ओळखले का?
"ए शुक शुक"
"ए अरे थांब"
अचानक मागून आवाज येतो पण स्वतःला "ए" ह्या नावाने कोणी हाक मारेल असे जरासे विस्मरणात गेले असल्याने हो...हो..थांबा जरा सविस्तर सांगतो तर आपण सगळे नोकरी-व्यवसायानिमित्त एका विशिष्ठ पदावर काम करत असतो आणि ते पद म्हणजेच आपली ओळख होते.
म्हणजे कोणी दुकान,हार्डवेअर स्टोअर,हॉटेल या व्यवसायात असेल तर "शेठ' या विशेषणाने तर कोणी बँक मॅनेजर,बिजीनेसमन,डॉक्टर,वकिल ,सरकारी अधिकारी या पदावर असेल तर "सर" "साहेब" अशा विशेषणानेओळखले जातो.
आणि विशेष म्हणजे समाजात सुद्धा आता एक वेगळीच छाप असल्याने "आबा" "आप्पा" "दादा" "भाऊ" अशी काहीशी ओळख निर्माण झालेली असते.
तर "ए" अशा एकेरी नावाने आवाज आल्यावर मी दुर्लक्ष केले आणि पुढे जाऊ लागतो तर आता मागून
"ए हॅलो!!! अरे थांब जरा."
अशी काहीशी अनपेक्षित हाक ऐकू येते आणि मी आश्चर्यचकित होऊन थांबतो.
साधारण ४० च्या घरातील एक व्यक्ती किंचित मळकट कपड्यात असलेली माझ्याकडे पाहून एका हातात भलीमोठी जड पिशवी व दुसऱ्या हाताने मला थांबायचा इशारा करत भरभर चालत येते आणि जवळ येताच हातातील पिशवी खाली ठेवून खिशातून रुमाल काढत कपाळावरील घाम पुसत मला म्हणाते....
"का रे ओळखले नाहीस का?"
जगात मी ३ गोष्टींना खूप घाबरतो आता तसा मी बऱ्याच गोष्टींना घाबरत असतो पण आता ३ गोष्टीच विचारात घेऊया.
हां तर काय म्हणत होतो तर मी जगात ३ गोष्टींना खूप घाबरतो ...
१) मी नेमका गडबडीत असतो मोबाईलवर रिंग वाजते स्क्रिनवर अनोळखी नंबर येतो जरासा विचार करून मी फोन घेतो आणि समोरून आवाज येतो "हॅलो ओळखले का मी कोण बोलतोय.?"
२)बायको बरोबर तिच्या माहेरच्या एखाद्या कार्यक्रमात गेलेलो असतो माझ्या सारख्याच चुकलेल्या एखाद ४-५ जावयांबरोबर थोड्याशा गप्पा सुरु असतात आणि अचानक एखादी वयस्कर व्यक्ती समोर येते आणि आमच्याकडे पाहून बोलते ...
"नमस्कार पाव्हणं वळखलं का नाय?" आता ते नेमके कोणाला बोलले हे न कळाल्याने एकाच बॉल मध्ये आमच्या ४-५ जणांच्या विकेट पडतात.
३) कोठेही अगदी कोठेही तुम्ही विचारही करू शकत नाही अशा ठिकाणी एखादी व्यक्ती भेटते आणि चक्क माझे नाव घेत बोलते..
"काय राजु ओळखले कि नाही?"
आई शप्पथ !!! अशा वेळी मी टोटल ब्लँक होतो. हो नाहीतर काय एकतर मी वेगळ्याच विचारात असतो. आणि अचानक जर कोणी असे विचारले तर काहीच लिंक लागत नाही कारण एकतर साधारणपणे १०वी-१२ वी नंतर म्हणजे वय वर्ष १६-१८ व्या वर्षा नंतर माझ्यात जो काही बदल झाला आहे त्यातल्या त्यात वयाच्या ३२-३४ व्या वर्षी जो काही फार मोठा बदल झाला आहे.त्यातही मला ओळखणारा कोणी भेटला कि माझ्या मनात त्याच्या विषयी प्रचंड आदर वाढलेला असतो आणि मी समोरच्याला ओळखू शकत नसल्याने स्वतःवर अतीप्रचंड चिडलेला असतो.
आणि समोरचा तर चक्क युगे अठ्ठावीस उभा विटेवरी मधिल पांडुरंगा सारखा कमरेवर हाथ ठेवून उभा असतो.आणि मी समोरच्याकडे तो मंगळ ग्रहावरचा एखादा एलियन आहे अशा प्रकारे पहात असतो.
समोरचा मात्र माझी कसलीही अवस्था झालेली असली तरी किव न करता "ओळख पाहू?" हे कोडे नव्हे सापशिडीचा पट मांडून उभा असतो.आणि मी बिचारा त्या सापशिडीच्या खेळात बालपणापासून म्हणजे अगदी बालवाडी पासून आत्ता परवा झालेल्या नविन ओळखी पर्यंत सगळ्या झालेल्या ओळखीच्या शिड्या चढत असतो आणि प्रत्येक वेळी समोरच्याचा अनोळखी चेहरा सापासारखा मला परत आहे त्या ठिकाणी आणत असतो.
आता जवळ जवळ १०-१५ मिनिटे झालेली असतात काल परवा झालेल्या नविन ओळखीपर्यंत हा समोरचा एलियन सॉरी..सॉरी.. मनुष्य काही माझ्या लक्षात येत नाही त्यामुळे मी सपशेल हार मानलेली असते आणि तसे नाखुषीनेच मी कबूल करणार तेवढ्यात समोरचा तो सापशिडीतल्या सापासदृश्य मनुष्य मला एका वेगळ्याच नावाने आवाज देतो.
क्षणभर त्याने उच्चारलेले नाव माझेच असू शकते असे मनात येते पण माझा चेहरा मात्र अजूनही गोंधळलेला पाहून आता समोरचा सुद्धा थोडासा गोंधळतो आणि परत त्या नावाचा उच्चार करतो.पण मी मात्र तसाच उभा असलेला पाहून मात्र समोरचा जास्तच गडबडतो.
तिसऱ्यांदा जेंव्हा तो ते अनोळखी नावाने मला ओळख दाखवतो तेंव्हा माझी खात्री होते कि समोरच्याची काहितरी गफलत झाली आहे आणि तो आपल्याला दुसराच कोणीतरी समजला आहे.
हे त्याच्याही लक्षात येते क्षणभर आम्ही दोघेही एकमेकांकडे अवघडल्यासारखे पहात राहतो मग अचानक तो हात पुढे करत म्हणतो
"सॉरी हं मी तुम्हाला तो अमका तमका समजलो होतो.सॉरी ...रिअली वेरी सॉरी."
हुश्श!!!
एकदाचे मनावरचे ओझे कमी झाल्यासारखे वाटते आणि मी सुद्धा त्याच्या हातात हात देत
"इट्स ओके होते असे कधी कधी.''
म्हणतो आणि आम्ही दोघेही आता एकमेकांना खूप जुने मित्र असल्या सारखे बाय बाय करतो व आपापल्या मार्गाला निघतो.
आता मी थोडेसे अंतर पुढे येताच मागून एका महिलेचा नाजूक आवाज येतो..
"अहो..अहो ऐकता का?"
मी मागे वळून पहातो तर एक अनोळखी मध्यमवयिन सुंदर महिला मला थांबवत घाई घाईने माझ्या जवळ येते आणि म्हणते...
" ओळखले का?"
©राजू सोपान लोंढे.
वाचने
4101
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
खुमासदार
In reply to खुमासदार by श्रीरंग_जोशी
धन्यवाद.
लेखाचा शेवट लई ग्वाड केला राव
In reply to लेखाचा शेवट लई ग्वाड केला राव by विद्यार्थी
धन्यवाद
लेखन आवडले पण तुम्ही मला
In reply to लेखन आवडले पण तुम्ही मला by रेवती
हा...हा..हा
In reply to लेखन आवडले पण तुम्ही मला by रेवती
हा...हा..हा
"अरे असं काय करतो पुरूषोत्तम
समक्ष भेट झाल्यावर " काय ,
In reply to समक्ष भेट झाल्यावर " काय , by जयन्त बा शिम्पि
हा...हा..हा
In reply to समक्ष भेट झाल्यावर " काय , by जयन्त बा शिम्पि
किंवा मग, "नाही मी "ओळखले"
In reply to किंवा मग, "नाही मी "ओळखले" by अत्रे
नाही मी "ओळखले" नाही, मी
सही लिहिलय
जबरा
In reply to जबरा by नाखु
छान आयडीया दिली आहे.
वा.. मस्त सर्वांच्या मनातलं
In reply to वा.. मस्त सर्वांच्या मनातलं by गवि
धन्यवाद.