उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील टेकडी खालच्या एका गुहेत शेरखान लपून राहत होता. महाबली रेड्याच्या भीतीने शेरखानला गुहेत शरण घ्यावी लागली होती. रात्रीच्या वेळी लपत-छपत छोटे हरीण किंवा सस्याना मारून तो कशी-तरी गुजराण करत होता. गुहेत शेरखान गहन विचारात दडलेला होता, अनेक विचार त्याच्या मनात येत होते. गुहे समोर असलेल्या छोट्याशा डबक्यातले पाणी बहुतेक आठवड्यात आटून जाईल. जंगलातल्या मोठ्या तलावावर महाबलीचा कब्जा आहे. पाण्या विना जगणे अशक्य. उभे आयुष्य ज्या जंगलात गेले, कदाचित ते जंगल सोडण्याची पाळी येणार. पण कुठे जाणार? काय करावे काहीच त्याला सुचेनासे झाले होते.