घरासमोर मोठ्ठी गच्ची होती. वाड्यातल्या बर्याच बिर्हाडांतल्या काकवा, मावश्या, आज्ज्या उन्हाळ्यात वाळवणं घालायला यायच्या. माझी आज्जीही वाळवणं घालायची. पापड, कुरडया, भरल्या मिरच्या. एका कोपर्यांत मलमली कापडांत पडदानशीन केलेले सांडगे.
मला मोठं काम असायचं. सकाळ-संध्याकाळ गच्चीत वावर असला, तरी दुपारी एक ते चारच्या वामकुक्षीच्या वेळेत सामसूम असायची. कावळे-चिमण्यांसारख्या पक्ष्यांपासून आणि खालच्या मजल्यावरच्या बिर्हाडातल्या बारक्या पशूंपासून त्या वेळात संरक्षण मिळत नसे. मग माझी नेमणूक सावलीतल्या गव्हाच्या पोत्यांवर होई.