बरान
माझिद माझ्दी हा माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक. कलर ऑफ पॅरेडाइज, चिल्ड्रन ऑफ हेवन, द फादर अशा सगळ्याच कलाकृतींचा मी प्रचंड चाहता आहे. माझ्या तेहेरानच्या वास्तव्यात माझी या असामीची भेट होऊ शकली नाही याची अजुनही मला हुरहूर वाटते.
त्यांच्या सर्व कलाकृतींमधे माझी विशेष आवडती फिल्म म्हणजे 'बरान'
रशिया - अफगाण युद्धामधे विस्थापीत झालेले अफगाणी निर्वासीत लोक लपूनछपून तेहेरान बाहेरच्या निर्वासीतांच्या छावण्यांमधून दुर्दैवाचे दशावतार भोगताहेत. इराणमधे त्यांना कामासाठी येण्याची मुभा आहे पण अनेक नोंदी करून आणि ओळखपत्र मिळवूनच. इराणमधे राहण्याचीही अनुज्ञा नाहीच, दिवसभर काम करून संध्याकाळी छावणीत परत. याशिवाय अनेक अफगाणी निर्वासीत ओळखपत्राशिवाय अनधिकृतपणे तेहरानच्या जवळपास अगदी तुटपुंज्या मोबदल्यावर काम करून लपुनछपून दिवस काढतायत. स्वदेशापासून तुटलेली आणि त्यामुळेच आपापसात ऋणानुबंध तयार झालेली माणसे..
अशाच एका मोठ्या इमारतीच्या बांधकामावर अनेक अफगाणी अनधिकृतपणे काम करताहेत, एक इराणी मुलगा याच बांधकामावर चहा देणे, जेवण बनवणे इत्यादी आरामाची कामे करून दिवस काढतोय. तिथल्या इराणी - अफगाणी कामगारांना टोमणे मारणे, पक्ष्यांना दगडं मारणे, काहीसा उडाणटप्पूपणा करणे ह्या सगळ्या मधे 'लतीफ' चे दिवस आरामात चाललेत.
अचनक एके दिवशी एक अफगाणी मजूर नजाफ याला बांधकामावर अपघात होउन दवाखान्यात जावं लागतं, आणि पुन्हा आपल्यासमोर त्या विदीर्ण आयुष्यातले कष्ट आणि अपरिहार्य दु:ख चमकून जातं. दुसर्या दिवशी नजाफचा मुलगा रहामत त्याच्याऐवजी कामावर येतो. नजाफसारखंच कष्टाचं काम करण्याचा तो बिचारा प्रयत्न तो करतोही पण गरीब चेहेरा आणी अशक्तपणामुळे त्याला कष्टाचं काम न देता लतीफचं आरामशीर काम देण्यात येतं आणि आपल्या लतीफवर पुन्हा विटा आणि पोती उचलायची वेळ येते.
चिडलेला लतीफ रहमतचं जिणं अवघड करून टाकतो, त्याला हरप्रकारे त्रास देतो, पण रहमत चकार शब्द न बोलता आपलं काम करतच रहातो. या सगळ्या घटनाक्रमात आपल्याला लतीफचा राग अजिबात येत नाही, उलट आपल्या जाणवत राहतं ते महाग होणार मानवी आयुष्य. त्या सगळ्याच घटनांची अपरिहार्यता आणि हतबलता..
अचानक एका संतापाच्या क्षणी लतीफला हे कळतं की रहमत हा मुलगा नसून मुलगी आहे, आणि वडिलांच्या गरीबीला हातभार लावण्यासाठी हे अवघड काम ती करतेय. लतीफच्या चेहेर्यावरचे भाव बदलत जातात. अपराधीपणा, करूणा, संताप अशा अनेक छटामधून एका कोवळ्या निरागस नात्याचा अंकूर जन्म घेतो.
अकस्मात कथा एक करूण वळण घेते, बांधकामावरून सर्व अफगाण मजूरांना हाकलून द्यावं लागतं आणि रहमतही परागंदा होतो/ते.. लतीफचा अस्वस्थ करणारा शोध सुरू होतो 'रहमत'साठी म्हणजेच खर्या 'बरान'साठी...
त्यापुढचा सगळा प्रवास केवळ स्तब्ध करणारा, मानवी भावनांचे खोल पण ओळखीचे रंग अधीक गहिरेपणाने जाणवून देणारा....
नियती नावाच्या हरामखोर श्वापदाचा सतत संताप येत रहातो. प्रत्येक व़ळणावर असंख्य प्रश्न उभे रहातात. उत्तरासाठी आपली तडफड चालू रहाते..
कथेच्या ओघात अनेक पात्रांच्या तोंडून काही क्रूर पण शाश्वत सत्यं समोर येतात, आयुष्याचं तत्वज्ञानही इतक्या भयाण पणानं समोर येत रहातं.. आपली घालमेल होतंच रहाते... प्रेमाचा अर्थ जाणवतो आणि वैयर्थही..
आणि ह्या सगळ्याच्या पाठिमागे युद्धाची पार्श्वभूमी एखाद्या कातर करणार्या सारंगीच्या खोल स्वरासारखी सतत जाणवत राहाते, काळीज पोखरत रहाते...
कथेचा सगळ्यात अप्रतीम भाग म्हणजे शेवटच्या दॄष्यामधील प्रेमाचा आश्वासक स्वर.. रहमतच्या गालावरचं हलकं पुसटसं स्मित.. प्रीतीचा इतका हळुवार संवाद... आणि शेवटी कोसळणारा 'बरान' म्हणजेच 'पाउस'
युद्धाच्या रखरखीत वाळवंटात भिरकवली जाणारी आयुष्याची लक्तरं आणि त्याच विदीर्ण पार्श्वभूमीवर एक सोनेरी हळूवार अल्लड प्रेमकथा ही आवर्जून पहावी अशीच आहे...
माझे इराणमधले अनुभव इथे वाचता येतील.
वाचने
4165
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
ह्या सिनेमाबद्दल आधीही वाचले होते... कथा अतिशय टचिंग आहे. धन्यवाद.
सिनेमा छान आहे.
असेच उत्तमोत्तम चित्रपटांचे परिक्षण येउ द्या.
माझिद माझ्दी यांच्या दिग्दर्शनाबद्दल श्री. चिंतातूर जंतू यांची काही लिहावे अशी त्यांना विनंती करतो.
सहज आणि यशोधरा यांच्याशी सहमत आहे.
पहिला पाहिजे हा सिनेमा
आमच्या हॉटेलात हे अफगाणी असेच तुटपुंजा पैशासाठी काम करतात (एकच सुदैव म्हणजे ते येथे रेफ्युजी म्हणून आहेत .त्यांच्याशी मी मुद्दाहून संवाद साधतो .मायभूमीत त्यांनी त्यांच्या जन्मापासून रशियन .अमेरिकन भारतीय व पाकिस्तानी फौजा पहिल्या आहेत .त्यांचे अनुभव व जीवनाचे तत्व मुल्ये सारेच अचाट
सुधीर काकांनी सल्ला दिल्यानुसार (फतवा काढला ) मी जमेल तसे त्यांचे अनुभव नक्की लिहीन .
सध्या वेळात वेळ काढून हा सिनेमा फुकटात कसा पाहता येईल ह्याचा शोध घेणे आहे .
In reply to पहिला पाहिजे हा सिनेमा आमच्या by निनाद मुक्काम …
कृपया तुमच्या स्वाक्षरीच्या वाक्याच्या आधी काहीतरी एक आडवी रेघ, नक्षीकाम वगैरे करा हो. तुमच्या नियमीत बदलत्या स्वाक्षर्या, धाग्याशी (अ)संबधीत प्रतिसाद आहे असे वाटते.
In reply to निनाद सर by सहज
तुमच्या सल्याबद्दल मनापासून धन्यवाद .
आर पहिले तर हि उणीव माझ्याही लक्षात आली .नक्की बदलतो .
छान लिहीले आहेस परीक्षण. पिक्चर पाहायलाच पायजेल
छान परीक्षण
पिक्चर बघायला पाहिजे
मी इथेच परीक्षण वाचुन चिल्ड्रेन ऑफ हेवन पाहिलेला
आता हा पन नक्की बघेन
अरे मर्दा जरा बयाजवार लिही की. हे असे 'दिलमें प्यास पैदा करके अधूरी छोड देना...' वगैरे 'कट्यार' मधल्या खांसाहेबांचे दु:ख का देतोस बाबा. चित्रपट येकदम झक्कास बर्का.
ह्या सिनेमाबद्दल आधीही वाचले होते बहुदा सकाळ सप्तरग मधे !!
गणेश मतकरींच्या ब्लॉगवर आधीही याबद्दल वाचलं होतं. त्यामुळे हा चित्रपट पाहायच्या यादीत होताच. आता पुन्हा नव्याने शोधायला सुरूवात करते.
चित्रपट परिक्षण/परिचयांसाठी माझा आवडता ब्लॉगः
http://apalacinemascope.blogspot.com/
मस्त परिक्षण लिहिलस रे अर्धवटा.
(काय आयडी सुचालाय राव तुला. तुला तस संबोधताना आमची गोची होते).
टु बी वॉच्ड यादीत भर घातली आहे.
In reply to मस्त परिक्षण लिहिलस रे by गणपा
छान ओळख करून दिली आहे.
>>(काय आयडी सुचालाय राव तुला. तुला तस संबोधताना आमची गोची होते)
हेच म्हणतो.
अतिशय सुंदर चित्रपट आणि तेवढीच छान ओळख.
छान परीक्षण
पिक्चर बघायला पाहिजे
सुंदर ओळख!! यादीत नाव अॅड केलय. :)
बघितलाय हा. नक्कीच बघण्यासारखा आहे.
एक अतिशय उत्कृष्ठ चित्रपट आहे.
दु:ख दैन्यातून येणारा सर्वायवलसाठीचा स्ट्रगल आणि त्यातून निर्माण होणारे मानवी मनाचे अविष्कार.
अनेक निर्वासित छावण्यातून अश्या प्रेम कथा फुलात असतात. वणव्यातून येणारी तप्त झुळूकसुद्धा हवी हवीशी वाटते.
पाहिला आहे मी हा चित्रपट. आता श्री.अर्धवट यांचे हे सुंदर परिक्षण वाचून परत त्यातील अनेक प्रसंगांची मालिका नजरेसमोर जशीच्यातशी उभी राहिली. त्या मुलाचे (प्रत्यक्षात "मुलगी") बांधकामावरील मजुरांना कामादरम्यान तो कडक काळा चहा (चहाच असेल....कारण दिसणार्या वाफा) देणे, नंतर गुपचूप त्याच इमारतीत केलेल्या एका जुजबी आडोशाला जावून पुनश्च आपला पेहराव लपेटून घेणे....रहस्य उघडकीला आल्यानंतर लतीफच्या वागण्यात पडलेला लक्षणीय फरक....कागदपत्रांसाठी शासकीय चेकर्स रस्त्यावर तिचा पाठलाग करत असताना लतीफच्या जीवाची होणारी घालमेल.... ती खेडेगावाला परतल्यावर तिच्यासाठी त्याने केलेली पायपीट.
ग्रामीण भागातील दृष्ये तर पुन्हापुन्हा पाहण्यासारखी आहेत.
चित्रपटाला सबटायटलचीदेखील बिलकुल गरज नसावी असे वाटते हा चित्रपट पाहताना....खरे तर ही एक कविताच आहे.
इन्द्रा
In reply to कविता....! by इन्द्र्राज पवार
इन्द्रा यांनी वरिल केलेले दृष्याचे सुंदर वर्णन अन श्री.अर्धवट यांचे केलेले संपूर्ण चित्रपटाचे परिक्षण दोन्हीही अप्रतिम !
एक विनंती कृपया श्री अर्धवट यांनी आपले मिपावरिल सदस्य नाव बदलून काहीतरी छानसे ठेवावे :-)
(व्यनीतून तुम्हाला एक नाव सुचवत आहे, आवडल्यास ठेवा नाहीतर आणखिन कोणतेही चांगलेसे ठेवा, नाहीतर राहूद्या आपली मर्जी )
तुम्हाला श्री.अर्धवटराव असे संबोधण्यास आम्हालातरी आवडत नाही.
तुमच्या नावात अन तुमच्या लेखणीत प्रचंड विरोधाभास आहे.
छान चित्रपट आणि परीक्षण सुद्धा...आता परत एकदा यादीत टाकलाय.
अजुन येउ द्या.
ह्या सिनेमाबद्दल आधीही वाचले