Skip to main content

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … ३ (अंतिम )

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 16/07/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ (अंतिम ) भाग १ भाग २ २०१५ आज ३२ वर्षानंतरही संस्था वाढवण्याची स्पर्धा कमी होत नाही. कापड गल्लीत अजून एक कापडाचं दुकान चालतंच ! किंवा अजून थोडं वेगळं उदाहरण. एखाद्या मंदिरात जत्रेनिमित्य लाखोंची गर्दी होणार, आणि येणारा प्रत्येकजण एक प्रसादाचा नारळ घेणार असेल तर नारळाची भरपूर दुकाने निघणारच. काहीजण चार दुकाने टाकणार तर कुणी फक्त भांडवल टाकून दुकान दुसऱ्याला चालवायला देणार. विशिष्ठ लोकेशनच्य दुकानाचे अन ओरडणाऱ्याचे जास्त नारळ खपणार. ते खराब आहेत का चांगले, हे घरी गेल्याशिवाय नाही कळणार! घेणारे भाविक म्हणण्यापेक्षा - भावुक अधिक आहेत, तिथे फक्त विकण्याला महत्व. तसं आहे हे. घेणाऱ्यांनी विचार नाही केला तर देणाऱ्यांना काय पडलेय? खालील चित्रात २००६-१३ या काळात वाढलेली कॉलेजेस पाहिली की हे कळेल. सध्या सतरा लाख प्रवेश देशात होतात. त्यापैकी एक लाखाहून अधिक महाराष्ट्रात होतात. अनेक मोठ्या व्यक्तिंनी वेळोवेळी या वाढीवर जाहीर टीका केलीच आहे. 'मेट्रोमॅन' ई श्रीधरन यांनी तर थेट ही असली वाढ देशाला लाजिरवाणी असल्याचं म्हटलंय ! अभियांत्रिकीची संपूर्ण भारतात वाढलेली प्रवेश क्षमता : गेल्या सात वर्षात जवळ-जवळ चौपट! e मार्च २०१० मधे एक आशादायक बातमी वाचली होती. केंद्रीय मंत्रीमंडळाने परदेशी विद्यापीठांना काही अटींवर भारतात खासगी विद्यापीठे सुरु करायला परवानगी द्यायचं ठरवलं. (त्यावेळची वॉल स्ट्रीट जर्नल मधली ही बातमी) याला आधार असा होता की कुठल्याश्या पहाणीनुसार अजूनही तांत्रिक शिक्षण घेतलेले लोक जागतिक पातळीवर कमी पडणार आहेत. पण आपले शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे नाही. त्यामुळे इथल्या युवकांना ही संधी मिळणार नाही . त्यापेक्षा परदेशी विद्यापीठांनी इथे यावे तसेच भारतीय उद्योगांनी पण आपली विद्यापीठे काढावीत. शिवाय हे दोन्ही घटक भागीदारीत सुद्धा हे करू शकणार होते. सरकार डाव्या पक्षांवर अवलंबून नसल्याने हे शक्य आहे असा कयास होता. सरकारला हे माहीत होते की दर्जेदार शिक्षणाला प्रचंड खर्च आहे. तो करणे आपल्याला शक्य नाही. त्यापेक्षा हे सरळ सोपे आहे ते करून मोकळे व्हावे. असा निर्णय होण्यामागे पाश्चात्य देशांचा इंटरेस्ट असणारच. दरवर्षी लाखो मंडळी शिकायला तिकडे जातात आणि स्थायिक होतात. पण जे पैशाच्या थोडक्या कमतरतेमुळे जाऊ शकत नाहीत त्यातले काही इथेच मिळाले निम्म्या शुल्कात तर काय वाईट आहे? टाटा, विप्रो आणि काही आयटी कंपन्यांना अश्या विद्यापीठांमध्ये रस होता कारण सध्या दरवर्षी पास होणाऱ्या सतरा लाखातले एक लाख इंजिनियर पण थेट त्यांच्या कामाचे नसतात. त्यापेक्षा आपापले हवे तसे मनुष्यबळ तयार केलेले बरेच. पण असं काही पुढे झालंच नाही. कुठे माशी शिंकली? सरकारमध्ये सामील महान मंडळी आडवी आली. या विद्यापीठांनी '' Non-profit organization'' असण्याची मुख्य अट आणि वर त्यांनी या संस्थांतही घटनेनुसार ५०% आरक्षणाची अट पुढे केली. या कल्पनेचे उद्धिष्ट वेगळे आहे, १००% भांडवल खासगी आहे याचा सोयीस्कर विसर पडला, अश्या अटी मान्य करणे त्या विद्यापीठांना शक्य नव्हते आणि सरकारला पण ती फी भरणे शक्य नव्हते. एकूण योजना बारगळलीच. आता पुन्हा बोलावले तरी ही विद्यापीठे येतील असं वाटत नाही. त्यातली मेख अशी होती की अश्या फक्त दहा विद्यापीठांनी सध्याच्या १५००० खासगी संस्थांचे पितळ उघड केले असते. दर्जा म्हणजे काय ते लोकांना पहायला मिळाले असते. संशोधनाची संस्कृती आली असती - किंवा सुरु तरी झाली असती. सध्याच्या संस्थांची क्याम्पस प्लेसमेन्ट बंद झाली असती. आपल्या मुळाशी येणारी अशी काही सुधारणा त्यांना नको होती. एकूण काय, इच्छाशक्तीअभावी ही हाताशी आलेली मोठी संधी गेली. तरीही प्रत्येक सरकार काहीतरी वेगळं करू पाहातंच. पण चुकीचे निर्णय झाले की अनेक पिढ्या परिणाम भोगत बसतात. आता पुन्हा सरकार बदलले असल्याने कांही नवे निर्णय येणे साहजिकच आहे. त्यानुसार कर्नाटकच्या धर्तीवर सर्व महाराष्ट्रात एकच तंत्रविद्यापीठ असणार आहे असं समजतंय . याच्या चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू आहेत. चांगली बाजू अशी की सध्या मुलांमधे विभागीय कॉम्प्लेक्स खूप जास्त आहे. अन्य ठिकाणी BE झालेल्यांना पुण्यामुंबईत काहीसं कमी लेखलं जातं, ते होणार नाही. सर्वांनी एकसारखीच परीक्षा दिलेली असल्याने भेदभाव होणार नाही. अन्य कांही राज्यांत याचा फायदा झाला आहे. सध्या परीक्षा व्यवस्थेवर ताण आहे तो परीक्षक कमी संख्येने आहेत म्हणून. विभागीय असमतोल असूनही अन्य विभागात पेपर तपासणीला पाठवता येतील. निकाल वेळेवर लागतील . मर्यादा अशी आहे की या सर्व शिक्षकांना एका पातळीवर प्रशिक्षित करणे कठीण काम आहे. '' चलता है '' मनोवृत्ती ग्रामीण संस्थांत कमालीची दिसून येते. मी काही ठिकाणी परीक्षक म्हणून जात असे तेव्हां ही मंडळी कधी भिकाऱ्यागत 'मार्क्स चांगले द्या ' म्हणून गयावया करत. त्यांना नि:पक्षपाती परीक्षेचे महत्व, त्याचा मुलांना होणारा फायदा , हुशार मुलांवर होणारा अन्याय , हे काही सांगून समजत नसे. शेवटी ते असेही सांगत की, '' आमच्या नोकरीचा प्रश्न आहे … '' संस्थाचालक मुलांच्या पासिंगवरून त्यांची नोकरी चालू ठेवायची का हे ठरवतात! मग अशा वेळी मुद्देच संपतात. असले प्रकार आता शहरातही होऊ लागलेत. एकाच विद्यापीठ आल्यावर अश्या ठिकाणांना आणि चांगल्या संस्थांना वेगळे करणे कठीण होणार. म्हणजेच ' सब घोडे बारा टक्के' ची शक्यता आहे . जर काही गैरव्यवहार झाले तर संपूर्ण विद्यापीठ बदनाम होऊ शकते. याचा भारताबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसू शकेल. पण हे सगळे झाले जर-तर . आता यावर्षीचे अभियांत्रिकी प्रवेशाचे महाराष्ट्रापुरते आकडे पाहू : महाराष्ट्रातल्या एकूण मंजूर जागा: १,६५,००० आलेले अर्ज: १,१०,००० रिक्त जागा : ५५,००० अंतिम किमान रिक्त जागांचा अंदाज : ७०,००० (४२%) अचूक अंतिम चित्र सप्टेंबरमध्ये स्पष्ट होईल लवकरच हा रिक्त जागांचा आकडा ५०% पेक्षा वाढेल. कारण यावर्षीसुद्धा नव्या संस्था आणि तुकड्या आल्याच आहेत ! आजची अवस्था हे बाळसे नसून सूज आहे, हे कळत असूनही वळत नाही अशी सगळ्यांची अवस्था आहे . ''अति तिथं माती '' ची ही केस. आमच्या कंपनीतल्या क्याम्पसला जाणाऱ्या लोकांच्या अंदाजाने खरी गरज याच्या निम्मी पण नाहीय. महाराष्ट्रासाठी त्यांनी फक्त सोळा कॉलेजेसची यादी केलीय त्याबाहेरील कॉलेजच्या लोकांना ते फ्रेशर म्हणून घेतच नाहीत. अन्यत्र पास झालेल्यांना दोन वर्षे अनुभव असल्यास परीक्षा घेऊन- अनुभवाचा खरेपणा तपासून मग घेतात. विशेष म्हणजे तीन सर्वोत्तम कॉलेजेसमधूनही घेत नाहीत कारण तिथली मुले अमेरिकेला किंवा व्यवस्थापनाकडे नक्कीच जातात. ट्रेनिंग पूर्ण होता होता कंपनी सोडतात ! सामाजिक परिणाम: माझ्याकडे गावाकडचे दोन जुळे बंधू जॉबसाठी मदत करा म्हणून भेटायला येतात. हे खरं जुळ्याचं दुखणं . एकाला इंजिनियर केलं म्हणून दुसऱ्यालाही केलं. पदवीप्रमाणे ज्ञान दोघांनाही नाही. घरची गरिबी असूनही ते दोघे लहान खेड्यात BE झाले. त्यात नऊ लाख खर्च झालाय आणि पुण्यात काटकसरीने राहून सात महिने नोकरी शोधतायत. घरून खर्चासाठी दोघात पाचसात हजार महिना मिळतात. आता पालकांची सहनशक्ती संपत आलीय. अत्यंत निराशेत असणारे पण हिम्मतीने घरची शेती करायला नको म्हणणारे हे दोघेजण केवळ प्रातिनिधिक आहेत. अशी किती मुले- मुली नोकरी शोधत फिरत असतील? शिक्षणाची गंगा (?) गावात पोहोचवण्याचा दावा करणाऱ्यांनी नक्की विचार करावा . अर्थव्यवस्थेत वाटा: २००७ च्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यस्तरावर सोळाशे कोटी रुपये शुल्क घेतले गेले. अनधिकृत आकडा देवाला ठाऊक . आज त्यावेळेपेक्षा दुप्पट मुले इंजिनियरिंग करतात आणि वाढीव फीनुसार वर्षाला किमान तीन हजार कोटी गोळा होत असू शकतील. एव्हढा खर्च करून हा आउटकम समर्थनीय नाहीच. या उत्पन्नावर या संस्था कर भरतात का? तसेच या मुलांनी बँकेतून कर्ज काढलेले असेल तर ते नोकरी न मिळाल्याने फेडू शकतील् का? नसल्यास बँकेचे - पर्यायाने मोठे राष्ट्रीय नुकसान होणार आहे . किंवा काही पालक शेत विकून किंवा गहाण ठेवून पैसे घेतात. अधिकांश मुले नोकरीत जाण्यायोग्य नाहीत , हे माहित असूनही प्रशिक्षणावर मेहेनत घेतली जात नाही. काहीवेळा तर इंग्रजी न येणे किंवा आत्मविश्वास नसल्याने चांगली मुले मागे पडतात. पासिंगची टक्केवारी एकूणच ही समस्या दीर्घकालीन प्रश्न निर्माण करेल असे वाटते. गेली तीस वर्षे या सगळ्याचा तटस्थ साक्षीदार म्हणून पहाताना मला चित्र फारसे आशादायक वाटत नाही. त्या क्षेत्रातल्या आणि उद्योगातल्या लोकांनाही त्यांच्या कडून फार अपेक्षा नाहीत. संस्थाचालकांना हे ठाऊक आहे पण चालतेय तितके दिवस ते कमावून घेणारच. इंडस्ट्रीला लागेल तसे इंजिनियर्स ते घेणार- शिकवणार, वापरणार - नको तेव्हा काढून टाकणार. मग कळत कुणाला नाहीय? तर आपल्याला - म्हणजे पालकांना. पूर्वी मी शिक्षणक्षेत्रात काम केले असल्याने अनेकजण एकमेकांच्या ओळखीने सल्ला घेण्यासाठी संपर्क साधतात. परवा एका पालकाला थम्ब रूल सांगितला. मेरीट लिस्ट लागलीय- कित्येक लाख मुलं पात्र ठरली आहेत . तुमच्या पाल्याचा क्रमांक पहिल्या दहा हजारात असेल तरच अभियांत्रिकीचा विचार करा अन्यथा दुसरं काहीतरी करा . त्यांना पटलं नसेलच. पण नंतर निराश होण्यापेक्षा आधीच काहीतरी भरीव करायला घेतलेलं बरं. सरकार नियंत्रण करीत नसेल तर आपण आपल्यापुरते नक्कीच करू शकतो . सरकारने हस्तक्षेप करून कडक निकष लावून देशभरातला इनटेक सतरा लाखवरून सात लाख इतका तरी कमी केला आणि दर्जा वाढवला तर काही बरे होऊ शकते. या वळणावर कठोर निर्णय लागणार! शैक्षणिक संस्था स्वतःहून काहीही करणार नाहीत. पुढे काय? (हा अनाहूत सल्ला मिपाकरांना नसून (मिपाकर लै पोचलेले आहेत!) घरट्यातून डोके काढून डोळे किलकिले करून वास्तव जगाकडे पहाणाऱ्या नवोदित अभियंत्यांना आहे.सुदैवाने अनेक मुलांना वास्तवाची जाणीव झाली आहे.) बाबांनो आणि बबड्यानो ! आयटीत जाण्याने ऐटीत रहाण्याची वेळ आतां राहिली नाहीय. या क्षेत्रातली वाढ ३०% प्रतिवर्ष वरून १०.२% वर आली आहे म्हणे. दिवसेंदिवस त्याना मिळणारा प्रतितास दरही कमी होत गेल्याने जास्त पगार ते देऊ शकत नाहीत. जुनी खोडं स्वतः टिकून रहातात. त्याबदल्यात दहावीस माणसं सहज कमी करून कंपनीला फायदा दाखवतात आणि त्यामुळे काम करणाऱ्या मोजक्या लोकांवर ताण पडतो. सध्या निवृत्तीचं प्रमाण कमी आहे पण पाच वर्षात ते वाढेल अकाली निवृत्ती आणि सक्तीची निवृती सुरु होईल, आणि काहीशी संधी सुरु होईल - पण जे आधीच तिथे असतील त्याना. त्यामुळे नुसत्या आयटीचा विचार सोडून द्यावा. मिळत असेल तर नक्की जावे, पण आपल्या कोअर ब्रांचचा अभ्यास चालूच ठेवावा. ज्याच्याकडे स्किल आहे त्याला सर्व क्षेत्रांत नेहमीच मागणी राहील. किंवा त्याऐवजी स्टार्टअप्स बद्दल माहिती घेऊन त्यात काम करावं. किंवा विक्रीची कला असेल तर सेल्स मध्ये करियर करावं. ती कला नसल्यास अवगत करावी . बी पी ओ किंवा तश्या प्रकारच्या कामापासून खूप दूर राहावं आणि भरपूर कष्टाची सवय लावून घ्यावी. स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने नोकरी सुरु केल्यास एक वेगळाच अनुभव मिळतो. मेरीट लिस्ट मध्ये अगदी तळाशी असलेल्या एक लाख मुलांनी तर स्किल इंडिया सारख्या योजनेत सहभागी व्हावे. मिसळपाव वर 'क्लोंडाईक गोल्ड रश' वाचताना मला या सगळ्या प्रकाराची राहून राहून आठवण येत होती. थेट तुलना होऊ शकत नसली तरी 'कमालीची लालसा' हे साम्य आहेच - आपल्या समाजाला ते कुठे नेणार हे समजण्यापलीकडचे आहे. ( समाप्त ) संदर्भ, आकडे आणि चित्रे: पहिल्या भागात दुवे दिलेली AICTE आणि DTE यांची अधिकृत संस्थळे.

वाचने 47222
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

वास्तवदर्शी लेख मालिका आवडली. एकदा पुण्यातील एका अगदी छोट्या कंपनीसाठी संगणक अभियंते निवडताना प्लेसमेंट सर्वीसचे चार्जेस कंपनीचे मालक देत नाही म्हणाले म्हणून कँडीडेटच्या पगारातून पैसे घेणार्‍या प्लेसमेंट सर्वीस कडून ४-५ कँडिडेट घेतले. सहा साडेसहा हजाराच्या जॉबसाठी मुले उड्यामारून तयार होती कारण ग्रामीण भागातून आलेली बरीच (अभियंता) मुले रोजंदारीचे आयटीया लेव्हलचे कामगार म्हणून तीन साडेतीन हजारावर (१२ तास) काम करत होती त्यातले पहिल्या महिन्याचे चाळीस टक्के प्लेसमेंट एजन्सी घेणार. आणि एवढे करून हे जॉबही परमनंट असणार नाहीत म्हणजे दर सहा महिन्यानी प्लेसमेंट एजन्सीला चाळीस टक्के देणे आले. प्लेसमेंट एजन्सीला त्यांचे चाळीस टक्के मिळावेत आणि मुलांनी सहा महिन्याच्या आतही जॉब सोडू नये म्हणून त्यांच्या सर्टीफीकेट्सची ओरीजनल्स या प्लेसमेंट कंपन्या ठेऊन घेणार थोडक्यात अभियंत्यांकडून वेठबिगारी. बर्‍याच मुलांच्या ग्रामीण पालकांनी कोरडवाहू जमीन ठेवण्यापेक्षा आहे नाही ती जमीन विकून ह्या मुलांना मोठ्या आशेने अभियांत्रिकी शिक्षण दिलेले ज्ञान आणि एक्सपोजरच्या अभावाने आणि स्पर्धा ह्या कारणांनी मुले अपेक्षीत पगार सोडाच शहरातील स्वतःच्या जेवणाचे आणि राहाण्याचे पैसे मिळाले तर पुरे. वर जिथे जिथे मुले लिहिले त्यात अभियंत्या मुलीही आल्या. अशीच परवड एम बी ए ची कॉलेजेस अत्याधिक प्रमाणात काढूनही केली गेली. अर्थात अशा महाविद्यालयातून बाहेर पडलेला कठीण परिस्थितीला तोंड देणारा विद्यार्थीवर्ग निमुटपणे सहन करत असतो मिसळ पाव सारख्या संकेतस्थळावरून त्यांनी त्यांच्या समस्यांबद्दल बोलते व्हावयास हवे तरच त्यांच्या समस्यांच्या गांभीर्याचा अंदाज समाजापुढे अधीक व्यवस्थीतपणे पुढे येऊ शकेल.

In reply to by माहितगार

अशीच परवड एम बी ए ची कॉलेजेस अत्याधिक प्रमाणात काढूनही केली गेली.
एमबीए हा इंजीनियरिंगपेक्षा भयानक प्रकार आहे. एका जाणत्या माणसाला या बाबत लिहितं करायच्या प्रयत्नात आहे.

In reply to by माहितगार

त्यांच्या सर्टीफीकेट्सची ओरीजनल्स या प्लेसमेंट कंपन्या ठेऊन घेणार
ओरिजिनल्स कशा काय ठेवता येतात? शाळा कॉलेजात ठेवणे वेगळे. हे बेकायदेशीर वाटते. आणि कंपन्या तरी थेट भरती का करत नाहीत? त्यांच्याकडे एच आर वाले लोक असतातच.

In reply to by पैसा

ओरिजिनल्स कशा काय ठेवता येतात?
सन्माननीय हे हल्ली फ़्रेशरच्या बाबतीत सर्रास होते. मुळ कागदपत्रे कंपनीकडे अडकून पडल्याने वेठबिगारी करण्यापलीकडे पर्याय नसतो.

In reply to by सतिश गावडे

भयन्कर आहे! असं हैदराबादला करतात हे ऐकलं होतं. महाराष्ट्रात असं काही ऐकलं नव्हतं. म्हणूनच हल्ली कंपन्या पार्श्वभूमी तपासण्यासाठी वेगळ्या संस्था नियुक्त करतात. खरा अनुभव नसतो आणि असे दोन वर्षे ओलिस राहून बाहेर पडणारे 'बिचारे' मुलाखतीस येतात.

अतिशय समर्पक आढावा घेण्याचा स्तुत्य प्रयत्न. चतुरंग

मिपाकरांनी फाट्यावर मारलेल्या माझ्या डॉ. प्रकाश पवार यांच्या 'आरक्षण' विषयक लेखाच्या निमीत्ताने या धागा लेखातून या धाग्यासाठी एक अनुषंगीक अवांतर मुद्दा. ... *वाढत्या लोकसंख्येचा बेरोजगारी वरील प्रभाव; शैक्षणिक क्षेत्रातून मागणी पेक्षा पुरवठा अधिक देणार्‍या शैक्षणिक संस्थांचे खर्चीक ढोंग व त्यातून उत्पन्न होणारी छूपी बेरोजगारी आणि उद्योजकाता विकास चळवळीच्या अपयशाचा परामर्ष: आरक्षण विषयाचे विश्लेषण होताना ज्या काही महत्वाच्या मुद्यांची चर्चा होताना दिसत नाही त्यात एक म्हणजे वाढती लोकसंख्या आणि त्या मानाने रोजगाराची अनुपलब्धततेतून येणारा सामाजिक दबाव. यातीलच समांतर मुद्दा शैक्षणिक पात्रतेस अनुसरून रोजगार नसलेल्या छूप्या बेरोजगारीचाही आहे. शैक्षणिक पात्रतेस अनुसरून रोजगार नसलेल्या छूप्या बेरोजगारीचा प्रश्न नवीन नाही, गेल्या वीसवर्षातील यातील नवीन बाब म्हणजे शिक्षणाचे खासगी करण झाल्यानंतर ज्या उज्वल भवितव्याची स्वप्ने यूवकांना दाखवून त्यांच्या कडून भरमसाठ देणग्या घेऊन शिक्षण दिल त्या प्रमाणात त्यांना प्रत्यक्षात रोजगार संधी उपलब्ध झाल्या नाहीत यातील एक कारण पुरवठा आणि मागणी यातील तफावत राहील आहे. ग्रामीण भागातील उंच देणग्या देऊनही रोजगार प्राप्त न झालेल्या यूवकांना मुंबई पुण्यात ज्या वेठ बिगारीला तोंड द्याव लागत ते ज्या संवेदनशील लोंकांनी जवळून अनुभवल असेल तेच सांगू शकतील अथवा त्या अनुभवातून गेलेले तरूणच त्यांची लाजीरवाणी स्थिती समोर मांडू शकतील. लोकसंख्येचे प्रश्न आणि हा असंतोष समाजात खदखदत असणे आश्चर्याचे नाही ही गोष्ट येथे लक्षात घेणे जरूरीचे वाटते. पण याच उत्तर उद्योजकता विकासात आहे की आरक्षणात हे या प्रश्नाला शांत चित्ताने भिडल्या नंतरच कळू शकते. ....

अत्यंत पोटतिडकीने लिहिलेली आणि वाचकांचे डोळे खाडकन डोळे उघडणारी लेखमाला. हे असे फक्त इंजिनीरिंग मधेच चालले आहे असे नाही , सर्वच क्षेत्रात शिक्षणाची अशी वाट लावायचा विडा उचलला आहे या शिक्षण सम्राटांनी . सरस्वतीला यांनी लिपस्टिक लाउन बाजारात उभे केले आहे. पैजारबुवा,

प्राथमिक प्रवेश फेरी आता झाली आहे- यात विशेष रस असल्याने यावर्षी किती जागा मोकळ्या जागा रहातात त्याची उत्सुकता आहे. पहिल्या फेरीत मिळालेल्या जागी काही ना काही कारणाने हजारो लोक्स जातच नाहीत. परिणामी त्या मोकळ्या राहतात. आता समुपदेशन सुरु झाले आहे. त्यातून उरलेले प्रवेश होतील. मेडिकलला मात्र जरी दुसऱ्या फेरीत मिळणार असेल तरी पहिले जिथे मिळाले तिथे रीतसर प्रवेश घ्यावाच लागतो. खासगी असले तरी . आभियांत्रिकीलाही २००० साला पर्यंत असं होत होतं की जागांपेक्षा दोनतीन हजार अर्ज जास्त येत. तितक्या लोकांना प्रवेश मिळत नसे. तेंव्हा रिपोर्ट न करणारे या प्रक्रियेतून बाद होत. यावर्षी असेही अर्जच कमी आल्याने पासष्ठ हजार मोकळ्या जागा असणार हे आपण पाहिलं आहे. आता मिळूनही प्रवेश न घेणारे किंवा अन्य अभ्यासक्रमाला जाणारे त्यात वाढतील. कॉलेजे लोकांना बोलवू-बोलवून नेऊ लागलीत . खालील आलेखात पन्नास प्रकारच्या शाखांपैकी प्रातिनिधिक फक्त पाच शाखांची आकडेवारी पहा. n पुणे, विदर्भ, शिवाजी, मुंबई, मराठवाडा या क्रमाने विद्यापीठामधे अनावश्यक संस्था आहेत असे दिसते. हे अत्यंत रोचक आहे. अन्य छोट्या विद्यापीठात एकूण जागाच कमी, त्यामुळे रिकाम्या जागाही कमी आहेत. जसे बाटु- लोणेरे, किंवा गोंडवन विद्यापीठ. ते इथे परिणाम करत नसल्याने धरले नाहीत. सोयीसाठी पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाडा आणि विदर्भातल्या प्रत्येकी दोन विद्यापीठांना एकत्र केले आहे. (तसेही नुसत्या राजकारणानेच त्यांना वेगळे केलेय!) आता दहा ऑगस्ट पर्यंत अचूक आकडा कळेल. पण लेखात म्हटलेली लालसा विभागवार स्पष्ट होते! जनता हुशार आहे. सुमार संस्थांना मस्त फाट्यावर मारले आहे. एका संस्थेत कुठल्याश्या शाखेत सर्व १२० जागा म्हणजे दोन्ही तुकड्या मोकळ्या राहिल्या आहेत ! (त्याला परवानगी देणारे आता कुठे असतील?) विशेष म्हणजे शासकीय अभियांत्रिकी (अवसरी-पुणे ) मध्ये इलेकट्रोनिक्सच्या १७ जागा मोकळ्या गेल्या. मंत्र्यांनी मनमानी करत गावाकडे काढलेले सरकारी कॉलेज असल्याने हुशार मुलांनी पाठ फिरवली आहे. एकूण बरीच माहिती मनोरंजक आहे. पालक सुजाण असल्याचे पाहून आनंद वाटला ! अधिक सविस्तर संस्थानिहाय माहितीसाठी या ठिकाणी पाहता येईल.

In reply to by खेडूत

'जनता हुशार आहे. सुमार संस्थांना फाट्यावर मारले आहे' तेच तर. मागणी होती म्हणून पुरवठा बेबंद वाढला. गैरव्यवहार वाढले. हे अर्थात गैरव्यवहारांचे समर्थन नाही, ती 'का?' या प्रश्नाची चिकित्सा आहे. मागणी घटली की आपोआपच या संस्था बंद पडतील किंवा नवी कुरणे शोधतील. जनता मेंढरांसारखी वागताना दिसली तरी त्यात एक व्यवहार असतो, रोजीरोटीचा व्यवहार. आणि व्यवहारवाद हे एक उघडे-नागडे, कुरूप असे वास्तव असते.

In reply to by खेडूत

कॉलेजे लोकांना बोलवू-बोलवून नेऊ लागलीत .
हे कधीच सुरू झालंय. २ वर्षांपूर्वी माझ्या मुलाला सीईटी नंतर असे कित्येक ईमेल्स आणि एसेमेस आले. आमचे कॉलेज असे आणि तसे, फीमधे सवलत देऊ वगैरे. त्याला गोव्यात आम्ही रहातो तिथेच सरकारी कॉलेजमधे मेक्यानिकलला पहिल्याच राउंडमधे अ‍ॅडमिशन मिळाल्याने महाराष्ट्र सीईटीला चांगले मार्क्स असूनही बाकी काही विचारही केला नाही.

विना अनुदानित कोलेज मध्ये या वर्षी ८० हजार जागा रिकाम्या राहणार आहेत. बिच्चारे कोलेज चालक. केंद्र सरकार या करता योग्य पाऊले उचलत आहे. हे बघा .. थोडक्यात विना अनुदानित ला ३२०० बकरे मिळतील जे एरवी NIT मध्ये जाऊ शकले असते. आहे कि नाही सरकार डोकेबाज ? http://www.loksatta.com/kg-to-college-news/nit-waste-of-space-this-year… विविध कारणांमुळे प्रवेश रद्द करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जागा अन्य प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांमधून भरण्याऐवजी त्या रिक्तच ठेवण्याचे अनाकलनीय धोरण 'नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी'ने (एनआयटी) राबविल्याने देशातील 'आयआयटी'खालोखाल प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या तंत्रशिक्षण संस्थेतील तब्बल ३२०० जागा यंदा चक्क वाया जाणार आहेत. थोडय़ाफार गुणांनी एनआयटीचा प्रवेश हुकलेल्या हजारो विद्यार्थ्यांवर यामुळे मोठा अन्याय होणार आहे

In reply to by अभिजित - १

एन आय टी आणि नव्या आय आय टीज मध्ये हल्ली (२००९ नंतर )जागा शिल्लक रहातात. अश्या एकूण ९० संस्था एकत्र अ. भा. पातळीवर प्रवेश प्रक्रिया करतात . गेल्या वर्षी सुद्धा बरोब्बर २ ऑगस्टला अशाच मोकळ्या राहिलेल्या जागांबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने या संस्थांना सुनावले होते. मनुष्यबळ मंत्रालयाला पुढील वर्षी (२०१५-१६) उपाय शोधण्यास सांगितले होते. त्यामुळे यावर्षी ते झाल्यास विद्यार्थी पुन्हा न्यायालयात जातील आणि किमान पैसे परत मिळवतील. या संस्थांना अश्या जागांचे या वर्षी १४.५ कोटी रुपये मिळाले तरी पुढच्या तीन वर्षात मिळू शकणारे १०० कोटी बुडणार आहेत . त्यामुळे असे करणे मुळीच शहाणपणाचे नाही ! मात्र हे इतर राज्यातल्या खासगी संस्थांच्या फायद्यासाठी केले जाते असे नाही. देशभरात अभियांत्रिकीच्या सुमारे साडेपाच लाख जागा मोकळ्या रहातात. या तीन हजाराने त्या संस्थाना फरक पडत नाही. निव्वळ लाल फितीच्या कारभाराचा नमुना आहे! मागास विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार भरत असते. खासगी संस्था ते सरकारकडून मिळवतात. त्यामुळे कसेही करून इनटेक वाढवणे , मागास विद्यार्थ्यांना आकर्षित करून, प्रवेश देऊन शासनाकडून शुल्क उकळणे - सर्वांना उत्तीर्ण करून पुढील वर्षीचे उत्पन्न निश्चित करणे असा खेळ चालू असतो. त्यापुढे जाउन अस्तित्वात नसलेल्या विद्यार्थ्यांचे पैसे लाटण्याचेही प्रकार झाले आहेत. यावर्षीच्या ८०,००० मोकळ्या जागांमध्ये मागास विद्यार्थांच्या जागा ७०% असू शकतात. याचे कारण मुळात गरजच नसताना प्रवेश क्षमता वाढली आहे . अजून १५ दिवसांत अधिकृत आकडेवारी मिळेल असा अंदाज आहे.

आणि अजून एक . मागास वर्गीय विद्यार्थी लोकांचे भले व्हावे म्हणून त्यांना आरक्षण आहेच. पण या खासगी कोलेज मध्ये पण त्यांना जागा असतात आणि त्यांची करोडो रु ची फ़ी दयाळू सरकार भरते. अर्थात कोलेज चालाकंचे भले व्हावे हाच खरा हेतू. इतर ठिकाणी सरकार कडे पैसा नाही . पण इथे उडवायला आहे. सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे भाजप सरकार येउन पण हा प्रकार अजून हि चालूच आहे. खेडूत साहेब जरा याच्यावर पण प्रकाश टाकाल का ? नक्की किती जागा / सरकार दर वर्षी किती पैसे भरते इथे ?

त्यानंतर चित्र क्लीअर होईल. पण अंदाजे ६०००० जागा रिकाम्या रहातील असा अंदाज आहे. जिथे जागा भरल्या जाणार नाहीत अथवा खूप कमी भरतील, ती कॉलेज बंद पडायच्या मार्गावर आहेत. वाईट तिथल्या स्टाफचे वाटते. त्यांच्या नोकरीचे काय?

धागा वर काढत आहे- मुख्यतः जे पालक येत्या वर्षा दोन वर्षांत पाल्याला अभियांत्रिकीला पाठवू इच्छितात आणि त्या क्षेत्राची माहिती नाही, त्याना उपयोग व्हावा. या वेळची प्रवेश प्रक्रिया- २०१६ संपली. यावर्षीही पालक आणि विद्यार्थी, दोघांनीही ते सजग असल्याचे दाखवून दिले आहे. मोकळ्या जागा रहात असल्याने नियमावलीचे पालन करत सरकारने तीस हजार जागा आधीच कमी केल्या होत्या. त्यामुळे आधीच्या १,६५,००० जागांच्या तुलनेत यावर्षी १,३५,००० जागा होत्या. कॉलेजांनीही विद्यार्थी आकर्षित करण्यासाठी फी कमी केली आहे. त्यांपैकी अवघ्या ७१,००० जागा भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे निम्म्या जागा रिकाम्या रहाण्याचा ट्रेंड तसाच राहिला आहे. आता पुढच्या वर्षी ही सूज अजून उतरते का ते पहायचे! एक रोचक गोष्ट अशी: पुणे (२९ हजार) आणि मुंबई (१७ हजार) या दोन विद्यापीठ क्षेत्रांत ६५% प्रवेश झालेत. म्हणजे अवघे ३५% प्रवेश उर्वरित महाराष्ट्रात झालेत. त्याच पुणे विभागात सहा महाविद्यालये अशी आहेत, जिथे पैसे देऊन एकही प्रवेश झाला नाही! म्हणजे मागासवर्गीय कोट्यातून १०-२० टक्के प्रवेश केवळ फी पडत नाही म्हणून झाले. अशी महाविद्यालये विदर्भात सर्वाधिक आहेत. (अश्या एका ठिकाणी पहिला विद्यार्थी महाराष्ट्रात गुणवत्ता क्रमाने ९२००० वा आलेला आहे.) आता सर्व नियम मोडीत काढून उद्यापासून पुन्हा तीन दिवस 'प्रवेश प्रक्रिया- चौथा भाग' होत आहे. हा, 'जो जे वांच्छील तो ते लाहो' राऊंड आहे, त्यामुळे अजून एक-दोन हजार लोक्स आंत येतील. डिप्लोमा (पदविका) साठी २५ हजार जागांसाठी अवघे १५००० अर्ज आले आहेत. याचा परिणाम असा होतोय, की प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे पगार साताठ महिने अडून रहात आहेत. त्यातून काही अन्य समस्या उभ्या रहात आहेत. हे हजारो विद्यार्थी आता अन्य व्यवसायाभिमुख अभ्यासाकडे वळत आहेत, असे एका प्राध्यापकाने सांगितले. ' जे होते ते चांगल्यासाठीच' असं म्हणून निरीक्षण करत आहे...!

In reply to by खेडूत

खेडुतराव, ह्याला पूरक बातमी. वस्तुस्थिती माहीत नाहीये पण परवाच्या आयटीआय प्रवेशप्रक्रियेला सोलापूर आयटीआय समोरील रस्ता ब्लॉक. 2 किमी लाईन.

In reply to by अभ्या..

खरंय. डिप्लोमाधारक हाताने काम करत् असूनही ते कामगारवर्गात मोडत नाहीत. त्यांना युनियन करता येत नाही. त्यापेक्षा नक्की जॉब मिळवून देणारे शिक्षण म्हणून आय टी आय करण्याकडे ओढा आहे.

हा सर्व प्रश्न निव्वळ मार्केट ड्रिवन आहे. नोकर्‍या मिळण्याच्या संधी होत्या म्हणून सगळे इंजीनीरिंगकडे धावले. काहींचा जास्त फायदा झाला, काहींचा कमी. आता संधीचा गूळ शिल्लक नाही हे दिसताच सगळे मुंगळे आपोआप हटतील. दुसर्‍या कुठल्या, जसे हॉस्पिटॅलिटी, टूरिझमची हवा झाली तर हे मुंगळे तिथे जमा होतील. धनदांडगे, राजकीय नेते त्याही प्रकारचे शिक्षण देणार्‍या संस्था काढतील. मागणी तसा पुरवठा. आणि मागणी आहे की संपली याची बातमी बाजारात आपल्या कल्पनेपेक्षा जास्त झपाट्याने पसरते. सध्या फ्रेशर्समधला ट्रेंड असा आहे की फारसे वलय नसलेल्या आय्टी कंपनीत एकदोन वर्षे नोकरी करायची आणि नंतर उच्च शिक्षणासाठी (एम. एस.) अमेरिकेला जायचे. तोही काही दिवसांनी संपेल.