Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेल्लाभट on Mon, 06/06/2016 - 08:12
ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी. पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा. जरी शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असं पक्कं समीकरण आजकाल झालेलं असलं, तरीही मातृभाषा शिक्षणाबद्दल काही सत्य आणि त्यासंबंधी जगात बळावत असलेली भावना सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. हा एखादा प्रादेशिक भाषेसंबंधीचा लेख न समजता वैश्विक विषयासंबंधी काहीतरी माहिती म्हणून इथला मजकूर लिहिलेला आहे. मुलांच्या शाळेच्या प्रवेशाच्या तारखा कदाचित उलटल्या असतील, कदाचित अजून प्रवेश बाकी असतील. तेंव्हा निर्णय घेण्याआधी लेखात दिलेले दुवे (लिंक्स) जरूर बघा, वाचा, विचार करा आणि जमलं तर पूर्वग्रह बाजूला ठेवून निर्णय घ्या. आपण अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल काही मतं करून घेतलेली असतात. ही मतं बहुतांशी विचारांती केलेली नसतात तर ऐकीव, गोष्टींवर, किंवा कसल्यातरी प्रभाव किंवा दडपणामुळे केलेली असतात. आणि या मतांचा अणूस्फोटाप्रमाणे प्रसार होत जातो आणि त्याचं प्रथेत रुपांतर होतं. भारतातील लोक हे ठराविक बाबतीत इतके अनुकरणप्रिय आहेत की त्यांच्यावर कुठल्याही विचाराचा प्रभावच होत नाही. आणि भारतात, किंबहुना कुठेही एखादा नवा विचार साधारण तीन अवस्थांतून जातो. प्रथम काहीतरी नवीन, म्हणून त्याच्याकडे लोकं आकृष्ट होतात. नवं ते हवं, अशा भावनेने तो विचार अनेकांच्या मनत घर करतो. मग पुढे सगळेच जण त्या मार्गाने जाऊ लागले की त्याचा 'ट्रेंड' होतो. आणि मग तो ट्रेंड एखाद्या लाटेसारखा सगळ्यांना वाहून नेऊ लागला की त्याची पद्धत किंवा प्रथा होते, आणि इतर पर्यायच दिसेनासे होतात. असंच काहीसं शिक्षणाच्या बाबतीत झालेलं आहे. हा विषय तसा नवीन नसला, आणि गेले काही महिन्यात याबद्दल बरंच लिहिलं गेलेलं असलं तरी याच्याशी निगडीत काही बाबी लक्षवेधी आहेत, प्रामुख्याने शिक्षणाच्या माध्यमाबद्दल. इंग्रजांपासून दाखला द्यायचा झाला तर इंग्रज अधिकारी लॉर्ड मॅकॉले याने इंग्रजीतून शिक्षणाची मुळं भारतात रोवली. भारतासारख्याच ब्रिटिशांच्या इतर कॉलन्या होत्या त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे राज्य करता यावं याकरता घेतलेला हा धोरणात्मक निर्णय होता. पुढे कॉलन्या संपल्या, देश स्वतंत्र झाले, जग खुलं झालं आणि लोकांना, देशांना काही गोष्टींचे परिणाम खुपायला, जाणवायला लागले. त्याबद्दल अभ्यास केला गेला, संशोधन केलं गेलं, आणि अनेक गोष्टी समोर आल्या. a #macaulayism युनेस्को ही जागतिक स्तरावरची संस्था मातृभाषेतून शिक्षणाबद्दल आग्रही आहे. १९९० च्या दशकापासून युनेस्को ने यासंबंधी अनेक लेख, अनेक पेपर प्रकाशित केले असून बहुभाषिक देशांना मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्याचं सतत आवाहन केलेलं आहे. जगातील ४०% मुलं अशा भाषेत शिक्षण घेतात जी त्यांना सहज समजत नाही आणि जी त्यांची मातृभाषा नाही. पण पुलंनी म्हटल्याप्रमाणे, सायबाची मुंबई म्हटलं की जसा आजही मुंबईकराचा ऊर भरून येतो, तसंच इंग्रजीत बोललं की अजूनही त्या माणसाबद्दल आपल्या मनात श्रेष्ठत्वाची भावना येते. परंतु युनेस्कोच्या या आवाहनांमुळे असेल किंवा स्वजाणिवेतून असेल, इतर अनेक देशांनी मात्र मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. काही देशात तर तसे कायदेही आहेत. नेमके दाखले द्यायचे म्हटले तर, ज्या इंग्लंड देशाची ही भाषा आहे, तिथलीच नावाजलेली संस्था ब्रिटिश काउन्सिल आपल्या 'व्हॉईसेस' मासिकात 'व्हाय स्कूल्स शुड टीच यंग लर्नर्स इन होम लँग्वेज' या शीर्षकाने लेख लिहिते आणि त्यात मातृभाषेतून शिक्षणाचा आकलनशक्ती, बौद्धिक विकास यावर होणारा सकारात्मक परिणाम सांगते. गव्हर्नमेंट ऑफ हाँग काँग ने आपल्या शैक्षणिक धोरणात स्पष्टपणे या विषयी तरतुदी केलेल्या आहेत. युनायटेड अरब अमिराती, अनेक अफ्रिकन देश, जर्मनी, टर्की यासारख्या देशातही या विषयी आवाज उठवला जातोय, बदल घडत आहेत. अफ्रिकेत आणि अनेक युरोपियन देशात तर लोकांनी चळवळी उभा केलेल्या आहेत. आंतरजालावर, सोशल मिडियावर या संबंधीची मुबलक माहिती मिळते. सोयीस्करपणे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा स्वभाव समजू शकतो. परंतु आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, वाढीसाठी, प्रगतीसाठी जर एखादी गोष्ट चुकीची आहे, आणि जे जागतिक स्तरावर वारंवार सिद्ध होत आहे, तरीही तीच गोष्ट योग्य आहे म्हणण्याला काय म्हणावं हे समजत नाही. हे कुणाला सांगायचा प्रयत्न केला की मात्र मराठी मराठी करणार्‍या कुठल्यातरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं सांगणार्‍याकडे बघितलं जातं. हा झाला महाराष्ट्राचा भाग. इतर राज्यातही बहुतेक इंग्रजीचाच पगडा आहे त्यामुळे भाषिक वैविध्यतेतून खुलणारी संस्कृती आणि तिची संपन्नता ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वैज्ञानिक दृष्ट्या हे मानवजातीच्या वाढत्या वैफल्याचं मुख्य कारण होऊ शकतं कारण व्यक्त होता येणं ही नुसती भावनिक गरज नसून आरोग्यासाठी अनिवार्य अशी गोष्ट आहे. बहुभाषिक व्यक्तीलाही व्यक्त होण्यास मदत करते ती म्हणजे मातृभाषा. परंतु मातृभाषेतून ज्यांचं शिक्षण झालेलं नसतं त्यांना इतर भाषा शिकणंही अतिशय कठीण जातं आणि मेंदू आणि जग यात भक्कम असा दुवाच निर्माण होत नाही. त्याचं पर्यवसान वैफल्य आणि मानसिक दुर्बलतेत होतं. या गोष्टी भंपक वाटू शकतात, किंवा वैयक्तिक मतं वाटू शकतात. परंतु याबद्दल अनेक पुस्तकं, अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी काहींचे दुवे खाली दिलेले आहेत. ते वाचावेत अशी विनंती आहे. a 2 qq आपण अनेकदा समाजाच्या विरुद्ध जायला घाबरतो. सगळे एकीकडे जात असतील तर आपण दुसरीकडे तोंड करायला कचरतो. पण मेंढरं आणि आपण मानव यात फरक आहे हे सिद्ध होत असेल तर ते या एकाच गोष्टीतून आणि ती गोष्ट म्हणजे विचार. विचार केला तर पटतं, की इंग्रजी माध्यमातून न शिकल्याने आपलं काहीही अडलं नाही. वाचलं तर कळतं, की आपल्यासारखेच अनेक आहेत ज्यांचंही काही अडलं नाही. पण 'सगळे' नावाची मंडळी आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात मग आपणहही तेच केलं पाहिजे हे ठरवताना विचार होत नाही, कारण वेगळं पडणं म्हणजे मागे पडणं नव्हे हेच मुळी लक्षात घेतलं जात नाही. जे योग्य ते योग्यच म्हटलं पाहिजे, कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. भविष्य हे मिळणारी नोकरी, आणि पैसे इथेच संपत असेल तर मात्र मातृभाषेचं स्थान भविष्यात न दिसणं स्वाभाविक आहे. मुंबई पुण्यातही मातृभाषेचं महत्व पटतंय. हळू हळू का होईना, मनं बदलतायत. इंग्रजी'च्या' शिक्षणासाठी इंग्रजी'तून' शिकण्याची गरज नाही याची जाणीव होते आहे. शासनाकडूनही याला प्रोत्साहन मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. पण त्या आधी एकत्र यायची तयारी दाखवायला हवी. मग शाळांची अवस्था, तिथली मुलं, तिथले शिक्षक या सगळ्या सबबी सहज दूर होण्यासारख्या वाटायला लागतील. पण एकत्र यायला हवं. मराठीसाठीच नव्हे, प्रत्येक प्रादेशिक भाषेसाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी. शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत. https://www.britishcouncil.org/voices-magazine/why-schools-should-teach-young-learners-home-language http://www.edb.gov.hk/en/edu-system/primary-secondary/applicable-to-secondary/moi/key-events-moi-fine-tuning-bg/moi-guidance-for-sec-sch/sep-1997/mother-tongue/index.html http://timesofindia.indiatimes.com/home/education/news/Kids-fare-better-when-taught-in-mother-tongue/articleshow/49212516.cms http://www.thenational.ae/opinion/comment/learning-in-your-mother-tongue-first-is-key-to-success-at-school https://www.culturalsurvival.org/news/mother-tongue-based-education-philippines http://www.fremdsprachendidaktik.rwth-aachen.de/Ww/programmatisches/pachl.html http://www.sbs.com.au/news/article/2016/04/01/calls-increased-mother-tongue-education-indigenous-school-students http://www.cu.edu.ph/?page_id=3290 https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-primary-education-gurmeet-kaur https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-primary-education-gurmeet-kaur http://www.un.org/apps/news/story.asp?NewsID=50147 http://www.isaet.org/images/extraimages/P1214011.pdf
  • Log in or register to post comments
  • 24838 views

प्रतिक्रिया

Submitted by नमकिन on गुरुवार, 06/09/2016 - 09:49

In reply to मुळात जर्मनी या देशात एकच by अभिनव

Permalink

वा

अभिनव प्रतिवाद
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 06/08/2016 - 13:36

Permalink

उत्तम लेख

उत्तम लेख आणि चर्चा
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on गुरुवार, 06/09/2016 - 10:59

Permalink

सोन्याबापु आणि असंका यांचे मुद्दे मार्मिक व तर्कयुक्त आहेत

वरील चर्चेत सोन्याबापु यांनी मांडलेला बोली भाषे संदर्भातील मुद्दा मराठीतच शिक्षण हवे ची तार्कीक परीणीती आहे. अत्यंत वेगळा व जबरदस्त मुद्दा तर्कयुक्त रीतीने मांडलेला आहे जो विचारणीय आहे. असंका यांनी इंग्रजीपेक्षा मराठी च बोलीभाषेशी अंतर जे दाखवल आहे तो मुद्दाही जबरदस्त तर्कयुक्त आहे. चर्चेतील प्रतिसाद प्रगल्भ आहेत मजा येत आहे वाचायला धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on गुरुवार, 06/09/2016 - 12:48

In reply to सोन्याबापु आणि असंका यांचे मुद्दे मार्मिक व तर्कयुक्त आहेत by मारवा

Permalink

धागालेखकांनी थोडा मतभेदांना

धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते
बर दिला.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on गुरुवार, 06/09/2016 - 13:16

In reply to सोन्याबापु आणि असंका यांचे मुद्दे मार्मिक व तर्कयुक्त आहेत by मारवा

Permalink

अवांतरः

अवांतरः अरेच्या! धन्यवाद !! खरं तर तुमचाच एक प्रतिसाद माझ्या वरच्या प्रतिसादाच्या मुळाशी होता. यनावाला की राजेश घासकडवी यांच्या धाग्यावरचा. "ब्रिटीश राज नक्की कधी सुरु झालं?...तो पहिला ब्रिटिश नागरीक महत्वाचा!" असं काहीतरी होतं.
धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते.
हे आयडियल झालं. लेखक विषयाशी अत्यंत समरस होउन लिहित असल्याने त्यांची प्रतिक्रिया तशी साहजिक वाटली. मुळ विषयाबद्दल आपण काहीच मत दिलेलं नाही याचं मात्र आश्चर्य वाटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by शान्तिप्रिय on गुरुवार, 06/09/2016 - 11:20

Permalink

माझेही शिक्षण मराठी भाषेत

माझेही शिक्षण मराठी भाषेत झाले. पण त्यामुळेच मी चांगले इंग्रजीहि बोलु शकतो. परंतु माझ्या मुलीला मी इंग्रजी माध्यमात घातले आहे. पण तिला मराठीची आवड निर्माण करायचा माझा प्रयत्न असतो. आणि माझे सुदैव म्हणजे आवड हळूहळू निर्माण होत आहे. सध्या ती म्रुत्युंजय हे पुस्तक वाचत आहे ( हळुहळु). त्यातील काहि शब्द कळाले नाहित तर मी समजावुन सांगतो. मराठी हा विषय सर्व शाळात १ ली पासुन (सि बि एस ई, आय सी एस ई, इंटर्नेशनल स्कूल) सक्तीचा करावा या मताचा आहे. इंग्रजीही १ली पासुन शिकवावे.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on गुरुवार, 06/09/2016 - 11:34

In reply to माझेही शिक्षण मराठी भाषेत by शान्तिप्रिय

Permalink

आपणास लेखाचा मुद्दा कळलेला

आपणास लेखाचा मुद्दा कळलेला आहे का? मुलांना मराठी येणं न येणं हा मुद्दा नाहीये. मुलांना सर्वोत्तम माध्यमातनं शिक्षण मिळावं - जे मातृभाषा हेच असू शकते, हा मुद्दा आहे. मराठी ही इथे बहुतेकांची मातृभाषा आहे त्यामुळे सरळ "मराठी" माध्यम म्हणून लोक पुढे जात आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by नमकिन on Fri, 06/10/2016 - 08:56

In reply to आपणास लेखाचा मुद्दा कळलेला by असंका

Permalink

भाषा

मुलांना इंग्रजी वा इतर भाषा येणं न येणं हा ही मुद्दा नाहीं तर मातृभाषा (भले ती कुठलिही असो) शिक्षण माध्यम असावी हाच आहे. मुद्दा धरुन ठेवायला माझा हातभार!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 06/10/2016 - 15:30

In reply to माझेही शिक्षण मराठी भाषेत by शान्तिप्रिय

Permalink

मराठी हा विषय सर्व शाळात १ ली

मराठी हा विषय सर्व शाळात १ ली पासुन (सि बि एस ई, आय सी एस ई, इंटर्नेशनल स्कूल) सक्तीचा करावा या मताचा आहे. इंग्रजीही १ली पासुन शिकवावे.
+१ खरं तर महाराष्ट्राने अंमलात आणलेलं त्रिभाषा सूत्र ही मुख्य समस्या आहे. महाराष्ट्रात लहानपणापासून हिंदी सक्तीची असल्याने इतरभाषिक महाराष्ट्रात हिंदीतच बोलतात कारण महाराष्ट्रीयन हिंदी बोलू शकतात. महाराष्ट्र हे असं राज्य आहे की जिथे त्या राज्याची भाषा शिकणे सक्तीचे नाही व इतरभाषिक स्थानिक भाषा अजिबात न शिकता आपले संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात आरामात घालवू शकतात (अमिताभ बच्चन, गुलजार, सलीम , जावेद, शाहरूख, दिलीपकुमार इ. मंडळींनी आपले सर्व आयुष्य महाराष्ट्रात घालविले पण आजतगायत मराठी शिकले नाहीत.). महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी व इंग्लिश भाषा सक्तीची असावी व हिंदी ऑप्शनल असावी.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 06/27/2016 - 17:48

In reply to मराठी हा विषय सर्व शाळात १ ली by श्रीगुरुजी

Permalink

लाखवेळा सहमत

महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी व इंग्लिश भाषा सक्तीची असावी व हिंदी ऑप्शनल असावी. तसंही आमची पिढी हिंदी सिनेमे पाहूनच हिंदी भाषा शिकली आहे. हिंदी ८ नंतर संस्कृताला ऑप्शन म्हणून असली तरी चालेल. मराठी आणि इंग्रजी कंपल्सरी.
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Mon, 06/27/2016 - 23:13

In reply to लाखवेळा सहमत by llपुण्याचे पेशवेll

Permalink

..

हिंदी ऑप्शनल आहे... हिंदी , हिं + सं , पूर्ण संस्कृत असे पर्याय असतात. बायदिवे , लोकाना संस्कृत ही परकी वाटत नाही , पण हिंदी परकी वाटते हे पाहून नेत्रे जलं आगम्यति !
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Fri, 07/01/2016 - 13:00

In reply to मराठी हा विषय सर्व शाळात १ ली by श्रीगुरुजी

Permalink

+१ मु़ळात ज्या प्रांतात आपण

+१ मु़ळात ज्या प्रांतात आपण राहतो तिथली भाषा उत्तम बोलता यावी ही आनंदाची गोष्ट आहे असंच वाटत नाही या लोकांना. दुसरी भाषा चांगली बोलता यावी अशी आस असणं हे किती आनंददायी असु शकतं हे परप्रांतियांना कळत नाही हे फार दुर्दैवी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश भिडे on गुरुवार, 06/09/2016 - 21:51

Permalink

हे जुनं नाटक नवीन संचात परत

हे जुनं नाटक नवीन संचात परत आलंय का???
  • Log in or register to post comments

Submitted by नमकिन on गुरुवार, 06/09/2016 - 22:34

In reply to हे जुनं नाटक नवीन संचात परत by रमेश भिडे

Permalink

खेळ व्हायचा

खेळ व्हायचा तुझा जायचा जीव चिमुकल्यांचा! नेमेचि येतो पावसाळा व शालेय प्रवेश.
  • Log in or register to post comments

Submitted by कापूसकोन्ड्या on Fri, 06/10/2016 - 09:40

Permalink

काथ्याकुट

कुट कुट काथ्या कुट
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Fri, 06/10/2016 - 10:10

Permalink

उत्तम विषय

उत्तम विषय व चांगली चर्चा. मातृभाषेतून शिक्षण केव्हाही चांगले पण तीच मातृभाषा कायम वापर्ली जाते का शि़क्षणात? एम.ए. मराठी झालेला तरूण महाराष्ट्राबाहेर्,देशाबाहेर करीयर करू शकेल का?वर चीन्,जर्मनीची उदाहरणे दिली आहेत पण त्या देशात बालवाडीपासुन ते पी.एच.डी.पर्यंत मातृभाषाच वापरली जाते ना ?इंग्रजीकडे दुर्लक्ष करणारे तरूण मुलाखतीत 'त त प प' करतात व हुशारी असूनही नोकरी मिळू शकत नाही. https://en.wikipedia.org/wiki/Foreign_Secretary_(India) येथे बहुतांशी लोक इंग्रजी माध्यमात शिकलेले कसे? त्यातही बहुतांशी एम.ए.इंग्रजी! मातृभाषेत शि़क्षण घेऊन परिस्थिती बदलेल का ? असा ह्यांचा प्रश्न.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 06/10/2016 - 10:28

In reply to उत्तम विषय by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

मातृभाषेतून शिक्षण केव्हाही

मातृभाषेतून शिक्षण केव्हाही चांगले पण तीच मातृभाषा कायम वापर्ली जाते का शि़क्षणात? हा प्रश्न आहे, आरोप आहे, तक्रार आहे की पळवाट आहे? एम.ए. मराठी झालेला तरूण महाराष्ट्राबाहेर्,देशाबाहेर करीयर करू शकेल का?वर चीन्,जर्मनीची उदाहरणे दिली आहेत पण त्या देशात बालवाडीपासुन ते पी.एच.डी.पर्यंत मातृभाषाच वापरली जाते ना ?इंग्रजीकडे दुर्लक्ष करणारे तरूण मुलाखतीत 'त त प प' करतात व हुशारी असूनही नोकरी मिळू शकत नाही. नक्कीच करू शकेल कारण त्याचा विचार भक्कम तयार झालेला असेल. तो कुठलीही भाषा सहज शिकू शकेल, इतरांपेक्षा लवकर. याचीही उदाहरणं असंख्य आहेत. ते त त प प वाले इंग्लिशवर मेहनत घेत नसावेत पुरेशी. इंग्लिश यायलाच हवं, आधीपासून म्हणतोय, आणि तेही उत्तम यायला हवं. स्वतःची स्तुती नाही पण अमेरिकेतल्या परिक्षेसाठी प्रश्न सेट करताना, किंवा ऑफिसात लोक (इंग्लिशमधूनच शिकलेले) जेंव्हा मला मेल ड्राफ्ट करून दे सांगत येतात तेंव्हा ते करताना, कंपनीच्या अ‍ॅन्युल पब्लिकेशन मधे टॉपिक्स लिहिताना, इंग्लिश पुस्तकाच्या मॅनुस्क्रिप्टचं प्रूफरिडिंग करताना... मला काडीचीही अडचण जाणवली नाही. इंग्रजीची आवड लहानपणापासून लावली गेली, आणि प्रोत्साहन दिलं गेलं. पण विचार मराठीतूनच करतो आणि त्याचा अभिमान आहे. https://en.wikipedia.org/wiki/Foreign_Secretary_(India) येथे बहुतांशी लोक इंग्रजी माध्यमात शिकलेले कसे? त्यातही बहुतांशी एम.ए.इंग्रजी! मातृभाषेत शि़क्षण घेऊन परिस्थिती बदलेल का ? असा ह्यांचा प्रश्न. पास. ते ह्यांनाच विचारा तुमच्या.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Fri, 06/10/2016 - 12:20

In reply to मातृभाषेतून शिक्षण केव्हाही by वेल्लाभट

Permalink

बरोबर

इंग्रजीची आवड लहानपणापासून लावली गेली, आणि प्रोत्साहन दिलं गेलं हे अतिशय महत्वाचे. प्रत्येक घरात ते कसे होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
ते त त प प वाले इंग्लिशवर मेहनत घेत नसावेत पुरेशी
म्हणजे अगदी सुरूवातीपासूनच तशी मेहनत घ्यायला हवी.पण त्याच वेळेत इंग्रजी माध्यमाचा एखादा मुलगा तासभर फूट्बॉल खेळेल व घरी आई वडिलांबरोबर बसून इंडिया-टुडे वाचण्याचा प्रयत्न करणार्या मुलाला नैराश्य आणेल.असो. मी म्हणते, मुलास इंग्रजी माध्यमात घालून मराठीवर घर मेहनत घ्यायला काय अडचण आहे?अमेरिकेत राहणारे भारतिय वंशाचे लोक असेच प्रयत्न करतात ना?त्यांच्या मुलांना विचार करताना काही अडचण येते का?
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 06/10/2016 - 12:52

In reply to बरोबर by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

मुलास इंग्रजी माध्यमात घालून

मुलास इंग्रजी माध्यमात घालून मराठीवर घर मेहनत घ्यायला काय अडचण आहे
अरे यार! मी म्हणतो हा उलटा अट्टाहास का? आपलं सोडून दुसर्‍याचं नेसायची धडपड का?
त्याच वेळेत इंग्रजी माध्यमाचा एखादा मुलगा तासभर फूट्बॉल खेळेल व घरी आई वडिलांबरोबर बसून इंडिया-टुडे वाचण्याचा प्रयत्न करणार्या मुलाला नैराश्य आणेल.असो.
हो आणि त्याचप्रकारे मराठी माध्यमाचा मुलगा उद्या मराठी साहित्य, दर्जेदार कलाकृतीही तितक्याच आनंदाने बघेल आणि इंग्रजी माध्यमाचा मुलगा 'त्यात खूप हाय फाय मराठी असतं' म्हणून त्याला मुकेल. जवळचे मित्र आहेत हे वाक्य म्हणणारे. कीव येते.
अमेरिकेत राहणारे भारतिय वंशाचे लोक असेच प्रयत्न करतात ना?त्यांच्या मुलांना विचार करताना काही अडचण येते का?
ते अमेरिकेत राहतात, तो प्रश्नच वेगळा आहे. इथल्यांबद्दल बोला. आणि विचार करताना अडचण येतेच्च.
  • Log in or register to post comments

Submitted by नमकिन on Fri, 06/10/2016 - 21:18

In reply to मुलास इंग्रजी माध्यमात घालून by वेल्लाभट

Permalink

वर लिहिल्याप्रमाणेच परत लिहीतोय

असेल ते इटवा अन् नसेल ते पाठवा हा प्रकार आहे शाळेत वेगळी भाषा अन् घरी वेगळी शिकवणी, मूल बिचारे सगळीकडे शिकण्यातंच. इक पल तो जीने दो!
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 06/27/2016 - 17:52

In reply to मुलास इंग्रजी माध्यमात घालून by वेल्लाभट

Permalink

मस्तंवेल्ला

वेल्ला तुझाशी अनेक वेळा सहमत आहे. मराठी वाचकच दर्जेदार न राहील्यामुळे उरले सुरलेले लेखकू भाव खाऊन जातात. मराठी मधे उत्कृष्ठ लेखन करणारे आता फारसे शिल्लक नाहीत. सुदैवाने जे आहेत ते जुन्या पिढीतलेच आहेत. मराठी माणूस इंग्रजी चांगला शिकला अभ्यास करून, सराव करून तर शिक्षणाचे माध्यम मराठी असल्याने काही फार बिघडणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sat, 06/11/2016 - 15:15

Permalink

नेहमीचाच विषय आणि सर्वांचे

नेहमीचाच विषय आणि सर्वांचे नेहमीचेच गैरसमज. ह्यावर मागे बराच वादंग होऊनही 'मातृभाषेतून शिक्षण' ह्याचा अजूनही भलताच अर्थ लावत काही लोक गोंधळ घालत आहेत हे बघून आश्चर्य वाटले. १. युनेस्कोच्या मते प्राथमिक शाळा म्हणजे अगदी बालवाडी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण. २. हे शिक्षण मुलांना अनोळखी भाषेतून देणे चुकीचे. कारण ह्याचे विषय हे अगदी जवळचे, आजूबाजूचे, परिसरातले असतात. मुलांना त्यांच्या नेहमीच्या (मातृभाषा हा शब्द शब्दशः घ्यायची गरज नाही) भाषेतून माहिती लवकर समजू शकते. अनोळखी भाषेमधे आधी भाषेवर मेहनत घ्यावी लागते, नंतर माहितीवर दुसरी. ३. इंग्रजीतून उच्च शिक्षण ह्याबद्दल दुमत असायचे कारण नाही. जागतिक स्तरावर राहण्यासाठी बारावीनंतरचे काही शाखांचे शिक्षण इंग्रजीतून असले तरी हरकत नसावी. काथ्याकुट करणारी मंडळी 'उच्चशिक्षण मातृभाषेतून उपयोगाचे नाही' ह्याच मुद्द्यावर विनाकारण अडून बसलेले असतात हे नेहमीच बघितले आहे. 'मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण' व 'उच्चशिक्षणाची भाषा' हे दोन वेगवेगळे मुद्दे व विषय आहेत हे कृपया आतातरी ध्यानात घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by नमकिन on Sat, 06/11/2016 - 16:19

In reply to नेहमीचाच विषय आणि सर्वांचे by संदीप डांगे

Permalink

नेहमीचा पण दरवर्षी

कुणाच्यातरी आयुष्यातला व आयुष्याची दिशा ठरवणारा प्रश्न. जालावर मनोहर राईलकरांचे अनेक लेख मराठीत ( "अमृतमंथन" अनुदिनीवर ) फार पूर्वी पासून हीच भूमिका आग्रहाने मांडत आहेत. बाल संगोपन विषयावर विविध पुस्तकातही हेच म्हटलंय की मातृभाषा शिक्षण माध्यम उत्तम. बहुधा व्यवहार भावनेवर मात करतोय हेच खरं
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 06/27/2016 - 17:58

In reply to नेहमीचाच विषय आणि सर्वांचे by संदीप डांगे

Permalink

सहमत

काथ्याकुट करणारी मंडळी 'उच्चशिक्षण मातृभाषेतून उपयोगाचे नाही' ह्याच मुद्द्यावर विनाकारण अडून बसलेले असतात हे नेहमीच बघितले आहे. हज्जारदा सहमत. आताच आमच्या ओळखीती एका मध्यप्रदेशस्थ मुलीने एम एस सी कॉम्य्पुटर सायन्स केले. तिची क्रमीक पुस्तके हिंदीतून होती. जिथे तांत्रिक शब्द येई तेव्हढा फक्त ईंग्रजीत होता. जसे "Menu में जाकर, आप सारे System Options देख सकते है". "Java एक Object Oriented programming languag है". ती आता तिच्या कंपनीत इतरांबरोबर राहून इंग्रजी पण चांगली बोलते. मागे कोणत्या तरी चर्चेत बंगालात १८७० साली मेडीकल चे शिक्षण देखील बंगाली भाषेत देत असत हे वाचले आहे. आणि त्यात इंग्रजी आणि बंगाली २न्ही माध्यमातून मेडीकल शिक्षण घेणार्‍यांची संख्या सारखी होती उलट बंगाली भाषेत शिक्षण घेणारे अंबळ जास्त होते हे ही वाचल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments

Submitted by नमकिन on Mon, 06/27/2016 - 18:31

In reply to सहमत by llपुण्याचे पेशवेll

Permalink

तो बंगाल चा

प्रतिसाद मीच "पुरवला" होता
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 06/11/2016 - 23:10

Permalink

मला स्वतःला सेमि इंग्लिश हा

मला स्वतःला सेमि इंग्लिश हा प्रकार चांगला वाटतो....पण त्यातुन शिकलेल्या मुलांची जीआरीची वर्ड लिस्ट करताना हालत बघितली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सुचिकांत on Mon, 06/13/2016 - 16:58

In reply to मला स्वतःला सेमि इंग्लिश हा by टवाळ कार्टा

Permalink

सेमी इंग्लिशचे वर्ग चुकीच्या

सेमी इंग्लिशचे वर्ग चुकीच्या पद्धतीने भरवले जातात. त्याचे २ निकष पूर्ण व्हावे लागतात. १. इंग्रजी माध्यमात शिकून किमान डीएड झालेला शिक्षक त्या शाळेत हवा २. पुस्तके सेमीची असावीत. सध्या सेमीची पुस्तके बाजारात नाहीत. ती इंग्रजी माध्यमाची पुस्तके आहेत. सेमीची पुस्तके आर्धी मराठी आणि आर्धी इंग्रजी असावीत..पण हे दोन्ही निकष शासनातर्फे पूर्ण केले जात नाहीत. मग सेमी अवघड जाते अशी पण अगदी हुशार समजल्या जाणाऱ्या मुलांकडून ओरड ऐकायला मिळते. त्यापेक्षा युनेस्कोच्या संशोधनाप्रमाणे जितके दूरपर्यंत शिकता येईल तितके मातृभाषेतूनच शिका.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 06/13/2016 - 16:18

Permalink

छान लेख आहे.

छान लेख आहे. आम्ही आधीच मुलीला मराठी माध्यमांत घातले आहे. पण इतर कुंपणावरल्या लोकांसाठी उपयुक्त ठरावा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुचिकांत on Mon, 06/13/2016 - 16:50

Permalink

@वेल्लाभट - लेख अभ्यासपूर्णच

@वेल्लाभट - लेख अभ्यासपूर्णच आहे. आम्ही याच विषयावर काम करत आहोत. असे सर्व संदर्भ एकत्रित करून आम्ही एक पीपीटी, सद्य मराठी शाळांची स्थिती, युनेस्कोचा मराठीतून अहवाल अशा अनेक गोष्टी एकाच इमेल मध्ये देत आहोत. एकदा डोळ्याखालून घालायचे असल्यास, Majhishala.Majhibhasha@gmail.com ला मेल करा. नाहीतर तुमचा मेल आयडी द्या. इतरांना पण हीच विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 06/13/2016 - 17:48

In reply to @वेल्लाभट - लेख अभ्यासपूर्णच by सुचिकांत

Permalink

मेल पाठवला आहे..

मेल पाठवला आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by सुचिकांत on Mon, 06/13/2016 - 20:45

In reply to मेल पाठवला आहे.. by असंका

Permalink

मेलला प्रतिसाद दिला आहे ..

मेलला प्रतिसाद दिला आहे ..
  • Log in or register to post comments

Submitted by नमकिन on Mon, 06/13/2016 - 21:39

In reply to मेल पाठवला आहे.. by असंका

Permalink

मी

मी पण
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 06/13/2016 - 22:35

Permalink

माझा मुलगा एकाच भाषेतुन काही

माझा मुलगा एकाच भाषेतुन काही शिकत नाही हे माझ्या लक्षात आलंय. सध्या तरी त्याला शाळाच नसल्याने आम्ही मनाला येईल ते प्रयोग करु शकतो. तो आमच्याशी बोलतो.. इथे अमेरिकेत आता त्याला सतत इंग्रजीत बोलणारे लोक भेटत आहेत, त्याच्याशी बोलत आहेत. आम्ही मध्ये पडत नाही, तो त्याचा प्रयत्न करुन बोलतो. हिंदी लोकांशी हिंदीत. मराठी लोकांशी मराठीत. प्रत्येक वेळेस त्या त्या भाषेतले शब्द बरोबर वापर्तो. ह्याचा अर्थ मुलं डोक्यात बरोबर ठेवत असतात. ज्ञान महत्वाचं ना. भाषा दुय्यम वाटते मला तरी. पण माझी मतं बदलत असतात. एक वर्ष इंटरनॅशनल शाळेत घालवुन लक्षात आलंय की कल्पना कितीही भारी असली तरी ती राबवणं जास्त महत्वाचं असतं. अत्यंत दर्जा शिक्षणपद्धत असुनही काही फायदा नसतो जर शिक्षक उत्तम नसतील. शिक्षक चांगले असतील तर भाषा दुय्यम असते. हे सध्याचं मत आहे. एक वर्षानी पाहु. आल्यावर मराठी एस.एस.सी मध्ये घालायचा विचार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुचिकांत on Tue, 06/14/2016 - 10:42

In reply to माझा मुलगा एकाच भाषेतुन काही by पिलीयन रायडर

Permalink

मी तुमची याअगोदरचीपण मते

मी तुमची याअगोदरचीपण मते वाचली आहेत. तुम्ही मराठी एसएससीचा विचार करताय ही गोष्ट अभिनंदनीय आहे. तुमची टोकाची विचारसरणी नाही.. तुम्हाला मराठी माध्यमाचे फायदे पाठवायची इच्छा आहे. यावर जाणून घ्यायचे असल्यास मेल करा आणि अभिप्राय द्या - Majhishala.Majhibhasha@gmail.com
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 06/14/2016 - 11:54

Permalink

उत्तम विषय...

आणि तितकीच उत्तम चर्चा.
  • Log in or register to post comments

Submitted by Nitin Palkar on Sat, 06/25/2016 - 21:31

Permalink

मातृ भाषेतून शिक्षण

माझ्या मुलाचा जन्म ऑक्टोबर १९८५ मधला.तो मराठी माध्यमातून शिकला. तो पाचवीत असताना त्याच्या शाळेतील एका शिक्षक पालक सभेत 'गणित व शास्त्र हे विषय मुलांना इंग्रजीतून शिकवावेत का' या विषयावर चर्चा होती. बहुसंख्य पालकांचे मत सदर विषय इंग्रजी भाषेतून शिकवावे असे होते. काही जणांनी असे प्रतिपादन केले की, गणित व शास्त्र विषय आतापासून इंग्रजीतून शिकवल्याने मुलांना उच्च माध्यमिक व पुढील शिक्षणात त्याचा फायदा होईल कारण उच्च शिक्षण इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. माझे स्वतःचे मत मात्र याच्या विरुद्ध होते. मी माझ्या मुलाला दहावी पर्यंत संपूर्ण मराठी तुकडीत ठेवले. २००० साली तो एस.एस.सी. व २००२मध्ये एच.एस.सी. झाला. त्याला अनुक्रमे ८४% व ८६% गुण मिळाले. त्यानंतर त्याने भौतिक शास्त्रात पदवी व पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी. फिजिक्स) मिळवली. या सर्व शिक्षणात त्याला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठीतून (मातृभाषेतून) घेतल्याने कोणतीही अडचण आली नाही. आणखी एक माहिती येथे देणे अनाठायी ठरणार नाही असे वाटते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करताना, काही काळ त्याने ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतील उच्च पदाधिकाऱ्यांना (एक्झीक्युटिव्ह्जना) इंग्रजीचे शिक्षण देण्याचे कामही केले. मुलांच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे मध्यम मातृभाषाच असावी असे माझे ठाम मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Mon, 06/27/2016 - 10:48

In reply to मातृ भाषेतून शिक्षण by Nitin Palkar

Permalink

तुमचं अभिनंदन व कौतुक. योग्य

तुमचं अभिनंदन व कौतुक. योग्य निर्णय घेऊन त्यावर ठाम राहिल्याबद्दल.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्बोचार्जड फिलॉसॉफर on Tue, 06/28/2016 - 00:39

Permalink

माझे मत थोडे वेगळे आहे ,मुळात

माझे मत थोडे वेगळे आहे ,मुळात इंग्रजी भाषा ही आपल्यापेक्षा प्रगत मेंदू असलेल्या युरोपियन अर्थात ब्रिटीशांची भाषा आहे .एखादा भारतीय विद्यार्थी जर कमी IQ चा असेल तर त्याला पहील्या यत्तेपासुन जरी इंग्रजि माध्यमात ठेवले तरी त्याला इंग्रजीचे पुर्ण ज्ञान घेता येणार नाही कारण मुळातच ही भाषा शिकायला अक्कल लागते.जर एखादा भारतीय विद्यार्थी जात्याच हुशार असेल तर तो कोणत्याहि माध्यमात शिकला तरी त्याला इंग्रजी सहज आत्मसात करता येईल.माझ्या बरोबर मराठि माध्यमात शिकलेले अनेकजण केवळ बुद्धीमत्तेमुळे इंग्रजी आत्मसात करु शकले व आज ते परदेशात डॉलरमध्ये खेळत आहेत व माझ्यासारखे बेताची अक्कल असलेले आजही इंग्रजीत बोलताना चाचपडतात तात्पर्य काय ,अक्कल असेल तर मराठी माध्यमात शिकुनसुद्धा इंग्रजिवर प्रभुत्व मिळवता येते ,जगभरातल्या संधी दाराशी येतात व आमच्या सारखे सुमार बुद्धिमत्तेचे लोक तंबाखु मळत पाट्या टाकत बसतात. ( आपला पाल्य हुशार असेल तर बिनधास्त मराठी माध्यमात घालावा)
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 06/28/2016 - 09:31

In reply to माझे मत थोडे वेगळे आहे ,मुळात by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

Permalink

_/\_

_/\_
  • Log in or register to post comments

Submitted by सुचिकांत on Wed, 06/29/2016 - 13:58

In reply to माझे मत थोडे वेगळे आहे ,मुळात by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

Permalink

अत्यंत बेजबाबदार विधान करताय!

अत्यंत बेजबाबदार विधान करताय! @'टर्बोचार्जड फिलॉसॉफर' - शहरातल्या मोठ्या इस्पितळामध्ये दरवर्षी शाळा सुरु व्हायच्या वेळी, आयक्यू तपासणी कार्यक्रमासाठी पालक येतात, आणि डॉक्टर सांगतात आयक्यू चांगलाच आहे, तुम्ही तुमच्या मुलांना मातृभाषेतून शिकवा. इंग्रजी शिकायला काय आयक्यू लागतो? काहीही !!! गोव्यात गेला तर, फेरीवाला पण चांगलं इंग्रजी बोलू शकतो! बुद्धीमत्तेचे विविध प्रकार आहेत. भाषिक बुद्धिमत्ता त्यापैकी एक. एखाद्या उत्कृष्ट mechanical engineer चे इंग्रजी जर कच्चे असेल तर त्याचा आयक्यू कमी आहे म्हणता येईल का? यावर विचार करा. मुलांचा कल कोणत्या दिशेला आहे, हे जर ठरवायचे असेल तर पहिल्या पासून मातृभाषेतून शिक्षण कधीही चांगलेच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 06/29/2016 - 19:52

In reply to माझे मत थोडे वेगळे आहे ,मुळात by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

Permalink

खिक्क...गिर्जाचा सल्ला जास्तच

खिक्क...गिर्जाचा सल्ला जास्तच मनावर घेतलात काय? =))
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 06/29/2016 - 19:15

Permalink

'अनावस्था' हा शब्द या चर्चेत

'अनावस्था' हा शब्द या चर्चेत वाचण्यात आला. 'दुरवस्था' + 'अनास्था' या दोहोंपैकी काय अपेक्षित आहे काही कळले नाही! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on गुरुवार, 06/30/2016 - 07:43

In reply to 'अनावस्था' हा शब्द या चर्चेत by एस

Permalink

.

हायब्रीड
  • Log in or register to post comments

Submitted by नमकिन on Fri, 07/01/2016 - 08:20

In reply to 'अनावस्था' हा शब्द या चर्चेत by एस

Permalink

दुरवस्था

चपखल. अनवस्था प्रसंगंच म्हणायचा हा. बाकी अनावस्था= अनावश्यक आस्था होईल का?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com