✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एका गारुड्याची गोष्ट १२: धामण: जुन्या ओळखीचा साप !

ज
जॅक डनियल्स यांनी
Tue, 11/19/2013 - 10:10  ·  लेख
लेख
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे ! एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग. एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य ! एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी ! मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार ! एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर ! एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका ! या लेखापासून मी बिनविषारी सापांबद्दल लिहणार आहे. बिनविषारी म्हणजे " ज्या सापांच्या मध्ये विष नसते आणि ते ओपोआप(काही माणसांच्या डोक्यावर केस येतात तसे.. ) तयार पण होत नाही त्यामुळे ते चावले असता प्रतिविष घ्यावे लागत नाही." ही व्याख्या लक्षात ठेवा कारण, काही लोकांचा प्रश्न असतो की " बिनविषारी साप- वेळ आली की विषारी बनतात का ?" असे फक्त मनुष्यजाती मध्येच घडू शकते. आपणच नवीन-नवीन विष निर्माण करायला आपण विज्ञानाचा आधार घेतो, आणि मग सिरीया मध्ये सिरीन वापरला जातो. बिनविषारी साप निसर्गतःच बिनविषारी (कम्प्लीट बेज !) असल्यामुळे त्यांना अन्न मिळवायला दुसऱ्या क्लुप्त्या वापराव्या लागतात. चपळ असलेले साप भक्षाच्या मागे लागून त्याची मुंडी पिरगाळून ढेकर देतात तर काही अवाढव्य साप (अजगर-अनाकोंडा) आर्मीतल्या स्नायपर सारखे ८-८ दिवस गवतात लपून राहून शिकार करतात. हा अनाकोंडाचा व्हिडीओ बघा-अनाकोंडाची शिकार ! मी सगळ्या पक्ष्यांचा राजा हा "कावळा" (मोर हा मिस्टर वर्ल्ड आहे, राजा नाही !) मानतो तसा माझ्यासाठी या बिनविषारी सापांचा राजा "धामण" ! धामण (बिनविषारी): हा म्हणजे आर.के. लक्ष्मणच्या कॉमन-म्यान सारखा कॉमन-साप आहे. याचा वावर म्हणजे, माझ्या सिंहगड-कॉलेजच्या होस्टेलच्या मित्रांसारखा जिकडे खाणे (आणि पोरी) तिकडे, वडगाव-आनंदनगरच्या (चरवड, जगतापांच्या इ.) शेतजमिनी, सहकारनगरमधील बंगल्याच्या बागा, बिल्डींगच्या पार्किंगच्या जागा, येमेसिबी चे ट्रान्सफोर्मारच्या बाजूचे खड्डे, टेकडी वरच्या वस्त्यांमधली भुसभुशीत घरे, मार्केटयार्ड मधली धान्याची कोठारे इ. सिंहगडकॉलेजच्या मुलींच्या होस्टेल मध्ये घुसलेल्या धामणीला मी एका रात्री पकडले होते, मला असे रात्री होस्टेल मध्ये बघून माझी एक मैत्रीण बेशुद्ध पडायची बाकी होती ;) चांगला संटा ६-८ फुट वाढणारा हा साप आहे. पूर्वीच्याकाळी ४ -४ किलोचा कोबीचा गड्डा पहिला आहे, त्याच चालीवर आम्ही पूर्वी खडकवासल्याला ९-१० फुटी धामणी धरल्या आहेत, असे अनेक जुने सर्पतज्ञ म्हणतात. चकचकीत पिवळा रंग त्यावर काळे पट्टे आणि हाताएवढी जाडी असे सर्वसाधारण वर्णन. पण विष नसल्यामुळे चपळता आणि निसर्गात लपायची क्षमता यावरच सगळे अवलंबून असते. त्यामुळे या पिवळ्या रंगाच्या छटा सापाच्या वावरण्याच्या जागेप्रमाणे बदलत जातात. पुण्यात पिवळा, हिरवट-पिवळा, मातेरी, शेवाळी, राखाडी, काळपट तांबूस इ. असे अनेक रंग सापडतात. निसर्गाला रंगांच्या बाबतीत कोणीच हरवू शकत नाही, अगदी पेठ्तली साड्यांची दुकाने पण नाही .... धामण बघा कशी ग्लॉसी फिनिश मारून बसली आहे. धामण धामण १ धामणीची चपळता म्हणजे "मिल्खा सिंग" सारखी, धामणीला पकडताना मी अनेक वेळा जॉनटी र्होड्स सारखी उडी मारली आहे. बिनविषारी साप असल्यामुळे नुसत्या हाताने पकडायचा, हे आमचे सर्पोद्यानचे तत्व. त्यामुळे धामण दिसली की "टाक हात आणि पकड" असे मी काम चालायचे पण याच्या चपळतेमुळे या सापाने मला पासपोर्ट-विसा पेक्षा जास्त पळवले आहे. एक वेळ कोंबडी पकडणे सोपे, कारण तिच्या वर उडी मारली तर पिसे तरी हातात येतात. (प्रयत्न करून झाले आहेत, त्यामुळे प्रश्न नको !) त्यामुळे वेट-लॉस प्रोग्राम मध्ये धामण सामाविष्ट्य करायला हरकत नाही, मैदानातील धामण ४-५ वेळा पकडून वजन घटवा ! कॉलवरची धामण तर अजूनच वेगळी, घुशीच्या बिळात धामण असेल तर उन्हातानात अंगमेहनत करून कुदळ-फावडे घेऊन ती बिळे खोदायला लागायची. घुशीची बिळे ही एकमेकाना जोडलेली असतात,त्यामुळे एक बीळ खोदून उपयोग नसतो. कधी कधी धामण अर्धी बाहेर असेल तर तिची शेपटी एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने बीळ खोदायला लागायचे. पटांगणात असलेला साप लोकांनी उचकवला म्हणून खूप वेळा बिळात जाऊन बसायचा आणि मग ते १० मिनिटाचे काम लोकांच्या चुकीमुळे ३-४ तासाचे होऊन बसायचे.(भाग ४) नट मध्ये जसा बोल्ट हळू हळू घट्ट होत जातो, तशी बिळातली धामण हळू-हळू घट्ट होत जायची आणि मग पतंग काटताना जसे हळू हळू ढील देऊन मग एकदम खेचायचा असतो तोच प्रकार इकडे करायला लागायचा. मिपाकर आदुबाळ आणि अजून एक माझा मित्र (चिन्मय) यांना घेऊन मी अशीच एक अर्धी बिळात असलेली धामण पकडली होती,साधारण पणे मी कोणाला कॉल ला घेऊन जात नसे पण त्यावेळी पर्याय नव्हता.(पाणीपुरीच्या प्लेट वरून उठवून साप पकडायला घेऊन गेलो गेलो म्हणून आदुबाळ अजून शिव्या घालतो मला.) ५०-६० लोकं जनता वसाहती मध्ये (पार्वती पायथा)त्या धामणीच्या आजूबाजूला कोंडाळ करून उभे होते, मी एका हाताने धामण पकडून दुसऱ्या हाताने खोदत होतो,हे साधारण १५-२० मिनिटे चालू होते, ती धामण बिळात लॉक करून बसली होती...... शेपटी पकडून, माझे खोदणे आणि ढील देणे चालूच होते,इतक्यात ती ७-८ फुटी धामण बाहेर निघाली,आणि कबुतरे उडून जातात तसे माझ्या बाजूचे लोकं सैरावैरा पळून गेले. मी तिला शांतपणे पोत्यात घातली आणि (पाणी पुरी खाण्यासाठी )घरचा रस्ता पकडला. सगळ्यात जास्त कॉलवर सापडणारा साप असे मी या सापाचे वर्णन करीन, चिमण्या जश्या मनुष्यवस्तीच्या जवळपास घरे करून राहतात तसाच हा साप मनुष्यवस्ती मधेच राहतो. बिनविषारी असला तरी या ७-८ फुटी सापाला कॉल वर पकडणे सोपे कधीच नव्हते, कारण म्हणजे त्यांची चपळता आणि अंगावर उसळण्याची क्षमता ! सापाच्या चाव्याला मी कधीच भीत नाही पण पब्लिक मध्ये बिनविषारी साप चावला तरी खूप जास्त अंधश्रध्दा पसरते याची मला जाणीव होती. म्हणून फुकटचे सापांबरोबर खेळ करायला जायचो नाही आणि "क्षणार्धात साप पोत्यात !" विषारी सापांचा नियम इकडे पण पाळायचो. पिवळीधम्मक धामण. धामण ३ २००५ चा मे महिना, इंजिनियरींगची पीएल (अभ्यासासाठी सुट्टी)संपायला आली होती,आठवड्याने पहिला पेपर होता. तळजाई वरच्या वस्ती वरून सकाळी १० च्या सुमाराला कॉल आला, "घरात काळा मोठा नाग निघाला आहे." मी तडक पोहचलो, वस्तीमध्ये २० बाय २० ची टेकडीच्या उतारावरची खोली, त्यामध्ये किचन, बेडरूम, लिविंग रूम, मास्टर बेडरूम, आणि छोटी मोरी ! घराचा मालक गवंडी आणि मालकीण मजूर, त्यांची ३-४ चार चिल्लीपिल्ली असे (छोटे) सुखी कुटुंब बाहेर उभे होते. बाजूच्या घराच्या मुलीने सकाळी या खोलीत काळा मोठा साप पहिला आणि चक्कर येऊन पडली. माझ्या डोक्यातली गणिते, निष्कर्षाची सुई नाग किंवा धामणी कडे वळवत होती. मागच्याच आठवड्या मध्ये याच वस्तीच्या वरच्या भागातला पकडलेल्या नागाची आठवण अजून डोक्यात ताजी होती. मी हळू हळू सामान हलवायला सुरुवात केली,लोखंडी पलंग हलवला तर खाली घुशीची आख्खी अपार्टमेंट स्कीम होती. घुशींची बिळे म्हणजे "बायकांचे मन", इथे थांगपत्ता या शब्दाला अर्थच नाही. ते खोदण्यात काही उपयोग नव्हता, कारण ते बीळ वरच्या घराचे बेसमेंट होते. "साप पळून गेला असेल, दिसला तर कॉल करा” असे सांगून मी कल्टी मारली. घरी पोचून थोडे इंजीनेरारिंग डोक्यात भरत असताना परत १२ ला कॉल आला-“ साप परत दिसला !” मग मात्र या कॉल ला मी चान्स घेतला नाही, चील्लीपिल्लींचा विचार करून हळूहळू करत सगळे समान बाहेर काढले, त्या वस्तीच्या रस्त्यावर त्यांचा संसार आला. आत्ता खोली मध्ये ते बीळ आणि नवीन बांधलेली मोरी राहिली होती. ते बीळ पण थोडे खोदले, सापाचे नख पण दिसले नाही (सापाला नखे नसतात, वाक्यप्रचार वापरला आहे !) घर मालकाची इच्छा होती की त्या बिळात सायकल चे टायर जाळावे, त्याला विरोध करून पहिला पण काही उपयोग झाला नाही, मग शेवटी टायर जाळले. अजूनही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे, “मी रस्त्यावर बसलो आहे, माझ्या आजूबाजूला ती चिल्लीपिल्ली खेळत आहेत, आणि तो मालक आणि मालकीण स्वतःच्या घरातून उठणाऱ्या काळ्या धुराकडे बघत आहेत.....! अर्ध्या तासाने टायर संपल्यावर घरात पहिले, माझ्या अंदाजानुसार साप काही मिळालाच नाही. मग हताश होऊन परत ३ ला घरी परतलो. दोन घास पोटात टाकले, आणि परत “कॉल”, ताट तसेच सरकवून, आईचा ओरडा खाऊन मी तळजाई पठारावर पोहचलो. सगळे लोकं आणि समान अजून बाहेरच होते. मी पोहोचायच्या आधी त्याच बिळातूनच सापाने परत डोके काढले होते, यावरून तिथे मला “ हे बीळ पुढे संपते आहे” ही घुशीच्या मुन्सीपालटीचा बोर्ड मला दिसला. पण बीळ खोदून पण उपयोग नव्हता-घर खाली आले असते, आणि बीळ तसे सोडून पण उपयोग नव्हता ! आता, सगळ्या वस्तीचे डोळे माझ्या कडे लागले होते, शेवटची ओवर खेळताना तेंडल्यावर किती दडपण असेल हे मी अनुभवत होतो. शेवटी मग “ मी साप असतो तर बीळ जळत असताना काय केले असते ?", असे सारासार विचार मी केला. ट्यूब पेटली- खोलीतली थंड जागा म्हणजे “मोरी”, घर मालकाची परवानगी घेऊन नवीन मोरी खोदली. २ फुट बाय २ फुट फरशी खाली, ८ फुटी धामण वेटोळे मारून बसली होती. शेवटी ५ वाजता धामणीला पोत्यात घातल्यावर त्या घरमालकाने माझ्या पायावर लोळण घेतली, घर मालकीण रडायला लागली...."कुठल्या देवाने सांगावा धाडला तुला ? पांग फेडलस पोरा, काळूबाई तुझे भले करो !" अश्याच अनेक वाक्यांनी पिच्चर शेवट गोड झाला. पुढचा भाग धामण...क्रमशः ! सगळे फोटो हे आंतरजालावरचे आहेत आणि त्यांना कुठल्याही पद्धतीने पण बदलले नाही.

Book traversal links for एका गारुड्याची गोष्ट १२: धामण: जुन्या ओळखीचा साप !

  • ‹ एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका !
  • Up
  • एका गारुड्याची गोष्ट १३: धामण: उंदराचा कर्दनकाळ ! ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
65545 वाचन

💬 प्रतिसाद (109)

प्रतिक्रिया

सही!!!!

लॉरी टांगटूंगकर
Tue, 11/19/2013 - 10:15 नवीन
धामण फार सुंदर दिसते आहे!!! पुढचा भाग वेळेत टाकावा.
  • Log in or register to post comments

परीक्षा असल्यामुळे हा लेख

जॅक डनियल्स
Tue, 11/19/2013 - 10:26 नवीन
परीक्षा असल्यामुळे हा लेख लिहायला वेळ लागला. आता पुढचे भाग वेळेत येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

नेहमीप्रमाणे अप्रतिम . धामण

जेपी
Tue, 11/19/2013 - 10:19 नवीन
नेहमीप्रमाणे अप्रतिम . धामण स्वत:ची शेपटी तोंडात पकडुन टायर सारखा आकार घेऊन पळते अस ऐकल आहे .खर आहे का ?
  • Log in or register to post comments

धन्यवाद् ! हा खूप मोठा गैरसमज

जॅक डनियल्स
Tue, 11/19/2013 - 10:28 नवीन
धन्यवाद् ! हा खूप मोठा गैरसमज आहे. धामण हा साप सरपटणारा साप असल्यामुळे त्याचे टायर होत नाही. फक्त तो खूप बुंगाट सरपटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

पाचवी - सहावीत असताना एका

अद्द्या
Tue, 11/19/2013 - 11:56 नवीन
पाचवी - सहावीत असताना एका शेतातून सायकल घेऊन जात असताना या बाई अडकल्या होत्या टायरमध्ये . . कशी काय माहित . गुडघ्यापर्यंत गवत होतं. एकदम सायकल जड वाटायला लागली . थोडं गवत बाजूला करून बघितलं तर हे चाकात . "नागोबा नागोबा" बोंबलत पळालो होतो तिथून . :P तासभर तरी थरथरत होतो भीतीने . :D नंतर कोणी तरी सायकल आणून दिलीन घरी . सगळ्या तारा तुटल्या होत्या . पण . दुर्दैवाने त्या लोकांनी सापाला पण मारलं होतं नाग समजून :-/ :( लेख नेहमी प्रमाणेच जबरा . पुढचा भाग लवकर येउदे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

:))

स्पंदना
Tue, 11/19/2013 - 12:16 नवीन
:)) :)) काय काय विचार करतात लोक तरी! नुसती कल्पना करुनच पाणी आल डोळ्यात हसुन हसुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

अधाश्या सारखा वाचला

चाणक्य
Tue, 11/19/2013 - 10:35 नवीन
मस्त लिखाण.
  • Log in or register to post comments

झकास

निनाद
Tue, 11/19/2013 - 10:50 नवीन
अप्रतिम माहिती. त्यातही सगळ्याला खास विनोदाची फोडणी! अगदी वाटच पाहत असतो जॅक डनियल्स च्या लेखनाची.
इतक्यात ती ७-८ फुटी धामण बाहेर निघाली,आणि कबुतरे उडून जातात तसे माझ्या बाजूचे लोकं सैरावैरा पळून गेले. मी तिला शांतपणे पोत्यात घातली आणि (पाणी पुरी खाण्यासाठी )घरचा रस्ता पकडला.
कसले जबरी दृष्य डोळ्यासमोर उभे राहीले... :)
  • Log in or register to post comments

डोके

निनाद
Tue, 11/19/2013 - 10:51 नवीन
पब्लिक मध्ये बिनविषारी साप चावला तरी खूप जास्त अंधश्रध्दा पसरते याची मला जाणीव होती.
किंवा
शेवटी मग “ मी साप असतो तर बीळ जळत असताना काय केले असते ?", असे सारासार विचार मी केला.
कसले जबरी डोके आहे... मानले!
  • Log in or register to post comments

धामण आणि नाग ह्यातील फरक चटकन

झकासराव
Tue, 11/19/2013 - 10:57 नवीन
धामण आणि नाग ह्यातील फरक चटकन न ओळखता आल्याने बर्‍याच धामनी जिवाला मुकत असतील. ५-६ फुटी पिवळी धम्मक धामण शेताच्या बांधावरुन जाताना पाहिली आहे. सुंदर दिसते (दुरुनच) :)
  • Log in or register to post comments

अस काही वळ्वळणार भयंकर समोर

पियुशा
Tue, 11/19/2013 - 11:10 नवीन
अस काही वळ्वळणार भयंकर समोर आल तर ते विषारी आहे की बिनविषारी हे समजेपर्यंत मला घेरी आलेली असेल ;) असो लेख अन माहीती नेहमीप्रमाणे कडक :)
  • Log in or register to post comments

दुर्दैवाने नाग आणी धामण यातील

सुबोध खरे
Tue, 11/19/2013 - 11:10 नवीन
दुर्दैवाने नाग आणी धामण यातील फरक लांबून सहज ओळखता येत नाही आणी धामण हि नागाची बायको असते अशा तर्हेच्या गैरसमजुती असल्यामुळे धामणींची सर्रास कत्तल होते. खरा तर धामण हि शेतकऱ्याची खरी मित्र आहे कारण तिचे मुख्य भक्ष्य उंदीर हे आहे आणी इतर साप जी गोष्ट विषाने साधतात ते विष नसल्यामुळे धामण हि उंदरांना आपल्या चपळतेने पकडते. नागासारखी दिसणारी आणी अत्यंत चपळ असल्याने तिच्याबद्दल अजूनच गैरसमज पसरलेले आहेत. अन्यथा या खर्या शेतकऱ्यांच्या मित्राची इतकी कत्तल झाली नसती. आमच्या स्वतःच्या घरात मुंबईत (१ ९७४ ) धामण शिरली होती पण ती ओळखणे शक्य नव्हते आणी त्यावेळेस असे सर्पमित्र उपलब्ध नव्हते त्यामुळे प्रथम तिला मारण्यात आले आणी नंतर हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काही करता आले नाही.
  • Log in or register to post comments

मस्त..

शैलेन्द्र
Tue, 11/19/2013 - 11:29 नवीन
मस्त.. धामण आणि घुबड इतके उंदीर खातात, की त्यांना त्यासाठी राष्ट्रीय संरक्षकाचा दर्जा दिला पाहिजे
  • Log in or register to post comments

त्या बद्दल मी पुढच्या भागात

जॅक डनियल्स
Tue, 11/19/2013 - 21:56 नवीन
त्या बद्दल मी पुढच्या भागात सविस्तरपणे लिहिणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

एकदम कडक लिखाण!

चतुरंग
Tue, 11/19/2013 - 11:30 नवीन
जॅडॅ, तुमचं लेखन म्हणजे भन्नाटच असतं. माहितीने भरपूर असूनही किंचितही थांबू न देता, वाक्यावाक्याला कोपरखळ्या मारत, चिमटे घेत लेख धामणीसारखाच सळसळत कधी संपला ते समजलंच नाही!! जियो!!! :)
  • Log in or register to post comments

+१

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/19/2013 - 18:55 नवीन
@सळसळत कधी संपला ते समजलंच नाही!! जियो!!! >>>++++++++++११११११११११११११११११ ============================================================== @एक वेळ कोंबडी पकडणे सोपे, कारण तिच्या वर उडी मारली तर पिसे तरी हातात येतात.>>> Image removed. @ घुशींची बिळे म्हणजे "बायकांचे मन", इथे थांगपत्ता या शब्दाला अर्थच नाही>>> Image removed. @शेवटी मग “ मी साप असतो तर बीळ जळत असताना काय केले असते ?", असे सारासार विचार मी केला. ट्यूब पेटली- खोलीतली थंड जागा म्हणजे “मोरी”, घर मालकाची परवानगी घेऊन नवीन मोरी खोदली. २ फुट बाय २ फुट फरशी खाली, ८ फुटी धामण वेटोळे मारून बसली होती. शेवटी ५ वाजता धामणीला पोत्यात घातल्यावर त्या घरमालकाने माझ्या पायावर लोळण घेतली, घर मालकीण रडायला लागली...."कुठल्या देवाने सांगावा धाडला तुला ? पांग फेडलस पोरा, काळूबाई तुझे भले करो !" अश्याच अनेक वाक्यांनी पिच्चर शेवट गोड झाला. >>> __/\__ जे.डी...तुमच्या कामातल्या आत्मीयतेला आणी जिगरबाजीला सल्लाम! __/\__ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

रोचक अन मजेशीर

अग्निकोल्हा
Tue, 11/19/2013 - 11:34 नवीन
.
  • Log in or register to post comments

उत्तम लिखाण.. माहिती

गवि
Tue, 11/19/2013 - 11:36 नवीन
उत्तम लिखाण.. माहिती पोचवण्याची शैली आकर्षक. त्यामुळे नुसतेच पुस्तकी अ.ब.क. मुद्दे न राहता वाचण्याची इच्छा जागती राहते. लगे रहो. धामणीशी बराच परिचय आहे. नेहमी आसपास दिसणारा साप असला तरी सांगलीत मात्र अगदी घराच्या खाली असलेल्या (सिमेंटचा ढाचा आणि खालची भुसभुशीत शेतजमीन यांच्या)सापटीत कायमची वसतीला असलेली धामण नेहमी पाहिली आहे. ती कधीच घरात येत नसल्याने आणि तसा अपाय काही न दिसल्याने दुर्लक्ष करीत असे. पाळीव कुत्रा आणि धामण यांचा नेहमी पाठलाग आणि खुन्नस चालायची पण कुत्र्याला चाहूल लागून तो पळत येईस्तोवर धामण सापटीत पसार झालेली असायची, उर्वरित शेपूट बाहेर वळवळताना दिसले तरी कुत्रा चडफडत भुंकत राही.
  • Log in or register to post comments

हा पाळीव वरून आठवलं. आमची आजी

llपुण्याचे पेशवेll
Mon, 12/02/2013 - 19:02 नवीन
हा पाळीव वरून आठवलं. आमची आजी कोकणातल्या घरात फार पूर्वीपासून २ घणसं आहेत असे म्हणायची. पण तिची अंधश्रद्धा अशी की त्या आपल्या घरातल्या कोणाला चावत नाहीत. तरीपण ती रात्री कधी विजेरी घेतल्याशिवाय बाहेर जात नसे. आम्ही आमच्या परसांत, लाकडांच्या ढिगार्‍यांत, झाडांवर, पातेर्‍याच्या ढिगात अनवाणी खेळलो पण कधीही सापाचे दर्शन देखील झाले नाही. आजीच्या मते घणसं जोडीनी राहतात. पण आमच्या परसात काम करणार्‍या एका बाईला चावलं होतं घणस पण ते लगेच लक्षात आले म्हणून लागलीच खारेपाटणात नेऊन तिच्यावर उपचार होऊ शकले आणि ती वाचली. त्यानंतर ती बाई आमच्या घरी केवळ सारवलेल्या जमिनीवरच चालत असे. अलिकडे आमच्या वडीलांनी घराच्या आजूबाजूची जमिन साफ करून नवीन कलमं, सागवान लावण्यासाठी सगळी जमिन बेणायचे (झाडे-झुडूपे, गवत काढून जमिन स्वच्छ ज्क्करण्याचे कॉन्ट्रॅक्ट गावातल्या एकाला दिले होते. त्याला मात्र आंब्याखालचे गवत साफ करताना एक घणस मिळाले आणि त्याच्या लोकांनी ते लागलीच मारले. आजीला कळल्यावर आजी म्हणली मला काही त्रास नव्हता त्याचा पण त्याची लोकं कामाला वावरतील तर त्यांना भिती नको म्हणून मारली अस्तील, ठीक आहे. पण म्हटली १ मिळालीये तर दुसरी पण मिळेल. त्याप्रमाणे दुसरी पण पुढील दारच्या परसवा शेजारची आंब्याची खळ साफ करताना मिळाली. ती ही मारण्यात आली. मग आम्ही आजीला चिडवत असू, आजीने पाळलेले दोन घणस मारले म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

घणस म्हणजे?. घोणस?.?बापरे....

आनन्दिता
Tue, 12/03/2013 - 02:27 नवीन
घणस म्हणजे?. घोणस?.?बापरे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

पावरबाज लेख ज्याक साहेब .

चिप्लुन्कर
Tue, 11/19/2013 - 11:43 नवीन
नेहमी प्रमाणेच मस्त लिखाण .
  • Log in or register to post comments

सापटी म्हणजे काय?

परिंदा
Tue, 11/19/2013 - 11:51 नवीन
सापटी म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

भेग - फट, दोन गोष्टींच्या

शैलेन्द्र
Tue, 11/19/2013 - 12:07 नवीन
भेग - फट, दोन गोष्टींच्या मधली चपटी, अरुंद जागा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद!

परिंदा
Tue, 11/19/2013 - 12:44 नवीन
अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

जॅ.डॅ. आपन तुमच्या लेखनाचे

मोहन
Tue, 11/19/2013 - 12:12 नवीन
जॅ.डॅ. आपन तुमच्या लेखनाचे आन त्याच्या ष्टाइलचे येक्दम ५२" फ्यान झालो पघा. अशेच लिवित राहा द्येवा.
  • Log in or register to post comments

काय वेग असतो या धामणीचा! एकदा

स्पंदना
Tue, 11/19/2013 - 12:21 नवीन
काय वेग असतो या धामणीचा! एकदा सायंकाळच्या उन्हात ही सळसळणारी धामण परड्यात पाहीली होती. कसली वेगात जात होती, की घाबरायच सुद्धा विसरल माझं. नुसतीच अवाक होउन पहात राहीले.तिच्या त्या प्रचंड वेगाने ती जणु तरंगत निघालीय असा भास होत होता त्या सोनेरी किरणात. बाकी धामण नागाची बायको? अगागा!
  • Log in or register to post comments

इतर लेखांप्रमाणेच खुसखुशीत

चावटमेला
Tue, 11/19/2013 - 13:00 नवीन
इतर लेखांप्रमाणेच खुसखुशीत लेख. बादवे, कधी विषारी साप बिनविषारी सापांना चावल्याचे ऐकीवात आहे का? जसे की नाग धामणीला चावला वगैरे..
  • Log in or register to post comments

हो

हरवलेला
Tue, 11/19/2013 - 13:49 नवीन
किंग कोब्रा नुसता चावत नाही, तर खातो सुद्धा ! तू नळी वर बघा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

हो, किंग कोब्रा चे स्टेपल

जॅक डनियल्स
Tue, 11/19/2013 - 21:59 नवीन
हो, किंग कोब्रा चे स्टेपल फूड म्हणजे धामण आहे. मण्यारपण छोट्या धामणी खाते, किंग तर ७-८ फुटी धामण एकवेळेला आरामात पचवू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

नेहमीप्रमाणे उत्कृष्ठ लिखाण.

प्रचेतस
Tue, 11/19/2013 - 13:38 नवीन
नेहमीप्रमाणे उत्कृष्ठ लिखाण. मिपावरच्या सर्वोत्तम लेखमालिकेंपकी एक.
  • Log in or register to post comments

Khup chhan information.

pacificready
Tue, 11/19/2013 - 13:54 नवीन
Khup chhan information.
  • Log in or register to post comments

आयडी बदलला का रे प्यार्‍या?

किसन शिंदे
Tue, 11/19/2013 - 14:36 नवीन
आयडी बदलला का रे प्यार्‍या? कि हा राखीव आयडी आहे?:);)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

मोबिलसाठी! मराठी टायपत न्हाई.

प्यारे१
Tue, 11/19/2013 - 14:59 नवीन
मोबिलसाठी! मराठी टायपत न्हाई. तोच प्रयत्न होता. ड्यु आयडी आपलं काम न्हाई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

तुम्हाला कसे कळले, हा प्यारे

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 12/06/2013 - 00:21 नवीन
तुम्हाला कसे कळले, हा प्यारे चा आयडी आहे ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

खूप आवडला हा भाग सुध्दा(सध्या

किसन शिंदे
Tue, 11/19/2013 - 14:06 नवीन
खूप आवडला हा भाग सुध्दा(सध्या एवढंच म्हणतो, दर वेळेला तेच तेच काय म्हणायचं; )) बाकी ठाणेकर, तुम्हाला एक व्यनि पाठवला होता. उत्तराची वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments

झकास !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/19/2013 - 14:16 नवीन
तुमची माहिती सांगण्याची हातोटी विलक्षण आहे ! उपमा-उत्प्रेक्षांचा खुसखुशीत शैलितला उपयोग खास आवडला.
  • Log in or register to post comments

लेख आवडला

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 11/19/2013 - 14:18 नवीन
एक सर्पमित्र आहेत आमच्या सोसायटीत..त्यांच्या हातात परवाच धामण बघितली (लांबुनच) तोंड डोक्याच्यावर (त्यांच्या) आणि शेपुट जमिनीवर (धामणीची) म्ह्णजे ७ फूट तरी लांब असेल
  • Log in or register to post comments

बिनविषारी साप म्हटलं की थोडं

प्यारे१
Tue, 11/19/2013 - 15:02 नवीन
बिनविषारी साप म्हटलं की थोडं रिलॅक्स झालो. कोपरखळ्या एका चढीस एक आहेत... भन्नाट. टोपी काढली आहे बंधो!
  • Log in or register to post comments

धामण झकास दिसतेय !!

सूड
Tue, 11/19/2013 - 15:12 नवीन
धामण झकास दिसतेय !!
  • Log in or register to post comments

बिनविषारी साप असल्यामुळे

जिन्क्स
Tue, 11/19/2013 - 18:07 नवीन
बिनविषारी साप असल्यामुळे नुसत्या हाताने पकडायचा बिनविषारी साप चावल्यामुळे अजिबातच काही होत नाही का? माझ्या महिती प्रमाणे बिनविषारी सापांच्या दातांमध्ये त्यांनी खाल्लेल्या भक्श्याचे कण साठुन रहातात. हे सडलेले कण चावता वेळी माणसाच्या शरीरात जाउन प्रसंगी जीवावर बेततात. प्रकाश टाकावा...
  • Log in or register to post comments

हे सडलेले कण चावता वेळी

परिंदा
Tue, 11/19/2013 - 19:14 नवीन
हे सडलेले कण चावता वेळी माणसाच्या शरीरात जाउन प्रसंगी जीवावर बेततात.
असे असेल तर एखादया रात्री ब्रश न करता झोपलेल्या बिनविषारी माणूसाने सकाळी उठल्यावर (ब्रश करण्याआधी) कोणाला चावले तर? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स

काही नाजूक लोकांना इन्फेक्शन

जॅक डनियल्स
Tue, 11/19/2013 - 22:03 नवीन
काही नाजूक लोकांना इन्फेक्शन झालेले मला माहित आहे. पण त्यांना ताप येतो, तो भीतीने येतो का इन्फेक्शन ने मला अजून पूर्ण माहित नाही. पहिली गोष्ट, साप चावून भक्ष्य खात नाही (तो गिळतो !), त्यामुळे आपल्या दातात जसे बडी शेप अडकते तसे काही अडकत नाही. अजगरासारखा मोठं साप चावला तर जास्त रक्त जाऊन चक्कर येऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स

मेल्या...

अर्धवटराव
Tue, 11/19/2013 - 23:38 नवीन
>> त्यामुळे आपल्या दातात जसे बडी शेप अडकते तसे काही अडकत नाही. -- =)) उपमा द्यायच्या बाबतीत पु.लं. चा वारसा चालवणारा तुच एक दिसला आजवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

>> सापांच्या दातांमध्ये

सूड
Tue, 11/19/2013 - 18:20 नवीन
>> सापांच्या दातांमध्ये त्यांनी खाल्लेल्या भक्श्याचे कण साठुन रहातात. तशी शक्यता कमी आहे, कारण साप भक्ष्य आपल्याला लहापणी शिकवतात तसं बत्तीस वेळा वैगरे चावून खात नाहीत. ते सरळ गिळतात, असा आत्तापर्यंतचा तरी माझा समज आहे. चूक बरोबर जेडिभौ सांगतीलच!!
  • Log in or register to post comments

तो शिंचा रोज दात जरी घासत

गवि
Tue, 11/19/2013 - 18:51 नवीन
तो शिंचा रोज दात जरी घासत असला तरी वट्टात कोणीही अगदी सुंदरशी परीदेखील चावणे म्हणजे दुखणार आणि ठसठसणारच की रे ... (उदाहरण चुकले काय रे ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>सुंदरशी परीदेखील चावणे

सूड
Tue, 11/19/2013 - 19:04 नवीन
>>सुंदरशी परीदेखील चावणे म्हणजे दुखणार आणि ठसठसणारच की रे ... साप चावल्याचा अनुभव नसला तरी लोकांच्या सांगण्यावरुन, वाचनातून कळतं हो. आता परी चावलेलं कोणी माहितीत नाही, स्वानुभव तर नाहीच नाही. आता सापडलीच एखादी आणि चावलीच तर सांगतो. ;) स्वगतः चला, आता एक चावरी परी शोधणे आले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

(No subject)

प्यारे१
Tue, 11/19/2013 - 19:31 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जेडी

मी-सौरभ
Tue, 11/19/2013 - 19:05 नवीन
नाग आणि धामण यातला फरक पटकन ओळखता येईल असे काही फरक सांगाल का? फणा काढणे आणि न काढणे हा एक फरक आहे का? मी पकडायला जाणार नाहीच पण जमल तर एखादा मुका जीव मरण्यापासुन तरी वाचवू शकेन :)
  • Log in or register to post comments

मी पुढच्या भागात सांगायचा

जॅक डनियल्स
Tue, 11/19/2013 - 22:05 नवीन
मी पुढच्या भागात सांगायचा प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

मस्त लेख.

यशोधरा
Tue, 11/19/2013 - 19:31 नवीन
मस्त लेख.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा