वाबळेवाडीची शाळा - विलक्षण प्रेरणादायी अनुभव
ब्लॉग दुवा: http://www.apurvaoka.com/2016/04/wablewadi-school-visit-inspirational.html
ज्या शाळेतून मुलांचा पाय निघता निघत नाही, त्या शाळेला भेट दिल्यावर आमचेही पाय तिथून निघत नव्हते. वाबळेवाडीच्या शाळेबद्दल इंटरनेटवर वाचल्यापासून ती शाळा बघण्याची खूप इच्छा आणि उत्सुकता होती. एका नकोनकोशा वाटणा-या शाळेतून एका हव्याहव्याशा शाळेत झालेलं तिचं रुपांतर आम्हाला बघायचं होतं. तिथली नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती समजून घ्यायची होती. तिथल्या मुलांशी, त्यांना घडवणा-या शिक्षकांशी आम्हाला बोलायचं होतं. त्यानुसार लवकरात लवकर शाळेशी संपर्क साधला, आणि शाळेला भेट दिली. त्या भेटीचा हा सचित्र वृतांत.
शाळेचा नेमका पत्ता नकाशात न दिसल्याने मुख्य हायवेवर एका व्यक्तीला 'वाबळेवाडीला कसं जायचं?' असं विचारताच 'शाळेत जायचंय?' असा प्रतिप्रश्न आला आणि त्या शाळेच्या कीर्तीची पहिली खूण पटली. दत्तात्रेय वारे यांच्या संकल्पनेतून आणि सोबत असलेल्या सर्व शिक्षकांच्या सहयोगातून २०१२ पासून पुढे या शाळेचा कायापालट झाला आणि शाळेने एक उदाहरण इतर शिक्षणसंस्थांसमोर ठेवलं.
दत्तात्रेय वारे, हे वाबळेवाडीच्या शाळेचे मुख्याध्यापक. आम्ही शाळेत जाताच वारे सरांनी आमचं स्वागत केलं. या शाळेचा भूखंड तसा लहान आहे. पण असं असताना त्या जागेचा पुरेपूर आणि प्रभावी वापर केलेला आम्ही बघत होतो. पटांगणातील जमिनीवर विशिष्ट प्रकारे काढलेले अंक आणि अक्षरं, खांबांबर असलेली, खंड, नद्या, पर्वत, ऋतू, इत्यादींची माहिती, फरशांवर आखलेली कोष्टकं, तक्ते, या सगळ्यामुळे लहान जागेतही माहितीचं मोठं भांडार मुलांसाठी भरलेलं होतं. शाळेत मुलांना यावंसं वाटण्यासाठी शाळेतलं वातावरण तसं पूरक हवं, हा वारे सरांचा विचार ठिकठिकाणी दृश्य रुपात दिसतो.
पूर्व प्राथमिकच्या वर्गातील बाईंशी, मुलांशी आम्ही बोलत होतो. त्या मुलांचा धीटपणा बघून खूश व्हायला होत होतं. पाटीवर नावं लिहिणं, चित्र काढणं, असं सगळं आम्ही एका गोलात बसून करत होतो. पूर्व प्राथमिकच्या बाई सांगत होत्या, 'आम्ही मुलांना कसलंही दडपण देतच नाही मुळी. आता आत्ताच सगळे खेळत होते, ते म्हणाले आता आम्ही पाटीवर लिहितो, मी म्हटलं लिहा. हसत खेळत अभ्यास या विचाराला धरूनच इथे गोष्टी शिकवल्या जातात. चांगल्या सवयीही शिकवल्या जातात. म्हणजे वाढदिवस असेल तर आम्ही सांगतो की चॉकलेट आणू नका, आणि खाऊही नका. ते चांगलं नसतं म्हणून. मग पालकही तसं करतात.'
इथे एक गोष्ट सतत जाणवत होती ती म्हणजे कमालीची स्वच्छता. पूर्व प्राथमिक वर्गाला लागूनच असलेलं शाळेचं स्वयंपाकघर इतकं नीटनेटकं होतं, की विश्वास बसत नव्हता.
आम्ही शाळेत जाऊन मुलांसाठी काही कार्यशाळा घ्यायचं, मुलांसोबत मिळून काही गोष्टी करायचं ठरवलं होतं. शाळेत पूर्व प्राथमिक ते पाचवी पर्यंतचे वर्ग भरतात. चित्र काढून झाल्यावर आम्ही इतर इयत्तांच्या मुलांना एकत्र घेऊन सगळ्यांना एका पुस्तकातल्या दोन गोष्टी सांगितल्या.
गोष्टी ऐकताना मुलांचं असणारं लक्ष, पडणारे प्रश्न, त्यांनी दिलेली उत्तरं हे सगळं खूप छान होतं. मग मुलांना बॅडमिंटन शिकवत व खेळत पुढे काही वेळ आम्ही व्यतीत केला. उत्साह, आणि आत्मविश्वास हे दोन गुण प्रत्येक गोष्टीत इथली मुलं दाखवत होती. बॅडमिंटन खेळतानाही ते दिसत होतं. आपल्याला कळलेलं आणि दुसर्याला न जमणारं असं सगळं त्याला स्वतःहून मुलं समजवून सांगत होती. नेतृत्वगुण, व्यवस्थापन वगैरे कुठल्याही संज्ञा ठाऊक नसलेली मुलं हे सगळं आत्मसात करून होती. कबड्डी खेळतानाही त्यांच्यातला जोश बघून दोन मिनिटं आम्हीही मागे सरलो.
इथे विद्यार्थ्यांना शक्य असलेली प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून दिलेली आहे. अनेक पुस्तकं, जवळजवळ प्रत्येक खेळासाठी लागणारी उपकरणं, अनेक वाद्यं, वैज्ञानिक उपकरणं, टॅबलेट्स, कॉम्प्यूटर, असं सगळं या शाळेत आहे. वारे सर म्हणाले, 'गोल्फ सोडून सगळ्या खेळांचं साहित्य इथे आहे. मुलांना सगळं काही उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे'. शिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक, इतर चांगले चित्रपटही दाखवले जातात. विद्यार्थ्यांना 'तुम्हाला तुमच्या शाळेबद्दल काय आवडतं?' असं विचारल्यावर 'सगळंच' आणि 'तुम्हाला तुमच्या शाळेत अजून काय हवं असं वाटतं?' असं विचारल्यावर 'काहीच नाही. आमच्या शाळेत सगळं आहे.' अशी मिळालेली उत्तरं ही ख-या अर्थाने वारे सर आणि इतर सर्व शिक्षकांच्या कष्टाची पावती आहे.
या शाळेतली अशी एक एक गोष्ट बघत आम्ही प्रेरित होत होतो. वारे सरांशी बोलताना सर म्हणाले, 'ही शाळा जेंव्हा या बदलातून गेली, तेंव्हा आमचं बघून जिल्ह्यातल्या इतर अनेक शाळांनी याप्रकारे शिक्षणपद्धतीत बदल केले. आमच्या शाळेला क्रमांक एकची जिल्हापरिषद शाळा ठरण्याचा मान मिळाला असून त्याबद्दल फार आनंद होतो. आज आसपासच्या इंग्रजी शाळातून मुलांना काढून पालक आमच्या शाळेत प्रवेश घेतात, लांबलांबहून घेऊन येतात. आणि इथली मुलं निश्चितच इतर मुलांपेक्षा उजवी ठरतात'
उन्हाळ्यात फ्रीजमधलं पाणी पिऊ नये, त्याने आजारी पडण्याचा धोका असतो यासारखी लहान पण महत्वाची गोष्ट, किंवा आपण जसं एखाद्या मित्राकडे पेन्सिल नसेल तर त्याला आपल्याकडची जास्तीची पेन्सिल देऊन मदत करतो, तसंच आज आपल्या राज्यात अनेक शेतकर्यांकडे शेतीला पाणी नाही, पैसे नाहीत तर आपण आपल्याला शक्य होईल तितकी मदत त्यांना करायला हवी यासारखी गोष्ट जितक्या उत्तमप्रकारे समजावून इथले खैरे सर मुलांना सांगत होते, तितक्या प्रेमाने आजकाल फार कमी शिक्षक मुलांशी बोलत असतील. या शाळेत एकंदरितच मुलांना चांगल्या सवयी लावणं, चांगले विचार पेरणं याला शिक्षक प्राधान्य देतात.
माध्यमाबद्दल विचारलं असता वारे सर म्हणाले, 'काही गोष्टींच्या बाबतीत आम्ही ठाम आहोत. त्यामुळे आम्हाला सीबीएसई, सेमी इंग्लिश इत्यादी पर्याय खुले असूनही आम्ही त्यांचा विचार केला नाही. शेवटी ज्ञान महत्वाचं की भाषा हे ठरवायचं आहे. शाळेचं माध्यम मराठीच आहे, कारण आपली, मुलांची मातृभाषा मराठी आहे. परंतु पहिलीपासून हिंदी व इंग्लिश या भाषा शिकवल्या जातात आणि त्यामुळे मुलांना कुठेच भाषेची अडचण येत नाही.' याची प्रचीती जेंव्हा पूर्व प्राथमिकच्याही मुलांनी आम्हाला इंग्लिशमधे आपली नावं सांगितली, तेंव्हा आलीच.
इथली मुलं अनेक खेळांमधे आणि कलांमधे पारंगत आहेत आणि त्याचं बरंचसं श्रेय वारे सरांना जातं. मुलांना नेमबाजी शिकवता यावी यासाठी स्वतः बालेवाडीला जाऊन नेमबाजीचं प्रशिक्षण घेऊन येणं, मुलांना प्रशिक्षण देणं आणि राज्यस्तरावर पदक जिंकणारी मुलं त्यातून घडवणं हे मोठ्या जिद्दीचं आणि त्याहूनही जास्त आत्मीयतेचं उदाहरण वारे सरांच्या रुपात या शाळेत आहे.
वारे सर सांगत होते, 'अडचणी, प्रश्न आमच्यापुढेही होते. पण फरक इतकाच की आम्ही आमच्या पद्धतीने त्यावर उत्तरं शोधली आणि पुढे गेलो. यात पालकांचा सिंहाचा वाटा आहे कारण आजवर आम्ही जेंव्हा जेंव्हा हाक दिली तेंव्हा तेंव्हा आमच्या मदतीला पालक उभे राहिले आणि आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला मदत केली. निवडणुका या गावातही होतात पण शाळा ही सर्वांची आहे आणि सर्वांसाठी आहे हे गावकर्यांनी समजून घेतलं म्हणूनच हे साध्य झालं.'
या शाळेत पालकांचा सक्रीय सहभाग असतो. एखादी गोष्ट एखाद्या पालकांना उत्तम येत असल्यास ती ते मुलांना शिकवू शकतात. अशाच एक पालक या मुलांना कला, व कार्यानुभव शिकवतात. कला दालनात गेल्यावर मुलांनी काढलेली चित्र, तयार केलेल्या गोष्टी बघताना थक्क व्हायला होतं.
आम्ही जितकं वाचून गेलो होतो त्याच्या कित्येक पटीत प्रेरणादायी आमचा हा अनुभव होता. एका मुलाला वारे सरांनी आमच्यासमोर तिनाच्या पटीतले अंक, पंधराचे निम्मे किती, साताचे निम्मे किती, साडेतीन च्या अर्धे किती, अमूक अमूक रुपये कुणाला द्यायचे असल्यास कितीच्या किती नोटा द्याव्यात असे प्रश्न विचारले आणि त्याची त्या मुलाने एकेक सेकंदात उत्तरं दिली. सर जेंव्हा म्हणाले की हा मुलगा पहिलीत आहे आणि त्याला गणितासारखं गणित शिकवलेलं नाही, तेंव्हा हसत खेळत शिक्षण किंवा ज्ञानरचनावाद या विषयी आणखी प्रश्नच आमच्याकडे उरले नाहीत.
'आमच्याकडे जेंव्हा पुरेशी जागा असेल तेंव्हा आज जी मराठी शाळांची अवस्था आहे, की त्यांच्याकडे मुलं फिरकतही नाहीत, ती अवस्था इथल्या इंग्रजी शाळांची होईल असा आम्हाला विश्वास आहे', हे वारे सरांचं म्हणणं आणि त्यांचा हाच विनम्र आत्मविश्वास हा खर्या अर्थाने या शाळेचा कणा आहे. वाबळेवाडीत या वर्षीही जागांच्या तिपटीपर्यंत प्रवेश अर्ज आले. अनेक मुलं अशी आहेत ज्यांना इंग्रजी, सीबीएसई शाळांतून काढून पालकांनी वाबळेवाडीच्या या शाळेत घातलं आहे, आणि लांबलांबहून इथे ती येतात.
शिक्षण या गोष्टीचा आपल्याकडे प्रचंड बाऊ केला जातो आणि त्याचा मुलांवर होणारा वाईट परिणाम 'स्पर्धेचं युग' म्हणून झाकला जातो. विशेषतः शहरांत हे लोण जास्त पसरलेलं आहे. त्यातही शाळेत दिल्या जाणा-या शिक्षणापेक्षा शाळेचं नाव, बोर्ड, माध्यम, दिखाव्याच्या सुविधा, आणि अनेक अनुचित गोष्टींकडे शाळेच्या दर्जाचं मापक म्हणून बघितलं जातं आणि तिथेच मुलांची फरफट सुरू होते. सगळं असूनही जिथे शहरातल्या अनेक शाळा अपुरी अनुदानं, अपुरं सहकार्य आणि इतर अनेक कारणं देतात, तिथे वाबळेवाडीच्या या शाळेने गाठलेली ही उंची कमालीची स्तुत्य आहे. तेंव्हा पुढे आपल्या मुलासाठी शाळा निवडताना योग्य निकषांचा यथोचित विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे.
आज पुणे जिल्ह्यात अनेक शाळांनी वाबळेवाडीच्या शाळेसारखी शिक्षणपद्धती अवलंबली आहे. असं म्हणायला हवं की सकारात्मकता ही संसर्गातूनच पसरते, त्याचे डोस देता येत नाहीत. शिक्षणातली ही सकारात्मकता पुण्यामुंबईतही नक्कीच पसरेल, परंतु शाळांच्या आधीही पालकांनी त्यासाठी तयार असणं गरजेचं आहे. तेंव्हा शक्य असल्यास जरूर या शाळेला भेट द्या आणि सहसा शाळेत जाताना मुलांच्या चेहर्यावर न दिसणारा आनंद बघा. या शाळेत येऊन गेल्यावर आमच्यासारखंच तुम्हालाही कदाचित विद्यार्थी म्हणून पुन्हा एकदा 'अशा' शाळेत जावंसं वाटेल.
'पुन्हा कधी येणार?' या मुलांनी विचारलेल्या प्रश्नाला 'लवकरच येऊ हं, नक्की' हे उत्तर आपसुक आमच्याकडून आलं. कारण आमच्यासाठी इतकं भारून टाकणारा हा अनुभव फार वेगळी ऊर्जा देणारा होता.
http://www.zpschoolwablewadi.org/
Google Maps Link
प्रतिक्रिया
उत्कृष्ठ कार्य
काढला नाही
उत्तम उपक्रम !
वाबळेवाडीचं विचारत असाल तर
.
सुन्दर माहिती
+1
Pagination