मी जिथे रहाते ते कुमामोतो शहर, माझं याबे गाव आहे तरी कसं? ते पहायचं असं कित्तीतरी दिवस वाटत होतं. पण "आज जाऊ, उद्या जाऊ" असं करता करता चक्क दोन वर्ष उलटून गेली. आणि मग ह्यावर्षी आईबाबांबरोबर त्यांची दुभाषी म्हणून जायचा योग आला. आणि मी कुमामोतोच्या प्रेमात पडले. का? त्याचं हे (प्रकाश)चित्रमय उत्तर...
माऊंट आसो...ऊर्फ आसोसान
हा अगदी माझ्या "बगल मे" म्हणावा तसा. घरापासून गाडीने फक्त चाळीस मिनिटांवर. जपानमधला सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी. खरं म्हणजे हे चार पर्वत. पण ह्यातला एकच जिवंत आहे. (नशीब!) ह्याचं सहाशे मीटर रुंदीचं मुख पाहिलं की आपलं मुख उघडं पडतं.