आपण सगळेच व्यवहारात बोलताना हेच वर लिहिलेले शब्द नेहमी वापरतो. पूर्वीपासून वापरत आलोय. आपल्याला नेहमीच मुलाचं शिक्षण महत्त्वाचं वाटतं. आणि मुलीचं फक्त लग्न महत्त्वाचं वाटतं. फक्त लग्न. तिच्या जन्मापासूनच तो आईबापांना चिंतेत टाकणारा प्रश्न. एखाद्या बचतयोजनेची जाहिरात असो किंवा पर्सनल लोन.
आपण मुलांचं लग्न आणि मुलीचं शिक्षण याला महत्त्व देत नाही. एका प्रसिद्ध लेखकानं काहीशा कडवटपणानं एका लेखात लिहिले होते की,'आपल्या देशात पुरुष कसाही का असेना, त्याला एक बायको मिळतेच.'मुलानं शिकावं, कुठं तरी नोकरी मिळवावी की त्याचं काय लग्न होतंच. पण मुलगी उलट जास्त शिकलेली नसावीच. उगीच नवऱ्याच्या पेक्षा जास्त शिकलेली असेल आणि त्याच्या डोक्यावर बसली तर? लग्नाच्या बाजारात एलिजीबल ठरण्याइतकंच तिनं शिकावं. ती गोरी, सुंदर, उत्तम स्वयंपाक करणारी, सासरच्या माणसांची सेवा करणारी, कुलाचार, कुलधर्म, व्रतवैकल्ये, उपवास पाळणारी असावी. लग्नानंतर लगेच तिनं गरोदर व्हावं. आणि मुलगा जन्माला घालावा. "स्वकुलतारक सुता,सुवरा वरुन वाढवी वंश वनिता."
बस एवढीच अपेक्षा. तिच्या शिक्षणाशी काय देणं घेणं? शिक्षणाचा उपयोग व्हावा यासाठी हवं तर तिनं घरच्या घरी शिकवण्या घ्याव्यात. शहरात परिस्थिती बदलली असली तरी लहान गावांमध्ये अजूनही फार वेगळं काही नाही.
का नको असते मुलगी? ती बायको म्हणून, आई म्हणून, बहीण म्हणून हवी असते पण पोटी मुलगी म्हणून जन्माला यायला नको असते.
याचं कारण म्हणजे मुलगी लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाते. कुणी आणि कशी ही प्रथा/पद्धत रूढ झाली/केली कळत नाही. तिचं खाणं, पिणं, कपडालत्ता, शिक्षण, आरोग्य, आणि लग्नविधीवर करावा लागणारा, त्यांना कर्जबाजारी करणारा खर्च. याचे रिटर्न्स त्यांना मिळत नाहीत. मुलगी शिकते. अगदी डाॅक्टर, इंजिनिअरही होते. पण ती लग्नानंतर मिळवलेल्या पैशांनी सासरचं घर भरते. तिचे पैसे तिचा नवरा घेतो,वापरतो. तिचे आईवडील नाही वापरत. हा आतबट्ट्याचा व्यवहार नाही आईबापांच्या दृष्टीने? फार कटु,विखारी सत्य आहे हे! तिनं मिळवलेले पैसे तिनं आईबापांना द्यायचे ठरवले तर त्यासाठी तिला नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते. समजा तिला तशी परवानगी मिळालीच तरी तिच्या बापाचा स्वाभिमान जागा होतो. जावयाचे पैसे घ्यायचे? अरे हट्! मेलो तरी घेणार नाही.
हे समर्थन नव्हे. काहीशी कारणमीमांसा.
शिवाय एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. म्हणजे लोक असा विचार करतात की, मुलगा म्हातारपणात आधार देतो. काळजी घेतो. किमान तशी शक्यता असते. मुलीचा काय उपयोग? ती तर तिच्या सासूचं बेडपॅन उचलते. म्हणजे मुलीचा म्हातारपणातही काही उपयोग नाही.
थोडक्यात मुलीची उपयुक्तता शून्य. अ बिग झीरो.
म्हणून तिचा जन्म, तिचा जीव जणू मूल्यरहित! मुलीनं माहेरहून सासरी जाणं हे मला भातशेती सारखं वाटतं. एका जमिनीत चांगली रुजलेली रोपं उपटून दुसरीकडं लावायची !
अजूनही थोडं रफ् आणि कटू वास्तव समोर मांडायचं तर... हे "उपयुक्तता मूल्य" आपली मानवजात बऱ्याच प्राण्यांच्या बाबतीत वापरते.
म्हशीला म्हैस (मुलगी) झाली तर ते चांगलं. रेडा (मुलगा)झाला तर त्याला उपयुक्तता मूल्य नाही. गायीला फक्त गायच व्हायला नको. दुधाला गाय आणि ओझ्याला बैल असे दोन्ही हवे. तिला बैलही व्हायला हवा. कारण तो शेतीच्या कामासाठी उपयोगी पडतो. आणि एखाद्या कोटींच्या मालकिणीच्या दृष्टीने वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीला मात्र मुलगीच व्हायला हवी. कारण तिचा उपयोग होतो. मुलगा होऊन काय उपयोग? त्याचा तिला पैका मिळवण्यासाठी काय उपयोग? निसर्गानं सगळे जीव समत्वाने जन्माला घातले. पण माणसाने मात्र सर्वत्र उपयुक्तता पाहिली.
आई मुलीला म्हणते, "माहेर हे तुझं घर नाही. सासर हेच तुझं घर." मग ती सासरी तनुमनाने समर्पित होते. पण जर का नवरा संतापला, तर तो म्हणतो,"तू माझ्या घरातून चालती हो."
मग स्त्रीचं खरं घर कोणतं? का तिला घर नसतंच? आपण नीट लक्षात घेतलं तर आपल्याला असं दिसतं की , अनेक राण्या,महाराण्या ,थोर समाजसुधारक स्त्रिया,राजकारणी स्त्रिया यांनी पराक्रम गाजवला तेव्हा त्या विधवा होत्या. किंवा कुमारिका होत्या. इथं त्यांच्या मागे त्यांचा पती,भाऊ, वगैरे वगैरे कोणताही पुरुष उभा नाही.
भावासाठी रक्षाबंधन, भाऊबीज असते. नवऱ्यासाठी वटसावित्री आहे. मुलग्यासाठी अश्विन पौर्णिमा आहे. पण स्त्रीसाठी काय?
तिच्या साठी सतत कंठाळी उपदेश. "तू अशी वाग, तशी वागू नकोस. नाहीतर पुढे तुझ्याही नशिबात पोटात मूल असतांना वनवास येईल."
हं! याचसाठी मुलाचं शिक्षण आणि मुलीचं लग्न is very very important.Understood?
आता अनेक कायद्यांमुळे स्त्री हिताचं रक्षण केलं जातंय. अनेक कायदे स्त्रियांच्या बाजूने झालेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना झपाट्याने कमी होत आहेत. अनेक मुली लग्नानंतरही आपल्या आईवडिलांना आर्थिक मदत करताहेत. त्यांच्या आजारपणात त्यांची शुश्रुषा करताहेत. त्यांच्या उपचारांवर खर्च करताहेत. त्यांचे पतीही खर्चाचा भार उचलताहेत. वृद्ध आई वडिलांना आपल्या सासरी कायमचं राहायला आणताहेत.
शिवाय मुलगा अंत्यसंस्कार पार पाडतो. त्यानं अग्नी दिला तर स्वर्ग मिळतो. पण हल्ली मुलीही अग्नी देतात. अंत्यसंस्कार करतात. मुलगा आपलं नाव, आडनाव लावतो. ते पुढे चालू राहातं. पण हल्ली बऱ्याच मुली माहेर ,सासर ही दोन्ही आडनावं लावतात. काही जणी तर फक्त माहेरचंच आडनाव लग्नानंतरही लावतात. त्या सैन्यात,IT क्षेत्रात, पोलिस खात्यात,हेर खात्यात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. त्या वैमानिक असतात, अंतराळवीर असतात. इस्रोत,नासात वैज्ञानिक असतात. क्रीडा क्षेत्रात सुवर्ण पदकं मिळवतात. हे चित्र नक्कीच आशादायक आहे. फक्त ही सजगता समाजातील सर्व स्तरातील स्त्रियांपर्यंत पोहोचली पाहिजे.
कशी बदलेल ही परिस्थिती? बदलली तर पाहिजेच. बदलावी तर आपल्यालाच लागेल! आशेची असंख्य किरणं हळुहळू फाकताहेत. असंख्य बदल दृग्गोचर होताहेत. स्त्रियांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान जागा झालाय. पुरुषांना बदलत्या परिस्थितीची जाणीव झालीय. त्यांची सदसद्विवेकबुद्धी जागृत झाली आहे. हळुहळू मेट्रो सिटीतून, शहरांतून परिस्थिती सुधारली आहे. बदल झालाय. घडतोय. हे समाजभान आता निमशहरातल्या आणि खेड्यातल्या स्त्री पुरुषांमध्ये ही झिरपेल.
बीज रोवले गेलं आहे. अंकुर तर फुटणारच.
मुलगा, मुलगी दोघांचंही शिक्षण समान महत्त्वाचं आहे. सुयोग्य साथीदारासह दोघांचंही सहजीवन विकसित होईल!!!
विश्व संत तुकाराम महाराज म्हणतात,"शुद्ध बीजापोटी फळे
रसाळ गोमटी."
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला लेख. संथ गतीने का…
चांगला लेख. संथ गतीने का होईना बदल घडत आहे, पण वरवरचे बदल होण्यापेक्षा समाजाच्या मानसिकतेत मुळापासून बदल होणे गरजेचे आहे. थोडेसे अवांतर म्हणजे कुठल्याही मंगल प्रसंगी अजूनही बऱ्याच ठिकाणी विधवा स्त्रियांना अक्षरश: वाळीत टाकल्यासारखी मिळणारी वागणूक. असे काही प्रसंग पाहिल्यापासून मी अशा समारंभांना जाणे पूर्णपणे सोडून दिले.
मुलींची लग्न शिक्षण पूर्ण…
मुलींची लग्न शिक्षण पूर्ण होतास वयाच्या 21 -२५व्या वर्षी करून दिले पाहिजे. त्या सासरी जाऊन नोकरी शोधू शकतात. उशीर केल्यावर अनेक समस्या निर्माण होतात. एका जागी पाच वर्षे नोकरी केल्यानंतर वयाची तिसी जवळ आली की दुसऱ्या जागी जाऊन नोकरी करणे कठीण होते कारण अधिकांश कंपन्या फ्रेशर्सला प्रेफरन्स देतात. मग नोकरी करणारा शहरात मुलगा मिळत नाही आणि मुलींचे लग्न रेंगाळतात. आज शिक्षित आणि नोकरी करणाऱ्यांचे लग्न ३० उलटल्यानंतरच होत आहे. एक अपत्य पैदा करणे ही कठीण होऊ लागले आहे. लग्न न झालेल्या मुला मुलींची संख्या भयंकर रीतीने वाढत आहे. ब्राह्मण समाजात ही समस्या पराकोटीला गेलेली आहे. पुढील तीन-चार पिढ्या मराठी ब्राह्मण समाज अस्तित्वहीन होणार आहे.
दुसरा परिणाम वाढत्या वयाच्या मूुली लव जिहाद मध्ये ही फसतात.
विचार पटले. बदल होतोय हळूहळू…
विचार पटले. बदल होतोय हळूहळू पण अजून खूप बाकी आहे. स्टिरिओटाईप मोडणे कठीण. घरी येणाऱ्या सुनेचा खर्च सासरच्या घरावर पडतो असा एक विचार मांडला जातो, त्याबाबत असं म्हणावंसं वाटतं की आयुष्यभरासाठी ती स्त्री म्हणजे एक कामगार असावा तशी राबवून घेतली जाते फुकट, फुल टाईम, विना सुट्टी देता. जेवणखाण आणि राहणे या बेसिसवर. त्याची किंमत कोणीच करत नाही.
मुले म्हातारपणात काळजी घेणार…
मुले म्हातारपणात काळजी घेणार हि गोड गैरसमजूत जी सध्याच्या ६०-४० वयाच्या लोकांची आहे त्याचा भोपळा बऱ्यापैकी फुटणार आहे. काही आर्थिक स्थरांत हे शक्य आहे पण आपण जितके जास्त सुशिक्षित आणि श्रीमंत तितकी हि शक्यता कमी. त्यांत गैर सुद्धा काहीच नाही. त्यामुळे आईवडिलांनी आत्ताच आपल्या म्हातारपणात आपण कसे राहू ह्याची तयारी करून ठेवलेली पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे लग्न टिकेल ह्याची शाश्वती नाही. त्यामुळे मुलीला शक्यतो जास्त सोने इत्यादी देऊ नये. तिला मूळ होईपर्यंत राहावे. त्याच पद्धतीने मुलाच्या नावी सुद्धा जास्त संपत्ती ठेवू नये.
१८ वर्षे पर्यंत शिक्षणाची जबाबदारी पालकांनी घ्यावी त्यानंतर शक्य तितकी कमी मदत करावी. मुलाच्या नवे कर्ज काढावे. पाहिजे तर हफ्ते तुम्ही भरा पण मुलाला त्या उपकाराची जाणीव वारंवार करून द्या.
विचारात टाकणारा लेख
खरेच मुलीचे शिक्षण आणि मुलामुलीचे लग्न यावर काथ्याकूट व्हायला हवा. आजकाल लग्नाचे वय सर्रास ३० झाले आहे आणि लग्न जुळणे आणि त्याहुन ते टिकणे कठीण झाले आहे.
माणुस २०-३० दरम्यान सेक्षुअली प्रॉडक्टिव असतो पण सेटल नसतो म्हणुन तेव्हा लग्न होत नाही आणि सेटल झाल्यावर हॉर्मोन तितकी ॲक्टिव रहायली नसल्याने मूल व्हायला प्रॉब्लेम (दोघांना). मग आय व्ही एफ न काय काय.
दोघापैकी एकजण उत्तम कमवत असेल तर करुन द्यावे लग्न , आणि दुसऱ्याने घर संभाळावे यावर काय म्हणणे आहे?
मग आय व्ही एफ न काय काय…
In reply to विचारात टाकणारा लेख by राजेंद्र मेहेंदळे
कालांतराने मुलांचा जन्म प्रयोगशाळेत होईल असे एका लेखात वाचले होते. त्यात असेही लिहिले होते कि वृध्दाअवस्था हा एक रोग समजला जाईल व त्यावर उपचार केले जातील वगैरे.
उत्तम लेख!
बहुतांश मुद्द्यांशी सहमत. संस्कृती, परंपरांच्या नांवाखाली स्त्रियांची सतत घुसमट होत आलेली आहे. हा पुरूषसत्ताक पध्दतीचा परिणाम आहे. पण ती इतकी अंगवळणी पडली आहे, की लक्षात सुध्दा येत नाही. स्त्रिया नकळत हीच पुरुषसत्ताक पध्दती पुढे नेतात याचे एक उदाहरण म्हणजे मुलींना नवरा आपल्यापेक्षा जास्त कमावणाराच आणि अधिक उंचच हवा असतो. यात आपण नकळत पुरुषसत्ताक पध्दतीच जपतो आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही.
>> मुलीनं माहेरहून सासरी जाणं हे मला भातशेती सारखं वाटतं. एका जमिनीत चांगली रुजलेली रोपं उपटून दुसरीकडं लावायची !
म्हणून तर लग्नात अक्षता तांदळाच्या असतात, कारण तांदूळच फक्त एका जागेतून उपटून दुसरीकडे लावला जातो.
+1
आपल्याला नेहमीच मुलाचं शिक्षण महत्त्वाचं वाटतं. आणि मुलीचं फक्त लग्न महत्त्वाचं वाटतं. फक्त लग्न.
आजी पेपर तपासायला घेतला आणि वरील ओळी वाचून अगोदर दहा पैकी दहा मार्क देऊन टाकले आत्ता बाकीचं वाचतो..
माझी तर जिंदगी एवढ्याच साठी होती असे वाटायला लागले आहे. मधला स्पेस केवळ ऑक्सीजनपुरता होता आयुष्यात..
आजी लिहिती राहा.
-दिलीप बिरुटे
छान
लेखातील सर्व मुद्दे पटणारे आहेत. काळ बदलला आता ब-याच ठिकाणी कमवत्या आणि बीन
कमवत्या स्त्रिया सासरी म्हणजे वर्चस्व करुन राहतात प्रमाण अगदी कमी आहे, असावं ( विदा नाही ) पण सध्या काळाचे फटके पारंपरिक चुल मुल वगैरेला बसत आहेत.
उदा. नवरा बायको दोघेही कमावते आहेत. नव-याचा पगारही बायकोच्या खात्यात ट्रांसपर होतांना पाहिलेले आहे, सगळं प्लॅनिंग ती करते. तो काही घुम्या वगैरे, किंवा बायला वगैरे नाही. पण, त्याला ती त्याला नमवतेच आता ते कसं काय वगैरे संशोधन विषय. आता एवढं एक उदाहरण म्हणजे आपला देश नाही पण कुछ तो चल रहा है, हे मात्र नक्की.
-दिलीप बिरुटे
माझ्या आईवडिलांचे ऋण याबाबत…
माझ्या आईवडिलांचे ऋण याबाबत मी कधीच फेडू शकणार नाही. त्यांना माझ्याबाबत शिक्षण महत्वाचे वाटले 🙏
अवांतर
पण कितीही पुढारलेल सासर असु द्या, स्वयंपाक ही मुलींची जबाबदार हे बदलायल हव.
मुलांनाही आयानी स्वयंपाक शिकवला पाहिजे.
आमच्याकडे सकाळचा नाश्ता हेच तयार करतात, खुप कष्ट करून हा व इतर बदल मी घडवले😅
हे आणि अजून गोष्ट जर माझ्या सासूने मुलाला आधीच शिकवले असते तर.
सेम पिंच
आमच्याही घरामध्ये माझ्या आजोबांनी मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे हे नेहमीच प्राधान्य मानले. अगदी एक मुलगा आणि तीन मुली असताना देखील. त्यामुळे मी आणि माझी बहीण देखील त्याच संस्कारात वाढलो.अगदी लहानपणापासून तुम्हाला शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे हेच बिंबवण्यात आले. बाकी या सगळ्या च्या मुळाशी मुलीने सासरी जाऊन सासरच्या कुटुंबात राहणे हे आहे. आता यामध्ये भारतीय कुटुंब संस्था टिकवून राहणे हे मूळ कारण जरी असले, तरीही लग्नानंतर जोडप्याने दोन्हीकडच्या आई-वडिलांच्या जवळ राहता येईल किंवा कमीत कमी पटकन संपर्कात राहता येईल अशा पद्धतीने वेगळे राहणे हाच योग्य उपाय वाटतो. जेणेकरून दोन्ही पालकांपासून ही मुले लांब राहतील. स्वतःच्या संसाराची जबाबदारी ही स्वतः घेतील आणि सासरच्या लोकांची जास्त ढवळाढवळ न होता पती-पत्नींना स्वतःचा संसार स्वतःच्या मनाप्रमाणे करता येईल. हे होत असतानाच दोन्ही बाजूच्या आई-वडिलांची जबाबदारी ही दोघांनीही समानतेने घेणे आवश्यक आहे. आपली मुले लग्नानंतर लांब जाण्याचा अनुभव दोन्हीही पालकांच्या वाट्याला आला पाहिजे. माझे हे म्हणणे बऱ्याच जणांना पटणार नाही परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता आजच्या काळात हाच उपाय सर्वात जास्त योग्य वाटतो. बाकी परिस्थिती हळूहळू बदलत आहे हे मात्र मान्य. मुलांनी देखील घर कामांमध्ये आपला वाटा उचलला पाहिजे याबाबत दुमत नाही. अगदी जेवण करणे जमत नसले तर अन्य कामात मात्र रोजची जबाबदारी म्हणून ते काम केले पाहिजे हे मात्र नक्की . याबाबत नवरा बायकोने आपापसात ही कामे ठरवून घेणे जास्त योग्य. माझ्या सासूबाई या नोकरी करणाऱ्या असल्यामुळे त्यांनी दोन्ही मुलांना घरातल्या कामांची सवय लावलेली आहे. आम्ही आमच्या मुलाला सुद्धा अशी कामे करायला लावतो. ही आज काळाची गरज आहे. आयतं हातात आणून देण्याची सवय अत्यंत घातक आहे.
बाकी आजी तुमचे लेखन नेहमीच रोजच्या जगण्यातले व अनुभवातले वाटत असल्याने पटते आणि आवडते देखील
विवाहसंस्थेचे भाकित
एकदा विवाहेच्छुक तरुण तरुणींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रोता म्हणुन गेलो होतो. एका समुपदेशिकेने उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात तिने सांगितले कि लग्न जमवताना या सर्व गोष्टींचा विचार तर कराच पण घटस्फोट झाला तर काय? या गोष्टीचाही आत्ताच विचार करुन ठेवा. इथे आपण लग्न जमवायला आलो आहोत की घटस्फोटाचा विचार करायला आलो आहोत असा प्रश्न काही लोकांना पडेल. पण विवाह संस्थेच्या वेगाने ढासाळत्या परिस्थितीचा विचार केला तर या प्रश्नाचा विचार आत्ताच करावा लागेल. स्त्रीमुक्तीचा विचार जसा सशक्त होत गेला तसा विवाह संस्थेचे भवितव्य अशक्त होत गेले.पुढील काही शतकात विवाह संस्था नामशेष होत जाईल असे आमचे भाकित आहे.आपला देश किमान तीन शतकात एकाच वेळी वावरतो. त्यामुळे कैक पिढ्या जातील. विवाह संस्थेला पर्याय म्हणून लिव्ह इन रिलेशन वाढत जाईल. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. सहजीवन व व्यक्तिस्वातंत्र्य एकाच वेळी जपता आले पाहिजे हा विचार लिव्ह इन मधे करार स्वरुपात केला जातो. अजून हा प्रकार प्रायोगिक अवस्थेत आहे. पण भविष्यात याला चांगले दिवस आहेत असेही भाकित या निमित्त वर्तवतो.
जाता जाता:- मंगळ्सूत्राचे बदलते डिझाईन व स्त्री स्वातंत्र्याचा प्रवास असा विषय पण अभ्यासकाला घेता येईल.🤣
विवाह संस्थेला पर्याय म्हणून…
विवाह संस्थेला पर्याय म्हणून लिव्ह इन रिलेशन वाढत जाईल.
लिव्ह इन रिलेशन पुरुषाला जास्त सोयीची असून स्त्रीला फार तोट्याची आहे.
नात्यांमध्ये स्त्रियांची मानसिक गुंतवणूक खूप जास्त असते. दोघे वेगळे झाले तर बहुधा स्त्री जास्त काळ निराशेच्या गर्तेत जाते.
शारीरीक तर असतेच. त्यातून होणाऱ्या \ नको असलेल्या गरोदरपणाची सर्व जबाबदारी स्त्रीची असते
आणि लग्न झालेले नसले तर स्त्रीला कायद्याचे संरक्षण फार अपुरे आहे.
लग्न संस्थेला पर्याय म्हणून लिव्ह इन रिलेशन फार तोकडी पडते.
लग्न संस्थेला पर्याय पेक्षा …
लग्न संस्थेला पर्याय पेक्षा परस्पर संमतीने घटस्फोट घेणे हे जास्त सोपे होणे आवश्यक आहे.
पोटगीमुळे अनेक घटस्फोट…
In reply to लग्न संस्थेला पर्याय पेक्षा … by सुबोध खरे
पोटगीमुळे अनेक घटस्फोट टांगलेले पाहिले आहेत.रोजच मर 🙄
मुळात maturity नसताना लग्न हाच भारतीय विवाहसंस्थेचा लुप होल आहे. अरेंज मॅरेज नसतं तर निम्मी जनता -मुलगा वा मुलगी अविवाहित राहिले असतें.EQ चा खुप कमी विचार भारतीय लग्नसंस्थेत होतो.
ग्न करणाऱ्या स्त्री/पुरुष…
ग्न करणाऱ्या स्त्री/पुरुष याना विवाहबाह्य संबंध ठेवण्याची परवानगी नाही.
लिव्ह इन मध्ये असे कोणते बंधन असते का. बहुधा नसते.
मग अशा परिस्थितीत जन्माला आलेले मूल आपलेच आहे याची खात्री नसेल तर त्या गरोदर स्त्रीचे आणि बाळाचे पालन पोषण तो पुरुष करेल का/ का करेल.
ह्यात त्या स्त्रीचे, बाळाचे नुकसान आहे. आणि असे सगळीकडे व्हायला लागले तर समाजाचे नुकसान आहे.
कारण मग सरकारला जागोजाग अनाथ आश्रम उघडावे लागतील.
लग्न हे प्रामुख्याने शरीरसंबंध आणि प्रजनन यांच्याशी निगडित असते.
स्त्रीकडे खूप जास्त प्रजननक्षम वर्षे उपलब्ध नसतात म्हणून मुलीचे लग्न योग्य वयात होणे का कळीचा मुद्दा मानला जातो. हे व्यावहारीक कारण आहे. ह्यात चुकीचे काय आहे?
विवाहसंस्था आणि लोकशाही हे एकसारखेच आहेत. दोन्ही वाईट आहेत पण त्याच्यापेक्षा कमी वाईट पर्याय उपलब्धच नाहीत.
लग्न हे प्रामुख्याने…
In reply to ग्न करणाऱ्या स्त्री/पुरुष… by अप्पा जोगळेकर
लग्न हे प्रामुख्याने शरीरसंबंध आणि प्रजनन यांच्याशी निगडित असते.
स्त्रीकडे खूप जास्त प्रजननक्षम वर्षे उपलब्ध नसतात म्हणून मुलीचे लग्न योग्य वयात होणे का कळीचा मुद्दा मानला जातो. हे व्यावहारीक कारण आहे.
अगदी सहमत !
स्नेही जनहो,माझ्या या लेखावर…
स्नेही जनहो,
माझ्या या लेखावर सोळा म्हणजे तसे खूप प्रतिसाद आले आणि बाराशेहून अधिक वाचने झाली, याचा मला आनंद झाला आहे. सर्वांनीच सविस्तर आणि सखोलपणे स्वतःचे मत प्रतिसाद देताना व्यक्त केले आहे त्यामुळे विशेष समाधान वाटले.
सर्वांचेच मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय…
मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ हे कायद्याने परवानगी दिलेले वय आहे. ह्यात व्यक्ती सज्ञान आहे ही बाब कायद्याने विचारात घेतलेली आहे.
मतदानाचे, ड्रायव्हिंग लायसन्स चे आवश्यक वयसुद्धा १८ असते.
सर्वसामान्य व्यक्तीला लग्न झाल्याशिवाय वस्तुस्थितीची, महागाईची, आर्थिक जबाबदारीची जाणीव होत नाही.
साहित्य आणि चित्रपट यांच्या प्रभावामुळे लग्नाचा मूळ हेतू म्हणजे शरीरसंबंध, प्रजनन, अपत्याचे पालनपोषण, संगोपन आणि त्या अनुषंगाने सहकार्य
हे विसरले गेले.
आणि एकमेकांना समजून घेणे, प्लेटॉनिक लव्ह वगैरे काल्पनिक संकल्पनाचा सुळसुळाट झाला.