✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता

ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग १)

क
क्लिंटन यांनी
Mon, 08/01/2022 - 10:43  ·  लेख
लेख
ऑगस्ट २०२२ हा महिना सुरू झाला असल्याने ताज्या घडामोडींचा नवा धागा काढत आहे. ६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होईल. या निवडणुकीत भाजपकडून बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनकड आणि तृणमूल काँग्रेस सोडून इतर सगळ्या विरोधी पक्षांकडून काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा हे उमेदवार आहेत. मार्गारेट अल्वांची उमेदवारी जाहीर करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही या कारणाने तृणमूल काँग्रेस हा एक प्रमुख विरोधी पक्ष मतदानात भाग घेणार नाही. तसेच बिजू जनता दलानेही जगदीप धनकड यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे ते देशाचे पुढचे उपराष्ट्रपती बनतील हे जवळपास नक्की आहे. राजकारणात (खरं तर कुठेही) कधी कोणाचे नशीब फळफळेल हे सांगता येत नाही. जगदीप धनकड हे त्यातीलच एक. jagdeep त्याचे झाले असे की १९८९ च्या लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना २५ सप्टेंबर १९८९ रोजी काँग्रेसविरोधी राजकारणातील एक महत्वाचे नेते आणि हरियाणाचे मुख्यमंत्री देवीलाल यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत बोट क्लबवर विरोधी पक्षांची विराट सभा झाली होती. त्या सभेसाठी जगदीप धनकड यांनी राजस्थानातील त्यांच्या झुनझुनू या ठिकाणाहून ७५ ट्रकभरून लोक आणले होते. त्या सभेत ७ लाख लोक हजर होते असे मी अन्यत्र वाचले आहे. एका ट्रकमध्ये कितीसे लोक मावत असतील? मला नाही वाटत ५०-६० पेक्षा जास्त लोक एका ट्रकमध्ये मावत असतील. अगदी १०० लोक एका ट्रकमध्ये कोंबले असे धरले तरी एकूण सभेला उपस्थित असलेल्या लोकांच्या तुलनेत १% हून थोडे जास्त लोक धनकड यांनी आणले होते. खुद्द देवीलालांच्या लक्षात जगदीप धनकड यावेत असे त्यात काय होते कल्पना नाही. पण ते आले. त्यावेळी धनकड ३८ वर्षाचे होते. 'ये छोरा होनहार है' असे म्हणत देवीलालांनी त्यांना जनता दलाची झुनझुनूमधून उमेदवारी मिळवून दिली. त्यापूर्वीचे १० वर्षे ते जयपूरला राजस्थान उच्च न्यायालयात वकीली करत होते. ते झुनझूनूमधून जिंकून लोकसभेत गेले आणि मग वि.प्र.सिंग यांच्या सरकारांमध्ये उपमंत्री होते. पुढे १९९१ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळच्या दोनेक महिन्यात त्यांनी राजीव गांधींचा विश्वास संपादन केला. त्यावेळेसही धनकड यांना झुनझुनूमधूनच उमेदवारी हवी होती पण १९८९ मध्ये स्वतः धनकड यांनी ज्यांना पराभूत केले ते काँग्रेस उमेदवार कॅप्टन अयुबखान यांची १९६५ च्या युध्दात वीरचक्र मिळाल्यामुळे असलेली ओळख आणि तसेच ते अल्पसंख्य समुदायातील असल्याने त्यांना उमेदवारी नाकारून धनकड यांना उमेदवार बनवायला राजीव गांधी तयार नव्हते. म्हणून शेवटी त्यांना अजमेरमधून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्यासाठी राजीव गांधींनी स्वतः प्रचारसभा घेऊनही त्यांचा भाजप उमेदवाराने पराभव केला. पुढे १९९३ ते १९९८ या काळात धनकड राजस्थान विधानसभेत काँग्रेस पक्षाकडून आमदार होते. १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी परत एकदा झुनझुनूमधून काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणुक लढवली. त्यावेळी त्यांच्यासमोर ज्येष्ठ नेते शीशराम ओला (तिवारी काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा गट स्थापन केला होता त्याचे ते उमेदवार होते) आणि भाजपचे मदनलाल सैनी होते. त्या निवडणुकीत धनकड यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. धनकड यांचे त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले अशोक गेहलोत यांच्याशी जमायचे नाही. १९९८ च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत ८-९ महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरलेल्यांना उमेदवारी द्यायची नाही हा नियम काढून गेहलोत यांनी जगदीप धनकड यांचे तिकीट कापले. त्यानंतर धनकड १९९९ मध्ये काही महिने राष्ट्रवादीत आणि २००० मध्ये भाजपत सामील झाले. जवळपास २० वर्षे भाजपत काढूनही भाजपने त्यांना कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी दिली नाही की कोणते महत्वाचे पद दिले नाही. तरीही ते पक्षात राहिले आणि आपल्या वकिलीत रमले होते. २०१२ च्या सुमारास दोन वर्षांनी होणार्‍या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप स्वतःच्या बहुमताने सत्तेत येईल याची सुतराम शक्यता दिसत नव्हती. तरीही ते भाजपमध्येच राहिले. काँग्रेसमध्ये परत जायचा विचार त्यांनी केला नाही. अशोक गेहलोत यांच्याशी त्यांचे जमायचे नाही हे एक कारण असू शकेल. म्हणजे १९८९ मध्ये देवीलालांच्या नजरेत ते भरणे जसे त्यांच्या पथ्यावर पडले त्याप्रमाणेच अशोक गेहलोत यांच्याशी न जमणेही त्यांच्या पथ्यावर पडले असे दिसते. हा त्यांच्या नशीबाचाच भाग म्हणायला हवा. मधल्या वर्षांमध्ये जगदीप धनकड हे नाव विसरायलाच झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकींच्या वेळेस विकीपीडीया की अन्यत्र कुठे झुनझुनू लोकसभा मतदारसंघाविषयी वाचत असताना तिथे पूर्वी जिंकलेल्यांची नावे होती त्यात ते नाव वाचल्यावर 'अरे हे पण होते' हे आठवले. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे पक्षात कोणतेही पद न मिळता कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी न मिळताही जगदीप धनकड टिकून राहिले. गेल्या २० वर्षात रा.स्व.संघाशी त्यांनी जुळवून घेतले. लॉकडाऊनपूर्वी राजस्थानातील संघ पदाधिकार्‍यांची बैठक होती त्यासाठी मोहन भागवत राजस्थानात आले होते तेव्हा ते जगदीप धनकड यांच्या फार्महाऊसवरही आवर्जून गेले होते.वास्तविकपणे सर्वोच्च न्यायालयातील आघाडीचे वकील आहेत त्यांच्यात त्यांच्या नावाची गणना होते. पण कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, प्रशांत भूषण हे इतर त्याच लीगमधले वकील कोणत्या ना कोणत्या उचापात्या मधून मधून करत असतात. असे कशातही नाव धनकड यांचे सहसा येत नाही. तरी नाही म्हणायला त्यांच्या नावावर एक बट्टा म्हणजे काळवीट शिकारप्रकरणी त्यांनी सलमानखानचे वकीलपत्र घेतले होते ही एक वादग्रस्त केस त्यांच्या नावावर आहे. पण ती केस वगळता बातम्यांमध्ये यावी अशी कोणतीही केस त्यांनी लढवलेली नाही. अशा जगदीप धनकड यांची निवड जुलै २०१९ मध्ये अचानक बंगालच्या राज्यपालपदावर झाली. नियमावर बोट ठेऊन ममता सरकारला ते व्यवस्थित नडले. फेब्रुवारी २०२२ मध्ये ममता सरकारने बंगाल विधानसभेचे अधिवेशन ७ मार्चला बोलावायची शिफारस राज्यपालांकडे केली. पण राज्यपालांकडे शिफारस गेली त्यात एक घोळ होता. नेहमी सभागृहाची बैठक सकाळी ११ ला भरते (११ ए.एम) त्याऐवजी काही कारणांनी ती दुपारी २ ला भरवावी (२ पी.एम) अशी शिफारस ममता सरकारला करायची होती. पण ए.एम आणि पी.एम मध्ये घोळ झाला आणि राज्यपालांना गेलेल्या शिफारसीत विधानसभेची बैठक ७ मार्चला रात्री २ वाजता (२ ए.एम) बोलवावी अशी शिफारस गेली. ती शिफारस बघून राज्यपालांनी सरकारच्या मुख्य सचिवांना राजभवनावर बोलावून घेतले. पण ममता सरकार आणि राज्यपाल यांच्यातून विस्तव जात नसल्याने मुख्य सचिव तिथे गेलेच नाहीत. मग राज्यपालांनी सरकारने केलेल्या शिफारशीप्रमाणे ७ मार्चला रात्री २ वाजता विधानसभेची बैठक बोलावली. राज्यपाल मंत्रीमंडळाने केलेल्या शिफारशीला बांधील असतात आणि मला विधानसभेचे सत्र रात्री दोनला बोलवायची शिफारस आली त्याला मी काय करू असे त्यांनी म्हटले. मग पळापळ झाली. मुख्य सचिव राज्यपालांकडे गेले आणि त्यांनी पी.एम च्या ऐवजी ए.एम लिहिणे ही चूक आहे हे राज्यपालांना सांगितले. त्यावर मग नियमावर बोट ठेऊन मंत्रीमंडळाच्या शिफारसीला आय.ए.एस अधिकारी कोणत्या आधारात चूक म्हणत आहेत हा प्रश्न विचारला. मग परत मंत्रीमंडळाने सुधारीत शिफारस राज्यपालांकडे पाठवली आणि विधानसभेची बैठक दुपारी २ ला बोलावण्यात आली. कलकत्त्याजवळचे जादवपूर विद्यापीठ हे दिल्लीतील जे.एन.युची कनिष्ठ आवृत्ती शोभावी असे आहे. तिथे तत्कालीन केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो गेलेले असताना सी.ए.ए च्या प्रश्नावरून विद्यार्थ्यांनी त्यांना घेरले. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो की काय अशी परिस्थिती आली. हे कळल्यावर राज्यपाल जगदीप धनकड स्वतः तिथे गेले आणि आपल्या सुरक्षारक्षकांचा वापर करून त्यांनी बाबूल सुप्रियोंची सुटका केली. भाजपने आतापर्यंत भैरोसिंग शेखावत आणि वैंकय्या नायडू या वरीष्ठ नेत्यांना उपराष्ट्रपतीपदाची संधी दिली आहे. शेखावत तर पक्षाचे खूपच मोठे नेते होते- वाजपेयी- अडवाणींच्या बरोबरचे. वैंकय्या नायडू तितके ज्येष्ठ नसले तरी बर्‍यापैकी वरीष्ठ होते. त्यामानाने जगदीप धनकड हे नाव एकदम किरकोळ दिसते. असे म्हटले जात आहे की शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने जाट समाज भाजपपासून दुरावला आहे त्याला एका जाटाला उपराष्ट्रपती करून परत जवळ करायचा प्रयत्न आहे. तसेच जगदीप धनकड हे सुध्दा शेतकरी कुटुंबातील आहेत. पण शेतकरी आंदोलनाचा राजस्थानात फारसा प्रभाव नव्हता. जो काही होता तो पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात. तसेच हरियाणा-पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट राजस्थानातील जाटांना आपल्या बरोबरचे मानतात का हा एक प्रश्न आहे. त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे असे कोणाला राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती बनवून त्याचा निवडणुकांच्या राजकारणावर किती फरक पडतो? फार नसावा. नाहीतर प्रणव मुखर्जींना राष्ट्रपती केल्यावर काँग्रेसने बंगालमध्ये मोठे यश मिळवायला हवे होते. तसे झाले नव्हते. असो. जगदीप धनकड यांना शुभेच्छा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34865 वाचन

💬 प्रतिसाद (177)

प्रतिक्रिया

तसे पाहता या प्रकांडपंडीत

आग्या१९९०
Mon, 08/01/2022 - 22:10 नवीन
तसे पाहता या प्रकांडपंडीत अर्थ शास्त्री लोकांचे योगदान नक्की काय असते हाच मला नेहेमी पडलेला प्रश्न आहे. हे लोक फक्त यांव करायला पाहिजे त्यांव करायला पाहिजे वगेरे वर भरभक्कम मानधन घेउन लेक्चर देतात. नंतर त्याचा काहीही उपयोग होत नाही. सहमत! खरोखरच हे लोकं हुशार असते तर जगात कुठल्याच देशात आर्थिक मंदी, घोटाळे, चलनवाढ झालीच नसती. ठराविक चक्राने ह्या गोष्टी घडतंच रहातात. सबप्राइम घोटाळ्यानंतर ह्या लोकांवरचा विश्वासच उडून गेलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

दोन प्रकारचे अर्थशास्त्री

विवेकपटाईत
Tue, 08/02/2022 - 09:49 नवीन
जगात दोन प्रकारचे अर्थशास्त्री असतात. एक पुस्तकी ज्ञान असलेले डिग्री धारी . सिद्धांत मांडणारे. एसी खोलीच्या बाहेरचे जग माहीत नसणारे. दुसरे डिग्री नसणारे पण देशाच्या समस्यांची जाण असणारे, जमीनीवरची माहिती असणारे जे इतिहास घडवितात. आपले पंत प्रधान हे दुसर्‍या कोटीतील अर्थशास्त्री आहेत. फक्त 45 कोटी गरीबांना बँक खाते 12 रुपयांत सुरक्षा विम्या सहित देऊन उघडून देशात आर्थिक क्रांति घडवून आणली. गरीबांना आणि अनेक घटकांना मिळणारी सरकारी मदत, अनुदान, कर्जे , कृषि उत्पाद विक्री जी पूर्वी अधिकान्श - राज्य, जिला, तालुका, ग्राम माध्यमातून होणार्‍या गळती नंतर मिळायची आज शतप्रतिशत थेट खात्यात मिळतात. फक्त याच एका योजनेने ग्रामीण भागात आर्थिक क्रांति घडवून आणली. आमच्या भागात ही रिक्शावाले, घर कामकरणार्‍या बाया गरजेच्या साठीपहिले 100 रु वर 5 रु महिना व्याजवर कर्ज घेत होत्या. आता खात्यातून पैसा काढतात. हे उदाहरण पर्याप्त आहे. बाकी अमर्त्य सेन इत्यादींचे विचार वाचल्यानंतर त्यांना अर्थशास्त्री म्हणणे अर्थशास्त्र या विषयाचा अपमानच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

आपले पंत प्रधान हे दुसर्‍या

आग्या१९९०
Tue, 08/02/2022 - 10:14 नवीन
आपले पंत प्रधान हे दुसर्‍या कोटीतील अर्थशास्त्री आहेत भयानक विनोद! घेतलाय अनुभव नोटाबंदी निर्णय घेतला त्यावेळी. देशाच्या अर्थव्यवस्थेचा बट्याबोळ केला ह्या एका निर्णयानी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

देशाच्या अर्थव्यवस्थेचा

चौकस२१२
Wed, 08/03/2022 - 17:46 नवीन
देशाच्या अर्थव्यवस्थेचा बट्याबोळ केला ह्या एका निर्णयानी. २-३ उधारणे द्याल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

२-३ उधारणे द्याल का?

आग्या१९९०
Wed, 08/03/2022 - 20:58 नवीन
२-३ उधारणे द्याल का? नोटाबंदीचे मिपावरील चर्चा धागे वाचा , सापडेल तेथे. नोटाबंदीचे राक्षसी अपत्य म्हणजे २००० चे चलन दिवसेंदिवस अक्राळ विक्राळ रूप धारण करतेय. काळा पैसा नष्ट झालाच नाही पण तो वाढवायला हातभार लावतेय. जिकडे जिकडे छापे टाकले तिकडे हिचेच दर्शन होते आणि अर्थव्यवस्था पोखरायला मदत करतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

अज्ञानी आणि अर्थशास्त्राचे

विवेकपटाईत
Wed, 08/03/2022 - 18:25 नवीन
अज्ञानी आणि अर्थशास्त्राचे ज्ञान नसलेले लोक नोटबंदी बाबत विचित्र विधान करतात. 2014 मध्ये एनडीए सत्तेत आली त्या घटकेला बँकांचे 18 लाख कोटी बुडीत खात्यात गेलेले होते. बँकांचा हातात तरल पैश्यांची कमतारता होती. जनधन खाते आणि नोट बंदी, ह्यांनी बँकांना संजीवनी दिली. 18 लक्ष कोटी बँकांत पोहचले. मिळालेल्या कमिशन मुळे जनधन आणि गरीब खातेदारांना ही दोन लक्ष कोटींचा निश्चित फायदा झाला. बँक खाते असणे फायदाच्या सौदा आहे, हे गरीब जनतेला कळले. 45 कोटी गरीब जनता प्रथमच बँक खात्यांचा वापर करू लागली. त्याचा लाभ ही बँकांना मिळाला. प्रत्येकाकडे खाते असल्याने सरकारी अनुदान, सबसिडी, कर्ज, सरकारी कृषि उपज खरीदीचा पैसा, स्कॉलरशिप एत्यादी सर्व खात्यात येऊ लागले. सहजच बंकांचीआर्थिक स्थिति सुधारली. मध्यस्थांचा भ्रष्टाचार बंद झाल्याने सरकारचे ही लक्ष कोटीहून जास्त वाचले. खालच्या दर्जाचे काम करणारे उदा. ई रिक्शा चालकांनी बंकांकडून कर्ज घेतले. (भाड्याचे रोजचे 350 रुपूये वाचले). गरिबांची आर्थिक स्थिति सुधारली. खाते असल्याने बचतीची सवय ही लागली. अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. बाकी नोट बंदीचे नुकसान काय झाले अजून एक ही व्यक्ति सांगू शकलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

बाकी नोट बंदीचे नुकसान काय

आग्या१९९०
Wed, 08/03/2022 - 21:04 नवीन
बाकी नोट बंदीचे नुकसान काय झाले अजून एक ही व्यक्ति सांगू शकलेला नाही. नोट बंदीचे काय नुकसान झाले हे पंतप्रधानांनाच ठाऊक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

बँकांचा हातात तरल पैश्यांची

कॉमी
Wed, 08/03/2022 - 22:05 नवीन
बँकांचा हातात तरल पैश्यांची कमतारता होती. जनधन खाते आणि नोट बंदी, ह्यांनी बँकांना संजीवनी दिली.
हायला. आमच्या अडाणी अर्थशास्त्रात बँकांना 'तरल पैसे' (liquidity) पुरवायला CRR आणि SLR रेट कमी जास्त करतात, मनी मार्केट ऑपरेशन्स करतात... पण विंटरनॅशनल इकॉनॉमिक्स शिकलेले तद्न्य डायरेक्ट नोटबंदी करतात. हहपुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

CRR व SLR किती ताणावेत

गामा पैलवान
गुरुवार, 08/04/2022 - 02:02 नवीन
कॉमी, १८ लाख कोटी रुपये ब्यांकांत पोहोचवण्यासाठी राखीव रोकड प्रमाण ( CRR ) व वैधानिक तरलता प्रमाण ( SLR ) किती वरखाली करावे लागतील? काही अंदाज? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

भारी आवडलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/02/2022 - 11:33 नवीन
>>>आपले पंत प्रधान हे दुसर्‍या कोटीतील अर्थशास्त्री आहेत. =)) आवडलं. मस्त. दिवस खुसखुशीत जातो बघा. >>>अमर्त्य सेन इत्यादींचे विचार वाचल्यानंतर त्यांना अर्थशास्त्री म्हणणे अर्थशास्त्र या विषयाचा अपमानच आहे. वाह काका वाह ! भक्ती अशी आणि इतकी उच्चच असली पाहिजे. लिहिते राहा. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

डॉक्टर साहेब, गेल्या काही

विवेकपटाईत
Wed, 08/03/2022 - 18:28 नवीन
डॉक्टर साहेब, गेल्या काही वर्षांतील ह्या सरकरबाबत अमर्त्य सेनचे विधान वाचून घ्या. गूगल वर भरपूर सापडतील. त्यातले एक ही विधान सत्य झालेले नाही. एक तर ते राजनीतिज्ञ म्हणून विरोधाला विरोध करत असतील, त्यात काही गैर नाही. पण जेंव्हा अर्थशास्त्री म्हणून टिप्पणी करतात. तेंव्हा ते अज्ञानी आहेत हेच सिद्ध होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपले पंतप्रधान हे दुसऱ्या कोटीतील अर्थशास्त्री आहेत.

Nitin Palkar
Tue, 08/02/2022 - 20:26 नवीन
पंतप्रधानांचं अतिशय योग्य वर्णन. २०१४/१५ साली मी एका बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना, केवळ आधार कार्ड व पॅन कार्ड यांवर बँक खाते उघडावे असे आदेश आले. त्या वेळेला 'हा काय मूर्खपणा आहे' असेच वाटले होते. आज या खात्यांची उपयुक्तता लक्षात येतेय. सरकारी योजनांमधून मिळणारे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले आणि अनेक दलालांची दुकाने बंद झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

अगदी याच पध्दतीने नोटाबंदीची

शाम भागवत
Tue, 08/02/2022 - 21:21 नवीन
अगदी याच पध्दतीने नोटाबंदीची उपयुक्तता अजून काही वर्षांनी लक्षात येईल. तेव्हां तुल्यबळ समांतर अर्थव्यवस्था अस्तित्वात असताना व दिवसेंदिवस आणखी बलवान होत असताना किती धोकादायक ठरू शकते त्यावर प्रकाश पडलेला असेल व त्या अर्थव्यवस्थेतील एक मोठा भाग (रोखीचा भाग) एका रात्रीत मूळ अर्थव्यवस्थेत विलीन करण्याचा निर्णय किती महत्वाचा होता हे कोणीतरी पुराव्यानिशी मांडेल. त्यावेळेस नोटाबंदीचे झालेले दीर्घकालीन फायदे व तात्कालीन तोटे यासंबंधात भरपूर विदा उपलब्ध झालेला असेल. परमीट राज रद्द करण्याचा नरसिंह राव यांचा निर्णय व मनमोहनसिंग यांचे अर्थसंकल्पीय धोरण यांचे मूल्यमापन २० वर्षानीच योग्य रीतीने झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar

परमीट राज रद्द करण्याचा

आग्या१९९०
Wed, 08/03/2022 - 21:25 नवीन
परमीट राज रद्द करण्याचा नरसिंह राव यांचा निर्णय व मनमोहनसिंग यांचे अर्थसंकल्पीय धोरण यांचे मूल्यमापन २० वर्षानीच योग्य रीतीने झाले. आर्थिक धोरणे हि दीर्घकालीन परिणाम करणारीच असतात. नोटाबंदी हि सर्जिकल स्ट्राईक ह्या प्रकारातील होती. पंतप्रधानांनी केलेली घोषणा परत ऐका. आज आधी रात से ..... "बस बेकार कागज का टुकडा होंगे " असल्या प्रकारचा निर्णय होता. अर्थात अल्पकाळात असे काही झाले नाही आणि दीर्घकाळाचा विचारच केला नसल्याने उगाच ओढून ताडून त्याचा संबंध जोडू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

बर.

शाम भागवत
Fri, 08/05/2022 - 13:29 नवीन
बर. २० वर्षांनी बोलू. निदान २०३७ अगोदर तरी नको. अर्थात त्यावेळेस मी असेन तर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

राजन यांना आर्थिक सल्लागार

मनो
Fri, 08/05/2022 - 04:11 नवीन
राजन यांना आर्थिक सल्लागार व्हायचे नसून त्यांची वाटचाल मंत्रिपदाकडे चालू आहे. मनमोहन सिंग यांचे उदाहरण त्यांच्या डोळ्यापुढे आहेच. त्यामुळं त्यांची विधाने एक भावी राजकारणी बोलतो आहे, असे समजून वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

१. राजन हे सप्टेंबर २०१३ ते

शाम भागवत
Fri, 08/05/2022 - 13:23 नवीन
१. राजन हे सप्टेंबर २०१३ ते सप्टेंबर २०१६ पर्यंत गव्हर्नर होते. त्यावेळेस ते मोदींना जे काही ओळखत असतील त्यात बदल झालेला असू शकत नाही का? त्यामुळे असा प्रश्न पडतो की, सहा वर्षांनी त्यांची मते बदलू शकत नाहीत का? २. राजन यांनी खोटी खोटी स्तुती केली आहे असे काही सुचवायचे आहे का? प्रत्यक्षात काहीच घडलेले नसून निव्वळ पदासाठी राजन ही दिशाभूल करत आहेत? मला तुमची टिपण्णी नीट समजलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

राजकारणी हा शब्द वाईट अर्थाने

मनो
Sun, 08/07/2022 - 08:29 नवीन
राजकारणी हा शब्द वाईट अर्थाने वापरलेला नाही. नेत्याला लोकांना समजेल, पटेल, आचरणात आणता येईल असे बोलावे लागते, प्रसंगी अंतिम उद्दिष्टपूर्तीसाठी परस्परविरोधी विधाने करावी लागतात. अर्थतज्ञ त्या मानाने data-based विधाने खुलेपणाने करू शकतो, हा फरक सांगायचा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

जगदीप धनकड,

मुक्त विहारि
Mon, 08/01/2022 - 18:36 नवीन
यांच्या बद्दल माहिती न्हवती ... माहिती बद्दल धन्यवाद ....
  • Log in or register to post comments

क्लिंटन यांचा लेख ....

गामा पैलवान
Mon, 08/01/2022 - 19:34 नवीन
क्लिंटन यांचा मूळ लेख अतिशय वाचनीय आहे. संदर्भ नेमके व सांगोपांग आहेत. -गा.पै.
  • Log in or register to post comments

सौदी अरेबियात ८ हजार वर्ष जुन्या शहराचा शोध....

मुक्त विहारि
Mon, 08/01/2022 - 19:54 नवीन
सौदी अरेबियात ८ हजार वर्ष जुन्या शहराचा शोध; खोदकाम सुरू असताना सापडले प्राचीन मंदिर https://maharashtratimes.com/international/international-news/ancient-temple-discovered-in-8000-years-old-archaeological-in-saudi-arabia/articleshow/93247414.cms --------- नामशेष झालेली अजून एक संस्कृती.....
  • Log in or register to post comments

प्राचीन मंदिर?

निनाद
Tue, 08/02/2022 - 04:15 नवीन
प्राचीन मंदिरे या भागात होती असे म्हणतात. मूर्तीपूजा पण होती. पण यावर एक वरवंटा फिरला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

काथ्याकूटीय धाग्याच्या गाभ्यात इतका वाचनीय मजकूर

टर्मीनेटर
Mon, 08/01/2022 - 21:01 नवीन
काथ्याकूटीय धाग्याच्या गाभ्यात इतका वाचनीय मजकूर मी आज पहिल्यांदाच बघितला आहे. भारताचे भावी उपराष्ट्रपती जगदीप धनकड ह्यांच्या विषयी खूप छान माहिती दिलीत. एकूणच हरहुन्नरी व्यक्तिमत्व दिसतंय त्यांचं! उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्षही असल्याने लेखात वर्णीलेल्या त्यांच्या अनेक 'गुणांचा' राज्यसभेच्या कामकाजासाठी खुबीने वापर करण्याचा सत्ताधारी पक्षाचा मानस असावा. आता धाग्यावरचे पुढचे प्रतिसाद नेहमीप्रमाणे कुठल्या दिशेने जातील हे सांगायला ज्योतिषची गरज नाही 😀 पण माहितीचे उत्तम संकलन असलेल्या लेखाने सुरुवात तरी छान झाली आहे एवढे बोलून मी खाली बसतो. जय हिंद!
  • Log in or register to post comments

जगाला

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 08/01/2022 - 21:59 नवीन
संजय राउत ह्यांना ४ ऑगस्टपर्यन्त कोठडी. पत्राचाळ प्रकरणात झालेली ही अटक आहे. म्हाडामधील काहीनी काही काळापुर्वी तक्रार केली होती त्या संबंधात ही अटक आहे. मराठी वाचकाना 'आर्थिक शहाणपण' शिकवणारे,तेलाचे अर्थकारण सांगणारे लोकसत्ताचे संपादक ह्या प्रकरणावर अजुनही गप्प आहेत. पुतिन/ट्रंप ह्यांना ईशारे देणारे मराठी पत्रकार ह्या प्रकरणावर चिडीचुप का?आमचे मराठी नेते घोटाळा कसा करतात ते कळू द्यात की ..
  • Log in or register to post comments

इडीची कारवाई आज ना उद्या

आग्या१९९०
Mon, 08/01/2022 - 22:29 नवीन
इडीची कारवाई आज ना उद्या होणार हे माहीत असूनही संजय राऊत सतत काहीना ना काही भडक बोलत होते त्यांना हुतात्मा होण्याची खात्री असणार. नक्की का अटक झाली हे का सांगत नाही. सगळे तोंडी आरोप आहेत. त्यांनी खरोखरच काही गुन्हा केला असेल तर कागदोपत्री पुरावे नक्कीच नष्ट केले असते. इडीच्या धाडीत नक्की कोणते कागदपत्र मिळाले. बहुतेक भुजबळ भाग २ होणार.
  • Log in or register to post comments

काहीही असो, संजय राऊत यांच्या

उगा काहितरीच
Mon, 08/01/2022 - 22:41 नवीन
काहीही असो, संजय राऊत यांच्या सारख्या नेत्याला ११-१२ लाखासाठी अटक झाली हे जरा अती वाटत आहे. किमान काही (शे) कोटी असले असते तर पटलं असतं. ११-१२ लाख खूपच कमी वाटत आहेत. दुसरं काही कारण असेल तर कल्पना नाही बूवा.
  • Log in or register to post comments

११-१२ लाखासाठी अटक झाली हे जरा अती वाटत आहे

धर्मराजमुटके
Mon, 08/01/2022 - 23:05 नवीन
काहीही असो, संजय राऊत यांच्या सारख्या नेत्याला ११-१२ लाखासाठी अटक झाली हे जरा अती वाटत आहे.
हो. ना. आणि ईडी कधीही आपल्या घरी पायधूळ झाडू शकते हे माहित असूनही ११-१२ लाख घरात ठेवण्याइतका आत्मविश्वास कुठून पैदा झाला हे देखील नवलच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

संजय राऊत यांच्या सारख्या

विजुभाऊ
Tue, 08/02/2022 - 09:41 नवीन
संजय राऊत यांच्या सारख्या नेत्याला ११-१२ लाखासाठी अटक झाली हे जरा अती वाटत आहे.
त्यांना त्यासाठी अटक झालेलीच नाहि. त्यांच्या घराची झडती घेताना ती रक्कम सापडली इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

ते मान्य आहे.

धर्मराजमुटके
Tue, 08/02/2022 - 10:28 नवीन
ते मान्य आहे. पण ईडी कधीही घरी येणार असेल तर मी घरात १ रुपया देखील ठेवला नसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

डॉक्टरपेक्षा कम्पौंडर ना अधीक

विजुभाऊ
Tue, 08/02/2022 - 13:33 नवीन
डॉक्टरपेक्षा कम्पौंडर ना अधीक ज्ञान असते. हा आत्मविश्वास असला की असे होणारच. अर्थात. ५५ लाख इतराना सहज देऊ शकणार्‍या या मध्यवर्गीय माणसाच्या घरात इतकी रक्कम म्हणजे किरकोळच म्हणावी लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

११-१२ लाख रुपयांमुळे

कानडाऊ योगेशु
Tue, 08/02/2022 - 14:36 नवीन
११-१२ लाख रुपयांमुळे राऊतरावांपेक्षा ई.डी चेच जास्त हसे झालेय. तिकडे बंगालमध्ये २५-२५ करोड मिळताहेत धाडी टाकुन आणि इकडे फुस्स्स्स फक्त काही लाख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हे कदाचित हिमनगाचे टोक असावे.

श्रीगुरुजी
Tue, 08/02/2022 - 14:43 नवीन
हे कदाचित हिमनगाचे टोक असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

खानावळीतील २ खानांची होलसेल

मदनबाण
Mon, 08/01/2022 - 23:02 नवीन
खानावळीतील २ खानांची होलसेल मध्ये फाटली आहे ! १] सॉलमॉड खॉण :- तथाकथित महामाजुरडा आणि नावापुढे "भाई" लावणारा हा आता पतलुन ओली झाल्या सारख्या अवस्थेत आहे म्हणे ! बंदुकीचा परवाना आणि बुलेट प्रुफ गाडीची या तथाकथित भाईंना पडली म्हणजे हा तर फट्टु भाई निघाला शेवटी ! २] ऑमिर खॉण :- लाल सिंग को बिठा दो. ही घोषणा त्याच्या कानावर पोहचली की काय ? आज आपला चित्रपट पाहण्यासाठी हाता-पाया पडायला लागला है. यह खौफ अच्छा लग रहा है दोनो खाणो का ! :))) संदर्भ :- Death threat: After upgrading his car with bulletproof armour, Salman Khan gets gun license for self-protection Laal Singh Chaddha: फिल्म 'लाल सिंह चड्ढा' का बायकॉट होने पर अंदर से टूट गए आमिर खान, रिलीज से चंद दिन पहले कह दी ये बड़ी बात जाता जाता :- चेन खुली की मेन खुली की चेन... लाल सिंह चड्ढा का तो लोग बाजा बजा के ही दम लेंगे ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Har Har Shambhu | Mahadev New Song | har har shambhu shiv mahadeva | Shiv Bhajan | Mahakaal Song
  • Log in or register to post comments

“त्यांना वाटतं माझं देशावर प्रेम नाही…” ‘लाल सिंह चड्ढा’ला होणाऱ

मुक्त विहारि
Tue, 08/02/2022 - 10:10 नवीन
“त्यांना वाटतं माझं देशावर प्रेम नाही…” ‘लाल सिंह चड्ढा’ला होणाऱ्या विरोधावर आमिर खानची प्रतिक्रिया https://www.loksatta.com/manoranjan/aamir-khan-reacts-on-boycott-laal-singh-chaddha-trend-says-i-feel-sad-mrj-95-3050702/lite/ 1. देशप्रेमाचा आणि ह्या सिनेमाचा काय संबंध? 2. २०१५ मध्ये आमिर खान एका वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. “आपला देश खूप सहिष्णू आहे, परंतु काही लोक दुष्टपणा पसरवत आहेत.” असं त्यानं म्हटलं होतं. एवढंच नाही तर आमिर खानची पूर्वश्रमीची पत्नी आणि चित्रपट निर्माती किरण राव हिने देखील देशाबद्दल वक्तव्य केलं होतं, “भारत देश सुरक्षित नाही त्यामुळे मी माझ्या मुलाच्या सुरक्षेसाठी देश सोडण्याचा विचार करत आहे.” असं विधान तिनं केलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

वारंवार इडी त्यांच्याकडे का जात आहे - जयंत पाटील.

कंजूस
Tue, 08/02/2022 - 06:12 नवीन
DHFL,HDIL,PMC BANK घोटाळा झालाय त्यामागे इडी लागली आहे. त्यातले पैसे कुठे गेले ते शोधताना हे सापडले. वाधवा किंवा सूत्रधार कुणाला कशाला लोन देतील हा मुद्दा आहेच. बाकी रिटन फाईल करणाऱ्या व्यक्तीने गेल्या पाच वर्षांत दाखवलेरी रक्कम आणि घरात सापडलेली रक्कम याचा संबंध असतोच.
  • Log in or register to post comments

राज्यपालांची माफ़ी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/02/2022 - 07:54 नवीन
देशात काहीही बोलण्यात आणि फेकाफेकी करण्यात नंबर दोन वर असलेले ( एक नंबर अजुनही आपल्या शेठचाच आहे) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल माफ़ी मागितली. क्षमा करावी असे म्हणता म्हणता लांबलचक ड्राफ्ट वाचायला मिळतो. ड्राफ्ट त्यांनीच लिहिला असेल असे समजण्यास हरकत नाही. क्षमा निवेदनातील काही ओळी-
''महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देतील, असा विश्वास बाळगतो,'
यापुढे, आपण घटनात्मक पदाची प्रतिष्ठा जपण्याचा आणि संवैधानिक जवाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न कराल त्याचबरोबर कमी, महत्वाचे, आणि योग्य ते बोलाल अशी अपेक्षा व्यक्त करून एक महाराष्ट्रीयन माणूस म्हणून आपणास क्षमा करतो. काळजी घ्या. तब्येतीला जपा. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे (महाराष्ट्रीयन)
  • Log in or register to post comments

काहीही चुकीचे बोलले नसतानाही

श्रीगुरुजी
Tue, 08/02/2022 - 08:50 नवीन
काहीही चुकीचे बोलले नसतानाही मनाचा मोठेपणा दाखविल्याने कोश्यारींबद्दलचा आदर दुणावलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+1

मुक्त विहारि
Tue, 08/02/2022 - 09:57 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१

जेम्स वांड
Tue, 08/02/2022 - 09:20 नवीन
राज्यपालांच्या पदावरून इतका वावदुकपणा करणे बरे नव्हे असेच वाटते, कारण ह्या पदावर असताना असे माफीनामा वगैरे जाहीर करून फूट इन द माऊथ मोमेंट्स टाळल्या जाऊ शकतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देशात काहीही बोलण्यात आणि

चौकस२१२
गुरुवार, 08/04/2022 - 10:08 नवीन
देशात काहीही बोलण्यात आणि फेकाफेकी करण्यात नंबर दोन वर असलेले वाचाळवीर महान संपादक संनजयजी राऊत यांचा क्रमांक किंतवा ? कि नाहीच .. हे म्हणजे आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्रीयन

mayu4u
Mon, 08/22/2022 - 18:20 नवीन
या शब्दाचा संधीविग्रह काय हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पत्राचाळ घोटाळा व त्यात संजय

श्रीगुरुजी
Tue, 08/02/2022 - 08:48 नवीन
पत्राचाळ घोटाळा व त्यात संजय राऊतांचा सहभाग व पुरावे https://www.indiatoday.in/india/story/what-is-the-patra-chawl-case-ed-evidence-sanjay-raut-arrest-1982659-2022-08-02
  • Log in or register to post comments

पुरावे कुठे आहेत? मी संजय

आग्या१९९०
Tue, 08/02/2022 - 10:09 नवीन
पुरावे कुठे आहेत? मी संजय राऊत ह्या व्यक्तीबद्दल विचारात आहे,ज्यांना अटक झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दिलेली बातमी संपूर्ण वाचावी.

श्रीगुरुजी
Tue, 08/02/2022 - 10:16 नवीन
दिलेली बातमी संपूर्ण वाचावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

पुरावे म्हणजे कागदपत्र

आग्या१९९०
Tue, 08/02/2022 - 10:19 नवीन
पुरावे म्हणजे कागदपत्र दाखवावे. नुसते हा व्यवहार तो व्यवहार असल्या गोष्टी सांगणे म्हणजे पुरावे नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बरं, पुरावे नाहीत असे समजावे.

श्रीगुरुजी
Tue, 08/02/2022 - 11:33 नवीन
बरं, पुरावे नाहीत असे समजावे. पुरावे नाहीत अशी समजूत करून घेण्यास माझा आक्षेप नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

म्हणजेचं संजय राऊतांचे वाधवान

रात्रीचे चांदणे
Tue, 08/02/2022 - 09:14 नवीन
म्हणजेचं संजय राऊतांचे वाधवान कुटूंबाबरोबर फार जुने संबंध आहेत. लोकडाऊन चालु असताना ह्या वाधवान कुटूंबाला खंडाळा ते महाबळेश्वरला जाण्यासाठी खास परवानगी मिळाली होती आणि ते उघड झाल्यावर एका IPS ऑफिसरचा बळी दिलेला होता.
  • Log in or register to post comments

धक्कादायक

क्लिंटन
Tue, 08/02/2022 - 10:44 नवीन
म्हणजेचं संजय राऊतांचे वाधवान कुटूंबाबरोबर फार जुने संबंध आहेत.
वाधवान कुटुंबिय पी.एम.सी बँक आणि येस बँक घोटाळ्यात आहेत. पी.एम.सी बँकेला बुडविले एच.डी.आय.एल कंपनीने आणि येस बँकेला बुडविण्यात डी.एच.एफ.एल (दिवाण हाऊसिंग फायनान्स) ही एक कंपनी होती. एच.डी.आय.एल चे प्रवर्तक आहेत राकेश आणि सारंग वाधवान हे दोन भाऊ तर डी.एच.एफ.एल चे प्रवर्तक आहेत कपिल आणि धीरज वाधवान हे भाऊ. राकेश आणि सारंग हे कपिल आणि धीरजचे चुलतभाऊ आहेत. राकेश आणि सारंग वाधवाननी पी.एम.सी बँकेला अगदी पध्दतशीरपणे धुतले. त्यांना उंची गाड्याचा शौक होता. फेरारी- लॅम्बॉर्गिनी वगैरे घ्यायची असेल तर सरळ पी.एम.सी बँकेच्या चेअरमनला फोन करून 'दे दो पैसा' अशी ऑर्डर जायची. मग पी.एम.सी बँकेकडून वाधवान बंधूंना गाडी विकत घ्यायला कार लोन दिले न जाता एच.डी.आय.एल कंपनीच्या बॅलन्स शीटवर पी.एम.सी बँकेकडून कर्ज दिले जायचे आणि तिथून 'मनी लाँडरींग' करून हे वाधवान बंधू कंपनीतून पैसे आपल्या खिशात टाकायचे. पी.एम.सी बँकेच्या एकूण लोन बुकच्या बराच मोठा भाग एकट्या एच.डी.आय.एल ला दिलेल्या कर्जाचा होता. एच.डी.आय.एल मधून मनी लाँडरींग झाल्याने पी.एम.सी बँकेला कर्जाची परतफेड होणे शक्य नव्हते. त्यामुळे ऑक्टोबर २०१९ मध्ये पी.एम.सी बँक अडचणीत आली. येस बँकेची कथा वेगळीच आहे. पूर्ण भारतीय बँकिंगमधील सगळे एन.पी.ए येस बँकेच्या लोन बुकमध्ये होते असे म्हटले तरी चालेल. पण सी.ई.ओ राणा कपूर ज्या कारणाने जवळपास दोन वर्षे तुरूंगात होता ती केस डी.एच.एफ.एल ची. डी.एच.एफ.एल कंपनी बाँड विकून पैसे उभे करायची आणि ते पैसे गृहकर्जासाठी द्यायची. मधला व्याजातील फरक हे त्या कंपनीचे उत्पन्न होते. डिमॅट अकाऊंटमधून पूर्वी 'कॉर्पोरेट बाँड' मध्ये डी.एच.एफ.एल च्या बाँडना अर्ज करा अशाप्रकारच्या एन्ट्री २०१८ पूर्वी बघितल्याचे माझ्या लक्षात आहे. तशा जाहिराती अनेकांनी बघितल्या असतीलच. तर डी.एच.एफ.एल च्या वाधवाननी आपल्या एच.डी.आय.एल च्या चुलतभावांप्रमाणे 'मनी लाँडरींग' केले आणि बाँड विकून उभे केलेले पैसे कंपनीतून काढून स्वतःच्या खिशात घालायला सुरवात केली. या डी.एच.एफ.एल चे ३७०० कोटींचे बाँड विकत घ्यायला येस बँकेच्या राणा कपूरांनी मान्यता दिली. क्रेडीट रिस्क टिमने हे बाँड अजिबात घेऊ नयेत अशी शिफारस केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करून राणा कपूरांनी ते बाँड येस बँक विकत घेईल असा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसातच राणा कपूरांच्या पत्नीच्या बँक खात्यात आणि मुलींच्या कंपनीत काही कोटी रूपये अचानक आले. हे पैसे डी.एच.एफ.एल च्या वाधवानने दिले होते. म्हणजे वाधवानला मनी लाँडरींग करायला राणा कपूरांनी मदत केली आणि त्या बदल्यात स्वतः 'कट' घेतला. खातेदारांचे पैसे राणा कपूर वाधवानांच्या खिशात टाकणार आणि त्याबद्दल स्वतः 'कट' घेणार अशी सगळी रचना होती. तर हे वाधवानांचे असे सगळे किळसवाणे रॅकेट आहे. येस बँक त्यामानाने मोठी असल्याने रिझर्व्ह बँक आणि सरकारने धावपळ करून ती बँक वाचवली आणि काही दिवसात खातेदारांना पैसे काढायची परवानगी मिळाली. पण पी.एम.सी बँक लहान असल्याने त्या बँकेला वाचवायला इतकी धावपळ झाली नाही त्या बँकेच्या खातेदारांचे अतोनात हाल झाले. शेवटी जानेवारी २०२२ मध्ये युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत पी.एम.सी बँकेचे विलीनीकरण होणार अशी बातमी आली. विलीनीकरण खरोखरच झाले की नाही काय माहिती. त्या बँकेचे खातेदार दोन वर्षांपेक्षा जास्त काळ अडचणींना तोंड देत होते. आपली सगळी आयुष्यभरची पुंजी गेली म्हणून अनेकांनी आत्महत्या केल्या. अशा वाधवानांबरोबर संजय राऊतांचे संबंध असतील तर ते नक्कीच धक्कादायक आहे. पी.एम.सी बँक बुडविण्यातही त्यांचा वाटा होता का याचीही चौकशी व्हायला हवी. पत्रा चाळीतील ६५० मराठी कुटूंबांना रस्त्यावर आणण्याबरोबरच हे पी.एम.सी बँकेला धुवायचे पापही त्यांच्या माथी आहे का याचीही चौकशी व्हावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

विलीनीकरण खरोखरच झाले की नाही काय माहिती

असा मी असामी
Tue, 08/02/2022 - 16:56 नवीन
शेवटी जानेवारी २०२२ मध्ये युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत पी.एम.सी बँकेचे विलीनीकरण होणार अशी बातमी आली. विलीनीकरण खरोखरच झाले की नाही काय माहिती विलीनीकरण झाले आहे, खातेदारांना आता फक्त पैसे भरता येतात, पैसे काढायची परवानगी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरी ठार,

मुक्त विहारि
Tue, 08/02/2022 - 10:01 नवीन
अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरी ठार, अमेरिकेने ड्रोन हल्ला करत केला खात्मा, बायडन म्हणाले “९/११ हल्ल्याचा बदला पूर्ण” https://www.loksatta.com/desh-videsh/al-qaeda-chief-ayman-al-zawahiri-killed-in-drone-strike-by-us-joe-biden-sgy-87-3051744/ अमेरिकेने करून दाखवले ..... मुंबई Bomb स्फोटा बाबतीत काय?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा