
आज सकाळपासूनच मधुराची खूप धावपळ चालली होती. कसेबसे घरचे सगळे काम आटपून ती ऑफिसला निघाली. आज पटवर्धन फूड कंपनीबरोबर तिची महत्त्वाची मीटिंग होती. काही कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मधुरा तशी खूपच साधी, सरळ, अत्यंत हुशार, शिस्तबद्ध, स्वाभिमानी आणि महत्त्वाकांक्षी होती. एम.बी.ए. करून ती सामंत ब्रदर्समध्ये मार्केटिंग मॅनेजरच्या पदावर अनेक वर्षे काम करत होती. अतिशय मेहनती आणि कर्तबगार अशी ही मधुरा लगबगीने ऑफिसला पोहोचली, तोच ऑफिसच्या मुख्य दरवाज़ात तिला एक चेहरा ओळखीचा दिसला.