शिवजयंती
गाडी निघाली..चायनीज ची दुकाने आणि त्याच्या बाजूला मंडई त्यात वेगवेगळ्या भाजीपाल्याने आणि फळांनी बहरलेला माहोल.तिथेच बाजूला एक पूजा साहित्याचं दुकान आणि त्यात सिजनल वस्तूंची रेलचेल.
समोर सिग्नल आणि प्रचंड गर्दी!
१९ फेब्रुवारी.आज शिवजयंती. महाराजांना दोन क्षण घट्ट डोळे मिटून आठवून पाहिलं.मग ते चौथीच्या पुस्तकात घोड्यावर बसून मोहिमांना जाताना दिसले,काय ते रूप काय ते तेज अगदी अवर्णनीयच! सगळा इतिहासच प्रेरणादायक तो.
पिप sssssss पिप ssssss एकदम वर्तमानातच आदळलो!
डोळ्यातून ते तेज हटेना!! पण समोरचं चित्रही पाहवेना- हे चायनीज गाडीवाले का बरं फोफावले असतील? नंतर जुने इकडचे तिकडचे संदर्भ जे व्हाट्सअप्प वर फिरत असतात ते आठवले-चायनीज हे पदार्थ आहेत (जे चायनात पण असे बनवत नाहीत आणि फक्त इंडिया मधेच असे असतात) आणि विकणारे इथलेच कुठले तरी आसामी बांधव आहेत.मग ते आसाम मध्ये का नाही राहत असा निरुपयोगी प्रश्न पडला आणि गाडीचा गियर नकळत उचलला.
एकदम मेंढरं सुटावी तशी माझ्यासकट गाडी त्या झुंडीतून जाऊ लागली आणि एकदम टर टर ssss ट ssss टर अशी सुसाट एक गाडी पुढून निघून गेली. त्यावर तीन मावळे ट्रॅफिक रुल्स धाब्यावर बसवून स्वार आणि हेल्मेट पण नाही!(पुण्यात आणि हेल्मेट? ते काय असतं? काय बोलता राव) भगवा कुर्ता पांढरा पायजमा कानात बाळी हातात ब्रेसलेट कपाळाला चंद्रकोर! असे प्रसन्न चेहरे.. शिवाय डोक्याचे खालून भादरलेले वर डोंगर म्हणून ठेवलेले केस(स्टाईल असते ती!)
पुन्हा चौथीच्या धड्यात महाराजांच्या स्वप्नरंजनाचा भाग आठवला. हेच ते आधुनिक मावळे आता जयंतीच्या निमित्ताने महाराजांचा इतिहास जागवत आहेत आणि काळानुरूप हा बदल झालाय असं सहज वाटून गेलं.
आधुनिक काळात घोडे वापरणं तसं योग्य व्हायचं नाही कारण तेवढी बडदास्त ठेवायची तर या मावळ्यांकडे तेवढी दौलत नाही आणि शिवाय PETA वाले प्राण्यांचा अमानुष छळ म्हणून केस वगैरे करतील! नकोच ते.शिवाय गाडीला झेंडा होताच-क्षत्रिय कुलावतंस! अशा रयतेच्या राजाला कूळ भूषणाला अभिमानाने सगळीकडे झेंड्याच्या रूपाने मिरवणारे मावळे पाहिलं की वाटतं-हो गरज आहे सर्वांना सांगण्याची की,होता असाही एक राजा जो कित्तेक शतकानंतर ही आठवला जातो.
गाडी निघाली आणि पुन्हा दुसरा चौक आणि पुन्हा तोच माहोल.
त्यात भर फक्त साऊंड सिस्टीम च्या रॅक ची! दन दन वाजत होतं, गाणी होती का नव्हती नीट ऐकू येत नव्हतं पण तुताऱ्या आणि ढोल एकदम शंभर बाजूने वाजत होते त्यामुळे माहोल अगदी सळसळत होता.
काही मंडळींना आज सरकारी सुट्टी असल्याने ती भाजी किंवा गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यात गुंग! तसं एवढ्या कोलाहलात कुणाला काही त्रास वगैरे होत नव्हता म्हणा. आता पूजा साहित्य आणि त्या बरोबरीने फेटे झेंडे भगवामय पाहायला छान वाटत होतं आणि एकदम साऊंड सिस्टीम ला कंठ फुटला!
पोवाडे वाजू लागले..झालं एकदाचं जयंती साठी म्हणून आवश्यक जे आहे ते आलेलं आहे आणि वातावरणात तजेला आहे. अर्धाकृती पुतळ्याला हार घालून झाला..सुवासिक अगरबत्ती ,पेढे, गुलाल आणि एकमेकांच्या गळाभेटी..
गाडी अजून पुढे सरकली आणि काही मावळे टर ट ssss र करत सुसाट झेंडे घेऊन निघाले..नेमकं कुठे जाणार ते दरवर्षी वाटतं ते याही वर्षी वाटलं आणि मध्ये दाटीवाटीने बसलेला मावळा त्वेषाने ओरडू लागला- शिवाजी महाराज की.. बाकीचे जय म्हणे पर्यंत त्याने तोंडातून काहीतरी रस्त्यावर ओतलं-अगदी लालेलाल एकदम रक्तासारखं आणि पुन्हा ऊर्जेने ओरडला-शिवाजी महाराज की.. पुन्हा जय झालं. अजून पुढच्या महिन्यात अजून एकदा शिवजयंती आहे याचा विचार करत पुन्हा..
गाडी निघाली..
वर्गीकरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
शिवाजी जन्माला यावा तो दुसर्या घरात
Anek prarisad avadale.
प्रतिसाद दिला त्या सर्वान्चे आभार