मला तो खूप वेळा भेटलाय, आताशा संपर्क कमी झालाय हे खरं पण तरीही संबंध काही संपला नाहीये.
अजून कधीतरी एखाद्या निवांत रात्री रपरपत असतो. मीच टाळतो बाहेर जायचं. सखीची झोपमोड करून त्याला भेटायला जायचं म्हणजे नको वाटतं. पण अस म्हणून, झोप येते का शांत, त्याच्या हाका चालूच असतात की. आपण तोंडावर पांघरूण ओढून झोपेचं सोंग घेऊन रहायचं.
लहानपणी नेहेमीच भेटायचा तो, आणि आतासारखं वरवरचं, तोंडदेखलं नाही, पक्का सामील असायचा मलाच. घरच्यांनी सांगितलं म्हणून छत्री घेऊन बाहेर पडायचं, पण जरा पुढे गेलं की लगेच छत्री मिटून भिजायचं.