छोटा शिमला https://www.misalpav.com/tourism/53715 -१
https://www.misalpav.com/tourism/53727 -२
https://www.misalpav.com/tourism/53743 -३
उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा समजून घेतली व रूममधे गेलो. रात्रीचा मेन्यू मस्त होता. जेवल्यानंतर निद्रादेवीने अलगद कुशीत घेतले.........
आता पुढे.
चौकस चिंगी सारखे,निरीक्षण हा माझा स्थाई भाव आहे. जीथे जातो तीथे जरा हटके माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक पहाता हाॅटेलचे मालक कोण,खाजगी,सरकारी, किती वर्षपुर्वी स्थापन झाले वगैरे चांभार चौकश्या करायची काही गरज नाही पण रहमान किडा स्वस्थ बसू देत नाही.हाॅटेल मधील फोटो गॅलरी मधे कै.रा.ब. श्री दिवान सिंह मदान,व मिळालेल्या "रायबहादूर", या पदवी प्रमाणपत्रांच्या फोटोफ्रेम दिसल्या. रायबहादूर हे तत्कालीन मालकांचे पुर्वज,प्रिन्सली नाभा स्टेट मधील प्रतिष्ठित व्यक्ती होते.त्यांना ब्रिटीश सरकारने रायबहादूर ही पदवी दिली होती. पुश्तैनी जागेवर १९९२ मधे बांधलेले हाॅटेल समुद्र सपाटीपासून हाॅटेल साडेसहा हजार फुट उंचीवर आहे. हाॅटेलची रचना,रंगरंगोटी,पडदे, फर्निचर आणि प्रकाशयोजने मधे राॅयल टच दिसून येत होता.
बिशप काॅटन शाळा जवळच,दोन चाकीने सहा सात मिनिटाच्या अंतरावर.डोंगर उतारावर,उंच सुचिपर्णी,देवदार वृक्षांनी वेढलेला,अतिशय निसर्गरम्य परिसर. मुख्य रस्त्याजवळ पण कोलाहला पासून दूर. निरव शांतता कशाला म्हणतात ते इथे कळते.(utter serenity).सखोल वर्णन करण्याचा उद्देश असा की हे सर्व बघून मन प्रसन्न झाले.सकाळी लवकर उठून पक्षीदर्शन करण्या साठी परफेक्ट लोकेशन वाटले.नेहमी प्रमाणे,पाच वाजता डोळे उघडले. हात जोडले,
"कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती
करमुले तू गोविंदम्,प्रभाते कर दर्शनम्",
सकाळी उठवल्याबद्दल भगवंताचे आभार मानले व प्रातस्मरणीय श्र्लोक पुटपुटत चहाचे सामान ठेवलेल्या टेबला कडे मोर्चा वळवला.
"आदौ रसना सौख्यमं,
ततः दन्तधावन-लीला,
तदनन्तरं अंगविक्षेप:,
अन्ते च महा-उदरभरणम्!"
"नास्ति चहात् परं सौख्यं",हे मात्र बरिक खरे हों
नित्यकर्म आटोपून खाली उतरलो.सहा वाजले होते. शुकशुकाट होता.स्वागतकक्ष कर्मचारी बसल्या बसल्या डुलक्या घेत होता. डायनिंग हाॅल कडे डोकावले.तिकडेही सामसूम होती.मला पाहता मुख्य प्रवेशद्वारावरील चौकीदार घुमटीच्या बाहेर आला. सुहास्य वदने अभिवादन केले.याचे कारण कालच त्याला मी पक्षी कसे ओळखतात याबद्दल शिकवले होते मोबाईल वर ॲप डाऊनलोड करून दिले.तो तेच पहात होता.मला म्हणाला "सर,हाॅटेलच्या मागच्या बाजूला जा हमखास पक्षी दिसतील."
मी पण माझे ॲप सुरू केले व कॅमेरा घेऊन चालायला सुरुवात केली.रस्ता छोटाच,डांबरी पंचेचाळीस डिग्री चढण, आसपासचा परिसर न्याहाळत चाललो होतो. किलबिलाट सोडला तर इतर कुठलाच आवाज येत नव्हता. सर्वस्वी नवी जागा, पुण्यातील झाडाच्या तिप्पट उंचीची झाडे,कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत याचा अंदाज घेण्यासाठी ॲप कडे नजर टाकली. त्यात चार पक्षांची नावे दिसत होती,एकही ओळखीचा नाही.नजरेला पडावेत म्हणून एका जागी स्थिरावलो.
सकाळी सकाळी,एकाच ठिकाणी उभा,हातात कॅमेरा, भिरभिरणारी नजर,मला अशा अवस्थेत बघून, रस्त्यावरून जाणाऱ्या शिडशिडीत माणसाने विचारले "पक्षी बघताय काय? या माझ्या बरोबर." मी त्याच्या बरोबर चालू लागलो. आम्ही कोण,तुम्ही कोण झाले. "शिनपा",चा सेवानिवृत्त चिफ इंजिनियर होता.(जशी मनपा तशी इथली शिनपा) थोडे अंतर पुढे आल्यावर तो म्हणाला,"इथे थांबा, दाणे टिपयला पक्षी येतील",आणी पुढे निघून गेला.खरोखर थोड्या वेळात पक्षी जमा होऊ लागले.
पाचशे मिटर मधेच रेंगाळत राहिलो.बिशप काॅटन शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या टोळ्या रनिंग करत गेल्या.पि टी चा (फिजिकल ट्रेनिंग) तास असावा.नेहमीचे प्रभात फेरीवाले एकमेकाला जाता येता हाय,हॅलो करत होते.काही जणांनी विचारपूस केली, काही जण विचीत्र नजरेने बघत पुढे निघून गेले.
सारेच नवीन पक्षी, ग्रेट बारबेट,व्हर्डिटर फ्लायकॅचर, ग्रे ट्रिपी (Gray Treepee),ग्रे हुडेड वॅर्ब्लर,कबुतर,थ्रश वगैरे.
पक्षांची दाणे टिपण्याची लगबग बघीतली.एक भांडकुदळ असावा तो इतरांच्यात न मिसळता जरा बाजूलाच दाणे टिपत होता.सारे पक्षी पोट भरल्यावर निघून गेले.आठ वाजता "कुफ्रीला",जायचे होते.साडेसात वाजले होते.घाई घाई मागे फिरलो.
पक्षांची काही प्रचि.....
^^^^^^^^^
नाष्ट्यासाठी मंडळी जमली होती.डायनिंग हाॅल मधे सर्व गोष्टी निटनेटक्या पद्धतीने मांडून ठेवलेल्या होत्या.हाॅलचे नाव "व्हर्टिगो", दोन बाजूला काचेच्या पारदर्शक भिंती,बाजूच्या खोल दरीतले पाईन, देवदार वृक्षांचे शेंडे इथे बसून सहज दिसत होते.पलीकडे शिमला शहराचे विहंगम दृश्य दिसत होते.मोठ्या सिट आऊट मधे "पिटोनिया, फ्लाॅक्स" फुलांच्या कुंड्या,बर्ड फिडर पक्षी, फुलपाखरे किटकांना आकर्षित करत होत्या.हाॅलचे नाव जरा विचित्र वाटले,"व्हर्टिगो",असे नाव ठेवण्याच्या मागे नक्की काय कारण असावे! तेंव्हाच कुणाला तरी विचारायला हवे होते पण नाष्टा व पक्षी यांच्या नादात साफ विसरलो.मला वाटते, कदाचित भोवतालचा निसर्ग,पक्षी आणी शांतता अनुभवत चविष्ट जेवणामुळे एक प्रकारची झिंग येत असावी म्हणून तर नाही?.
असो,सर्वजण कथा, कादंबरीत वाचलेल्या "कुफ्री", गावाकडे प्रस्थान करण्यास उतावीळ झाले होते. सर्व पुणेकर मंडळी,शिमला थंड हवेचे ठिकाण असे प्राथमिक शाळेपासून घोकलेले.हायनेक स्वेटर्स,हुडिज घालून तयार होते.महिलांनी एक शाल जवळ ठेवली होती. मी मात्र एक जाडसर टी शर्ट आणी जीन्स घातली होती. छोट्या गाड्या तयार होत्या.ट्रान्सपोर्ट लिडर मात्र बरमुडा, गोल गळ्याचा टी शर्ट व चपला घालून फिरत होता. चेहर्यावर स्पष्ट दिसत होते की शिमला आता शिमला राहीला नाही.सांगत होता,"बिशप काॅटन शाळे जवळ एकच घर होते, आता भरपूर वस्ती झाली आहे".वाहन चालक त्याच गल्लीत वाढलेला होता.त्याने जुने घर सुद्धा दाखवले. घराचे वय आणी संरचना पहाता शंका घेण्यास जागा नव्हती.इतर घराच्या मानाने हे एकच घर वेगळे दिसत होते.
सोळा कि.मी.प्रवास होता.कुफ्री भारत-तिब्बत रोड वरचे एक निसर्गरम्य ठिकाण.पुर्वी हा भाग नेपाळ मधे होता. तत्कालीन नेपाळ नरेशने केलेल्या साम्राज्य विस्तारामुळे ब्रिटीशांचे लक्ष वेधले गेले १८१९ मधे "सुगौल", रणभूमीवर ब्रिटिश सैन्याने गोरखा सैन्याला धूळ चारली. सुगौल संधी तहा अंतर्गत हा प्रदेश भारताशी जोडला गेला.याच मार्गावर"जतोंग",छावणी आहे.याचा सुद्धा मोठा इतिहास आहे. पण पुन्हा कधीतरी.साडेसहा हजार फुटावरून आठ हजार फुट उंचीवर चाललो होतो. पर्यटकांना "माऊंटन सिकनेस",चा त्रास होत नव्हता ही जमेची बाजू होती.
ऐंशी व नव्वदच्या दशकात जम्मू रेल हेड होते. तिथून पुढे सर्व प्रवास बसने करावा लागत असे. रस्ते छोटे व दुर्गम. पहिल्यांदा प्रवास करणाऱ्या सैनिकांना माऊंटन सिकनेस बद्दल सुचना दिल्या जायच्या.पत्नीटाॅप (उधमपुर जवळच्या एका शिखराचे नाव आहे) ते काझीकुंड हा प्रवास तर "गोल गोल राणी", खेळा सारखा असायचा.काहीजण खाणेपिणे टाळायचे.जम्मू ते कारगिल, केरण, गुरेज,तंगधार, बुधखरबू, लेह मधे कार्यरत असलेल्या सैनिकांना आठ ,दहा कधी विस,विस दिवस थांबत थांबत प्रवास करावा लागत असे. "विंटर स्टाॅकिंग",ही एक मोठी ॲक्टीव्हिटी,मे ते आक्टोंबर च्आया दरम्यान पुर्ण करावी लागत असे.आता ऑल व्हेदर थेट रेल आणी रोड झाल्याने सैन्य आणी नागरी दळणवळण बरेच सोपे झालेय आहे.दिल्ली ते श्रीनगर, बारामुल्ला पर्यंत सरळ ट्रेन आहे.तंत्रज्ञानामुळे अंतरही कमी झाले आहे.सलग प्रवास सुखकर झाला आहे.कुशल इंजिनियर,तंत्रज्ञ व अन्य कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने हे साध्य झाले आहे.मला तर नवल वाटते.आजही पिरपंजाल पर्वताचे रौद्र रूप आठवते. ते खुनी नाले,जागोजागी छोटी मंदिरे,पिर बाबा..... आणी त्याच्या बद्दल वरिष्ठांकडून ऐकलेले किस्से....... असो, पुन्हा एकदा तसेच वातावरण बघून माऊंटन सिकनेस नाही पण नॉस्टॅल्जिया जरूर झाला.
मिपावर "ओव्हर हाइप्ड",हा शब्द बोकाळलाय.मला वाटते कुफ्री सुद्धा ओव्हर हाईप्ड टुरिस्ट डेस्टीनेशन आहे. (वाक्य रचनेमुळे भारी वाटू लागलय) का ते नंतर सांगतो.
साडेआठ वाजता निघून कुफ्री ॲडव्हेंचर ॲण्ड स्नो पार्कला साडेदहाला पोहोचलो.पर्यटकांचे स्वागताच्या साठी विवीध सहासी खेळ तयार होते.एक वाजेपर्यंत मनसोक्त खेळायला मिळणार होते.झिप लाईन,हाॅन्टेड हाऊस,डॅश कार,बंगी जम्प,फाईव्ह डी मुव्ही,इनफिनीटी रूम वगैरे वगैरे.पर्यटकांनी राख्या (Wrist Band) बांधून घेतल्यावर वयोगटा नुसार आपापल्या आवडीच्या खेळाकडे पांगले. तैनात कर्मचारी बॅण्डवर सही करत होते. रिस्ट बॅण्डची युक्ती कोणी शोधली असावी? बरेच ठिकाणी हे बॅण्ड बांधताना बघीतले आहे. यामधे एकच गोष्ट दोन वेळा करता येत नाही.आजकाल बहुतेक सर्व खेळ पर्यटन स्थळांवर उपलब्ध असतात. "पुलंची", आठवण आली. ते जर आज बरोबर असते तर म्हणाले असते."शिंच्या,हे काय रें,आमच्या रत्नांग्रिस सुद्धा हे सगळं आहे बरं का! इतक्या लांब येवून कशास एवढ्या दमड्या खर्च करायच्या", किंवा असेच काहितरी.
कुफ्री मधील निसर्ग सौंदर्य सोडले तर बाकी विशेष काही नाही. म्हणून मला ओव्हर हाईप्ड वाटले.मी सर्व खेळ खेळून चुकल्याने असे वाटत असेल.
कदाचित पर्यटन स्थळांचे सुद्धा वय असते असे म्हणावे लागेल. सहप्रवाशांमधे एक नवविवाहित जोडपे, स्वमग्न, आलौटेड सिटवर न बसता शेवटच्या सिटवर बसायचे. कुणाशी फारसे घेणे देणे नाही. तेव्हढ्या पुरते हाय,हॅलो करून कोषात जात होते.बाकी अनुभवी कुटुंबवत्सल मुलां नातवंडा बरोबर तर कुणी समदु:खी, गट्टी जमली त्यांच्या बरोबर असे विभागले होते.
थोड्यावेळा पुरते का होईना मन कोल्हापूरास फेर फटका मारून आले.आणी,अर्थात फेमस गाणे आठवले जे लग्नापूर्वी एकमेकास हमखास विचारले जाते.....
"लोणावळा, खंडाळा,
कोल्हापूरचा पन्हाळा
बेंगलोर, गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला ?"
मला फक्त विस दिवस सुट्टी मिळाली होती. सत्यनारायण, गोंधळ व इतर धार्मिक कार्यक्रमा मुळे वेळ कमी होता म्हणून आम्हीं जवळचेच कोल्हापूर,पन्हाळा ऑप्शन पसंत केले.तेंव्हा झाशीला कार्यरत होतो,नंतर "खजुराहो ", फ्रिक्वेंट डेस्टीनेशन झाले होते.
आलोच आहोत तर एक दोन खेळ बघू. हाॅन्टेड हाऊस, फाईव्ह डी मुव्ही बघीतली आणी बंगी जम्पच्या समोरच्या बाकड्यावर येवून बसलो. जाडे भरडे,लुकडे सुकडे,मोटे नाटे,लहान थोर सर्व जण "पहले आप,पहले आप" करत बंगी जम्पचा आनंद घेत होते. बरोबरचे चित्रीकरण करत होते. जवळच्या दुकानात विंण्डो शाॅपिंग करावे असा विचार करून तिकडे मोर्चा वळवला. हिमाचल स्पेशल ड्राय फ्रुटस्,ज्यूस, जाम, केसर,पहाडी बदाम,पहाडी लसूण,ॲपल बर्फी,किवी बर्फी जडीबुटी, शिलाजित(खलमकडा) व इतर अनेक गोष्टी विकायला होत्या.पर्यटन स्थळावरचे दुकानदार हुषार असतात. त्यांना माहित असते कोणाला काय दाखवायचे. आम्हांला त्यानी पहाडी लसूण, हृदय, किडनी, लिव्हर वर किती गुणकारी आहे याचे गुणगान केले. तर लहान मुलांबरोबर असणाऱ्यांना कुटुंबाला घरगुती चॉकलेट्स कशी हेल्दी आहेत या बद्दल बौद्धिक देत होते.आम्हीं थोडे ड्राय फ्रुटस् व लसूण खरेदी केला. (लसूण,बारीक सुपारीच्या आकाराचा गोल,खालून चपटा व आतमधे मोतीया कलर असा असतो.सोलून ठेवला तर मोती म्हणून कुणी सहज फसेल)
एकाने अंबा बर्फी घेतली.कहर....शोले मधला असरानीचा डायलॉग आठवला "जेल मे सुरूंग." पुणेकर कुफ्रीमधे अंबाबर्फी घेतो म्हंजे कहरच......अर्थात कुणी,कुठे,काय घ्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
एक वाजला आला होता,जेवण्यासाठी प्रस्थान केले. जेवण उत्तम होते.बाजूच्या खिडकीतून कुफ्री शहराचे सुंदर दृश्य दिसत होते.
चिनी महाल,हिमालयन प्राणी संग्रहालय व ओव्हर हाईप्ड The Mall road, Scandal Point and Shimla Church ही प्रेक्षणीय स्थळे उर्वरित दिवसाचे लक्ष होते.पर्यटक गाडीमधे बसले आणी गंतव्य स्थाना कडे अग्रेसर झाले.
चिनी महाल.
कुफरी जवळ चीनी बंगला एक ऐतिहासिक, ब्रिटिश कालीन वास्तू आहे.मागे उंच पर्वत शिखरांची रांग आणी अद्भुत निसर्गरम्य परिसर आहे.स्थानिक व ब्रिटीश वास्तुकलेचे अद्भुत मिश्रण बघायला मिळते.संपुर्ण महाल लाकडी आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार महाराजा पटियाला भुपेंदरसिंह यांनी चिनी मूलच्या पत्नीसाठी हा बंगला बांधला होता.भारत व पाकिस्तान मधे सन बहात्तरचा "शिमला समझौता", इथेच संपन्न झाला. ख.खो.दे.जा. प्रधानमंत्री इंदिरा गांधी शिमला येथील वास्तव्यात इथे रहाणे पसंत करत. बंगल्या समोर दोन भूर्ज पत्राची झाडे आहेत. पर्यटनस्थळ,स्थानिक विक्रेते भरपूर आहेत.
हिमालयन प्राणी संग्रहालय
चिनी बंगल्या शेजारीच प्राणी संग्रहालय आहे. डोंगराळ भाग चढ उतारावर प्राण्यांचे,पक्षांचे आवास बांधलेले आहेत.कमी जास्त प्रमाणात इतर प्राणी संग्रहालया सारखेच हे संग्रहालय आहे.
सांगण्या सारखी गोष्ट इथे "ओरिऐंटल टर्टल डव्ह", (खवलेदार होला, तामकवडा) आणी "मुनाल",(हिमाचलचा राज्य पक्षी) त्यांच्या नैसर्गिक अधिवासात दिसले ना की प्राणी संग्रहालयाच्या खुराड्यात."ओरिऐंटल टर्टल डव्ह" यांची जोडी प्रेम करताना दिसली.
ओरिऐंटल टर्टल डव्ह.
पुण्यामधे लाफिंग डव्ह व अम्रीकेत मोर्निग डव्ह बघीतले आता हा तिसऱ्या प्रकारचा डव्ह दिसला.तिन्ही प्रकारचे पक्षी,आकार,रंग व खास चिंन्हामुळे सहज ओळखता येतात. टर्टल डव्हच्या गळ्यावर स्कार्फ सारखे पट्टे असतात. विषयांतर नको.
मुनाल पक्षी आपल्या कडील मोरासारखा रंग बिरंगी असतो.मोर आणी लांडोर प्रमाणेच नर मुनाल खुप सुंदर,डोक्यावर हिरवा तुरा, लाल मान बाकी अंग मोरपंखी, शेपटीचा रंग नारंगी सोनेरी असतो.मादा मुनाल ही तेव्हढी सुंदर नसते.तीचा रंग तपकिरी असतो.इच्छुकानी स्पष्ट कल्पना येण्यासाठी अंतरजालावरील प्रचि बघावे.
सुर्यास्ताची वेळ होती. पूर्वनियोजित पार्किंग मधे बस पोहचली. येथून पुढे छोट्या गाडीने प्रवास होणार होता.
शिमला पर्वतीय क्षेत्रात वळणावळणाचे,अरुंद आणि शांत रस्ते आहेत.जणू मोठ्या पायर्या. बरेच ठिकाणी मोठ्या गाड्या जाऊ शकत नाही.नगर निगमने प्रदूषण नियंत्रणा साठी नो व्हेईकल झोनस डिक्लेअर केले आहेत. वाहने, गर्दी,शार्प टर्न, हेअरपिन बेंण्ड मुळे वहातूक कोंडीचा सामना बरेच वेळा करावा लागतो. माॅल रोडवर वाहनांना प्रतिबंध आहे. माॅल रोडवर जाण्यासाठी शिमला नगर निगमने दोन उदवाहक (Elivators) लावले आहेत. पर्यटक, स्थानिक सर्वांनाच या उदवाहकांचा वापर करावा लागतो.भयंकर गर्दी असते.आम्ही रांगेत उभे राहीलो. व्यवस्थापन उत्तम होते. लवकरच आम्ही रोडवर पोहचलो जणू तळ मजल्यावरून दहाव्या मजल्यावर गेल्या सारखे.
रोडच्या सुरूवातीलाच बरेच लोक लहान मुलांच्या बाबा गाड्या (Stroller) घेऊन उभे होते.हे कशासाठी!,रहावले नाही, विचारले. गंमतशीर उत्तर मिळाले.इथे कुठलेही वाहन आणण्यास प्रतिबंध आहे. लहान मुल बरोबर असल्यास या बाबा गाड्या भाड्याने घ्याव्या लागतात. तिथेच बँकर्स शाॅपमधे प्रत्येकाच्या पसंतीचे चहा,काॅफी,पॅटिस,समोसा आणी पेस्ट्रीज फस्त केले व माॅल रोडवर चालायला सुरुवात केली. दोन्ही बाजूला विवीध प्रकारची दुकाने.शहरातील बाजारपेठ,प्रचंड गर्दी जणू पुण्यातल्या लक्ष्मी रोड वरील गणपतीची मिरवणूक,फक्त ढोल ताशे व गुलाल नव्हता.असो पण खुप मजा आली.दोन तास फिरलो. क्राईस्ट चर्च, स्कॅण्डल पाॅईंट,गेऐटी थिएटर बघीतले. अर्थात बाहेरूनच.विंण्डो शाॅपिंग करून उदवाहकाने पार्किंग मधे परत आलो.माॅल रोडचा संक्षिप्त इतिहास व भूगोल काही माहित असलेला काही अंतरजालावरील माहितीनुसार खाली वाचकांसाठी दिलाय.
द माॅल रोड
मैदानी कडक उन्ह सहन होत नसल्यामुळे साहेबांनी उन्हाळ्यात मसूरी,नैनिताल,शिमला, मनाली अशा पर्वतीय शहरात तात्पुरती वस्ती केली.मनोरंजन,सकाळ संध्याकाळ फिरणे,खरेदी, सोशलायझिंग साठी थिएटर्स,क्लब बनवले. साहेबांची गरज भागवण्यासाठी व्यापारी इथे पोहोचले. सुरवातीला ऐत्तदेशीय लोकांना इथे येण्यास प्रतिबंध असे.आता हेच माॅल रोड पर्यटकां साठी प्रेक्षणीय स्थळ बनले आहे.
शिमल्यातील माॅल रोड आणी रिज रोडच्या वळणाला स्कॅण्डल पाॅईंट म्हणून ओळखतात. ब्रिटिश मुलगी महाराजा बरोबर पळून गेली म्हणून हे नाव पडले असे अंतरजालावर कळाले."माॅल रोड शिमला", अधिक माहिती साठी गुगल सर्च करावे.
१८८७ मधे "गेएटी थिएटर", मनोरंजनासाठी बांधले ते ही माॅल रोडवरच आहे.
माॅल रोड, लक्कड बझार जवळचे क्राईस्ट चर्च, १८५७ मधे बांधलेले प्रार्थनास्थळ गोथिक वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
दूरSsssss.. दर्शन.
पर्यटन करताना, काही प्रेक्षणीय स्थळे जवळ असतात पण वेळे अभावी,किंवा बकेट लिस्ट मधे नसल्याने बघता येत नाहीत. पण जाता जाता सहज त्यांचे दर्शन घेता येते.अशा काही जागा,
शिमला हवाई अड्डा.
जुबारहट्टी,घरेलू हवाई अड्डा डोंगरमाथा कापून बनवलेला आहे.टेबल टाॅप क्ष्रेणीत येतो. कुफ्री जाताना त्याचा एरियल व्ह्यू दिसतो. खराब मौसम,पुअर व्हिजिब्लिटी या ना त्या कारणाने उडाने बहुतेक वेळा रद्द होतात. त्यापेक्षा रोड कनेक्टिव्हिटी खुप चांगली आहे.
चैल पॅलेस.
थ्रि इडियट्स चित्रपटाचे शेवटी रणछोडदास छांछड याच्या शोधार्थ बाकीचे मित्र येतात तो हाच शानदार पॅलेस. बाहेरचे चित्रीकरण याच बंगल्यासमोर तर आतले छायाचित्रण दुसरी कडे कुठेतरी झाले.
महाराजा भुपेदर सिह,पटियाला यांना लाॅर्ड किचनरने शिमल्या मधून निष्कासित केले. १८९१ मधे महाराजांनी शिमल्यापेक्षा जास्त उंचीवर हा पॅलेस बांधला.कुफ्री जाता जाता हा पॅलेस लांबून दिसतो. महाराजा पटियाला आपल्या शानदार जीवनशैली साठी जगभर प्रसिद्ध होते. चाळीस रोल्स राईस( Roles Rails car) गाड्या यांच्या गॅरेज मधे होत्या. "पटियाला पेग,पटियाली सलवार,लस्सी दा ग्लासा", अशा अनेक गोष्टी प्रिन्सली स्टेट्स पटियाला बरोबर जोडल्या गेल्या आहेत.
सरते शेवटी,हाॅटेलवर परत आलो.खुप दमलो होतो. पाठ टेकताच निद्राधीन झालो.....
बाकी पुढे...
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रचि डकवायची आहेत.
थोडी वाट बघा.
प्रचि डकवली.
पर्यटनस्थळ इतके सुंदर आहे की माझ्यासारखा नवशिक्या फोटोग्राफर ने कसेही बटन दाबले तरी चांगलेच प्रचि येते. प्रत्येक धाग्यावर थोडी थोडी डकवतोय.
सगळी गंमतच असते.
हातात हात घालून भटकले की कळते. (आणि पोटोबा भरलेला असावा.)
वा वा!!
हा पण भाग मस्त जमलाय बरे का!! फोटो डकवायची टेक्निकही जमली आहे. मागचा राहीलेला भागही वाचला. पुभाप्र
कर्नल साहेब, पर्यटनस्थळ तर…
कर्नल साहेब, पर्यटनस्थळ तर सुंदर आहेच पण त्याबद्दलचे तुमचे लिखाण, चित्रे आणि अवान्तर माहिती सगळेच सुन्दर!
रच्याकने, काही दशकान्पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे युरोप प्रत्यक्ष पहाण्याआधी हिन्दी सिनेमात पाहिला होता, तीच गत जपानची. पण मी जरी जुन्या काळचा (देव आनन्द आणि साधना असलेला) "लव्ह इन सिमला" सिनेमा पाहिला असला तरी सिमला प्रत्यक्ष पहाण्याची आता जरूर राहिलेली नाही - तुमच्या लेखाने ते काम करून टाकलेले आहे😊
आणखी एक - तुमच्या माल रोडच्या चित्रात आलेली (आता) "ICICI Bank" ची शाखा असलेली इमारत १८७७ साली त्या काळच्या "Mercantile Bank" करता बान्धलेली होती. नन्तर त्यात बरीच सुधारणा करून ती "Grindlays Bank" ने १९१२ साली विकत घेतली आणि २००२ साली "ICICI Bank"ला विकली. म्हणजे आता ती सुमारे १५० वर्षाची आहे. १८६४ पासून १९४७ पर्यन्त शिमला ही ब्रिटिश काळातली भारताची उन्हाळी राजधानी असल्यामुळे शिमल्यातल्या बऱ्याच ऐतिहासिक इमारती अशाच १००-१५० वर्षान्च्या आहेत.
धन्यवाद मोघे सर.
In reply to कर्नल साहेब, पर्यटनस्थळ तर… by शेखरमोघे
माॅल रोडवर डाॅमिनोज च्या खाली एक बेकर्स चे दुकान आहे. ते ही असेच जुने आहे. तीसरी का चौथी पिढी चालवत आहे. चविष्ट पफ,सॅण्डविचेस, काॅफी मिळते.
अधिक माहितीबद्दल आभार.
उत्तम फोटो आणि वर्णन …
उत्तम फोटो आणि वर्णन .....
दरवेळी सिमल्याला गेलो कि ... गर्दी वाढली आहे असा डायलॉग ऐकायला मिळतो ... पण कितीही गर्दी वाढली तरी संध्याकाळी मॉल रॉड वर भटकण्याची मजा कमी होत नाही ...
कुफ्री वरून पुढे सांगला व्हॅली बेस्ट आहे
छानच,बरीच नवी माहिती समजली…
छानच,बरीच नवी माहिती समजली.मुनाल पक्षी प्रत्यक्षात पाहावा वाट्तोय!
सर्व वाचकांचे मनापासून आभार.
अप्रतिम निसर्ग आणी इतिहास हे या पर्यटनस्थळाचे वैशिष्ट्य आहे.
इतिहासातील बऱ्याच खुणा संपल्या किंवा पुसट झालेल्या आहेत. तरीदेखील या ठिकाण चे आकर्षण काही वेगळेच आहे.
छान फोटो आणि भटकंती, १३ …
छान फोटो आणि भटकंती, १३ वर्षांपूर्वी या रस्त्यांवरून मारलेले फेरफटके आठवले.