✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी

म
मृत्युन्जय यांनी
Fri, 04/01/2016 - 17:46  ·  लेख
लेख
नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली. साधारण महाभारताच्या कथेतल्या या २ नायकांच्या सूडाच्या प्रवासातील मुख्य टप्पे सगळ्यांनाच ज्ञात आहेत. कर्ण आणी अर्जुन एकाच आईची दोन मुले दैवगतीने वेगवेगळ्या ठिकाणी वाढले. त्यापैकी अर्जुन उच्च्कुलीन राजपुत्र म्हणून वाढल्याने त्याला साक्षात गुरु द्रोणांकडुन सर्व दैवी अस्त्रांचे आणि शस्त्रांचे ज्ञान मिळाले तर कर्ण एक सूतपुत्र म्हणुन वाढल्याने त्या ज्ञानापासून वंचित राहिला मात्र द्रोणाचार्यांच्या आश्रमातच राहुन त्याने शस्त्रास्त्रांचे उत्तम ज्ञान मिळवले आणि धनुर्विद्येत प्राविण्य मिळवले पण सर्व प्रकारे लायक असुनही केवळ प्रचलित जातिव्यवस्थेमुळे एका ठराविक मर्यादेपलीकडे ज्ञान न मिळवु शकल्याने त्याला दैवी अस्त्रांपासून वंछित रहावे लागले जी त्याने नंतर परशरामांकडुन फसवणुकीने मिळवले आणी त्याच्मुळे त्याचा घात झाला. पण या सर्व घटनाक्रमामागचे जबरदस्त राजकारण कधी कोणी समजुन घ्यायचा प्रयत्न करताना दिसत नाही. कर्ण आणि अर्जुन या दोन व्यक्तिरेखांच्या आडुन दुर्योधन आणि कृष्ण या दोन राजकारण्यांनी जे अप्रतिम राजकारण खेळले त्याच्या विवेचनासाठी हा खटाटोप. महाभारत आपण नेहमीच एका साचेबद्ध रितीने पाहतो आणि ते बरोबरही आहे कारण तसे न केल्यास ते मूळ कथाबीजाला आव्हान देण्यासारखे होइल. पण थोडा वेळ त्यातील सर्व दैवी घटना आणि संगती बाजूला करुन बघितल्यास मानवी भावभावनांचे अगणित कंगोरे सामोरे येतील. दैवी अस्त्रे, कृष्णाचे देवत्व, देवांचे अस्तित्व आणि दैवी चमत्कार या संदर्भाकडे दुर्लक्ष केल्यास कृष्ण आणि दुर्योधन यांच्या राजकारणाचे द्वंद्व दिसुन येइल. त्यामुळे फक्त या लेखापुरत्या या सगळ्या गोष्टींना मी फाटा दिला आहे आणी हे लक्षात ठेउनच कृपया हा लेख वाचावा. जर दैवी अस्त्रांचे अस्तित्वच अमान्य केले तर हे लक्षात येइल की द्रोणाचार्यांनी त्यांच्या सर्वच शिष्यांना केवळ युद्धकलेत आणि युद्धशास्त्रात प्रवीण केले होते. यात कदाचित रासायनिक शास्त्रावर आधारित अस्त्रे असु शकतील जी त्यांनी काही ठराविक लोकांना शिकवली ज्यांचा उपयोग कदाचित " सर्वसंहारक अस्त्रे " म्हणुन होउ शकत होता पण एकास एक युद्धात कदाचित ही अस्त्रे निरुपयोगी होती. हे गृहीतक मान्य केल्यास एकल्व्याची कथा देखील अजुन जास्त समजुन घेता येइल. जर अर्जुनाकडे इतकी सगळी संहारक अस्त्रे होती की जी एकास एक युद्धात देखील वापरता येत होती तर द्रोणाचार्यांच्या मनात तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होइल की नाहीए याबाबत शंका असण्याचे कारण नव्हते. पण धनुर्विद्येतली एकलव्याची प्रगती आणी कौशल्य बघता त्यांना त्याबद्दल भय उत्पन्न झाले याचाच दुसरा अर्थ असा होतो की कदाचित दैवी अस्त्रे असा काही प्रकार नव्हताच. होत्या त्या सगळ्या अफवा. त्यामुळेच कर्णाकडे दैवी अस्त्रे नाहित हे माहिती असुनही दुर्योधनाला त्याच्यात अर्जुनाचा प्रतिस्पर्धी दिसला. युद्धकलेत आणि धनुर्विद्येत अर्जुनाचा उतारा कौरवांकडे नव्हता आणि त्यामुळॅच पहिली संधी मिळताच दुर्योधनाने कर्णाला आपल्या जाळ्यात ओढले. दुर्योधनाच्या गुणाग्राहकतेचा आणी राजकीय दूरदृष्टीची ही पहिली चुणूक होती. या वेळी तरी युधिष्ठिराकडे त्या राजकीय कुवतीवर उतारा नव्हता आणी सर्वंकष राजकीय पटलावर कृष्णाचा उगम होइस्तोवर युधिष्ठिर विदुराच्या राजकारणीय कौशल्यावर विसंबुन तरलेला दिसतो. अर्जुनाकडे दैवी अस्त्रे आहेत आणी कर्णाकडे ती नाहित हे जेव्हा कंठशोष करुन सांगितले जात होते त्याच्याच आसपास कधीतरी दुर्योधनाने कर्णाकडे दैवी अस्त्रे नसली तरी जन्मजात दैवी कवच आणी कुंडले आहेत अशी आवई उठवुन दिली असावी आणि ही नि:संशयपणे एक आवईच होती असे म्हणण्यास वाव आहे. कर्णाचे जन्मजात दैवी कवच भेदुन कुठलेही अस्त्र किंवा शस्त्र त्याला इजा पोचवु शकत नाही हे सत्य असल्यास द्रौपदी स्वयंवरामध्ये, गंधर्व युद्धात आणि विराट युद्धात त्याला इजा कश्या झाल्या याचे काही स्पष्टीकरण मिळु शकत नाही. शिवाय जर कर्णाकडे दैवी कवच कुंडले होती तर ती एक असामान्य घटना होती आणि अश्या असामान्य माणसाबद्दल परशुरामांना काही माहिती नव्हती हे संभवत नाही. त्यामुळे कर्णाचे अभेद्य कवच आणि कुंडले अस्तित्वातच नव्हती हे मानायला वाव आहे. अशी आवई उठवल्याने कर्ण अर्जुनापेक्षा सरस, प्रबळ आणि अजेय आहे अशी भावना सैन्यात पसरवण्यात दुर्योधन यशस्वी झाला आणि त्यामुळे सैन्याचे आणी कौरवपक्षाचे मनोधैर्य वाढले असावे. दुर्योधनाने राजकारणाच्या पटावरचे अजुन एक घर या खेळीमुळे सर केले. दुसरीकडे द्रोणाचार्यांनी न शिकवलेली विद्या आणी कौशल्य कर्णाने परशुरामांकडुन हस्तगत केली असावी परंतु हे करताना त्याने यच्चयावत सर्व दैवी अस्त्रे परशुरामांकडुन शिकुन घेतली आहेत अशी आवई उठवण्यात दुर्योधन यशस्वी झालेला दिसतो. द्रोणाचार्यांना दैवी अस्त्रे परशुरामांनी शिकवली होती त्यामुळे अर्जुनाच्या गुरुंच्या गुरुंकडुन दैवी अस्त्रे शिकलेला महान धनुर्धर म्हणुन कर्णाची जाहिरात करण्याची संधी दुर्योधन दवडेल असे वाटत नाही. दुर्योधनाने अजुन एक पॉईंट सर केलेला दिसतो. त्यानंतर त्याच्या या तंत्राला त्याच्यावरच उलटवण्याचा यशस्वी प्रयत्न कृष्णाने केलेला दिसतो. त्याने दुर्योधनावर कडी करत अशी आवई उठवलेली असावी की अर्जुनाने तर सर्वच देवांकडुन दैवी अस्त्रे मिळवली (परशुराम काय चीज आहे) आणी भरीस भर म्हणुन त्याने देवाधिदेव शंकराचा कृपाप्रसाद ग्रहण करुन त्यांच्याकडुन अस्त्रांमध्ये सर्वोच्च स्थानी असलेले पाशुपत अस्त्र थेट शिवाकडुन मिळवले. अजुन एक ब्राउनी पॉइंट सर करताना या सग्ळ्या कथेला कर्णाला (न) मिळालेल्या शापांची फोडणी दिली गेली आणी अशी अफवा पसरवली गेली की कर्ण ऐनवेळी त्याचे ब्रह्मास्त्र विसरेल असा शाप परशुरामांनी दिला आहे तर कर्णाचे रथचक्र युद्धाच्या ऐन ध्मश्चक्रीत चिखलात घुसेल असा शाप त्याला ब्राह्मणाने दिलेला आहे. यानंतर कर्णाला पुरते निष्प्रभ करण्यासाठी पुढची चाल खेळली गेली असावी आणि कुठल्याश्या ब्राह्मणाला पुढे करुन कर्णाकडे कधी नसलेले कवच आणी कुंडल त्याने त्या ब्राह्मणाला म्हणजे इंद्राला दान केली अशी आवई उठवली गेलेली दिसते. लोकांना दाखवण्यापुरता हा बनाव कदाचित खरेच घडवुन आणला गेला असाबा आणि घेणार्‍याला आणी देणार्‍याला दोघांनाही त्यातला फोलपणा जाणवला असावा पण त्यामुळे सैन्यावर मोठा दुष्प्रभाव पडु शकतो. झालेल्या या नुकसानीची भरपाई करण्यासाठी कौरवांनी अजुन एक आवई उठवुन दिली की कर्णाच्या दानशूर पणावर प्रसन्न होउन इंद्राने त्याला अशी एक अमोघ शक्ती दिली आहे की ज्या योगे तो कुठल्याह्ही यौद्ध्याला मारु शकेल. या शेवटच्या अफवेवरचा उतारा कॄष्णाला घटोत्कचाच्या मृत्युत दिसला आणि एवढी दु:खद घटना घडलेली असतानाही त्या घटनेचे देखील सवतःच्या राजकीय फायद्यासाठी भांडवल करण्यात कृष्ण यशस्वी झाला. घटोत्कचाच्या मृत्युसरशी त्याने कर्णाची शक्ती वापरुन संपली आणी इंद्राकडे परत गेली अशी आवई उठवुन दिली. सर्व पांडव दु:खी असताना कृष्णाने मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने रथावर उड्या मारुन आपला आनंद व्यक्त करताना कर्णाने त्याची शक्ता गमावल्याची बातमी पसरवली. त्यामुळे घटोत्कचाच्या मृत्युने मनोबल गमावलेल्या पांडव सैन्याला उलट आता अर्जुनाचा मार्ग निर्धोक झाला असे मानुन मनातली सर्व मरगळ झटकुन युद्ध करण्यास आधारच मिळाला. यामुळेच कदाचित अर्जुनाचे देखील मनोबल वाढले असावे. सैन्याचे तर नि:संशय वाढतेच. युद्धाच्या सतराव्या दिवशी कर्णाने शल्याला रथाचे सारथ्य करण्याची विनंती केली याचा कृष्णाने या सगळ्या घडामोडीत अचूक उपयोग करुन घेतला आणि शल्याने मोठ्या कौशल्याने कर्णाचा रथ वेगळा काढुन युद्धाभूमीवर चिखल साठला असेल अश्या ठिकाणी नेउन उभा केला. आणि मग "चिखलातुन चाक निघाले की सांग, मी येतो परत सारथ्य करायला" असे सांगुन शक्य चक्क निघुन गेला. त्या चिखलात चाक रुतलेले असताना सारथी सोडुन गेलेला असताना आणि रथ हलत नसताना केलेल्या त्या एकतर्फी युद्धात कर्णाला नि:शस्त्र असताना मारताना 'अखेरच्या युद्धात रथचक्र जमिनीत रुतण्याचा ' त्याला शापच होता असे सांगण्याचे नैतिक पाठबळ देखील कृष्णार्जुनाला त्या शापाच्या अफवेतुनच मिळाले. महाभारत युद्धात बहुतेक सगळ्या प्रमुख यौद्ध्यांचा अंत साध्या बाणांनीच झाला आहे. दैवी अस्त्राने सदगती प्राप्त झालेले फार थोडे. भीष्म साध्या बाणांनी शरपंजरी पडले. द्रोणांचा तलवारीने शिरच्छेद झाला, भूरिश्रवाचेही तेच, कर्ण साध्या अंजलिक बाणाने मारला गेला, दुर्योधन गदायुद्धात गेला, वृषसेन साध्या बाणाने मारला गेला, दृष्ट्यद्युम्न आणि युधामन्यु यांना तर अश्वत्थाम्याने हातानेच मारले. असे असताना अवास्तव महत्व दिल्या गेलेल्या दैवी अस्त्रांना आणि शक्तींना राजकारणाच्या पटावर मोहर्‍यांसारखे वापरुन कृष्ण आणि दुर्योधनाने राजकीय चातुर्याचे असीम प्रदर्शन केले असे मानण्यास वाव आहे. या सगळ्या खेळ्यांमध्ये कर्ण आणि अर्जुन या दोघांचा प्याद्यांसारखा मोठ्या खुबीने वापर केला गेला. ****************** तळटीपा: १. वरचे विवेचन हे माझे मत झाले. महाभारताच्या मुख्य कथेत सगळ्या दैवी घटना, व्यक्ती आणी शक्तींचा उल्लेख केला गेला आहे. जर या सर्व गोष्टींचे दैवी आवरण अथवा अस्तित्व अमान्य करायचे झाले तर या सगळ्या घटनांचे स्पष्टीकरण क्से करता येइल याचे विवेचन करण्याचा हा माझ्या दृष्टीकोनातुन छोटा प्रयत्न. २. महाभारतातले राजकारण मुख्यत्वे लढले गेले चार पात्रांमध्ये दुर्योधन आणि शकुनी एका बाजुला आणि कृष्ण आणि युधिष्टिर दुसर्‍या बाजुला. त्यातही मुख्य खेळाडु दुर्योधन आणी कृष्ण त्यामुळे या दोघांचाच प्रामुख्याने उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात या संपुर्ण राजकारणामागे अजुनही व्यक्ती असु शकतात. " वर नमूद केल्याप्रमाणे हे माझे "रीडिंग बिटवीन द लाइन्स" किंवा "इंटरप्रिटेशन आहे त्यामुळे अमुक गोष्ट कृष्णाने केली याचा पुरावा मूळ महाभारतातुन काढुन द्यायला सांगितल्यास तसा काही देता येणार नाही. ३. हा लेख लिहिताना मुळात महाभारत घडले का? महाभरत खरे की केवळ एक कथा? या दृष्टीकोनातुन?विचार केलेला नाही. एका खर्‍या कथेचे दैवी आवरण बाजुला सारुन त्यातील काही घटनांचे विवेचन इतक्या ढोबळ अर्थाने कृपया या लेखाकडे बघावे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
इतिहास
वाङ्मय
साहित्यिक
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
मत
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
33391 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

महाभारतात असेच लिहिले आहे हो

मृत्युन्जय
Mon, 04/04/2016 - 12:25 नवीन
महाभारतात असेच लिहिले आहे हो. अगदीच स्पष्ट बोलायचे झाल्यास ही मंत्र वगैरे निव्वळ थापेबाजी होती असे माझे मत आहे. आअ कुठलाही आशिर्वाद कुंतीला नसावा. कारण तसा वर असल्यास इंद्राला आवाहन करण्यापुर्वी तपःश्चर्या वगैरे करुन त्याची आळवणी करायला लागली नसती. पुर्ण एक वर्ष इंद्राची स्तुती केल्यावर प्रसन्न होउन त्याने कुंतीला पुत्र मिळवुन देण्याचे आश्वासन दिल्याचे दिसते. त्यामुळे केवळ मंत्राच्या सहाय्याने देवांना आवाहन करता येत होते हे पटत नाही. बाकी तुम्ही आक्षेप घेतल्यावर परत वाचले तेव्हा असे लक्षात आले की कुंतीने माद्रीला मंत्र दिला याचा अर्थ तिने तिला तो सांगितल असे नाही तर बहुधा मंत्र तिनेच म्हटला होता आणि माद्रीने फक्त कुठल्या देवांकडुन पुत्रप्राप्ती व्हावी त्यांचे स्मरण केले होते आणि त्या स्मरणाला अनुसरुन आमंत्रित केलेल्या अश्विनीकुमारांनी तिच्याबरोबर संबंध ठेवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

:)

चांदणे संदीप
Mon, 04/04/2016 - 13:14 नवीन
आअ कुठलाही आशिर्वाद कुंतीला नसावा. कारण तसा वर असल्यास इंद्राला आवाहन करण्यापुर्वी तपःश्चर्या वगैरे करुन त्याची आळवणी करायला लागली नसती. पुर्ण एक वर्ष इंद्राची स्तुती केल्यावर प्रसन्न होउन त्याने कुंतीला पुत्र मिळवुन देण्याचे आश्वासन दिल्याचे दिसते. त्यामुळे केवळ मंत्राच्या सहाय्याने देवांना आवाहन करता येत होते हे पटत नाही.
इथेही लॉजिक गडबडतय....सूर्याची आळवणी केल्यावर मात्र त्याने लगेच येऊन कर्णाची भेट कुंतीच्या उदरात ठेवली. तिथे कुंतीने एक पूर्ण वर्ष सूर्याची आळवणी करण्याची शक्यता आजिबातच नाहीये!
कुंतीने माद्रीला मंत्र दिला याचा अर्थ तिने तिला तो सांगितल असे नाही तर बहुधा मंत्र तिनेच म्हटला होता आणि माद्रीने फक्त कुठल्या देवांकडुन पुत्रप्राप्ती व्हावी त्यांचे स्मरण केले होते
हे म्हणजे सलाईन एकाला लावले आणि बरे दुसर्याला वाटल्यासारखे आहे! :) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

इथेही लॉजिक गडबडतय...

मृत्युन्जय
Mon, 04/04/2016 - 13:34 नवीन
इथेही लॉजिक गडबडतय....सूर्याची आळवणी केल्यावर मात्र त्याने लगेच येऊन कर्णाची भेट कुंतीच्या उदरात ठेवली. तिथे कुंतीने एक पूर्ण वर्ष सूर्याची आळवणी करण्याची शक्यता आजिबातच नाहीये! इथे लॉजिक काहिच नाहिये. इथे फॅक्ट्स जशाच्या तश्या मांडलेल्या आहेत. सुर्य लगेच आला तर इंद्राची मात्र आळवणी करायला लागली असे महाभारतातच लिहिले आहे. इंद्रापासुन पुत्रप्राप्तीसाठी कुंतीने पुर्ण एक वर्ष काहिसे व्रत घेतले आणी पांडुने तर एका पायावर उभे राहुन तपश्चर्या केली असे म्हटले आहे. मात्र भीम आणि अर्जुन यांच्यामधील एका वर्षाचे अंतर पाहता इंद्र कदाचित ३ महिन्यात तयार झाला असावा आणि कुंतीने व्रत मात्र १ वर्षे केले असावे असे दिसते. हे म्हणजे सलाईन एकाला लावले आणि बरे दुसर्याला वाटल्यासारखे आहे! :) तसे आहे खरे. दुर्वासांचा आशिर्वाद लई स्ट्राँग होता बरं का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

लिहिलेच आहे तर...

चांदणे संदीप
Mon, 04/04/2016 - 13:44 नवीन
इंद्राची मात्र आळवणी करायला लागली असे महाभारतातच लिहिले आहे.
बरोबर आहे, साधे देव आणि देवेंद्र यांच्यात काहीतरी तर फरक नको का असायला! ;) असो, धन्यवाद, तुम्ही वेळ काढून माझ्या फालतू शंका-कुशंकांना उत्तरे देत आहात! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

महाभारत आवडीचा विषय आहे हो.

मृत्युन्जय
Mon, 04/04/2016 - 13:58 नवीन
महाभारत आवडीचा विषय आहे हो. आणी शंका फालतु आजिबात नाहित. तुम्हाला उत्तरे देताना मलादेखील महाभारताबद्द्दल २ नविन गोष्टी कळाल्या आज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

बापरे, महाभारताचे वाचन केलेच

अभ्या..
Mon, 04/04/2016 - 14:08 नवीन
बापरे, महाभारताचे वाचन केलेच पाहिजे. एवढ्या एका प्रतिसादात मला कमीतकमी १० आधुनिक काळातली कथाबीजे सापडलीत. अ‍ॅक्चुअली व्यासांनी काहीच सोडलेले नाही लिहिण्याचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

या तर्क सुत्राचा

भाऊंचे भाऊ
Fri, 04/01/2016 - 23:17 नवीन
सर्व डोलारा महाभारत युद्धात बहुतेक सगळ्या प्रमुख यौद्ध्यांचा अंत साध्या बाणांनीच झाला आहे. या एकमेव विधानाभोवती एकवटला आहे... पण या तर्कटामधे लोकाना अस्त्र निवारणाचे सुपरनेचुरल कौशल्य ज्ञात होते म्हणून ते प्रमुख गणले गेले हीबाब सोयीस्करपणे विसरली आहेच परंतु हे मेलेले जे प्रमुख योध्दे आहेत ते अस्त्रामुळे न्हवे तर त्यांना त्यांच्या शक्तिंपासून अस्त्रांपासून श्री कृष्णाने कावेबाज पणे दूर केले ही बाब विसरणे अशक्य आहे अन एकदा ते असे कावेबाज पणाला बळि पडल्यावर ईसिसच्या लोकांनी सुधा त्यांना नुसत्या सुऱ्याने ग्ळे कापून मारले असते तिथे दिव्य शक्तिची गरज काय ?
  • Log in or register to post comments

नाही नाही. तसे नाही. कदाचित

मृत्युन्जय
Sat, 04/02/2016 - 12:19 नवीन
नाही नाही. तसे नाही. कदाचित मी मुद्दा योग्यप्रकारे मांडलेला नाही. मला असे म्हणायचे होते की महाभारताभोवतालची सगळी अद्भुतरम्यता शेष केल्यास बाकी जी काय कथा उरेल त्याचे तार्किक विश्लेषण काय असेल. सर्व प्रमुख यौद्ध्यांचा अंत कसा झाला याचे विवेचन फक्त त्यातील एक भाग म्हणुन घेतला आहे. तसे पाहता दिव्यास्त्रांच्या उपयोगाची अनेक उदाहरणे महाभारतात आहेतच की. घटोत्कच देखील वासवी शक्तीने मारला गेला असेच मानण्यात येते ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

मग एक गोष्ट नक्की आहे

भाऊंचे भाऊ
Sat, 04/02/2016 - 12:45 नवीन
दुर्योधन धूर्त न्हवे तर लो सेल्फ इस्टीम , इनसिक्योर असलेली व्यक्तीरेखा ठरते. विशेषत: एकत्र शिक्षणात पांडव जास्त गुणी असे चित्र निर्माण झालेले असताना. त्याला लक्षागृह, भिमाला विष पाजने, दोन वेळा द्युत खेळावे लागणे या सर्व गोष्टीमधे करताना त्याची पांडवासोबत युध्द टाळायची आगतिकता पुन्हा पुन्हा दिसते. त्याने युद्ध टाळायचेच प्रयत्न जास्त केलेत आणि अशी नकारात्मकतेला बळि पडलेली व्यक्ति धूर्तपणे नको असलेल्या भावी युध्दाच्या चाली रचते पटत नाही. कारण युध्द हे आपल्या ह्क्कासाठी का असेना पांडवानी छेडले आहे. दुर्योधनाने नाही. आणि तो या कलेत परिपूर्ण नाही... महाभारत युध्द स्ट्रेटेजिक कृष्णाने (नाइलाजाने) बनवले अन कौरवाने ही दृष्टी युध्द टाळाय्ला वापरली करायला कधीच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

युद्ध टाळण्याचा सर्व प्रयत्न

मृत्युन्जय
Sat, 04/02/2016 - 13:19 नवीन
युद्ध टाळण्याचा सर्व प्रयत्न पांडवांकडुन झालेला दिसतो. याउलट दुर्योधन नेहमीच युद्धाची तयारी करत होता. पांडव वनवासात असताना दुर्योधनाने हे ताडले होते की १३ वर्षांनी युद्धाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे ती १३ वर्षे त्याने भीमाच्या पुतळ्यावर प्रहार करुन गदेचा सराव केला. या १३ वर्षांदरम्यानच कर्णाने दिग्विजय करुन मित्र जोडले. शिवाय कर्णाला आपल्या बाजुला वळवुन घेण्यात दुर्योधनाही हीच दूरदृष्टी होती. बाकी महाभारत युद्धा स्टृएटेजिकली कृष्णाने लढण्यास भाग पडले हे १००% मान्न्य. थोडेसे याच अंगाने मी या आधीही एका लेखात लिहिले होते. आणि एक वर्तुळ पुर्ण झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

13 वर्षे पूतळा बदडने, देट्स पर्सनल ग्रज.

भाऊंचे भाऊ
Sat, 04/02/2016 - 13:52 नवीन
पण हो 13 वर्षानी पांडवांचा हक्क अमान्य करून युध्दास भाग पाडायचे त्याने ठरवले हे मान्य. तसेच ईराक बाबत जश्या रासायनिक अस्त्रे असल्याच्या अफवा उठ्वल्या गेल्या तसेच काहीसे करण आर्जुन बाबत केले गेले असावे हां आपला तर्क पटतो. फक्त हे अशी अस्त्रे अस्तित्वात न्हवती असे गृहीत धरले तरच अन्यथा त्यांच्यात खरोखर शितयुध्दच चालू झाले. पण अफवाच उठवायच्या आहेत तर त्या इतक्या मर्यादित कशा ? तसेच विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर अर्जुनाने अस्त्रांचे प्रदर्शन प्रजेसमोर केले होते जिथे प्रथमच त्याची गाठ कर्णासोबत पडली(हे मी टिवित पाहिले) मग अस्त्रांच्या अस्तित्वावर मर्यादा कशा मानायच्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

(हे मी टिवित पाहिले)

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 04/02/2016 - 14:04 नवीन
(हे मी टिवित पाहिले) काय हे साहेब ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

त्या वेळी फार वाचन करत न्हवतो

भाऊंचे भाऊ
Sat, 04/02/2016 - 14:08 नवीन
त्या वेळी फार वाचन करत न्हवतो. आणि नंतर महाभारता सारख्या अवांतरावर वेळ घालवायला वेळ मिळाला नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

महाभारता सारख्या अवांतरावर???

टवाळ कार्टा
Sat, 04/02/2016 - 19:54 नवीन
महाभारता सारख्या अवांतरावर????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

+१२३४५६७८९

sagarpdy
Mon, 04/04/2016 - 14:47 नवीन
+१२३४५६७८९
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नाही ते म्हणतायत त्यात पण

आनन्दा
Sun, 04/03/2016 - 09:27 नवीन
नाही ते म्हणतायत त्यात पण तथ्य आहे.. दुर्योधनाने शक्यतोवर समोरासमोरचे युद्ध टाळायचाच प्रयत्न केलेला दिसतो.. अपवाद विराटाकडे झालेले युद्ध, ज्यात तो हरून देखील जिंकला असता.. किंबहुना जिंकलाच. नंतर फासे वेगळे पडले हा भाग वेगळा. आणि दुसरे अंतिम युद्ध - जे होणार आहे हे गृहीत धरून तो शेवटची १३ वर्षे तयारी करत होता. पण ही २ सोडल्यास तो शक्यतो युद्धबाह्य मार्गाने विजय मिळवण्यआचा प्रयत्न करत होता असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

पांडव म्हणजे चांगुलपणाचा

तर्राट जोकर
Sat, 04/02/2016 - 13:50 नवीन
पांडव म्हणजे चांगुलपणाचा आदर्श आणि कौरव म्हणजे वाइटपणाचा आदर्श असा दॄष्टीकोन ठेवला तर मृत्युंजय जे म्हणत आहेत ते कळायला कठिण जाईल. हे पूर्वग्रह बाजूला ठेवून तटस्थपणे निव्वळ घटनांकडे बघणे योग्य ठरेल. तुम्ही म्हनताय तशी लो सेल्फ एस्टीम, इन्सिक्योर अशी व्यक्तिरेखा वाटत नाही. ज्यांच्या जन्माचा, बापांचा पत्ता नाही, संशयास्पद मूळ आहे अशा पाच जणांनी येऊन इस्टेटीत वाटा द्या म्हनून ठाण मांडून बसले तर कुणी ही चिडचिड करेल. दुसरा मुद्दा युद्धाचा की युद्ध का टाळले. माझ्या मते राजकारणात थेट मैदानात उतरण्या आधी मुत्सद्दी चाली खेळायला लागतात, छल कपट करायला लागतं, शत्रुला तुच्छ, नालायक ठरवून मनोबल तोडायला मानहानी करायला लागते. कमीत कमी उर्जा, बळ, माणसे, वेळ वापरुन शत्रूचा नायनाट करणे हे जास्त आदर्श मानलं जातं. प्रत्येक प्रश्न प्रतिष्ठेचा बनवणे व युद्धाच्या मैदानात घेऊन जाणे राजधर्माला शोभत नाही. कॄष्णशिष्टाईच्या प्रसंगात सुईच्या अग्रावर मावेल एवढी जमीन द्यायलाही त्याने नकार दिला. ह्याचा अर्थ त्याला सेटलमेंट नकोच होती, त्याला त्यांच्याशी संबंधच नको होते. शेवटी युद्धाचे आव्हान दिले तेव्हा तेही स्विकारले, जर तो युद्धाला घाबरला असता तर 'घ्या काय पायजे ती दोन पाच एकर जागा आणि टळा एकदाचे' असेही तो म्हणू शकला असता.. आपल्याच सैन्यातल्या रथी-महारथींचे मन शत्रूच्या बाजूने झुकलेले असतांना युद्ध करायला लागलेला राजा. तो शेवटपर्यंत शौर्याने लढला. त्याला आपण भित्रा, कमकुवत, पलायनवादी अशा दॄष्टीने पाहू शकतो का? हा प्रतिसाद टायपत असतांना मृत्युंजय यांचे उत्तर आलेले बघितले. त्या उत्तराशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

किंमत आदर्शीकरणालाच तर आहे...

भाऊंचे भाऊ
Sat, 04/02/2016 - 14:00 नवीन
. नाहि तर मृत्युंजय यांनी महाभारत कशाला वाचले असते त्यांनी निळु फुलेंच्या एखाद्या चित्रपटातिल पात्रांवर लेखमाला लिहली नसती काय ? तटस्थता म्हणजे वास्तवाकडे डोळे मिंटूण बघणे अशी आपली काही धारणा असेल तर आपला प्रतिसाद योग्य आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

महाभारत आपण नेहमीच एका

तर्राट जोकर
Sat, 04/02/2016 - 14:12 नवीन
महाभारत आपण नेहमीच एका साचेबद्ध रितीने पाहतो आणि ते बरोबरही आहे कारण तसे न केल्यास ते मूळ कथाबीजाला आव्हान देण्यासारखे होइल. पण थोडा वेळ त्यातील सर्व दैवी घटना आणि संगती बाजूला करुन बघितल्यास मानवी भावभावनांचे अगणित कंगोरे सामोरे येतील. दैवी अस्त्रे, कृष्णाचे देवत्व, देवांचे अस्तित्व आणि दैवी चमत्कार या संदर्भाकडे दुर्लक्ष केल्यास कृष्ण आणि दुर्योधन यांच्या राजकारणाचे द्वंद्व दिसुन येइल. त्यामुळे फक्त या लेखापुरत्या या सगळ्या गोष्टींना मी फाटा दिला आहे आणी हे लक्षात ठेउनच कृपया हा लेख वाचावा.
हे वाचले नाही का? मला नाही वाटत लेखकमहोदयांनी आदर्शिकरणाच्या उठाठेवीसाठी लेख लिहला आहे. बाकी तुम्हाला तो कसेही करुन त्याच्यातच बसवायचा असेल तर आपला पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

महाभारताच्या खरे घडले असेल

मृत्युन्जय
Sat, 04/02/2016 - 14:36 नवीन
महाभारताच्या खरे घडले असेल तर प्रश्नच नाही. नसेल घडल्यास ती जगातली सर्वोत्तम कथा आहे असे मी मानतो. त्यामुळे महाभारतावर जितके जमेल तितके वाचायला आवडते. आदर्शतावादासाठी रामायणा वाचणे उत्तम. महाभारत त्या उलट करड्या रंगात गुंफले आहे. जवळजवळ सगळीच पात्रे या रंगाच्या थोड्याफार अल्याड पल्याड उभे असलेली दिसतील. मानवी भावभावनांचे जितके कंगोरे महाभारतात दिसतात तितके क्वचितच इतरत्र कुठल्या कथांमध्ये दिसतात. त्यामुळेच महाभारत मला श्रेष्ठ वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

तुमचे खरे आहे तरीही काय पन राव

समाधान राऊत
Fri, 04/01/2016 - 23:55 नवीन
म्हणजे जयद्रथ ला रात आंधळे होते(तरिही तो युद्धात उतरला) असं म्हणायचे आहे का आपल्याला भाऊ((भाभा)) आणि कृश्नाने त्याला दिवसाच(कट रचुण --अर्थात सुर्य ग्रहणाने) अंधळे केले....असेच म्हणावे लागेल
  • Log in or register to post comments

सरा आपला प्रतिसाद माझ्या डोक्यावरून गेला

भाऊंचे भाऊ
Sat, 04/02/2016 - 00:08 नवीन
जरा सोपा करून सांगा की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत

तो विषयच नै ना

समाधान राऊत
Sat, 04/02/2016 - 17:59 नवीन
जादु मंत्रे अस्त्रे यांचा विचार न करता महाभारत कसे असेल असा मुळ मुद्दा असतना आपन म्हटले कि सर्वांकडे supper natural skill होते. असो((आनि त्याही क्रुष्णाने काढुण घेतल्या )) म्हंजे विषयच आप्ल्या डोक्यावरुन गेलेला दिस्तो..म्हनुं हे उपहासात्मक उदाहरन... कदचित ते ही खरे असु शकेल कारण आजची हुशार मंडळी अनि संगनक ही हेच संगतात कि तेरा दिवसात दोन ग्रहने झाली.. 1..पहिले सुर्य ग्रहं युद्धाच्या 14 व्या दिवशी --यावेळी जयद्रथ मेला. 2.तेथुन पूढे 13 दिवसने जे ग्रहण झाले त्यावेळी क्रुश्न गेल..((पण इथे ग्रहण कारण नसुन कालदर्शक आहे..)) अनि महाभारतामधेहि हि दोन ग्रहणे उल्लेखिलि आहेत. may be days will Chang
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

हे नवीनच ऐकतोय!

हकु
Sat, 04/02/2016 - 18:27 नवीन
जयद्रथानंतर तेरा दिवसांनी कृष्ण गेला???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत

त्यांच्या मते.:)

प्रचेतस
Sat, 04/02/2016 - 18:28 नवीन
त्यांच्या मते.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हकु

ते चुकले आहे माझ्याकडुन

समाधान राऊत
Sat, 04/02/2016 - 18:59 नवीन
ते चुकले आहे माझ्याकडुन 3 तप लिहायचे होते ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

..

lgodbole
Sat, 04/02/2016 - 06:14 नवीन
ग्रहण ही घटना फक्त कृष्णालाच माहीत होती का ? बाकी ल्काना शाळेत भुगोल शिकवत नव्हते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत

मुळात कौरवाकडील भीष्म,

हेमंत लाटकर
Sat, 04/02/2016 - 07:30 नवीन
मुळात कौरवाकडील भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांचा आेढा पांडवाकडेच होता. भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण यांना कपटाने मारले. कृष्ण निती
  • Log in or register to post comments

मृत्युंजय साहेब तुमचा लेख एकदम पटला

जगप्रवासी
Sat, 04/02/2016 - 11:30 नवीन
मृत्युंजय साहेब तुमचा लेख एकदम पटला. महाभारतातील या महत्वाच्या २ पात्रांकडे पूर्ण लक्ष असताना मागून सूत्र हलवणारे दुर्योधन आणि कृष्ण होते हे तुमच्या विवेचनातून पटत. खूप छान लेख.
  • Log in or register to post comments

आभ्यासपूर्ण लेख , मला एकदा

माझीही शॅम्पेन
Sat, 04/02/2016 - 12:19 नवीन
आभ्यासपूर्ण लेख , मला एकदा ह्या विषयावर बोलायचे आहे :) आपल्याही आजूबाजूला असे बरेच कृष्ण आणि दुर्योधन आहेत त्यांच काय करायाच
  • Log in or register to post comments

वाखु साठवली आहे.

यशोधरा
Sat, 04/02/2016 - 13:12 नवीन
मृ, लेख आवडला. लेख आणि प्रतिसाद वाचते आहे.
  • Log in or register to post comments

हेच

स्वाती दिनेश
Sat, 04/02/2016 - 17:02 नवीन
यशो सारखेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

माझा मूळ लेख (ज्याचा उल्लेख

साहना
Sat, 04/02/2016 - 14:01 नवीन
माझा मूळ लेख (ज्याचा उल्लेख पहिल्या परीश्चेदांत केला आहे) आधिकारिक महाभारताच्या प्रती मध्ये नव्हता. त्याचा मुल स्रोत एका गुजराती मासिक आहे. सध्या आठवत नाही. आपले म्हणणे १००% पटते. महाभारतातील अनेक गोष्टी कवी कल्पना असल्या तरी सूत्रधार कृष्ण आणि दुर्योधन होते ह्यांत शंका नाही. महाभारताची कथा सांगत असताना दुर्योधनचा उल्लेख जास्त केला जात नाही तरी सुद्धा मूळ महाभारतांत दुर्योधन चाणाक्ष राजकारणी म्हणूनच दिसून येतो. द्यूत असो वा अज्ञातवास, दुर्योधन प्रत्येक ठिकाणी कायद्याचा आसरा घेत असतो. अगदी द्रौपदी वस्त्र हरणात सुद्धा दुर्योधन धर्म आणि कायदा ह्याचीच भाषा वापरतो. आम्हा भारतीयांना सगळ्याच गोष्टी अतिरंजित करून किंवा ब्लेक आणि व्हयिट स्वरूपांत पहायची खोड असल्याने या युद्धांतील दुर्योधनाचा ग्रांड प्लान कधी पुढे येताच नाही.
  • Log in or register to post comments

ढॅण्टॅढॅण!

चांदणे संदीप
Sat, 04/02/2016 - 15:39 नवीन
मृत्युंजय सर... आपल्या लेखाचा रोख हा कृष्ण आणि दुर्योधन यांनी आपापल्या प्याद्यांचा (पक्षी:कर्णार्जुन) वापर करून हे महाभारत घडविले असा दिसतो. इथे आशयाशी जरा सहमती नोंदवतो पण त्याचबरोबर 'त्या' दोघांना प्यादे म्हणण्याबाबत माझा आक्षेप! कारण एक लगेच सांगता येईल की, दोघेही महाभारताची अतिमहत्वाची पात्रे आहेत. तसेच त्यांच्याकडे अस्त्रे वगैरे असणे ह्या अफवा असण्याच्या शक्यतेला तर मी आजिबात सहमत होऊ शकत नाही. आता, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अस्त्रांचा दैवीपणा काढला तर दोघेही सर्वसामान्य योद्धेच कदाचित ठरले असते. यासाठी तुम्ही द्रोणांनी एकलव्याचा अंगठा कापून घेतल्याचे उदाहरण दिले आहे. ओके! आता, माझ्या मते, अस्त्र वगैरेंचा वापर करण्यासाठी धनुष्य चालवता येणे ही बेसिक गरज होती. गदेवर अस्त्र लावून फेकल्याचे कुठेही उदाहरण नाही. मग त्याहीपुढे जाऊन जर कोणीतरी त्या धनुर्विद्येत अतिशय प्राविण्य मिळवत असेल तर अस्त्रांचा वापर करायला तो एक ॲडेड ॲडव्हांटेज आहे! कारण, समजा एखाद्या नवशिक्याला किंवा कामचलाऊ धनुर्धाराला सांगितले की बाबारे इथून सोलापूरवर अस्त्र चालव आणि त्याने कोल्हापूरवरच सोडले तर! "आर्र्र स्वारी बर्का सर...." म्हणण्यावाचून त्याला नो इलाज! आपण ऑलिंपीक वगैरेमध्ये तीरंदाजीची अटीतटीची स्पर्धा पाहतो. एक-अर्ध्या गुणाच्या फरकानेही मेडल हातातून निसटू शकते. मग अस्त्र चालविणे हे मेडल मिळवण्यापेक्षा नक्कीच महत्वाचे ठरते, नाही का? शिवाय एकलव्याच्या गोष्टीतून वाचल्या/समजल्याप्रमाणे एकलव्याने ज्या पद्धतीने कुत्र्याच्या तोंडात बाण मारून त्याला इजा न होऊ देता त्याचे तोंड बंद केलेले ते पाहता नुसत्या अचूक नेम मिळवण्यापुरते त्याचे कौशल्य मर्यादित राहिले नव्हते तर त्याहीपेक्षा पुढे गेलेले. एक चांगले उदाहरण आत्ता सुचते ते म्हणजे, धोनीसारखे उत्तम फिनीशर व स्ट्रॉंग हिटर असणे केव्हाही चांगलेच पण त्याचवेळी उत्तम फिनीशर, तंत्रशुद्ध हिटर, गॅप काढण्याची अनोखी कला, दबावात आपल्यातले सर्वोत्तम बाहेर काढणे व सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या सगळ्यात सातत्य राखणे ह्या गुणांमुळे कोहली आताचा सर्वश्रेष्ठ फलंदाज गणला जाणे यात नो नवल. म्हणून द्रोणांनी एकलव्याला आताचा कोहली होण्याची संधीच मिळू दिली नाही! ;) दुसरे म्हणजे वर "उका" भाऊंना म्हणायचे आहे की अस्त्रे वगैरे सगळ होतं पण काळाने ते सगळ चट्टम करून टाकलं. याचा अर्थ त्यांना महाभारत खरेच घडले असावे असे म्हणायचे आहे. त्यांनी स्वत:च म्हटल्याप्रमाणे प्रतिसाद विस्कळीत आहे खरा, बट लेट मी हेल्प हिम. इथेही मी त्यांच्याशी अंशत:च सहमत आहे. म्हणजे, त्यांच्या अस्त्रांच्या अस्तिवाबद्दल असणाऱ्या समजुतीला माझे अनुमोदन पण महाभारत खरेच घडले का नाही याबद्दल मी नॉट दॅट खात्रीशीर! :) आता तुम्ही म्हणाल जिथं आडातच नाही तिथं पोहऱ्यात कुठून? थांबा... दोन्ही शक्यतांचा विचार करू... १) महाभारत खरेच घडले होते नि अस्त्रांचे ज्ञान कालौघात नष्ट झाले.... ऊका खुश! ;) २)महाभारत ही त्या काळची साय-फाय/फिक्शन कॅटेगरीतली उत्कृष्ट कादंबरी होती, त्यामुळे अस्त्र वगैरे त्यात असणं हा एक कल्पनाशक्तीचा जबरद्स्त आणि लोकप्रिय आविष्कार होता! इथे, पहिल्याविषयी मी काय बोलणार? तो प्रत्येकाच्या वैयक्तिक मानण्याचा/श्रद्धेचा भाग आहे. मानो तो गंगा मा है ना मानो तो बहता पानी वगैरेसारखं! आणि दुसरी शक्यता विचारात घेतली तर काय, प्रश्नच मिटला! कारण ते काल्पनिक आहे म्हटल्यावर इथे लिहीण्यात तुम्हांला कल्पनेच्या बाबतीत सर्वच स्वातंत्र्य आहे. तुमच्या कल्पनांच्या सीमा तुम्ही ताणून किती दूरवर नेऊ शकता हे केवळ तुमच्याच कल्पना'शक्ती'वर अवलंबून आहे. इथे त्या महाकवीने त्या कल्पनेच्या लगोरीला परिणामकारक ताणून सर्वसामान्यांना त्यात बसवून दूर भिरकावून दिले आहे, जे की त्या हवेतल्या प्रवासातच सर्वजण आहेत अजून, खाली पडलेच नाहीत! त्याबद्दल व्यासांना एक कडक सलाम! आता आपण ह्या दोन्ही शक्यतांमधला संयुक्त दुवा म्हणाजेच "अस्त्राचे असणे" केवळ याचाच विचार करू. अस समजा महाभारत काळात विज्ञानाच्या बाबतीत लोक चरमसीमेवर होते म्हणजे आतापेक्षाही कित्येक पटीने पुढे. पर्जन्यास्त्राकडे पाहिले असता आताच्या काळात ज्या पद्धतीने कृत्रीम पाऊस पाडला जातो, आठवा २००८ च्या ऑलिम्पीक्समध्ये चीनने या तंत्राने ऑलीम्पीक निर्विघ्नपणे पार पाडून जगाची वाहवा मिळवली होती, हेच तंत्रज्ञान पर्जन्यास्त्रात काहीच्या काही पटीने विकसीत करून वापरले असणार. आता हेलिकॉप्टरने पावसाच्या ढगात रसायनांची फवारणी करतात , तेव्हा नॅनो टेक्नोलॉजीने 'बाणावरच' काम भागत असेल. इथे या कामी आतासारख मिसाईलच का वापरलं गेल नसेल याचा विचार करता, आता जसं इंधनाच्या उपलब्धतेची मर्यादा लक्षात येऊन उशीरा का होईना आपण सौर व वायु उर्जेकडे वळलोय तसं त्या काळातल्या लोकांनी आधीच ते ओळखून उर्जेचे नेमके हेच स्त्रोत निवडले असणार. शिवाय हाताने बाण मारायचा म्हणजे हाताला, डोळ्याला, मेंदूला काम! जे आपण हळूहळू कमी करत जाऊन रोबोट वगैरे आणून एके दिवशी हॉलिवूडच्या वॉल ई ॲनिमेशनपटात कल्पना केल्याप्रमाणे हात-पाय यांच्या जेनेटिक्समध्ये अमूलाग्र बदल घडवू व त्यांना कसलेही काम कराण्यासाठी निरूपयोगी बनवू. शिवाय कुणीही उठावे आणि अस्त्र चालवावे असे न होऊ देण्यासाठी त्यांना मंत्र नामक व्हॉईस कमांड फिचरचे समर्पक, सुयोग्य असे कोंदण दिले. व्हॉईस कमांड आज किती प्रगत झाले आहे ते आपण बघतोच आहोत. स्मार्टफोनवर नंबर डायल करण्यापासून ते गुगलला कामाला लावण्यापर्यंत याचा वापर सहजपणे करता येतो. मी स्वत:विंडोज ७ या ऑपरेटींग सिस्टीमवर स्पीच रेकग्निशन फिचर वापरत होतो. सध्या विंडोज १० वर अजून वापरायला सुरू केलेले नाही. एकदम जबरदस्त उपयोगी असे फिचर आहे. मग यालाच त्या काळात पुन्हा काही पटीने विकसीत केले गेले असेच मानूयात. (फिक्शनमध्येही!) तसेच आजच्या काळातले टार्गेट सर्चिंग/हिट सर्चींग मिसाईल्स ही त्या काळातल्या अस्त्रांचीच बालके आहेत असे त्यांच्या संहारक क्षमतेच्या वर्णनांवरून वाचून वाटते. "हकु" यांच्या भीमाच्या नंबर एक नायकपात्र असण्याच्या प्रतिसादाला बहुतेक धनुष्यविद्याच व धनुर्धरच का श्रेष्ठ गणला गेलाय याचे उत्तर माझ्या आतापर्यंतच्या प्रतिसादात मिळू शकेल. तरीही धनुर्धाऱ्यांच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडतो. १) वर यकु यांनी भीमपराक्रमाचे जे दाखले दिलेत यावरून तो महावीर, महापराक्रमी होता याबाबत यत्किंचीतही संशय मनात येत नाही पण नीट पाहून विचार केला असता दिसते की ह्या सर्व पराक्रमगाथांत तो फक्त हॅन्ड टू हॅन्ड कॉम्बॅट लढला आहे असे दिसते. जिथे त्याने कर्णाला लढाईत ३१ वेळा हरविले आहे असेही म्हटले गेले आहे ती शुद्ध अतिशयोक्तीच वाटते मला. ३१ वेळा कर्णाबरोबर लढत बिजी होण्यापेक्षा शंभरच्या शंभर कौरव मारणे ही आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यातच त्याचा बहुतांश वेळ खर्ची गेला असावा. कारण तासाला एक कौरव या गतीने जरी सपाटा लावला तरी बराच वेळ गेला की हो! गणित मला जमत नाही, नाहीतर आकडेमोडही मोडून इथे ठेवली असती. तसेच जिथे बाकी महारथींनी अस्त्रे ठराविक वेळी वापरल्याचा उल्लेख आहे तिथे भीमाने कधी काही वापरल्याचा उल्लेख नाही. भीमाला स्वत:च्या मुलाकडूनही एकदा पराभव पत्करावा लागल्याचे वाचलेय. परत माझ्या कर्णार्जुनांना प्यादे म्हटल्याच्या आक्षेपाकडे वळतो. माझ्यामते हे दोघेच सोडून इतर सारे चाकरी करत होते किंवा व्हिजनलेस होते. कर्णाला मित्रप्रेम ही भावना प्रोटीनसारखी होती तर पांडवांमध्ये आपणच सर्वश्रेष्ठ असल्याचे अर्जुन जाणत असल्याने आपला पराभव म्हणजेच आपल्या घराण्याचा सर्वनाश या दडपणातून म्हणा किंवा आपला आधिकार आपल्याला मिळाला पाहिजे या भावनेतून नेहमी आपले सर्वोत्तम प्रदर्शन करीत राहायचे याचा जणू निश्चय अर्जुनाने केलेला व आयुष्यभर त्यात तो सुदैवीही ठरला! म्हणजेच दोघांनाही आपले ध्येय/उद्दिष्ट माहीत होते होते व त्यावरून ते आजीवन हटले नाहीत. शेवटी जशी प्रत्येकाची वेळ असते तशी कर्णाची दुर्दैवाने रथाचे चाक चिखलात फसल्यावर आली तशीच यादवी काळात अर्जुनालाही मानहानीकारक पराभवाची चव चाखावी लागली. म्हणजेच माझ्या मतानुसार दोघेही श्रेष्ठ धनुर्धर व अस्त्रांचे दोघांनाही ज्ञान असल्याने(वरचं अस्त्रांबद्दलच माझं लॉजिक!) तसेच दोघांपुढे आपापल्या बाजूंचे योग्य उद्दिष्ट असल्याने कुणी त्यांना चालवावे अशातले ते नव्हते. हे माझे वैयक्तिक मत/लॉजिक आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो! लेखनसीमा! Sandy
  • Log in or register to post comments

आयला....

चांदणे संदीप
Sat, 04/02/2016 - 15:57 नवीन
आयला एवढं काय काय लिहून पण अजून बरंच लिहायच राहिलच! :/ शेप्रेट लेख तरी लिहून झाला अस्ता! श्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

खरंच शेपरेट लेखच हवा होता की!

हकु
Sat, 04/02/2016 - 16:25 नवीन
खरंच शेपरेट लेखच हवा होता की! जसा "अर्जुन आणि कर्ण" ह्या लेखावरच हा वर लिहिलेला लेख, तसा तुमच्या ह्याच्यावरचा उपर एक!!! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

तेच!

चांदणे संदीप
Sat, 04/02/2016 - 16:47 नवीन
मग एकावर एक असे लै झाले असते ओ.... म्हणूनच नो शेप्रेट असा विचार केला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हकु

प्रतिसाद आवडला...

उगा काहितरीच
Sat, 04/02/2016 - 21:24 नवीन
प्रतिसाद आवडला... कसं आहे ना , महाभारत म्हणजे महासागर आहे . कुणी शंखशिंपले गोळा करतो, कुणी मासेमारी करतो, कुणी सागरतळाशी जाऊन अनमोल मोती काढतो तर कुणी काठावर बसुन त्याच्या भव्यतेने दिपून जातो. मी सगळ्यात शेवटच्या प्रकारातील आहे. महाभारत झालेच नाही असे कसे मानता येईल हो ? शेकड्यानी पुरावे आहेत ना साहेब . त्यावेळच्या जागा , वगैरे आजही आहेत . क्रुष्णासारख्या काही व्यक्तींची आजही पूजा वगैरे होते . ( लोक कितीही भाबडे असले ना तरीही कादंबरीतल्या व्यक्तिरेखांची पूजा नाही करणार असे मला वाटते.) हं आता काळानुसार काही भाग कमी जास्त झाला असेल नाही असे नाही . पण म्हणुन सगळे महाभारतच काल्पनीक आहे असे म्हणने बरोबर नाही असे मला वाटते. मला वाटते कोणता भाग प्रक्षिप्त आहे कोणता नाही याचा अभ्यास धागा लेखकाचा व इतरही काही मिपाकरांचा आहे. बाकी चर्चेतुन बरीच माहीती होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

उका सर

चांदणे संदीप
Sat, 04/02/2016 - 23:03 नवीन
तुमच्या प्रतिसादातून तुम्ही मला जाब विचारल्यासारखा फील का येतोय? मी स्पष्ट वर लिहिले आहे ते माझे वैयक्तिक मत आहे आणि ते मी कुणालाही मान्य करा अशा आग्रही सुरातही लिहीले नाही. शिवाय, हेही म्हटले आहे की, महाभारत घडले का नाही हे मी ठामपणे सांगू शकत नाही पण मी दोन्ही शक्यता गृहीत धरून त्यावर कायम मनन, चिंतन करत असतो कारण एकूणच महाभारत ही रचना माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अजून एक, जेव्हा मी महाभारत खरेच घडले असाही विचार करतो ना तेव्हाही मी दैवी शक्ती, देव वगैरे मानत नाही. एकूणच मी नास्तिक आहे. श्रद्धा ही सुद्धा माझ्यापासून खूप लांब राहते! ;) :D बोला, काय म्हणण आहे तुमच यावर? Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

तुमच्या प्रतिसादातून तुम्ही

उगा काहितरीच
Sat, 04/02/2016 - 23:26 नवीन
तुमच्या प्रतिसादातून तुम्ही मला जाब विचारल्यासारखा फील का येतोय?
बिलकुल नाही. तसं वाटत असेल तर ते माझी शब्दनिवड चुकली असावी.
मी दोन्ही शक्यता गृहीत धरून त्यावर कायम मनन, चिंतन करत असतो कारण एकूणच महाभारत ही रचना माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
सेम हिअर , माझ्याही अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे हा.
अजून एक, जेव्हा मी महाभारत खरेच घडले असाही विचार करतो ना तेव्हाही मी दैवी शक्ती, देव वगैरे मानत नाही. एकूणच मी नास्तिक आहे. श्रद्धा ही सुद्धा माझ्यापासून खूप लांब राहते! ;) :D बोला, काय म्हणण आहे तुमच यावर?
तर मग तुम्ही महाभारताचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे असे नम्रपणे सुचवू इच्छितो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

करतो ना...

चांदणे संदीप
Sat, 04/02/2016 - 23:45 नवीन
महाभारताचा ऐतीहासिक दृष्टीकोनातूनही अभ्यास जमेल तसा करत असतो. थोडंफार ऐकलेलं : ऐतिहासिक दृष्टीकोनातून जरा इंटरेस्टींग सांगतो, जळगावच्या जवळ कुठेतरी "कटापूर" नावाचे गाव आहे. सांगतात की भीमाने, बकासुराला मारून त्याचे हात धडापासून उखडून जेव्हा दूर फेकले तेव्हा ते इथेच येऊन पडलेले म्हणून त्या गावाचे नाव कटापूर असे पडले. सेम स्टोरी कोल्हापूरच्या पुढे कर्नाटक सीमेलगतच्या एका गावाबद्दलही (नक्की नाव आठवत नाही) ऐकली आहे. सोलापूर जिल्ह्यात, करमाळा तालुक्यात, एक गाव आहे "अंजनडोह" नावाचे. या गावाच्या नावाची कहाणी अशी सांगतात, की पांडव वनवासात असताना एकदा त्यांना खूप तहान लागली होती. तेव्हा अर्जुनाने याच ठिकाणी जमिनीत बाण मारून(बोअरवेल??) पाण्याचा झरा बाहेर काढला होता!! :) अशा बऱ्याच कथा/दंतकथा ठाऊक आहेत. भेटलो की निवांत गप्पा मारू! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

अशा बऱ्याच कथा/दंतकथा ठाऊक

उगा काहितरीच
Sat, 04/02/2016 - 23:55 नवीन
अशा बऱ्याच कथा/दंतकथा ठाऊक आहेत. भेटलो की निवांत गप्पा मारू!
चालेल चालेल ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

महाभारत झालेच नाही असे कसे

तर्राट जोकर
Sat, 04/02/2016 - 23:21 नवीन
महाभारत झालेच नाही असे कसे मानता येईल हो ? शेकड्यानी पुरावे आहेत ना साहेब . त्यावेळच्या जागा , वगैरे आजही आहेत . क्रुष्णासारख्या काही व्यक्तींची आजही पूजा वगैरे होते . (लोक कितीही भाबडे असले ना तरीही कादंबरीतल्या व्यक्तिरेखांची पूजा नाही करणार असे मला वाटते.) >> संतोषीमाता बद्दल ऐकले नाही तुम्ही?? स्वारी हां. अगदीच राहवले नाही म्हणुन अवांतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

सॉरी इथे विषय भरकटवू इच्छित

उगा काहितरीच
Sat, 04/02/2016 - 23:30 नवीन
सॉरी इथे विषय भरकटवू इच्छित नाही. खवतून याविषयी लिहीन. धन्यवाद .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय.

आनन्दा
Sun, 04/03/2016 - 09:35 नवीन
काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. पुढील वाक्ये कदाचित हा गैरसमज दूर करतील. १. संतोषी मातेची देवळे अगोदरपासून अस्तित्वात होती २. संतोषी माता ही देवी आहे असेच मानतात... अवतार मानत नाहीत. विशेषतः राम, कृष्ण आणि परशुराम यांना भारतीय साहित्यात एक ऐतिहासिक पुरुष म्हणून स्थान दिले आहे. तसे इतर कोणत्याही देवांचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

१. अगोदरपासून म्हणजे कधीपासून

तर्राट जोकर
Sun, 04/03/2016 - 12:46 नवीन
१. अगोदरपासून म्हणजे कधीपासून? २. दुसर्‍या मुद्द्यात खूप गोंधळ आहे. संदर्भ बघितले तर गोंधळ लक्षात येईल. पण हे अवांतर इथे करायचे आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

प्रतिसाद आवडला.

मृत्युन्जय
Mon, 04/04/2016 - 12:00 नवीन
प्रतिसाद आवडला. महाभारत खरेच झाले की नाही तो एका वेगळ्या चर्चेचा विषय होउ शकेल म्हणुन त्या मुद्द्याला या लेखात हातच लावला नाही. पण लेख लिहिताना असेच गृहीत धरले आहे की ते घडलेच. फक्त त्या महाभारताला दैवी कोंदणातुन मोकळे करुन मानवी सीमेवर बद्ध केले आहे इतकेच. त्यामुळेच दैवी अस्त्रांचे अस्तित्व या लेखापुरते अमान्य केले आही इतकेच. भीमाने कर्णाला ३१ वेळा हरवले असे जे म्हटले आहे त्याबद्दल बोलायचे झाल्यास ती अतिशयोक्तीच आहे पण भीम काही वेळेला कर्णाला वरचढ ठरला हे देखील सत्य आहे. पण भीम कर्णाला वरचढ ठरणे आणि कर्ण त्याला वरचढ ठरणे यात एक फरक होता तो असा की जेव्हा कर्णाने सर्वशक्तीन भीमाशी युद्ध केले तेव्हा भीमाला पुर्ण परास्त्र करुन त्याची पुरती मानखंडना करुन, त्याचा जीव घेणे शक्य असुनही तो न घेता त्याला अपमानित करुन सोडुन दिले. भीमाने कर्णावर असा निर्णायक विजय मिळवलेला दिसत नाही. अर्थात कर्णासमोर भीमाने दुर्योधनाच्या ३१ भावांना परलोकी धाडले हे ३१ पराभवांपेक्षा कमी देखील नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

कर्ण आणि अर्जुनांना प्यादे

मृत्युन्जय
Mon, 04/04/2016 - 12:04 नवीन
कर्ण आणि अर्जुनांना प्यादे म्हणण्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना प्यादे मी फक्त राजकारणाच्या खेळापुरते बोललो आहे. महाभारताचे युद्ध या दोन यौद्ध्यांचे जीवावरच लढले गेले. युधिष्टिराच्या दृष्टीने अर्जुन सर्वात मुख्य यौद्धा होता तर दुर्योधनाच्या दृष्टीने कर्ण. त्यामुळे बुद्धीबळाचा पट समोर मांडल्यास त्या दोघांना वजीर म्हणता येइल पण त्या दोघांच्या खांद्यावर बंदुक ठेउन कृष्ण दुर्योधनादी प्रभुतींनी राजकारणाचा जो पट मांडला होता त्या दृष्टीकोनातुन बघता या दोघांचा प्याद्यासारखाच उपयोग झाला असे दिसुन येइल. म्हणुन ही २ प्यादी. त्यांचे मुख्य युद्धातले आणि एकुणच महाभारतातले योगदान नक्कीच स्प्रूहणीय आहे आणी त्या पटावर त्यांना प्यादी नाही म्हणता येणार. राजकारण या विषयात मात्र दोघे थोडे कच्चे विद्यार्थी होते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

इंटरेस्टिंग मते

पैसा
Sat, 04/02/2016 - 19:47 नवीन
इंटरेस्टिंग मते
  • Log in or register to post comments

आमच्या शकुनीमामांना का म्हणून

दिग्विजय भोसले
Sat, 04/02/2016 - 20:45 नवीन
आमच्या शकुनीमामांना का म्हणून विसरलात? कृष्ण आणि शकुनी हे दोन राजकारणी होते ना?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा