ती...
लेखनप्रकार
ती... कोण होती ती? तसं माझं अन् तिचं नातं नव्हतच. साधारण ६ वर्षांपूर्वी तिचं आमच्या समोर राहणार्या एका तरुणासोबत लग्न झाल्यामुळे आमच्या समोर रहावयास आलेली.. पण मोकळा स्वभाव असल्यामुळे आमच्याही घरी कायम येणे जाणे.. त्यातून उलगडत गेली ती आणि तिचं आयुष्य.. तिला सख्खा भाऊ नव्हता म्हणून मला भाऊ मानलं.. आणि आता ही नात्याची वीण एवढी घट्ट झालीये की ती मला माझ्या सख्ख्या बहीणींईतकीच प्रिय..आणि म्हणूनच 'ती'ची कथा ईथे मांडावीशी वाटली..
ती.. अक्षरशः गोरीपान, सुंदर.. सोनेरी केसांमुळे गर्दीतही सहज ओळ्खू येणारी.. तिचं ५वी पर्यंत शिक्षण गावीच तिच्या वडीलांजवळ झालं. हूशार असल्याने तिच्या मुंबईला राहणार्या काकांनी तिला पुढील शिक्षणासाठी मुंबईला नेलं. १० वी पर्यंत तिकडे मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर वडीलांच्या आग्रहाखातर तिने पुन्हा गावी येऊन पुढील शिक्षण पुर्ण केलं. B.Sc.झाली.. जात्याच हुशार असल्यानं पदवीसोबतच राज्यसेवा परिक्षाही दिली. पहिल्याच प्रयत्नात अंतिम मुलाखतीपर्यंत मजल गेली.. सोबत तिच्यासाठी 'स्थळ' पाहणेही जोरात सुरू होते.. कॉलेजमधल्या काहीजणांनी प्रपोजसुद्धा केलं, पण घरचे संस्कार म्हणा अथवा वडीलांचा धाक म्हणा, तिने कुणालाच हो म्हटले नाही आणि वडील ठरवतिल त्याच मुलासोबत लग्न करायच असा निश्चय केला..तसं तिला पहायला येणार्या जवळपास प्रत्येकालाच ती पसंत पडायची. तिलाही काही मुलं पसंत पडायची, पण तिच्या वडीलांना त्यांच्या मनासारखं 'स्थळ' काही भेटत नव्हत. या सर्व प्रकारात तिचा राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास मागेच पडला होता. शेवटी एकदाचं तिच्या वडीलांना एक चांगल स्थळ सापडलं. तोच आमच्या समोरचा मुलगा.. रयतच्या शाळेत शिक्षकाची नोकरी होती. अजून 'पर्मनंट' झाला नव्हता, पण तिथे लागून ३ वर्षे झाली असल्याने लवकरचं 'पर्मनंट' होईल असे त्याने तिच्या घरच्यांना पटवलं. त्यावेळेस महिना ८०० रु. पगार आहे व 'पर्मनंट' झाल्यावर २० हजार पगार होईल असेही सांगितले..घरच्यांनीही अधिक चौकशी न करता होकार देऊन टाकला आणि तिचे त्याच्याशी लग्न झाले. ईथून पुढे सुरू झाली तिच्या आयुष्याची ससेहोलपट..
तो.. दिसायला जेमतेम.. काळासावळा वर्ण..त्याचा अन् तिचा जोडा जोडा शोभून वगैरे काही दिसत नव्हता..थोडक्यात त्यांचा जोडा विजोड वाटत होता. पण तिने त्याला स्वीकारलं होतं. पण काही गोष्टी हळुहळू समोर येऊ लागल्या तशी ती मनातून खचत गेली.. त्याला महीना ८०० रु. नव्हे तर १८० रु. मिळत होते..आज ६ वर्षांनीही (तिथे लगून एकूण ९ वर्षे) त्याला तितकाच पगार आहे. पण तो मात्र 'पर्मनंट्'च्या आशेवर तिथे अजूनही राबतोय.. १८० रुपयांत अर्थातच भागत नसल्याने नोकरी संभाळून काही पेंटीगची कामे करुन महीना हजार्-दिड हजार मिळवतो..त्यात कसेबसे दोन वेळच भागतं..
दरम्यान या ६ वर्षांत तिला २ अपत्येही झाली.. १ मुलगी व १ मुलगा.. तिच्या सुदैवाने दोन्ही मुलं तिच्यावरच..दिसायलाही अन् डोक्यानही.. मोठी मुलगी ३ वर्षाची झाल्यापासून शिक्षणासाठी आजोळी..कारण तिच्या शिक्षणाचा खर्च यांना न झेपणारा.. छोटा आता २ वर्षांचा झालाय.. त्याच्या शिक्षणाचं तरी आपण बघावं अशी तिची रास्त अपेक्षा..पण तिच्या नवर्यात धमक अशी नाहीच.. ९ वर्षे १८० रु. पगारात राबल्यानंतरही 'पर्मनंट' होण्यासाठी तिच्या नवर्याने तिला माहेरहून २ लाख आणावेत असं सांगितलं.. पण तिनं ठाम नकार दिला. तिला शारिरीक त्रास देण्याचीही धमक तिच्या नवर्यात नव्हती म्हणून त्याने तिला मानसिक त्रास द्यायला सुरूवात केली.. त्याच्या सोबतीला दीर भावजयही होतेच..तिच्या वडीलांना ह्या प्रकाराची कुणकुण लागताच मुलीला त्रास नको म्हणून लाखभर रुपये लगेच दिले..पन अजूनही तिच्या नवर्याच्या 'पर्मनंट' होण्याची शक्यता कमीच आहे. मध्यंतरी मीही त्याला नोकरी सोडून पुर्णवेळ व्यवसाय करण्याबद्द्ल सुचवले, ईतकेच काय, माझ्या ओळखीने एक पेंटींगचे मोठे कामही मिळवून दिले. पण ह्या महाशयांनी ते काम अर्धवट टाकले..
पण हि हिम्मत हरलेली नाही. एका ठीकाणी लॅब असिस्टंट म्हणून कामाला लागलीये..महीना १५०० रु. मिळतात ते ती साचवून ठेवतेय.. तिचं स्वप्न आता एकच आहे.. तिला तिच्या चिमुरड्यांना स्वतःच्या हिमतीवर शिकवायचयं.. मध्यंतरीच्या मानसिक त्रासामूळे राज्यसेवा परिक्षा पास होण्याचे कौशल्य असूनही आता ते स्वप्नच. पण आता बीएड शिकायच तिने ठरवलय.. तिची ईच्छा व ऊमेद बघून मीही तिला संपूर्ण सहकार्य करण्याचं ठरवलय.. बीएड च्या प्रवेश परीक्षेत तिला ५० पैकी ४४ गुण मिळालेत, यावरून अजूनही तिच्यात खूप काही करण्याची धमक आहे हे लक्षात येते..
मध्यंतरी तिच्या नवर्याने तिला शिवीगाळ केली तेंव्हा मीच जाऊन त्याला चांगलेच 'शांत' केले.. पण त्यानंतर माझ्या मनात सारखा एकच प्रश्न येतोय, तो म्हणजे माझ्या या ताईने का म्हणून या नालायक माणसासोबत राहावे?
तिच्या अंगभूत गुणांच्या जोरावर ती नक्कीच काहीतरी करुन दाखवेल याचा मला विश्वास आहे.. आणि तिच्या या प्रवासात मी कायम तिच्या सोबत असणार आहे..
ही काल्पनिक कथा नसल्याने कथेच्या अनुशंगाने येणारे नाट्य यात नसल्यामुळे कदाचित वाचनार्यास 'बोअर' होऊ शकते..
वाचने
2582
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
कथा किंवा तुम्ही म्हणता तशी सत्यकथा आवडली.
अशा बर्याच प्रश्नांचे उत्तर केवळ "समाज" हे आहे. :)
ही काल्पनिक कथा नसल्याने कथेच्या अनुशंगाने येणारे नाट्य यात नसल्यामुळे कदाचित वाचनार्यास 'बोअर' होऊ शकते..छे छे, अजिबात बोअर वगैरे नाही, बिनधास्त लिहा.
तिला पहायला येणार्या जवळपास प्रत्येकालाच ती पसंत पडायची. तिलाही काही मुलं पसंत पडायची, पण तिच्या वडीलांना त्यांच्या मनासारखं 'स्थळ' काही भेटत नव्हत. या सर्व प्रकारात तिचा राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास मागेच पडला होता. शेवटी एकदाचं तिच्या वडीलांना एक चांगल स्थळ सापडलं.
अजून 'पर्मनंट' झाला नव्हता, पण तिथे लागून ३ वर्षे झाली असल्याने लवकरचं 'पर्मनंट' होईल असे त्याने तिच्या घरच्यांना पटवलं. त्यावेळेस महिना ८०० रु. पगार आहे व 'पर्मनंट' झाल्यावर २० हजार पगार होईल असेही सांगितले..घरच्यांनीही अधिक चौकशी न करता होकार देऊन टाकला
सत्यकथेतील नायिकेला सहानुभूती जरुर आहे तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला अनेक शुभेच्छा परंतु जर वडिल तिच्यासाठी अनेक स्थळे पाहत होते आणि अनेक ठिकाणहून होकार आले /तिलाही काहीजण पसंत पडले तर ह्या मुलाची अधिक चौकशी न करता लग्न करुन देण्याची घाई घरच्यांनी का केली? त्यामुळे तिच्याच आयुष्याची परवड झाली असे दिसल्याने हे मनात आले.
स्वाती
In reply to प्रश्न.. by स्वाती दिनेश
साधारणपणे ६ वर्षापुर्वी फक्त ८०० रु. पगार असलेल्या माणसाशी कसे काय लग्न तिने केले किंवा घरच्यांनी ठरवले याचेच आश्चर्य वाटले. ते पण दिसायला जेमतेम अशा माणसाशी..
बाकी नायिकेला सहानुभूती जरुर आहे तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला अनेक शुभेच्छा
खादाडमाऊ
ह्म्म्म्म्म सत्यकथा वाचली.
प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात, असे म्हणतात. युयुत्सु ह्यांच्याकडुन दुसरी बाजु समजावुन का घेत नाही ?
In reply to ह्म्म्म्म्म सत्यकथा by परिकथेतील राजकुमार
उगाच टोमणा कशाला ?
ती गोष्ट पुर्ण कर आधी...बाकी सगळे धंदे करायला जमतात!
अजून एक सत्यकथा. या सगळ्या 'कथा'च असाव्यात असं खूप वाटतं, पण सत्यकथा निघतात. दुर्दैव. आजही एक समाज म्हणून आपण असे प्रकार थांबवू शकत नाही याची लाज वाटते. पण आजकाल अशा स्त्रियांना आधार देणार्या खूपशा संस्था असतात आणि खरोखरच त्यांचा उपयोग होतो. या परिस्थितीत सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिच्या नातेवाईकांनी (सासर माहेर दोन्हीकडच्या), मित्रांनी, सुहृदांनी तिला मदत करावी, उभारी द्यावी (अर्थात, पांगळं न बनवता.) ... हे ही दिवस जातील. ती सुखात राहिल हे नक्की. अशी काही उदाहरणं बघितली आहेत. ज्या स्त्रिया जिद्द न सोडता मेहनत करतात त्या नक्कीच यातून वर येतात, काही प्रकरणांमधे तर नवरा इतका सुधारलेला पाहिला आहे की आज तो अक्षरशः त्या बायकोच्या मुठीत वगैरे म्हणता येईल असा आहे. असो.
तुम्ही या तुमच्या बहिणीला नक्कीच सपोर्ट कराल.
नवरा नालायक आहेच आणि बापही मूर्ख आहे. मुंबईत वाढलेल्या मुलीला परत खेडेगावात कशाला बोलवले ? तिथे पुढच्या शिक्षणाच्या / नोकरीच्या कितीतरी संधी आहेत. तसेच गावात येउनसुद्धा करियर मार्गी लागायच्या आत तिचे लग्न करायची काय घाई होती ? आणि अशा मुलीला कितीतरी चांगली स्थळे मिळाली असती...या थापाड्याच्या गळ्यात का बांधली ?
मुलीने स्वतः ठाम भुमिका घ्यायला हवी होती, खेडेगावात वगैरे तसे अवघड असल्यास एखाद्या नातेवाईकांना मध्ये घालून किमान नोकरी तरी मिळवायला हवी होती. स्वयंपुर्ण झाले की गोष्टी बदलतात्...आता संपलं सगळं
एखाद्यावर पराकोटीचा विश्वास/ श्रद्धा ठेवण्यापुर्वी तो तितका लायक आहे की नाही हे पाहिले पाहिजे.
बोअर अजिबात नाही उलट सिरीयस करते आहे. सत्यकथा :-(
अरेरे बाप व नवरा दोन्ही हुकमाची पाने असुन अगदीच दुर्री व तिरी निघाली की. यापुढे स्वताचे व मुलांचे आयुष्य अजुन सुखकर करण्याच्या तुमच्या ताईच्या प्रयत्नांना यश लाभो ही सदिच्छा!
९ वर्षे १८० रु. पगारात राबल्यानंतरही 'पर्मनंट' होण्यासाठी
इतका शेळपट माणूस नवरा म्हणून ती अजूनही स्वीकारते. तीने खरे तर नवर्याला काहितरी चांगले करायला / दुसरी नोकरी करायला उद्यूक्त करायला हवे.ती नवर्याला अजूनही स्वीकारते. कधीकधी इतकी सहनशीलता स्त्रीया का दाखवतात याचाच प्रश्न पडतो.
ती खरेच तडफदार असेल तर तीने कोणत्यातरी कौन्सीलरशी बोलायला हवे.
नवरा ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेत माहीतीच्या अधिकाराचा वापर करून नवर्याला अधीक पगार/कायम अथवा दुसरे चांगले काम मिळवता येईल.
पण तुम्ही एकच बाजू मांडलीये.
घरचे संस्कार म्हणा अथवा वडीलांचा धाक म्हणा
लधीतरी या विरुद्ध बंड करून पहायला हवे. पण ते तवढे सोपे नसते. मेंदूचे प्रोग्रामिंग एवढे जबरदस्त असते की तीला यासाठी सायकियाट्रीस्टची गरज भासू शकते.
माझ्या ओळखीच्या एका मुलीला तिच्या सासूने छळायला सुरुवात केली. अक्षरशः खायला न देणे, कोंडून ठेवणे, नवर्याच्या खोलीत झोपू न देणे.. वगैरे प्रकार सुरु केले .नवरा एका मोठ्या कंपनीत कामाला होता. त्याला आपली आई अशी वागते याच्यावर विष्वासच नव्हता. त्या मुलीलाच्या शेजार्यानी मुलीच्या वडीलाना फोन केला. मुलगी घरी आल्यानन्तर महिनाभर काहीच बोलत नव्हती. ती डीप्रेशन मध्ये होती.
मानसोपचारतज्ञाने तिच्यावर उपचार केले. नवर्याला समजावले.
नवर्याची आई की बायको अशी पंचाईत होती. पण डॉक्टरानी समजावल्यानन्तर त्याला पटले.
वाईट वाटले वाचून पण तिने विरोध करायला हवा होता...जर मुलगा पसंत नसेल तर कसे काय लग्न केले ? आता बोलून काहीच फायदा नाही...आणि हि काही अगदी जुन्या जमान्यातील वगैरे गोष्ट वाटत नाही....त्यामुळे ज्याच्याबरोबर आयुष्य घालवायचे आहे तो कसा आहे त्याची किमान खात्री केलीच पाहिजे....
आता या परिस्थितीत तिच्या वडिलांना त्यांच्याच मुर्खपणामुळे लेकीची परवड बघावी लागतेय...शिवाय अजून वर पैसे सुद्धा द्यावे लागताहेत...
आतातरी तिच्या पाठीशी राहून तिला चांगली नोकरी लागेपर्यंत जवळ ठेवावी (ती खूप हुशार आहे असे लिहिल्याने ते गृहीत धरून) ....नंतर त्या खोतार्ड्याला हाकलून लाऊन पुनर्विवाह करायला हरकत नाही...सगळं आयुष्य असाच घालवणार का? आणि ती जरी घालवायला तयार असेल तरी मुलांनी काय चूक केली?
त्या मुलीच लग्न त्या मुलाशी होणं म्हणजे शुद्ध मुर्खपणा.
त्यावर मुलीने त्याचा मानसिक त्रास सहन करणे म्हणजे पाप.
आणी तरी आतापर्यंत त्याच्याबरोबर समाजाच्या/नातेवाईकांच्या दबावाखाली संसार करणे म्हणजे अतिरेक.
लेखात्/कथेत जेवढं लिहिलय त्यावरुन बोललो. अनेक पैलु असतील त्यांचाही विचार व्हायला हवा.
प्रामाणिक मतः त्या मुलीसाठी जे कराल ते विचार करुन आणी पुढे कसलीही अपेक्षा न ठेवता करा. खुप सार्या आणी विचित्र (अंगावर येणार्या) अडचणी येवु शकतात भविष्यात अशा प्रकारांमधे.
( अवांतरः लेखकाला वाचकांकडुन कय अपेक्षित आहे? सल्ला, मत, की फक्त कथा वाचणे? )
(थोडंफार जग पाहिलेला)
छान ...