Skip to main content

मिपाचे जावई व सुना, एक ओळख....! :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 15/12/2008 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो, आपण सर्वच जण येथे नेहमी येत असता, लिहीत असता, वाचत असता. मिपावर येणे झाले नाही तर चुकल्याचुकल्या सारखे वाटते, मिपा आता कुटुंबाप्रमाणेच आहे, इत्यादी.. असेही आपल्यापैकी बरेच जण अनेकदा म्हणताना आढळतात.. आता कुटुंबाचाच विषय निघाला तेव्हा अर्थातच प्रत्येकाच्या जोडीदाराचा विषयही ओघानेच आला. आणि म्हणूनच हा पेश्शल धागा मिपाकर सदस्यांच्या जोडीदारांकरता आहे. त्यांची ओळख करून घेण्याकरताच आम्ही ह धागा सुरू करत आहोत.. मिपावरील पुरुष सभासदांच्या जोडीदारांना इथे मिपाच्या सुना मानले आहे आणि स्त्री सभासदांच्या जोडीदाराला येथे मिपाचे जावई मानले आहे. तर मंडळी, प्रत्येकाने आपापल्या जोडीदाराची, म्हणजेच पर्यायाने मिपाच्या जावईसुनांची ओळख येथे करून द्यायची आहे! :) ओळखीचे स्वरूप - विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? :) जोडीदाराच्या आवडीनिवडी, एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या, एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? :) इत्यादी इत्यादी इत्यादी... जोडीदाराचा फोटूही येथे टाकल्यास उत्तमच, परंतु आग्रह अर्थातच नाही.. जे पतीपत्नी दोघेही इथले सभासद आहेत त्यांनीही एकमेकांची ओळख करून द्यायची आहे. अर्थात, ते शिक्रेट ठेवायचे असेल तर आग्रह नक्कीच नाही! :) आमच्यासारख्या अविवाहितांना आणि ब्रह्मचार्‍यांना या धाग्यात स्थान नाही! :) चला तर मंडळी, होऊ द्यात सर्वांना मिपाच्या गुणी जावई-सुनांची ओळख..! :) आपला, (अविवाहीत परंतु कुटुंबवत्सल!) तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33241
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

In reply to by पिवळा डांबिस

माझ्या मिपावर असण्यामुळे भरपूर शिव्याशाप उच्चारले जातात (शिवसेना - एकदम बाळासाहेब स्टाईल!!), पण ते बहुतेक वेळा तात्याला उद्देशून (मिपा काढल्याबद्दल!!! "मला सून म्हणतोय? माझ्या बारशाला आला होता का? आता भेटू दे तो तात्या!!! नाय त्याचे डेंगे मोडून चिंबोरीबरोबर उकळायला टाकला तर कायस्थाचं नांव नाय सांगणार!!!"
अग्गायायायाया..... ओ तात्या...सांभाळून हो...क्यालिफोर्नियाला जायचं म्हणताय शिंडीला भेटायला, डांबिसकाकांनापण भेटणार असाल तर बाहेरच भेटा...घरी नका जाऊ :)

In reply to by धमाल मुलगा

ओ तात्या...सांभाळून हो...क्यालिफोर्नियाला जायचं म्हणताय शिंडीला भेटायला, डांबिसकाकांनापण भेटणार असाल तर बाहेरच भेटा...घरी नका जाऊ असं नाय हां!!! ही बाई कितीही तडकली तरी आतिथ्याला मागे पडणार नाय हां!!!! आता जवळीक शिवसेनेची, त्याला कोण काय करणार?:) तेंव्हा तू निश्चिंत मनाने ये रे तात्या, आम्ही वाट पहात आहोत!!!:)

In reply to by पिवळा डांबिस

>>तेंव्हा तू निश्चिंत मनाने ये रे तात्या, आम्ही वाट पहात आहोत!!! बरेच दिवस कोणी सापडला पण नाही. ह. घे णे ---- सखाराम गटणे

तात्या, अवांतर, समांतर भरपूर चाल्लाव की. ओळख १६ जोड्यांची आणि प्रतिसाद १७६०... कसं करताव आता? बघा बुवा.. मजा येतेय खरंतर.. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

ओळखीचे स्वरूप - कसलं स्वरुप अन काय? ही मला चांगलीच ओळखून आहे. मी तिला ओळखून आहे असं मला दर काही दिवसानी नव्याने वाटत असतं! ;) विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? विवाह रीतसर एकमेकांना पाहून ठरला. तिने पाहिलेला पहिलाच मुलगा मी पण मी पाहिलेली ही सातवी मुलगी (आधीच्या सहा पैकी कोणी कोणास नाकारले ही माहिती गुप्त ठेवली आहे! [( ) नंतर बोलताना दोघांनीही एकमेकांना सांगितलं की पाहता क्षणीच दोघांच्याही डोक्यात घंटा वाजली की हाच माझा जोडीदार! जोडीदाराच्या आवडीनिवडी, मी/ती सिनेमा - बहुतेक सिनेमा बघताना मी झोपतो (फार कमी अपवाद)/ती कोणताही सिनेमा बघू शकते (असा तिला सार्थ अभिमान होता) (पण अलिकडेच काही सिनेमे असे निघाले की तिचे गर्वहरण झाले आहे! :B ) खाद्यपदार्थ - मोदक, गुलाबजाम, पावभाजी, शिरा आणि इतर असंख्य/पोहे, भेळ, पाणी-पुरी, रगडा-पॅटीस चटकमटक कडे जास्त ओढा. पुस्तके - दोघांनाही वाचायला आवडते. टीवी - घरी टीवी घेतलेला नाही त्यामुळे प्रश्न नाही! खेळ - बुद्धीबळ, क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल (हाताने खेळायचा अमेरिकन फुटबॉल नव्हे यूरोपियन!) / खेळ ह्या प्रकाराशी फारशी सलगी नाही. त्यातल्यात्यात पत्ते (भिकार-सावकारमधे ती कायम सावकार!) फळे - आंबा, पिकलेली गोड पपई, रसदार कलिंगड, मधुर केळी, रसरशीत स्ट्रॉबेरीज, जांभळं, पेरु जवळजवळ सगळीच मधुर फळं / आंबा (तोही शक्यतो हापूस) सोडला तर बाकीच्यांच्या वाटेला फारशी जात नाही. फिरणे - मला एकेकाळी फिरायची अवड होती हे मी आता विसरुन गेलोय! / तिला फारसे भटकायला आवडत नाही. शक्यतो घरीच मैफिल जमवावी, खावे प्यावे, भरपूर गप्पा कराव्यात ही आवड. माणसे - दोघांची समान आवड माणसे. घरी बोलवा. खा-प्या मजा करा, गप्पा करा, रात्ररात्र गप्पा करायचा उत्साह आहे (माझा तिच्यामुळे वाढला हे नक्की!) माणसांच्या पोटात शिरण्याची कला मात्र तिला अवगत आहे ह्यात काही वाद नाही! गोष्टी लक्षात ठेवणे - मी यथातथाच लक्षात ठेवतो. "कोण कोणास काय म्हणाले?" वगैरे प्रकारात माझे डोके चालत नाही! टेलीफोन नं, पासवर्डस, सांख्यिकी माहिती पक्की लक्षात ठेवतो! / ती म्हणजे काय लक्षात ठेवेल हे सांगता येत नाही. म्हणजे आमच्या चिरंजिवांच्या बारशाला (साधारण सात वर्षापूर्वी) माझ्या मामीने कोणती साडी नेसली होती (आणि कसा शिष्ठपणा केला - हे जास्त महत्त्वाचे ;) ) इथपासून ते मागल्या भारतवारीत निघता निघता मी कोणते छानछान ड्रेसेस तिला घ्यायला हवे होते इथपर्यंत सगळे लक्षात रहाते! ;) शिस्त - साधारणपणे नीट असल्या गोष्टी की चालते मला / प्रत्येक गोष्ट ही शिस्तीतच झाली पाहिजे ह्या तिच्या आग्रहामुळे माझ्या अनेक 'चांगल्या सवयी' मातीमोल ठरल्या आहेत (सूज्ञास अधिक सांगणे न लगे! ;) ) (उद्या चिरंजिवांनी दिवे लावले ना की माझ्याच नावाने फोडणार खडे - हे आवडतं पालुपद शिस्तीवरुन झालेल्या युद्धप्रसंगातलं) एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या, भांडणं भरपूर! खच्चून!! अहो तेरा वर्ष नियमाने करत आलोय ती. पण भांडणांनंतर ती जवळजवळ नेहेमीच उत्तम पदार्थ करुन खाऊ घालते! ;) त्यामुळे मी तिला चिडवतो की तुझं माथं गरम असतानाच तू पदार्थ बनवत जा, कसा झणझणीत होतो! तात्विक भांडणं भरपूर व्हायची हल्ली कमी होतात (कोण कोणास काय म्हणाले ह्याबाबतीतला माझा विसराळूपणा इथे नडतो - दुसरे काय?) मारामार्‍या नाही. फक्त शाब्दिक. (ती स्वयंपाकघरात असताना शक्यतो तेही नाही कारण लाटणे जवळच असते :O ) एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? मी एकटाच सभासद होतो तेव्हा सुरुवातीला व्हायची. ती आधीपासून फक्त वाचनमात्र होती पण नंतर मी धीराने आणि नेटाने तिला बराचकाळ मनवत हळूहळू सभासदत्त्वापर्यंत आणल्याने माझा डाव यशस्वी झाला आणि ती भांडणे संपली! :) आमचा फोटू - मिपावर झालेल्या बर्‍याच कट्ट्यातून तुम्हाला आस्मादिकांचे आणि आमच्या सौं चेदर्शन घडलेच आहे. खरं सांगू, घर, मुलगा, नवरा, स्वयंपाक, माणसं हे तिचं खरं प्रेम आहे! घरासाठी खपते ती. आज आमचा संसार ज्या काही भल्या स्थितीत आहे त्यात हिचा वाटा नि:संशय माझ्यापेक्षा जास्त आहे!! चतुरंग

In reply to by चतुरंग

खरं सांगू, घर, मुलगा, नवरा, स्वयंपाक, माणसं हे तिचं खरं प्रेम आहे! घरासाठी खपते ती. आज आमचा संसार ज्या काही भल्या स्थितीत आहे त्यात हिचा वाटा नि:संशय माझ्यापेक्षा जास्त आहे!! वाह! क्या बात है! खर्‍या अर्थी भावना पोचल्या! संसारात एकमेकांप्रती असेच प्रेम व आदर असावा.

मी / ती -- नवरा / बायको ---- नावः तिचं बदललं नाही / ती मला नावं ठेवत नाही (राम मिलाई जोडी असल्या सारखी आमची नावं अनुरूप आहेत !) वयः मी वयापेक्षा मोठा दिसतो असं तरूण मुलींना वाटतं / तिच्या पंचविशीनंतर तिचं वय वाढणं थांबलंय (असं मला बजावण्यात आलंय !) लग्न कसं जमलं?: पत्रिका बित्रिका बघून (तिला प्रेमविवाह करायचा नव्हता आणि माझे प्रेमविवाहाचे प्रयोग यशस्वी होत नव्हते !!!) लग्नाची अटः मला वकील किंवा डॉक्टर मुलगी नको होती / तिला फार काळ परदेशी वास्तव्य नको होतं (लग्न ठरलं तेव्हा ती पुण्यात वकिली करायची / लग्नानंतर एका वर्षात आम्ही अमेरिकेला आलो) पुस्तकं : दिसामाजी काही वाचावे / दिसामाजी काही वाचावे (माझं लेखन बाकी कुणी वाचो वा ना वाचो, घरी एक हक्काची वाचक आहे. महत्वाचे म्हणजे लेखनाबद्दल सडेतोड मत मिळतं... नवरा - बिवरा स्टेटस आड येत नाही... असं काही स्टेटस असतं का रे भाऊ ? !!!) जेवायच्या आवडी-निवडी: भरपूर (नखरे म्हणण्यापेक्षा जास्त) .. मी भेळ मात्र आदल्या दिवशी डिनर आणि दुसर्‍या दिवशी ब्रेकफास्टलाही खाऊ शकतो / ती सगळ्या भाज्या- बिज्या आवडीने खाते... (कसं काय जमतं माहिती नाही.... ज्या गावी जायचं नाही त्याची वाट का विचारावी? :) ) पसारा: असल्याशिवाय काम सुचत नाही / तिला पसारा दिसला की तो आवरायला लागते (ह्या बाबतीत मी चंद्रशेखर गोखलेंची ' घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं... एकाने पसरलं तर दुसर्‍याने आवरायचं' ही कविता पक्की लक्षात ठेवली आहे. :) ) पदार्थः ' आज जेवायला काय आहे? ' हा माझा आवडता प्रश्न / मला काय खावंसं वाटतंय ते माझ्याआधी तिला कळतं खाणं आवडतं?: मला बारा महिने, चोवीस तास / ती सुगरण (ह्याची खात्री पटल्यावरच लग्नाला हो म्हणालोय ना राव!!! माझ्या सासूबाई पुण्यात कुकिंग क्लासेस घेतात त्याचा पोटाला होणारा फायदा वेगळाच !!) (मिपाकर मित्र / मैत्रिणी घरी आल्याशिवाय कसं समजेल ? त्यामुळे हे आमंत्रण समजावे :) ) प्रकृती : बैठी / चळवळी भांडणं: त्याला काय कारण लागतं का? त्याशिवाय कुठला संसार सुखी असतो? नाटक / सिनेमा: कुठलाही सिनेमा पाहू शकतो / तिला चांगले तरी आवडतात किंवा 'चिक फ्लिक' :) छंद : भरपूर पण 'लष्कराच्या भाकर्‍या..' टाईपचे / खूप पण काळ्-वेळेचं भान राखून स्मरणशक्ती : मोजक्या तारखांशिवाय आकडे माझ्या लक्षात रहात नाहीत / ती माझी चालती-बोलती डिरेक्टरी आहे तूर्तास इथेच थांबतो ! --------- जोक्स अपार्ट, आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारांमुळे एकमेकांवरचा विश्वास वाढतच गेलाय हे एक सत्य !! ---------

In reply to by संदीप चित्रे

आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारांमुळे एकमेकांवरचा विश्वास वाढतच गेलाय हे एक सत्य !! चित्रे साहेब, लाखात एक बोललात. मोजक्या तारखांशिवाय आकडे माझ्या लक्षात रहात नाहीत / ती माझी चालती-बोलती डिरेक्टरी आहे आमचेही हे असेच आहे. आपला, (सहमत) भास्कर आम्ही येथे वसतो.

तात्या...काय जबरा काढलाय धागा...केवढं मोठं संकट..बोलायचं असतं खुप पण काय आहे की नीट बोलाव लागतं नाहीतर इथे लिहीताना मागुन मार पडायचा...तर आमचं असं... ओळखीचे स्वरूप - विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? : पिरेमातुन...हसु नका..लहानपणापासुन आम्ही पोरींच्या बाबतीत औरंगजेब होतो. रस्त्यावरुन मुलगी येताना दिसली की आम्ही आडबाजुची गल्ली धरुन जाणारे. त्यामुळे पिरेमातुन म्हणजे आम्हाला एक धक्काच होता आणि पालकांना तर आमच्यापेक्षा... जोडीदाराच्या आवडीनिवडी, मी/ती १. शाकाहारी/शाकाहारी...फक्त आम्हाला शाकाहारात आम्हाला पोळी/भाजी/वरण/भात इतकच माहीत..तर तीला कसल्या कसल्या फळांचे रस, कसले कसले सॅलड(कच्ची भाजी हो).... २. वडा-पाव/भेळ ३. भाजलेले शेंगदाणे/अजिबात नाय...(कॉलेस्ट्रोल वाढतं म्हणे...) ४. मिसळ(गोटा साफ करणारी :D ) /पाव-भाजी(अजुबाची) ५. गाणं गायचं/तबला वाजवते मित्रांनो (१-२ परीक्षा पण झाल्यात)...गुरुजींची आवडती विद्यार्थीनी.. ६. स्वयंपाक हे फक्त खावा/स्वयंपाक हा चांगला करावा व खावा..बघा मंडळी(लग्नानंतर ५७ किलो वरुन आपलं वजन ८० किलो झालं..२ वर्षात..काय समजलात मिश्टर).. ७. पिच्चर हे फक्त बघावेत/पिच्चर हे झोपण्यासाठीच असतात... ८. मला फुलं आवडुन घ्यावी लागतात/तिला दिलेलीही चालतात... एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या, १. हे काय चार चौघांच्यात चघळायचा विषय आहे का?? इति "ती" २. वैचारिक वाद कायम...पण आपण एक जोक नेहेमीच लक्षात ठेवलाय.. "नवरा बायकोच्या भांडणात एक नेहेमीच बरोबर असतो, दुसरा नवरा असतो".. ३. नो मारामारी...आम्ही(म्हणजे मी) कौटूंबिक हिंसाचाराच्या विरोधात आहोत...त्यावर माझा विश्वास आहे.....तसा तिचा नसावा बहुतेक... एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? नाही...कारण "ती" कविता वगैरे करते...त्यामूळे ती काय चाल्लं आहे आज मिपावर विचारत असते मधुन मधुन... एकूण छान चाल्ल आहे...कधी कधी ती माझ्या कपड्यांवरुन माझा पोपट करते. कधी कधी वेळ पाळण्यावरुन (?) घायकूतीला आणते. तरी पण पक्की पुणेकरीण आहे. शिस्त म्हणजे शिस्त. पण स्वयंपाक म्हणजे बघा लैच भारी करते...नशिब आपलं आपलं...सगळ्यांना निमंत्रण..कधी येताय सांगा..मस्त अण्णांचा 'रामकली' लावू आणि मिसळ/वाफाळलेला चहा/कॉफी करु... स्वगत : "आलो आलो....भांडी राहीली वाटतं आज माझ्या कडुन घासायची.. ;) "

In reply to by वाटाड्या...

"आलो आलो....भांडी राहीली वाटतं आज माझ्या कडुन घासायची.. आगदी खल्लास. =)) =)) नो मारामारी...आम्ही(म्हणजे मी) कौटूंबिक हिंसाचाराच्या विरोधात आहोत...त्यावर माझा विश्वास आहे.....तसा तिचा नसावा बहुतेक... =)) =)) मस्त अण्णांचा 'रामकली' लावू आणि मिसळ/वाफाळलेला चहा/कॉफी करु... काय आठवण काढली राव... चला आता स्वयपांक घरात काय चाललं आहे याचा कानोसा घेतो... आपला, (खादाड) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by वाटाड्या...

लहानपणापासुन आम्ही पोरींच्या बाबतीत औरंगजेब होतो. रस्त्यावरुन मुलगी येताना दिसली की आम्ही आडबाजुची गल्ली धरुन जाणारे. त्यामुळे पिरेमातुन म्हणजे आम्हाला एक धक्काच होता आणि पालकांना तर आमच्यापेक्षा... हाहाहा .... आमची (माझी आणि अभिरची अशीच काहीशी श्टूरी आहे) आमच्या लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी आमचा एक कॉमन मित्र (वयाने बराच मोठा आहे तो, ५०-५५!) घरी आला होता. त्याचं म्हणणं, "अदितीचं लव्ह मॅरेज झालं यात काहीही आश्चर्य नाही. पण अभिरचंपण! आणि ते पण अदितीशी!!". अर्थात आमच्याबद्दल जेव्हा "कुजबूज" सुरु झाली तेव्हा आम्ही दोघे मुंबईत नव्हतो पण कानावर आलेलं गॉसिप याच अर्थाचं होतं, "अदिती आणि अभिर? काहीतरी चूक होत आहे का?"

छान चालू आहे जावई -सुना परीचय..... मजा आली वाचुन..... उरलेली मंडळी कधी येताये...... (शिंगल & खुष ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

काही लिहिण्याची गरज नाही. पढवल्याप्रमाणे रंगरावांनी सगळं लिहिलय (नाहीतर धडगत नव्हती ना...).;) रेवती

ओळखीचे स्वरूप - किस्सा आहे... माझं इंजिनिअरिंग संपलं तेव्हा माझी एका मुलीशी ओळख झाली आणि तिच्याकडून माझ्या बायकोशी... ती मैत्रिण सायडिंगला पडली आणि आमची गाडी ट्रॅकवरून धावू लागली...:) विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? विवाहः- आंतरजातीय... बायको सी. के. पी अर्थातच प्रेम विवाह. भयंकर विरोध, माझ्याघरातून! नुकताच इंजिनिअर झालो होतो...ते ही गचके खात खात बोली भाषेतः- लै वेळा नापास होऊन (४ अक्षरी चार वर्षे) गाडी माझी धक्क्याला लागली होती...आणि बायको व्यवथित सेटल होती...तिचं त्यावेळी बुटीक होतं आणि मी नोकरीच्या शोधात...तिच्याघरातून तिच्या लग्नाचं बघत होते आणि हिचा जीव माझ्यावर!... एक ठरवलं होतं की, पळून जाऊन लग्न करायचं नाही...कधी कधी परीस्थिती बिकट वाटत असे... शेवटी २-२.५ वर्ष घासल्यानंतर २५ डिसेंबर २००५ ला लग्न लागलं...औंदा ३ वर्ष होतील...:) जोडीदाराच्या आवडीनिवडी, माझ्या- झोपा काढणे...दुपारीपण! त्यावरून तिची चिडचिड... दोघांनाही मासे प्र चं ड आवडतात...आणि पक्की सी के पी असल्यामुळे तिला मी आणलेले अजिबात पटत नाहीत, स्वत: जाऊन आणते. उत्तम सुगरण आहे...आणि खवय्यापण...लग्नाआधी मी अन्नभक्षण करणे एवढचं करायचो... लग्नानंतर चवीने खायला लागलो... छान चित्र/रांगोळी काढते... आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत एस एन डी टी पुणे कडून असणारी फेमस विद्यार्थिनी. फॅशन डिझायनिंग केलंय तिनं... दोन्ही घरातल्यांना सांभाळण्याची तारेवरची कसरत यशस्वीपणे चालू आहे तिची! नाटक, सिनेमा, मैफिली,फिरायची दोघांनाही आवड आहे...माणसं जोडायला मी तिच्याकडून शिकलो. तिला बाईक पण चालते फिरायला आणि मला कार शिवाय जायचा कंटाळा येतो...आणि गाडी स्पॉट पर्यंत जायला हवी हा माझा आग्रह असतो...त्यामुळे तिची इच्छा असूनही माथेरानला गेलेलो नाही अद्याप. पण आता जावसं वाटतंय...:) एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्‍या- डायरेक्ट अशा नाहीत्...पण मी कामानिमित्त मुंबईत आणि ती घरी पुण्यात असल्यामुळे (मी ही अस्सल पुणेरी आहे पण गेले ६ महिने जॉब मुंबईत असल्यामुळे शुक्र. पुणे आणि सोम. मुंबईत येतो) आमच्या पावणे दोन वर्षाच्या मुलीचं सगळं तीच करते...मी आल्यावर फक्त २-३ दिवस मुलीला तयार करणे शी धुणे वगैरे कामं मी करावीत अशी रास्त अपेक्षा. त्यावरून. मी हरतो. एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? नाही. कारण मी सोम्-शुक्र मिपा हापिसातून एक्सेस करतो...आणि पुण्याला गेल्यावर पूर्ण वेळ त्या दोघींना देतो...संगणकाला हातही लावत नाही. मला तिचा खूप अभिमान वाटतो! टचवूड:) मी त्या दोघींना खूप खूप 'मिस' करतोय आणि त्या पण मला! :(