पारध झालेला तो पारधी - २
सहजकाकांनी व्य. नि. मलाही केला होता. तो धागा खूप पुढं गेल्यानं हा नवा धागा काढतोय.
मूळ धागा
---
सहजरावांचे म्हणणे -
सक्तीने पुनर्वसन, दारुधंदे बंद करुन उपजीवीकेचे इतर प्रकल्प, लहान मुलांचे सक्तीचे शिक्षण, तरुणांचे संघटन, दीर्घकाल प्रबोधन, विविध योजना यांचा पाठपुरावा केल्याशिवाय त्यांचे गुन्हेगारी विश्व इतक्यात सुटेल असे वाटत नाही. पोलीस व पारधी समाजातील दोन्ही बाजुने पारध्यांना योग्य न्याय देण्याकरता जिल्हे/प्रांतवार संघटना करुन प्रयत्न. हे मत अर्थात गेले कित्येक वर्ष वर्तमानपत्रातुन व यासमस्येसंबधीत लोकांच्या मतांतुन आले आहे.
---
पुनेरींचे म्हणणे -
आपले म्हणणे अगदी पटते... या दृष्टीने अनेक जण प्रयत्न करीतही आहेत आणि त्यांचे दॄष्य परिणामही आहेत... परंतु यातल्या बहुतेक ठिकाणी अश्या लोकांची उन्नती करण्याकरता कोणी व्यक्ती/ संस्था जे प्रयत्न करतात ते त्यातल्या काही घटकांना मुख्य समाजापासुन वेगळे काढुन. माझ्या मते याबाबत समाजाचे व्यापक प्रबोधन करण्याची गरज आहे... काही मुले आश्रमशाळेत शिकतात पण तीच मुले सुट्टीत घरी जातात तेव्हा तिथे त्यांना समाजाकडुन त्यांच्याच वयाच्या, शाळेत शिकणार्या ईतर मुलांसारखी वागणुक मिळते काय? याचे उत्तर जोवर नाही असे येते तोवर या समाजघटकांची मुख्य समाजाशी नाळ जुळण्याची शक्यता रहात तर नाहीच उलट अश्या लोकांकडुन समाजाविरोधात अधिक उग्र प्रतिक्रिया येवु शकते असे मला वाटते.
---
सहजकाकांचे म्हणणे -
माझी इच्छा आहे की हा लेख फक्त उसासे भरण्यापुरत अन रहाता एक उत्तम वैचारिक चर्चा बनावी, भले उत्तर आपणा शोधु शकणार नाही पण जनसामान्यात ह्यावर काहीतरी भरीव कार्य व्ह्यायची उर्मी जागावी.
---
पुनेरी यांचे म्हणणे -
हे लिहिताना काही पारधी जमातीतले गुन्हेगार, त्यांनी गुन्हे करताना दाखवलेला क्रूरपणा हे नाकारणे किंवा त्याचे उदात्तीकरण करणे हा माझा हेतु नव्हे... गुन्हेगारी प्रवृत्ती, विकृती या रक्तातुन येत नाहीत असे माझे ठाम मत आहे. त्या इतर अनेक ठिकाणी जन्मतात. काही लोकांमध्ये त्या आहेत म्हणुन ते लोक ज्या समाजघटकाचे सदस्य आहेत तो संपुर्ण समाजघटकच मुख्य समाजातुन वगळावा ही विचारसरणी मला चुकीची वाटते.
---
धमाल मुलगा यांचे म्हणणे -
एक कुटुंब, तसा गोतावळा चांगलाच मोठा, हे पारधी! नक्की कोणते ते ठाऊक नाही. पैसा बक्कळ... सगळं व्यवस्थित असुनही वागणूकीत मात्र काडीचा फरक नाही...झुंडीनं फिरणं, दादागिरी करणं, हाणामार्या वगैरे नित्याचं...बरं, राजकीय वरदहस्त आहेच! मुलंबाळं कॉलेज बिलेज करुन शिकलेली सवरलेली(!) पण वृत्तीत मात्र काहीच फरक नाही... असं का होत असावं?
---
पुनेरी यांचं म्हणणं -
धमाल म्हणतात तसे होते हे मला मान्य. पण असे समाजाच्या अन्य घटकात होत नाही का? अन यांना अॅक्सेप्ट करुन आपण त्या समाजघटकावर उपकार करतो आहोत का? तुम्ही मांडलेलेच मुद्दे इतर जातीजमातींच्या काही लोकांबाबत लागु पडणार नाहीत का? मग इथे त्यांची जात हा मुद्दा कसा होतो?... तुम्ही तुमच्या गावातल्या पारध्यांचे उदाहरण दिले पण प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करणारे अनेक पारधी मला माहिती आहे. चिंध्या हे एक उदाहरण मी माझ्या लेखात दिलेच पण दुसरे आपल्या सर्वाना नेहमी दिसणारे उदाहरण म्हणजे सिग्नलवर गजरे, लिंबु-मिरची-बिब्बे, पुस्तके, खेळणी इत्यादी सामान वि़कणारे लोक. त्यातले बहुतेक पारधी आहेत अन त्यापैकी किमान ८० टक्के लोकांनी आयुष्यात कधीच गुन्हा केलेला नसतो. जातीच्या ब्रँडींगमुळे अश्या लोकांवर मोठा अन्याय होतो असे मला वाटते.
---
माझे म्हणणे -
परिघावरील समाजघटकांचे हे प्रश्न आहेत. त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत, त्यामुळे एरवीही अशा अनेक बाबींमध्ये मी म्हणतो तसे, इथे कृष्ण-धवल पद्धतीची उत्तरे मिळत नाहीत. हे परिवर्तन ही एक घटना असत नाही. ती एक प्रक्रिया आहे.
एखादा समुदाय जेव्हा परिघावर जातो, तेव्हा त्याच्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आधी तो समाज परिघावर का गेला, त्या कारणाला तो प्रतिसाद कशा पद्धतीने देत गेला, त्यातून त्याच्या पदरी नेमके काय पडले आणि त्यापुढे त्याचे प्रतिसाद कसे बदलत गेले हे पहावेच लागते. ते न पाहता, सुचवलेले उपाय वरकरणी असतात. कारण, हे उपाय वरकरणी लक्षणांवर काढलेले उपाय असतात. आजार, रोग आत असतो. मग या उपायांना शस्त्रक्रियेचे स्वरूप येते अनेकदा, जिची मुळातच गरज नसते. आपल्याकडे अशा अनेक प्रश्नांना कर्करोग ही उपमा देण्याची एक फॅशन आहे. कर्करोग म्हटले की, केमो, सर्जरी हे मार्ग आपण लगेचच स्वीकारतो. चूक आहे ती येथे. प्रश्न असतो तो एका समुहाचा. त्याला एक सोपी शरीरासाठीची उपमा दिली की काम भागते, किमान राजकारणी-नोकरशहा आणि संवेदनाशीलतेचा आव आणलेल्या मूळ समाजातील लोकांच्या लेखी.
प्रश्नांची सुरवात होते, ती जगण्याचे साधनस्रोत हिरावण्यातून. पारधी काय अचानक पारधी झाले? माणूस आधी शेतीच करीत होता ना? शेतीतून बाहेर फेकले गेलेले समूह या अशा स्वरूपात आविष्कृत होत गेले. समाजाच्या त्या-त्या वेळच्या गरजांनुसार त्यांचे कामानुसारचे वर्ग आकाराला आले. वर्गांची नंतर जात होत गेली आणि सगळे बिघडत गेले. हे असे घडले कारण, त्या व्यवस्थेत मुळातच विषमता अध्याहृत होती. काही कामे दुय्यम ठरली की जीवनस्रोतांच्या गुणवत्तेचा, त्यांच्या प्रमाणाचा प्रश्न येतो. उदाहरणार्थ - मी ज्यावेळी लोहारकाम करून घेतो, तेव्हा ते माझ्या इतर गरजांतील असते आणि स्वाभाविकच ते काम करणाऱ्याच्या जीवनस्रोताचा विचार मोबदला देताना होत नसतो. असे केव्हा तरी इतिहासात नक्कीच घडलेले असणार. त्यातून हे वर्ग दुय्यम ठरत गेले. या दुय्यमतेला त्यांनी दिलेला प्रतिसाद कसा असेल? आपल्याच मनात डोकावून पाहूया. मला कोणी दुय्यम ठरवले तर मी काय करेन? मी संधी मिळेल तेव्हा त्याचे उट्टे काढेन. कसे? हाती असेल त्या साधनाच्या आधारे. मला सुचते त्यानुसार. ज्यामुळे उट्टे काढण्याचे समाधान मला मिळेल त्यानुसार. यातून एक मनोभूमिका घडत जाते. ती सार्वजनिक होत जाते. त्यांना संस्कारांचे रूप येते (संस्कार हा शब्द रूढार्थाने वापरलेला नाही). मग चोरी केली तरच तो वयात आला हे मानण्याकडे कल जातो. तो एका दिवसात बदलता येत नाही. तो बदलायचा असेल तर चोरी न करता एक मुलगा उभा राहिला अशी शंभर उदाहरणे एका समुहापुढे उभी करावी लागतात. त्या काळात हा बाकी समूह जसा आहे तसा स्वीकारत, थोडा त्रास सोसत त्याच्याहाती पर्यायी जीवनस्रोत देत जावे लागते. "दिला जीवनस्रोत, कर सुधारणा" असं होत नाही.
समूह असा घडत जातो. मग उत्तरे कशी असतील? उत्तरांची प्रक्रिया असेल. एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढावे लागेल तेव्हा ती मिळतील. हा एका पिढीत सुटणारा प्रश्न नाही. माणूस एखादी गोष्ट केव्हा स्वीकारतो, जेव्हा त्याला त्यात त्याच्या हितसंबंधांचे संरक्षण होते आहे हे दिसते तेव्हाच. मग तोडग्याचे पॅकेज असेच काढावे लागेल. ते पॅकेजच असावे लागेल.
एकच शिक्षणाचं उदाहरण घेऊ - ज्या गटांचा आपण विचार करतोय, त्यांची अक्षरांशी ओळखच मुळी गेल्या दोन-चार पिढ्यांमध्ये होते आहे. गणपती ठाऊक नसणाऱ्यांना 'ग' 'गणपती'चा हे शिकवून आपण "ते शिक्षीत झाले" असे म्हणतो ही चूक नाही का? त्या अक्षराशी त्याचं नातं कसं जोडलं जाईल? तेच जोडलं गेलं नाही तर त्या शिक्षणातून आपण अपेक्षा का करतो? हेही मी तसं खूप पुढचं लिहितो आहे.
सक्तीचे पुनर्वसन होत नसते. पुनर्वसन ज्यांचे करावयाचे आहे त्यांना तितक्या ताकदीचे पर्यायी जीवनस्रोत द्यावे लागतात. त्या जीवनस्रोतांचा अवलंब करून जगणं सुसह्य करण्याची क्षमता त्यांच्यात हवी. तेव्हा कुठं त्यांच्यात पुनर्वसनाचा स्वीकार करण्याची मानसिकता निर्माण होईल. चार-दोन कुटुंबं पुढं आली म्हणून समूह पुढं येत नसतो. असे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यांना पाठबळ द्यावे लागते. ते दिले तरच हे प्रयत्न पुढे सरकतात. हे प्रयत्न ज्या परिस्थितीत सुरू असतात ती पाहिली की आपली वाटचाल किती कठीण आहे हे कळते. हे प्रयत्न म्हणजेच मुळात एक संघर्ष असतो. वर पुनेरी यांनी म्हटलं आहे की, "व्यक्ती/ संस्था जे प्रयत्न करतात ते त्यातल्या काही घटकांना मुख्य समाजापासुन वेगळे काढुन." हे असं का होतं? काम करणाऱ्यांना ठाऊक नसतं का की असं काही केलं तर फसगत होईल? ते ठाऊक असतं. मुख्य समाजापासून वेगळं काढून अशी ही जाणीवपूर्वक प्रक्रिया नसते. समाजाचाच एक भाग मानून ही प्रक्रिया सुरू होते. जिथं आहे तिथं जाऊन विकास पोचवण्याचा उद्देश असतो त्यामागे. पण होतं काय की, अशा प्रयत्नांबाबत मुख्य समाजच अनेकदा दूर राहणं पसंत करतो. असं एक जग आहे हे गावीच नसतं. हे दोषारोपण नाही. वास्तव आहे ते सांगतोय. कारण इथंही मुख्य समाजातील अनेक घटकांचीही रोज एक लढाई सुरू असतेच याची जाणीव आहे. त्या लढाईत आपण या घटकांसाठी स्पेस निर्माण करू शकू का?
राहता राहिला सरकार नावाचा घटक. त्याविषयी काय बोलायचे? सरकार स्वतःला समाजासाठीची आपण एक यंत्रणा आहोत असे मानत असते का? माझे वैयक्तिक मत नकारार्थी आहे. सरकार असे मानते आपण काम करण्यासाठी समाज उपलब्ध आहे. मग त्यातून ती तुमच्यासाठी करतोय ही भावना येते. मग ती चॅरिटी ठरते आणि मग केलं तेवढं केलं, त्याचीच टिमकी वाजवली आणि पाठ थोपटून घेतली.
डीनोटिफाईड या शब्दाविषयी मी जे म्हटलं आणि त्यावर शाहरूख यांनी दिलेली प्रतिक्रिया यासंदर्भात बोलकी. शाहरूख म्हणतात, "जेंव्हा त्या जमातींवरचा "गुन्हेगार" हा शिक्का पुसला गेला तेंव्हा त्यांचा वेगळा उल्लेख होणे गरजेचे होते." असहमत. हे वेगळेपण कशासाठी? सरकारला (हे कुणाचे होते?) आरक्षणाची एक व्यवस्था करावयाची होती यासाठी. लक्षात घ्या, सरकार येथे या समुहांना काही 'देत' होते. तो त्या समुहाचाही, आपल्याच समाजाचा एक भाग म्हणून, हक्क आहे, ही भावना किती होती? डीनोटिफाईड हाच शब्द का या वर्गवारीसाठी? डीनोटिफाईड असे म्हणतानाही हा वर्ग वेगळाच राहतोय हे भान तेव्हाच्या शासनकर्त्यांना राहिले नाही. हा सांस्कृतिक वर्चस्ववाद असतो. मनात खोलवर जाऊन बसलेला.वर्गीकरण
प्रतिक्रिया
श्रावण मोडकांचे प्रतिपादन
चांगले
अवांतर नव्हेच...
वाचतो आहे
अजून लिहावे !!!
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सहजरावांना प्रतिसाद
हो.
सहजरावांना प्रतिसाद
उल्लेख
कोणत्या
ब्रिटिशां
बेरड्-रामोशी
मोडकसाहेब तुम्हीसुद्धा
सविस्तर
परीघ
परीघ!