन
Sat, 04/02/2016 - 12:45 नवीन
कवच कुंडले असताना तो जखमी कसा झाला हा प्रश्न त्यामुळे अनुत्तरितच राहतो.
तोच तर मुद्दा आहे. जर कर्ण जखमी झाला तर त्याच्याकडे कवचकुंडले वगैरे काही नाही हे कोणाच्याच लक्षात न येता सगळ्यांनी या आवईवर विश्वास ठेवला हे अविश्वसनीय वाटते. अशी आवई उठविणे हे राजकारणाच्या सोयीसाठी केले असेल हे समजू शकतो. पण समजा त्या आवईच्या विपरीत असे काही घडले तर मात्र मुळातल्या त्या आवईतच काही दम नाही हे लक्षात येऊन त्या आवईचा उलटा परिणाम व्हायला हवा. एक उदाहरण द्यायचे झाले तर क्रिकेट संघात घेतलेला नवा खेळाडू सचिन+ब्रॅडमन+लारा इत्यादींचे कॉम्बिनेशन आहे ही आवई संघातील इतर खेळाडूंचे मनोबल उंचावावे म्हणून उठवली असे समजू. पण हा खेळाडू जर गल्लीत बॉलिंग करणार्‍या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कधी तोंडही न बघितलेल्या बॉलरकडून दोनचार वेळा सहज आऊट झाला तर त्या आवईत काही अर्थ नाही हे इतर खेळाडूंच्या लक्षात यायला किती वेळ लागणार? कर्ण जर जखमी झाला असेल तर नेमके असेच काहीतरी झाले नाही का?तरीही सगळ्या जगाने या आवईवर विश्वास ठेवला, इतकेच नव्हे तर कृष्णानेही ती कवचकुंडले गेली अशी उलटी आवई उठवली हे सगळे कसे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

पण हा खेळाडू जर गल्लीत बॉलिंग

मृत्युन्जय
Sat, 04/02/2016 - 14:32 नवीन
पण हा खेळाडू जर गल्लीत बॉलिंग करणार्‍या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कधी तोंडही न बघितलेल्या बॉलरकडून दोनचार वेळा सहज आऊट झाला तर त्या आवईत काही अर्थ नाही हे इतर खेळाडूंच्या लक्षात यायला किती वेळ लागणार? तसे झालेले दिसत नाह्ही. कर्ण एक धनुर्धर म्हणुन नि:संशय श्रेष्ठ होता. तो तुम्ही म्हणाता त्याप्रमाणे गल्लीतल्या खेळाडुंकडुन हारलेला दिसत नाही. अर्जुनाशी जेव्हा जेव्हा त्याचा सामना झाला तेव्हा तेव्हा तो एकतर्फी झाला असे म्हणवत नाही. अपवाद विराट युद्धाचा. त्यात अर्जुनाने त्याच्यापेक्षा सरस मानल्या गेलेल्या द्रोण आणी भीष्मांना देखील धूळ चारलेली दिसते. अगदीच उदाहरण द्यायचे झाल्यास अर्जुन जर सचिन तेंडुलकर असेल त्तर कर्ण कदाचित जॅक कलिस होता. तो जितका श्रेष्ठ धनुर्धर होता तितकाच श्रेष्ठ मल्ल देखील होता. मल्लयुद्धात भीम जरासंधाला ९ / १८ दिवस हारवु शकला नव्हता तिथे तीच करामत कर्णाने एका दिवसात करुन दाखवल्याचे दिसते. अंतिम युद्धात कर्णाने सात्यकी सोडुन इतर सर्वांना कधी ना कधी हरवले आहे. अर्जुन देखील त्याच्या बाणांनी विद्द्ध होउन बेशुद्ध पडलेला असतानाच कर्णाने रथचक्र जमिनीतुन बाहेर काढण्यासाठी खाली उडी मारली. त्यामुळे त्यातही तो अगदी कमकुवत होता असे मानण्यास वाव नाही. शिवाय दिग्विजयात त्याने यादव सोडुन सगळ्यांनाच नमवलेले दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

उत्तम विवेचन

तिरकीट
Fri, 04/01/2016 - 21:36 नवीन
म्हात्रे साहेबांनी उल्लेखलेले युगांत नक्कीच वाचनीय आहे. नुकतीच इपिक वाहीनीवर आलेली 'धर्मक्षेत्र' ही मालिकाही आवडली.
  • Log in or register to post comments

रोचक लेख आणि काही प्रतिसाद.

अजया
Fri, 04/01/2016 - 22:39 नवीन
रोचक लेख आणि काही प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

छान विवेचन मृत्युंजय!

बोका-ए-आझम
Fri, 04/01/2016 - 23:13 नवीन
एक उत्सुकता - कर्ण हा सूर्यपुत्र आणि अर्जुन हा इंद्राचा पुत्र, नकुल आणि सहदेव हे अश्विनीकुमारांचे पुत्र - याकडे कसे पाहता तुम्ही? दुर्योधनाने पांडवांना राज्यात वाटा द्यायला नकार देण्यामागे त्यांचे जन्म संशयास्पद असल्याचा काही भाग असेल का?
  • Log in or register to post comments

पाचही पांडव तर सरळ सरळ

मृत्युन्जय
Sat, 04/02/2016 - 12:16 नवीन
पाचही पांडव तर सरळ सरळ नियोगाने जन्माला घातलेले आहेत. जसे धृतराष्ट्र, पांडु आणी विदुर जन्मले तसेच. ते औरसपुत्र नसल्याचा मुद्दा दुर्योधनाने उचलला होताच. त्यावेळेस विदुराने अथवा नारदांनी त्याला त्याच्या बापाच्या जन्माची उकल करुन सांगितली आणी मग त्या हिशोबाने भीष्म वगळता कोणाचाच राज्यावर हक्क उरत नाही हे दाखवुन दिले. त्यामुळॅ मग नंतर हा मुद्दा चर्चिलेला गेलेला दिसत नाही. शिवाय तसे बघता कौरवांचा जन्म देखील सरळ साध्या गर्भधारणेने झालेला दिस नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

नाय हो...

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 04/02/2016 - 12:31 नवीन
शिवाय तसे बघता कौरवांचा जन्म देखील सरळ साध्या गर्भधारणेने झालेला दिस नाही :) कौरवांचा जन्म देखील सरळ साध्या गर्भधारणेनेच झालेला दाखविला आहे (पक्षी, द्रोणातून वगैरे नाही). मात्र ती गर्भधारणा सरळ साध्या प्रथेने झाली नसावी असे म्हणायला जागा आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

पाचही पांडव तर सरळ सरळ

Anand More
Sat, 04/02/2016 - 16:49 नवीन
पाचही पांडव तर सरळ सरळ नियोगाने जन्माला घातलेले आहेत. जसे धृतराष्ट्र, पांडु आणी विदुर जन्मले तसेच.
नियोगाबद्दल माझ्याकडे थोडी वेगळी माहिती होती. आता समोर संदर्भ ग्रंथ नाही आहे पण जेव्हढे आठवतेय तेव्हढे लिहितो. पतीच्या परवानगीने केवळ अपत्यप्राप्तीसाठी नियोग शास्त्र संमत होता. तो देखील पतीच्या भावाशी किंवा पतीने निवडलेल्या ब्राह्मणाशी. त्यात देखील त्या परपुरुषाबद्दल शारीर आकर्षण राहणार नाही याची काळजी घेतली जात असे. एका अपत्य प्राप्तीनंतर दुसऱ्या अपत्यासाठी नियोग शास्त्र संमत नव्हता. त्या न्यायाने धृतराष्ट्र आणि पंडू यांचा राज्यावरचा अधिकार शास्त्रसंमत होता. धृतराष्ट्र अंध असल्याने आणि राजा अव्यंग हवा या अटीमुळे तो ज्येष्ठ असूनही अपात्र ठरला. आणि राज्य पंडू कडे गेले. पंडू निपुत्रिक होता. तो राज्य सोडून पत्नीसहीत वनात गेला होता. वडिलधारे जवळ नसताना, त्यांची संमती घेतली नसताना, राजप्रासादापासून दूर, वनात, शारीरिक दृष्ट्या असमर्थ पंडूने, एका अपत्य प्राप्तीनंतरही घडू दिलेला नियोग शास्त्र संमत कसा? आणि अश्या अशास्त्रीय नियोगातून जन्मलेल्या मुलांचा अधिकार योग्य की मूळच्या ज्येष्ठ परंतु अव्यंग राजाच्या स्वअपत्याचा अधिकार योग्य ? हा खरा महाभारताचा प्रश्न आहे. यावर त्याकाळातील समजूतीप्रमाणे भीष्म, द्रोण आणि बहुसंख्येने राजे (अगदी माद्रीचा भाऊ शल्य, म्हणजे पांडवांचा मामा सुद्धा) दुर्योधनाच्या बाजूने उभे राहतात . पांडवांना राज्यात दिलेला प्रवेश हा मानवतेच्या कारणाने दिलेला होता. आणि त्यांना मिळालेला पाठींबा इतर राजांच्या सूडाच्या राजकारणाचा भाग होता. असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सहमत

lgodbole
Sat, 04/02/2016 - 22:48 नवीन
बहुतेक नियोग ३ अपत्यासाठी अलाउड होता... एक देवाला , एक देशाला , एक आईबापाला..... कुंतीकडे चौथ्या अपत्याची पंडुने मागणी केल्यावर म्हणुनच कुंती पुढची अपत्ये माद्रीकडुन घ्यायला सांगते. .... राजा अव्यंग असावा असा संकेत होता. लिखित नियम नव्हे... एकदा ध्रूतराष्ट्राने राज्य व्यवस्थित संभाळल्यावर तो नियम पुन्हापुन्हा मध्ये आणायचे कारण नव्हते. .... कुंतीने मोठ्या लबाडीने आधी अश्रित म्हणुन स्वतःची मुले मोठी करुन घेतली व नंतर डाव साधला. शापानंतर जंगलात गेल्यावर जो पंडू राज्याकडे फिरकलाही नव्हता तो व पांड्व प्रजेची सहानुभुती गिळुन बसले व शक्य तितके पण सुंदरयेने राज्य संभाळलेला धृतराष्ट्र मात्र प्रजेचा रोष व उपहास यांचा मानकरी ठरला. .... भारतीय ( हिंदु ? ) जनता आजही तशीच आहे. धृतराष्ट्र = आमची काँग्रेस पंडू = तुमची बीजेपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

एक नम्र विनंती: प्लिज या

उगा काहितरीच
Sat, 04/02/2016 - 22:57 नवीन
एक नम्र विनंती: प्लिज या धाग्यावर तरी आपले अनमोल विचार मांडू नका . आम्हा पामरांना इथल्या चर्चेतून महाभारताविषयी थोडीफार माहिती मिळत आहे ती मिळू द्या .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lgodbole

तीव्र सहमती. कृपया आता इथे

तर्राट जोकर
Sat, 04/02/2016 - 23:13 नवीन
तीव्र सहमती. कृपया आता इथे राजकारण आणून घाण करु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

..

lgodbole
Sat, 04/02/2016 - 23:54 नवीन
व्यासोच्छिष्टं जगत सर्वम . आमचा काय दोष ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

नियोगासाठी निवडला जाणारा

मृत्युन्जय
Mon, 04/04/2016 - 11:41 नवीन
नियोगासाठी निवडला जाणारा पुरुष उच्चकुलीन आणि सदवर्तनी असावा अशी व्यवस्था केली जायची. आजही कृत्रिम गर्भधारणा करताना लोक तश्या पएक्षा करतात तर त्या काळी तर तसा नियम असणे स्वाभाविकच आहे. नियोगातुन जन्मलेली अपत्ये ही त्या स्त्रीच्या नवर्‍याची समजली जायची (मग तो जिवंत असो अथवा मृत). नियोगाद्वारे अपत्यप्राप्तीचा निर्णय अगदी थोरामोठ्यांच्या मतानेच घेतला जायचा असे नाही तर बर्‍याचदा दांपत्य स्वतःही तो निर्णय घ्यायचे किंवा अशीही उदाहरणे आहेत की "नवर्‍याच्या भल्याकरता " पत्नीनेच परस्पर नियोगाद्वारे अपत्य्प्राप्ती करुन घेतली. पुत्रप्राप्तीशिवाय स्वर्गप्राप्ती होउ शकत नाही असा समज असल्याने पांडुला पुत्रप्राप्ती करुन घेण्याचा मोह आला. त्याला मिळालेल्या शापामुळे तो स्वतः ते करु शकत नाही हे माहिती असल्याने त्याने कुंतीला नियोगाद्वारे पुत्रप्राप्ती करुन घेण्याची गळ घातली. त्या आधी त्याने काही ऋषीमुनींशी चर्चा करुन हे योग्य असल्याची खात्री करुन घेतली होती. महाभारतातील वर्णनानुसार असे दिसते की अर्जुनाच्या जन्माच्या आधीदेखील पांडुने विद्वज्जनांशी संवाद साधुन तिसर्‍या अपत्यप्राप्तीसाठी मार्गदर्शन घेतले होते. त्यावरुन असे दिसते की नियोगाद्वारे एकापेक्षा अधिक अपत्यप्राप्ती शास्त्रसंमत होती. कुंतीपासुन ३ मुले झाल्यावर देखील पांडुला अधिक पुत्र हवे होते पण कुंतीने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. पती व्यतिरिक्त ३ पेक्षा अधिक लोकांशी संभोग करणार्‍या स्त्रिया वेश्या गणल्या जातात त्यामुळे याहुन अधिक पुत्रांना मी नियोगाद्वारे जन्म देणार नाही असे तिने ठणकावुन सांगितले (खरे बघता सुर्य धरुन ही संख्या आधीच ३ पेक्षा जास्त झालीए होती). यादरम्यान माद्रीला देखील पुत्रप्राप्तीची इच्छा होतीच. तिइने पांडुला विनंती करुन देवांना आमंत्रित करण्याचा एक मंत्र कुंतीकडून शिकुन घेतला आणी पहिल्याच प्रयत्नात जुळ्या अश्विनीकुमारांकडुन २ पुत्रांची प्राप्ती करुन घेतली. कुंतीने यावरुन असा ग्रह करुन घेतला की असे जर ३ प्रयत्न माद्रीनेदेखीले केले तर तिच्या मुलांची संख्या माद्रीपेक्षा कमी होइल (आणी मग अर्थातच तिचा वरचष्मा कमी होइल) म्हणुन तिने त्याहुन जास्त मंत्त्र माद्रीला देण्यास स्पष्ट नकार दिला आणि पांडुच्या मुलांची संख्या ५ वर मर्यादित राहिली. राज्यावरचा दावा कुणाचा ह प्रश्न तर महत्वाचा खराच. पांडु हा अभिमंत्रित राजा होता तर धृतराष्ट्र हा त्याचा प्रतिनिधी होता. पांडु राज्य सोडुन गेलाच नव्हता तर तो केवळ काही काळासाठी त्याचे राज्य धृतराष्ट्रच्या अधिपत्याखाली सोडुन गेला होता असे पांडवाच्या समर्थकांचे म्हणणे होते तर राज्य सोडुन गेलेला पांडु मृत्युपर्यत परत आलाच नाही आणी मग राज्य धृतराष्ट्रानेच सांभाळले, तो असाही ज्येष्ठ होता तर त्या अधिकाराने राज्य दुर्योधनाचेच असे कौरव समर्थकांचे म्हणणे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

मृत्युन्जय सर

चांदणे संदीप
Mon, 04/04/2016 - 12:06 नवीन
कुंतीने यावरुन असा ग्रह करुन घेतला की असे जर ३ प्रयत्न माद्रीनेदेखीले केले तर तिच्या मुलांची संख्या माद्रीपेक्षा कमी होइल (आणी मग अर्थातच तिचा वरचष्मा कमी होइल) म्हणुन तिने त्याहुन जास्त मंत्त्र माद्रीला देण्यास स्पष्ट नकार दिला आणि पांडुच्या मुलांची संख्या ५ वर मर्यादित राहिली.
With all due respect... हे आजिबातच पटले नाही! प्रत्येक अपत्यप्राप्तीसाठी वेगवेगळा मंत्र लागत होता ह्याला काही आधार आहे का? Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा