गुलाम वजीर!
लेखनप्रकार
प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्यांची चाल ओळखता येण्यासाठी तुम्ही सुशिक्षित असावंच लागतं असं नाही.
लौकिकार्थानं अक्षरशत्रू असलेला मीर सुलतान खान बुद्धिबळातल्या भल्याभल्यांना अक्षरशः शत्रू वाटला असला तर नवल नाही!
हिंदुस्थानात जे काही महान बुद्धिबळपटू होऊन गेले त्यात सुलतान खानचा क्रमांक आपल्याला बराच वर लावावा लागेल.
सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या मिठ्ठा प्रांतात १९०५ साली जन्मलेला, 'मीर सुलतान खान' असं एखाद्या नबाबाप्रमाणे भारदस्त नाव असलेला, हा महान बुद्धिबळपटू प्रत्यक्षात 'नबाब मलिक उमर हयात खान' ह्या पंजाब प्रांतातल्या एका सरंजामशहाच्या पदरी एक यकःश्चित गुलाम होता! नियतीचा खेळही कसा चमत्कारिक असतो बघा, प्रत्यक्ष जीवनातल्या ह्या गुलामाला पटावरच्या राज्याचं औटघटकेचं राजेपद मात्र बहाल झालेलं होतं!
उमर हयातने त्याला बुद्धिबळाचे धडे दिले आणि तो १९२८ साली अखिल हिंदुस्थानाचा जेता झाला. बुद्धिबळातली त्याची विलक्षण चमक बघून त्याच्या मालकाने त्याला आपल्याबरोबर १९२९ साली इंग्लंडच्या दौर्यावर नेलं. उणीपुरी चार वर्षे १९२९ ते १९३३ मीर इंग्लंडमधे खेळला आणि त्याने सारं जग हलवून सोडलं!
बुद्धिबळाच्या भारतीय प्रकाराशी सरावलेल्या मीरला, विल्यम विंटर आणि फ्रेडरिक येट्स ह्या ब्रिटिश मास्टर्सच्या मार्गदर्शनाखाली पाश्चात्य प्रकारातले किंचित फरक आत्मसात करण्यासाठी थोडा वेळ लागला आणि मग मात्र त्याने मागे वळून बघितलंच नाही. १९२९, १९३२ आणि १९३३ सालचे 'ब्रिटिश अजिंक्यपद' तर त्याने पटकावलेच, एवढेच नव्हे तर १९३०, १९३१ आणि १९३३ साली झालेल्या 'जागतिक बुद्धिबळ ऑलिंपियाड' मधे त्याचा समावेश ब्रिटिश संघाकडून केला गेला (आपण पारतंत्र्यात होतो ना!), आणि त्या स्पर्धेतून त्याने असामान्य कामगिरी केली.
रानावनात गुराढोरांच्या मागे पळणार्या एखाद्या काटकुळ्या पोराने थोड्या सरावाने असामान्य गुणवत्तेच्या जोरावर थेट आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जिंकावी तसंच काहीसं!
त्याला मुळीच लिहिता वाचता येत नसल्याने फार पंचाईत होत असे. सांगितलेल्या सूचना त्याला समजत नसत मग सय्यद अकबर शाह नावाच्या दुभाषाची मदत घेऊन तो त्याची वाटचाल सुरु ठेवी.
अलेक्झांडर अलेखिन, मॅक्स युवे, ऍरॉन निम्झोविच, अकिबा रुबेनस्टाईन (ह्यातले दोन जगज्जेते होते) अशा अतिरथी महारथीबरोबर तर तो खेळलाच पण 'बुद्धिबळ ही त्याची मातृभाषा आहे' असा ज्याचा अत्यादराने उल्लेख केला जाई अशा 'होजे राऊल कापाब्लँका' ह्या जगज्जेत्याला जेव्हा मीरने खडे चारले त्यावेळी मात्र सर्व जगाचे डोळे त्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेने दिपून गेले!!
हास्टिंग्ज येथे १९३० साली खेळल्या गेलेल्या अजिंक्यपद स्पर्धेतला हा डाव आजही जगातल्या उत्कृष्ट डावांमधला एक समजला जातो ह्यापरते भाग्य ते कोणते!
ह्या डावात मीरने कॅपाब्लँकाच्या मोहर्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत असे काही जखडून ठेवलेले दिसते की मीरविरुद्ध कोणी नवखाच खेळतो आहे असे वाटावे. त्यातही मीरचा स्वतःचा आंतरराष्ट्रीय सामन्यांचा किंवा खेळाडूंविरुद्धचा नगण्य अनुभव लक्षात घेता हे फारच उच्च कोटीचे ठरते.
'वजिराचा भारतीय बचाव' (क्वीन्स इंडियन डिफेन्स) असं नाव असलेल्या ह्या बचावात मीरने वापरलेल्या खेळ्यांमधून पुढे टायग्रान पेट्रोशान ह्या खेळाडूने 'पेट्रोशान वेरिएशन' अशी विख्यात पद्धती विकसित केली. ह्या पद्धतीचा गॅरी कास्पारोवने त्याच्या सुरुवातीच्या काळात भरपूर उपयोग केला.
त्याचा प्रशिक्षक विल्यम विंटरने एक प्रसंग सांगितलाय. हँबुर्गमधल्या एका सामन्यात ऑस्ट्रियन चँपियनने मीरच्या अशिक्षितपणाची हेटाळणी करण्यासाठी "तुमचा चँपियन कोणती भाषा बोलतो"? असा उद्धट प्रश्न केला. मी "तो चेसची भाषा बोलतो" असे म्हणालो! त्याला एक स्मितहास्य देऊन मीर खेळायला लागला. तीन वेळा आलेला बरोबरीचा प्रस्ताव नम्रपणे नाकारुन मीर खेळतच राहिला आणि त्यानंतर काही खेळ्यातच ऑस्ट्रियन चँपियनला डाव सोडावा लागला! :)
१९३२ आणि १९३३ अशी दोन वर्षे सुलतान खान जगातल्या पहिल्या दहा खेळाडूत स्थान मिळवून होता ह्यावरुन त्याच्या गुणवत्तेची कल्पना येऊ शकेल!
१९३३-३४ साली त्याच्या मालकानं भारताचा रस्ता पकडला आणि त्याला परतावं लागलं. एकदा भारतात परतल्यानंतर बुद्धिबळाच्या सरावाला आणि मोठ्या स्पर्धांना तो मुकला. त्याच्या ऐतिहासिक कीर्तीने भारावून गेलेले काही ब्रीटिश समीक्षक आणि खेळावर पुस्तके काढणारे लेखक त्याला १९५१ मधे भेटले आणि त्याच्या ज्ञानाचा अंदाज घेण्यासाठी म्हणून त्यांनी त्याला त्यावर्षीच्या बॉट्विन्निक विरुद्ध ब्रॉन्स्टीन ह्या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेतला एक डाव दाखवला. त्या खेळ्या बघून बाहेरच्या जगाशी कुठलाही संबंध नसलेला हा साधासुधा माणूस उद्गारला "ह्या तर अत्यंत सुमार खेळाडूंच्या प्राथमिक अवस्थेतल्या खेळ्या आहेत!"
अशा ह्या असामान्य मीर सुलतानचं उदयाला येणं जसं सहज आनंददायी होतं तसंच त्याचं अलगद विस्मृतीत विरुन जाणंही चटका लावून जाणारं ठरलं. सध्याच्या पाकिस्तानातल्या सरगोधा प्रांतात आपल्या कुटुंबासमवेत छोट्या जमिनीच्या तुकड्यावर समाधानाने गुजराण करणार्या ह्या 'गुलाम वजिराने' १९६६ साली काळाच्या पटावरुन प्रस्थान ठेवले!
चतुरंग
वाचने
8187
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
अरेरेरे
वाचनीय माहिती वर्धक लेख.
मस्त गोष्ट
असहमत!
In reply to असहमत! by पिवळा डांबिस
डांबिसकाका,
वा / समर्पक शिर्षक
चतुरंग
गुलाम वझीर!
अनवट माहिती
माहितीपूर्ण....
In reply to माहितीपूर्ण.... by प्रभाकर पेठकर
असेच म्हणतो !!!
ऋणी आहोत
रंगा,
In reply to रंगा, by विसोबा खेचर
_बाय द वे,
In reply to रंगा, by विसोबा खेचर
त्या शिव्या रंगासाठी नव्हत्या हो!:)
In reply to त्या शिव्या रंगासाठी नव्हत्या हो!:) by पिवळा डांबिस
:)
मस्त
छान लेख, खेळही बघितला
पिडा शी सहमत
रंगा,
In reply to रंगा, by विसोबा खेचर
तात्या,
वा!!