Skip to main content

माझी कविता

परीक्षा

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 09/07/2017 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
परीक्षेला बसवलं आहेस तू अशा देवा किती पानं लिहितोय तरी वेळच संपत नाही इतकी अवघड परीक्षा काय ही कामाची हजारदा वाचला तरी तुझा प्रश्नच कळत नाही ! परीक्षेचं वेळापत्रक तरी आधी सांगायचं असतं कोणालाही असं थेट पेपरला बसवायचं नसतं अभ्यासक्रम वेगळा आणि हे प्रश्न भलतेच आहेत गोंधळ झाला तरीही वर मार्क मिळवायचे आहेत ? मागे एकदा दिला होता मी धैर्याचा एक पेपर त्याचं काय झालं पुढे ते कळलंच नाही नंतर आता चालू आहे सहनशक्तीची अफाट चाचणी करतोस तरी कशी तू असल्या प्रश्नांची जुळवणी ? एक पेपर झाला की मध्ये थोडा वेळ द्यायचा असतोय तुझ्या शाळेत मात्र मी सतत परीक्षेलाच कसा बसतोय पेपर संपव तुझे सगळे आता, सांग मी पास

एक अधिक एक...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 05/07/2017 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
एक अधिक एक=दोन! डायल केल्यावर लागलाच्च पाहिजे फोन! नेटवर्क बिझी असू शकतं. रेंज नसू शकते. कदाचित स्वीच अॉफ असू शकतो समोरच्याचा फोन! या वास्तविक शक्यता ग्रुहीत धरणार कोण? .. छे! छे! लागलाच्च पाहिजे फोन. कारण,एक अधिक एक=दोन! गणितात आयुष्य पहायचं. पण आयुष्याचं गणित शिकायचं नाही! पहिल्या एक आणी दुसय्रा एकच्या किं~मती मधली तफावत..मूल्यांचं वेगळेपण? त्यांचं मूळ १ असणं,नसणं? त्यांची भूक तहान तर अमान्य, अस्विकार्यच! कारण एक अधिक एक=दोन! यापेक्षा वेगळी जीवननिष्ठा कोण??? ह्हूं!!! लागलाच्च पाहिजे फोन! कारण,एक अधिक एक=दोन! एक अधिक एक=पाच! एक अधिक एक=दहा! कधी कधी मायनस दहा देखील!

भेटी लागी जीवा . .

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 03/07/2017 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
परब्रम्ह उभे ठाकले समोर साक्षात कैसे मी मग सावरावे आता देहभान दाटलेला कंठ,डोळा पाणी आर्त हरपली केव्हाच अवघी भूक तहान मागणे भौतिक सुखे हे मूर्खलक्षण अशाश्वत गोष्टींचे काय करु कळेना तूच निर्मीलेल्या जगी कंठतो जीवन तरीही का तुझा परीसस्पर्श होईना सद्य परिस्थिती देवा तुझिया समोरी काय तुला मी वेगळे असे आळवावे दाता आहेस तू, एवढेच द्यावे मला तुझ्या चरणाची मी फक्त धूळ व्हावे !

निळा प्रवासी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 24/06/2017 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
अजाण पक्षी सुजाण वारा उन्मुक्तावर स्वच्छन्द पहारा चुकवून अव्यक्तांच्या नजरा उनाड पाऊस, अवखळ गारा काळ्या डोही कातळपाणी हिरवे असुनी रान अधाशी वेशीवरती उभा थबकुनी अवकाशीचा निळा प्रवासी गंध मातीचा, धरा बहरली पानोपानी ओजही सजले डोळ्यांत कुणाच्या नीर निळे हिरव्या तेजाने डोळे निवले ये रे, ये रे ... अनंत याचना जलदांचे अवगुंठन सरले कोसळू लागल्या रेशिमधारा धरतीचे मग मी पण सुटले ! © विशाल विजय कुलकर्णी
काव्यरस

आनंदवन

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 20/06/2017 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
मी नाही जाणत उगम तुझ्या दु:खाचा तू पापी अथवा क्षण जगसी शरमेचा प्रारब्ध तुझे वा आणी येथे तुजला करुणेचा पाझर नाही चौकस इथला नि:शंक निकट ये, हाती दे तव हात या दु:खार्ता॑च्या देशी हाच प्रघात परवलिची इथली एकच अनवट खूण जरि जखम तुला, तरी माझे हृदय विदीर्ण जरि भग्न तुझे कर, घडवू शिल्प अभंग जरि कभिन्न वास्तव, बदलू त्याचा रंग या निबिड अरण्यी, चल रचण्यास तराणे आनंदवनाचे हेच ब्रीद, अन गाणे आनंदवनाचे हेच ब्रीद, अन गाणे
काव्यरस

झिन झनन निनादत होते

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 01/06/2017 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांचे इमले रचता रचता मी इथवर आलो पण वीट वीट कोसळता नि:शब्द, खोल मी उरलो त्यावेळी जखमी अवघे भवताल सोबती होते विझत्या शब्दांच्या संगे झिन झनन निनादत होते शब्दांच्या विझत्या ज्योती उतरती गडद डोहात तरि नाद कुठुन हे येती जणु पैंजण रुणझुणतात -मी काठावर, की मीच खोल डोहात? -की रुणझुणतो मी, पैंजण होऊन त्यात?
काव्यरस

माराल काय तुम्ही तयांना ......

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी सोमवार, 29/05/2017 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
माराल काय तुम्ही तयांना हाती त्यांच्या समशेर आहे हात तुमचे बांधलेले क्षमा याचनेची आर्जव आहे निः शब्द मौनता तुमची कमाल आहे भ्याडपणाची त्यांनी किती कुरापती काढल्या परी षंढ तुमचा जागा आहे लाज असे तुमची तुम्हाला सभ्यतेतही भीड भरली काय तुम्ही कराल सामना अशा जनांचा वा मनाचा
काव्यरस

ख्रिस्त

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी गुरुवार, 11/05/2017 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
शांततेचे गात गाणे अवतरलासी तू भूवरी या पिचलेल्या गरिबांचा क्रूस वाहिलास खांद्यावरी या प्रेम दिधले तू जगाला वेदना पचवूनीया का न समजली दयार्द्रता तुझी तुला खिळवणाऱ्या राक्षसांना अजूनही संहार होतो भाविकांचा प्रेमळ जनांचा क्रूरपणे गिळता तयांना दिसेल का क्रोध लाजताना नसती जरी सगळेच प्रेषित तुझ्यापरी देवाचे सुत का प्रयत्नांना आज त्यांच्या कुचेष्टेचे बिरुद लाभे हात मी निढळावरी लावुनी उभा इथे शतकानुशतके वाट तुझी पाहताना देह पंचत्वी विलीन होतसे
काव्यरस

काळाचे गीत

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 09/05/2017 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
तूहि नव्हतीस, मीही नव्हतो बघ काळ कसा बदलतो तारे ते जे सदाच असती आपल्या जागी नभात वरती आज मोजण्या जागे कोणी मनात अन् मोगरे माळूनि फेऱ्या आपुल्या पाणवठ्याच्या चर्चा साऱ्या गावकुसाच्या कशी न कळली तू गेलेली नियती अशी उलटलेली पुन्हा भेटलीस का वळणावर? घेऊन कुंकू परके, भांगावर उभय उरातहि ते काही आधीसारखे हलले नाही         तूहि नव्हतीस मीही नव्हतो         पुरते आपण अनोळखी होतो         तू आहेस अन आज मीही         समोरासमोर अगदी, तरीही         त्याच्या हाती सर्व आहे         बघ काळ बदलला

मग्न तळ्याकाठी

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 07/05/2017 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
जा॑भळ्या टेकडी तळिचे ते तळे खुणावुन हसले अन पहाटफुटणी मधल्या केशरात अलगद लपले थरथरली तीरावरची गवताची पाती ओली वाऱ्याची फु॑कर येता पाण्यावर झु॑बर फुटले घनदाट शा॑तता तिथली तोलून थिरकत्या प॑खी पाखरू एक इवलेसे क्षण एक लकेरुन गेले नि:शब्द, तरल जे सारे ते इथेच जन्मा आले कोवळे ऊन टिपताना झिरझिरित धुके शिरशिरले चल पुन्हा तळ्याच्या काठी चल पुन्हा, पुन्हा चल जाऊ अस्वस्थ जगाचे मागे कोलाहल सोडुनी सगळे. - उदय
काव्यरस