जहालभाषाचिकित्सक
लेखनप्रकार (Writing Type)
जहालभाषाचिकित्सकची पार्श्वभूमी सांगाल का?
प्रत्येक देशाचे, भागाचे, तिथे राहाणाऱ्या लोकांचे काही विशेष गुणधर्म असतात. तिथल्या जमिनीच्या मातीतून आणि नद्यांच्या पाण्यातून माणसांच्या नसानसांत वहातात. त्यातूनच त्या प्रांताची एक प्रतिमा तयार होते. महाराष्ट्राची तशी प्रतिमा फार मऊ मुलायम नाही असं नक्कीच म्हणता येईल. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं वर्णन करताना मंगल, पवित्र वगैरे नमन करून झाल्यावर पहिली ओळ कुठची वापरली तर 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' आणि 'अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा' असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपलं थोडं बरं वाटावं म्हणून 'नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा' अशी समजूत घातलेली आहे. 'अटकेवरी जेथील तुरंगि जल पिणे, तेथ अडे काय जलाशय नदाविणे' या ओळींतूनही देशाच्या कोरडेपणाविषयीच भावना व्यक्त होतात. त्यात थोडासा, 'आम्ही कोरडे असलो म्हणून काय झालं, आम्हाला फरक पडत नाही' असा स्वर आहे. मरहट्ट या नावातूनच कोणीतरी हट्टाकट्टा, फटाफट रट्टे हाणणारा डोळ्यासमोर येतो. तर सांगायचा मुद्दा काय, आपण मराठी लोक हे राकटपणाबद्दल प्रसिद्ध आहोत. हे चित्र बदलायला हवं.
पण म्हणजे नक्की काय करायचं?
एखादी गोष्ट मुळापासून बदलायची म्हणजे फार कष्ट असतात. राकटपणाची प्रतिमा बदलायची तर खरोखर राकटपणा टाकून देऊन मऊ, मृदू, नाजूक होण्याची गरज नाही. प्रतिमा लाइज इन द आइज ऑफ द बिहोल्डर असं कोणीतरी आंग्ल कवी म्हणून गेलेला आहेच. तेव्हा स्वतः आंतर्बाह्य बदलण्याचे त्रास कशाला घ्यायचे? निव्वळ आपलं बाह्य रूप बदललं की झालं. मग लोकांना आपण रासवट वगैरे वाटणार नाही. तेच तर साधायचं आहे.
हे बाह्य रूप कसं बदलायचं?
सोप्पं आहे. बाह्य रूप बदलणं म्हणजे खरोखर सगळ्यांनी नटरंगमधल्या अतुल कुलकर्णीसारखं पैलवानापासून सुरूवात करून नाच्यापर्यंत रुपडं बदलायचं करायचं असं मी म्हणत नाही. मराठी माणसाचं बाह्य रूप म्हणजे तो अथवा ती (पाशवी शक्तीही अस्तित्वात आहेत याची दखल) जी बोलतो अथवा बोलते ती भाषा. त्या भाषेला जर पैलवानासारखं लंगोट लावून आखाड्यात घुमवण्याऐवजी गोंडस कपडे घालून तुणतुणं वाजवायला लावलं तर निश्चितच मराठी भाषिकांची प्रतिमा बदलेल.
आत्ताच हा प्रश्न का उपस्थित झाला?
एकेकाळी आपल्या अस्मिता एखाद्या किल्ल्याच्या बुरुजासारख्या दणकट होत्या. या नव्या युगात किल्ले गेले, बुरुज ढासळले तशा त्याही कोमल आणि नाजूक झालेल्या आहेत. काप गेल्यावर शिल्लक राहिलेली भोकं उघडी पडून नाजूक व्हावी तशा. गेली काही वर्षं आपल्या सांस्कृतिक जीवनात अतिरेकाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. जेम्स लेन प्रकरणी होणारी तोडफोड असो, की आनंद यादवांवर आणि ह. मो. मराठेंवर आलेली क्षमा मागायची पाळी असो, की आंबेडकरांच्या व्यंगचित्राबाबतचा वाद असो. विशिष्ट अस्मिता कुरवाळणं, त्यांना खतपाणी घालणं, व त्यामुळे इतर अस्मिता दुखावणं हे वाढत चाललेलं आहे. प्रश्न असा येतो की साध्या पिसानेही ओरखडा उमटून जखमा होऊ शकणाऱ्या अस्मिता दुखवाव्याच का? मुळात जर अभिनिवेशहीन भाषा वापरली, नाजूक विषयांपासून दूरच राहिलं, तर कशाला दुखावतील कोणाच्या अस्मिता? तेव्हा विचारशुद्धी आणि भाषाशुद्धी झाली तर आपल्यासमोर उभे रहाणारे कित्येक प्रश्न चुटकीसरसे नष्ट होतील. यासाठी जहाल किंवा कोणालाही दुखावणारी भाषा टाळणं हे निकडीचं झालेलं आहे.
पटलं. पण हे कसं साधावं?
भाषा हे आपल्या जीवनाचं महत्त्वाचं अंग आहे. आपण बोलतो, लिहितो, संवाद साधतो ते भाषेतूनच. एकमेकांना टपल्या मारतो, चिमटे काढतो तेही भाषेतूनच. इथपर्यंत असतं ते ठीक आहे. पण त्यापुढे जाऊन मुद्दे संपल्यावर गुद्द्यांवर उतरतो, लाथाळ्या करतो, तिरकस शब्दांच्या नखांनी बोचकारे काढतो. वैचारिक विषयांवर भावनिक होऊन जहाल भाषेत लिहितो... हे थांबवायला हवं. पण ते थांबवण्यासाठी आधी ओळखता आलं पाहिजे. यु कॅनॉट कंट्रोल व्हॉट यु कांट मेजर. पूर्वीच्या काळी प्रकाशनाची माध्यमं मर्यादित होती. जे काही प्रकाशित व्हायचं ते प्रशासकांच्या पूर्वानुमतीनंतरच व्हायचं. त्यामुळे असले प्रकार जरा कमी व्हायचे. मात्र आजचा जमाना संस्थळं, ब्लॉग्ज, ऑनलाइन वर्तमानपत्रांचा आहे. इंटरऍक्टिव्ह माध्यमांमुळे कोणीही उठून काहीही लिहू शकतो. घरची कामं सांभाळून संपादन करणाऱ्या संपादकांना हे सगळं शोधता येईलच असं नाही. त्यासाठी आम्ही नवीन प्रोग्राम तयार केलेला आहे. त्याचं नाव आहे 'जहालभाषाचिकित्सक'
नक्कीच रोचक वाटतंय. त्याचं काम कसं चालतं?
आम्ही मराठीतल्या शब्दांना, वाक्प्रचारांना जहालपणाची रेटिंग्ज दिलेली आहेत. एखाद्या लेखात अशा शब्दांचं प्रमाण किती आहे, यावरून आम्ही लेखाचा जहालपणा ठरवतो. तसंच लेखात जिथे जिथे पातळी सोडून लेखन केलेलं असेल ती वाक्यं हायलाइट करतो. भाषाशुद्धीचिकित्सक ज्याप्रमाणे अशुद्ध लेखन हायलाइट करतो, तसंच. संपादकांना एका क्लिकने ती आक्षेपार्ह वाक्यं काढून टाकून लेख शुद्ध, सौम्य करता येतो. तसंच मधुपर्यायोक्तीची सोय करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ एखाद्या अग्रलेखाचा मथळा 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असा असेल तर तो बदलून 'धोरणाचा पुनर्विचार करण्याचा प्रयत्न करावा अशी आमची सरकारला अजिजीची विनंती आहे' असा आपोआप करता येईल. किंवा 'भले तर देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी' हे बदलून 'भले तर देऊ अंगीचा अंगरखा नाठाळाला विनवू नमवुनि माथा' असं होईल. अशाने समाजजीवनात वारंवार होणारे संघर्ष याने टळतील. कारण प्रश्न मराठी लोकांच्या भाषेचा नाही. वैचारीक किंवा तथ्यात्मक लेखन करतांना वाचक विचार आणि तथ्याकडे आकृष्ट व्हायला हवा, भावनांच्या आवेगात नव्हे. असले भावनांचे आवेग असलेले लेखन मी म्हणतो तेच खरे आहे आणि तुम्ही ते मानलेच पाहिजे अशा धाटणीचे होते. वाचकांनी विचार करुन निर्णय घेतलेला बरा, त्यासाठी भाषाशैली भिन्न वापरावी. लेखन कोणते आहे याच्याशी सुसंगत लेखन शैली असावी.
वा. पण या शब्दांच्या जहालपणाची प्रतवारी कशी ठरवली जाते?
'जहालभाषाचिकित्सक'ची कार्यपद्धती हे ट्रेड सीक्रेट आहे, त्यामुळे फार खोलात जाऊन प्रणाली सांगता येणार नाही. पण साधारण कल्पना देतो. आम्ही अगदी अक्षरांच्या पातळीवर जातो. मराठी भाषेत ठ, ड, ण, ट, र, अशी अनेक कर्णकटू व्यंजनं मोठ्या प्रमाणात वापरली जातात. मराठी या शब्दातच र आणि ठ ही अगदी राठ वाटणारी, कठोर अक्षरं आहेत. ठार, रट्टा, दगड, हाणणे, मारामारी, तक्रार, कटकट, बंड, दणदणीत, कठोर, दणका वगैरे उदाहरणांवरून हे स्पष्ट होतं. याउलट बंगाली किंवा गुजराथी भाषांमध्ये सगळे ग, ल, त, ब अशी गुलगुलीत, गुळगुळीत, गुबगुबीत अक्षरं वापरली जातात. त्यामुळे त्या भाषांमध्ये गोडवा येतो. गुजराथी लोक व्यापारात पुढे आणि मराठी लोक मागे पडण्यामागे या भाषेतल्या गोडव्याचा मोठा हात आहे. मराठी भाषेत खरखरीत, रखरखीत, कोरडे ठणठणीत, असे अनेक शब्द आहेत. त्यांच्यातल्या अक्षरांप्रमाणे जहालपणा वा कोरडेपणा ठरवायला मदत होते.
वाक्प्रचारांबद्दल थोडं सांगता येईल का?
शब्दांचा जहालपणा जसा अक्षरांवरून ठरतो, तसा वाक्प्रचारांचा जहालपणा हा त्यातल्या शब्दांवरून ठरतो. म्हणजे तिच्यायला, च्यायला, च्यामारी वगैरे शब्द ब्लॅकलिस्टमध्ये आहेत. ते शब्द असलेले वाक्प्रचार आपोआपच हायलाइट केले जातात. ब्राह्मण हा शब्द बहुतेक वेळा त्या विशिष्ट जमातीला दूषणं देण्यासाठीच वापरला जातो. तेव्हा तसली वाक्यंही ताबडतोब संपादकांच्या नजरेस आणून दिली जातात. बामन असा शब्द असेल तर आख्खा लेख ताबडतोब बाद होतो. 'शिवाजी' हा शब्द नुसता आला - त्याआधी छत्रपती शिवाजी किंवा किमान त्यानंतर महाराज आलं नाही - तर लगेचच रेड फ्लॅग उभारला जातो. एकेरीत उल्लेख आला तर ते वाक्यच भडक लाल रंगात संपादकांसमोर सादर होतं. प्रत्येकच पूजनीय व्यक्तिमत्व - मग ते लोकमान्य टिळक असो, बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा महात्मा गांधी असोत - नुसत्या नावाने आले तर लेखकाचा उद्देश त्यांचा अवमान करण्याचा आहे हे चिकित्सक प्रणालीत गृहित धरलं जातं, आणि संपादकांनी ते तपासून पाहिल्याशिवाय लेखाला प्रसिद्धी मिळणार नाही अशी सोय करता येते. किंवा संपादकांना इतके कष्ट घ्यायचे नसतील तर ते सन्मानदर्शक शब्द आपोआप घालण्याची सोयही त्यात आहे. राजकीय पक्षांबद्दलचे उल्लेखही सोबर भाषेत येतील याची काळजीही या प्रणालीत घेतलेली आहे. विशेषतः भाजपा आणि मनसे यांच्याविरुद्ध काही लोक अकारण भडक भाषा वापरताना दिसतात. त्यामुळे या पक्षांना भाषाशुद्धीकरणाबाबत विशेष झुकतं माप देण्यात आलेलं आहे. एकंदरीतच भाषा छचोर होऊ नये असा प्रयत्न आहे. कारण छचोर भाषेमुळे विषयाचं गांभिर्य कमी होतं. भाषणांत अशी भाषा असेल तर 'काय धाडसी वक्ता आहे हो!', 'सॉल्लीड फोडला/झोडला एकेकाला. मानलं पाहिजे बुवा!' अशी प्रतिक्रिया ऐकू येते. भाषणांत/लेखनांत, मांडण्याचा प्रयत्न केलेल्या मुख्य विषयावर श्रोत्यांमध्ये/वाचकांमध्ये चर्चा होताना दिसत नाही. व्यक्तीचं कौतुक होतं. विचारांना चालना मिळत नाही.
हम्म्म.. या चिकित्सकाचा कुणाकुणाच्या लेखनावर परिणाम होईल?
हे परिणाम दूरगामी असतील. वितंडवाद घालणाऱ्या कुठच्याही लेखकाच्या लेखनावर होईल. उदाहरणार्थ 'गाय हा उपयुक्त पशू आहे' हे वाक्यच घ्या. गोमातेला परमपूज्य मानणाऱ्या हिंदूंच्या भावना दुखावणारं हे विधान असल्याचं जहालभाषाचिकित्सकात लगेच नोंदलं जाऊन ते वाक्य बदललं जाऊन 'गाय ही हिंदूंना देवस्थानी आहे. तिच्या पोटी तेहतीस कोटी देव वसतात. तिचं मूत्र आणि विष्ठा हीही हिंदूंना पूजनीय आहे. ती दूध देते, त्यावर अनेक बालकं पोसली जातात. म्हणून ती उपयुक्त असली तरी मातेसमान पूजनीय आहे.' असं बदललं जाईल. म्हणजे मूळ वाक्याचा गाभा तोच राहिला, पण गायीविषयी असलेल्या हिंदूंच्या भावनांचा अनादर होऊ दिला नाही. यातच जहालभाषाचिकित्सकाचं बलस्थान आहे. एकेकाळी सावरकर, फुले, आगरकर इत्यादींनी अत्यंत जहाल भाषेत समाजसुधारणेबाबत मतं मांडली. पण त्या जहाल भाषेमुळे नक्की काय साधलं? काही नाही. त्याऐवजी वेळीच त्यांच्या भाषेवर चिकित्सक लावून त्यांची भाषा मवाळ, मृदू केली असती तर बरं झालं नसतं का? समाजाच्या अंगावर शाब्दिक कोरडे ओढून त्यांनी जागृती करण्याचा प्रयत्न त्यांच्या परीने केला. पण हेच काम मऊ, मुलायम पिसं फिरवून समाजाच्या अंगावर गुदगुल्या करून साधता नसतं आलं का? निश्चित आलं असतं. चाबकाचे फटके कोणाला आवडतात? कोणालाच नाही. गुदगुल्यांनी कोणाला हसू येत नाही? सगळ्यांनाच येतं. मग तुम्हीच सांगा, काय जास्त परिणामकारक?
मग कुठच्या लेखकांवर याचा परिणाम होणार नाही?
अतिशय चांगला प्रश्न आहे. या जहालभाषाचिकित्सकाची डेव्हलपमेंट करताना आम्हाला आदर्श लिखाण म्हणजे काय, याची उदाहरणं फीड करण्याची गरज पडली. आम्हाला अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखे लेखक सापडले. साने गुरुजी, प्रवीण दवणे आणि व. पु. काळे हे तीनच लेखक आम्ही आदर्श म्हणून वापरले. त्यामुळे त्यांचा जहालतेचा स्कोअर शून्य येईल. ना. सी. फडक्यांचं ललित लेखनही त्या चाचणीवर बऱ्यापैकी उतरतं. दुर्दैवाने संत ज्ञानेश्वर सोडले तर बाकी संत वाङमय थोडा जहालपणा बाळगून आहे. तुकाराम महाराज तर अनेक ठिकाणी फ्लॅग होतात. संत रामदासही मूर्खांविषयी बोलतात तेव्हा जहालच होतात. या सर्वांच्या लेखनाचं शुद्धीकरण करण्याचाही आमचा दूरगामी प्रकल्प आहे. मराठी भाषेतून जेव्हा तळतळाट, थयथयाट, टीका, चुका काढणं, तिरकस बोलणं, कोणाला दोष देणं, कोणाला टाकून बोलणं, कोणाला राग येईल असं बोलणं... हे सगळं निघून जाईल, इतिहासातूनही पुसलं जाईल तोच मराठी भाषेचा सुवर्णक्षण असेल. मग एकवेळ अशी येईल की शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला हे हिंदू-मुसलमान तेढ वाढवणारं आहे हे लक्षात ठेवून 'शिवाजी महाराज व अफझलखान यांच्यातल्या वाटाघाटी फिसकटल्यामुळे खानाचं आतडं तीळतीळ तुटलं. आणि त्या धक्क्यानेच त्याचा मृत्यू झाला.' असं विधान येईल. मग का होतील दंगे?
काही शेवटचे शब्द?
महाराष्ट्र राज्य सरकारने प्रमाण भाषेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. भाषाशुद्धीचिकित्सकाने या प्रमाण भाषेचा उपयोजन सुकर केलं. हे बदल आवश्यक असले तरी क्रांतिकारक नव्हते. जहालभाषाचिकित्सकाद्वारे आम्ही मराठी भाषेत, व त्यातून मराठी समाजजीवनात आमूलाग्र क्रांती करणार आहोत. भाषेतील वैषम्ययुक्त शब्द, वाक्प्रचार नष्ट करून राज्यीय, राष्ट्रीय व जागतिक एकात्मतेला हातभार लावत आहोत. ज्यावेळी जगातली प्रत्येक व्यक्ती साने गुरुजी, प्रवीण दवणे व व. पु. काळे यांच्या लेखनाप्रमाणे बोलेल, लिहील व वागेल तो खरा सुदिन. तो दिवस दूर असला तरी असाध्य नाही. जहालभाषाचिकित्सकामुळे तो दिवस जवळ आणण्याचं साधन आपल्याला मिळालेलं आहे.
(श्रेयअव्हेर http://www.misalpav.com/comment/427419 या लेखावरचे काही प्रतिसाद शब्दशः वापरले आहेत)
प्रतिक्रिया
'शिवाजी महाराज व अफझलखान
भावना
मिपावरील अनेक लेख अन
पन
गल्लत
हं
पण हे असं मुळमुळीत काहीतरी
अंशतः सहमत
पंचमी.
गैरसमज
प्रत्येकच पूजनीय व्यक्तिमत्व
व्वाह्वा !!!
कधी करणार इन्ष्टॉल ?
हवा तेव्हा
..मागेल तेव्हा ताबडतोब
भाषाचिकित्सकची आयडिया
+१
मिसळीचा कट गायब करण्याच्या या
लै भारी.
झक्कास.
माफ करा
किंबहुना जे लोक जहाल भाषा
सुंठी वाचुन खोकला जात असेल
>>अवलंबलेलं कडक आधिकारिक
झक्कास!
भाषेला सौलभ्य प्रदान केल्यास
जहाल मोड >>> *त्यागिरी )
LOL! LOL!
जहालभाषाचिकित्सक