टाटा निक्सन एक्सएम पेट्रोल मॅन्युअल गाडीचा, पुरेशा वापरानंतरचा रिव्यू

कांदा लिंबू's picture
कांदा लिंबू in जनातलं, मनातलं
5 Apr 2021 - 9:14 am

कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे हा धागा मी काढला होता. तिथल्या सूचना, सल्ले व मार्गदर्शनाबद्धल सर्व व्यक्त-अव्यक्त मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.

२० सप्टेंबर २०२० ला गाडी हातात आली. महिनाभर वापरल्यावर रिव्यू लिहीन असं ठरवलं होतं पण मग म्हटलं पाचेक हजार किमी वापरानंतर लिहावा (टंकाळा, दुसरं काय!). आता लिहितोय. उशीर झाल्याबद्धल क्षमस्व.

स्वतःची नवीन चारचाकी घेण्याचा पहिलाच अनुभव होता. पोटात अनेक फुलपाखरे बागडत आहेत असं उगीच वाटत होतं. पण घरून काम सुरु असल्याने रोज गाडी घेऊन ऑफिसला जाण्याचा प्रश्नच नव्हता. (१५ मार्च २०२० नंतर गच्चीबावलीला गेलोच नाहीय!) मग वीकेंड्सला खरेदी, मित्र, नातेवाईक, शे-दोनशे किमीपर्यंत पर्यटन असं इकडं तिकडं फिरणं सुरु झालं. त्यातच मग दोन महिन्याच्या आत १५०० किमी वर पहिली सर्व्हिसिंग झाली.

नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा गाडी घेऊन तेलंगणाच्या बाहेर पडलो. हैद्राबादच्या आउटर रिंग रोडवर १०८-११० च्या (तरीही तिथे संथ वाटणाऱ्या) गतीने, डिव्हायडरवरची लाल-पिवळी फुलझाडे पाहत प्रवास एन्जॉय केला. राष्ट्रीय महामार्ग ४४ वर सुसाट निघालो अर्थात, १०० ची वेगमर्यादा पाळून गाडी चालवली; याआधी ओव्हरस्पीडींगचा ₹१०३५/- दंड लागला होता!. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातल्या माझ्या गावी गेलो. आजूबाजूच्या खेड्यांत फिरलो. खेळाच्या मैदानात, पीक काढलेल्या शेतात, गायरानात, उंचसखल भागात, किनवट-उमरखेड दरम्यानच्या जंगलात झाडांमधून वाट काढून (हो!), गोदावरी नदीच्या वाळूत... अशी मस्त ऑफ-रोडिंग केली. २०९ मिमी ग्राउंड क्लिअरन्स इथे उपयोगी पडला.

डिसेंबरात गडचिरोली-नागपूरला गेलो. डोअर-टू-डोअर ५२५ किमी अंतर, बायको-लेकरांना घेऊन सकाळी ९ ते संध्याकाळी ५ मध्ये पार पाडले. विदर्भात फिरताना मनातल्या मनात तेलंगणा आणि महाराष्ट्रातल्या रस्त्यांच्या दर्जांची तुलना झाली. प्रवास बराचसा सुखकर होण्यात गाडीचे अप्रतिम सस्पेन्शन इथे उपयोगी पडले.

मागच्या महिन्यात तेलंगणा-आंध्र-कर्नाटक असा २०००+ किमी प्रवास केला. कर्नूल ते तिरुपती दरम्यानच्या, डिव्हायडर नसलेल्या, सव्वाशे किमीच्या पट्ट्यात लक्झरी बसला ओव्हरटेक करणे हे कौशल्याचे काम आहे. तिरुपती ते तिरुमला या घाटात गाडी चालवण्याचा अनुभव मस्त आहे. दोन्ही ठिकाणी स्पोर्ट्स मोड उपयोगी पडला.

आम्ही किराणा वगैरे सामान शक्यतो महिना-दोन महिन्यांचे एकदाच भरतो. परवा उप्पलच्या मेट्रोमधून मी आणि माझा एक मित्र, आमच्या दोन कुटुंबांचे महिनाभराचे किराणा सामान आणायला गेलो. येताना आम्ही एक क्विंटल तांदूळही घेतला. गाडीची ३५० लिटरची बूट स्पेस इथे उपयोगी पडली.

टाटा निक्सन ही दहा लाखाच्या आसपासच्या किंमतीतली खरंच मस्त गाडी आहे. १.२ लिटरचे टर्बो इंजिन, चार प्रवासी आणि त्यांचे आठ दिवसाच्या प्रवासाचे सामान अगदी सहज वाहून नेते. शहरात सिटी मोड, महामार्गावर ७० च्या पुढे गेल्यावर इको मोड आणि ओव्हरटेक करताना केवळ काही वेळा स्पोर्ट्स मोड, हे ताकद आणि माइलेजचा समतोल साधतात. गाडीचा सहावा गियर ८० च्या पुढे गेल्यावर एक लयीत, वेगाने गाडी चालवायला मदत करतो. वजनदार बॉडी असल्यामुळे ७०+ च्या वेगातही कॉर्नरिंग करताना कठीण वाटत नाही. जवळजवळ आवाजरहित असे पेट्रोल इंजिन लॉन्ग-ड्राईव्हवरही थकवा जाणवू देत नाही. तुलनेने ऐसपैस सीट्स आणि भरपूर लेग स्पेस, आरामदायक प्रवासाचा अनुभव देतात. कडक उन्हातही एसीचा गारवा अक्षरशः दोन मिनिटात केबिन थंडगार करतो.

ही बाजारातील सर्वोत्तम गाडी आहे असं काही नाही; पण मी मात्र माझ्या निक्सीवर जाम खुश आहे.

सुखद क्षण:

हैद्राबादच्या विमानतळाला जाताना, दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी, विविध फुलझाडे, वृक्ष अशा मनमोहक रस्ता होता. गाडीतल्या हर्मन म्युझिक सिस्टिम वर पन्ना की तमन्ना है की हिरा मुझे मिल जाये हे गाणं ऐकत गाडी चालवत होतो. सोबत माझी प्रिय पत्नी होती. हा प्रवास कधीही संपू नये असं वाटत होतं...

फजितीचा क्षण:

गाडी शोरूममधून घरी आणली. रिव्हर्स करताना रिव्हर्स गियर टाकला तरी गाडी आचके देत पुढेच जात होती. काय होतंय ते काहीच कळेना. मग बाजूच्या एका मित्राला बोलावलं. त्याच्याकडे फियाट पुन्टो आहे. तोही दहा मिनिटे खटपट करून थकला. शेवटी पुढच्या भिंतीत आणि गाडीत फक्त काही इंचांचे अंतर राहिले. मग अचानक माझ्या लक्षात आलं, गियर रॉडच्या मुठीखाली एक बटन असतं, रिव्हर्स गियर टाकताना ते बटन दाबून गियर टाकावा लागतो नाहीतर रिव्हर्स ऐवजी सहावा गियर पडतो. डिलिव्हरीच्या वेळी सेल्सवाल्याने हे मला स्पेसिफिकली सांगितलं होतं, मी ऐनवेळी विसरलो होतो.

ठळक माहिती -

  • सध्याचे ओडोमीटर - ६८००+
  • आतापर्यंत भरलेले पेट्रोल अंदाजे ₹४००००/-
  • टॅंक फुल पद्धतीने एसी सुरु ठेवून मिळालेला सर्वोत्तम माइलेज: १६. ७ किमी / लिटर (गाडीच्या कॉन्सोल वर १८.२ दाखविते)
  • नियंत्रित व सुरक्षितपणे गाठलेली सर्वोच्च गती - १३९ किमी / तास (ही गुगल मॅपची स्पीड आहे, गाडीच्या स्पीडोमीटर वर यापेक्षा ४-५ किमी ने जास्त दाखविते)

माझे मत -

ही गाडी का घ्यावी -

  • टाटाची सर्व्हिस (Yes, I mean it!)
  • शानदार लूक्स
  • दणकट बॉडी - भारतातील सर्वोत्तम सुरक्षा
  • इंजिनचा अति कमी आवाज
  • उंच सीटमुळे रस्त्यावर अधिक चांगले लक्ष व गाडीवर अधिक चांगले नियंत्रण
  • स्पोर्ट्स मोडवरचा भन्नाट पिकअप
  • अप्रतिम म्यूजिक सिस्टम
  • कार्यक्षम एसीचा सुखद गारवा
  • (मागच्यादेखील) ऐसपैस आरामशीर सीट्स
  • सर्वोत्तम लगेज स्पेस...

ही गाडी का घेऊ नये -

  • (मारुती ब्रीझाच्या) तुलनेत कमी माइलेज
  • (ह्युंदाई वेन्यूपेक्षा) किंचित कमी दर्जाचे वाटणारे इंटेरिअर्स
  • अबे, टाटा की गाडी कैकू लिया भै? अशी मध्यमवयीन लोकांकडून हेटाळणी

विशेषतः वाहनप्रेमी आणि सर्वच मिपाकरांच्या प्रतिसादांच्या प्रतीक्षेत...

आपला स्नेहांकित
कांदा लिंबू

जीवनमानतंत्रमौजमजासमीक्षा

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

5 Apr 2021 - 10:49 am | उगा काहितरीच

Nexon ! खरंच खूप छान आहे गाडी. पण AMT थोडी महाग होती म्हणून मग टिगोर घेतली. (खरंतर टियागो बुक केली होती. पण टिगोर मिळाली. वो एक लंबी कहानी है ! ) आत्ता पर्यंत ~5000 km चालली. आत्तापर्यंत तरी अतिशय सुखद अनुभव होता. मागच्याच विकेंडला गोवा ट्रीप करून परतलो १३५० km च्या आसपास झाली पूर्ण ट्रिप. मजा आली गाडी चालवायला. AMT मुळे गाडी चालवताना खूपच आराम वाटतो पण. माझ्यासारख्या नवशिक्या ड्रायव्हरला पण काही त्रास नाही वाटत.

कानडाऊ योगेशु's picture

5 Apr 2021 - 4:51 pm | कानडाऊ योगेशु

मी ही दोन आठवड्यांपूर्वी टिगोर ए.टी.एम घेतली. खरेतर नेक्सॉन अ‍ॅटोमॅटीकच बुक केली होती पण प्रतिक्षा काळ जास्त झाल्याने ती रद्द करुन डॉ.खरेसाहेबांचा सल्ला मानून टीगोर अ‍ॅटोमॅटीक घेतली.

मुक्त विहारि's picture

5 Apr 2021 - 11:20 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

टाटा नेक्सन घेण्याचा खूप महिने विचार करत होतो २०१९ च्या शेवटी, टेस्ट ड्राईव्हला गेलो तर अल्ट्रोज होती डिस्प्लेवर. लगेच टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि बुक करून टाकली. फेब्रुवारी २०२० ला डिलिव्हरी घेतली आणि महिन्याभरात लॉकडाउन सुरु झाला. त्यामुळे वर्षभरात अजून ५००० चा टप्पा पण ओलांडला नाही.
गाडी मात्र एकदम मस्त आहे, गाडीत बसल्यावर जसे सुरक्षित वाटते तसे मारुतीच्या कुठल्याही गाडीत बसल्यावर वाटत नाही. मायलेज थोडे कमी वाटते, विशेषतः शहरी रस्त्यांवर कारण ट्रॅफिक, स्पीड ब्रेकर आणि सिग्नल. टाटाच्या नवीन गाड्या नक्कीच चांगल्या आहेत आणि सस्पेंशन भारतीय रस्त्या करता तर नक्कीच दणकट आहेत. टाटा ची आफ्टर सेल्स सर्विस पूर्वी कशी होती कल्पना नाही, पण आता नक्कीच चांगली आहे.

चौथा कोनाडा's picture

5 Apr 2021 - 12:18 pm | चौथा कोनाडा

झकास रिव्हीव्यू !
निक्सॉन सध्या हॉट केक आहे !

बापूसाहेब's picture

5 Apr 2021 - 12:29 pm | बापूसाहेब

छान रेव्हियू.

आता डिझेल ए एम टी आहे.
पर्फेक्ट डीझाईन. आणी कंफर्ट. सेफ कार.

सुबोध खरे's picture

5 Apr 2021 - 7:51 pm | सुबोध खरे

ज्याला मोठी गाडी हवी आहे त्याने नेक्सन जरूर घ्यावी आणि ज्याची तेवढी गरज नाही त्याने टिगॊर घ्यावी हे माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो.

दोन्ही गाड्यांमध्ये पुढची आणि मागची सीट आणि बूट मध्ये भरपूर जागा आहे त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात त्या गाड्या अतिशय आरामदायक ठरतात.

ताटाच्या गाड्यांमध्ये असलेले दोन महत्त्वाचे गुण म्हणजे त्याचे वातानुकूलन अत्यंत उत्तम असते आणि त्याचे सस्पेन्शन उत्तम असते.

बाकी त्यांचे इंजिन मारुती/ ह्युंदाई इतके मुलायम नाही हे मान्य करूनही सुरक्षिततेच्या बाबतीत टाटा च्या गाड्या मारुतीच्या कितीतरी पट चांगल्या आहेत.

एक लिटर ला दोन किंवा तीन किमी ऍव्हरेज कमी मिळत असले तरी मारवाडी हिशेब केल्यास टाटाच्या गाड्या या दोन्ही कंपन्यांच्या पेक्षा साधारण २ लक्ष रुपयाने स्वस्त आहेत. त्यामुळे साधारण ७० हजार किमी गाडी चालवेपर्यंत दोन्हीचा होणारा एकंदर खर्च सारखाच निघेल.( यात २ लक्ष रुपयांचे ५ वर्षाचे व्याज धरलेले नाही). ते धरल्यास १ लक्ष किमी मन्हा तुमची मारुती गाडी फायद्यात जाईल.

सामान्य माणूस आपली गाडी यालेक्षा जास्त चालवत नाही. (टॅक्सी असेल तर हिशेब वेगळा आहे)

कुटुंबाच्या सुरक्षिततेचा मुद्दा गृहीत धरल्यास टाटा च्या नेक्सोन रणगाड्यात बसल्यावर मिळणारी मानसिक शांतता अतुलनीय आहे.

नवी गाडी घेतलेल्या सर्व मित्रांना अनेक शुभेच्छा

कानडाऊ योगेशु's picture

6 Apr 2021 - 12:10 am | कानडाऊ योगेशु

सस्पेंशन आणि सुरक्षितता याबाबत +१.
आताच उज्जैन भोपाळ असा साधारण २०० किमी चा प्रवास केला आणि प्रवासाचा काहीही शीण जाणवला नाही.
अ‍ॅटोमॅटीक मध्ये एक प्रॉब्लेम मात्र जाणवतोय. गिअर चेंज होताना थोडा लॅग जाणवतो. त्यामुळे ओवरटेक करताना जिथे जास्त पॉवरची गरज असते तिथे अचानक लॅग येऊ शकतो. पण सरावाने ह्यावरही नियंत्रण येईल असे वाटते.

सुबोध खरे's picture

6 Apr 2021 - 10:33 am | सुबोध खरे

जेंव्हा एखाद्या वाहनाच्या पुढे जायचे असेल(ओव्हरटेक) तर स्पोर्ट मोड वर गाडी टाका म्हणजे हा विलंब अजिबात जाणवणार नाही.

अगोदर एकदा दोनदा स्पोर्ट मोड वर गाडी किती पटकन वेग घेते याचा अंदाज घेऊन ठेवा

एकदा हा अंदाज आला कि गाडी पुढे काढणे एकदम सोपे होऊन जाते.

विद्याधर३१'s picture

6 Apr 2021 - 11:38 am | विद्याधर३१

वर गाडी छान पिकप घेते. लोणावळा घाटात त्याचा खुप उपयोग होतो.

कानडाऊ योगेशु's picture

6 Apr 2021 - 11:22 pm | कानडाऊ योगेशु

टीगोर मध्ये स्पोर्ट मोड नाही आहे. नेक्सॉन मध्ये आहे.

सुबोध खरे's picture

7 Apr 2021 - 1:52 pm | सुबोध खरे

https://www.youtube.com/watch?v=fVkE9_X0AK8
हे पाहून घ्या

कपिलमुनी's picture

9 Apr 2021 - 12:05 am | कपिलमुनी

https://www.youtube.com/watch?v=DOhmkwf28s0

बी एस ६ मध्ये टिगोर ए एम टी मधील मोड्स काढले आहेत असे व्हिडिओ वरुन कळाले .

उगा काहितरीच's picture

9 Apr 2021 - 11:30 pm | उगा काहितरीच

बरोबर ! माझ्या टिगोर BS6 मधे मोडस नाहीयेत. ओव्हरटेक करताना थोsssडा प्रॉब्लेम वाटत होता. पण मग गेअर आपोआप डाऊन होतो अन् निघते गाडी. आता बरीचशी झाली सवय.

सुबोध खरे's picture

10 Apr 2021 - 9:36 am | सुबोध खरे

हायला
हे माहिती नव्हते

कपिलमुनी's picture

6 Apr 2021 - 12:33 am | कपिलमुनी

मागच्या महिन्यात नेक्सॉन डिझेल एक्सएमएस घेतली आहे .सध्या १००० किमी झालेत.

तब्बल दहा वर्षे आणि सव्वा दोन लाख किमिची ह्युन्दाई आय १० मेघनाची सोबत सुटली आहे.
सध्या नवीन गाडीचे फायदे तोटे लक्षात घेउन जुळवणे चालू आहे

भरपूर चालवलेल्या (१०,००० किमी + ) मध्ये इंडिका, व्हेंटो, आय १० , स्विफ्ट या गाड्या आहेत , यावर सविस्तर रिव्ह्यू लिहिन

सर्व नविन गाड्या मालकांचे अभिनंदन..

Review छान..

कपिलमुनी,
मिसळ ची पार्टी तर तुम्ही दिली पाहिजे ते पण nexon मध्ये आम्हाला बसवून..

योग्या..
तसाच पुण्याला ये...auto gear वर :-)

कानडाऊ योगेशु's picture

6 Apr 2021 - 12:52 am | कानडाऊ योगेशु

अरे गण्या तूच ये उज्जैन ला. महाकाल चे दर्शन ही होईल आणि मार्क ऑरेलियस ह्यांनी सल्ला दिल्याप्रमाणे भांग ही पिता येईल.

गणेशा's picture

6 Apr 2021 - 12:57 am | गणेशा

योग्या..

पुणेरी आग्रह तर नाही ना हा..
एक दिवस नक्की येईल.. मला इंदोर च्या सराफा बाजार ला जायचे आहे..

गण्या हक्काने म्हणणारा तूच एकटा आहे येथे.. दुसरे अविनाश काका होते..

लई भारी's picture

6 Apr 2021 - 12:59 pm | लई भारी

सर्व नवीन गाडी घेतलेल्यांचे अभिनंदन!

टाटा ग्रुप बद्दल विशेष आत्मीयता आहे आधीपासूनच :-) त्यामुळे चांगल्या गाड्या रस्त्यावर बघून आनंद होतोय! (विशेष म्हणजे लोक पण घेताहेत ही चांगली गोष्ट आहे)

मी २०१५ च्या सुरुवातीला थोडे धाडस करून टाटा झेस्ट घेतली, कारण तोपर्यंत एवढा चांगला ट्रॅक रेकॉर्ड नव्हता(आताच्या तुलनेत). आणि कितीतरी लोकांनी विचारले सुद्धा की, "टाटा का घेतली?". याउलट सुरुवातीला अनेक अनुभवी लोकांनी गाडी हातात घेतली त्यांचा प्रतिसाद होता की कसली स्मूथ वाटते, टाटा नाही वाटत (तुलना आधीच्या टाटाच्या गाड्यांशी होती)
त्यावेळी मला 'Value for money" वाटली होती आणि बाकीच्या गोष्टी पण आवडल्या होत्या.
मला एकदाही पश्चाताप झाला नाही आहे. आता ९५,०००किमी झाले आहेत. (मॅन्युअल, डिझेल). मला AMT पाहिजे होती पण मी घेतल्या नंतर ६ महिन्यांनी झेस्ट मध्ये AMT आणले.
माझा बहुतांश बाहेरचा प्रवास पुणे-निपाणी/पुणे-मुंबई या पट्ट्यात झाला आहे. त्यासोबत कोकण/महाबळेश्वर सुद्धा काही वेळा.
फक्त एकच जाणवते म्हणजे ६ वा गियर पाहिजे होता :-)
मायलेज म्हणाल तर, निवांत चालवली अगदी ८० च्या पुढे न जाता तर २२-२३ जाते. पण माझ्या चालवण्याला १८+ मिळते हायवेवर.

बदलायचा विचार पण नाही आहे, तरी सुद्धा Harrier खुणावत असतेच ;-)

सुबोध खरे's picture

6 Apr 2021 - 1:20 pm | सुबोध खरे

झेस्ट डिझेल चे इंजिन फियाट qadrajet १२४८ सीसी आहे हे जगभरात सर्वात जास्त विकल्या गेलेल्या इंजिनांपैकी एक आहे.

थोडा आवाज करते परंतु अत्यंत भरवशाचे शक्तिशाली आणि उत्तम मायलेज देणारे आहे.

NCAP ४ तारे असलेली अत्यंत सुरक्षित अशी आपली गाडी आहे.

आपली गाडी सहज अडीच तीन लाख किमी पर्यंत अजिबात त्रास न देता चालू शकेल

६ वर्षात गाडी बदलण्या पेक्षा ३-४ वर्षे थांबा nexon किंवा हॅरियरचे इलेक्ट्रिक व्हर्जन येईलच.

लई भारी's picture

6 Apr 2021 - 8:39 pm | लई भारी

हो, इंजिन संदर्भात हा विचार केला होता. ह्याला बहुधा 'India's 'national' engine' म्हणायचे इतका खप होता.

बदलणार नाहीच आहे इतक्यात, पण Harrier मस्त दिसते हे सांगायचे होते :-)

कानडाऊ योगेशु's picture

6 Apr 2021 - 11:24 pm | कानडाऊ योगेशु

पण Harrier मस्त दिसते हे सांगायचे होते :-)

हॅरीअर आणि न्यु सफारीच्या किमतीत तितकासा फरक नाही आहे आणि सफारी ७ सीटर आहे.
टाटाने स्वतःच्याच दोन उत्पादनात स्पर्धा का आणली ते समजत नाही.

नेक्सोन एलेक्ट्रिक ऑलरेडी आहे.

मी nexon xe petrol घेणार होतो कारण माझी उंची(६.२) जास्त असल्यामुळे माझे पाय स्टिअरिंग ला धडकत होते(baleno, tiago, swift) पण nexon xe जवळजवळ ८ लाख ४० हजार ल जात होती व माझे बजेट ८ लाख होते व accessories साठी (Power windows,central locking,music system,reverse camera,seat cover इ) साठी ४० एक हजार च्या वर खर्च आला असता म्हणून nexon कॅन्सल करून altroz घ्यावी म्हटले,टेस्ट ड्राइव्ह घेतली दोन्ही गाड्यांची दोन्ही गाड्या आवडल्या पण dealership(Solapur) वाल्याने गाडी विकण्यास काहीच इंटरेस्ट दाखवला नाही म्हणून ह्युंदाई chya showroom la i१० nios chi drive घेतली अनपेक्षितरित्या गाडीत माझे ड्रायव्हर सीट मधे पाय पुरले आणि performance(१.२ l petrol) पण चांगला वाटला म्हणून nios corporate edition book केली १० दिवसात डिलिव्हरी मिळाली jan २०२१ पासून १८०० किमी चालवली छान वाटली.

चौथा कोनाडा's picture

8 Apr 2021 - 12:29 pm | चौथा कोनाडा

dealership(Solapur) वाल्याने गाडी विकण्यास काहीच इंटरेस्ट दाखवला नाही म्हणून ह्युंदाई ....
टिपीकल टाटा !

लई भारी's picture

8 Apr 2021 - 4:55 pm | लई भारी

अजूनही ट्रक, इंडिका विकणाऱ्या काही लोकांकडे आहे का डिलरशिप :-)
'पंडित, पुणे' चा अनुभव असा होता बहुधा. सध्या बंद पडले आहे माझ्या माहितीप्रमाणे.
पुणे, कोल्हापूर, सांगली येथे चांगला अनुभव आहे. बऱ्याच ठिकाणी नवीनच डीलर आहेत.

सोलापूर टाटा showroom हे कंपनी चा मालकीचे आहे त्यामुळे तसे असावे,
बाकी पुणे chavan motors मधून जुलै २०२० मधे बहिणीने tigor auto घेतली तिचा अनुभव उत्तम.
घरी येऊन service साठी गाडी घेऊन गेले.

बबन ताम्बे's picture

9 Apr 2021 - 10:39 pm | बबन ताम्बे

रिव्ह्यू आवडला. टाटांचे इंजिनिअर/डिझायनर सस्पेंशनवर किंवा राईड कंम्फर्टवर खूप मेहनत घेतात. (मी पूर्वी टेल्कोत व्हेईकल डिझाइनला होतो त्या अनुभवावरून सांगतो).
माझ्याकडे सध्या ह्युंदाई I-20 आहे. खड्ड्यातून किंवा स्पीड ब्रेकर वरून गाडी गेली की दणकन दणका बसतो इतके कम्फर्टेबल सस्पेंशन आहे ☺️

कांदा लिंबू's picture

9 Apr 2021 - 11:51 pm | कांदा लिंबू

सर्व वाचक-प्रतिसादकांचे आभार.
सर्व नवीन गाडीमालकांचे अभिनंदन!

कांदा लिंबू's picture

9 Apr 2021 - 11:56 pm | कांदा लिंबू

चौथा कोनाडा, बापूसाहेब, गणेशा बबन ताम्बे, धन्यवाद.

कानडाऊ योगेशु, नरेन., मुक्त विहारि, विद्याधर३१, सुबोध खरे अनुप ढेरे धन्यवाद.

खरंतर टियागो बुक केली होती. पण टिगोर मिळाली. वो एक लंबी कहानी है !

उगा काहितरीच, कहानी जरुर लिख डालिये!

यावर सविस्तर रिव्ह्यू लिहिन.

कपिलमुनी, नक्की लिहा, वाचायला आवडेल.

dealership(Solapur) वाल्याने गाडी विकण्यास काहीच इंटरेस्ट दाखवला नाही म्हणून

Pratham, टाटांचा सेल्स विभाग सुधारण्यास खूप वाव आहे, हा माझा + मित्रांचा अनुभव आहे.

Harrier खुणावत असतेच ;-)

लई भारी, ऑल न्यू टाटा सफारीची टेस्ट राइड घेऊन बघा, हॅरिअरपेक्षा अधिकच आवडेल!

कांदा लिंबू's picture

9 Apr 2021 - 11:56 pm | कांदा लिंबू

रच्याक, निक्सन इवी, किंवा सगळ्याच इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती खूप जास्त आहेत असं मला वाटतं. म्हणजे त्यांचा उत्पादन खर्च हा भाग निराळा, पण एक ग्राहक / चालक / मालक म्हणून, पेट्रोल / डिझेल कार न घेता इलेक्ट्रिक कार घेण्यात सध्याच्या घडीला काय इन्सेन्टिव्ह आहेत?

कांदा लिंबू's picture

9 Apr 2021 - 11:58 pm | कांदा लिंबू

रच्याक, निक्सी आली म्हणून रॉलीला विसरलो नाही हं! बुलेट हेच माझं पाहिलं आणि शेवटचं वाहनप्रेम!

मराठी कथालेखक's picture

16 Apr 2021 - 4:32 pm | मराठी कथालेखक

ह्युंदाई व्हेन्युचा कुणाचा काही अनुभव आहे का ? नेक्सन व व्हेन्यु यांची तुलना करुन कुणी लिहू शकेल काय ?