Skip to main content

भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 06/06/2016 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी. पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा. जरी शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असं पक्कं समीकरण आजकाल झालेलं असलं, तरीही मातृभाषा शिक्षणाबद्दल काही सत्य आणि त्यासंबंधी जगात बळावत असलेली भावना सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. हा एखादा प्रादेशिक भाषेसंबंधीचा लेख न समजता वैश्विक विषयासंबंधी काहीतरी माहिती म्हणून इथला मजकूर लिहिलेला आहे. मुलांच्या शाळेच्या प्रवेशाच्या तारखा कदाचित उलटल्या असतील, कदाचित अजून प्रवेश बाकी असतील. तेंव्हा निर्णय घेण्याआधी लेखात दिलेले दुवे (लिंक्स) जरूर बघा, वाचा, विचार करा आणि जमलं तर पूर्वग्रह बाजूला ठेवून निर्णय घ्या. आपण अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल काही मतं करून घेतलेली असतात. ही मतं बहुतांशी विचारांती केलेली नसतात तर ऐकीव, गोष्टींवर, किंवा कसल्यातरी प्रभाव किंवा दडपणामुळे केलेली असतात. आणि या मतांचा अणूस्फोटाप्रमाणे प्रसार होत जातो आणि त्याचं प्रथेत रुपांतर होतं. भारतातील लोक हे ठराविक बाबतीत इतके अनुकरणप्रिय आहेत की त्यांच्यावर कुठल्याही विचाराचा प्रभावच होत नाही. आणि भारतात, किंबहुना कुठेही एखादा नवा विचार साधारण तीन अवस्थांतून जातो. प्रथम काहीतरी नवीन, म्हणून त्याच्याकडे लोकं आकृष्ट होतात. नवं ते हवं, अशा भावनेने तो विचार अनेकांच्या मनत घर करतो. मग पुढे सगळेच जण त्या मार्गाने जाऊ लागले की त्याचा 'ट्रेंड' होतो. आणि मग तो ट्रेंड एखाद्या लाटेसारखा सगळ्यांना वाहून नेऊ लागला की त्याची पद्धत किंवा प्रथा होते, आणि इतर पर्यायच दिसेनासे होतात. असंच काहीसं शिक्षणाच्या बाबतीत झालेलं आहे. हा विषय तसा नवीन नसला, आणि गेले काही महिन्यात याबद्दल बरंच लिहिलं गेलेलं असलं तरी याच्याशी निगडीत काही बाबी लक्षवेधी आहेत, प्रामुख्याने शिक्षणाच्या माध्यमाबद्दल. इंग्रजांपासून दाखला द्यायचा झाला तर इंग्रज अधिकारी लॉर्ड मॅकॉले याने इंग्रजीतून शिक्षणाची मुळं भारतात रोवली. भारतासारख्याच ब्रिटिशांच्या इतर कॉलन्या होत्या त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे राज्य करता यावं याकरता घेतलेला हा धोरणात्मक निर्णय होता. पुढे कॉलन्या संपल्या, देश स्वतंत्र झाले, जग खुलं झालं आणि लोकांना, देशांना काही गोष्टींचे परिणाम खुपायला, जाणवायला लागले. त्याबद्दल अभ्यास केला गेला, संशोधन केलं गेलं, आणि अनेक गोष्टी समोर आल्या. a #macaulayism युनेस्को ही जागतिक स्तरावरची संस्था मातृभाषेतून शिक्षणाबद्दल आग्रही आहे. १९९० च्या दशकापासून युनेस्को ने यासंबंधी अनेक लेख, अनेक पेपर प्रकाशित केले असून बहुभाषिक देशांना मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्याचं सतत आवाहन केलेलं आहे. जगातील ४०% मुलं अशा भाषेत शिक्षण घेतात जी त्यांना सहज समजत नाही आणि जी त्यांची मातृभाषा नाही. पण पुलंनी म्हटल्याप्रमाणे, सायबाची मुंबई म्हटलं की जसा आजही मुंबईकराचा ऊर भरून येतो, तसंच इंग्रजीत बोललं की अजूनही त्या माणसाबद्दल आपल्या मनात श्रेष्ठत्वाची भावना येते. परंतु युनेस्कोच्या या आवाहनांमुळे असेल किंवा स्वजाणिवेतून असेल, इतर अनेक देशांनी मात्र मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. काही देशात तर तसे कायदेही आहेत. नेमके दाखले द्यायचे म्हटले तर, ज्या इंग्लंड देशाची ही भाषा आहे, तिथलीच नावाजलेली संस्था ब्रिटिश काउन्सिल आपल्या 'व्हॉईसेस' मासिकात 'व्हाय स्कूल्स शुड टीच यंग लर्नर्स इन होम लँग्वेज' या शीर्षकाने लेख लिहिते आणि त्यात मातृभाषेतून शिक्षणाचा आकलनशक्ती, बौद्धिक विकास यावर होणारा सकारात्मक परिणाम सांगते. गव्हर्नमेंट ऑफ हाँग काँग ने आपल्या शैक्षणिक धोरणात स्पष्टपणे या विषयी तरतुदी केलेल्या आहेत. युनायटेड अरब अमिराती, अनेक अफ्रिकन देश, जर्मनी, टर्की यासारख्या देशातही या विषयी आवाज उठवला जातोय, बदल घडत आहेत. अफ्रिकेत आणि अनेक युरोपियन देशात तर लोकांनी चळवळी उभा केलेल्या आहेत. आंतरजालावर, सोशल मिडियावर या संबंधीची मुबलक माहिती मिळते. सोयीस्करपणे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा स्वभाव समजू शकतो. परंतु आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, वाढीसाठी, प्रगतीसाठी जर एखादी गोष्ट चुकीची आहे, आणि जे जागतिक स्तरावर वारंवार सिद्ध होत आहे, तरीही तीच गोष्ट योग्य आहे म्हणण्याला काय म्हणावं हे समजत नाही. हे कुणाला सांगायचा प्रयत्न केला की मात्र मराठी मराठी करणार्‍या कुठल्यातरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं सांगणार्‍याकडे बघितलं जातं. हा झाला महाराष्ट्राचा भाग. इतर राज्यातही बहुतेक इंग्रजीचाच पगडा आहे त्यामुळे भाषिक वैविध्यतेतून खुलणारी संस्कृती आणि तिची संपन्नता ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वैज्ञानिक दृष्ट्या हे मानवजातीच्या वाढत्या वैफल्याचं मुख्य कारण होऊ शकतं कारण व्यक्त होता येणं ही नुसती भावनिक गरज नसून आरोग्यासाठी अनिवार्य अशी गोष्ट आहे. बहुभाषिक व्यक्तीलाही व्यक्त होण्यास मदत करते ती म्हणजे मातृभाषा. परंतु मातृभाषेतून ज्यांचं शिक्षण झालेलं नसतं त्यांना इतर भाषा शिकणंही अतिशय कठीण जातं आणि मेंदू आणि जग यात भक्कम असा दुवाच निर्माण होत नाही. त्याचं पर्यवसान वैफल्य आणि मानसिक दुर्बलतेत होतं. या गोष्टी भंपक वाटू शकतात, किंवा वैयक्तिक मतं वाटू शकतात. परंतु याबद्दल अनेक पुस्तकं, अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी काहींचे दुवे खाली दिलेले आहेत. ते वाचावेत अशी विनंती आहे. a 2 qq आपण अनेकदा समाजाच्या विरुद्ध जायला घाबरतो. सगळे एकीकडे जात असतील तर आपण दुसरीकडे तोंड करायला कचरतो. पण मेंढरं आणि आपण मानव यात फरक आहे हे सिद्ध होत असेल तर ते या एकाच गोष्टीतून आणि ती गोष्ट म्हणजे विचार. विचार केला तर पटतं, की इंग्रजी माध्यमातून न शिकल्याने आपलं काहीही अडलं नाही. वाचलं तर कळतं, की आपल्यासारखेच अनेक आहेत ज्यांचंही काही अडलं नाही. पण 'सगळे' नावाची मंडळी आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात मग आपणहही तेच केलं पाहिजे हे ठरवताना विचार होत नाही, कारण वेगळं पडणं म्हणजे मागे पडणं नव्हे हेच मुळी लक्षात घेतलं जात नाही. जे योग्य ते योग्यच म्हटलं पाहिजे, कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. भविष्य हे मिळणारी नोकरी, आणि पैसे इथेच संपत असेल तर मात्र मातृभाषेचं स्थान भविष्यात न दिसणं स्वाभाविक आहे. मुंबई पुण्यातही मातृभाषेचं महत्व पटतंय. हळू हळू का होईना, मनं बदलतायत. इंग्रजी'च्या' शिक्षणासाठी इंग्रजी'तून' शिकण्याची गरज नाही याची जाणीव होते आहे. शासनाकडूनही याला प्रोत्साहन मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. पण त्या आधी एकत्र यायची तयारी दाखवायला हवी. मग शाळांची अवस्था, तिथली मुलं, तिथले शिक्षक या सगळ्या सबबी सहज दूर होण्यासारख्या वाटायला लागतील. पण एकत्र यायला हवं. मराठीसाठीच नव्हे, प्रत्येक प्रादेशिक भाषेसाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी. शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत. https://www.britishcouncil.org/voices-magazine/why-schools-should-teach… http://www.edb.gov.hk/en/edu-system/primary-secondary/applicable-to-sec… http://timesofindia.indiatimes.com/home/education/news/Kids-fare-better… http://www.thenational.ae/opinion/comment/learning-in-your-mother-tongu… https://www.culturalsurvival.org/news/mother-tongue-based-education-phi… http://www.fremdsprachendidaktik.rwth-aachen.de/Ww/programmatisches/pac… http://www.sbs.com.au/news/article/2016/04/01/calls-increased-mother-to… http://www.cu.edu.ph/?page_id=3290 https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-pri… https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-pri… http://www.un.org/apps/news/story.asp?NewsID=50147 http://www.isaet.org/images/extraimages/P1214011.pdf

वाचने 24880
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

In reply to by वेल्लाभट

वेल्ला तुझाशी अनेक वेळा सहमत आहे. मराठी वाचकच दर्जेदार न राहील्यामुळे उरले सुरलेले लेखकू भाव खाऊन जातात. मराठी मधे उत्कृष्ठ लेखन करणारे आता फारसे शिल्लक नाहीत. सुदैवाने जे आहेत ते जुन्या पिढीतलेच आहेत. मराठी माणूस इंग्रजी चांगला शिकला अभ्यास करून, सराव करून तर शिक्षणाचे माध्यम मराठी असल्याने काही फार बिघडणार नाही.

नेहमीचाच विषय आणि सर्वांचे नेहमीचेच गैरसमज. ह्यावर मागे बराच वादंग होऊनही 'मातृभाषेतून शिक्षण' ह्याचा अजूनही भलताच अर्थ लावत काही लोक गोंधळ घालत आहेत हे बघून आश्चर्य वाटले. १. युनेस्कोच्या मते प्राथमिक शाळा म्हणजे अगदी बालवाडी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण. २. हे शिक्षण मुलांना अनोळखी भाषेतून देणे चुकीचे. कारण ह्याचे विषय हे अगदी जवळचे, आजूबाजूचे, परिसरातले असतात. मुलांना त्यांच्या नेहमीच्या (मातृभाषा हा शब्द शब्दशः घ्यायची गरज नाही) भाषेतून माहिती लवकर समजू शकते. अनोळखी भाषेमधे आधी भाषेवर मेहनत घ्यावी लागते, नंतर माहितीवर दुसरी. ३. इंग्रजीतून उच्च शिक्षण ह्याबद्दल दुमत असायचे कारण नाही. जागतिक स्तरावर राहण्यासाठी बारावीनंतरचे काही शाखांचे शिक्षण इंग्रजीतून असले तरी हरकत नसावी. काथ्याकुट करणारी मंडळी 'उच्चशिक्षण मातृभाषेतून उपयोगाचे नाही' ह्याच मुद्द्यावर विनाकारण अडून बसलेले असतात हे नेहमीच बघितले आहे. 'मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण' व 'उच्चशिक्षणाची भाषा' हे दोन वेगवेगळे मुद्दे व विषय आहेत हे कृपया आतातरी ध्यानात घ्या.

In reply to by संदीप डांगे

कुणाच्यातरी आयुष्यातला व आयुष्याची दिशा ठरवणारा प्रश्न. जालावर मनोहर राईलकरांचे अनेक लेख मराठीत ( "अमृतमंथन" अनुदिनीवर ) फार पूर्वी पासून हीच भूमिका आग्रहाने मांडत आहेत. बाल संगोपन विषयावर विविध पुस्तकातही हेच म्हटलंय की मातृभाषा शिक्षण माध्यम उत्तम. बहुधा व्यवहार भावनेवर मात करतोय हेच खरं

In reply to by संदीप डांगे

काथ्याकुट करणारी मंडळी 'उच्चशिक्षण मातृभाषेतून उपयोगाचे नाही' ह्याच मुद्द्यावर विनाकारण अडून बसलेले असतात हे नेहमीच बघितले आहे. हज्जारदा सहमत. आताच आमच्या ओळखीती एका मध्यप्रदेशस्थ मुलीने एम एस सी कॉम्य्पुटर सायन्स केले. तिची क्रमीक पुस्तके हिंदीतून होती. जिथे तांत्रिक शब्द येई तेव्हढा फक्त ईंग्रजीत होता. जसे "Menu में जाकर, आप सारे System Options देख सकते है". "Java एक Object Oriented programming languag है". ती आता तिच्या कंपनीत इतरांबरोबर राहून इंग्रजी पण चांगली बोलते. मागे कोणत्या तरी चर्चेत बंगालात १८७० साली मेडीकल चे शिक्षण देखील बंगाली भाषेत देत असत हे वाचले आहे. आणि त्यात इंग्रजी आणि बंगाली २न्ही माध्यमातून मेडीकल शिक्षण घेणार्‍यांची संख्या सारखी होती उलट बंगाली भाषेत शिक्षण घेणारे अंबळ जास्त होते हे ही वाचल्याचे स्मरते.

मला स्वतःला सेमि इंग्लिश हा प्रकार चांगला वाटतो....पण त्यातुन शिकलेल्या मुलांची जीआरीची वर्ड लिस्ट करताना हालत बघितली आहे

In reply to by टवाळ कार्टा

सेमी इंग्लिशचे वर्ग चुकीच्या पद्धतीने भरवले जातात. त्याचे २ निकष पूर्ण व्हावे लागतात. १. इंग्रजी माध्यमात शिकून किमान डीएड झालेला शिक्षक त्या शाळेत हवा २. पुस्तके सेमीची असावीत. सध्या सेमीची पुस्तके बाजारात नाहीत. ती इंग्रजी माध्यमाची पुस्तके आहेत. सेमीची पुस्तके आर्धी मराठी आणि आर्धी इंग्रजी असावीत..पण हे दोन्ही निकष शासनातर्फे पूर्ण केले जात नाहीत. मग सेमी अवघड जाते अशी पण अगदी हुशार समजल्या जाणाऱ्या मुलांकडून ओरड ऐकायला मिळते. त्यापेक्षा युनेस्कोच्या संशोधनाप्रमाणे जितके दूरपर्यंत शिकता येईल तितके मातृभाषेतूनच शिका.

छान लेख आहे. आम्ही आधीच मुलीला मराठी माध्यमांत घातले आहे. पण इतर कुंपणावरल्या लोकांसाठी उपयुक्त ठरावा.

@वेल्लाभट - लेख अभ्यासपूर्णच आहे. आम्ही याच विषयावर काम करत आहोत. असे सर्व संदर्भ एकत्रित करून आम्ही एक पीपीटी, सद्य मराठी शाळांची स्थिती, युनेस्कोचा मराठीतून अहवाल अशा अनेक गोष्टी एकाच इमेल मध्ये देत आहोत. एकदा डोळ्याखालून घालायचे असल्यास, Majhishala.Majhibhasha@gmail.com ला मेल करा. नाहीतर तुमचा मेल आयडी द्या. इतरांना पण हीच विनंती.

माझा मुलगा एकाच भाषेतुन काही शिकत नाही हे माझ्या लक्षात आलंय. सध्या तरी त्याला शाळाच नसल्याने आम्ही मनाला येईल ते प्रयोग करु शकतो. तो आमच्याशी बोलतो.. इथे अमेरिकेत आता त्याला सतत इंग्रजीत बोलणारे लोक भेटत आहेत, त्याच्याशी बोलत आहेत. आम्ही मध्ये पडत नाही, तो त्याचा प्रयत्न करुन बोलतो. हिंदी लोकांशी हिंदीत. मराठी लोकांशी मराठीत. प्रत्येक वेळेस त्या त्या भाषेतले शब्द बरोबर वापर्तो. ह्याचा अर्थ मुलं डोक्यात बरोबर ठेवत असतात. ज्ञान महत्वाचं ना. भाषा दुय्यम वाटते मला तरी. पण माझी मतं बदलत असतात. एक वर्ष इंटरनॅशनल शाळेत घालवुन लक्षात आलंय की कल्पना कितीही भारी असली तरी ती राबवणं जास्त महत्वाचं असतं. अत्यंत दर्जा शिक्षणपद्धत असुनही काही फायदा नसतो जर शिक्षक उत्तम नसतील. शिक्षक चांगले असतील तर भाषा दुय्यम असते. हे सध्याचं मत आहे. एक वर्षानी पाहु. आल्यावर मराठी एस.एस.सी मध्ये घालायचा विचार आहे.

In reply to by पिलीयन रायडर

मी तुमची याअगोदरचीपण मते वाचली आहेत. तुम्ही मराठी एसएससीचा विचार करताय ही गोष्ट अभिनंदनीय आहे. तुमची टोकाची विचारसरणी नाही.. तुम्हाला मराठी माध्यमाचे फायदे पाठवायची इच्छा आहे. यावर जाणून घ्यायचे असल्यास मेल करा आणि अभिप्राय द्या - Majhishala.Majhibhasha@gmail.com

माझ्या मुलाचा जन्म ऑक्टोबर १९८५ मधला.तो मराठी माध्यमातून शिकला. तो पाचवीत असताना त्याच्या शाळेतील एका शिक्षक पालक सभेत 'गणित व शास्त्र हे विषय मुलांना इंग्रजीतून शिकवावेत का' या विषयावर चर्चा होती. बहुसंख्य पालकांचे मत सदर विषय इंग्रजी भाषेतून शिकवावे असे होते. काही जणांनी असे प्रतिपादन केले की, गणित व शास्त्र विषय आतापासून इंग्रजीतून शिकवल्याने मुलांना उच्च माध्यमिक व पुढील शिक्षणात त्याचा फायदा होईल कारण उच्च शिक्षण इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. माझे स्वतःचे मत मात्र याच्या विरुद्ध होते. मी माझ्या मुलाला दहावी पर्यंत संपूर्ण मराठी तुकडीत ठेवले. २००० साली तो एस.एस.सी. व २००२मध्ये एच.एस.सी. झाला. त्याला अनुक्रमे ८४% व ८६% गुण मिळाले. त्यानंतर त्याने भौतिक शास्त्रात पदवी व पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी. फिजिक्स) मिळवली. या सर्व शिक्षणात त्याला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठीतून (मातृभाषेतून) घेतल्याने कोणतीही अडचण आली नाही. आणखी एक माहिती येथे देणे अनाठायी ठरणार नाही असे वाटते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करताना, काही काळ त्याने ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतील उच्च पदाधिकाऱ्यांना (एक्झीक्युटिव्ह्जना) इंग्रजीचे शिक्षण देण्याचे कामही केले. मुलांच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे मध्यम मातृभाषाच असावी असे माझे ठाम मत आहे.

माझे मत थोडे वेगळे आहे ,मुळात इंग्रजी भाषा ही आपल्यापेक्षा प्रगत मेंदू असलेल्या युरोपियन अर्थात ब्रिटीशांची भाषा आहे .एखादा भारतीय विद्यार्थी जर कमी IQ चा असेल तर त्याला पहील्या यत्तेपासुन जरी इंग्रजि माध्यमात ठेवले तरी त्याला इंग्रजीचे पुर्ण ज्ञान घेता येणार नाही कारण मुळातच ही भाषा शिकायला अक्कल लागते.जर एखादा भारतीय विद्यार्थी जात्याच हुशार असेल तर तो कोणत्याहि माध्यमात शिकला तरी त्याला इंग्रजी सहज आत्मसात करता येईल.माझ्या बरोबर मराठि माध्यमात शिकलेले अनेकजण केवळ बुद्धीमत्तेमुळे इंग्रजी आत्मसात करु शकले व आज ते परदेशात डॉलरमध्ये खेळत आहेत व माझ्यासारखे बेताची अक्कल असलेले आजही इंग्रजीत बोलताना चाचपडतात तात्पर्य काय ,अक्कल असेल तर मराठी माध्यमात शिकुनसुद्धा इंग्रजिवर प्रभुत्व मिळवता येते ,जगभरातल्या संधी दाराशी येतात व आमच्या सारखे सुमार बुद्धिमत्तेचे लोक तंबाखु मळत पाट्या टाकत बसतात. ( आपला पाल्य हुशार असेल तर बिनधास्त मराठी माध्यमात घालावा)

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

अत्यंत बेजबाबदार विधान करताय! @'टर्बोचार्जड फिलॉसॉफर' - शहरातल्या मोठ्या इस्पितळामध्ये दरवर्षी शाळा सुरु व्हायच्या वेळी, आयक्यू तपासणी कार्यक्रमासाठी पालक येतात, आणि डॉक्टर सांगतात आयक्यू चांगलाच आहे, तुम्ही तुमच्या मुलांना मातृभाषेतून शिकवा. इंग्रजी शिकायला काय आयक्यू लागतो? काहीही !!! गोव्यात गेला तर, फेरीवाला पण चांगलं इंग्रजी बोलू शकतो! बुद्धीमत्तेचे विविध प्रकार आहेत. भाषिक बुद्धिमत्ता त्यापैकी एक. एखाद्या उत्कृष्ट mechanical engineer चे इंग्रजी जर कच्चे असेल तर त्याचा आयक्यू कमी आहे म्हणता येईल का? यावर विचार करा. मुलांचा कल कोणत्या दिशेला आहे, हे जर ठरवायचे असेल तर पहिल्या पासून मातृभाषेतून शिक्षण कधीही चांगलेच आहे.

'अनावस्था' हा शब्द या चर्चेत वाचण्यात आला. 'दुरवस्था' + 'अनास्था' या दोहोंपैकी काय अपेक्षित आहे काही कळले नाही! ;-)