Skip to main content

पेटुनी आरक्त संध्या...

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 22/03/2017 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे... केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे! मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे... वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे! काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे... सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे! एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी... त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे! मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही... आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे! सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी... मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे! —सत्यजित
लेखनविषय:

वाचने 6648
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

छान

तत्काळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद...हरवलेला!

मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही... आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!
हा शेर आरपार गेला! लाजवाब!!

एक बारीकशी सूचना. ओळींच्या पुढे टिंबे देण्याची गरज फार क्वचित असावी. अनेक ठिकाणी टिंबे दिल्याने शेरात व्यक्त झालेले विचार अधूरे आहेत की काय असे वाटून शेर विसविशीत व्हायची शक्यता वाटते.

चतुरंगजी,मितानजी,अपूर्वजी मनापासून धन्यवाद!

साधारण पणे मला कवितेतील रचनेत काही चूक आहे का पहायची (वाईट) सवय आहे. पण आपली ही गजल एकदम परफेक्ट .पहिल्या शेरात पहिली ओळ ही प्रकाशाशी संबंधित आहे मग दुसरी ओळ एकदम गंध या संकल्पनेवर का ? हे विचारण्याचे कारण असे की बाकी सर्व शेर वाचले असता पहिली ओळ व दुसरी ओळ यात एकच विषय व त्याची दुसरी बाजू मांडली आहे. उदा. सुनसान बाजार व वादळ, काजवे व सूर्य . ई. बाकी एक शेर माझ्या मानसिकतेशी जुळणारा आहे तो असा मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही... आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे! अर्थात सावन आये या ना आये जिया जब झूमे सावन है तार मिले जब दिलसे दिले वही समय मनभावन है ही ती मानसिकता . आपल्या रचनेचा आनंद घेतला आहे ! असेच मस्त लिहित रहा !

In reply to by चौकटराजा

पहिल्या ओळीत धग व दुसरीत शीतलता असे तर नाही ........ ? अंगार व केवडा....... अं ?

In reply to by चौकटराजा

दिलखुलास प्रतिसादाबद्दल खूप-खूप धन्यवाद अरुणजी! माझ्या लेखनात सुधारणा होणार असेल तर रसिकांच्या सूचनांचे स्वागतच आहे!आवश्यकता वाटेल तेंव्हा तेंव्हा निःसंंकोचपणे कळवाल कृपया! पुनश्च धन्यवाद! मतल्याबद्दल— >>>पहिल्या ओळीत धग व दुसरीत शीतलता>>>मला असेच काही अपेक्षित होते!

सत्यजित, सुन्दर ग़ज़ल ! एक अप्रिय,अनाहूत पण मनापासून सल्ला देतोय .... तुझ्यातल्या खर्‍या कवीला न्याय देण्यासाठी तुला ग़ज़लच्या बेड्या तोडाव्या लागतील. कवितेच्या कोणत्याही आकृतीब॓धात वा मुक्तछ॓दातही झळाळून उठेल अशी तुझ्या प्रतिभेची जातकुळी आहे, ती ओळख !!!

In reply to by अनन्त्_यात्री

आ.उदयजी, आपण माझ्या लेखणीबद्दल दाखवलेला विश्वास आणि सोबतच दिलेला सल्ला,हाती शुभेच्छा घेवून नव्या जबाबदारीप्रमाणे माझ्यासमोर उभे आहेत! आपण म्हणता तसे अधून-मधून इतर प्रकारांत लिहावयाचा प्रयत्न करुनही मनासारखे काही जमून येते असे वाटतच नाही! खरेतर सुरवात मुळी मुक्तछंदातूनच झालेली असली तरी माझ्याही नकळत,मराठी कवितेच्या या प्रकाराने एक प्रकारचे गारुडच घातले आहे मनावर!आपल्या सूचनेवर शक्य तेवढ्या त्वरेने लेखणी चालती होईल अशी स्वतःकडूनच अपेक्षा ठेवतो आहे!या प्रवासात मला आपल्या मार्गदर्शनाची गरज पडेलच! आपला स्नेह मिळत राहीलच या अपेक्षेसह... —सत्यजित

मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही... आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!
मुजरा घ्या मालक..!

In reply to by अत्रुप्त आत्मा

आ.आत्मबंधजी, आपल्याकडून मिळालेली ही मनमोकळी दाद...ऊराशी कवटाळावी इतकी अल्हादक आहे!त्यासोबतच पुढील लेखनाचा हुरुप वाढवून आदेशीत करणारी आहे! खूप-खूप धन्यवाद!

पण फार छान नाही.

आ.संजयजी, ही गझल म्हणावी तशी आपल्या अपेक्षेस उतरली नसतानाही आपण मोठ्या मनाने कौतुकच केलेत! अजून बेहतर लिहिण्याचा यत्न राहीलच...आपल्या शुभेच्छा कायम असू द्यात पाठीशी!

संदीपजी,सौरा,प्राची अश्विनी,सानझरी,पैसा...आपले आणि सर्वच रसिक-प्रतिसादकांचे हार्दीक आभार! आपला स्नेहांकीत, —सत्यजित

सुंदर ! मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही... आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे! आणि सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी... मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे! या ओळी विशेष आवडल्या.

एस,फुत्कार,सुहासजी,सुमीतजी,शैलेंद्रजी सर्वांचे धन्यवाद!