गीताई माऊली माझी...

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
22 Jan 2018 - 1:20 am

​आचार्य विनोबा भाव्यांनी त्यांच्या आईला गीता ऐकण्याची इच्छा होती पण संस्कृत येत नव्हते म्हणुन, श्रीमद्भगवद्गीतेचे "गीताई"च्या रुपाने मराठीकरण केले. ते करताना, मूळ श्लोक आणि त्यांचे छंद वगैरे जसेच्या तसे ठेवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. गंमत म्हणजे आईच्या प्रेमापोटी गीता मराठीत आणली पण त्याच गीतेस पण आई समजत त्यांनी सुरवातीस एक चांगला श्लोक लिहीला आहे:

गीताई माऊली माझी |
तिचा मी बाळ नेणता |
पडता रडता घेई, उचलूनी कडेवरी ||

आता ज्यांना भाषेचे आणि वाड्गमयातील किंचीत देखील समजत असेल त्यांना सहज समजेल की यात विनोबा काही स्वतःच्या आईला नाकारत गीतेस आई म्हणत नाहीत का वयाने मोठे झाले असले तरी त्यांना कोणी काही धडपडले म्हणून कडेवर घेतले नाही. काही गोष्टी या रुपकात्मक असतात. त्या निव्वळ अधुनिक काव्यात अथवा शेरोशायरीतच शोधायच्या असतात असे नाही, तर त्या किमान भारतीय अथवा हिंदू तत्वज्ञान वाचत असताना देखील समजून घेणे गरजेचे असते. अर्थात तसे न घेणारे हे एकतर समजशक्तीची मर्यादा असलेले भावनात्मक व्यक्ती असतात अथवा कितीही समजू शकत असले तरी, मुद्दामून रुपक सोडुन त्यातील काही प्रमाणात वाच्यार्थ लावत, सामान्यांच्या डोळ्यात धूळ फेकणारे आणि उंटाप्रमाणे तिरका चालण्याचा अंतस्थ हेतू बाळगणार्‍या व्यक्ती असतात. पण ते जाउंदेत...

लहानपणी विनोबांच्या वरील पंक्तीं वाचल्यावर वाटले की नक्की इतके त्यांना गीतेबद्दल कशाबद्दल वाटले असावे? गीता, काहींना धर्मग्रंथ वाटत असेल, म्हणजे देवासमोर वाचून त्याची नंतर पुजा करून फुले वाहणे वगैरे, तर काहींना तो तत्वज्ञान सांगणारा ग्रंथ वाटतो. माझ्या सारख्या सामान्यास तो तत्वज्ञान सांगणारा हिंदू धर्मातील एक ग्रंथ वाटतो, ज्यात उपनिषदांचा सारांश आहे. तो महाभारताच्या कुरूक्षेत्रावर श्रीकृष्णाने शब्दशः अर्जुनास सांगितला असेल हे कधीच शक्य वाटत नाही. पण व्यासांनी महाभारत लिहीताना त्यांच्या प्रतिभेचा वापर करून तो कृष्णार्जून संवाद संकलीत केला असे नक्की वाटते. आता तसा संवाद झाला होता का, महाभारत खरे का खोटे हा मुद्दा एकतर दुधखुळेपणाचा तरी आहे अथवा "वेडा बनून पेढा खात विषयांतर करण्याचा आहे!" तेंव्हा त्याकडेपण दुर्लक्ष करूया. कारण गीता हा ग्रंथ आहे हे वास्तव आहे. तसेच तो ऐन वेळेस गलितगात्र झालेल्या अथवा किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जूनास त्याच्या कर्तव्यास प्रवृत्त करण्यासाठी झालेला संवाद, हा नंतर विस्ताराने सांगण्यासाठी झालेला आहे.

विनोबांनी म्हणूनच गीतेचे वर्णन करत असताना, "पडता रडता घेई, उचलूनी कडेवरी" असे म्हणले आहे. तेच लोकमान्य टिळकांना जाणवत होते. की पब्लीक काम आणि कर्तव्य करण्याऐवजी कारणे देत गलीतगात्र होत परीस्थितीशी दोन हात करायला तयार होत नाहीत. त्यासाठी मंडालेला सहा वर्षे राहत असताना "आता काय करावे" अर्थात "किंकर्तव्यमूढ" न होता त्यांनी गीतारहस्य लिहीले आणि त्या पुस्तकाच्या सुरवातीस गीतेतीलच संदर्भ देत आपल्याला काय सांगायचे आहे, हे थोडक्यात सांगितले:

तस्माद्सक्तः सततं कार्य कर्म समाचर| असक्तो याचरन् कर्म परमाप्तोती पुरुषः ||३-१९||

अथवा गीताईच्या भाषेतः

म्हणुनी नित्य नि:संग करी कर्तव्य कर्म तू| नि:संग करीता कर्म कैवल्य-पद पावतो ||३-१९||

थोडक्यात कर्म करण्यावर आणि ते देखील निंसंगवृत्तीने (dispassionately) कर्तव्यरुपी कर्म करण्यावर भर दिला. गीतेच्या चाहत्यांमधे जसे टिळक, विवेकानंद, गांधीजी, विनोबा आदी अनेक स्वातंत्र्य चळवळीचे पुढारी, सैनिक तसेच नंतरच्या काळातले समाजसुधारक होते तसेच हेन्री डेव्हीड थरो, ओपनयहायमर, ब्रिटीश लेख ऑल्डस ह्क्सले आदी अनेक होते. या आणि अशा अनेकांची गत ही गीता वाचून भांग प्यायल्या सारखी न होता, त्यातून उर्जा मिळून उत्साह मिळण्यात का झाली असावी, असा मला प्रश्न पडतो...

परत उत्तर तेथेच जाते, की त्यांना कदाचीत कुठेतरी जाणवले असावे की "पडता रडता घेई, उचलूनी कडेवरी". अर्थात, जेंव्हा मनात द्वंद्व तयार होत असेल अथवा शंका तयार होत असतील तेंव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी, गीतेत ज्याला ज्ञान म्हणले आहे आणि जो ज्ञानप्राप्तीचा मार्ग म्हणला आहे तो मिळाला असावा. अर्थात अशांच्या दृष्टीने गीता हे action document आहे,मार्गदर्शक आहे, निव्वळ पोथी नाही!

कदाचीत याचे अंशत: उत्तर हे गीतेतील कर्मयोग कथनाच्या चौथ्या अध्यायाच्या शेवटाला असलेल्या ज्ञानप्राप्तीच्या उहापोहात असेलः

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते | तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति || ४-३८||

अथवा

ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी | योग युक्त यथाकाळी ते पावे अंतरी स्वये || ४-३८||

पण मग असे ज्ञान मिळावयचे कसे, गीता म्हणते,

श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: | ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति || ४-३९||

अथवा

श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी, नित्य सावध ज्ञानाने शिघ्र तो पावे, शांती शेवटची मग || ४-३९||

अर्थात, ज्ञान मिळवत असताना, तो मिळवण्याच्या मार्गावर श्रद्धा हवीच पण ती कशी तर संयामाने, नित्य सावधपणाने. अशा प्रकारे ज्ञान मिळवल्यास शांती मिळते. पण श्रद्धा म्हणजे काय इथेच अडकून पडणार्‍या, पक्षी: कर्म न करता नुसताच वाद घालत बसणार्‍या संशयात्म्यांच्या बाबतीत हे शक्य नसते. म्हणून पुढे लिहीले आहे:

अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति। नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः।।४-४०।।

अथवा

नसे ज्ञान नसे श्रद्धा, संशयी नासला पुरा | न हा लोकं, न तो लोकं, न पावे सुख संशयी || ४-४०||

हा श्लोक हा सर्वत्र लागू आहे. व्यावहारीक आहे. कालातित आहे! पण असे व्यवहारात आणि परमार्थिक अर्थाने देखील यशस्वी होयचे असेल तर, पुढचा श्लोकात गीता म्हणते... इथे एक लक्षात ठेवले पाहीजे की संशय हा नकारात्मक विचारातून येतो तर सावधपणा हा डोळस विचारातून येतो. जसा उपनिषदात गुरूशिष्य संवाद करताना शिष्य डोळसपणे गुरूला प्रश्न विचारतो तसे. तरी देखील, सावधपणा आणि संशयातील रेषा पुसट आहे त्यामुळे तेथे पण सावध रहावे लागते! ... असो.

योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसंछिन्नसंशयम्। आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय।।४-४१।।

किंवा

योगाने झाडीली कर्मे ज्ञाने सम्शये तोडीले | जो सावधान आत्म्यात, कर्मे त्यास न बांधिती ||४-४१||

आणि शेवटी म्हणले आहे,

तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनाऽऽत्मनः। छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत।।४-४२।।

अथवा

म्हणूनी अंतरातील अज्ञान-कृत संशय| तोडुनी ज्ञान-खड्गाने उठ तू योग साधुनी ||४-४२||

चौथ्या अध्यायातील शेवटचे वरील दोन्ही श्लोक हे अर्जुनाला आणि वाचकाच्या मनातील अर्जुनाला जागे आणि सावध करण्यासाठी आहेत. मनातले अज्ञान आणि संशय काढून टाक (संशय काढ, सावधपणा-डोळसपणा नाही!) आणि तो कसा तर ज्ञानरुपी खड्गाने...

वर उल्लेख केलेल्या महान व्यक्तींनी गीतेतून प्रेरणा घेत स्वतःचे समाजाला पुढे नेण्याचे ध्येय पूर्ण केले. तसे म्हणाल, तर कुठल्याही तत्वज्ञान (philosophical) ग्रंथातले, इतिहासातले, समाजकारणातले, राजकारणातले बघताना, वाचताना, सावधपणे निवडून स्फुर्ती/प्रेरणा घेता येऊ शकते, अथवा मागचे पुढचे न वाचता, असंबद्ध चिवडत, स्वतःतली संशयी वृत्ती आणि परीणामी नैराश्य वृद्धींगत करता येऊ शकते.

संयमाने आणि सावधपणे ज्ञानप्राप्तीचा मार्ग घेयचा का संशयात्मा होऊन उगाच बोटे मोडत नैराश्याला आमंत्रण करायचे, ही ज्या-त्या व्यक्तीची जडणघडण आहे.

धर्मइतिहासवाङ्मयसमाजजीवनमानविचारप्रतिभा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

22 Jan 2018 - 9:35 am | आनन्दा

निव्वळ सुंदर लेख.. फक्त जर यातून टीकात्मक वाक्ये वेगळी काढता आली असती तर तो याहून जास्त उंचीवर गेला असता असे नमूद करावेसे वाटते..

मूकवाचक's picture

22 Jan 2018 - 10:05 am | मूकवाचक

अप्रतिम लेख! (लेखात असलेली टीकात्मक वाक्येदेखील समयोचित वाटली).

सस्नेह's picture

22 Jan 2018 - 3:05 pm | सस्नेह

सरल सुगम लेख. पण संशायात्म्यांच्या उल्लेखाने निष्कारण वाकड्यात शिरला आहे...

पुंबा's picture

22 Jan 2018 - 10:25 am | पुंबा

लेख आवडला.

गीता भारतीय मनीषा के मानसरोवर मे खिला हुआ वह कमल है, जिसकी आभा में सदीयों का फेरा नये नये रंग जोडता चला गया है. - ओशो

गीता निव्वळ पारमार्थीक उपदेशांचं भेंडोळं नाही किंवा तत्वज्ञानाचा उहापोह नाही तर भारतीय मानस शतकानुशतके कश्या प्रकारे जीवनाकडे पाहू लागले त्याचा इतिहासदेखिल आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2018 - 12:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख !

लेखातले विश्लेषण जेवढे माहितीपूर्ण आहे तितकीच टीकात्मक वाक्येही चपखल आहेत. पण, "ते काहीही असो, पण माझाच्च शब्द अंतीम" अशी ठाम मानसिक घडण असणार्‍यांवर त्याचा फार परिणाम अपेक्षित नाही. :(

संयमाने आणि सावधपणे ज्ञानप्राप्तीचा मार्ग घ्यायचा का संशयात्मा होऊन उगाच बोटे मोडत नैराश्याला आमंत्रण करायचे, ही ज्या-त्या व्यक्तीची जडणघडण आहे.

स्वयंघोषित पुरोगाम्यांची (खर्‍या पुरोगाम्यांची नव्हे) खरी गोची अशी असते की त्यांची मनःस्थिती दुसर्‍या प्रकारची असते... त्यामुळे ते स्वतः सुखी होत नाहीत आणि दुसर्‍यांनाही सुखाने राहू देत नाहीत.

एखाद्या गोष्टीवर टीका करण्यासाठी ती गोष्ट, (अ) स्वतःला पटत नाही किंवा (आ) स्वतःच्या विचारसरणीच्या किंचित का होईना पण विरोधी आहे, या दोनपैकी एक कारण त्यांना पुरेसे असते. 'शास्त्रिय विचार करणारा' असा स्वतःसंबंधी (दुरा)ग्रह असणार्‍या या लोकांना, एखाद्या गोष्टीवर टीका करण्याअगोदर, "आपल्याला तिच्यासंबंधी अगदी सांगोपांग माहिती नसली तरी, आपल्या टीकेवर इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देण्याइतपत किमान माहिती व धैर्य असावे", हा शास्त्रिय दंडक पाळण्याची गरज वाटत नाही ! "दगड मारून, (अ) पळून जाणे किंवा (आ) दुरून इतरांची गंमत पाहत बसणे आणि (इ) केवळ आपल्याला पाठिंबा देणार्‍याबद्दल गोड/आभारप्रदर्शक शब्द व्यक्त करणे व (ई) आपल्या म्हणण्यावर प्रश्न उभे करणार्‍यांचा अपमान करून त्यांना हतोत्साह करणे" अश्या बनेलपणाच्या कृती त्यांच्या लेखी "हुशारी" असतात !?

काही स्वयंघोषित पुरोगाम्यांच्या स्वभावाचा "काकदृष्टी" हा मूलधर्म कधी कधी (की बर्‍याचदा ?) इतका विकोपाला गेलेला असतो की, रोज एखादे (खरे / बनावट / राईचा पर्वत करणारे / नसलेली राई कल्पून तिचा पर्वत बनवणारे / गैरसोईच्या पर्वताला राई बनवणारे / गैरसोईचा पर्वत आस्तित्वातच नाही असे ठासून म्हणणारे) खुसपट काढून दुसर्‍याला खट्टू केल्याशिवाय त्यांच्या गळ्यातून घास खाली उतरत नाही. (खरे तर, हा, इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा अत्यंत केविलवाणा प्रकार असतो आणि त्याबद्दल माझ्या मनात प्रचंड करुणा आहे.) :(

मुख्य म्हणजे, आपली विचासरणी शास्त्रिय असल्याचा दावा करत असतानाच, आपल्या म्हणण्यासंबंधीचे पुरावे अथवा तर्क देणे (जो शास्त्राचा मूलाधार आहे) त्यांना आवश्यक वाटत नाही. त्याबद्दल विचारणा केल्यास ते तो स्वतःचा अपमान समजतात आणि प्रश्न विचारणार्‍यांना अपशब्दांनी अपमानित करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, असे समजतात (जे तद्दन असभ्यपणाचे, (uncivil) लक्षण आहे). सर्वात मोठा विनोद म्हणजे, त्यांचे हे अशास्त्रिय आणि असभ्य वागणे एखाद्या भोंदू बाबाला (ज्याच्याशी त्यांचे हाडवैर असल्याचे ते सतत घोकत असतात) शोभून दिसेल असेच असते !

यामुळेच, (अ) सामाजिक व वैयक्तिक मानसशास्त्राची किमान जाण आणि (आ) शास्त्रिय दंडकांची किमान जाण, या दोन गोष्टीचा ज्यांच्यात मोठा अभाव आहे अश्या व्यक्ती समाजसुधारणा करण्यात अयशस्वी ठरतात. ते "दुसर्‍यांच्या निष्फळ कुरापती काढून स्वतःचा अहंकार कुरवाळत बसणे आणि त्यामुळे लोकांच्या चेष्टेचे/तिरस्काराचे धनी होणे" या वैयक्तिक पायरीवरच अडखळत राहतात. याचा पुढचा परिणाम ते अधिक निराश होण्यात आणि अहंकार (इगो) दुखावल्याने अधिकाधिक कुरापती काढण्यात होतो... व हे दुष्टचक्र वेळेबरोबर मोठे मोठे होत जाते. परिणामी, ते स्वतः सुखी होत नाहीत आणि दुसर्‍यांनाही सुखाने राहू देत नाहीत.

प्राची अश्विनी's picture

22 Jan 2018 - 12:28 pm | प्राची अश्विनी

लेख आवडला.

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2018 - 3:17 pm | श्रीगुरुजी

सुंदर लेख!

परंतु लेख अपूर्ण वाटला. अजून विश्लेषण हवे होते.

यश राज's picture

22 Jan 2018 - 3:35 pm | यश राज

अप्रतिम...+++१

लेख आणि डॉ.म्हात्रे ह्यांचा प्रतिसाद आवडला...

विकास's picture

23 Jan 2018 - 4:11 am | विकास

वाचक - प्रतिसादकर्त्यांचे आभार!

@ आनन्दा: टिकात्मक वाक्ये काढण्याचा मोह होत होता. पण तो मोह वाटला म्हणून टाळला! :) जोक अपार्ट... ज्यांनी वाचला त्यांना त्या (टिकात्मक) स्पष्टीकरणाची गरज नव्हती, आपसुकच कळले असेल. आणि ज्यांना उद्देशून लिहीले त्या बाबतीत सांगून काही उपयोग होण्याची शक्यता नाही... (पक्षी: पालथ्या घड्यावर, का काय म्हणतात ते! ;) ). तरी सुद्धा जे काही निमित्त होते, ते स्पष्ट करणे देखील गरजेचे वाटले.

शिवाय काय आहे, सध्या (म्हणजे गेल्या शतकापासून!) आपल्या, म्हणजे भारतीय समाजाला, असंदर्भ (आउट ऑफ कॉन्टेक्स्ट) लिहायची, बोलायची आणि त्यातून दुसर्‍यास तुच्छ लेखायची सवय झालेली आहे. मिपावर आणि इतरत्र बर्‍याचदा जे काही बघतो ती त्याच वृत्तीची फळे असतात. येथे मी कुणा एकाची बाजू घेऊ इच्छीत नाही, आणि म्हणूनच "आपल्या, म्हणजे भारतीय समाजाला" असे म्हणतोय. पण जेंव्हा असे कुठलेसे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट गीतेवर लिहीले जाते, ज्या गीतेतून शतकानुशतके अनेकांनी स्फुर्ती घेतली, तेंव्हा असे लिहीणार्‍यांच्या एकतर उद्देशांबद्दल नाहीतर विचार करण्याच्या कुवतीबद्दल शंका येऊ लागते. (प्रस्तुत घटनेत, आधीची शक्यता आहे असे मला वाटते!). बरं, गीता काही एका पक्षाची नाही, संघटनेची नाही, व्यक्तीची नाही किंवा एकाच विशिष्ठ समाजाची नाही, तर अख्या भारतवर्षाची आहे. भारतीय तत्वज्ञानाच्या विचारमंथनातून निघालेले अमृत आहे. त्याच्यावरपण उगाच काहीतरी फुटकळपणे नावे ठेवत लिहीलेले वाचले की राग येत नाही, पण कीव येते. अशा वेळेस, थुंका काय थुंकायचे ते सुर्यावर, असे म्हणावेसे वाटते. असो.

पाश्चात्य विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा चांगला आणि वाईट उपयोग करणारे इतिहासात पानोपानी दिसतील. असे अनेक, विशेष करून वैद्यकशास्त्रातील (औषधी) शोध आहेत, जे नंतर आरोग्यासाठी योग्य नसल्याचे जाणवले आहे. कधी कधी तर हवे तसे निकष ठरवून "वैज्ञानिक" संशोधन झालेल्या गोष्टी आहेत. पण म्हणून ते विज्ञान वाईट ठरत नाही तर त्याचा दुरुपयोग करणारे हिंस्त्र, विकृत अथवा अजून काही शेलकी विशेषणे लावता येतील असे ठरतात. तेच अनेकदा तत्वज्ञानाच्या संदर्भात असते. भोंदू अनेक निघाले म्हणून तत्वज्ञानच वाईट म्हणणे याला काही अर्थ नाही! अर्थात हे झोपलेल्या उठवून सांगता येईल.

एखाद्या हिंदी गीतकाराला, म्हणूनच "जीतलो मन को पढकर गीता, मन ही हारा तो क्या जीता" असे म्हणताना ना धर्म दिसतो, ना अंधश्रद्धा... बर्‍याचदा असे वाटते की जशी काहींना आध्यात्म अथवा तत्वज्ञानाची नशा असते तशीच काहींना (का अनेकांना?) अधुनिकतावादाची नशा असते. आणि अशा नशेत "अहं"पणा मिसळला की जे काही कॉकटेल तयार होते, ते प्राशन करणार्‍याबद्दल... काही विचारू नका महाराजा! असो.

गीता हे अक्षर वाड्मय आहे. सहस्त्र+ वर्षांनी देखील त्याचा क्षर झालेला नाही. तसेच जी व्यक्ती त्याचे मनापासून, पक्षी: डोळे आणि डोके उघडे ठेवून, जीवनाचे तत्वज्ञान म्हणून वाचन करते तिला त्यातून स्वतःपुरता काहीतरी मार्ग मिळू शकतो... आणि त्या अर्थाने देखील ते अक्षर आहे कारण माणसाचा नाश होऊं देत नाही.

"सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे..." आणि मग सरते शेवटी, "अंधाराचे पाश मनाचे हे गळुनी जावे" या बालकविंच्या ओळी नुसत्या बालविहगापुरत्या आहेत असे समजून, एखादा वाचून सोडू शकतो, अथवा त्यातून स्वतःसाठी संदेश घेऊन स्फुर्तीने स्वतःपुरता सक्रीय होऊ शकतो. अथवा एखादा "चैतन्य" वगैरे सगळे थोतांड आहे असे म्हणत भरकटू शकतो! म्हणूनच असे वाटते की, हे शेवटी ज्याच्या त्याच्या जडणघडणीवरच अवलंबून असते.

सुखीमाणूस's picture

23 Jan 2018 - 6:22 am | सुखीमाणूस

खूप सुंदर

मूकवाचक's picture

23 Jan 2018 - 8:42 am | मूकवाचक

गीता प्रबोध या ग्रंथातला एक परिच्छेद आठवला -

गीताशास्त्राच्या ज्ञानबिंबाचा उदय पाहून अनंत साधकगण जीवन नावाच्या पोकळीत निर्भयपणे झेपावतात. स्वामी विवेकानंद! मोठा गोड जीव! गीतेच्या कुशीतून तो बाहेर आला व जगाला तेजाळून, लखलख करीत स्वात्मरत झाला. स्वामी रामतीर्थ उंच आकाशात स्वानंदाची लकेर उठवीत, ही भगवद्वाणी गाऊ लागले. दयानंद सरस्वती उल्हास करीत आर्यपुत्रांचे ब्रह्मवर्चस सांगून गेले. लोकमान्य टिळक कर्तव्याचा चाप स्कंधी धारण करून गुलामीचे सारे साखळदंड तोडते झाले. महात्मा गांधी तर या गीतेच्या शब्दांचा - अक्षरांचा नवा बहर देऊन निजधामी गेले. तो पुरूषशार्दुल विनोबा या गीता सिंहीणीचे अमृतमय दूध पिऊन गर्जना करीत, सारा भारतवर्ष पावन करण्यासाठी मस्त निर्भय व निरामय होत परिभ्रमण करून गेले! किती महात्मे सांगू? ज्ञानोबा तर या भयावह भवसागरीचा प्रज्वलित दीपस्तंभच या गीतेने निर्माण केला. एकनाथांनी आपले ह्रूदयाकाश प्रेमाने भरून त्यात जगच साठविले. अशा या गीतेच्या उद्भवासरशी या जगातील पाप - ताप दूर झाले. आता जोवर गीता आहे तोवर दु:खाचे लोळ या गीता - पुत्रांच्या जीवनात नाहीत! जो गीताशरण झाला त्याला त्या घनःश्यामाने आपल्या हृदयी साठविलाच म्हणून समजा!

- श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर

मूकवाचक's picture

23 Jan 2018 - 8:42 am | मूकवाचक

गीता प्रबोध या ग्रंथातला एक परिच्छेद आठवला -

गीताशास्त्राच्या ज्ञानबिंबाचा उदय पाहून अनंत साधकगण जीवन नावाच्या पोकळीत निर्भयपणे झेपावतात. स्वामी विवेकानंद! मोठा गोड जीव! गीतेच्या कुशीतून तो बाहेर आला व जगाला तेजाळून, लखलख करीत स्वात्मरत झाला. स्वामी रामतीर्थ उंच आकाशात स्वानंदाची लकेर उठवीत, ही भगवद्वाणी गाऊ लागले. दयानंद सरस्वती उल्हास करीत आर्यपुत्रांचे ब्रह्मवर्चस सांगून गेले. लोकमान्य टिळक कर्तव्याचा चाप स्कंधी धारण करून गुलामीचे सारे साखळदंड तोडते झाले. महात्मा गांधी तर या गीतेच्या शब्दांचा - अक्षरांचा नवा बहर देऊन निजधामी गेले. तो पुरूषशार्दुल विनोबा या गीता सिंहीणीचे अमृतमय दूध पिऊन गर्जना करीत, सारा भारतवर्ष पावन करण्यासाठी मस्त निर्भय व निरामय होत परिभ्रमण करून गेले! किती महात्मे सांगू? ज्ञानोबा तर या भयावह भवसागरीचा प्रज्वलित दीपस्तंभच या गीतेने निर्माण केला. एकनाथांनी आपले ह्रूदयाकाश प्रेमाने भरून त्यात जगच साठविले. अशा या गीतेच्या उद्भवासरशी या जगातील पाप - ताप दूर झाले. आता जोवर गीता आहे तोवर दु:खाचे लोळ या गीता - पुत्रांच्या जीवनात नाहीत! जो गीताशरण झाला त्याला त्या घनःश्यामाने आपल्या हृदयी साठविलाच म्हणून समजा!

- श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर

प्रत्यक्षातून प्रतिमा उत्कट..
लाखापेक्षा सुद्धा ही प्रतिक्रिया बाप आहे.

जिओ!

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jan 2018 - 10:52 am | ज्ञानोबाचे पैजार

जगण्याचे साधे सोपे तत्वज्ञान गीतेमधे सांगितले आहे. त्याच मूळे अनेकांनी या गीतावृक्षाच्या पारावर आपली पथारी पसरली आहे. मराठीतच सुध्दा ज्ञानोबारायां पासून ते लोकमान्य, विनोबांपर्यंत सार्‍या दिग्गजांना तिने भुरळ पाडलेली दिसते.

विनोबा भावे वर्ध्याच्या तुरुंगात बंदीवान असताना त्यांनी तेथे गीतेवर प्रवचने केली. त्याच तुरुंगात बंदी असलेलया साने गुरुजींनी ती लिहून घेतली. नंतर त्याचे नंतर पवनार आश्रमाच्या वतीने त्याचे पुस्तक काढण्यात आले. विनोबांनी अत्यंत सोप्या भाषेत गीतेचे सार या प्रवचनांमधुन सांगीतले आहे.
या पुस्तकाचे नंतर अनेक भाषांमधे भाषातर झाले.

व्यक्तीशः मला हे पुस्तक अतिशय आवडले. एकदा हातात घेतल्यावर झपाटल्या सारखे वाचून काढले होते.

पैजारबुवा,

अर्धवटराव's picture

24 Jan 2018 - 5:44 am | अर्धवटराव

विकासरावांसारख्या नेमस्तांनी आपली स्थितप्रज्ञता सोडावी इतका कर्कश्य वाजतोय का रेडीओ... :)

असो. श्रद्धा (ज्याला शुद्ध मराठीत रेडीनेस ऑफ रिसेप्टिव्हीटी म्हणतात) विरुद्ध शंकेखोर वृत्ती (अतिशुद्ध मराठीत ज्याला स्पेक्युलेशन म्हणतात) असा मामला आहे. आपली पुरोगामित्वाची रग जिरवायची, शिवाय गीतेवर टिकात्मक वगैरे लिखाण करुन शंकराचार्य, ज्ञानोबा, टिळक इ. मंडळींच्या मांदियाळीत जाउन बसायची हौस भागवायची म्हटल्यावर विवेक वगैरे क्षुल्लक गोष्टींना थारा कोण देणार.

बाकी लेख फक्कड जमलाय हो विकासराव. आता थोडं इंद्रप्रस्थ युगातुन दिल्ली युगात या. केजरीभौंची चळवळ परत सुरु होणार आहे. महाराष्ट्रात सेनेनी भाजपाशी काडीमोड नक्की केलाय. चव्हाणद्वय आणि पवारद्वय मैत्रीच्या आणाभाका लवकरच घेणार असं दिसयत. आणि तिकडे गुर्जरदेशी दिडशेचा आकडा शंभरीदेखील गाठु शकला नाहिए. कर्नाटकी संगीतात फार काहि आशेचा सुर ऐकायला येत नाहिए... या पार्श्वभूमीवर मोदि-शहा आपला सल्ला ऐकायला उत्सुक आहेत असं कानावर आलं आहे :)

मारवा's picture

26 Jan 2018 - 4:13 pm | मारवा

श्रद्धा (ज्याला शुद्ध मराठीत रेडीनेस ऑफ रिसेप्टिव्हीटी म्हणतात) विरुद्ध शंकेखोर वृत्ती (अतिशुद्ध मराठीत ज्याला स्पेक्युलेशन म्हणतात) असा मामला आहे. आपली पुरोगामित्वाची रग जिरवायची, शिवाय गीतेवर टिकात्मक वगैरे लिखाण करुन शंकराचार्य, ज्ञानोबा, टिळक इ. मंडळींच्या मांदियाळीत जाउन बसायची हौस भागवायची म्हटल्यावर विवेक वगैरे क्षुल्लक गोष्टींना थारा कोण देणार.

तुमचा शंकेखोर वृत्ती वरील आक्षेप त्याच्या अतिरेकाकडे कदाचित निर्देश करीत असावा. कदाचित तुम्हाला या संदर्भातील काही नकारात्मक अनुभव असावा.
परंतु क्रिटीकल स्कील्स असणे क्रिटीकल क्वेस्चनींग ची आवश्यकता व तिचे स्थान फार महत्वाचे आहे. या संदर्भात बर्ट्रांड रसेल ची मांडणी दाखवणारा पटकन दाखवण्याजोगा हा परीच्छेद कदाचित उपयुकत ठरावा असे मला प्रामाणिकपणे वाटते.

Such critical skills, grounded in knowledge, include: (i) the ability to form an opinion for oneself, (5) which involves, for example, being able to recognize what is intended to mislead, being capable of listening to eloquence without being carried away, and becoming adept at asking and determining if there is any reason to think that our beliefs are true; (ii) the ability to find an impartial solution, (6) which involves learning to recognize and control our own biases, coming to view our own beliefs with the same detachment with which we view the beliefs of others, judging issues on their merits, trying to ascertain the relevant facts, and the power of weighing arguments; (iii) the ability to identify and question assumptions, (7) which involves learning not to be credulous, applying what Russell calls constructive doubt in order to test unexamined beliefs, and resisting the notion that some authority, a great philosopher perhaps, has captured the whole truth

शिवाय गीतेवर टिकात्मक वगैरे लिखाण करुन शंकराचार्य, ज्ञानोबा, टिळक इ. मंडळींच्या मांदियाळीत जाउन बसायची हौस भागवायची म्हटल्यावर

आता राजीव साने गीतेचे विश्लेषण करतात तर मी तरी असे म्हणणार नाही की ही हौस आहे
आपण हे व्याख्यान जरुर ऐकावे अशी विनम्र शिफारस करतो.

हे गीतेवरील अप्रतिम असे व्याख्यान आहे. साने यांचे विश्लेष व व्यासंग थक्क करणारा आहे.
https://www.youtube.com/watch?v=drwrrWyLoGg