प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्यांची चाल ओळखता येण्यासाठी तुम्ही सुशिक्षित असावंच लागतं असं नाही.
लौकिकार्थानं अक्षरशत्रू असलेला मीर सुलतान खान बुद्धिबळातल्या भल्याभल्यांना अक्षरशः शत्रू वाटला असला तर नवल नाही!
हिंदुस्थानात जे काही महान बुद्धिबळपटू होऊन गेले त्यात सुलतान खानचा क्रमांक आपल्याला बराच वर लावावा लागेल.
सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या मिठ्ठा प्रांतात १९०५ साली जन्मलेला, 'मीर सुलतान खान' असं एखाद्या नबाबाप्रमाणे भारदस्त नाव असलेला, हा महान बुद्धिबळपटू प्रत्यक्षात 'नबाब मलिक उमर हयात खान' ह्या पंजाब प्रांतातल्या एका सरंजामशहाच्या पदरी एक यकःश्चित गुलाम होता!