✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एका गारुड्याची गोष्ट १२: धामण: जुन्या ओळखीचा साप !

ज
जॅक डनियल्स यांनी
Tue, 11/19/2013 - 10:10  ·  लेख
लेख
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे ! एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग. एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य ! एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी ! मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार ! एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर ! एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका ! या लेखापासून मी बिनविषारी सापांबद्दल लिहणार आहे. बिनविषारी म्हणजे " ज्या सापांच्या मध्ये विष नसते आणि ते ओपोआप(काही माणसांच्या डोक्यावर केस येतात तसे.. ) तयार पण होत नाही त्यामुळे ते चावले असता प्रतिविष घ्यावे लागत नाही." ही व्याख्या लक्षात ठेवा कारण, काही लोकांचा प्रश्न असतो की " बिनविषारी साप- वेळ आली की विषारी बनतात का ?" असे फक्त मनुष्यजाती मध्येच घडू शकते. आपणच नवीन-नवीन विष निर्माण करायला आपण विज्ञानाचा आधार घेतो, आणि मग सिरीया मध्ये सिरीन वापरला जातो. बिनविषारी साप निसर्गतःच बिनविषारी (कम्प्लीट बेज !) असल्यामुळे त्यांना अन्न मिळवायला दुसऱ्या क्लुप्त्या वापराव्या लागतात. चपळ असलेले साप भक्षाच्या मागे लागून त्याची मुंडी पिरगाळून ढेकर देतात तर काही अवाढव्य साप (अजगर-अनाकोंडा) आर्मीतल्या स्नायपर सारखे ८-८ दिवस गवतात लपून राहून शिकार करतात. हा अनाकोंडाचा व्हिडीओ बघा-अनाकोंडाची शिकार ! मी सगळ्या पक्ष्यांचा राजा हा "कावळा" (मोर हा मिस्टर वर्ल्ड आहे, राजा नाही !) मानतो तसा माझ्यासाठी या बिनविषारी सापांचा राजा "धामण" ! धामण (बिनविषारी): हा म्हणजे आर.के. लक्ष्मणच्या कॉमन-म्यान सारखा कॉमन-साप आहे. याचा वावर म्हणजे, माझ्या सिंहगड-कॉलेजच्या होस्टेलच्या मित्रांसारखा जिकडे खाणे (आणि पोरी) तिकडे, वडगाव-आनंदनगरच्या (चरवड, जगतापांच्या इ.) शेतजमिनी, सहकारनगरमधील बंगल्याच्या बागा, बिल्डींगच्या पार्किंगच्या जागा, येमेसिबी चे ट्रान्सफोर्मारच्या बाजूचे खड्डे, टेकडी वरच्या वस्त्यांमधली भुसभुशीत घरे, मार्केटयार्ड मधली धान्याची कोठारे इ. सिंहगडकॉलेजच्या मुलींच्या होस्टेल मध्ये घुसलेल्या धामणीला मी एका रात्री पकडले होते, मला असे रात्री होस्टेल मध्ये बघून माझी एक मैत्रीण बेशुद्ध पडायची बाकी होती ;) चांगला संटा ६-८ फुट वाढणारा हा साप आहे. पूर्वीच्याकाळी ४ -४ किलोचा कोबीचा गड्डा पहिला आहे, त्याच चालीवर आम्ही पूर्वी खडकवासल्याला ९-१० फुटी धामणी धरल्या आहेत, असे अनेक जुने सर्पतज्ञ म्हणतात. चकचकीत पिवळा रंग त्यावर काळे पट्टे आणि हाताएवढी जाडी असे सर्वसाधारण वर्णन. पण विष नसल्यामुळे चपळता आणि निसर्गात लपायची क्षमता यावरच सगळे अवलंबून असते. त्यामुळे या पिवळ्या रंगाच्या छटा सापाच्या वावरण्याच्या जागेप्रमाणे बदलत जातात. पुण्यात पिवळा, हिरवट-पिवळा, मातेरी, शेवाळी, राखाडी, काळपट तांबूस इ. असे अनेक रंग सापडतात. निसर्गाला रंगांच्या बाबतीत कोणीच हरवू शकत नाही, अगदी पेठ्तली साड्यांची दुकाने पण नाही .... धामण बघा कशी ग्लॉसी फिनिश मारून बसली आहे. धामण धामण १ धामणीची चपळता म्हणजे "मिल्खा सिंग" सारखी, धामणीला पकडताना मी अनेक वेळा जॉनटी र्होड्स सारखी उडी मारली आहे. बिनविषारी साप असल्यामुळे नुसत्या हाताने पकडायचा, हे आमचे सर्पोद्यानचे तत्व. त्यामुळे धामण दिसली की "टाक हात आणि पकड" असे मी काम चालायचे पण याच्या चपळतेमुळे या सापाने मला पासपोर्ट-विसा पेक्षा जास्त पळवले आहे. एक वेळ कोंबडी पकडणे सोपे, कारण तिच्या वर उडी मारली तर पिसे तरी हातात येतात. (प्रयत्न करून झाले आहेत, त्यामुळे प्रश्न नको !) त्यामुळे वेट-लॉस प्रोग्राम मध्ये धामण सामाविष्ट्य करायला हरकत नाही, मैदानातील धामण ४-५ वेळा पकडून वजन घटवा ! कॉलवरची धामण तर अजूनच वेगळी, घुशीच्या बिळात धामण असेल तर उन्हातानात अंगमेहनत करून कुदळ-फावडे घेऊन ती बिळे खोदायला लागायची. घुशीची बिळे ही एकमेकाना जोडलेली असतात,त्यामुळे एक बीळ खोदून उपयोग नसतो. कधी कधी धामण अर्धी बाहेर असेल तर तिची शेपटी एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने बीळ खोदायला लागायचे. पटांगणात असलेला साप लोकांनी उचकवला म्हणून खूप वेळा बिळात जाऊन बसायचा आणि मग ते १० मिनिटाचे काम लोकांच्या चुकीमुळे ३-४ तासाचे होऊन बसायचे.(भाग ४) नट मध्ये जसा बोल्ट हळू हळू घट्ट होत जातो, तशी बिळातली धामण हळू-हळू घट्ट होत जायची आणि मग पतंग काटताना जसे हळू हळू ढील देऊन मग एकदम खेचायचा असतो तोच प्रकार इकडे करायला लागायचा. मिपाकर आदुबाळ आणि अजून एक माझा मित्र (चिन्मय) यांना घेऊन मी अशीच एक अर्धी बिळात असलेली धामण पकडली होती,साधारण पणे मी कोणाला कॉल ला घेऊन जात नसे पण त्यावेळी पर्याय नव्हता.(पाणीपुरीच्या प्लेट वरून उठवून साप पकडायला घेऊन गेलो गेलो म्हणून आदुबाळ अजून शिव्या घालतो मला.) ५०-६० लोकं जनता वसाहती मध्ये (पार्वती पायथा)त्या धामणीच्या आजूबाजूला कोंडाळ करून उभे होते, मी एका हाताने धामण पकडून दुसऱ्या हाताने खोदत होतो,हे साधारण १५-२० मिनिटे चालू होते, ती धामण बिळात लॉक करून बसली होती...... शेपटी पकडून, माझे खोदणे आणि ढील देणे चालूच होते,इतक्यात ती ७-८ फुटी धामण बाहेर निघाली,आणि कबुतरे उडून जातात तसे माझ्या बाजूचे लोकं सैरावैरा पळून गेले. मी तिला शांतपणे पोत्यात घातली आणि (पाणी पुरी खाण्यासाठी )घरचा रस्ता पकडला. सगळ्यात जास्त कॉलवर सापडणारा साप असे मी या सापाचे वर्णन करीन, चिमण्या जश्या मनुष्यवस्तीच्या जवळपास घरे करून राहतात तसाच हा साप मनुष्यवस्ती मधेच राहतो. बिनविषारी असला तरी या ७-८ फुटी सापाला कॉल वर पकडणे सोपे कधीच नव्हते, कारण म्हणजे त्यांची चपळता आणि अंगावर उसळण्याची क्षमता ! सापाच्या चाव्याला मी कधीच भीत नाही पण पब्लिक मध्ये बिनविषारी साप चावला तरी खूप जास्त अंधश्रध्दा पसरते याची मला जाणीव होती. म्हणून फुकटचे सापांबरोबर खेळ करायला जायचो नाही आणि "क्षणार्धात साप पोत्यात !" विषारी सापांचा नियम इकडे पण पाळायचो. पिवळीधम्मक धामण. धामण ३ २००५ चा मे महिना, इंजिनियरींगची पीएल (अभ्यासासाठी सुट्टी)संपायला आली होती,आठवड्याने पहिला पेपर होता. तळजाई वरच्या वस्ती वरून सकाळी १० च्या सुमाराला कॉल आला, "घरात काळा मोठा नाग निघाला आहे." मी तडक पोहचलो, वस्तीमध्ये २० बाय २० ची टेकडीच्या उतारावरची खोली, त्यामध्ये किचन, बेडरूम, लिविंग रूम, मास्टर बेडरूम, आणि छोटी मोरी ! घराचा मालक गवंडी आणि मालकीण मजूर, त्यांची ३-४ चार चिल्लीपिल्ली असे (छोटे) सुखी कुटुंब बाहेर उभे होते. बाजूच्या घराच्या मुलीने सकाळी या खोलीत काळा मोठा साप पहिला आणि चक्कर येऊन पडली. माझ्या डोक्यातली गणिते, निष्कर्षाची सुई नाग किंवा धामणी कडे वळवत होती. मागच्याच आठवड्या मध्ये याच वस्तीच्या वरच्या भागातला पकडलेल्या नागाची आठवण अजून डोक्यात ताजी होती. मी हळू हळू सामान हलवायला सुरुवात केली,लोखंडी पलंग हलवला तर खाली घुशीची आख्खी अपार्टमेंट स्कीम होती. घुशींची बिळे म्हणजे "बायकांचे मन", इथे थांगपत्ता या शब्दाला अर्थच नाही. ते खोदण्यात काही उपयोग नव्हता, कारण ते बीळ वरच्या घराचे बेसमेंट होते. "साप पळून गेला असेल, दिसला तर कॉल करा” असे सांगून मी कल्टी मारली. घरी पोचून थोडे इंजीनेरारिंग डोक्यात भरत असताना परत १२ ला कॉल आला-“ साप परत दिसला !” मग मात्र या कॉल ला मी चान्स घेतला नाही, चील्लीपिल्लींचा विचार करून हळूहळू करत सगळे समान बाहेर काढले, त्या वस्तीच्या रस्त्यावर त्यांचा संसार आला. आत्ता खोली मध्ये ते बीळ आणि नवीन बांधलेली मोरी राहिली होती. ते बीळ पण थोडे खोदले, सापाचे नख पण दिसले नाही (सापाला नखे नसतात, वाक्यप्रचार वापरला आहे !) घर मालकाची इच्छा होती की त्या बिळात सायकल चे टायर जाळावे, त्याला विरोध करून पहिला पण काही उपयोग झाला नाही, मग शेवटी टायर जाळले. अजूनही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे, “मी रस्त्यावर बसलो आहे, माझ्या आजूबाजूला ती चिल्लीपिल्ली खेळत आहेत, आणि तो मालक आणि मालकीण स्वतःच्या घरातून उठणाऱ्या काळ्या धुराकडे बघत आहेत.....! अर्ध्या तासाने टायर संपल्यावर घरात पहिले, माझ्या अंदाजानुसार साप काही मिळालाच नाही. मग हताश होऊन परत ३ ला घरी परतलो. दोन घास पोटात टाकले, आणि परत “कॉल”, ताट तसेच सरकवून, आईचा ओरडा खाऊन मी तळजाई पठारावर पोहचलो. सगळे लोकं आणि समान अजून बाहेरच होते. मी पोहोचायच्या आधी त्याच बिळातूनच सापाने परत डोके काढले होते, यावरून तिथे मला “ हे बीळ पुढे संपते आहे” ही घुशीच्या मुन्सीपालटीचा बोर्ड मला दिसला. पण बीळ खोदून पण उपयोग नव्हता-घर खाली आले असते, आणि बीळ तसे सोडून पण उपयोग नव्हता ! आता, सगळ्या वस्तीचे डोळे माझ्या कडे लागले होते, शेवटची ओवर खेळताना तेंडल्यावर किती दडपण असेल हे मी अनुभवत होतो. शेवटी मग “ मी साप असतो तर बीळ जळत असताना काय केले असते ?", असे सारासार विचार मी केला. ट्यूब पेटली- खोलीतली थंड जागा म्हणजे “मोरी”, घर मालकाची परवानगी घेऊन नवीन मोरी खोदली. २ फुट बाय २ फुट फरशी खाली, ८ फुटी धामण वेटोळे मारून बसली होती. शेवटी ५ वाजता धामणीला पोत्यात घातल्यावर त्या घरमालकाने माझ्या पायावर लोळण घेतली, घर मालकीण रडायला लागली...."कुठल्या देवाने सांगावा धाडला तुला ? पांग फेडलस पोरा, काळूबाई तुझे भले करो !" अश्याच अनेक वाक्यांनी पिच्चर शेवट गोड झाला. पुढचा भाग धामण...क्रमशः ! सगळे फोटो हे आंतरजालावरचे आहेत आणि त्यांना कुठल्याही पद्धतीने पण बदलले नाही.

Book traversal links for एका गारुड्याची गोष्ट १२: धामण: जुन्या ओळखीचा साप !

  • ‹ एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका !
  • Up
  • एका गारुड्याची गोष्ट १३: धामण: उंदराचा कर्दनकाळ ! ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
65545 वाचन

💬 प्रतिसाद (109)

प्रतिक्रिया

भुजंग हा साप असतो का ? का

जेपी
Tue, 11/19/2013 - 19:32 नवीन
भुजंग हा साप असतो का ? का नुसतीच दंतकथा आहे ? या भुजंगची एक ष्टोरी हाय माझ्याकड लिहिन सावकाशीन .
  • Log in or register to post comments

भुजंगराव

कपिलमुनी
Tue, 11/19/2013 - 20:18 नवीन
पूर्वीच्या मराठी चित्रपटात व्हिलनचे नाव असायचे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

भाग ७ मध्ये मी यावरती खूप

जॅक डनियल्स
Tue, 11/19/2013 - 22:09 नवीन
भाग ७ मध्ये मी यावरती खूप लिहिले आहे, ती अंधश्रद्धा आहे. भाग७
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

भारी!!

प्रभो
Tue, 11/19/2013 - 20:01 नवीन
भारी!!
  • Log in or register to post comments

जे डी....

मुक्त विहारि
Tue, 11/19/2013 - 22:06 नवीन
तुम इधर कभी आनेवाला है.... मस्त लेख... हे साले असले काही वाचायला मिळते म्हणून तर मिपा आहे... जिओ...
  • Log in or register to post comments

धन्यवाद् !

जॅक डनियल्स
Tue, 11/19/2013 - 22:10 नवीन
धन्यवाद् ! ७ डिसेंबर ला पुण्यात, मग महिनाभर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

वा वा, मग एक सापावाला कट्टा

शैलेन्द्र
Tue, 11/19/2013 - 22:23 नवीन
वा वा, मग एक सापावाला कट्टा करु, किंवा एक रात्रीचा ट्रेक, सापांसाठी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

एक रात्रीचा ट्रेक, सापांसाठी.

सूड
Tue, 11/19/2013 - 22:27 नवीन
एक रात्रीचा ट्रेक, सापांसाठी.. +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

त्याच दरम्यान मी हि असेन

अद्द्या
गुरुवार, 11/21/2013 - 09:41 नवीन
त्याच दरम्यान मी हि असेन पुण्यात बहुदा . त्यामुळे . . "ए मी पण मी पण "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

"जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात.."

एस
Tue, 11/19/2013 - 23:40 नवीन
इथे नागीणऐवजी धामण हा शब्द खरा शोभला असता असे माझे मत आहे. धामण आजपर्यंत कधी स्वतः पकडायच्या भानगडीत पडलो नाही. (माझ्या वजनाचे रहस्य ;) कोण एवढी धावाधाव करणार ना! :-)) ) आणि कशाला पकडायची म्हणा. बिनविषारी, सो एकदम सेफ. तिचा तो अशक्य चपळपणा आणि विशेषतः जाळीदार नक्षी असलेली शेपटी बघतच रहावीशी वाटते. काय ती अदा आणि काय तो वेग. बैठकीच्या लावणीत बाईंनी फेकलेला कटाक्ष किंवा जगजीतच्या गझलेतील कातर तान... बस. काहीकाही साप खरंच प्रचंड सुंदर असतात. धामण, तस्कर, उडता सोनसर्प, घोणस हे आपल्याकडचे साप फार आकर्षक दिसतात. आमच्याइकडे धरणात पोहताना कित्येकदा ही अगदी जवळून सळसळत जाते तेव्हाही नवख्या माणसाची भीतीने पाण्यातच उडणारी गाळण पाहून धो धो हसायचोही. उंदरांचा काळ आहे धामण. पण माणसांना ते कळत नाही. दरवर्षी उंदीर २०% अन्नधान्याची नासाडी करतात. वर शैलेन्द्र यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच धामण आणि घुबडांचे आभार मानावेत तेवढे कमीच. माणूस एवढा आंधळा झालाय की निसर्गातील त्याचे मित्र संपवत चाललाय आणि पर्यायाने शत्रू मात्र ढीगाने पैदा होताहेत. पण त्याला त्याची पर्वा कुठली. असो. बाकी तुमचा लेख कसा झालाय हे सांगणे बंदच करत आहे कारण माझ्याकडील शब्दसंग्रह संपुष्टात आला आहे. पण जेडी, तुम्ही एकतरी लेख माझ्या सर्वात आवडत्या सापावर, सापांमधल्या तेंडल्यावर म्हणजे नागराजावर लिहा अशी आग्रहाची विनंती.
  • Log in or register to post comments

हो नक्की लिहीन, मला स्वतःला

जॅक डनियल्स
Wed, 11/20/2013 - 00:13 नवीन
हो नक्की लिहीन, मला स्वतःला त्याचा अनुभव नसल्यामुळे लिहायचे टाळत होतो. पण माझा पण आवडता साप असल्यामुळे नक्की टाकीन लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

क्या बात है

एस
Wed, 11/20/2013 - 00:19 नवीन
धन्यवाद. द्या टाळी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

एक विनंती

सुबोध खरे
Wed, 11/20/2013 - 09:41 नवीन
साप बिनविषारी म्हणून बिनधास्तपणे पकडायला जाऊ नये. कारण बिनविषारी साप सुद्धा चावतात आणि ते स्वसंरक्षणासाठी करकचून चावतात. बिनविषारी सापांना दात असतात ते चावण्यासाठी नव्हे तर भक्ष्य तोंडात घट्ट धरता यावे, पळून जाऊ नये यासाठी. शिवाय नाग आणि धामण यातील गल्लत जीवावर बेतू शकते. मुळात आपण उंदीर तरी हातात पकडतो का? कारण तो पण करकचून चावतो. मी परत हेच म्हणेन कि साप म्हणू नये धाकला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

नक्कीच.

एस
Wed, 11/20/2013 - 23:24 नवीन
सेफ म्हणजे नाही पकडला तरी तिथल्या लोकांना त्यापासून काही धोका नाही अशा अर्थाने म्हणायचे होते मला. बाकी उगाच परिस्थितीची गरज नसताना निसर्गात हस्तक्षेप करू नये हे खरंच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

नेहमी प्रमाणेच

बाप्पू
Wed, 11/20/2013 - 00:10 नवीन
नेहमी प्रमाणेच लेख एकदम सुरेख.....पण ही टायर जाळण्यमागचे कारण काय ते नीट सजले नाही...
  • Log in or register to post comments

लोकांच्या मते, टायर जाळल्यावर

जॅक डनियल्स
Wed, 11/20/2013 - 00:14 नवीन
लोकांच्या मते, टायर जाळल्यावर धूर होऊन साप गुदमरून बाहेर येतो. पण माझा अनुभव आहे की तो आत अजून बसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

नेहमीप्रमाणे ज-ब-रा

खटपट्या
Wed, 11/20/2013 - 02:37 नवीन
नेहमीप्रमाणे ज-ब-रा
  • Log in or register to post comments

लै भारी.

शिल्पा ब
Wed, 11/20/2013 - 05:00 नवीन
लै भारी.
  • Log in or register to post comments

झकास, जेड्स! आणि डोसक्यावर न

आदूबाळ
Wed, 11/20/2013 - 05:11 नवीन
झकास, जेड्स! आणि डोसक्यावर न बसता आपणहून लेख टाकल्याबद्दल आभार!
  • Log in or register to post comments

लेख टाकायचा होता, पण अगदी

जॅक डनियल्स
Wed, 11/20/2013 - 05:54 नवीन
लेख टाकायचा होता, पण अगदी "जिंकू किंवा मरू" अशी परीक्षा होती. त्यामुळे जरा वेळ झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

माहितीपुर्ण लेख. नेहमीसारखाच.

पाषाणभेद
Wed, 11/20/2013 - 09:14 नवीन
माहितीपुर्ण लेख. नेहमीसारखाच.
  • Log in or register to post comments

+१००

शिद
Wed, 11/20/2013 - 20:02 नवीन
असेच म्हणतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

प्रतिविष हा काय प्रकार असतो?

म्हैस
Wed, 11/20/2013 - 12:29 नवीन
प्रतिविष हा काय प्रकार असतो? म्हणजे जो साप चावलाय त्याच सापच विष असत का?
  • Log in or register to post comments

सापाचे विष हे एक प्रथिनांचे

सुबोध खरे
Wed, 12/04/2013 - 19:46 नवीन
सापाचे विष हे एक प्रथिनांचे मिश्रण असते. घोणस आणि फुरसे या जातीच्या सापाच्या विषात एक तर्हेची विकरे(enzymes) असतात जी आपल्या उतीच्या मधील संयोजक/बांधक (सिमेंट)ला अक्षरशः वितळवून टाकतात.त्यामुळे आपले स्नायू, रक्तवाहिन्या, सांधे इ ला भोके पडून अंतर्गत रक्तस्त्राव होतो. तसेच नाग आणि मण्यार यांची विषे सुद्धा एक तर्हेची प्रथिने असतात जी आपल्या मेंदूकडे आणि मेंदूकडून येणाऱ्या संदेशवहनात अडथळा आणतात. त्यामुळे शरीराच्या अवयवातून मेंदूकडे संदेश जात नाही आणि मेंदूकडून श्वसन आणि हृदयाला जाणारे संदेश बंद झाल्याने माणूस श्वास घेऊ शकत नाही आणि बेशुद्ध पडून मृत्यू मुखी पडतो. हि प्रथिने अगदी थोड्या प्रमाणात( ज्याने घोड्याला फारशी इजा होणार नाही) घोड्याला टोचतात. घोड्याचे शरीर या प्रथिनांविरुद्ध प्रतिद्रव्य/ प्रतिपिंड(ANTIBODY) तयार करतात. हळू हळू त्या विषाचे प्रमाण वाढवत नेतात म्हणजे घोड्याच्या शरीरात(रक्तात या प्रतिद्रव्य/ प्रतिपिंड चे प्रमाण वाढू लागते. या नंतर घोड्याचे रक्त काढून त्यातील लाल आणी पांढर्या पेशी रक्तद्रवापासून(प्लास्मा) वेगळ्या काढतात आणी घोड्याला परत करतात. उरलेल्या रक्तद्रवाचे बाष्पीभवन करून तयार झालेले चूर्ण/पूड हि प्रतिविष म्हणून बाटल्यात भरून पाठवले जाते. जेंव्हा एखाद्या घोड्याला केवळ एकाच तर्हेच्या सापाचे( उ. फक्त नागाचे) विष टोचून प्रतिपिंड तयार करतात त्याला monovalent (एकसंयुजी) प्रतिविष म्हणतात. हे केवळ त्याच जातीच्या सापाच्या विषबाधेवर वापरता येते. पण जर घोड्याला वेगवेगळ्या जातीच्या सापांची विशे थोड्या थोड्या अंतराने टोचली तर घोडा त्या सर्व सापन्विरुद्ध प्रतिविष तयार करतो. आणी अशा घोड्य़ापासून तयार केलेले प्रतिविष तेवढ्या जातीच्या सापांच्या विषबाधेवर उपयुक्त ठरते.याला polyvalent (बहु संयुजी) प्रतिविष म्हणतात. भारतात नाग, मण्यार, फुरसे आणी घोणस हे चार विषारी साप बहुतेक सर्पविष बाधेस जबाबदार असल्याने भारतात मिळणारी बहु संयुजी सर्प विष प्रतीबंधके हि या चार सापावर उपयुक्त ठरतील अशी असतात. जेंव्हा रुग्णाला कोणता साप चावला आहे ते माहित नसते किंवा डॉक्टर ला त्याच्या माहितीबद्दल संशय असतो तेंव्हा असे बहु संयुजी प्रतिबंधक वापरले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

>>>भारतात नाग, मण्यार, फुरसे

प्यारे१
Wed, 12/04/2013 - 20:06 नवीन
>>>भारतात नाग, मण्यार, फुरसे आणी घोणस हे चार विषारी साप बहुतेक सर्पविष बाधेस जबाबदार असल्याने पकपकपकाक नावाच्या चित्रपटात नाना पाटेकर भारतात सापडणार्‍या विषारी जाती पाच म्हणतो. टीपिकल नाना स्टाईल.... नाग, मण्यार, फुरसे, घोणस आणि माणूस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

धन्यवाद् डॉ.!

जॅक डनियल्स
गुरुवार, 12/05/2013 - 00:32 नवीन
धन्यवाद् डॉ.! खूप मस्त आणि सोप्या शब्दात माहिती दिली आहे, मला स्वतःला जास्त प्रतिविष विषयी जास्त शास्त्रीय माहिती नाही, त्यामुळे तुमची माहिती खूप उपयोगी पडते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ज्ञानात भर पडली आणि मी धाग्याची शंभरी पूर्ण केली.

रुस्तम
गुरुवार, 12/05/2013 - 03:54 नवीन
धन्यवाद डॉक्टर… ज्ञानात भर पडली आणि मी धाग्याची शंभरी पूर्ण केली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अतिशय सुरेख माहिती. हे थोडफार

स्पंदना
गुरुवार, 12/05/2013 - 04:37 नवीन
अतिशय सुरेख माहिती. हे थोडफार माहित होतं, पण अस सव्विस्तर सांगितल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अप्रतिम लेख.....

मिनेश
Wed, 11/20/2013 - 16:32 नवीन
>>>> " बिनविषारी साप- वेळ आली की विषारी बनतात का ?" असे फक्त मनुष्यजाती मध्येच घडू शकते. हे भारीच.....
  • Log in or register to post comments

मालक

विटेकर
Wed, 11/20/2013 - 16:51 नवीन
दंड्वत स्वीकारावा ..
  • Log in or register to post comments

भारीच !!!

सुहास झेले
गुरुवार, 11/21/2013 - 12:05 नवीन
भारीच !!! आता पुढचा भाग वेळेत येऊ दे रे :) :)
  • Log in or register to post comments

आईशप्पथ! १ नंबर लेख.

राजमुद्रा२१
गुरुवार, 11/21/2013 - 15:02 नवीन
आईशप्पथ! १ नंबर लेख.
  • Log in or register to post comments

उत्तम माहिती

सुकामेवा
गुरुवार, 11/21/2013 - 15:37 नवीन
जॅक, ति साप पकडायची काठी विकत कठे मिळेल , माझ्या भावाच्या घरी खुप साप निघतात, एक प्राथमिक गरज मह्णुन घ्यायची आहे.
  • Log in or register to post comments

मला भारतात कुठे मिळेल माहित

जॅक डनियल्स
गुरुवार, 11/21/2013 - 22:00 नवीन
मला भारतात कुठे मिळेल माहित नाही. माझ्या मते, साप पकडायच्या फंदात पडू नका, बाकी तुमची मर्जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुकामेवा

पकडणार नाहिच फक्त घेउन ठेवणार आहे एक आप्तकालीन साधन मह्णुन

सुकामेवा
Fri, 11/22/2013 - 09:08 नवीन
आतापर्यंत तीन साप निघाले आहेत, ते पण सर्पमित्रानीच पकडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

पुण्यात कोथरुड मध्ये...

जिन्क्स
गुरुवार, 11/21/2013 - 22:27 नवीन
पुण्यात कोथरुड मध्ये (मॅक डी च्या मागे, करिष्मा) Adventure World नावाचं दुकान आहे. तिथे मिळते तसली काठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुकामेवा

काहि फोटू...

भटक्य आणि उनाड
गुरुवार, 11/21/2013 - 17:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अजुन एक..

भटक्य आणि उनाड
गुरुवार, 11/21/2013 - 17:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर ! कात आहे.

जॅक डनियल्स
गुरुवार, 11/21/2013 - 21:58 नवीन
सुंदर ! कात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भटक्य आणि उनाड

देखणी आहे धामीण ! चित्तथरारक

सस्नेह
गुरुवार, 11/21/2013 - 17:31 नवीन
देखणी आहे धामीण ! चित्तथरारक लेख.
  • Log in or register to post comments

कात ?

कपिलमुनी
Fri, 11/22/2013 - 19:56 नवीन
सर्वच साप कात टाकतात ? की काही खास व्हीआयपीना ही सोय आहे?
  • Log in or register to post comments

सर्वच साप कात टाकतात, ती

जॅक डनियल्स
Sat, 11/23/2013 - 04:14 नवीन
सर्वच साप कात टाकतात, ती निसर्गाने दिलेली त्यांना देणगी आहे. सरपटणारे प्राणी असल्यामुळे अंगावरची कातडी मध्ये काही अडकून किंवा त्याला काही संसर्ग होऊन जीवास त्रास होऊ नये म्हणून ही देणगी दिली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

कात टाकणे

सुबोध खरे
गुरुवार, 12/05/2013 - 09:57 नवीन
सापाची कातडी(त्वचा) हि अतिशय लवचिक असते.साप त्वचेवरच सरपटत असल्याने या लवचिकतेची आवश्यकता असतेच . सततच्या वापरण्याने या त्वचेचा लवचिकपणा कमी होतो. त्वचेची ताणले जाण्याची क्षमता परीसीमेला पोहोचली कि त्वचा त्याहून अधिक ताणली जाऊ शकत नाही. फार ताणला गेलेला मोजा जसा ढिला किंवा लेचापेचा होतो तशीच या जुन्या त्वचेची गत होते. मानवी त्वचे सारखी ती सूक्ष्म प्रमाणात झडून जाऊन नवीन त्वचा येत नाही तर आतमध्ये संपूर्ण नवी त्वचा आलेली असते. त्यामुळे साप जुन्या त्वचेला डोक्याजवळ घासून एक भोक पाडतो आणि त्या भोकातून एखाद्या बिळातून बाहेर पडल्यासारखा बाहेर पडतो. त्यामुळे एखादे वेळेस आपल्याला डोक्यापासून शेपटी पर्यंत अक्खी कात दिसते. तसेच सापाची वाढ झाल्याने त्याचे अंग आतमध्ये आखडले जाते.त्यामुळे पिल्लाची वाढ होत असताना त्याला जास्त वेळा कात टाकावी लागते. आणि पूर्ण वाढ झालेला साप कमी वेळा कात टाकतो. पहा MOULTING -http://en.wikipedia.org/wiki/Moulting जुनि त्वचा टाकून देण्याच्या अगोदर त्याची लवचिकत कमी झाल्याने साप मंदगती होतो आणी निस्तेज व अनाकर्षक दिसतो. आणी तेच कात टाकल्याने तो चपळ तजेलदार आणी चमकदार दिसतो. म्हणूनच मराठीत एखाद्या गोष्टीचा काया पालट झाला असे आपण म्हणतो किंवा त्याने कात टाकली म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

मस्त

अभिजा
Sat, 11/23/2013 - 10:54 नवीन
नेहमीप्रमाणेच छान लेख! पुढील भागाची वाट पाहतो. धामण आणि नाग यांतील फरक कसा ओळखावा, ही माहिती अपेक्षित आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

पैसा
Sat, 11/23/2013 - 14:29 नवीन
अगदी देखण्या सापाची तेवढीच देखणी ओळख!
  • Log in or register to post comments

झकास !

मदनबाण
Sun, 11/24/2013 - 10:10 नवीन
झकास ! :)
  • Log in or register to post comments

निमविषारी साप पण असतात का?

परिंदा
गुरुवार, 11/28/2013 - 18:43 नवीन
निमविषारी साप पण असतात का? http://www.loksatta.com/vruthanta-news/new-snake-in-sanjay-gandhi-national-park-279935/ या लेखात मांजर्‍या हा साप निमविषारी असल्याचा उल्लेख आहे म्हणून
  • Log in or register to post comments

निम विषारी साप म्हणजे जे

सुबोध खरे
Wed, 12/04/2013 - 21:15 नवीन
निम विषारी साप म्हणजे जे चावल्यामुळे चावलेल्या भागाला सूज वगैरे येते पण त्यामुळे माणूस मरत नाही. त्यामुळे अशा सापाच्या चावल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात देखरेखीसाठी चोवीस तास पर्यंत ठेवतात आणी विषबाधेची कोणतीही लक्षणे कमी झाली कि औषधोपचार करून घरी पाठवले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

खुप सुन्दर अनि म्हत्वपुर्न

नॉन रेसिडेन्षि…
Fri, 11/29/2013 - 15:47 नवीन
खुप सुन्दर अनि म्हत्वपुर्न लिहितओस तु मित्रा.
  • Log in or register to post comments

जबरदस्त..

चिगो
Fri, 11/29/2013 - 22:26 नवीन
कं लिवतंस? कं लिवतंस.. जेडि, मानलं राजा तुला..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा