Skip to main content

मांजरे येती रॉयल घरा.. 😺

लेखक साहित्ययात्री यांनी गुरुवार, 02/07/2026 21:53 या दिवशी प्रकाशित केले.

मांजरे येती रॉयल घरा...🐱

 

असेच एकदा टाईमपास म्हणून ब्रिटिश न्यूज चॅनेल्स पाहत होतो. आपल्या सुनक साहेबांचे भाषण होणार होतं.  10 डाउनिंग दरवाजा उघडला आणि कॅमेराचा एकदम चकचकाट टीव्हीवर पाहायला मिळाला. पण मग नीट बघितलं तर ब्रिटनचे पंतप्रधान नाही,एक गुबगुबीत मांजर बाहेर आले होते. 

10 डाउनिंग स्ट्रीट मध्ये मांजर?? ते पण असे भटके दिसणारे??? 
आपल्याकडे दर दाराआड काठी तय्यार ठेवलेली घरे अजूनही पाहायला मिळतात. वाजले म्याव की हाण काठी!

इथे चक्क मांजर आरामात चालत बाहेर आले लाल कार्पेटवर आरामात अंग टाकून झोपले सुद्धा!! त्यांना कोणीही त्रास दिला नाहीच उलट फोटो मात्र निघत गेले.

मग लक्षात आलं अरे हा तर लॅरी!

ह्या लॅरी साहेबांचा जन्म अज्ञात. आपल्या कडे असता तर 1 जून अशी अधिकृत वाढदिवस तारीख लावली असती. पण साहेबांना कोणीतरी  लंडनच्या बॅटरसी कॅट्स आणि डॉग शेल्टर मध्ये आणून सोडले.

2011 साली मात्र त्याचे भाग्य उजळलेच. त्यावेळचे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जोन्सन आणि त्यांच्या पत्नीने त्याला दत्तक घेतले ते त्यांच्या लहानग्या मुलींसाठी pet म्हणून.

पण त्यांचे विशेष उंदीरमारु कौशल्य बघून त्याची नेमणूक मुख्य उंदीर-मार ( chief mouser ) म्हणून झाली. 2011 पासून लॅरी भाऊ त्या पदावर आहेत.

कित्ती आयले कित्ती गईले हे वैशाली सामंतचे 'दाजीबा' गाणे तुम्हाला नक्की आठवत असेल. लॅरी भाऊंना मराठी येत असते तर दर ब्रिटिश पंतप्रधानांना जाताना आणि येताना पाहून तो हे नक्की म्हणाला असता. 😂

लॅरीने तब्बल 6 ब्रिटिश पंतप्रधानांना येताना आणि जाताना पहिले आहे.

सध्या लॅरी 15 वर्षाचा आहे. म्हणजे माणसांच्या भाषेत वानप्रस्थाश्रमात आहे. साहेब अजून गुटगुटीत आहेत. त्याचे दुसरे बालपण आत्ता सुरु झाले आहे.

जाता जाता एक गंम्मत.

इंग्लंड ची एलिझाबेथ-2 राणी जेव्हा वारली तेव्हा तिच्या मृत्यूसंबंधी चा कोड वर्ड होता London Bridge is down. 
आणि लॅरी साहेबाचा आहे Larry bridge is down.

असा हा लॅरी. ब्रिटिश सरकारचा अधिकृत कर्मचारी आहे. पण त्याला पगार वगैरे काही मिळत नाही बरका! 

त्या ऐवजी 10 डाउनिंग स्ट्रीट च्या स्टाफ पडूनच त्याची सगळी काळजी घेतली जाते. 

जगात असंख्य लॅरी फॅन्स आहेत. त्याच्या हालचाली, असंख्य फ़ोटोज तुम्हाला नेटवर मिळतील. 
लॅरी ला उदंड आयुष्य लाभो अशी सर्वांचीच इच्छा आहे. माझीसुद्धा!

लॅरी असाच लोकांना हसवत रहा....

 

तुमच्या कडे आहे का असा एखादा लॅरी. प्रतिसादात नक्की सांगा. 

 

तुमच्या कडे काही भू भू आणि माऊ बाळंच्या आठवणी असतील तरी त्या नक्की लिहा. 

 

साहित्ययात्री (प्रणव जोशी) 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 809
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

समर्थाघरचे श्वान...त्यास थोरही देती मान.

( हे लिहीताना  अशाच एका  भांडूपच्या श्वानाची आठवण झाली. )


खफवर जस्ट दुपारीच एका मांजरीविषयी लिहिले होते.तर ते असे!

आमच्या शेजारच्या काकूंच्या मुलाचं लग्न होते. लग्नासाठी जसे पाहुणे जमायला लागले तसें घरातली गर्दी वाढू लागली. काकूंची प्रिय मांजर त्यात गायब झाली.दोन दिवस झाली तरी ती परतली नाही.शेवटी लग्न झाले. पाहुणे परतले. आता आठ दिवसांनी मांजर परत आली.

तिला शांतता पाहिजे होती काय? यावर आमचा काथ्याकुट सुरुये. मांजरीचे मानसशास्त्र 😅

बर काकू म्हणतात "आमच्या आलेक्सला कॅट फूडचीच सवय, ती इतक्या दिवस काय खात होती? कोण देत होते खायला?"

ह्म्म्म, काकूंना म्हटलं "काकु ती मांजर आहे मांजर स्वतःच अन्न स्वतः मिळवतेच, तिने तिची सोय बरोबर केली असणार "

शेवटी काकूंचा जीव भांड्यात पडला हे महत्वाचे😅


आमच्या कडे ४ मनी माउ आहेत. 
चिनु - १० वर्ष
बनी - ७ वर्ष
बर्फी - ६ वर्ष
आणि आताच एक नवीन addition - बेला - ९ महिने
हे सर्व आमच्या कडे कसे आले यावर नक्किच कधितरी लिहेन. 
आमचे जिव आहेत हे सर्व.
लॅरी सारखाच थाट आहे सर्वांचा. 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

अरे वा! ७ वर्षे म्हणजे बराच मोठा काळ की!


अवांतर : दहा डाऊनिंग मार्ग हे घर पंप्रचं आहे. राजाचं नाही. तस्मात रॉयल हे विशेषण वापरू नये. 

-गा.पै.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

फोटो चढवण्यात अपयश आलेले आहे. 

कसा अपलोड करायचा ते बघितले पण होतं नाहीये. 

बाकी अंतरजालावर लॅरी चे फोटो उपलब्ध आहेत. 

इथे टिचकी मारा 

https://www.google.com/search?q=larry+the+cat&oq=larry+the+&gs_lcrp=EgZ…

 


प्राणी आवडत नसल्याने लेख वाचला नाही पण हजेरी लावली यासाठी लिहीले.

वेगळा विषयावर लिहीले आहे हे नक्की.


मला प्राणी आवडतात पण त्यांच्या नैसर्गिक अधिवासात.  

पाळीव प्राणी अजीबात आवडत  नाहीत.  


गावी कोकणात मांजर हा प्राणि स्वत:ला पाळून घेतो. तशीच एक मांजर आमच्याकडे पाळलेली होती. गावी मांजरे सर्व घरात जाउन येउन असतात, जिकडे  मच्छीचा वास येइल तिकडे जाउन येणार. पण त्यांचे बेस लोकेशन एक घर असते, ज्या घरात त्यांचे विषेश लाड होतात ते त्यांचे बेस लोकेशन. गावभर फिरून आल्यावर रात्री बेस लोकेशन च्या घरात हक्काच्या अंथुरणावर लोळणार.

तर अशी एक आमची मांजर ठरलेली होती. ती तीला वाट्टेल तेव्हा गावातील इतर बोक्यांसोबत "मैत्री" करुन येत असे. बाहेर बोके पैश्याला पासरी असतात. आणि अशा पाळलेल्या मांजरी त्यांच्याकडे जाउन "शेण खाउन" येतात. त्यावर आपला ताबा नसतो. ताबा ठेवुच शकत नाही. कारण दिवसभर यांच्यावर पाळत ठेवणार कोण?

तर अशीच आमची मांजर बाहेर जाउन कार्यभाग उरकुन आली. कालांतराने तिचे पोट फुगले. त्यांमुळे तीची आम्च्या घरात विशेष काळजी घेतली जाउ लागली. लाड केले जाउ लागले

मी लहान होतो पण आमच्या मांजरी ने कोणत्या बोक्यासोबत "संधान" बांधले असेल याचा अंदाज लावु लागलो. बाहेर जाउन मी प्रत्येक बोक्याकडे संशयाने पहात असे. बोका मात्र माझ्याकडे अशा नजरेने पहात असे की,

"हमको क्या देख रहे हो? तुम तुम्हारी मांजर को कंट्रोल मे रखो ने"

सर्व बोक्यांवर फक्त संशयच घेउ शकत होतो, दुसरे काही करुही शकत नव्हतो, आपलाच सिक्का खोटा त्याला काय करणार.

कालांतराने आमची मांजर बाळंत होत असे, परत तीच्या पिलांचे लाड केले जात असत, मग ती पिल्ले मोठी होऊन त्यांचा त्यांचा बेस लोकेशन शोधत असत.

मी त्या पिलांच्या रंगावरुन त्यांचा बाप कोण असावा याचा अंदाज लावत बसे.

आमची मांजर परत गावभर उनाडक्या करायला आणि शेण खायला मोकळी होत असे.

 

असो, असा आमचा मांजरी सोबत टाइमपास होत असे.

 


In reply to by खटपट्या

खटपट्या,

 

तुमचं मार्जारपुराण आवडलं. कोकणांत घरी मांजर पाहिजेच. उगीच सापकिरडू घरात घुसायच्या आधीच बंदोबस्त झालेला बरा. मांजराची चपळता हा स्वतंत्र विषय आहे.

 

आ.न.,

-गा.पै.


मी खूप लहान असताना बाबांनी एक मांजरीचं पिल्लू कुठूनसं आणलं होतं. मी आणि माझी बहीणही लहानच होतो. त्या पिलासोबत खेळायला, त्याला काय हवं नको ते बघायला आम्हाला खूप आवडू लागलं. तिचं फार मोठं वेगळं नाव वगैरे आम्ही ठेवलं नव्हतं, तिला आम्ही मनीच म्हणायचो. तर मांजर हा फार लाघवी प्राणी. स्वतःचे लाड कसे करून घ्यायचे ते तिला छान जमायचं. आमचं घर खालीच होतं, घरसमोर बाग वगैरे होती. तर ती मनी तिचे विधी त्या बागेतल्या मातीमध्ये जाऊन उरकायची.
 
ती तिला हवं तेव्हा भटकायला जायची आणि तिला हवं तेव्हा घरी यायची. मनी मोठी होत गेली तशी तिचे निरागस निळसर डोळे करारी हिरव्या डोळ्यांमध्ये रूपांतरित झाले, पण लाडिकपणा मात्र तोच राहिला. मग एकदा असं समजलं की तिला पिल्ले होणार आहेत. तिला ४  पिल्ले झाली. पिल्ले झाली की मनी त्यांना सात जागी फिरवते. आम्ही मोजलं नाही कधी पण थोड्या थोड्या दिवसांनी मनी त्यांची जागा बदलायची खरी.
 
आधी मनी उंदीर कुठे कधी खायची आम्हाला कधी समजलं नाही, पण पिलांसाठी दोनतीनदा तिने अर्धमेले उंदीर आणले होते. घरामध्ये त्याची घाण मात्र ठेवली नाही. तिच्या पिलांना शी करायला कुठे जायचं ते आम्ही बाहेर मातीमध्ये ठेवून शिकवायचो. तिला शेवग्याच्या शेंगा आणि उडदाचे तळलेले पापडही खूप आवडायचे. आम्ही शाकाहारी असल्याने आमच्याकडून मात्र तिला फक्त दूध-पोळीच मिळायची. मांसाहारासाठी ती स्वतःवरच पूर्णपणे अवलंबून होती. सकाळी आमचे दूधवाले आले की त्यांच्या मापट्याने तिच्या बशीत पण थोडं दूध ओतायचे.
 
तिच्या पिलांपैकी दोन थोडी मोठी झाल्यावर आम्ही सोडून आलो, दोन घरातच थांबली. त्यातीलही एक बोका होता तो नंतर घर सोडून निघून गेला. मनीची पिल्ले आल्यानंतर आम्ही पुन्हा पिलांशी खेळण्यात दंग होऊन गेलो. अशी मनीला बऱ्याचदा पिल्ले झाली. त्यातली बरीचशी घरात राहीली काही निघून गेली, बहुतेक करून बोके होते ते निघून गेले. काही आम्ही सोडून आलो. पिल्ले जास्त मोठी झाल्यावर सोडली तर कुठेही अगदी गाडीवर जाऊन त्यांना सोडून आलो असलो तरी ती काही दिवसांनी घरी परतत असत, त्याचं आम्हाला फार आश्चर्य वाटे. 
 
एकदा एक पिल्लू खूपच सुंदर झालं होतं मनीला तिचं नाव आम्ही ऐश्वर्या ठेवलं होतं. आतपर्यंत जितक्या मांजरी झाल्या त्यात खरोखर ती खूपच देखणी होती. ती आजिबात घराबाहेरच पडत नसे, बरीच मोठी झाली तरी ती कधीच घराबाहेर गेली नाही. तिचा स्वभाव खूपच भेदरट होता. कुठून काही पडल्याचा आवाज आला तरी ती घाबरून मांडीवर येऊन बसत असे. हिचं कसं होणार अशी आम्हालाच चिंता लागून होती. एकदाच पहिल्यांदा ती घराबाहेर गेली आणि नंतर घरी पुन्हा कधी आलीच नाही. ती इतकी घाबरट होती की तिला कदाचित रस्ताही ओलांडता येत नसेल आणि मांजर घरी परततेच तेव्हा तिचं काही बरंवाईट झालं असेल असा आमचा आम्हीच समज करून घेतला आणि वाईट वाटून घेतलं.
 
तर मनीपासून सुरु झालेला हा प्रवास, मनी म्हातारी होऊन गेली तरी तिची वंशवेल आमच्याकडे चालूच राहीली होती. काही पिल्ले कधी घरातच दगावत तेव्हा त्यांना टेकडीवर जाऊन आम्ही पुरून येत असू. खूप वाईट वाटे. अनेकदा मन्यांची नवजात पिल्ले बोक्यांनी येऊन पळवली. खूप आश्चर्य वाटायचं. मग ते समजल्यावर तीही खबरदारी घेऊ लागलो. पण नंतर नंतर काही पिलांचं घरात असताना मरून जाणं, पिल्ले नवीन असताना मांजरीने घरात उंदरे आणणं त्याची घाण होणं, बोक्यांनी पिल्ले पळवून नेणं या गोष्टींचा त्रास होऊ लागला.
 
आमच्याकडे शेवटची मांजर राहिली होती तिला जरा जास्तच वर्षे पिल्ले झाली. म्हणजे आम्हाला वाटायचं ही म्हातारी झाली आहे, कधीही जाईल. पण काही दिवसांतच तिचं पोट फुगलेलं दिसायचं. खूप जास्त वयात पिल्ले झाल्याने की काय पण ती पहिलीच अशी मांजर निघाली जिने शेवटी शेवटी स्वतःचीच पिल्ले खाल्ली, बोक्यांनी तर नेलीच काही. नंतर नंतर ती खूप घाणेरडीही राहू लागली. तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती नेमकी चतुर्थी-एकादशीलाच घरात उंदरे-पक्षी मारून आणायची, ती पूर्ण न खाता त्यांचे अवशेष घरात सोडून द्यायची. एकदा देवघरातच मेलेला उंदीर ठेवून गेली होती.
 
या शेवटच्या अनुभवांनंतर मात्र आम्ही मांजरी पाळणं बंद केलं, तरी साधारण पंधरा ते वीस वर्षे आम्ही मांजरींच्या सहवासात राहीलो, त्याही आमचं कुटुंबच होत्या. त्यांच्या सहवासात ताणतणाव खरंच जाणवत नसतील पण तेव्हा तशी जाणीव नव्हती. आता फ्लॅट सिस्टीममुळे मांजर काय कोणताच प्राणी पाळणं मला शक्य वाटत नाही. आणि इतकी वर्षे त्यांच्या संगतीमध्ये राहून मन भरलं असेल कदाचित.

In reply to by श्वेता व्यास

छान अनुभव, मांजरी उंदरे चिमण्या घरात आणू लागल्या की तिरस्कार वाटू लागतो.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद अबा, अंगणात आंब्याचं झाड होतं, मनी स्वतः त्यावर जाऊन बसायची आणि खाली पिल्लाना आवाज देत बसायची, त्यांना झाडावर चढणे शिकवण्यासाठी. झाडाच्या खोडाला पिलांना पुढच्या पायांच्या नखांना धार लावायला शिकवायची. पिल्ले आपलीच शेपटी पकडण्यासाठी गोल गोल फिरत खेळत ते बघायला खूप मौज वाटे.


मांजरी पाळण्यासाठी पण महानगरपालिकेचा परवाना घ्यावा लागतो का ? कुत्रा महानगरपालिकेत नोंदवून बिल्ला घ्यावा लागतो तसे काहीसे ?