वाबळेवाडीची शाळा - विलक्षण प्रेरणादायी अनुभव

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
29 Apr 2016 - 12:27 am

ब्लॉग दुवा: http://www.apurvaoka.com/2016/04/wablewadi-school-visit-inspirational.html

ज्या शाळेतून मुलांचा पाय निघता निघत नाही, त्या शाळेला भेट दिल्यावर आमचेही पाय तिथून निघत नव्हते. वाबळेवाडीच्या शाळेबद्दल इंटरनेटवर वाचल्यापासून ती शाळा बघण्याची खूप इच्छा आणि उत्सुकता होती. एका नकोनकोशा वाटणा-या शाळेतून एका हव्याहव्याशा शाळेत झालेलं तिचं रुपांतर आम्हाला बघायचं होतं. तिथली नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती समजून घ्यायची होती. तिथल्या मुलांशी, त्यांना घडवणा-या शिक्षकांशी आम्हाला बोलायचं होतं. त्यानुसार लवकरात लवकर शाळेशी संपर्क साधला, आणि शाळेला भेट दिली. त्या भेटीचा हा सचित्र वृतांत.

a

शाळेचा नेमका पत्ता नकाशात न दिसल्याने मुख्य हायवेवर एका व्यक्तीला 'वाबळेवाडीला कसं जायचं?' असं विचारताच 'शाळेत जायचंय?' असा प्रतिप्रश्न आला आणि त्या शाळेच्या कीर्तीची पहिली खूण पटली. दत्तात्रेय वारे यांच्या संकल्पनेतून आणि सोबत असलेल्या सर्व शिक्षकांच्या सहयोगातून २०१२ पासून पुढे या शाळेचा कायापालट झाला आणि शाळेने एक उदाहरण इतर शिक्षणसंस्थांसमोर ठेवलं.

a1

दत्तात्रेय वारे, हे वाबळेवाडीच्या शाळेचे मुख्याध्यापक. आम्ही शाळेत जाताच वारे सरांनी आमचं स्वागत केलं. या शाळेचा भूखंड तसा लहान आहे. पण असं असताना त्या जागेचा पुरेपूर आणि प्रभावी वापर केलेला आम्ही बघत होतो. पटांगणातील जमिनीवर विशिष्ट प्रकारे काढलेले अंक आणि अक्षरं, खांबांबर असलेली, खंड, नद्या, पर्वत, ऋतू, इत्यादींची माहिती, फरशांवर आखलेली कोष्टकं, तक्ते, या सगळ्यामुळे लहान जागेतही माहितीचं मोठं भांडार मुलांसाठी भरलेलं होतं. शाळेत मुलांना यावंसं वाटण्यासाठी शाळेतलं वातावरण तसं पूरक हवं, हा वारे सरांचा विचार ठिकठिकाणी दृश्य रुपात दिसतो.

a2

a4

a3

पूर्व प्राथमिकच्या वर्गातील बाईंशी, मुलांशी आम्ही बोलत होतो. त्या मुलांचा धीटपणा बघून खूश व्हायला होत होतं. पाटीवर नावं लिहिणं, चित्र काढणं, असं सगळं आम्ही एका गोलात बसून करत होतो. पूर्व प्राथमिकच्या बाई सांगत होत्या, 'आम्ही मुलांना कसलंही दडपण देतच नाही मुळी. आता आत्ताच सगळे खेळत होते, ते म्हणाले आता आम्ही पाटीवर लिहितो, मी म्हटलं लिहा. हसत खेळत अभ्यास या विचाराला धरूनच इथे गोष्टी शिकवल्या जातात. चांगल्या सवयीही शिकवल्या जातात. म्हणजे वाढदिवस असेल तर आम्ही सांगतो की चॉकलेट आणू नका, आणि खाऊही नका. ते चांगलं नसतं म्हणून. मग पालकही तसं करतात.'

a5

इथे एक गोष्ट सतत जाणवत होती ती म्हणजे कमालीची स्वच्छता. पूर्व प्राथमिक वर्गाला लागूनच असलेलं शाळेचं स्वयंपाकघर इतकं नीटनेटकं होतं, की विश्वास बसत नव्हता.

a6

आम्ही शाळेत जाऊन मुलांसाठी काही कार्यशाळा घ्यायचं, मुलांसोबत मिळून काही गोष्टी करायचं ठरवलं होतं. शाळेत पूर्व प्राथमिक ते पाचवी पर्यंतचे वर्ग भरतात. चित्र काढून झाल्यावर आम्ही इतर इयत्तांच्या मुलांना एकत्र घेऊन सगळ्यांना एका पुस्तकातल्या दोन गोष्टी सांगितल्या.

गोष्टी ऐकताना मुलांचं असणारं लक्ष, पडणारे प्रश्न, त्यांनी दिलेली उत्तरं हे सगळं खूप छान होतं. मग मुलांना बॅडमिंटन शिकवत व खेळत पुढे काही वेळ आम्ही व्यतीत केला. उत्साह, आणि आत्मविश्वास हे दोन गुण प्रत्येक गोष्टीत इथली मुलं दाखवत होती. बॅडमिंटन खेळतानाही ते दिसत होतं. आपल्याला कळलेलं आणि दुसर्‍याला न जमणारं असं सगळं त्याला स्वतःहून मुलं समजवून सांगत होती. नेतृत्वगुण, व्यवस्थापन वगैरे कुठल्याही संज्ञा ठाऊक नसलेली मुलं हे सगळं आत्मसात करून होती. कबड्डी खेळतानाही त्यांच्यातला जोश बघून दोन मिनिटं आम्हीही मागे सरलो.

a7

इथे विद्यार्थ्यांना शक्य असलेली प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून दिलेली आहे. अनेक पुस्तकं, जवळजवळ प्रत्येक खेळासाठी लागणारी उपकरणं, अनेक वाद्यं, वैज्ञानिक उपकरणं, टॅबलेट्स, कॉम्प्यूटर, असं सगळं या शाळेत आहे. वारे सर म्हणाले, 'गोल्फ सोडून सगळ्या खेळांचं साहित्य इथे आहे. मुलांना सगळं काही उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे'. शिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक, इतर चांगले चित्रपटही दाखवले जातात. विद्यार्थ्यांना 'तुम्हाला तुमच्या शाळेबद्दल काय आवडतं?' असं विचारल्यावर 'सगळंच' आणि 'तुम्हाला तुमच्या शाळेत अजून काय हवं असं वाटतं?' असं विचारल्यावर 'काहीच नाही. आमच्या शाळेत सगळं आहे.' अशी मिळालेली उत्तरं ही ख-या अर्थाने वारे सर आणि इतर सर्व शिक्षकांच्या कष्टाची पावती आहे.

a8

या शाळेतली अशी एक एक गोष्ट बघत आम्ही प्रेरित होत होतो. वारे सरांशी बोलताना सर म्हणाले, 'ही शाळा जेंव्हा या बदलातून गेली, तेंव्हा आमचं बघून जिल्ह्यातल्या इतर अनेक शाळांनी याप्रकारे शिक्षणपद्धतीत बदल केले. आमच्या शाळेला क्रमांक एकची जिल्हापरिषद शाळा ठरण्याचा मान मिळाला असून त्याबद्दल फार आनंद होतो. आज आसपासच्या इंग्रजी शाळातून मुलांना काढून पालक आमच्या शाळेत प्रवेश घेतात, लांबलांबहून घेऊन येतात. आणि इथली मुलं निश्चितच इतर मुलांपेक्षा उजवी ठरतात'

a9

उन्हाळ्यात फ्रीजमधलं पाणी पिऊ नये, त्याने आजारी पडण्याचा धोका असतो यासारखी लहान पण महत्वाची गोष्ट, किंवा आपण जसं एखाद्या मित्राकडे पेन्सिल नसेल तर त्याला आपल्याकडची जास्तीची पेन्सिल देऊन मदत करतो, तसंच आज आपल्या राज्यात अनेक शेतकर्‍यांकडे शेतीला पाणी नाही, पैसे नाहीत तर आपण आपल्याला शक्य होईल तितकी मदत त्यांना करायला हवी यासारखी गोष्ट जितक्या उत्तमप्रकारे समजावून इथले खैरे सर मुलांना सांगत होते, तितक्या प्रेमाने आजकाल फार कमी शिक्षक मुलांशी बोलत असतील. या शाळेत एकंदरितच मुलांना चांगल्या सवयी लावणं, चांगले विचार पेरणं याला शिक्षक प्राधान्य देतात.

माध्यमाबद्दल विचारलं असता वारे सर म्हणाले, 'काही गोष्टींच्या बाबतीत आम्ही ठाम आहोत. त्यामुळे आम्हाला सीबीएसई, सेमी इंग्लिश इत्यादी पर्याय खुले असूनही आम्ही त्यांचा विचार केला नाही. शेवटी ज्ञान महत्वाचं की भाषा हे ठरवायचं आहे. शाळेचं माध्यम मराठीच आहे, कारण आपली, मुलांची मातृभाषा मराठी आहे. परंतु पहिलीपासून हिंदी व इंग्लिश या भाषा शिकवल्या जातात आणि त्यामुळे मुलांना कुठेच भाषेची अडचण येत नाही.' याची प्रचीती जेंव्हा पूर्व प्राथमिकच्याही मुलांनी आम्हाला इंग्लिशमधे आपली नावं सांगितली, तेंव्हा आलीच.

इथली मुलं अनेक खेळांमधे आणि कलांमधे पारंगत आहेत आणि त्याचं बरंचसं श्रेय वारे सरांना जातं. मुलांना नेमबाजी शिकवता यावी यासाठी स्वतः बालेवाडीला जाऊन नेमबाजीचं प्रशिक्षण घेऊन येणं, मुलांना प्रशिक्षण देणं आणि राज्यस्तरावर पदक जिंकणारी मुलं त्यातून घडवणं हे मोठ्या जिद्दीचं आणि त्याहूनही जास्त आत्मीयतेचं उदाहरण वारे सरांच्या रुपात या शाळेत आहे.

a10

वारे सर सांगत होते, 'अडचणी, प्रश्न आमच्यापुढेही होते. पण फरक इतकाच की आम्ही आमच्या पद्धतीने त्यावर उत्तरं शोधली आणि पुढे गेलो. यात पालकांचा सिंहाचा वाटा आहे कारण आजवर आम्ही जेंव्हा जेंव्हा हाक दिली तेंव्हा तेंव्हा आमच्या मदतीला पालक उभे राहिले आणि आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला मदत केली. निवडणुका या गावातही होतात पण शाळा ही सर्वांची आहे आणि सर्वांसाठी आहे हे गावकर्‍यांनी समजून घेतलं म्हणूनच हे साध्य झालं.'

a11

या शाळेत पालकांचा सक्रीय सहभाग असतो. एखादी गोष्ट एखाद्या पालकांना उत्तम येत असल्यास ती ते मुलांना शिकवू शकतात. अशाच एक पालक या मुलांना कला, व कार्यानुभव शिकवतात. कला दालनात गेल्यावर मुलांनी काढलेली चित्र, तयार केलेल्या गोष्टी बघताना थक्क व्हायला होतं.

आम्ही जितकं वाचून गेलो होतो त्याच्या कित्येक पटीत प्रेरणादायी आमचा हा अनुभव होता. एका मुलाला वारे सरांनी आमच्यासमोर तिनाच्या पटीतले अंक, पंधराचे निम्मे किती, साताचे निम्मे किती, साडेतीन च्या अर्धे किती, अमूक अमूक रुपये कुणाला द्यायचे असल्यास कितीच्या किती नोटा द्याव्यात असे प्रश्न विचारले आणि त्याची त्या मुलाने एकेक सेकंदात उत्तरं दिली. सर जेंव्हा म्हणाले की हा मुलगा पहिलीत आहे आणि त्याला गणितासारखं गणित शिकवलेलं नाही, तेंव्हा हसत खेळत शिक्षण किंवा ज्ञानरचनावाद या विषयी आणखी प्रश्नच आमच्याकडे उरले नाहीत.

'आमच्याकडे जेंव्हा पुरेशी जागा असेल तेंव्हा आज जी मराठी शाळांची अवस्था आहे, की त्यांच्याकडे मुलं फिरकतही नाहीत, ती अवस्था इथल्या इंग्रजी शाळांची होईल असा आम्हाला विश्वास आहे', हे वारे सरांचं म्हणणं आणि त्यांचा हाच विनम्र आत्मविश्वास हा खर्‍या अर्थाने या शाळेचा कणा आहे. वाबळेवाडीत या वर्षीही जागांच्या तिपटीपर्यंत प्रवेश अर्ज आले. अनेक मुलं अशी आहेत ज्यांना इंग्रजी, सीबीएसई शाळांतून काढून पालकांनी वाबळेवाडीच्या या शाळेत घातलं आहे, आणि लांबलांबहून इथे ती येतात.

शिक्षण या गोष्टीचा आपल्याकडे प्रचंड बाऊ केला जातो आणि त्याचा मुलांवर होणारा वाईट परिणाम 'स्पर्धेचं युग' म्हणून झाकला जातो. विशेषतः शहरांत हे लोण जास्त पसरलेलं आहे. त्यातही शाळेत दिल्या जाणा-या शिक्षणापेक्षा शाळेचं नाव, बोर्ड, माध्यम, दिखाव्याच्या सुविधा, आणि अनेक अनुचित गोष्टींकडे शाळेच्या दर्जाचं मापक म्हणून बघितलं जातं आणि तिथेच मुलांची फरफट सुरू होते. सगळं असूनही जिथे शहरातल्या अनेक शाळा अपुरी अनुदानं, अपुरं सहकार्य आणि इतर अनेक कारणं देतात, तिथे वाबळेवाडीच्या या शाळेने गाठलेली ही उंची कमालीची स्तुत्य आहे. तेंव्हा पुढे आपल्या मुलासाठी शाळा निवडताना योग्य निकषांचा यथोचित विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे.

a13

आज पुणे जिल्ह्यात अनेक शाळांनी वाबळेवाडीच्या शाळेसारखी शिक्षणपद्धती अवलंबली आहे. असं म्हणायला हवं की सकारात्मकता ही संसर्गातूनच पसरते, त्याचे डोस देता येत नाहीत. शिक्षणातली ही सकारात्मकता पुण्यामुंबईतही नक्कीच पसरेल, परंतु शाळांच्या आधीही पालकांनी त्यासाठी तयार असणं गरजेचं आहे. तेंव्हा शक्य असल्यास जरूर या शाळेला भेट द्या आणि सहसा शाळेत जाताना मुलांच्या चेहर्‍यावर न दिसणारा आनंद बघा. या शाळेत येऊन गेल्यावर आमच्यासारखंच तुम्हालाही कदाचित विद्यार्थी म्हणून पुन्हा एकदा 'अशा' शाळेत जावंसं वाटेल.

'पुन्हा कधी येणार?' या मुलांनी विचारलेल्या प्रश्नाला 'लवकरच येऊ हं, नक्की' हे उत्तर आपसुक आमच्याकडून आलं. कारण आमच्यासाठी इतकं भारून टाकणारा हा अनुभव फार वेगळी ऊर्जा देणारा होता.

http://www.zpschoolwablewadi.org/
Google Maps Link

समाजजीवनमानतंत्रशिक्षणमौजमजालेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

विद्यार्थी's picture

29 Apr 2016 - 12:45 am | विद्यार्थी

आपल्या आजूबाजूला अनेक लोक खरोखर प्रेरणादायी काम करत असतात. टीव्हीवर अविरतपणे दिसणाऱ्या नकारात्मक बातम्यांच्या जमान्यात मिपावरचे असे लेख मनाची निराशा घालवण्याचे काम करतात. या सुंदर आणि सकारात्मक माहितीसाठी मनापासून धन्यवाद.

यशोधरा's picture

29 Apr 2016 - 12:50 am | यशोधरा

फारच मस्त आणि सकारात्मक!

धन्यवाद, वेल्लाभट. या लेखाची वाट पाहत होते. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन आलात त्याबद्दल तुमचे कौतुक. खुप प्रेरणादायी काम, खास करुन फंडींग नसताना. ही शाळा सुंदर दिसतेच आहे, त्यांना जमेल ती मदत करायला आवडेल. तुम्ही मागे म्हणला होतात त्या प्रमाणे काही पुस्तकं / सीडीज पाठवेन म्हणते.

वा वा ! खरंच प्रेरणादायी !! मलाही या शाळेला भेट द्यायला नक्कीच आवडेल.

एक एकटा एकटाच's picture

29 Apr 2016 - 7:08 am | एक एकटा एकटाच

अगदी बरोबर बोललात

लेख वाचुन शाळेला भेट द्यावीशी वाटतेय

मार्गी's picture

29 Apr 2016 - 7:48 am | मार्गी

अरे वा! खूप सुंदर. महत्त्वाची माहिती दिलीत.

देश नक्केच पुढे जावू शकतो.

नाखु's picture

29 Apr 2016 - 8:52 am | नाखु

वेल्लाभौंना आणि शाळेला,पालकांच्या पाठींब्याला,वारे सरांना मुजरा..

जिल्हा परिषद शाळेत २ वर्षे शिकलेला नगरी नाखु

मार्मिक गोडसे's picture

29 Apr 2016 - 9:04 am | मार्मिक गोडसे

'शाळेत पालकांचा सक्रीय सहभाग' ही कल्पना आवडली.

सकारात्मकता ही संसर्गातूनच पसरते, त्याचे डोस देता येत नाहीत.

मस्तच.

वाचनखूण साठवली आहे. एक दिवस नक्कीच भेट देईन.

सुंदर शाळा. कमालीची स्वत्छता दिसतेय.
आधी कुठल्याश्या वाहिनीने दखल घेतली होती. इथे सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

अशा शाळेला मदत करायला आवडेल.अजून अशा शाळा तयार व्हायला हव्यात.

अनुप ढेरे's picture

29 Apr 2016 - 10:21 am | अनुप ढेरे

मस्तं!

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2016 - 12:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत अप्रतिम, स्पृहणिय काम चालवले आहे वारेसर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी !!!

असेच लोक खरे देशबांधणीचे काम करत आहेत !

धन्यवाद वेल्लाभटसाहेब ही माहिती आम्हाला दिल्याबद्दल.

सकारात्मकता ही संसर्गातूनच पसरते, त्याचे डोस देता येत नाहीत.
याला +१००,००० !

वेल्लाभट's picture

29 Apr 2016 - 3:09 pm | वेल्लाभट

सगळ्यांचे आभार. वृत्तांत टाकायला उशीर झाला काही कारणांमुळे. पण अनुभवाचा ताजेपणा तसूभरही कमी नाही. आता सुट्टी आहे शाळांना. पुढे या भागातल्या अशा इतर काही शाळांना भेटी देऊन काही अ‍ॅक्टिविटी, काही वर्कशॉप, किंवा मुलांसाठी काहीतरी करण्याची योजना आहे.

यशोधरा's picture

30 Apr 2016 - 2:43 am | यशोधरा

पुढे या भागातल्या अशा इतर काही शाळांना भेटी देऊन काही अ‍ॅक्टिविटी, काही वर्कशॉप, किंवा मुलांसाठी काहीतरी करण्याची योजना आहे.

मला जमल्यास मदत करायला आवडेल.

वेल्लाभट's picture

2 May 2016 - 2:36 pm | वेल्लाभट

मग संपर्क करू का प्लॅन ठरेल तेंव्हा?

यशोधरा's picture

6 May 2016 - 1:58 am | यशोधरा

जरुर.

मृत्युन्जय's picture

29 Apr 2016 - 3:40 pm | मृत्युन्जय

काय सुंदर शाळा आहे. लेखनही अतिशय प्रेरणादायी आहे.

अतिशय प्रेरणादायी आणि सकारात्मक काम घडतंय या शाळेत.ते माहिती करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!

मधुरा देशपांडे's picture

29 Apr 2016 - 4:23 pm | मधुरा देशपांडे

स्तुत्य आणि सकारात्मक उपक्रम. धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल.

पिलीयन रायडर's picture

29 Apr 2016 - 5:24 pm | पिलीयन रायडर

मी मनापासुन सांगते की इतकं छान वाटलं हा वृतांत वाचुन की आपण इथे जाउन रहावं आणि पोराला सध्याच्या शाळेतुन काढुन इथेच शिकावावं. सध्या ज्या पद्धतीने माझ्या मुलाच्या शाळेत शिकवणे चालु आहे, ते पहाता लवकरच मी वैतागुन जिल्हा परिषदेची शाळा गाठणार असं दिसतंय. बरं दुसर्‍या शाळेत घालावं तरी एक झाकुन दुसरी काढावी इतक्या सगळ्याच येड्या शाळा आहेत. आपण मुलांना काय शिकवतोय? का शिकवतोय? कसं शिकवतोय? हे सगळं बाजुला ठेवुन "किती शिकवतोय" बसं एवढंच शिक्षक पहात आहेत. किती भला मोठा सिलॅबस पोरांच्या वह्यांमध्ये ओतला (डोक्यात नाही) ह्यावर सगळे लक्ष. "हसत खेळत" हा तुमच्या लेखातला फार महत्वाचा शब्द आहे. पोरं आपसुक शिकायला हवीत हो ह्या वयात. अंक आणि बाराखडी शिकवायला एवढा जीव का काढायचा?

सगळं कौतुक वारे सरांचं आहे. जेव्हा एखादा शिक्षक शाळेसाठी झोकुन देऊन काम करतो तेव्हा ती शाळा नेहमीच वेगळी उठुन दिसते.

खरंच इतक्या सहजतेने शिक्षण देणारी अजुन कोणती शाळा आहे पुण्यात? मी घर बदलुन तिथे जायला तयार आहे. अट एकच की पोरगं उड्या मारत शाळेत गेलं पाहिजे.

वेल्लाभट's picture

30 Apr 2016 - 3:47 pm | वेल्लाभट

पुण्यात म्हणाल तर ज्ञानप्रबोधिनी, अक्षरनंदन आहेत शिक्रापूरजवळ ही, करडेलवाडी व अजून काही आहेत....

तुम्ही पक्कया असाल तर सगळं शक्य आहे. मला सुधा मुंबईतल्या शाळांमधे राम वाटत नाही... काय करायचं विचार चालू आहे.

नुस्त्या उचापती's picture

30 Apr 2016 - 12:21 am | नुस्त्या उचापती

वेल्लाभट आणि सर्व मिपाकरांचे वारे सर आणि त्यांच्या स्टाफच्या वतीने मी आभार मानतो . कारण असे कौतुक क्वचितच आमच्या वाटयाला येते . जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकत आहेत . अनेक चांगले उपक्रम राबवत आहेत .आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने विदयार्थी घडवत आहेत . अक्षरशः शेकडो शाळांनी ISO मिळवले आहे .
वाबळेवाडी सारख्या अनेक शाळा आज ग्रामीण भागात आहेत . त्यासाठी कित्येक शिक्षक रात्रंदिवस झटत आहेत .आम्हांला गरज आहे ती फक्त कौतुकाची .
तुम्ही ' पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा . '

..... एक शाळा ISO करण्याच्या प्रयत्नात असलेला प्राथमिक शिक्षक .

स्रुजा's picture

30 Apr 2016 - 5:27 am | स्रुजा

तुमच्या शाळे बद्दल आणि कामाबद्दल पण माहिती वाचायला आवडेल.

वेल्लाभट's picture

30 Apr 2016 - 3:49 pm | वेल्लाभट

याबद्दल लिहावं असं आग्रहाने सांगेन

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2016 - 4:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !

तुमच्या शाळेबद्दलही वाचायला आवडेल... अगदी पहिल्यापासून ते भविष्यात तुम्हाला ISO सर्टिफिकेट मिळेपर्यंतची वाटचाल आणि नंतरचे अनुभवही इथे टाकावे असा आग्रहाने सांगू इच्छितो ! त्यामुळे इतरांना माहिती व प्रेरणा मिळेल.

तसेच, तुम्हाला काही मदतीची गरज पडली तर तेही इथे लिहा. चांगल्या कामात मिपाकर मागे राहत नाहीत असाच अनुभव आहे.

'गुरुने दिला ज्ञानरुपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा' हे अगदी सार्थ ठरवता तुम्ही शिक्षक!
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. :)

रेवती's picture

30 Apr 2016 - 4:11 am | रेवती

लेखन आवडले. खूपच चांगला उपक्रम.

खटपट्या's picture

30 Apr 2016 - 4:35 am | खटपट्या

खूप छान लेख आणि माहीती. सर्व फोटोही मस्त आहेत. पहीला फोटो तर स्पर्धेत देण्यासारखा आलाय.

विवेकपटाईत's picture

30 Apr 2016 - 4:26 pm | विवेकपटाईत

अशी शाळा असेल तर मुलांना शाळेत जाण्याची भीती वाटणारच नाही. हौशीनी शाळेत जातील. माहित साठी धन्यवाद.

नीलमोहर's picture

30 Apr 2016 - 4:37 pm | नीलमोहर

आदर्श शाळा कशी असावी याचे अतिशय सुंदर उदाहरण..

बरखा's picture

30 Apr 2016 - 4:47 pm | बरखा

"आमच्याकडे जेंव्हा पुरेशी जागा असेल तेंव्हा आज जी मराठी शाळांची अवस्था आहे, की त्यांच्याकडे मुलं फिरकतही नाहीत, ती अवस्था इथल्या इंग्रजी शाळांची होईल असा आम्हाला विश्वास आहे', हे वारे सरांचं म्हणणं आणि त्यांचा हाच विनम्र आत्मविश्वास हा खर्‍या अर्थाने या शाळेचा कणा आहे. "

अशा शाळेला आणि त्यांच्या या आत्मविश्वासु सरांना खुप खुप शुभेच्छा !

चांदणे संदीप's picture

30 Apr 2016 - 7:01 pm | चांदणे संदीप

आता पुन्हा शाळेत जाऊन बसावसं वाटतंय!

या माहितीपूर्ण लेखासाठी धन्यवाद वेल्लाभट!

वर नुस्त्या उचापती सरांनाही पुढच्या त्यांच्या सर्व कार्यांसाठी मनपूर्वक शुभेच्छा!!

Sandy

नुस्त्या उचापती's picture

30 Apr 2016 - 10:41 pm | नुस्त्या उचापती

आता पुन्हा शाळेत जाऊन बसावसं वाटतंय!

कधीही या आमच्या शाळेत .आपलं स्वागतच आहे .
शाळेतच कट्टा करु .

कानडाऊ योगेशु's picture

30 Apr 2016 - 10:57 pm | कानडाऊ योगेशु

सकारात्मक वाचायला मिळाले.
एक प्रश्न आहे.
तिथल्या स्टाफ ला वारे सरांनी कसे मोटीवेटेड ठेवले आहे.?
इथल्या बेंगलोरमध्ल्या शाळांमधली एक नेहेमीची बोंब म्हणजे अ‍ॅट्रीशन भरपूर आहे. एकाच वर्षी एका वर्गावर २-३ नवे शिक्षक/शिक्षिका येतात जातात. प्रत्येकाची वेगळी पध्दत. ती एक डोकेदुखीच आहे.

नुस्त्या उचापती's picture

30 Apr 2016 - 11:10 pm | नुस्त्या उचापती

गेल्या वर्षी ' एक दिवस शाळेसाठी ' नावाचा उपक्रम राबवला गेला . यामध्ये सर्व प्रशासकिय विभागांमधील अधिकाऱ्यांनी एक पूर्ण दिवस शाळेत घालवायचा होता .आमच्या शाळेत आलेल्या अधिकाऱ्याने सकाळी अगदी सफाईपासून ते शेवटी 'वंदे मातरम् ' होईपर्यंत हिरिरीने सहभाग घेतला . दिवसभर मुलांमध्ये ते रमून गेले होते .मु मुले देखिल आलेल्या नव्या ' गुरुजींवर ' खूश होते . शाळा सुटल्यावर बराच वेळ त्यांचा पाय निघत नव्हता . त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . नक्कीच तो दिवस त्यांच्या कायम स्मरणात राहिला असेल .

टवाळ कार्टा's picture

1 May 2016 - 12:03 pm | टवाळ कार्टा

सुरेख

वेल्लाभट's picture

2 May 2016 - 12:51 pm | वेल्लाभट

पुन्हा सर्वांचे आभार.

शक्य झाल्यास या धाग्याची लिंक पसरवा (कसंकाय चेपु इत्यादीवर) अशी विनंती करेन, इतकाच उद्देश की ही माहिती अनेकांपर्यंत जाऊन अनेक डोक्यांत विचार सुरु व्हावा... उत्तम शिक्षणाच्या व्याख्या तपासल्या जाव्यात.

चाणक्य's picture

2 May 2016 - 1:37 pm | चाणक्य

छान वाटले वाचून. वारे सर आणि त्यांच्या स्टाफचं अभिनंदन व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा.

सुनील's picture

2 May 2016 - 2:11 pm | सुनील

शाळा आणि लेख दोन्ही आवडले.

मिपावर पूर्वी एक अत्तार सर म्हणून कोकणातील एका शाळेतील शिक्षक होते. तेदेखिल त्यांच्या शाळेत विविध उपक्रम राबवीत आणि मिपावर लेख लिहून माहिती देत. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आलेले दिसले नाहीत.

एस's picture

2 May 2016 - 3:21 pm | एस

इथे मिपाकर 'शनअत्तार' सरांचे लेख वाचता येतील.

सनईचौघडा's picture

2 May 2016 - 3:37 pm | सनईचौघडा

है शाब्बास रे अपुर्वा.
हा लेख इथे लिहलास त्याबद्दल धन्यवाद, आणि असे प्रयत्न करणार्या अनेक जि.प. च्या सर्व शाळेतील उप्रक्रमांना / गुरुजींना शुभेच्छा!

अभिजीत अवलिया's picture

5 May 2016 - 12:04 pm | अभिजीत अवलिया

एकदा भेट दिलीच पाहिजे ह्या शाळेला.

पैसा's picture

5 May 2016 - 1:59 pm | पैसा

अतिशय प्रेरणादायी काम आहे. नाहीतर बहुतांश शाळा शिक्षकांबद्दल अनादर उत्पन्न करायचं काम करत असतात!

नुस्त्या उचापती सरांचेही अनुभव वाचायला नक्की आवडतील!

त्रिवेणी's picture

5 May 2016 - 2:36 pm | त्रिवेणी

खुप छान लेख.पुढच्या वेळी असे कुठल्या शाळेत जाणार असल तर नक्की सांगा.१००% येणार.आणि एखाद्या शाळेला माझ्या परीने नक्की मदत करांयला आवडेल.

वेल्लाभट's picture

5 May 2016 - 2:48 pm | वेल्लाभट

जरूर.

उल्का's picture

5 May 2016 - 3:24 pm | उल्का

खूप सुंदर लेख. :)
काय स्वच्छ, सुन्दर आहे ही शाळा.

पिलीयन रायडर's picture

6 May 2016 - 11:48 am | पिलीयन रायडर

परवा मुलाचय शाळेत अ‍ॅडनिशन कॅन्सल करायला गेले तर म्हणे एकही रुपया फीस वापस मिळणार नाही. म्हणलं कुठे लिहीलय तुम्ही. काही तरी तर पॉलीसी डॉक्युमेन्टेड असेल की.. तर म्हणे बघतो शोधतो.. म्हणलं तुम्ही ISO Certified आहात का? तर हेडबाईंना अत्यंत तुच्छ कटाक्ष टाकुन "शाळांना ISO नसतं" असं सुनावलं. तेव्हा तुमचा हा लेख.. त्यातले फोटो आणि नस्त्या उचापतींचा प्रतिसाद.. सगळंच तोंडावर फेकुन मारावं वाटलं.. पण सगळी खुमखुमी गिळुन "जाउ द्या.. करा अ‍ॅडमिशन कॅन्सल" म्हणुन आले.. नुसता पैसा आणि मोठमोठ्या बिल्डींग आणि फाडफाड इंग्रजीतुन बालमानसशास्त्र फाडणारे लोक असुन काही होत नाही.. हे असे शिक्षक लागतात..

आमच्या गुरुजींचे कार्य आता सगळीकडे दिसुन येत आहे आणि लोक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत हे पाहुन आनंद वाटला. आजकाल प्रत्येक तालुक्यात आणि केन्द्रात अश्या शाळा तयार करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरु झालाय. शिक्षक स्वतः पदरमोड करुन शाळा सजवतात आणि विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अनुभव देण्यासाठी धडपडतात. आम्ही ज्या आदिवासी भागात काम करतो त्या भागातही शहरी मुलांना सहजी टक्कर देणार आणि अभ्यास करणारी पिढी शिक्षक तयार करताना दिसतात. एक उदाहरण देतो. नाशिक जिल्ह्यात पेठ तालुक्यात अति दुर्गम भागात काही शाळा आणि शिक्षक अगदी सुन्दर काम करताना पाहिले आहे. मुले अगदी आत्मविश्वासाने बोलतात. माझा मुलगा शहरी शाळेत जातो पण मला त्याला मिळणार्‍या शैक्षणिक अनुभवांबाबत कायम असमाधान असते. ते फक्त दिखावुपणा करतात. शैक्षणिक क्षेत्रात काय बदल होत आहेत ते यांच्या गावीही नसते. ईगतपुरी तालुक्यात कुरुंगवाडी म्हणुन शाळा आहे. अशीच देखणी.

वेल्लाभट's picture

6 May 2016 - 12:53 pm | वेल्लाभट

म्हणजे?

स्वीट टॉकर's picture

6 May 2016 - 1:27 pm | स्वीट टॉकर

एका अतिशय उत्कृष्ठ कार्याची आम्हाला ओळख करून दिलीत! धन्यवाद !
शाळेची आम्हाला उत्तम कल्पना येईल असेच फोटो काढले आहेत.

तुमची आणि त्यांची हरकत नसेल तर वारे सरांचा फोटो टाकू शकाल का?

वेल्लाभट's picture

6 May 2016 - 2:57 pm | वेल्लाभट

परंतु नेटवर आहेत त्यांचे फोटो. गूगल करा मिळेल लगेच्च. थांबा मीच टाकतो.
https://i.imgsafe.org/4c65fe5.jpg
https://i.imgsafe.org/4ced5b8.jpg
https://i.imgsafe.org/4e5e2d7.jpg

सस्नेह's picture

6 May 2016 - 3:41 pm | सस्नेह

उत्तम उपक्रम !
या सर्वांसाठी आर्थिक तरतूद कोठून केली असेल याबद्दल कुतूहल आहे.

वेल्लाभट's picture

6 May 2016 - 4:02 pm | वेल्लाभट

वाबळेवाडीचं विचारत असाल तर गावातल्या ६६ कुटुंबांनी एकमताने ठरवलं की आपणच पैसे जमवू. ६६ घरांनी १७ लाख रुपये एकत्रित केले.

चांदणे संदीप's picture

6 Feb 2020 - 1:34 pm | चांदणे संदीप

आजच्या सकाळची ही लिंक.

सं - दी - प

अजय खोडके's picture

6 Feb 2020 - 2:50 pm | अजय खोडके

फार सुन्दर माहिती. अश्या शाळा सर्व भारतात असायला ह्व्या. सकाळच्या लिन्क बद्दल धन्यवाद !!

जालिम लोशन's picture

8 Feb 2020 - 11:51 am | जालिम लोशन

अप्रतीम.